मी रोजच फुलतोयं
उमलतोयं
अगदी तजेलदार
रंगही देखणा
सुवास तर बहरदार
दिवस मावळला
संध्याकाळ झाली
पुन्हा गळून पडलो.
सुर्योदय, सुर्यास्त
दोन्ही बघितले मी
या रोपां वरूनच
कुणीही आला नाही
मला खुडायला.
एरवी माझ्या नशिबात
सूर्योदय असे
पण सूर्यास्त छे
शक्यच नाही .
उमलल्यावर तासाभरातच
खुडून नेत असत
कुणीतरी .
मग माझा प्रवास
सुरू होई
कधी बाजारपेठा
कधी मॉल
कधी छोटी दुकानं
कधी हारात
कधी गुच्छात
कधी लग्न मांडवात
कधी मर्तकात
कधी देवळात
कधी नेत्यांच्या गळ्यात
कधी गांधीच्या, बाबांच्या फोटोला
कधी देवळा मागच्या ढिगांवर
काय झाले कुणास ठाऊक
बरेच दिवसांपासून
मी फुलतोय
रोज फुलतोय
ना प्रवास
ना कुणाची भेट
नाही म्हणायला
मला एक संधी मिळाली
आपल्याबद्दल विचार करायला
थोडा अवधी आहे माझ्याजवळ.
काही दिवसांनी
मी पुन्हा नवा प्रवास सुरू करेन
पुन्हा एकदा
या नेत्याने लाख रुपये देणगी दिली
टाळ्या .............हार
या मंत्र्यांनी एवढा निधी दिला
टाळ्या ........... पुष्पगुच्छ
या समाज संस्थेने एवढे धान्य गरिबांना वाटले टाळ्या ...........फुलांचा वर्षाव
या बाजारपेठेत माझी मागणी वाढेल. वर्तमानपत्रात बातमी
फुलांचे भाव वाढले
मागणी वाढली.
छान
छान
तुमचे लेख, कविता सारंच लिखाण
तुमचे लेख, कविता सारंच लिखाण फार सकारात्मक !