अन्नपुर्णा आणि अण्णा-२ (वसंत शिंदे)
आता ‘सातो दिन भगवानके, क्या मंगल क्या पीर’ असं असलं तरी कॉलेजच्या काळात शुक्रवारी संध्याकाळीच ‘रविवार’ चढायला लागायचा. आणि त्याचा हॅंगओव्हर मंगळवारपर्यंत टिकायचा. (वेगळा अर्थ काढू नका.) यादीच फार मोठी असे. रद्दीची दुकाने पालथी घालणे, पेपरची कात्रणे काढणे, अप्पा बळवंतला जावून ऊगाचंच पुस्तकांच्या दुकानात पुस्तके चाळणे, मित्राच्या रुमवर तबला-पेटी घेऊन मैफील रंगवणे. (कुणी काही म्हणो, आम्ही तिला मैफीलच म्हणायचो) शंकरच्या स्टुडीओत जावून मातीशी खेळणे असल्या अनेक भानगडी असायच्या. त्यामुळे कॉलेजच्या कामासाठी खऱ्या अर्थाने दोनच दिवस मिळायचे. बुधवार आणि गुरुवार. रविवारी जाग यायची तिच पसाऱ्यात.