रोजच्या जीवनात येणारे थरारक प्रसंग

Submitted by पशुपत on 9 March, 2020 - 06:20

एक प्रसंग मनावर कोरला गेलेला आहे. १९८९ मधे दिल्लीला मुलाखतीसाठी गेलो होतो. डिसेंबरचे दिवस , मरणाची थंडी !.
मी झेलम एक्स्प्रेसने रात्री ९ ला स्टेशनला उतरून धौला कुवाला रिक्षाने गेलो. मित्राच्या भावाकडे ( नेव्ही क्वार्टर्स ) जायचे होते. फोन नव्हते. चुकीच्या गेटला उतरलो. आत सिक्युरिटीला विचारल्यावर हे कळले. मग त्याने सांगितले चालत कसे जायचे. कुडकुडत , न झेपणारे सामान घेऊन चालता झालो. १० मिनिटाचे अंतर . पाच मिनिटाने , आलो तिथले दिवे आणि पोहोचायचे होते तिथले दिवे क्षीण दिसू लागलेले. किर्र अंधार , रातकिड्यांची किरकिर. आकाशात छोटी चंद्रकोर... इतक्यात बाजूने दोन कुत्रे हुश हुश करत आले .. पायातले उरले सुरले त्राणही गेले. मनात भीमरूपी म्हणायला लागलो. मग मेंदू चालू लागला. कुत्रे माझ्यावर भुंकत नव्हते.. याचा अर्थ ते पाळीव आणी ट्रेंड आहेत ! इतक्यात त्यांचा मालक माझ्ह्या बाजूने येऊन माझ्याशी बोलू लागला ! जीव भांड्यात पडणे म्हणजे काय त्याचा खरा खरा खरा अनुभव आला.
तो ऑफिसरच होता . मित्राच्या भावाला ओळखणारा !. त्याने मला सोबत केली आणि योग्य इमारतीत आणून सोडले . त्याचे आभार मानायचे भानही त्यावेळी मला उरले नव्हते.
त्याच ट्रिप मधला शेवटच्या दिवशीचा रात्रीचा प्रसंग असाच थरार अनुभवाचा.
पुण्यातल्या आमच्या कट्टा गँगमधला एक मित्रही त्या काळात दिल्लीत नोकरी करायचा. त्याला भेटायला संद्याकाळी (ज्या मित्रा च्या भावाकडे राहिलो होतो त्याची) जुनी बजाज १५० स्कूटर चालवीत गेलो. रात्री हॉटेलात जेऊन, गप्पा मारून निघालो. मला दिल्लीची काडीमात्र माहिती नाही. कडक अंधार , निर्मनुष्य रस्ते , थंदीचा कडाका ! त्या मित्राने मला ज्या एरियात जायचे होते तिथे जाणार्या चौकात आणून सोडले. आणि गप्पा मारून तो परत निघाला . तो कुठलीशी बस पकडून जाणार होता, त्याने मला माझ्या वाटेतल्या खाणाखुणा सांगून ठेवल्या. मी स्कूटर चालू केली आणि निघालो तर काय, स्कूटरचे टायर फ्लॅट. ओरडून आधी त्याला हाक मारली. तो भारी धीराचा. त्याने पहाणी केली आणि शोध लावला कि व्हाल्व्ह मधली पिन अडकली आहे. नशीबाने ज्या कॉर्नरवर आम्ही उभे होतो , तो पेट्रोल पंपच होता. आता तिथल्या मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाषात आम्ही तार शोधू लागलो . २ - ४ मिनिटानी ती मात्र सापडली. व्हाल्व्हची पिन सरळ करण्यात यशही मिळाले. आता प्रष्ण होता हवा कशी भरायची ! तिथल्याच हवेच्या नळीचा अंदाज घेतला. माझ्या नशीबाने काँप्रेसरमधे हवेचे पुरेसे प्रेशर होते. हवा भरली. संकटात मेंदू तीक्ष्णपणे काम करतो . त्याला म्हंटले ५ मिनिटे हवा टिकते आहे याची खात्री करू. ती टिकली. मग तो म्हणाला इथून माझे घर ५ मिनिटाच्या (स्कूटरवरून) अंतरावर होते. (३-५ कोलोमीटर असावे) . तू माझ्यासाठी त्या कॉर्नरवर १५ मिनिटे थांबणार आणि तोपर्यंत मी परत आलो नाही तर मी सुखरूप घरी पोहोचलो असे समजून निघून जाणार असे ठरले.
मग मी निघालो . तो ५ मिनिटाचा प्रवास अजून लक्षात आहे. लांबून आमची बिल्डिंग दिसू लागल्यावर परत खूप खूप खूप आनंद झाला.

आता या प्रसंगांचे इतके काही वाटत नाही पण त्या वेळी मात्र खूप थरारक वाटले होते.

तुमच्या जीवनात असे काही प्रसंग घडले असतीलच. इथे सांगण्या साठी स्वागत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे धागा हा.

सगळयांचे अनुभव वाचताना शहारा येतोय अंगावर. सगळे जण लिहितायत पण छान

गुहागर ला मित्र मित्र ,एका मित्राच्या घरी ट्रीपला गेलो होतो. एका दुपारी ओहोटीच्या पाण्यात चेंडू ने झेला झेली खेळ चालू होता. अचानक माझ्या लक्षात आले कि किनाऱ्याची वाळू दिसेनाशी झाली आहे , पायाखाली वाळू लागत नाहीये. तेव्हा परिस्थिती चे गांभीर्य लक्षात आले. मग सगळे पोहत एकमेकांच्या जवळ आलो. एकमेकांना धरून साखळी केली आणि पोहत बाहेर आलो.
आल्यावर मित्राचे वडील जे काही चिडले आमच्या वर !

एक म्हण आहे "यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते". मला माझ्या बायकोने जीवन दान दिले आहे. सांगतो कसे.
एकदा माझ्या गोडवून चे काम चालू होते. तेव्हा गोदामात प्रकाश यावा म्हणून वायरिंग नवीन केली होती. ते वायर शटर वरून गेले होते. काम झाल्यावर शटर खाली वरी करताना ते वायर शटर मध्ये गुंडाळले गेले आणि शटर मध्ये करंट उतरले. माझ्या बरोबरच्या दूर फेकले गेले आणि माझा हात कडी मध्ये अडकला आणि मला शॉक बसू लागला. मी ओरडत होतो. कोणी मेन फ्युज बंद करायला पाळला कोणी लाकूड आणण्यास पाळला. त्या वेळेस माझी गरोदर असलेली पत्नी जवळ होती तिने मला पकडून ढकलण्याचा प्रयत्न केले पण ती फेकली गेली परत ती उठली आणि मला जोरदार पकडून ओढली मग माझी सुटका झाली. लगेच मला हॉस्पिटल मध्ये नेली. देवाच्या कृपेे ने मला आणि तिला काही झाले नाही. आज मी जिवंत आहे ते फक्त तिच्या धाडसाने.

एक म्हण आहे "यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते". मला माझ्या बायकोने जीवन दान दिले आहे. सांगतो कसे.
एकदा माझ्या गोडवून चे काम चालू होते. तेव्हा गोदामात प्रकाश यावा म्हणून वायरिंग नवीन केली होती. ते वायर शटर वरून गेले होते. काम झाल्यावर शटर खाली वरी करताना ते वायर शटर मध्ये गुंडाळले गेले आणि शटर मध्ये करंट उतरले. माझ्या बरोबरच्या दूर फेकले गेले आणि माझा हात कडी मध्ये अडकला आणि मला शॉक बसू लागला. मी ओरडत होतो. कोणी मेन फ्युज बंद करायला पाळला कोणी लाकूड आणण्यास पाळला. त्या वेळेस माझी गरोदर असलेली पत्नी जवळ होती तिने मला पकडून ढकलण्याचा प्रयत्न केले पण ती फेकली गेली परत ती उठली आणि मला जोरदार पकडून ओढली मग माझी सुटका झाली. लगेच मला हॉस्पिटल मध्ये नेली. देवाच्या कृपेे ने मला आणि तिला काही झाले नाही. आज मी जिवंत आहे ते फक्त तिच्या धाडसाने.

मी अमेरिकेत असतानाची गोष्ट आहे, 1995 सालच्या थंडीतली! तेव्हा मी रोज न्युजर्सीहून कनेक्टिकट राज्यात नोकरीला जात असे. जाऊन येऊन ते 160 मैल अंतर होतं. जायला दीड एक तास सहज लागायचा. एके दिवशी सकाळी गाडी घेऊन निघालो. स्नो पडणार असा अंदाज होता, पण तो दुपारी पडणार होता म्हणून मी जायचं ठरवलं. तिकडे रस्त्यावरचा स्नो तातडीने बाजुला ढकलून रस्ता मोकळा करतात त्यामुळे संध्याकाळी निघेपर्यंत रस्ता साफ झालेला असेल असा मी तर्क केला. ऑफिसला व्यवस्थित पोचलो आणि काम सुरू केलं. थोड्या वेळाने स्नो सुरू झाल्याचं खिडकीतून दिसायला लागलं. जेवण झाल्यानंतर मला आमच्याच ऑफिस मधल्या एका बाईचा फोन आला. माझ्याचं रस्त्यावर सुमारे 30 मैलांवर तिचं गाव होतं. ती म्हणाली 'मी आत्ताच घरी आले आहे ऑफिसमधून! स्नोचं काही खरं नाही, फार वाईट आहे. तू ताबडतोब घरी जायला नीघ.' मी तातडीने निघालो. रस्त्यात स्नोचा अक्षरश: चिखल झाला होता. नेहमी 55 मैलांच्या (तेव्हाची ती हायवे वरची वेग मर्यादा होती) वेगाने जाऊ शकणारा मी जेमतेम 20/25 मैलाच्या वेगाने मारू शकत होतो. स्नो थांबायला तयार नव्हता. काही पर्याय नसल्यामुळे मी हळूहळू रस्त्याच्या अगदी उजव्या (स्लो लेन) लेन मधे जात राहीलो.

थोड्या वेळाने बर्‍या पैकी वेगाने जाणार्‍या तीन मोठ्या 18 चाकी ट्रकांनी मला ओव्हर टेक केलं. मी मनात म्हंटलं 'आयला, बरं आहे यांचं! वजनदार असल्यामुळे यांना स्नोने काही फरक पडत नाही.' हळू हळू साधारणपणे एका तासाने त्या बाईच्या गावापाशी आलो. नेहमी गजबजलेल्या रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती, जेमतेम एखादं वाहन दिसत होतं. थोड्या वेळाने एका पाठोपाठ एक असे तिन्ही ट्रक रस्त्याच्या बाजूला कोलमडून पडलेले दिसले. मी मनातल्या मनात हसलो पण जास्त सावध झालो. अजून एका तासाने मी कॉफी ब्रेक घ्यायचं ठरवलं. कारण अजून एक दीड तास तरी सहज लागणार होता. एका सर्व्हिस स्टेशन मधे गाडी घातली. उतरल्यावर गाडीच्या चाकांची पहाणी केली तर चाक आणि मागची बॉडी यात स्नोचा चिखल बसलेला दिसला. हाताने जमेल तेव्हढा काढला, कॉफीचा पेपर कप घेऊन हायवेला लागलो. चांगला प्रशस्त 3/3 लेनचा हायवे पण तेव्हा सुनसान होता. घरापासून अवघे 10/15 मैल असताना अचानक माझ्या गाडीची चाकं घसरली आणि गाडी घसरत घसरत जायला लागली. मी ड्रायव्हिंग मॅन्युअल मधल्या आठवतील त्या गोष्टी करायचा प्रयत्न केला. म्हणजे ब्रेक मारायचा नाही व अ‍ॅक्सिलरेटर वरचा पाय काढायचा. मॅन्युअल प्रमाणे मागची चाकं घसरली असतील तर एक करायचं असतं आणि पुढची घसरली तर दुसरं! गाडीवर कुठलाच कंट्रोल नसलेल्या मला नक्की कुठली चाकं घसरली आहेत ते समजत नव्हतं कारण मी पूर्ण बधीर झालो होतो. त्यामुळे मी दोन्ही गोष्टी थोड्या थोड्या केल्या. एक म्हणजे गाडी ज्या बाजुला वळते आहे तिकडे हळूहळू स्टिअरिंग वळवणे. जिकडे गाडी वळते आहे त्याच्या विरुद्ध दिशेला गाडी वळवून गाडी सरळ करणं हे नैसर्गिक असतं पण त्याच्या नेमकं उलट करायचं असतं. दुसरं म्हणजे ब्रेक अगदी अलगद दाबायचा. मी दोन्ही गोष्टी आलटून पालटून केल्या. त्यामुळे गाडीनं सगळ्यात उजव्या लेन मधे घसरत घसरत तोंड सगळ्यात डाव्या (फास्ट लेन) च्या बाजूकडे केलं. गाडीची मागची बाजू रेलिंगवर आपटली आणि गाडीच बंद पडून एकदाची थांबली. आता गाडी सगळ्यात उजवीकडच्या दोन्ही लेनमधे उभी होती. नशीब चांगलं असल्यामुळे हायवे वर एकही गाडी नव्हती. नेहमी सारखी रहदारी असती तर या भानगडीत शंभरेक गाड्यांचा अ‍ॅक्सिडेंट झाला असता. गाडीतून खाली उतरून पाहीलं, गाडीचा एका बाजूचा टेल लॅंप फुटला होता. माझं अंगं थरथरत होतं. रस्त्यात गर्दी नसली तरी गाडी फार वेळ तशा विचित्र अवस्थेत (दोन्ही लेना अडवून) ठेवण्यात जास्त धोका होता. कसाबसा गाडीत बसलो, गाडी चालू केली. नशिबानं ती सुरू पण झाली. मग आणखी हळू हळू चालवत मी सुमारे साडेतीन तासांनी घरी पोचलो. घरी गेल्यावर सुद्धा बराच वेळ अंग थरथरत होतं.

माझा हा अनुभव मी इथे लिहिला आहे. तिथूनच उचलून इथे लिहीते.

२०१५ च्या आमच्या कॉलिफोर्निया ट्रीपमधील हा प्रसंग आहे. लॉस एंजेलिसला पोहोचल्याच्या साधारण तिसर्‍या दिवशीची गोष्ट. जेट लॅग पूर्ण उतरला नव्हता त्यामुळे दुपारी सगळेजण अंथरुणात लोळत, पेंगत होतो. आणि अचानक बिल्डिंगचा फायर अलार्म वाजायला लागला. घोषणा ऐकू यायला लागली की "बिल्डिंगमध्ये कुठेतरी आग लागली आहे. बाहेर पडा आणि लिफ्ट न घेता जिन्यानं खाली उतरून जा." झोपाळलेल्या डोक्यात ही सुचना जाईपर्यंत आणि त्यानंतर जरा बरे कपडे पटापट चढवून, पासपोर्टस, पर्सेस, मोबाईल्स, लॅपटॉप वगैरे गोळा करून घराबाहेर पडायला फारतर दीड मिनिट लागलं असेल पण मनावर प्रचंड दडपण यायला लागलेलं. बाहेर पडलो तर कुठे काही धूर दिसत नव्हता किंवा वासही येत नव्हता. बहुधा चुकून झालेला अलार्म असणार असा संशय आलाच. पण तरीही टेन्शन होतं. लांबलचक कॉरीडॉरच्या एका टोकाला गेलो तर ते दार उघडेना. धावत पुन्हा दुसर्‍या टोकाला गेलो, तिथेही दार उघडेना. मग रितसर भिती वाटली. नविन शहर, अनोळखी बिल्डिंग, अजून कोणी दिसेना, काय करावं कळेना.

पुन्हा एकदा ट्राय केला अन उघडलं एकदाचं दार. खाली आलो आणि बिल्डिंगमधल्या इतर मंडळींबरोबर बसलो. फायरब्रिगेडच्या गाड्या आल्या, सेक्युरिटीबरोबर काहीतरी गुफ्तगु केलं आणि फॉल्स अलार्म आहे हे डिक्लेअर झाल्यानं आम्ही सगळे पुन्हा आपापल्या घरी गेलो. अवघं १५-२० मिनिटांचं नाट्य! पण त्यानंतर फायरब्रिगेडचा सायरन वाजला की जीव धसकायचा!

खतरनाक अनुभव आहेत सगळ्यांचे...वाचून धस्स होतंय....
कोकणात फिरायला गेल्यावर एकदा समुद्रात उतरलो होतो तेव्हा पाठीवर लाट झेलून उडी मारायची असा खेळ चालू होता. अचानक माझा पाय घासरून मी पाण्यात पालथी झाले...5 7 सेकंद पाण्याखाली जीव इतका घाबरा झाला की बस...पाणी फार खोल नव्हते पण पोहायला येत नसल्याने तेव्हा खूप भीती वाटलेली ....एवढं असून ही नंतर समुद्रावर ग्लायडिंग करताना बिलकुल भीती वाटली नाही ..उलट खूप मजा आली.

आमच्या एका रुममेट चा वाढदिवस आम्ही विसरलो होतो कधीतरी दुपारी माझ्या लक्षात आले की आज हीचा वाढदिवस असतो मग काय तिचा राग घालवण्यासाठी तिला आवडेल तिथे सेलिब्रेट करायचं ठरलं आणि लगेच आम्ही सिंहगड किल्ल्याला जायला निघालो सुद्धा..
आम्ही चौघीनी वेळेचं गणित अगदी कट टू कट बसवलं होत आमच्या नियोजनानुसार रात्री 9 पर्यंत आम्ही परत येणार होतो पण तो दिवसच भयानक होता सगळ नियोजनच फसलं..
तर झालं अस..आम्ही दुपारी 3 ला स्वारगेट वरून सिंहगड जायला शेअर गाडी केली होती तो ड्रायव्हर थांबत थांबत भेटतील तेवढे पॅसेंजर घेत होता त्यामुळे आम्हाला सिंहगड च्या पायथ्याला पोचायला 4.30 झाले..पावसाळ्याचे दिवस होते आणि जास्त गर्दी नसल्यामुळे सिंहगड पायथा पासून वर किल्ल्याला जायला कुठलीच गाडी मिळेना..गाडी मिळाली तर पाहिजे तेवढे पॅसेंजर मिळेना..एका गाडी वाल्याला जास्त पैसे देऊन 5 ला किल्ल्यावर पोचलो..
खूप दाट धुक, सोसाट्याच्या वारा आणि रिमझिम पाऊस चालू होता..त्यात तो गुलाबी थंडीत डोळ्यांना तृप्त करणारा हिरवागार निसर्ग..इतक्या उशिरा इतक्या लांब येण्याचं सार्थक झालं अस वाटायला लागलं..तिथेच केक कापला आणि खूप फोटोज् काढले..पाऊस होता म्हणून तिघी पैकी एकीचा मोबाईल फोटो साठी वापरायचं ठरलं बाकीचे तीन मोबाईल फोन एका प्लास्टिक मधे ठेऊन एकीच्या हातात दिले..मस्त रिमझिम पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुटला होता त्यामुळे मोठ्याने गाणे लाऊन हातातलं सगळ सामान खाली ठेऊन आम्ही खूप नाचलो नंतर मस्त पिठलं भाकरी ठेचा खायला एका उबदार झोपडीत जाऊन बसलो..थोड्या वेळात फोटो ची देवाणघेवाण करावी म्हणून मी तिला मोबाईल ची पिशवी मागितली आणि तेव्हा तिला आठवल जिथे नाचलो होतो तिथेच आपण पिशवी विसरून आलोय..सगळ्यांनी उठून वेड्यासारखं तिकडे धाव घेतली पण तोपर्यंत उशीर झाला होता तिन्ही फोन हरवले होते आजूबाजूला विचारणा केली पण काही फायदा झाला नाही..जी मुलगी मोबाईल विसरली तिचा वाढदिवस होता त्या हरवलेल्या मोबाईल मधे एक तिचा पण मोबाईल होता म्हणून आम्ही जास्त काही न बोलता चुपचाप जेवून घरी निघायचं ठरवल..कपडे सगळे ओलेचिंब झाले होते..मगाशी गुलाबी वाटणारी थंडी आता अंगाला बोचत होती..हळूहळू अंधार पडू लागला तशी होती तेवढी गर्दी पण ओसरू लागली..
आम्ही येताना गाडीने आलो होतो त्यामुळे जाताना तरी ट्रेकिंग करत जाऊ अस ठरलं..
6 वाजले होते जास्त अंधार पडला नव्हता खाली पोहचेपर्यंत जास्तीत जास्त 7 वाजतील असा अंदाज लाऊन आम्ही हळू हळू सिंहगड उतरायला सूरवात केली..पाऊस दिवसभर चालूच होता त्यामुळे सगळीकडे चिखल झाला होता..आम्हाला वाटले की या रस्त्याने पायी सिंहगड उतरणारे खूप जण असतील पण आमच्यासारखा मूर्खपणा कुणीही केलेला नव्हता..हळू हळू अंधार पडू लागला तसा जीव घाबरायला लागला आणि आपोआपच पाय वाकडे तिकडे पडू लागले..मोठे मोठे दगड गोटे आणि चिखलाने माखलेला उतार असलेला रस्ता उतरताना एकीचा पाय घसरला आणि ती तिथेच पाय धरून बसून राहिली..तिला उठून शांत करून निघेपर्यंत अजून अंधार गडद झाला..
आजूबाजूला किर्र जंगल..पायाखाली चिखल..सरळ उताराचा मोठ्या मोठ्या दगड गोट्याचा रस्ता..आणि त्या इतक्या भयावह वातावरणात आम्ही फक्त चौघी..आमचे पाय भीतीने आणि थंडीने आपोआप थरथरायला लागले होते..नाही म्हणायला वरून एक कुत्रा सोबत आला होता तेवढाच धीर वाटतं होता..एकच फोन त्याला सुद्धा रेंज नव्हती..अर्धी वाट आम्ही उतरलो होतो पण आमचं नशीब इतकं जोरावर होत की अजून एकीच्या पोटात असह्य वेदना चालू झाल्या..एकीलाच आधाराने चालवत किल्ला उतरताना जीव जात होता त्यात आता दुसरीला सुद्धा आधार द्यायचा म्हणजे पायातली होती नव्हती तेवढी सगळी शक्ती संपली..आधीच उतारावरून चिखलातून उतरताना पायांवर खूप ताण येत होता..जीचा पाय मुरगळला ती आमच्यात सगळ्यात लहान होती तिला अजून पुढे चालवेना ती मधेच बसून रडायला लागली तिला पाहून पोट दुखणारी पण सुरू झाली..बाकी आम्हाला दोघींना काही कळेना..70% रस्ता पार झाला होता..थोड बसून परत राहिलेला रस्ता पार करू या अस ठरवून आम्ही एका दगडाला टेकून बसलो तर तेवढ्यात वरून दोन माणसं खाली येताना दिसली..ती काहीतरी मदत करतील अस वाटल पण त्यांच्या बोलण्यावरून ते ठीक वाटले नाही म्हणून आम्ही अंधारात झाडामागे लपून बसलो..8 वाजत आले होते आणि थोडा रस्ता अजून बाकी होता आम्ही परत जोमाने उठून खाली उतरायला निघालो थोड्यावेळाने मागून दोन पोर येताना दिसली यावेळेस खूप घाबरून गेलो पण ती चांगली निघाली काही न बोलता ती आमच्या समोर चालू लागली आम्ही खूप हळू उतरत होतो तशी ती आमच्यासाठी थांबत होती एकदाचा किल्ला उतरलो तेव्हा जिवात जीव आला..आता या बस स्टॉप वरून लगेच बस पकडून घरी जावं असा विचार करून आम्ही त्या पायथ्याच्या बस स्टॉप ला बस ची वाट पाहू लागलो..आजूबाजूला 2 4 बायका आणि एक मासे विकणारी पोरगी इतकेच जन होतो..8.30 वाजले होते इतक्यात बस येईल असा विचार करत आम्ही तिथेच बसून होतो.. होता तो एकुलता एक फोन पण बंद झाला होता..
9.30 वाजत आले तस हळूहळू एक एक जण निघून गेलं त्या सूनसान बस स्टॉप ला आम्ही चार पोरी आणि ती मासेवाली एक पोरगी फक्त राहिलो..10 वाजले तरी बस येईना तशी आमची चुळबुळ वाढली..ओले कपडे त्यात झोंबणारा गार वारा आणि चिखलात केलेली पायपीट त्यामुळे शरीर अगदी बधीर झालं होत..खांद्यावरची छोटी सॅक डोक्याखाली घेऊन मी तिथेच झोपी गेली..10.30 वाजले तरी बस आलेली नव्हती तेवढ्यात 4 5 माणसांचा घोळका तिथे आला ते सगळे दारू पिऊन काही बाही बडबडत होते..पाऊस चालूच होता काय करावं काही सुचत नव्हत ती मासेवाली पोरगी जवळपासच्या गावात राहणारी होती तिने आम्हाला सांगितले की 4 5 km पुढे एक स्टॉप आहे तिथून बस चालू असतात तुम्ही चालत तिथे जा आणि बस पकडा..ही माणसं चांगली नाहीत..जितक्या लवकर होईल तितक्या लवकर निघा..
आता तर एक पाऊल पण चालायचं त्राण उरलेलं नव्हत..त्यात चिखलाने पाय जड झाले होते..एकीचा पाय भयानक सुजला होता..एकीला चक्कर येत होती..आणि चालत जायचं म्हंटल तर परत किर्र घनदाट जंगलातून, पावसात भिजत,अंधार तुडवत जायला लागणार होत..पण काही इलाज नव्हता..
त्या मासेवालीने सोबत तिथपर्यंत पोचवायला यायची तयारी दाखवली आणि आम्ही सगळी हिम्मत एकवटून अंधारातून चालायला लागलो..10.30 वाजले होते आम्ही एकमेकींचा हात पकडुन जितक्या फास्ट होईल तितक्या फास्ट त्या मासेवालीच्या मागे चालत होतो..आजूबाजूला एकही वस्ती नव्हती अंधार इतका किर्र होता की एक मीटर समोरच फक्त दिसत होत..पूर्ण घनदाट जंगलातूनच तो छोटा रस्ता जात होता..त्यात रातकिड्यांचा भयानक आवाज..आणि वरून अविरत पडणारा पाऊस..
त्या दोघींचं रडणं चालूच होत..माझं शरीर थंडीने ठणकत होत आणि पाय इतके दुखत होते की कुठल्याही क्षणी मी खाली कोसळेल अस वाटायला लागलं होत..आम्ही आज हॉस्टेल ला परत येऊ की नाही याची काहीच अपेक्षा मला वाटतं नव्हती..पण त्या मासेवाली कडे पाहून आपोआप हिम्मत गोळा करत होतो..अचानक मागून एखादी गाडी यायची आणि जीव मुठीत घेऊन आम्ही एकमेकांचे हात अजून घट्ट पकडून घ्यायचो..अर्ध अंतर पार करून झालं होत आणि तितक्यात एक गाडी आमच्या मागून येत आमच्याजवळ स्लो झाली मला तर वाटल बस.., आता संपलो आपण..तो माणूस गाडीची काच खाली करून आम्हाला निरखून पाहत होता..किती पण ओरडलो तरी कुणी मदतीला आल नसतं कारण दूर दूर पर्यंत तिथे कुणीच नव्हत..पण ती मासेवाली खूप हिम्मतवाली होती तिने त्या माणसाला 2 4 शिव्या दिल्या आणि तो पुढे निघून गेला तेव्हाच आमचा जीव भांड्यात पडला..11.30 ला अर्ध मेल्या अवस्थेत आम्ही त्या रोड जवळच्या बस स्टॉप ला पोचलो..
इतका भयानक जंगलातला रस्ता आम्ही कसा पार केला ते देवालाच माहीत..पण आम्ही सुखरुप रहदारीच्या रस्त्याला पोचलो याचा आनंद गगनात मावत नव्हता..ती मासेवाली देवासारखी आमच्या मदतीला धाऊन आली होती..तिथल्या एका ओळखीच्या घरून तिने आम्हाला मोबाईल मागून दिला..त्यावरून हॉस्टेल च्या एका मैत्रिणीला कॉल करून कॅब बुक करायला सांगितली..आणि सुटकेचा निःश्वास सोडला..
ती मासेवाली पुढे कुठेतरी निघून गेली..तिची, डोक्यावर माश्यांची टोपली घेतलेली पाठमोरी आकृती किती तरी वेळ माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हती..आम्ही चौघी त्या बस स्टॉप ला कॅब ची वाट पाहत एकदम शांत बसून राहिलो..12 वाजत आले होते..एकदाची कॅब आली आणि आम्ही आमची थकलेली शरीर गाडीत झोकाऊन दिली..कुणीच कुणाला काही बोलत नव्हत..सगळेजण काय विचार करत होते माहीत नाही पण मला मात्र त्या दिवशी खात्री पटली की देव असतो आणि तो असा कुणाच्या तरी रुपात येऊन आपली मदत करतो..आपण फक्त विश्वास ठेवायचा असतो..
रात्री 1 च्या दरम्यान कधीतरी हॉस्टेल ला पोचलो..परत कधीच असं वेळ काळ न पाहता फिरायला जायचं नाही हा मोठा धडा आम्ही त्या दिवशी घेतला..
आणि कधी नव्हे ते आज मी देवाला हात जोडून रात्री झोपी गेली..

खतरा अनुभव आहेत एकेक!!

मी एका डान्स स्कुल मधे जायचे तो स्टुडीओ एका दुमजली बिल्डींगच्या बेसमेंट मधे होता. आमची प्रॅक्टीस रात्री ८- ९.३० असायची (वर्किंग लोकांना सोयीची वेळ म्हणून) . तोपर्यंत ल्डींगमधले बाकीचे सगळे ऑफिसेस बंद व्हायचे . सगळ्या बायकाच प्रॅक्टीसला येणार्‍या. सगळ्या जमल्या की आम्ही दार आतून लॉक करायचो, जाताना सगळ्या एकत्रच बाहेर पडायचो कारण पार्किंगमधे आमच्याच काय त्या तेवढ्या कार्स. तिथले लाईट पण मिणमिणते पिवळे.
एकदा असंच प्रॅक्टीस करत असताना धाडधाड दार वाजायला लागले. जी शिकवत होती तिने पटकन स्पिकर बंद केला घाबरून. सगळ्या जणी एका कोपर्‍यात गपचूप उभ्या राहिलो. परत जोरजोरात दार एकदा - दोनदा वाजले. बापरे अशी तंतरली तेवढ्यात स्गळे चित्र डोळ्यापुढून सरकले कोणीतरी बंदूक वगैरे घेऊन आत आलं गनफायर केले तर असं काहीबाही डोक्यात यायला लागलं. घरच्यांची आठवण यायला लागली, घशाला कोरड पडली, ९११ वगैरे कोणाला सुचलंच नाही. ५-१० मिनिटाने आवाज बंद झाला. अजून थोडा वेळ आम्ही असंच शांत बसलो असू मग जिचा स्टुडिओ आहे तिने नवर्‍याला फोन केला की तू बाहेर येऊन थांब काही दिसतेय का सस्पिशिअस? पार्किंग मधे किंवा जिन्यात कोणी असं वाटलं आहे तर पोलिसांना फोन कर तो आला १० मिनिटात बाहेर सगळं ओके होतं तरी आम्ही ग्रुप मधे बाहेर पडलो. अक्षरशः पळतच कार मधे शिरलो. तेव्हा जरा बरं वाटलं. तिथे सीसीटीव्ही तरी होते की नाही कु णास ठाऊक अ‍ॅट लिस्ट मनाचं समाधान कोण होतं बाहेर? ते तरी कळलं असतं आता या घटनेला ६-७ वर्ष झाली तरी मनातून जात नाही.

घटना आहे मी ५ वर्षांचा असतानाची, तारीख १२ एप्रिल, वेळ साधारण दुपारी १२. घरातले लोक जशी हि घटना सांगता तशी जराशी फिल्मी वाटते पण खरी आहे --- तेंव्हा माझ्या बाबांची नोकरी आमच्या मुळगावच्या शेजारील गावात होती. मला शाळेला सुट्टी असल्यामुळे एका ओळखीच्यांसोबत मी गावी (आजी - आजोबा - काका - काकू कडे) गेलो होतो. बाजूच्या गावात आमची आत्या राहते. तिचे यजमान परगावी नोकरीला असत. त्यांना काही काम असल्यामुळे आत्याच्या मुलाला जोतिबाला नवस फेडण्यासाठी घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्या बाबांवर आली..त्या दिवसात आमच्या शेतात नवीन विहीर खोदण्याचे काम सुरु होते. बाबांना जोतिबाला जायचे असल्याने आईला सोबत म्हणून मला परत घेऊन जाणे आणि विहिरीवरील कामगारांचे पगार देणे अश्याकारणाने वडील मला न्यायला आले. विहिरीला नुकतेच थोडे झरे लागले असल्याने पाणी जमा होऊन कामात थोडा अडथळा होत होता. ते पाणी बाहेर टाकण्यासाठी पाण्याचा पंप वापरत. त्याचा पाईप जोडातून सुटला होता, तो काका आणि इतर कामगारांनी बसवण्याचा प्रयत्न केला होता पण जमत न्हवते. तर तो बसवून देण्याची विनंती काकांनी बाबांना केली. त्यावर वडील आणि एकजण केरोसीनचा टेम्भा (लोखंडी दांडा अथवा स्प्यानर ला कापड गुंडाळून केलेली मशाल) करून पाइप गरम करून तो जोडण्याचा पर्यंत करत होते. बाजूलाच केरोसीनचा ५ लिटरचा डबा ज्यात १-२ लिटर केरोसीन असेल तो सकाळपासून उन्हात तळपत पडला होता आणि उन्हामुळे त्यात केरोसीनची वाफ तयार झाली होती. पाईप जोडण्याचे काम विहिरीच्या सदरेवर सुरु होते तर काठावरबसून मी आणि चुलत भाऊ वरून हे सर्व पाहत होतो. तेव्हा पाइप गरम करायला बाबांनी टेम्भा उचलला आणि केरोसिनचा डबा त्याकडे ओढला जाऊन त्याचा स्फोट झाला. स्फोट झाल्यावर बाबांचे कपडे पेटले आणि त्या स्फोटाचे सर्व केरोसीन वर उभ्या असल्येल्या माझ्या अंगावर आले आणि माझ्या कपड्यांची पेट घेतला. सर्व लोक कामात गुंग असल्याने कोणाच्या लक्ष्यात येईस्तोवर आणि आग विझावेस्तोवर मी ४५% आणि बाबा ५५% भाजलो होतो. त्या काळी आमच्या गावी बस अथवा दुसरी वाहने न्हवती. माझे ३ काका आम्हाला घेऊन लगेच बैलगाडी जुंपून शेजारच्या एस टी मिळणाऱ्या गावी निघाले. मधेच अर्ध्या वाटेत एका काकांच्या धोतराचा सोगा बैलगाडीच्या चाकात अडकून ते खेचले जाऊ लागले पण बाबांनी त्याही अवस्थेत त्यांना हाताला पकडले आणि ओरडून गाडी थांबायला लावली (संकटाची वेळ असल्याने गाडी पळवत नेत होते) तरीही गाडी थांबेस्तोवर काकांना थोडीफार दुखापत झाली. एस टी मिळणाऱ्या गावी पोहोचलो आणि गाडीची वाट पाहत होतो. बराच वेळ वाट पहिली पण एस टी येण्याचे काही चिन्ह दिसत न्हवते. चौकशी करता त्या गावात साखरपुड्यानिमित एक जीपगाडी (सर्व SUV जीप असत) आली होती त्यांना विनंती करून तिथून तालुक्याच्या ठिकाणी इस्पितळात निघालो. अर्ध्यावाटेत गेलो असता जीपचा टायर फुटला आणि गाडी वेडीवाकडी भेलकांडात जाऊन थांबली. मिलिटरीमन असलेल्या काकाने लगेच स्टेपनी वापरून चाक बदलून तालुक्याच्या गावी पोहोचवले. तिथेही एवढे भाजलेलं रुग्ण घ्यायला बऱ्याच इस्पितळांनी नकार देऊन पुढे पुण्याला जाण्याचा सल्ला दिला. तेंव्हा बाबांनी एकेकाळी वर्गमित्र आणि आता स्वतःचे मोठे इस्पितळ असलेल्या डॉक्टर मित्राच्या इस्पितळाकडे गाडी घ्यायला लावली. तर तिकडे डॉक्टर काही कामानिमित्त मुंबईला गेले होते आणि बाकीचे डॉक्टर बाबांना ओळखत नसल्याने आम्हाला भरती करून उपचार करण्यास नकार दिला. बाबांनी डॉक्टरकाकांना (पुढे ओळख होऊन मी त्यांना काका म्हणू लागलो) फोन करा अशी विनंती केली. थोड्या प्रयत्नांनी डॉक्टरांशी संपर्क झाला आणि त्यांनी आम्हाला लगेच भरती करून उपचार सुरु करायला सांगितले व ते मुंबईहून घरी यायला निघाले. तिकडे आम्हाला सोडून बैलगाडी घेऊन छोटा काका घरी गेला आणि बैलगाडी सोडून बैल दावणीला बांधत असताना भलामोठा नाग दावणीतून फुत्कारत त्याच्या अंगावर आला. काका बैलांना सोडून पळाला आणि बैल हि पळाले, नंतर बहुतेक नाग निघून गेला. डॉक्टरकाकांनी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी योग्य उपचार आणि काळजी घेऊन आम्हाला जीवदान दिले. मी आणि बाबा चांगले २ महिने इस्पितळात उपचार घेत होतो. (हि सर्व घटना घडली तेंव्हा माझी आई एकटीच बाबांच्या नोकरीच्या गावी आमची वाट पाहत बसली होती. तेंव्हा फोन नसल्यामुळे तिला यातील काहीच माहित न्हवते...संध्याकाळी कोणाकडूनतरी अशी दुर्घटना घडली आहे आणि आमच्या घरातील एक पुरुष आणि एक मुलगा भाजले आहेत एवढीच समजेल..संध्यकाळी तालुक्याला जायला गाडी नसल्याने रात्र कशीबशी तळमळून काढली आणि सकाळी पहिल्या गाडीने एका मैत्रिणीसोबत तालुक्याला येऊन जवळपास सगळी मोठी इस्पितळे पालथी घालून शेवटी आम्ही जिथे होतो तेथे पोहोचली, कितीतरी वेळ रडत होती हे मात्र माझ्या चांगले स्मरणात आहे)...एकूणच आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी तो काळ दिवस होता पण म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली न्हवती...कुठल्यातरी आणि कोणाच्यातरी पुण्याईने मदतीने प्रसंगातून बाहेर आलो...

बाप रे कसले अनुभव एकेक! सिंहगड चा अनुभव तर फारच डेंजर! काय हा वेडेपणा ! असं सतत मनाशी म्हणत होते वाचताना.

सिंहगड किस्सा डेंजर आहे. असाच साधारण माझ्याबाबतीत राजमाचीच्या एका पावसाळी ट्रिप दरम्यान घडला होता.

वर जाईपर्यंत सर्व ठीक होतं पण उतरताना प्रचंड पाऊस लागला. ज्या एका मुलाच्या भरवश्यावर ट्रेकला गेलो होतो, त्यानं सांगितलं की मागची वाट घेऊ, वाटेत दगडांवर ठिकठिकाणी पांढरे बाण रंगवले आहेत, ते फॉलो केले की बरोबर खाली कोंढाणे गावात पोचतो. कसलं काय ! प्रचंड पावसामुळे अलोट पाणी जिथे तिथे वाहत होतं. त्यामुळे ते बाण काही दिसेनात. मधूनच एखादा दिसायचा आणि आम्ही त्या दिशेनं जात रहायचो. पुढे ते बाण गायबच झाले. त्यामुळे आम्ही वाट चुकलो आणि त्यामुळे व्यवस्थित रस्ता मिळेना. शिळा ओलांडून, दगडांवरून कसेबसे पावसात खाली उतरत होतो. चालतोय चालतोय पण गाव काही येईना. हळूहळू संध्याकाळ होत आली, काळोख पडू लागला तसं धाबंच दणाणलं.

मोबाईल फोनचा जमाना नव्हता तो. त्यामुळे कुठे आहोत कळत नव्हतं, कोणाला संपर्क करण्याची सोय नव्हती, आजूबाजूला तसा जंगलीच परिसर. रात्र अशीच इथे काढायची वेळ आली तर कुणा प्राण्याची जंगी मेजवानी होण्याची शक्यता नाकारता येईना. कितीतरी वेळ प्रचंड कोसळणार्‍या पावसात दगडांमधून असेच साधारण दिशेचा अंदाज घेऊन चालत राहिलो. नखशिखांत भिजलेलो, बुटांत पाणी जाऊन ओलेकच्च झालेले, थंडी वाजत होती आणि मनात भितीही होतीच.

कधीतरी अचानक दूरवर दिव्यांसारखं काहीतरी अंधूक दिसायला लागलं. वाट जरा सोपी आणि मुख्य म्हणजे उतरणीची झाली आणि आम्ही डोंगरावरून खाली उतरलो आहोत आणि समोर एक गाव दिसतंय हे लक्षात आलं. एव्हाना पाऊस कमी झाला होता पण त्या गावातले दिवे गेले होते. आजूबाजूला कोणी दिसेना. आम्ही एका शेतात उतरलो होतो त्यामुळे घरं जवळ नव्हती. जरा इथे तिथे चालत गेलो तर दुरून आवाज आला. ते एक घर होतं आणि दिवे गेल्यामुळे घरातली लोकं बाहेर बसलेली होती (बहुतेक). त्यातली एक आजी आम्हाला कोण, काय, कुठे जायचं विचारायला लागली. कोंढाण्या ऐवजी आम्ही कुठेतरी भलत्याच ठिकाणी उतरलो होतो. तर ती आजी इतक्या रात्री स्वतःहून आम्हाला वाट दाखवायला आली.

वाटेत एका घराजवळ थांबून तिनं तिच्या चार भावांना बोलावलं तर ते हातात कोयते आणि टोपल्या घेऊन आले. बरोबर पेट्रोमॅक्सच्या २-३ बत्त्याही होत्या. ते कोयते बघून खरंतर धडकीच भरली होती. पण नंतर कळलं की ते अश्या पावसाळ्यात मासे शेतातल्या पाटात वाहत येतात त्यांना मारायला की पकडायला घेऊन आलेत. (जागूनी अश्या माशांबद्दल इथे लिहिलंय) त्यामुळे त्यानंतर चार बॉडिगार्ड्स, एका गाईड आणि रोषणाई अशा जामानिम्यात आमची वरात पुढे निघाली. आता हसू येतंय पण तेव्हा मात्र बेक्कार परिस्थिती झाली होती. आजीबाईंनी आम्हाला एका रस्त्यावर आणून सोडलं आणि इथून पुढे दोन किलोमीटर चालत गेलात की बस मिळेल असं सांगून त्या भावांबरोबर मागे वळल्या. आजीबाई भेटल्या नसत्या तर त्या शेतीवाडीतून तो रस्ता आम्हाला मिळणं शक्यच नव्हतं. यथावकाश आम्ही बसस्टॉपवर आलो, बस मिळवली, घरी पोचलो .... प्रचंड थकलेल्या अवस्थेत.

थकलेल्या अवस्थेत.
Submitted by मामी on 12 March, 2020 - 20:51
>> अशा वेळेस हिंस्त्र श्वापदं आणि साप, विंचू यांची अतिशय भिती वाटत राहते. जीव अक्षरशः मुठीत धरलेला असतो. सोबत कुणी तरी आहे हाच फक्त दिलासा असतो. एक जरी जोडीदार असेल तर मग धीर खचत नाही.

Awesome अनुभव आणि सगळे छान लिहिताय.

एक शंका - दोन ठिकाणी तुम्ही एवढा मोठा मुलींचा group असून भीती कशी काय वाटली!

खरचं वेडेपणा झाला होता तो..आता परत सिंहगड चा धसका च घेतलाय सगळ्यांनी..
राजसी..मुलींचा ग्रूप असला तरी आम्ही सगळ्या 22 23 वर्षाच्या..
आणि ती परिस्थिती इतकी बेकार होती की काय करावं कुणाला काही सुचत नव्हत त्यात मोबाईल नव्हते जवळ..आणि पाऊस अंधार जंगल सगळच एकदम जुळून आल होत..

अंजली_१२ हो आणि ती फार धाडसी पण होती..घाबरलेली असून सुध्दा तिने परिस्थिती खूप नीट सांभाळून घेतली होती

हो मामी आता तर आम्हाला पण खूप हसू येत तो दिवस आठवला की..पण त्यावेळी खरच खूप वाईट परिस्थिती असते..घरी आल्यावर तर प्रचंड थकवा जाणवत होता आम्हाला पण..

बापरे! किती डेंजर प्रसंग.
सिंहगड तर डेंजर सिचुएशन.
मित्रा, काळ आलेला पण वेळ आली नव्हती हेच खरं. खुप भयंकर वाईट वेळ.

मामी , चिमण , अमृताक्षर , मित्रा , अंजली_१२ , वेडोबा , उदयगिरी
काय कमालीचे प्रसंग आहेत ! लिहिलेही आहेत अतिशय प्रभावीपणे.

खरे अनुभव वाचायला मस्त वाटत आहे.
संकटात सापडला वर मनाची होणारी खालमेल आणि संकटावर मात करण्याचे परिस्थिती रूप प्रयत्न हे सर्व वाचायला रोमांचकारी आहे.

मामी, भयंकर वेळ.
खुपच वाईट वेळ माझी मोठी जाऊ तिच्या माहेरच्या फॅमिलीसोबत वैष्णोदेवीला गेली होती तेव्हा त्यांच्यावर आली.
त्यात जावेची काही महिन्याआधी मोठ्या दुखण्यातुन उठलेली बहीण वारली. Sad
उतरताना बर्फाचा पाउस सुरु झाल्याने त्यांना नीट चालता/उतरता येइना. पाय घरत होते. त्यात माझी जाऊ पडली आणि मनगटाचं हाड सरकलं. बाकी सगळ्यांना थोडीफार दुखापत झाली. खरचटलं वैगेरे.
हॉटेलवर गेल्यावर आधीच आजारातुन उठलेल्या अशक्त झालेल्या बहिणीला थंडी भरुन आली आणि श्वास लागला. त्यातच ती गेली.
शव तिथल्याच हॉस्पिटलात ठेवलं.
हे सगळं परतीच्या आदल्याच दिवशी झालं. दुसर्‍याच दिवशी परतीची ट्रेन होती त्याने बाकी सगळे परत आले. आणि तिचा भाऊ आणि बहिणीचा मुलगा तिथे थांबला प्रेत ताब्यात घेउन मुंबईला आणण्याचे सोपस्कार करण्यासाठी.
दोन दिवसांनी इथे पोचल्यावर जावेला हॉस्पिटलमधे नेउन प्लास्टर घातलं. दीड महिना लागला हात बरा व्हायला.
वाईट आठवणींनी त्यांना ही ट्रिप लक्षात राहिल Sad

Pages