आता काही महिन्यांपूर्वीपर्यंत मला फक्त मेल मधलं एफ वाय आय तेवढं माहीत होतं.पण घरातल्या छोट्या प्राण्यांच्या कृपेने बरेच 'डू ईट युवरसेल्फ' व्हिडीओ बघायला मिळाले.छान दिसणारा लांब टीशर्ट फाडून त्याचा मिनीस्कर्ट आणि क्रॉप टॉप करणे,सुंदर लांब अंगभर स्कर्ट ला मध्ये शिवून त्याचा जम्पसूट करणे, गाडीत मिडी अडकून अर्धा फाटला तर त्याचा सरोन्ग करणे ,चांगल्या चांगल्या वस्तुंना छिद्र पाडून आत वेगळ्या रंगाची बुटाची लेस ओवून पार्टीत घालण्यायोग्य शॉर्ट ड्रेस बनवणे,बाटल्या उभ्या कापून त्यात टिश्यू रोल ठेवणे वगैरे प्रकार बघायला चांगले होते.आपल्या खिश्याला काही चाट बसत नव्हता.कधीकधी 'ए भवाने, फॅशन स्ट्रीट ला 150 रुपयात मिळतोय ना तो चिमुकला स्कर्ट, त्यासाठी गॅप चा 20 डॉलर चा टीशर्ट फाडायची अवदसा कुठून आठवली?' वगैरे सात्विक संताप उद्गार सोडले तर बाकी मस्त करमणूक होती.
आता सर्वांची दीर्घकाळ घरात राहण्याची फेज चालू झाली आणि हे डी आय वाय अरबांच्या उंटासारखं घरात घुसलं. जुन्या कॉटन पॅन्ट फाडून त्याचे मास्क बनवणे, त्यासाठी जुन्या लेगिंग/बर्म्युडा मधले इलास्टिक कापून किंवा स्वतःचे नवेकोरे केसांचे रबर्स अर्धे कापून त्यांना जखमी करणे असे प्रकार चालू झाले.शांतपणे बघणे आणि अधून मधून 'स्वच्छ धुतलेले वापरा रे कपडे' असे रोबो सारखे सतत बडबडत राहणे या शिवाय पर्यायच नव्हता.
यात 'आम्ही बनवलेले नवे पदार्थ बघा'आणि 'नवे पदार्थ काय बनवताय, इथे माणसं मरतायत' असे 2 विरुद्ध विचार प्रवाह असलेल्या 2 कुटुंब व्हॉटसप गृपात समतोल साधायला 'नवे पदार्थ पूर्ण एक जेवण' असा एक जुगाड पर्याय काढून पदार्थ डी आय वाय वाल्या सापळ्यात आम्ही अडकलोच. सामोसे चांगले झाले,कचोऱ्या करताना जीरा पावडर ऐवजी अगदी सारखं पाकीट असलेली ज्येष्ठमध पावडर ढकलली गेली तरी सारणाला कळू न देता अलगद हे घोळ निस्तारले आणि कोणालाही पत्ता लागू दिला नाही.तो डालगोन्या कॉफीचा मैलाचा दगड पण यशस्वी पणे पार पाडला.फेसबुकवर डालगोना कॉफी च्या इतक्या पोस्ट होत्या की 'डालगोना नाही केलीस, दूर हो जा मेरी फ्रेंड्स लिस्ट से' असं सगळे फेसबुकजिवलग घेराव घालून भाले टोचून म्हणतायत अशी स्वप्नं पडायला लागल्यावर डालगोना प्रयोग अटळच होता.
हे सगळे प्रयोग करून आत्मविश्वास वाढल्यावर एका शनिवारी 'पाणीपुरीची पुरी घरी' वाल्या घातक उपक्रमाची सांगता झाली.तरी रेसीपीत त्या समंजस बाईने स्पष्ट लिहिलं होतं की 'पुऱ्या सहज आणि भरोसेमंद जवळपास विकत मिळत असतील तर तो सोपा उपाय आहे.' हा इशारा अगदी खास माझ्यासाठीचा ईश्वरी संकेत वाटत होता.पण एकदा आली लहर की कहर केलाच पाहिजे.
अगदी काटेकोर मोजून 1 कप रवा 2 चमचे मैदा घेतला.काटेकोर मोजून एक अष्टमांश बेकिंग सोडा घेतला.काटेकोर मोजून चमचा चमचा पाणी घालत पाणीपुरी कणकेचा वृक्ष फुलवला.घरातला दुसरा प्राणी 'मी एकटा राहायचो तेव्हा मी आणि माझ्या रूममेट ने पाणीपुरी पुऱ्या करून पाणीपुरी बनवून खाल्ली होती' याची दवंडी आजन्म पिटत आल्याने त्याला पकडून जवळ उभा केला.नैतिक आधार म्हणून.आणि पुऱ्या तळायला घेतल्या.त्या काही फुगेचनात.अगदी तेलात टाकल्यावर अर्धचंद्र झाला म्हणून खुश होऊन पुरी उलटावी तर मागे अर्धचंद्राकृती विहीर निर्माण झालेली दिसायची. पुऱ्या चांगल्या चवीच्या, खुटखुटीत वगैरे झाल्या पण एकही शहाणी शेवटपर्यंत फुगली नाही.
"नक्की रेसिपी बरोबर वाचली ना तू? 2 चमचे रवा आणि 1 कप मैदा असेल."
"मी पाच वेळा वाचलीय."
"नक्की रवाच घातलाय ना?"
"आणि काय घालणार? रव्या सारखं दिसणारं आणि काय असतं जगात?"
"भगर बिगर नाही घातलीस ना?"
"ओह फिश!!(हे मला आवडतं म्हणायला. आता आताच शिकतेय.) अरे परमेश्वरा!!"
म्हणजे ही चूक दुसऱ्या प्राण्याचीच.आमच्या घरात नेहमी त्याचीच चूक असते.शेजारच्या बाईला याने तांदूळ दिले.मी अंघोळीला गेले होते तेव्हा.तांदळाच्या डब्यात अगदी थोडी राहिलेली भगर होती.(तांदळाच्या डब्यात का, असं कसं, पिशवीवर चिठ्ठी का नाही वगैरे प्रश्न विचारल्यास दात पाडीन.आमच्यात असंच असतं.) ती पिशवी त्याने काढून ओट्यावर रव्याच्या पिशवी शेजारी ठेवली.म्हणजे अर्धी भगर, अर्धा रवा आणि 2 चमचे मैदा असं सारण बनलं होतं.
"आपण ना याचं वेगळं काही करूया.म्हणजे नुसती पोळी लाटली आणि भाजली तर?"
"करता येईल.खाणार कोण?"
"पुरी मालपोआ?करंजी?मोमोज?"
"हे बघ, मुलं पावभाजीत थोडा लाल भोपळा आवडीने खातात असली तरी भगर रव्याचे मोमो खाण्याइतकी येडी नाही झाली अजून."
"मग काय करणार?"
"पाणीपुरी साठी उकडलेले मूग आलं मिरची लसूण वाटून घालून ते सारण भरून मसाला करंज्या."
तो नाही का, एक संन्यासी होता, त्याने कफनी उंदीर कुरतडतो म्हणून मांजर आणली, मग मांजरीला दुधाला गाय आणली.आणि गायीला सांभाळायला बायको आणली.तसं हे सुधार प्रकरण वाढतच चाललं होतं.शेवटी चार तिखट करंज्या, एक तिखट मोदक,1 कचोरी, अनेक कडक शेवपुरी पुऱ्या, त्यावर बटाटा चटणी मूग शेव घालून एस पी डी पी अश्या प्रकारे पाणीपुरीचे सर्व पुरावे नष्ट करण्यात आले.'जेव्हा आयुष्य तुम्हाला न फुगणाऱ्या पाणीपुरी पुऱ्या देतं तेव्हा पापडी चाट किंवा शेव बटाटा दही पुरी करा' असं साध्वी अनुमी यांनी म्हणून ठेवलंच आहे.
घरात थोडा खराब झालेला गूळ होता.'खराब झालेला गूळ' असलेली मला एकाच रेसिपी माहीत आहे: दारू.मग जरा गुळापासून दारू वर गुगल करून झालं.
"तुला साधी पुरणपोळी मोठी बनवता येत नाही.दारू कशी बनवणार?"
"सोपी असते.लोक मिथाईल स्पिरिट पिऊन मरतात. आपण त्यांना ऑरगॅनिक गुळाची, आयर्न आणि पचनशक्ती वाढवणारी दारू बनवून ऑनलाइन विकू."
यावर दुसऱ्या प्राण्याने अत्यंत तुच्छतेने मान उडवून माझा आत्मविश्वास डळमळीत केला.त्यामुळे या गुळाचं झाडांना घालायला जीवामृत बनवायचं ठरलं.'देशी कपिला गाईचं शेण व मूत्र असल्यास उत्तम.' हे वाचून परत एकदा अडखळायला झालं.आमच्या घराजवळच्या गोठ्यातला माणूस अजिबात अवेअरनेस वाला नाही.त्याला हे देशी कपिला वगैरे सांगितलं तर म्हशीचं नाव कपिला ठेवून तिचं शेण खपवेल. पण जीवामृत करायचंच नक्की.पुढच्या आठवड्यात.तो खराब झालेला गूळ काय एक आठवडा थांबावं लागलं म्हणून आत्महत्या करणार नाहीये.
डी आय वाय मध्ये पुढची साथ आमच्या घरात आली ती म्हणजे केस स्वतः कापायची.युट्युबवर त्याचे पण खूप व्हिडीओ होते.एक शेंडी कपाळावर बांधून पुढे घेऊन एक रबर लावून कापून टाकायची किंवा डोक्याचे चार भाग करून चार रबर लावून कापून टाकायचे(डोके नाही, केस) किंवा बोकडाच्या दाढीप्रमाणे दोन्हीकडून बटा घेऊन हनुवटीवर त्यांना एक रबर बांधून कापून टाकणे वगैरे बरेच प्रकार होते.जिचे केस सरळ लांब आणि कापायला सर्वात सोपे ती घाबरून इकडे तिकडे पळणार आणि ज्या मेम्बरांचे केस कापायला छोट्या लेयर म्हणून कठीण ते 'तू काप बिनधास्त,बिघडले तरी शाळा चालू होईपर्यंत वाढतील' म्हणून डोकं ताब्यात देऊन बसलेले.'केस कापले नै तर आकाश कोसळणार नाहीये' हे मात्र मी धरून कोणीही मानायला तयार नव्हतं.मग शेंड्या बांधून केस कापणे, मग कात्री घेऊन उभे उभे कातरुन लेयर्स करणे, मग एकीकडे लेयर्स लहान झाले म्हणून दुसरीकडे कातरणे असा बाल वॉशिंग्टन पणा चौफेर चालू झाला.सुदैवाने केस कातरलेली सगळी मेम्बरं बरी दिसत आहेत.घरातील सर्वात मोठे प्राणी कात्री पहिली तरी दचकत आहेत.पण त्यांनीही ही डी आय वाय ची गंगा पाहून व्हिडिओ बघून स्वतःचे केस रंगवून घ्यायला परवानगी दिली आहे.'इकडचे लेयर्स मोठे' च्या नादात केस जरा लहान कापल्याने मी पुढचा किमान दीड महिना व्हिडीओ कॉन्फरन्स करणार नाहीये.पण बाकी आमच्या डी आय वाय आयुष्यात सर्व मजेत चालू आहे.जीवामृत केलं की फोटो टाकतेच.घाबरू नका.फोटोला शेणाचा वास येणार नाही.
धम्माल
धम्माल![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मटकी खपवण्यासाठी पाणीपुरी बनवण्याचा सल्ला दिलात तेव्हा हे सगळं चालू होतं का घरात?
नाही गं सोने
नाही गं सोने
त्याच्या नंतर एक आठवड्याने आठवली ही अवदसा ☺️☺️
साध्वी अनुमी!! : हाहा: लाॅक
साध्वी अनुमी!! : हाहा: लाॅक डाऊन डायरी आवडली.
जबर लिहिलंय!
जबर लिहिलंय!
भारी
मी पण स्वतःचे केस स्वतः कापले आहेत , नॉट बॅड
जबरदस्त. अर्धचंद्राकृती विहीर
जबरदस्त. अर्धचंद्राकृती विहीर![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
छान
छान
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मीही मुलाचे केस बेकार कापलेत
मीही मुलाचे केस बेकार कापलेत आता शाळेच्या झुम मिटींगमध्ये टोपी घालून बसतो .![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान
बाकी सगळं टाळलं पण पाणीपुरीची
बाकी सगळं टाळलं पण पाणीपुरीची पुरी मात्र करून पहावीच लागली! माझ्या पुऱ्या फुगल्या पण.. पण कडक नाही झाल्या![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
लेख फर्मास झाला आहे हे वेगळं सांगायला नकोच!
प्रतिसादांबद्दल धन्यवाद मंडळी
प्रतिसादांबद्दल धन्यवाद मंडळी.
जिज्ञासा, तुझ्या आणि माझ्या पुरयांचा आत्मा एकत्र केल्यास आयडियल पाणीपुरी पुरी बनेल(तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा सारखं ☺️)
मस्त!
मस्त!
खुसखुशीत ....
खुसखुशीत ....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खराब झालेला गूळ' असलेली मला एकाच रेसिपी माहीत आहे: दारू.
>>> टाका कि रेसीपी..
mi_anu, लेख चटकदार झाला आहे.
mi_anu, लेख चटकदार झाला आहे. पाणीपुरी सारखा! - विकतच्या!! तुम्ही बनवलेल्या नाही!!![Bw](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/bw.gif)
क्रॅप्स, गुगल करा ☺️☺️भरपूर
क्रॅप्स, गुगल करा ☺️☺️भरपूर सर्च झालेली टर्म आहे.
बहुधा गूळ, नवसागर,पाणी घालून उकळतात.त्याला एक कंडेन्सशन सारखं प्रयोगशाळा उपकरण लागतं
आणि जमा होणाऱ्या वाफेचं पाणी लोक पहिल्या धारेचे म्हणून पितात.
जाऊदे मला अटक व्हायची.गुगल करा.
फ्रीज मध्ये द्राक्ष आणून दोन
फ्रीज मध्ये द्राक्ष आणून दोन आठवडे झाले तरी ती संपली नाहियेत बघुन मी पण काल 'यीस्ट नसताना घरच्या घरी वाईनच्या' रेसिपी वाचल्या आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पापु आमच्या ही करुन झाल्या. खायच्या वेळेला आवन मध्ये टाकल्या की भैयाचा दिवा इफेक्ट येऊन मस्त कुरकुरीत बनतात पापु.
गूळ खराब झालेला कसा ओळखायचा?
गुळाच्या दारूचे डीआयवाय नक्की लिहा. केस कापायची नका लिहू मात्र. फार बोर होतात.
माझी मॅनेजर 'ओह्ह शूट' म्हणायची. बघा तुम्हाला आवडलं तर!
आमचं पण हेच चालू आहे.. रोज
आमचं पण हेच चालू आहे.. रोज नवं काहीतरी असतेच..आम्ही रोज आईला काहीतरी मागत असतो आमच्या डी आय वाय साठी ती तर जाम वैतागली आहे..
प्राण्याला पकडून उभा केला >>
प्राण्याला पकडून उभा केला >> डोळ्यासमोर आलं..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
खुसखुशित एकदम.
खुसखुशित एकदम.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अनु
अनु![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मला पण त्या पाणीपुर्या करायच्या फार मनात येतयं. पण रेसीप्या इतक्या उलट सुलट आहेत कि धाडस होत नाही आहे. परवाच एक प्रयोग रसगुल्ल्याचा फसलाय. गोळे तरंगतील म्हटलेली यु ट्युबवरची बाई . माझे जे तळाशी बसले ते बसलेच. आले नाहीत वर.
सीमा घ्या
सीमा
घ्या
तुमची एक स्टेप राहीली. केशराने त्या प्रत्येक रसगुल्यावर "श्रीराम" असे लिहायचे असते.
गूळ खराब होतो? खराब झालेला
गूळ खराब होतो? खराब झालेला गूळ कसा ओळखायचा हे शोधणे आले. पाणीपुरी पुर्या घरी करणारे भारीच असतात. तुझ्या भगर पुर्या आवडल्या...वाचायला..
अनु तुम्ही दिलेल्या कृतीने
अनु तुम्ही दिलेल्या कृतीने दारू बनवायला घेतली आहे.... रिपोर्ट देतो आज रात्री पिऊन...
खराब गूळ.. म्हणजे ती बादली
खराब गूळ.. म्हणजे ती बादली असते ना ती चिकट चिकट दिसते.रंग बदलतो.
पाफा, आधी सांगायचं ना, मी पण प्रत्येक पुरीवर राम लिहिलं असतं, माझ्याही पुऱ्या तरंगल्या असत्या कढईत.
(No subject)
मस्त शैली आहे तुमची!
मस्त शैली आहे तुमची!
(No subject)
बर्याच बाबतीत “अगदी अगदी“
बर्याच बाबतीत “अगदी अगदी“ झाले.
आम्ही, कस्क काय ग्रूपवर ज्ञान मिळवून, जुने नवर्याचे बनियान फाडून मास्क बनवले.
पदार्थ वगैरे मी कमीच केले पण मायबोलीवरील, “खाउगल्ली- आजचा मेनू“ वरील लोकांचा उत्साह पाहून कमाल वाटते.
इथे मला, रांधा, वाढा व उष्टी काढाचाच कंटाळा आलाय, मग लादी, भांडी , कपडे. म्हणजे घरातील सगळेच जण काम करतो पण, घरात ‘आळशी बुडाचीच’ लोकं ज्यास्त असल्याने, त्यांच्या बुडाला हलवण्याचे एक मोठे काम मलाच असते. त्यात, त्यांचे डी-वा-आय प्रयोग ...
घरात, हँडसॅनिटायझर बनवणे, केक बनवणे , आणि काय काय पसारा असतोच. ह्यात मात्र उत्साह आणि रोजची घरातली कामं, मॉम काय तेच तेच सांगते करायला?( मुलं)
तुला, पोलिसगिरी करायला कंटाळा येत नाही.( इति नवरा)
फॅमिली ग्रूपवर नकोती चढाओढ, टोमणे चालूच आहेत मेनु फोटो टाकून, लॉकडोउन नंतर काय आसले चर्चा करून आपण हुशार असे दाखवणे...
माझे हात शिवशिवत होते अगदी
माझे हात शिवशिवत होते अगदी काल परवा पर्यंत पाणीपुरी घरीच करायला.. पण दर्वेळी ( फ्रीझबाहेर) काढलेला रवा आत टाकला... म्हटलं मरो... ते तेल, रवा खर्चीक आणि नको ती मेहनत.
नवर्याचे केस कापून झाल्यावर तुनळी विडिओ पाहिले कारण तो खुपच चिडलेला, वेडावाकडा कट पाहून. मग तुझे डोकं जरा वाकडं आहे अश्या अरग्युमेंट पासून कैची खराब वगैरे भांडणं झाली.
मस्तच लेख अनु
मस्तच लेख अनु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आठवडाभर तुनळीवर अभ्यास करून करून या रविवारी नवर्याचे केस कापण्याचा कार्यक्रम पार पाडला. बर्यापैकी यशस्वी झाला. आता यापुढे घरीच केस कापून घेणार अशी कॉम्प्लीमेंटही मिळाली.
आम्ही पण (म्हणजे मुख्य किरदार
आम्ही पण (म्हणजे मुख्य किरदार मे मय आणी साईड कलाकार म्हणजे साईड्ला उभे राहुन उणेदुणे काढणारे) हा प्रयोग साग्रसंगीत करण्याचा प्रयत्न केला. पहिला "घाणा" छोट्या सानुकल्या गव्हाच्या पुरीसदृश्य पदार्थात बदलला. मग प्रत्येक "घाण्या" वाईज त्यात मैदा रव्याची भर पडत जावुन शेवटचा घाणा कडक पुरी/पापडी/लहान बिबडी/दुरवरुन दिसणारी "उडती तबकडी"च्या विभागात वर्ग करण्यात आला.
"मी_अनु" क्रमे बनलेले सगळे पुरी भाजी, मैदारवागहुपीठाची टोकरी, चाट्पापडी अशा विविध नावाखाली खपवला. झालेली मानहानी टाळण्यासाठी दुसर्या दिवशी दुध आणायला गेल्यावर त्याच्याच दुकानात दिसलेले तयार पुरीचे पाकीट गप गुमान घेवुन आलो.
Pages