डी.आय.वाय. आणि आम्ही

Submitted by mi_anu on 11 May, 2020 - 07:28

आता काही महिन्यांपूर्वीपर्यंत मला फक्त मेल मधलं एफ वाय आय तेवढं माहीत होतं.पण घरातल्या छोट्या प्राण्यांच्या कृपेने बरेच 'डू ईट युवरसेल्फ' व्हिडीओ बघायला मिळाले.छान दिसणारा लांब टीशर्ट फाडून त्याचा मिनीस्कर्ट आणि क्रॉप टॉप करणे,सुंदर लांब अंगभर स्कर्ट ला मध्ये शिवून त्याचा जम्पसूट करणे, गाडीत मिडी अडकून अर्धा फाटला तर त्याचा सरोन्ग करणे ,चांगल्या चांगल्या वस्तुंना छिद्र पाडून आत वेगळ्या रंगाची बुटाची लेस ओवून पार्टीत घालण्यायोग्य शॉर्ट ड्रेस बनवणे,बाटल्या उभ्या कापून त्यात टिश्यू रोल ठेवणे वगैरे प्रकार बघायला चांगले होते.आपल्या खिश्याला काही चाट बसत नव्हता.कधीकधी 'ए भवाने, फॅशन स्ट्रीट ला 150 रुपयात मिळतोय ना तो चिमुकला स्कर्ट, त्यासाठी गॅप चा 20 डॉलर चा टीशर्ट फाडायची अवदसा कुठून आठवली?' वगैरे सात्विक संताप उद्गार सोडले तर बाकी मस्त करमणूक होती.

आता सर्वांची दीर्घकाळ घरात राहण्याची फेज चालू झाली आणि हे डी आय वाय अरबांच्या उंटासारखं घरात घुसलं. जुन्या कॉटन पॅन्ट फाडून त्याचे मास्क बनवणे, त्यासाठी जुन्या लेगिंग/बर्म्युडा मधले इलास्टिक कापून किंवा स्वतःचे नवेकोरे केसांचे रबर्स अर्धे कापून त्यांना जखमी करणे असे प्रकार चालू झाले.शांतपणे बघणे आणि अधून मधून 'स्वच्छ धुतलेले वापरा रे कपडे' असे रोबो सारखे सतत बडबडत राहणे या शिवाय पर्यायच नव्हता.

यात 'आम्ही बनवलेले नवे पदार्थ बघा'आणि 'नवे पदार्थ काय बनवताय, इथे माणसं मरतायत' असे 2 विरुद्ध विचार प्रवाह असलेल्या 2 कुटुंब व्हॉटसप गृपात समतोल साधायला 'नवे पदार्थ पूर्ण एक जेवण' असा एक जुगाड पर्याय काढून पदार्थ डी आय वाय वाल्या सापळ्यात आम्ही अडकलोच. सामोसे चांगले झाले,कचोऱ्या करताना जीरा पावडर ऐवजी अगदी सारखं पाकीट असलेली ज्येष्ठमध पावडर ढकलली गेली तरी सारणाला कळू न देता अलगद हे घोळ निस्तारले आणि कोणालाही पत्ता लागू दिला नाही.तो डालगोन्या कॉफीचा मैलाचा दगड पण यशस्वी पणे पार पाडला.फेसबुकवर डालगोना कॉफी च्या इतक्या पोस्ट होत्या की 'डालगोना नाही केलीस, दूर हो जा मेरी फ्रेंड्स लिस्ट से' असं सगळे फेसबुकजिवलग घेराव घालून भाले टोचून म्हणतायत अशी स्वप्नं पडायला लागल्यावर डालगोना प्रयोग अटळच होता.

हे सगळे प्रयोग करून आत्मविश्वास वाढल्यावर एका शनिवारी 'पाणीपुरीची पुरी घरी' वाल्या घातक उपक्रमाची सांगता झाली.तरी रेसीपीत त्या समंजस बाईने स्पष्ट लिहिलं होतं की 'पुऱ्या सहज आणि भरोसेमंद जवळपास विकत मिळत असतील तर तो सोपा उपाय आहे.' हा इशारा अगदी खास माझ्यासाठीचा ईश्वरी संकेत वाटत होता.पण एकदा आली लहर की कहर केलाच पाहिजे.

अगदी काटेकोर मोजून 1 कप रवा 2 चमचे मैदा घेतला.काटेकोर मोजून एक अष्टमांश बेकिंग सोडा घेतला.काटेकोर मोजून चमचा चमचा पाणी घालत पाणीपुरी कणकेचा वृक्ष फुलवला.घरातला दुसरा प्राणी 'मी एकटा राहायचो तेव्हा मी आणि माझ्या रूममेट ने पाणीपुरी पुऱ्या करून पाणीपुरी बनवून खाल्ली होती' याची दवंडी आजन्म पिटत आल्याने त्याला पकडून जवळ उभा केला.नैतिक आधार म्हणून.आणि पुऱ्या तळायला घेतल्या.त्या काही फुगेचनात.अगदी तेलात टाकल्यावर अर्धचंद्र झाला म्हणून खुश होऊन पुरी उलटावी तर मागे अर्धचंद्राकृती विहीर निर्माण झालेली दिसायची. पुऱ्या चांगल्या चवीच्या, खुटखुटीत वगैरे झाल्या पण एकही शहाणी शेवटपर्यंत फुगली नाही.

"नक्की रेसिपी बरोबर वाचली ना तू? 2 चमचे रवा आणि 1 कप मैदा असेल."
"मी पाच वेळा वाचलीय."
"नक्की रवाच घातलाय ना?"
"आणि काय घालणार? रव्या सारखं दिसणारं आणि काय असतं जगात?"
"भगर बिगर नाही घातलीस ना?"
"ओह फिश!!(हे मला आवडतं म्हणायला. आता आताच शिकतेय.) अरे परमेश्वरा!!"

म्हणजे ही चूक दुसऱ्या प्राण्याचीच.आमच्या घरात नेहमी त्याचीच चूक असते.शेजारच्या बाईला याने तांदूळ दिले.मी अंघोळीला गेले होते तेव्हा.तांदळाच्या डब्यात अगदी थोडी राहिलेली भगर होती.(तांदळाच्या डब्यात का, असं कसं, पिशवीवर चिठ्ठी का नाही वगैरे प्रश्न विचारल्यास दात पाडीन.आमच्यात असंच असतं.) ती पिशवी त्याने काढून ओट्यावर रव्याच्या पिशवी शेजारी ठेवली.म्हणजे अर्धी भगर, अर्धा रवा आणि 2 चमचे मैदा असं सारण बनलं होतं.

"आपण ना याचं वेगळं काही करूया.म्हणजे नुसती पोळी लाटली आणि भाजली तर?"
"करता येईल.खाणार कोण?"
"पुरी मालपोआ?करंजी?मोमोज?"
"हे बघ, मुलं पावभाजीत थोडा लाल भोपळा आवडीने खातात असली तरी भगर रव्याचे मोमो खाण्याइतकी येडी नाही झाली अजून."
"मग काय करणार?"
"पाणीपुरी साठी उकडलेले मूग आलं मिरची लसूण वाटून घालून ते सारण भरून मसाला करंज्या."
तो नाही का, एक संन्यासी होता, त्याने कफनी उंदीर कुरतडतो म्हणून मांजर आणली, मग मांजरीला दुधाला गाय आणली.आणि गायीला सांभाळायला बायको आणली.तसं हे सुधार प्रकरण वाढतच चाललं होतं.शेवटी चार तिखट करंज्या, एक तिखट मोदक,1 कचोरी, अनेक कडक शेवपुरी पुऱ्या, त्यावर बटाटा चटणी मूग शेव घालून एस पी डी पी अश्या प्रकारे पाणीपुरीचे सर्व पुरावे नष्ट करण्यात आले.'जेव्हा आयुष्य तुम्हाला न फुगणाऱ्या पाणीपुरी पुऱ्या देतं तेव्हा पापडी चाट किंवा शेव बटाटा दही पुरी करा' असं साध्वी अनुमी यांनी म्हणून ठेवलंच आहे.

घरात थोडा खराब झालेला गूळ होता.'खराब झालेला गूळ' असलेली मला एकाच रेसिपी माहीत आहे: दारू.मग जरा गुळापासून दारू वर गुगल करून झालं.
"तुला साधी पुरणपोळी मोठी बनवता येत नाही.दारू कशी बनवणार?"
"सोपी असते.लोक मिथाईल स्पिरिट पिऊन मरतात. आपण त्यांना ऑरगॅनिक गुळाची, आयर्न आणि पचनशक्ती वाढवणारी दारू बनवून ऑनलाइन विकू."
यावर दुसऱ्या प्राण्याने अत्यंत तुच्छतेने मान उडवून माझा आत्मविश्वास डळमळीत केला.त्यामुळे या गुळाचं झाडांना घालायला जीवामृत बनवायचं ठरलं.'देशी कपिला गाईचं शेण व मूत्र असल्यास उत्तम.' हे वाचून परत एकदा अडखळायला झालं.आमच्या घराजवळच्या गोठ्यातला माणूस अजिबात अवेअरनेस वाला नाही.त्याला हे देशी कपिला वगैरे सांगितलं तर म्हशीचं नाव कपिला ठेवून तिचं शेण खपवेल. पण जीवामृत करायचंच नक्की.पुढच्या आठवड्यात.तो खराब झालेला गूळ काय एक आठवडा थांबावं लागलं म्हणून आत्महत्या करणार नाहीये.

डी आय वाय मध्ये पुढची साथ आमच्या घरात आली ती म्हणजे केस स्वतः कापायची.युट्युबवर त्याचे पण खूप व्हिडीओ होते.एक शेंडी कपाळावर बांधून पुढे घेऊन एक रबर लावून कापून टाकायची किंवा डोक्याचे चार भाग करून चार रबर लावून कापून टाकायचे(डोके नाही, केस) किंवा बोकडाच्या दाढीप्रमाणे दोन्हीकडून बटा घेऊन हनुवटीवर त्यांना एक रबर बांधून कापून टाकणे वगैरे बरेच प्रकार होते.जिचे केस सरळ लांब आणि कापायला सर्वात सोपे ती घाबरून इकडे तिकडे पळणार आणि ज्या मेम्बरांचे केस कापायला छोट्या लेयर म्हणून कठीण ते 'तू काप बिनधास्त,बिघडले तरी शाळा चालू होईपर्यंत वाढतील' म्हणून डोकं ताब्यात देऊन बसलेले.'केस कापले नै तर आकाश कोसळणार नाहीये' हे मात्र मी धरून कोणीही मानायला तयार नव्हतं.मग शेंड्या बांधून केस कापणे, मग कात्री घेऊन उभे उभे कातरुन लेयर्स करणे, मग एकीकडे लेयर्स लहान झाले म्हणून दुसरीकडे कातरणे असा बाल वॉशिंग्टन पणा चौफेर चालू झाला.सुदैवाने केस कातरलेली सगळी मेम्बरं बरी दिसत आहेत.घरातील सर्वात मोठे प्राणी कात्री पहिली तरी दचकत आहेत.पण त्यांनीही ही डी आय वाय ची गंगा पाहून व्हिडिओ बघून स्वतःचे केस रंगवून घ्यायला परवानगी दिली आहे.'इकडचे लेयर्स मोठे' च्या नादात केस जरा लहान कापल्याने मी पुढचा किमान दीड महिना व्हिडीओ कॉन्फरन्स करणार नाहीये.पण बाकी आमच्या डी आय वाय आयुष्यात सर्व मजेत चालू आहे.जीवामृत केलं की फोटो टाकतेच.घाबरू नका.फोटोला शेणाचा वास येणार नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्यासारखे विनोदी लिहायच्या टिप्स द्या सांगायचं असतं परंतू तुम्ही विनोदी अजिबात लिहित नसून खरंखुरं काय घडलं ते सटीप आणि सचित्रही देता. ते आम्हास विनोदी वाटतं.

पण तो वरुण नार्वैकर हे सर्व वाचेल तर 'आणि काय हवं' मालिकेतून साकेत-जुईला बाहेर काढून तुमच्या घरी क्याम्रा टीम घेऊन येईल.

म्हणून तर ललित मध्ये टाकते ☺️☺️ भेंडी 'विनोदी लेखन' मध्ये टाकलं आणि लोकांच्या चेहऱ्यावरची रेषाही हलली नाही तर इथे माझा बसल्या बसल्या पोपट होईल.ललित इज प्लेईंग सेफ. फार फार तर लोक गंभीर वैचारिक लिखाण म्हणून वाचतील.

'जेव्हा आयुष्य तुम्हाला न फुगणाऱ्या पाणीपुरी पुऱ्या देतं तेव्हा पापडी चाट किंवा शेव बटाटा दही पुरी करा' असं साध्वी अनुमी यांनी म्हणून ठेवलंच आहे.>>>
हहगलो

खुसखुशीत झालाय लेख Proud

आमच्याकडे पाणीपुरीच्या पुरया शेवपुरीच्या पुरया झाल्या.
मी त्यांचा फोटो काढला आणि सोबत काजोलचा कुछ कुछ होता है चा रडतानाचा फेमस फोटो जोडला.
मेरा पहेला प्यार अधुरा रह गया...
मेरी पहली पाणीपुरी शेवपुरी हो गयी...

पण तरी चव छान होती. तर पापडी चाट बनवून खाऊ घातले बायकोने. स्वत: केलेले प्रयोग ती कधी वाया जाऊ देत नाही.

केस कापायचा मात्र धीर होत नाहीये. घरी ट्रिमर सुद्धा नाहीये. असता तरी केसांवरचे प्रेम पाहता त्यांना धक्का नसता लावला. सध्या दिवसभर बायकोचे आणि पोरीचे कापडी हेअरबॅंड लाऊन असतो. तर कधी पोरगी क्लिपा लाऊन केस बांधून देते. आज एका कामासाठी बायकोची बहिण घरी आलेली तर तिच्याकडूनही तिचे कापडी हेअरबॅंड मागवले. तेवढीच व्हरायटी Happy
पुढे मागे गरज पडलीच तर चड्डीचे ईलास्टीक आणि नाड्या फाडून त्याचे हेअरबॅण्ड बनवून वापरेन पण आजवर मोठ्या प्रेमाने जपलेल्या केसांना वेडीवाकडी कात्री लाऊन त्यांचा गळा नाही कापणार Happy

अवांतर - कालपासून सगळीकडे जे आत्मनिर्भर आत्मनिर्भर चालू आहे त्यालाच ईंग्लिशमश्ये हे डी आई वाई बोलतात का... Wink

सीमा Light 1 घ्या
तुमची एक स्टेप राहीली. केशराने त्या प्रत्येक रसगुल्यावर "श्रीराम" असे लिहायचे असते.
Submitted by पाथफाईंडर on 11 May, 2020 - 20:15>>
लोल. अक्षर चांगल नसल्यानं रहित केले रसगुल्ले. हल्दिराम चालतात आता. Wink

मग तुझे डोकं जरा वाकडं आहे अश्या अरग्युमेंट पासून कैची खराब वगैरे भांडणं झाली.
Submitted by झंपी on 11 May, 2020 - 23:56
Lol झंपे Lol

तसंच कै नै हां श्रवु
तुमच्या ओट्यावर नाव नसलेली भगर नसेल आणि ती तुम्ही चुकून रव्यात घातली नाही आणि काटेकोर रेसिपी पाळली तर फुगतील।पुऱ्या. Happy
अब्राहम लिंकन 7 वेळा निवडणूकीत पडले आणि मग जिंकले
आपली पाणीपुरी पुरी 7 वेळा पापडी चाट बनली तरी चालेल,8 व्या वेळी टमटमीत फुगलेली कुरकुरीत पाणीपुरी बनेल.

मि..अनु .... मि विचार करत होते .. maida .. nahi vapraycha.. rava n deshpande gavhache peeth vaprun karaychya.. helthy version.. mhanun thodi bhiti.. harkat nahi karun baghte.. nahi phuglya tar.. thoda batata kissun. masala ghalun alu puri karen.. urlelya pithachi... thx anu..
hi navre mandali discourage kartat..

श्रवु, मॅनेजमेंट जार्गन्स मध्ये mvp (minimum viable product) ची संकल्पना आहे.म्हणजे आधी नीट ootb(डिफॉल्ट) मैदा रेसिपीने चांगली पाणीपुरी, आणि मग नंतर दुसऱ्या प्रयत्नाला कस्टमायझेशन, म्हणजे मैदा कमी करून कणिक वगैरे वगैरे Happy

Pages