लहानपणी गणपतीच्या आणि सशाच्या गोष्टीतला चंद्र अगदी आवडायचा. उन्हाळ्याच्या रात्री बाहेर झोपताना या चंद्रानंच तर झोपवलं आहे चांदण्यात गुरफटून. नंतर त्याच्यावरचे खड्डे, गुरुत्वाकर्षण, परिक्रमा शिकलो. पण इतक्या तांत्रिक गोष्टींमध्ये घुसूनसुद्धा चंद्र पाहिला की त्या गोष्टी कधीच आठवत नाहीत. कदाचित चंद्र हा आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर ‘केवळ आवडणे’ या एकाच गोष्टीसाठी निर्माण झाला असावा.
आज बुद्धपौर्णिमा. वनक-यांचा दिवस. पंढरपूरच्या वारीला झेंडे खांद्यावर घेऊन ‘विठूचा गजर’ करीत शेकडो किलोमीटर दरवर्षी चालून जाणा-या वारक-यांसारखे हे दर बुद्धपौर्णिमेला ‘वार्षिक प्राणीगणने’साठी मचाणावर बसायला आसुसलेले वनकरी. दरवर्षी राधानगरी, चांदोली, पेंच, मेळघाट, नागझिरा, ताडोबा कुठं ना कुठं नंबर लावून रात्रभर मचाणावर बसणारच.
४ बाय ४ फुटाच्या मचाणावर जवळजवळ १५ ते १८ तास बसणं म्हणजे गंमत नाही. हलायचं नाही, बोलायचं नाही, पायसुद्धा पूर्ण पसरून बसू शकत नाही. अशा मचाणावर पहिल्या गणनेसाठी मी नागझि-यात बसलो होतो. दुपारी १ ते सकाळी ८. वाघ नाही दिसला. पण तो सुमारे २०० मीटरवरच्या रस्त्यावर गुरगुराट करत खूप वेळ फिरत होता. त्याचं मला थोडंसं वाईट वाटतं, खूप असं नाही. कारण त्या रात्री मी आयुष्यातली पहिली उडणारी खार पाहिली, रात्री तीन वाजता चक्क पंख पसरून तिचं पॅराश्यूट मस्त तरंगत गेलं. अहाहा! आयुष्यातला अविस्मरणीय प्रसंग.
तर अशी ही नशा काही उतरत नाही. माणसं उतावीळ होतात. कदाचित ही अशी पहिली बुद्धपौर्णिमा असेल की अशा वनक-यांना मचाणावर बसून चंद्रप्रकाशात वन्यजीव पाहण्याऐवजी घरच्या गच्चीतून रस्त्यावरचे मोकाट कुत्रे पाहायची वेळ आली. सत्यानाश केला या करोनानं या वर्षीच्या गणनेचा. आता थेट २०२१.
आता खरं तर ही अशी गणना निव्वळ प्रघात म्हणून केल्यासारखीच आहे. आकडेवारी गोळा करायच्या नवीन पद्धती आता आल्या आहेत. मचाणावरची आकडेवारी फारशी विश्वासार्ह नाही राहिली. अनेक कारणं आहेत. या गणनेसाठी ‘हौसे, नवसे, गवसे’ सारेच जातात. त्यामुळं येणारे स्वयंसेवक चंद्रप्रकाशात जनावर अचूक ओळखतील याची शाश्वती नाही. कित्येकदा यात ‘सोम’सेवकही असतात. रात्री जंगलातल्या मचाणावर बसून ‘सोमाच्या प्रकाशात सोमरस पिऊन’ टुण्ण होणे यात यांचा आनंद सामावला आहे. जंगलात गणनेसाठी येऊन ‘शशी’ऐवजी ‘शिशी’त आनंद शोधणारे हे असे तद्दन बेवडे पाहिले की मग एक वाक्य पटतं, “दारू वाईट नाही, पिणा-यांनी बदनाम केली आहे.” आता वनविभाग चक्क सामान तपासून मगच स्वयंसेवकाला मचाणावर धाडतो.
एकदा तर सकाळी ७ वाजता मचाणावरून उतरून २-३ किलोमीटर चालत दोन अर्धवटराव वनविभागाच्या चौकीकडं आले. काय आहे म्हणे, की “आपल्याला बुवा मॉर्निंग वॉक केल्याशिवाय जमतच नाही आणि मग वॉक झाला की चहा कंपलसरी पाहिजे.” याचं त्यांना अफाट कौतुक होतं. आपण एका चांगल्या गोष्टीचा विचका केला आहे हे त्यांच्या गावीच नाही.
‘कैसे कैसोंको दिया है, ऐसे वैसोंको दिया है’ या गाण्याचा अर्थ त्या दिवशी नव्यानं समजला.
असो. २-४ खडे कुठं नसतात? असे क्वचित नमुने असले तरी या अशा कितीतरी बुद्धपौर्णिमांनी आजवर शेकडो निसर्गवेड्यांच्या जंगलातल्या रात्री अनुभवसंपन्न केल्या आहेत. कित्येक जंगलांसाठी यातून उपयुक्त माहिती मिळाली असेल.
या वर्षीच्या बुद्धपौर्णिमेचा हा चंद्र आज मला असा दिसला.
जंगलातल्या किश्श्याच्या
जंगलातल्या किश्श्याच्या अपेक्षेने वाचला..
करोना बुद्धपौर्णिमा २०२०
करोना बुद्धपौर्णिमा २०२०
सुंदर!
सुंदर!
@अजिंक्यराव पाटील
@अजिंक्यराव पाटील
काय झालं खरं तर, मी रात्री चंद्राचा फोटो काढला. छान आला असं मला वाटलं. मग म्हटलं इथं ठेवूयात, सगळे पाहतील तरी. पण नुसताच फोटो कसा? काहीतरी आगा-पिछा द्यावा लागेल या 'बौद्धपौर्णिमेच्या' चंद्राचा. म्हणून थोडंसं लिहिलं. बस. बाकी काही नाही.
मस्त आलाय फोटो. त्या रेषा फार
मस्त आलाय फोटो. त्या रेषा फार मस्त आल्यात.
मस्त आलाय फोटो. त्या रेषा फार
मस्त आलाय फोटो. त्या रेषा फार मस्त आल्यात. >>>सहमत.
काचेचा गोल वाटतोय ...किंचित टिचलेला !
“दारू वाईट नाही, पिणा-यांनी
“दारू वाईट नाही, पिणा-यांनी बदनाम केली आहे.” >> खरे आहे.
सुरेख लिहिता तुम्ही. नेहमीच्या विषयावर वेगळं वाचायला मिळालं की छान वाटतं.
उद्या आणि परवा पहाटे पाचला
उद्या आणि परवा पहाटे पाचला पूर्वेला पाहा. चंद्रकोर,शुक्र आणि गुरू.
धन्यवाद सुनिधी, अस्मिता,
धन्यवाद सुनिधी, अस्मिता, शूजिता, Srd
सुरेख फोटो...
सुरेख फोटो...
‘कैसे कैसोंको दिया है, ऐसे वैसोंको दिया है’ >>