शुद्ध सारंग!

Submitted by kulu on 28 March, 2020 - 10:26

आजवर अनेक शुद्ध सारंग अनुभवले! माझा अतिशय आवडता राग आहे. खरं तर एकापाठोपाठ एकाच स्वराच्या शुद्ध आणि कोमल श्रुती ज्या रागांत येतात ते सगळेच राग आवडतात, मग तो दोन गंधारांना वापरून रात्रीला जगवणारा जोग असो कि दोन्ही निषादांच्या ढगांवरून बरसणारा मिया मल्हार असो किंवा कोमल गंधाराच दुखणं शुद्ध गंधाराने संहत करणारी शिवरंजनी असो! ती शुद्ध स्वरावरून कोमल स्वरावर येणारी अलगद उतरण काही तरी करते काळजात एवढं नक्की!

पहिला शुद्ध सारंग ऐकला तो नेहमीप्रमाणे किशोरीताईंचा. खरं तर राग म्हणजे काय हे सुद्धा माहित नसण्याच्या काळात ऐकलेली "जा रे भंवरा दूर" ही द्रुत त्यावेळी रिपीट मोड वर ऐकली. मनाला गुदगुल्या करणारं कायतरी आहे हे, असं वाटलं. नंतर कधी तरी शुद्ध सारंग हा राग आहे आणि रागात ख्याल गातात असं थोडं कळलं तेव्हा मग विलंबित ऐकली! पण एकूण त्या २५ मिनिटांच्या रेकॉर्ड मध्ये मन काही भरत नव्हतं. पण मागच्याच वर्षी बहुतेक यु ट्यूब वर ४१ मिनिटांची शुद्ध सारंगाची ताईंची रेकॉर्ड आली आणि स्वर्ग मिळाल्याचा फील आला! ताई शुद्ध सारंगात काय कमाल करतात ते मला काही सांगता यायचं नाही! "प्राजक्ताची फुलं सुंदर का?" या प्रश्नाला उत्तर काय? त्याचा रंग, त्याचा गंध कि हे सगळं धरूनही त्यापेक्षा वेगळं काही? नाही सांगता येत! पण तिरप्या उन्हाच्या झोताने विरघळताना हिमालयातल्या स्फटिक-कणाला ज्या गुदगुल्या होत असाव्यात तसं काहीसं होतं ऐकताना! तीव्र मध्यमाला तीव्र म्हणण्यामागे काही कारण आहे, बाकी स्वरांच्या विकृत श्रुती कोमल असतात पण या मध्यमाला तीव्र आहे श्रुती. हा तिखट मध्यम आहे, जेवणाच्या ताटातल्या ठेच्याप्रमाणं! सांभाळून खाल्ला तर लज्जत वाढते जेवणाची आणि प्रमाण नाही सांभाळलं तर रया जाते. तसाच हा मध्यम सांभाळून वापरायचा आहे नाहीतर राग कर्कश्श व्हायला वेळ नाही लागत! ह्या तीव्र मध्यमालाच मुळात मऊ करण्यात ताई यशस्वी झाल्या आहेत.... गानसरस्वती हि काही उगीच मिळालेली उपाधी नव्हे! आणि कदाचित या ताईंच्या किमयेमुळे कि काय त्या सारंगाला उन्हाची झळ नाही पण कोमल शुभ्र आभा मात्र आहे!

आल्प्समधून प्रवास करताना असे बरेच सुंदर शुद्ध सारंग ऐकले, दिसले! थंडीत दुपारी आल्प्स मधल्या टेकड्या चढताना भीमाण्णांनी "सुंदर कांचन बरसे" म्हणून आजूबाजूच्या धवल नजाऱ्यावर सोनं वितळवलेलं आठवलं कि आजही फुलपाखरू व्हायला होतं! गंगुबाईंनी "तीव्र माध्यम लावू का?" असं श्रोत्यांना विचारून तीव्र मध्यम लावून आणलेली बहार काय वर्णावी! गंगुबाईंची मला कमाल वाटते. पुरुषालाही लाजवेल असा खडा आवाज बाईंचा. मुरक्या वगैरे प्रकार बाईंनी घेतलेले मला तरी आठवत नाहीत किंवा मला ते कळतही नसेल पण शुद्ध सारंग हा अखंड नाजूक राग असा गायलाय कि क्या केहने! अजून एक आपल्याला चीत करणारा शुद्ध सारंग म्हणजे कुमारांचा. "अलबेली नार सुहावे" ही अप्रतिम द्रुत आणि त्यात "हा" वर मध्यम आणि पंचमाने हातात हात धरून जी फुगडी घातलेय ती ऐकताना आपण पण तिथे फेर धरू लागतो! ती जी अलबेली नार आहे ती "सुहावे" म्हणजे नेमकी कशी ते फक्त त्या फुगडीवरून लक्ष्यात यावं, त्यात तिचा नखरा, तिची चाल, तिचा तोरा, तिचं सौंदर्य सगळं आहे! कुमार दाखवतात ते तुम्हाला.... स्वरचित्र उभं करतात! कुमारांनी गायचं आणि आपण काळीज खोलून त्यांच्यासमोर ठेवायचं याशिवाय दुसरी कुठली शक्यता कुमारांनी श्रोत्यांसमोर ठेवली आहे काय कधी?

अजून दोन माझ्या खास ठेवणीतले शुद्ध सारंग आहेत. एक विदुषी पद्मावती शाळीग्राम यांचा आणि दुसरा पंडित बसवराज राजगुरू यांचा! दोघंही सरळ मुद्द्याला हात घालणारी माणसं, स्वरांचं दळण नाही, राग अख्खा उभा करून ठेवणार झटक्यात आणि हे कधी झालं ते आपल्याला कळत पण नाही! कोळणी माश्याचा काटा झटक्यात बाजूला काढून ठेवतात तसं! पद्मावतीबाईंचा शुद्ध सारंग अवघा १७ मिनिटांचा. तेवढ्या वेळात बाईंनी सूर्यनारायणाची अशी आराधना केली की त्याने आपली ऊन्हं कोमल केली! एकतर जयपूर च्या प्रथेप्रमाणेच म्हणता येईल अशी आवाजाला हवीहवीशी खरखर! ऐकताना रंध्रारंध्राचे कान व्हावेत असं वाटतं! जयपूरच्या बलाच्या चक्राकार ताना अशा घेतल्यात बाईंनी की त्या स्वरवर्षावात कितीही भिजलं तरी समाधान होत नाही! बसवराज पण असेच, एवढा चटकीला शुद्ध सारंग कुठेच ऐकला नाही, त्यात आपण स्थिर व्हायचं नाहीच. उलट कांगारू व्हायचं आणि स्वरांच्या मोकळ्या रानात उड्या मारत तो राग ऐकायचा. किंबहुना दुसरं काही करताच येत नाही! राजगुरूंच्या शुद्ध सारंगाचं ऊन खेळकर आहे, विंदांच्या थंडीतल्या शिरशिरणाऱ्या उन्हात आजीलाही झिम्म्याची स्वप्नं दाखवणारं ते ऊन आहे!

परवाच अगदी विदुषी ललित रावांचा शुद्ध सारंग ऐकला! खरंतर सांगायला पण लाज वाटते कि ललितजींना मी गेल्या दोन महिन्यातच ऐकायला सुरु केलं. अंडर-ऍप्रिशिएटेड कलाकार या प्रकारांत त्यांचा नंबर फार वरचा आहे! काय जबराट गायलाय त्यांनी शुद्ध सारंग, काय ते मींडकाम, काय ती सरगम, काय ती बोलबांट... कसं काय आहे बुवा हे एवढं सगळं चांगलं! मला नाही कळत, हरलो मी! हरण्यात मज्जा आहे या! एक मींड तर तार सप्तकातल्या तीव्र मध्यमावरून मध्य सप्तकातल्या रिषभावर येऊन विसावते आणि तेवढा वेळ आपण श्वास रोखून धरायचा! काय बाई आहे ही, दीड सप्तकाची मींड? असं असतंय का कुठं? किती अवघड आहे अशी मींड पेलायचं म्हणजे, पण त्यामुळे शुद्ध सारंग स्वतःच शुद्ध होऊन जातो एव्हढं खरं!

आज हे लिहायला कारण म्हणजे मी आता डेकवर येऊन बसलोय! आज सॅम्पलिंग नाही माझं, त्यामुळे मला आरामात बसून बघता येतोय तो समोर नजर जाईल तिथवर निळा समुद्र, तो संपला कि निळं आकाश आणि मध्येच आमची लालचुटुक पदराची पांढरी साडी नेसलेली नौका! दिवस इतका मस्तंय, भास्करराव स्वच्छ प्रकाशाचं दान देतायत आणि या सगळ्यात मला शुद्ध सारंग दिसतोय! हे सगळं जरा आश्चर्यकारक आहे. कारण समुद्रावर मला शुद्ध सारंग दिसेल असं वाटलं नव्हतं! समुद्रावरचं ऊन हे नेहमी ओलं असतं आणि ओल्या उन्हाचा राग म्हणजे वृंदावनी सारंग! शुद्ध सारंगाची उन्हे कोरडी असतात, त्याला दमटपणा चालतच नाही. तोडलं तर कुरकुरीत वाटावं इतकं कोरडं ऊन असतं शुद्ध सारंगाचं! असं ऊन समुद्रावर कुठे मिळणार, पण आज पडलं! काय माझं भाग्य हे, सगळंच शुद्ध सारंग झालं आहे आज. लाटा दोन्ही मध्यमांच्या चढ-उतारावर नाचतायत, निषाद आणि धैवताचे पांढुरके कोरडे ढग त्या लाटांचं कौतुक करतायत, पंचमाचा सूर्य सगळ्या दर्याला गुदगुल्या करतोय आणि अविनाशी षड्ज फक्त निळा होऊन सगळीकडे भरून राहिलाय! शुद्ध सारंगाचं हे दर्शन मला पृथ्वीने काय म्हणून घडवावं? मला आवडतो म्हणून? मग त्यासाठी माझी कृतज्ञता पण शुद्ध सारंग, माझा नमस्कार पण शुद्ध सारंग आणि मी सुद्धा!

किशोरीताई: https://www.youtube.com/watch?v=ieZyT1CaB9k
भीमण्णा: https://www.youtube.com/watch?v=bp7MuG_nYXU
गंगुबाई: https://www.youtube.com/watch?v=SLar1ZWMblA
कुमार: https://www.youtube.com/watch?v=zQwt91IZ3bw
पद्मावती शाळीग्राम: https://www.youtube.com/watch?v=uSobJLnPyAs
पंडित बसवराज राजगुरू: https://www.youtube.com/watch?v=QgRK61cYyew
विदुषी ललित राव: https://www.youtube.com/watch?v=dYfy4YrPySo

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर.

सांगीतातले काहीही समजत नाही मात्र तुम्ही शब्दबद्ध केल्याने ज्यांना समजते त्यांना कशातून आनंद मिळतो व काय अनुभव येतात याची ओळख नक्की झाली

जिथं फुलं असतात,
तिथं भुंग्यांचे कळप !

ज्ञानदेवांनी म्हटलंय, "सुमने पालगने सारंगाचि" !!
मला किशोरीताईंचा शुद्ध सारंग आवडतो.

तुम्ही नेहमीच एवढं छान कसं काय लिहिता ??? !राग , स्वर यांना शब्दात बांधणं किती अवघड असेल ना ! मी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची विद्यार्थिनी आहे. पण असं कद्धीच नाही बुवा लिहू शकत ..

अब मोरी बात मध्ये दोन ओळी आहेत

जाऊ तोपे वारी वारी वारी

काही लोक वारी चार वेळा म्हणतात
तसेच हारी देखील काही लोक 3 दा म्हणतात , काही लोक 4 दा

पं भीमसेन जोशी 3 दा म्हणतात

आज हे एक गाणे मिळाले

लागे तोसे नैन
( चांदी की दिवार , आशा, तलत , संगीत एन दत्ता)

पण हे तर शुद्ध सारंगच्या अब मोरी बात मान ले पिहरवा ह्याची कॉपी करून घेतल्यासारखे वाटते.

https://youtu.be/6rd80gOT-HQ लागे तोसे नैन

https://youtu.be/jzh9BpQCW74 अब मोरी बात

वा! अगदी सेम वाटतं आहे गाणं. हे गाणं माहीत नव्हतं. चिजांवरून काही गाण्यांच्या चाली लावलेल्या ऐकून आहे.

कुलु आज तुझी अन या लेखाची आठवण क्रमप्राप्तच Happy

सकाळी उठले तेच नैना ना माने मनात घोळवत. पण सकाळच्या गडबडीत ते शोधून लावणं काही जमेना. मग उगाचच कामं चुकू लागली, वाढीव कामं होऊ लागली. नको ती कामं निघू लागली. सगळच बिनसलं. मग म्हटलं मरो ती कामं. चक्क पसारा आसपास तसाच ठेवून फोन घेऊन बसले सरळ. आधी शोधलं नैना न माने मोरा. ते लावलं अन पहिल्याच नैना वर मन डोलू लागलं. मनच काय सारं शरीरच नैनामय झालं. कुमारांचं गारुड मनावर काम करू लागलं. मनातली सगळी उलघाल, अस्वस्थता दूर कुठेतरी पळून गेली. मनभरून नैना बरसले. एक एक तान मनातला एक एक ताण सोडवत गेली. हलकं हलकं होत, मन पिसासारखं अलगद विहरू लागलं.
खरं तर सात मिनिटांची ही सफर पण सकाळची सगळी उलघाल संपली, एक नवा दिवस ताजा होऊन गेला.
पुन्हा एक गोष्ट सिद्ध झाली, संगीताला टाळणं करायचं नाही. त्या त्या क्षणांचं मागणं पूर्ण करायचं. मग आनंदच आनंद! आता दिवसभर मनात वाजत राहिल नैना न माने... अन मग सगळं मनासारखं घडत जाणार!

https://youtu.be/K_7-OQMA-js

Pages