वानरे - माकडांचे मृत्यू, आईची माया आणि भावना
ह्या लेखात माकडे तसेच वानरांच्या आयुष्यातील काही दुःखद घटना वर्णन केलेल्या आहेत. अर्थात मला जमेल आणि अर्थबोध होईल तसे ते लिहिले आहे. घटना (निरीक्षणे) खरी आहेत पण घटनांच्या अनुषंगाने आलेली माझी मते सत्यच असतील असे मी छातीठोकपणे सांगू शकत नाही.
वानराचा मृत्यू:
त्यावेळेस मी अमरावती वरुन वर्धेला ट्रेनने बर्याचदा जात असे (२००२ ते २००४ च्या दरम्यान कधीतरी). जागा मिळालीच आणि तीही खिडकीजवळची तर ट्रेन मधून माझे पक्षी निरीक्षण चालू होत असे. एखाद्या ठिकाणी काही (म्हणजे पक्षी!) दिसले तर मनातल्या मनात मग मी त्या जागेचे ‘लोकेशन’ आणि तिथे कसे पोहोचता येईल ह्याचा विचार करीत असे.
एप्रिल किंवा मे महिना असावा. मला अशीच भाग्यवान जागा मिळाली होती. बाहेर स्वच्छ सूर्यप्रकाश पडलेला होता. शेतं ओस पडलेली होती. झाडांची पालवी झडली होती. केवळ पळस, पांगारा, काटेसावर अशा ग्रीष्मऋतुत बहरणार्या झाडांना भडक लाल केशरी फुलं लगडलेली होती. त्यावर अनेक प्रकारचे पक्षी उतरताना दिसत होते. अर्थात त्यांची ओळख पटविण्याइतपत वेळ मिळत नव्हता. ट्रेन वेगात धावत होती. पण नजरेसमोरून चलचित्रफित वेगात गेल्याप्रमाणे मी आपला बघत बाहेर होतो. नेहेमीच बघत असतो. अशा चलचित्रफितींच्या खूप सार्या क्लिप्स मनातल्या मनात जोडून त्याचा लघुचित्रपट तयार होत असतो. आणि शेवटी आपण कुणाला तरी सांगताना ह्या लघुचित्रपटाची स्टोरी आपण सांगतो.
तर असे बाहेर बघता बघता अचानक मला एक दृश्य दिसले. एका वाळलेल्या झाडावर एक मोठे मृत लंगूर वानर वरच्या फांद्यांमध्ये अडकून ठेवलेले होते. मी ट्रेनच्या वेगाच्या हिशोबाने माझी मान वळवत ठेवली आणि जमेल तेवढे बघून घेतले. मला असे वाटले की वानर काही दिवसांपूर्वीच मेले असावे.
हा विचार करे पर्यन्त ट्रेन बर्याच पुढे निघून गेली होती. त्या जागेचे लोकेशन लिहून घ्यायचे राहून गेले होते. पण बडनेरा स्टेशन सोडल्यानंतर नागपुरकडे पंधरा मिनिटांनी हे दृश्य मला दिसले होते. म्हणजे माकड अमरावती पासून खूप दूर नव्हते. अंदाज आला होता. पण नेमके लोकेशन हवे होते. पुन्हा दोन तीन दिवसांनी वर्धेला जाताना मी रेल्वेलाइन वरचा खांब क्रमांक लिहून घेतला. ट्रॅकवरचे लोकेशन कसे शोधतात ते एका रेल्वे कर्मचार्याला विचारून घेतले.
पुढच्याच रविवारी सकाळी एका उत्साही निसर्गमित्राला सोबत घेतले आणि रेल्वे ट्रॅकला समांतर कच्च्या रस्त्यावर बाईक घातली. अंतर खूप नव्हतेच. अर्ध्या पाऊण तासात ते वाळलेले झाड शोधून काढले. झाडावर बर्यापैकी उंचीवर दोन तीन फांद्यांच्या बेचक्यात ते वानर फसलेले होते. एक लांब लाकडाची बल्ली शोधली. ती वानरापर्यन्त पोचली. आम्ही त्या वानराला खाली पाडू शकलो नाही. माझा मित्र झाडावर चढला आणि त्याने शक्कल लढवून एका काठीने त्या बेचक्यात फसलेल्या वानराला काढले व जमिनीवर ढकलले. वानर खाली पडले. बघतो तर त्याच्या शरीराचा केवळ सांगाडा शिल्लक होता. म्हणजे हाडे आणि त्यावर कोरडी कातडी. अगदी भुसा भरून ठेवतात तसे ते शव ‘प्रिझर्व’ झाले होते. पोटाचे मांस गळून पडले होते. बोळख्यात दात नव्हते. म्हणजे ते जर्जर म्हातारे असावे असे आम्ही अनुमान लावले.
आम्ही त्याची छायाचित्रे घेतली. वानराचा वार्धक्याने मृत्यू झाला होता ह्यात आम्हाला काही संशय नव्हता. पण मी वाचले होते की निसर्गात शाकाहारी व तृणभक्षी प्राण्यांना मांसाहारी प्राणी मारून खातात. पण ह्या वानराला एवढे वार्धक्य येईपर्यंत कुठल्याच श्वापदाने मारले नव्हते! मग त्याचा मृत्यू बेचक्यात फसून कसा झाला असेल? मला असे वाटते की जेव्हा त्या माकडाला स्वतःच्या मृत्यूची चाहूल लागली तेव्हा त्याने स्वतःला झाडावर अशा प्रकारे फसवून घेतले असेल की त्याला कुठलेही श्वापद खाऊ शकणार नाही!
असे म्हणतात की अशा वेळी त्याच्या कळपातील इतर सदस्य त्याला शेवटचा घास भरवितात वगैरे. पण माझा त्यावर विश्वास नाही. तर, त्याने स्वतःला असे फसवून घेतल्यानंतर त्याचा काही दिवसांनी मृत्यू झाला असणार. उन्हाळा असल्यामुळे त्याचे शव चांगलेच वाळले. ‘पण कावळ्यांनी त्याचे शव का खाल्ले नसावे?’
ह्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही.
‘गिधाडांनी त्याचे शव का खाल्ले नाही?’
ह्याचे उत्तर मला माहिती आहे. ‘त्या परिसरात गिधाडेच शिल्लक नाहीत!’
‘त्याच्या कळपातील सदस्यांनी त्याच्या शवाचे संरक्षण केले असेल काय?’ मला माहीत नाही.
जर कुठल्याही श्वापदाने लंगूर वानराला मारले नाही तर ते सर्वजण स्वतःचा वार्धक्याने येणारा मृत्यू अशाच प्रकारे स्वीकारतील काय? कदाचित - होय!
आणखी एक गोष्ट म्हणजे माझ्या सोबत आलेल्या निसर्ग मित्राला त्या नंतरचे तीन दिवस चांगलाच ताप भरला होता. मुद्दाम सांगायचे असे की त्या माकडाच्या शरीराला आम्ही हात अजिबात लावला नव्हता.
***
हा प्रसंग घडल्यानंतर माझी नागपूरला बदली झाली. कुठल्याशा संस्थेच्या कॅम्प साईटवर पक्ष्यांबद्दल बोलायला गेलो होतो (अंदाजे २००५-०६ मध्ये). त्या परिसरात छान झाडी होती. जंगलात फेरफटका मारताना एका झाडावर करड्या रंगाचे काहीतरी दिसले. बारकाईने बघितले तर ते एक वाळलेले लंगूर माकडाचे पिल्लू होते. दोन फांद्यांमध्ये ते फसलेले (फसवलेले) होते आणि वाळून केवळ सांगाडा शिल्लक राहिला होता. तेथील कुणीही मला त्याबद्दल अधिक माहिती देऊ शकले नाही. कुणीही ते याआधी बघितले नव्हते.
***
यापूर्वी मी दोन वेळा लंगूर वानराचे मृत पिल्लू बघितले होते. एकदा वानरी (त्याची आई) तर अगदी वाळून गेलेला पिल्लाचा सांगाडा घेऊन फिरत होती. हा प्रसंग मी यवतमाळ जिल्ह्यात माझ्या माहेरी (दारव्हा) बघितला होता.
***
आईची माया -१:
नागपूरचे श्री गोपाळ ठोसर सर वन्य प्राण्यांच्या वर्तणुकीचे गाढे अभ्यासक आहेत. त्यांची भेट झाली की ते अशा कितीतरी गोष्टी अर्थात प्रत्यक्ष आलेले अनुभव सांगतात.
त्यांनाही नागपूरला एकदा असाच प्रसंग बघायला मिळाला. वानरीचे पिल्लू नुकतेच मेले होते. वानरांचा संपूर्ण कळप शोकाकुल होता. त्यात वानरीचे रौद्र रूप दिसत होते.
सर समोर गेले आणि वानरीला उद्देशून म्हणाले
“अगं तुझं बाळ गेलंय. आता त्याचा मोह सोड!”
आणि आश्चर्य घडले. वानरीने पिल्लू त्यांच्या समोर टाकले आणि कळप मागे सरकला. नंतर सरांनी त्या पिल्लाचे अंत्यसंस्कार केले.
***
आईची माया - २:
दिनांक १५ एप्रिल २०१८. उत्तराखंड मधील पंगोट वरुन काठगोदामला जात असताना घाटाच्या रस्त्यात आमचा ग्रुप पक्षी बघायला थांबला होता. तेव्हा आमच्या पैकी एकाने मला सांगितले की एक लाल तोंडाची माकडीन (बोनेट मकाक) मृत पिल्लू घेऊन फिरतेय. त्यादिवशी मला चांगलाच ताप भरला होता आणि मी कारमध्येच पहुडलो होतो. तरी सुद्धा मी तिची छायाचित्रे आणि विडिओ घ्यायला सरसावलो. मी पुढे सरकताच एक मोठा माकड नर माझ्यावर धाऊन आला. तेव्हा इतर मित्रांनी त्याला भीती दाखवून मला संरक्षण दिले. तरीही मी त्याची छायाचित्रे आणि थोडा विडिओ मिळविला.
आईची माया स्वतःचे लेकरू एकतर आता जीवंत नाही हे मानायला तयार नसेल नाहीतर मेले तरी त्याला सोडायला ती तयार नसावी. अनेकदा एकलेली गोष्ट मला पुराव्यानिशी हवी होती. त्या नर माकडाला मादीच्या दुःखाचे मी भांडवल करू नये असे वाटत असावे काय?
‘तिला एकटे सोडा! त्रास देऊ नका. ती दुःखात आहे’.
असेच तो म्हणत असेल काय. अर्थात मी ते ऐकले नाही. माकडांचे दुःख आणि दुःखी असताना ते काय करतात ह्याचे कोडे मला पडले होते. ते सोडवायचे आहेच.
टिप: गूगल वर सर्च केले तर असे अनेक विडिओ उपलब्ध आहेत की ज्यामध्ये मृत पिल्लाला आई अनेक दिवस पर्यन्त सोबत घेऊन फिरते आहे. त्यात वानरे, माकडे, चिंपांजी, तसेच इतर अनेक मर्कटांचा समावेश आहे.
***
लाल तोंडाच्या माकडाचा मृत्यू:
दिनांक ९ मे २०१७: मुंबईला बीएनएचएसच्या गोरेगावातील संवर्धन शिक्षण केंद्राला एक फोन आला. फिल्म सिटीत एक माकड पडलंय त्याला घेऊन जा. अर्थात आमच्याकडे प्राणी पक्षी वाचविण्यासाठी कुठलीही सुविधा नाही. पण समोरच्या व्यक्तीने सांगितले की वन विभागाचे लोक सुद्धा यायला तयार नाहीत.
मी असा विचार केला की माकड ताब्यात घ्यावे व प्राण्यांच्या हॉस्पिटलला पाठवून द्यावे. म्हणून मी व माझा सहकारी दिलीप गिरी तिकडे पोहोचलो. लाल तोंडाचे माकड (बॉनेट मकाक) मृत्युपंथाला टेकले होते. दिलीप भाऊंनी त्याला उचलून घेतले. तर ते माकड आमच्याकडे बघत होते. त्याच्या नजरेत अतिशय केविलवाणे भाव होते. जणू ते म्हणत होते “मला वाचवा!” मी त्याची छायाचित्रे घेतली.
त्याने काही मिनिटातच प्राण सोडले. मी त्याच्या चेहेर्यावरील भावनांचे छायाचित्र सोशल मेडियावर टाकले तेव्हा मला एका व्यक्तीने हे छायाचित्र ‘डिस्टर्बिंग’ असून डिलिट करायला सांगितले. अर्थात मी तसे केले नाही. मला तर प्रत्येक वेळेस हे छायाचित्र बघून त्याची अगतीकता दिसते, वेदना दिसतात आणि त्याला स्वतःच्या मृत्युची चाहूल लागलेली दिसते! बघा तुम्हाला काही भाव दिसतात का ह्या छायाचित्रात?
डॉ. राजू कसंबे, मुंबई
आज छान लेखन म्हणवत नाही.
आज छान लेखन म्हणवत नाही.
नेहमी फोटो हवे होते असं वाटायचं. ह्या लेखातले फोटो बघवले नाहीत.
नसते दिले तर बरं झालं असतं
शेवटचा फोटो खरंच डिस्टर्बिंग आहे.
सस्मित +११
सस्मित +११
अगतिक आणी अजीजीचे भाव. काळीज
अगतिक आणी अजीजीचे भाव. काळीज तुटतय.
नागपुरचा वानरीने मेलेल्या बाळाचं समजुन उमजुन शरीर सोपवण्याचा प्रसंग तर डोक्यावरचे केस उभे रहातात असे शहारे आणणारा प्रसंग...भिडतोय.
बांदीपूरच्या जंगलात मी
बांदीपूरच्या जंगलात मी माकडिणीची प्रसूती पाहिली होती. नेमके पर्यटक जिथून सफारी घेतात तिथेच माकडांचा कळप होता. एक दांडगा नर, त्याच्या सोबत त्याच्यापेक्षा थोडे लहान ३,४ नर होते, त्यांच्यातले अधिकार त्यांना बघून कळत होते. ४ माकडिणी त्या गर्भार माकडीनीच्या आजूबाजूला कोंडाळे करून उभ्या बसलेल्या असताना माकडिणीने पिल्लाला जन्म दिला. नाळ लोम्बत होती. ते पिल्लू इतकं नाजूक होतं कि आपसूकच माणसात आणि माकडात तुलना झाली. मी काही फोटो घेतले होते, पण ते कार्ड नेमकं माझ्या मित्राकडे राहिलंय.
अजून सांगायचं झालं तर गावी आमच्या शेतात परिसरातल्या सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या लिंबाखाली मारुतीचे देऊळ आहे, ओणवेच उभे राहता येईल एवढेसे. बऱ्याचदा मंदिराच्या आजूबाजूला माकडे असतातच. आठवड्या दोन आठवड्यातून मंदिरातल्या मारुतीला भेटायला जांबुवंत देखील येतो, आणि जाताना ओळख म्हणून मंदिराच्या पायरीवरच दीर्घशंका करून जातो. कित्येकदा गावी असताना ती अस्वलाची चिकट विष्ठा घासून काढली आहे. गावात विजेच्या धक्क्याने एक माकड मेले होते. त्याची विधिवत अंत्ययात्रा काढून आमच्याच शेतात पुरले होते. त्याची भाऊबंद माकडे पण दुरून सारे बघत होतीच.
आमच्या शेतात जागलीला जावे लागत नाही, गावातल्या जुन्या चोरांनी नव्या चोरांना सांगूनच ठेवलंय, शंकरराव पाटलाच्या शेतात कधीच चोरीला जायचे नाही. (यामागे पण कथा आहे, पण इथे फार अवांतर होईल म्हणून असो)
मुद्दा एवढाच कि माकडांच्या वागण्याचे नीट निरीक्षण केले तर ते खरेच माणसाच्या किती जवळ आहेत हे कळून येते.
शेवटचा फोटो खरंच डिस्टर्बिंग
शेवटचा फोटो खरंच डिस्टर्बिंग आहे.>>>+१११
अजिंक्यराव पाटील
अजिंक्यराव पाटील
"त्याची विधिवत अंत्ययात्रा काढून आमच्याच शेतात पुरले होते. त्याची भाऊबंद माकडे पण दुरून सारे बघत होतीच."
अशी अंत्ययात्रा मी महाराष्ट्रात तसेच ओदिशा मध्ये बघितली आहे. एका वानराची समाधी सुद्धा बांधलेली बघितली आहे. हनुमान मंदीराजवळ ती आहे.
धन्यवाद!
अजिंक्यराव पाटील
अजिंक्यराव पाटील
"त्याची विधिवत अंत्ययात्रा काढून आमच्याच शेतात पुरले होते. त्याची भाऊबंद माकडे पण दुरून सारे बघत होतीच."
अशी अंत्ययात्रा मी महाराष्ट्रात तसेच ओदिशा मध्ये बघितली आहे. एका वानराची समाधी सुद्धा बांधलेली बघितली आहे. हनुमान मंदीराजवळ ती आहे.
धन्यवाद!
अशी शक्यता आहे कि हि माकडे
अशी शक्यता आहे कि हि माकडे झाडाच्या बेचक्यात अडकून पडल्यामुळे साधारण जे परभक्षी प्राणी किंवा कीटक त्यांना जमिनीवर खाऊन टाकतात ते तेथवर पोहोचू शकले नाहीत आणि कडक उन्हाळ्यामुळे शरीर वाळून गेले त्यामुळे शरीरातील(पोटातील) जिवाणू सुद्धा नष्ट झाले.
इजिप्तच्या ममीज अशाच वाळवून ठेवल्यामुळे काही शतके अस्तित्वात राहिल्या.
कारण सहसा एखादे प्राण्याचे पार्थिव जमिनीवर पडून असले कि ते किडामुंगी लागून आणि जमीनींतील जिवाणूंमुळे विघटित होऊन जाते.
माकडांना, वानरांना शत्रू एकच
माकडांना, वानरांना शत्रू एकच तो म्हणजे बिबळ्या. जिथे बिबळ्या नाही तिकडे ती म्हातारे होऊनच मरतात.
पुन्हा माकडांना खाणे मिळवण्यासाठी जी गावाकडे जायची आवड असते ती वानरांना नसते. शहरांत विजेच्या तारांचा शॉक लागून माकडे मरतात. खडकांना धरून उलटसुलट चढून माकडे फिरतात तेव्हा दरीत कोसळून मरतात तसा अपघाती मृत्यू वानरांना नसतो. वानरे झाडांवरच कोवळा पाला खातात, फांद्यांच्या साली खातात.
असे काही मृत्यू सोडल्यास नैसर्गिक शेवट ठरलेला.
यांची झोपण्याची सवय - माकडे दाट फांद्या पानांत संध्याकाळी जाऊन बसतात. त्यांचे पाय ( बोटे)फांदीला घट्ट धरतात आणि मग सकाळी जागे झाल्यावरच सोडतात. म्हाताऱ्या माकडाचे पाय सुटत असावेत व ते खाली पडत असेल.
वानर - सूर्य अस्ताला जाऊ लागला की वानरे उंच झाडावरच्या आपापल्या जागा पकडतात. आडव्या फांदीच्या बेचकीवर बोचा टेकून शेपटी खाली लोंबकळते, दोन्ही पाय बेचकीच्या एकेका फांदीवर ठेवून 'लॉक' करतात. पश्चिमेला असणाऱ्या बेचकीला प्राधान्य. मावळत्या सूर्याकडे बघत शांत होतात. आपण खाली गेलो तर एरवी पटापट दूर पळणारी वानरे फक्त आपल्याकडे एक कटाक्ष टाकतात. हलत नाहीत. हे भीमाशंकर, राणकपूर (उदयपूर -फालना रस्ता) इथे पाहिलंय. आता जर हे वानर म्हातारपणामुळे प्राण सोडते झाले तरी त्याच्या पायांचे लॉक उघडत नसावे असा कयास आहे. अर्थात ते तिथेच लोंबकळत वाळत असणार.
((बिबळ्या माकडांना कसे पकडतो? --
ही गोष्ट मी काकांच्याकडून ऐकली. ते बहिणीकडे ( माझी आत्या ) माथेरानला जात असत. भटकायचे . तिन्हीसांजेला माकडे जागा पकडत तेव्हा बिबळ्या फिरायचा. माकडे घाबरून आणखी वरच्या फांद्यावर जायला धडपडायची. बिबळ्या झाडावर चढतो पण बारीक फांद्यांवर जाऊ शकत नाही. पण माकडांची पळापळ सुरुच आणि शेजारचे झाड अधिक चांगले समजून उड्या मारतांना एखादे खाली पडतेच ते तो उचलतो. शिवाय गुरगुराटानेही टरकतात. खूपच दूर गेली तर शिकार होत नाही मग दुसरे कुत्रेबित्रे शोधण्यात बिबळ्या गावात घुसतो. नंतर अचानक बिबळे कुठे गायबच झाले का मारले गेले माहिती नाही.))
Srd.धन्यवाद.
Srd.धन्यवाद.
तुम्ही लिहिलेली माहितीच हा एक लेख होऊ शकतो.
खूप छान लिहिलय!!
अवांतर, सध्या ती माकडं आणी
अवांतर, सध्या ती माकडं आणी शेकोटीची गोष्ट वोट्सॅपअवर येत आहे, त्यात कित्पत तथ्य आहे?
वन्य जीवांच्या बाबतीत कुणाला
वन्य जीवांच्या बाबतीत कुणाला कधी काय दिसलं हे लिहून ठेवायला हवं. माहितगारांना काही विशेष दिसलं तर ते नोंद करतात पण सामान्य निरीक्षकांना नक्की काय सामान्य आहे आणि काय विशेष आहे हे लक्षात येत नाही आणि त्यांनी सर्वच नोंदी ठेवल्या तर पुढे काही वर्षांनी उपयोगी पडतील.
लेख आवडला.
लेख आवडला.
Jane Goodall बद्दल माहीत असेल. माकडांमधे चांगली आई, वाईट आई, युद्ध, कनिबलिझ्म वगैरे सगळं असतं.
माकड आणि वानर मध्ये फरक काय?
माकड आणि वानर मध्ये फरक काय?
आवडलं.
आवडलं.
श्रीनिवास विनायक कुलकर्णींंच्या 'डोह' या पुस्तकात 'आम्ही वानरांची सेना' अशा नावाचा एक लेख आहे. त्यांनीही फारच मस्त बारीकसारीक निरीक्षणं लिहिली आहेत. वानरं माणसांसारखीच वाटतात तो लेख वाचताना.
प्राणी वर्गवारीत फारसा फरक
प्राणी वर्गवारीत फारसा फरक नसावा शरीरदृष्ट्या. खादाडी आणि भांडखोरपणात माकडं अग्रेसर.
आपल्या हातातल्या वस्तू खाण्याचे जिन्नस मिळवण्यासाठी हुसकावून घेणे, हल्ला करणे हे काम माकडांचेच.
बहुतेक लहान चणीची, लाल
बहुतेक लहान चणीची, लाल तोडांची दिसतात ती माकडं आणि वानरे आकाराने मोठी, पांढरी केसाळ आणि काळी तोंडे असतात. असं मला वाटतं.
+१ वर्षा
+१ वर्षा
वानर - Apes
वानर - Apes
माकड़ - monkey
without tails and with tail
टेक्निकली असे असावे
पण सरधोपटपणे मोठ्या माकडाना वानर म्हटले जात असावे. डॉक्टर साहेबच ह्यासाठी योग्य मार्गदर्शन करतील.
माकड आणि वानर मध्ये फरकhttp:/
माकड आणि वानर मध्ये फरक
http://www.walkthroughindia.com/know-the-difference/difference-and-simil...
हा लेख ही आवडलाच, खूप
हा लेख ही आवडलाच, खूप interesting आहे ़
या लेखात फोटो नको अस वाटल..
या लेखात फोटो नको अस वाटल.. खुपच डिस्टर्बिंग आहे.
प्राण्यांचे हाल बघून मला खूप
प्राण्यांचे हाल बघून मला खूप वाइट वाटतं.रस्त्यावरची वितभर लांबीची अस्थिपंजर कुत्र्याची पिले अन्नाच्या शोधात पायाशी येतात तेव्हा गलबलते. काही ना काही देतच असतो मुक्या जनावरांना.
शेवटच्या फोटोने वाईट वाटले.
शेवटच्या फोटोने हलायला झाले.
शेवटच्या फोटोने हलायला झाले.
डॉक्टर असल्यामुळे अनेक मृत्यू अगदी जवळून पाहिले आहेत.
परंतु वर्गमित्राचा वीस वर्षाचा एकुलता एक मुलगा कर्करोगाने ग्रस्त होता. सर्व उपचार करूनही उपयोग झाला नाही. शेवटच्या स्थितीत व्हेंटिलेटरवर होता तेंव्हा त्याच्या डोळ्यातील भीती आणि मला वाचवा हि विनवणी याची आठवण हा फोटो पाहून आली आणि डोळ्यात पाणी उभे राहिले.
मित्र इंजिनियर आहे पण मी डॉक्टर आहे आणि काही तरी करेन म्हणून माझ्याबद्दल त्याला आणि त्याच्या मुलाला आशा होती.
माझ्या ओळखीचा वापर करून मुंबईतील सर्वोत्कृष्ट डॉक्टरना दाखवून काहीही उपयोग झाला नाही. आजही आपल्या अगतिकपणाबद्दल शरम वाटते.
त्याचा चेहरा अजूनही चार वर्षे झाली तरीही माझ्या डोळ्यासमोरून हलत नाही
असे प्रसंग प्रत्येकाच्या
असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतच राहतात.