सूर्यास्त

Submitted by kulu on 13 March, 2020 - 08:16

क्रूझवर आल्यापासून सूर्यास्त बघायचं व्यसनच लागलय! काय मजा मजा असते, रोजचा सूर्यास्त म्हणजे रोजची नवीन नवीन मेजवानी मनाला! समोर डोळ्यांना सूर्यास्त दिसतो तो वेगळा, शिवाय मन:चक्षूंना दिसतो तो आणि वेगळाच! डोळ्यांना फक्त दिसतो, पण रोजच्या आयुष्यातला सुखद गारवा, त्यातच बसलेला एखादा चटका, त्याची जाणवणारी हुळहुळ, कुणीतरी त्यावर घातलेली फुंकर किंवा कुणीतरी त्यावर अजून जोरात घातलेला घाव या सगळ्यांची त्या चक्षूंना बाधा होते आणि त्या सगळ्याला डोळे वाट मोकळी करून देतात!

मन:चक्षूंना भांबावून टाकण्याची ही क्षमता सूर्यास्तात जेवढी आहे तेव्हढी सूर्योदयात नाही, निदान माझ्यापुरतं तरी ते खरं आहे! मला सूर्यास्त जास्त जवळचा वाटतो कारण तो सगळ्यांचा आहे, त्याच्या कुणाकडून फारशा अपेक्षा नाहीत कि मला असंच बघा आणि तसंच बघा! सूर्योदय त्यामानाने बराच शिष्ट आहे. त्याला बघायला अंधारात उठा, कुठेतरी जागा शोधा जेणेकरून ते रविबिंब वर येताना कुठल्याही अडथळ्याशिवाय दिसेल! बरं, एवढे कष्ट घेतल्यासारखं तो क्षण पाहून तिथे निवांत बसता पण येत नाही, कारण सूर्योदय मुळातच "चला, उठा कामाला लागा" वगैरे आरोळ्या मारतच येतो. त्यामुळे हे सगळं नको असेल तर सुट्टीच्या दिवशीच सूर्योदय बघायला लागतो आणि ते पण केवढी मोठी तडजोड करून! कारण एरवी कामासाठी लवकर उठावं लागतंच पण आता सुट्टीच्या दिवशी सुद्धा लवकर उठायचं सूर्योदय बघायला!

त्यामानाने आमचा सूर्यास्त किती किती समजूतदार. दिवसभराच्या तळपण्यानं स्वत: सूर्य थकलेला असतो, पृथ्वीवर घडणारं सगळं बरं-वाईट बघून मऊ पडलेला असतो. आपल्या लेकरांना जरा वेळ द्यावा म्हणून मुद्दाम क्षितिजावर तो रेंगाळल्यासारखा वाटतो! सूर्यास्त कुठूनही बघितला तरी त्याचा मनावर होणारा परिणाम तितकाच संहत असतो, मग तो समुद्रकिनारी प्रियेबरोबर बघितला काय, कुठेतरी सडाफटिंग काळ्या डोंगरावर एकट्याने बघितला काय किंवा गजबजलेल्या शहरात दोन इमारतींच्या मधोमध बघितला काय! इव्हनिंग शिफ्ट असणाऱ्याला तो ऑफिसच्या लखलखीत खिडकीतून दिसतो, नोकरीवरून घरी जाणाऱ्या कुणाला बसमधली धुळीने भरलेली खिडकी बाजूला केल्यावर दिसतो, ट्रॅफिक लाईटवर उभ्या भिकाऱ्याला तो वाहतुकीच्या वर्दळीतून दिसतो आणि हे सगळं होताना त्या प्रत्येकाला तो वेगळा होऊन भेटतो, प्रत्येकाशी वेगळं बोलतो, ज्याला जे ऐकायचं आहे त्याला ते सांगतो! ज्याला आज चटके बसले त्याला फुंकर घालून उद्याच्या सुखाच्या हिंदोळ्याची स्वप्ने दाखवतो आणि जो आज आनंदलहरींवर विहरत होता त्याला आज आनंद मिळाला तर उद्यापण नक्की मिळेल याची शाश्वती देतो; ज्याचं स्वतःच माणूस गेलं त्याची भग्न, भकास, तप्त नजर खाली मान घालून पचवतो आणि ज्याच्या घरी नवीन जीवाच्या रडण्याने हसू उमललं त्याच्या आनंदात तेव्हढ्याच उत्साहाने सामील होतो! हे सगळं सूर्यस्ताला शक्य आहे कारण तो सगळ्यांच्यात गुंतलाय ....पण अडकला मात्र नाही! तो हळवा आहे पण रडका किरकिरा नाही! आयुष्याने शहाणपण शिकवलेल्या पांढऱ्या दाढीच्या कुठल्या अप्पा-अण्णा-आबा सारखा, गरम तव्याची माया घेतलेल्या वाकल्या पाठीच्या पण ताठ कण्याच्या आज्जीसारखा आहे तो! ...चहासारखा आहे तो.... रंक आणि राव कुठेही आणि कसाही पिऊ शकतात, गावठी कँटीन मध्ये २-३ रुपयाला मिळणाऱ्या चहापासून ते पामुक्कलेच्या टेकडीवरच्या एखाद्या पंचतारांकित हॉटेलात मिळणाऱ्या हजारांत किंमत असणाऱ्या चहापर्यंत, ज्याला जसा हवा तसा, जसा परवडेल तसा! सूर्योदय कॉफीचा आहे, तिच्या पदरी स्वतःची शिस्त, शिष्टता आहे आणि ती करायची एक विशिष्ट पद्धत आहे!

म्हणूनच सूर्यास्त आणि सूर्योदय दोन्ही वेळेच्या रागांत रिषभ कोमल असूनही त्यांची भावावस्था फार वेगळी आहे! मारव्यातल्या स्निग्ध, विदग्ध, हळव्या पण कणखर रिषभाची सर भैरवातल्या अलिप्त आंदोलित रिषभाला नाहीच! सूर्यास्त हुरहूर लावतो हे खरंय पण तीच हुरहूर आपल्या माणसांना जवळ आणते. कुटुंबाला, मित्रांना जवळ आणण्याची सूर्यस्ताची अशी स्वतःची एक पद्धत आहे! सूर्यास्त हाच मुळात चक्र पूर्ण करणारा आहे. "घराकडे परतणे" या अत्यंत सुखद क्रियेचं निसर्गात घडणारं दर्शन म्हणजे सूर्यास्त आहे! आल्प्समध्ये गायींच्या गळ्यातल्या घंटांनी हललेले सूर्यास्त मी पाहिले आहेत. शाळेतून आलेल्या मुलांना हात-पाय धुवून बाहेर अंगणात बसून खायला घालणाऱ्या आया, निळ्याशार समुद्रावर लाटांशी गप्पा मारणारे पक्षी अशा अनेक नजाऱ्यांचा सूर्यास्त हा केंद्रबिंदू आहे आणि त्याचा त्याला सार्थ अभिमान आहे! सूर्योदय हा अंगाला मूल न लावून घेणाऱ्या वडिलांसारखा आहे, त्यांची माया नसते असं नाही पण वास्तवाचे भान ठेवून मुलांनी कामे करावीत असा त्यांचा भाव असावा! सूर्यास्त आई आहे, तिच्या अपेक्षाच नाहीत काही, मुलांवर निरपेक्ष प्रेम करणे एवढेच त्या माउलीला माहिती आहे, ती भोळी आहे, वास्तवदर्शी असं काही तिला माहित नाही, ती भावनेतुन जग बघते आणि मुलांकडे तर त्याहूनही जास्त! लेकराच्या मनात काय चाललंय हे कळल्यावर त्याला घट्ट मिठीत धरायचं आणि काहीही न विचारता त्याच्या पाठीवरून हात फिरवायचा हे तिला माहीत! हा असा आहे सूर्यास्त. तो तुम्हाला तुमच्या दुःखाची कारणमीमांसा विचारणार नाही आणि तुमच्या आनंदात न विचारता सहभागी होईल. तुम्ही जेवढं सांगाल तेवढं तो मन लावून ऐकून घेईल आणि जे सांगणार नाही ते समजून घेईल! त्याच्या तुमच्याकडून अपेक्षाच नाहीत! सूर्यास्त म्हणजे सूर्याने अस्ताला जाण्यापूर्वी प्रत्येकाला समजून घेण्याचा केलेला एक अतिशय प्रामाणिक प्रयत्न आहे आनि त्यामुळे ज्याची त्याची निश्चिती ज्याची त्याला देणे हेच तो करतो!

आणि म्हणून मी इथे सूर्यास्त बघत असतो! समुद्रात एवढ्या लांब असताना तिच्याशी बोलणं होत नाही सारखं, पण ती सुद्धा हाच सूर्यास्त तिथे बघत असेल, तिच्या सुद्धा मनावर हाच सूर्यास्त तसाच फुंकर घालत असेल. तिच्याही मनाचा कोपरा भेटीसाठी आतुर होत असेल आणि हाच सूर्यास्त माझीही तीच आतुरता तिच्यापर्यंत पोहोचवत असेल! यातून तिच्याशी होणारा माझा संवाद यातच सुख!

हाच सूर्यास्त माझ्या आईला सांगत असेल कि "संपला ग बाई आजचा पण दिवस, आता अजून थोडे दिवस असे बघता बघता जातील आणि तुझं लेकरू उड्या मारत येईल तुझ्या कुशीत. मी बघतोय त्याला, त्याचं खुशलमंगल माझ्या डोळ्याने बघ तू, आसवं कशाला काढतेस खुळाबाई!" आणि हे ऐकून तिला दिलासा मिळत असेल! हे सगळं माझा सूर्यास्त विनातक्रार करत आहे... अशा रोजच्या सूर्यास्ताची पाठीवर पडलेली थाप मनाला उभारा देते आहे माझ्या, इथे अरबी समुद्रात, दूरवर!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अप्रतीम !
किती सुंदर असते तुमचे चिंतन .

म्हणूनच कदाचित तांबे म्हणतात
मावळत्या दिनकरा
अर्घ्य तुज जोडुनी दोन्ही करा

आसक्त परि तू केलिस वणवण
दिलेस जीवन हे नारायण
मनी न धरिले सानथोरपण
समदर्षी तू खरा

सुंदर लिहिलंय!
सूर्योदय आणि सूर्यास्त अशी तुलना मी कधी मनातल्या मनातही केली नव्हती, पण तुम्ही केलेली तुलना पटली. मस्त!

धन्यवाद Happy

सूर्योदय आणि सूर्यास्त अशी तुलना मी कधी मनातल्या मनातही केली नव्हती>>>>> वावे, मी सुद्धा आधी केली नव्हती, क्रुझवर वेळ मिळाला खूप असा विचार करायला!

डोळ्यात पाणी आले. फारच अप्रतिम लिहीले आहे.
@पशुपत - ओळींकरता धन्यवाद.
_______
समस्तांसुरांमाजि तूं जाण चर्या। म्हणोनीच तू श्रेष्ठ त्या नाम सूर्या।
दुजा देव तो दाखवी स्वप्रकाशीं। नमस्कार त्या सूर्यनारायणासी||
महामोह तो अंधकारासी नाशी। प्रभा शुद्ध सत्त्वाची अज्ञान नाशी।
अनाथा कृपा जोकरी नित्य ऐशी। नमस्कार त्या सूर्यनारायणासी||

आहाहा, तरल ओघवतं लिहिलं आहेस.

बाकी बाबा आणि आईची उपमा उलटीहि असू शकते हा.

मलापण मावळत्या दिनकरा आठवलं पटकन.

सूर्योदय, सूर्यास्त दोन्ही आवडतात डोळ्यात साठवायला.

सुरेख रे
मावळत्या दिनकराच आठवलं.

खूप सुंदर, तरल, भावमयी लेखन. सुर्योदय आणि सुर्यास्त या एकाच नाण्याच्या दोन बाजू. म्हटलं तर कितीतरी जवळ अन म्हटलं तर एकमेकांकडे कधीही बघु न शकणार्‍या. दोन्हींचा तौलनिक अभ्यास अनुभवांसहीत मांडणारा हा लेख अगदी आवडला. असेच लिहित रहा.

अस्ताचलाला जाणाऱ्या सुर्यनारायणाचं मावळणं जसं विलोभनीय असतं तसं मानवी जीवनाचा अस्तही विलोभनीय व्हायला हवा!
सुर्य जरी मावळतो तरी त्याचा संधिप्रकाश रेंगाळत असतो.नात्यांचा सहवास जरी संपला तरी आठवणींचा सुगंधं रेंगाळत असतो.
अतिशय उत्तम रीत्या सादर केली तुम्ही मावळतीची लिला

पुलेशु