न्यूझीलंड-६ : किवी क्रिकेट ग्राऊंड्स

Submitted by ललिता-प्रीति on 27 January, 2020 - 01:17

न्यूझीलंड-१ : माओरी! माओरी!! - https://www.maayboli.com/node/65811

न्यूझीलंड-२ : Unique to NewZealand... हे फक्त इथेच! - https://www.maayboli.com/node/66047

न्यूझीलंड-3 : हा खेळ मिनरल्सचा - https://www.maayboli.com/node/66538

न्यूझीलंड-४ : You are here. (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग १ला) - https://www.maayboli.com/node/67789

न्यूझीलंड-५ : किवी शहरांतल्या डोंगरांवर (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग २) - https://www.maayboli.com/node/69265

---------------------

न्यूझीलंड टूरच्या आधीच्या आठवड्यात टीव्हीवर रॉस टेलरचे इंग्रजी उच्चार समजून घेण्याचा प्रयत्न केला होता; तरी त्या देशात फिरताना खास क्रिकेट थीम मनात धरून फिरावं, बघावं असं काही निघताना डोक्यात नव्हतं. तिथे पहिल्याच दिवशी पाहियाच्या समुद्रकिनार्‍यावर (Horotutu Beach) भटकताना ही एक पाटी दिसली आणि तो धागा लक्षात आला.

IMG_20171106_034416_compressed.jpg

--
IMG_20171106_034438_compressed.jpg

ज्ञात माहितीनुसार न्यूझीलंडमध्ये १८३२ साली पहिला किकेट सामना खेळला गेला. सामन्याची जागा त्या पाटीच्या आसपास कुठेतरी असावी असं त्यात लिहिलेलं होतं. हा फोटो काढला तिथे आता व्यवस्थित डांबरी रस्ता आहे. समोर समुद्र. म्हणजे रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला ते ठिकाण असावं असा आम्ही अंदाज बांधला. आता त्या बाजूला घरं, हॉटेलं वगैरे आहेत. पाहियात क्रिकेटचा उल्लेख अन्यत्र कुठे दिसला नाही. पुढे रोटोरुआतही तसंच. शिवाय इतर इतकं काय काय नवनवीन बघण्यासारखं होतं, की क्रिकेट-क्रिकेट करत फिरावं असं काही वाटलेलं नव्हतं.
क्रिकेट परत एकदम समोर आलं वेलिंग्टनला, टूर सुरू होऊन एक आठवडा उलटून गेल्यावर.

वेलिंग्टनला एअरपोर्टबाहेर आलो, तिथे एकमेव दिसलेली टॅक्सी घेतली आणि हॉटेलच्या दिशेनं निघालो. टॅक्सीवाला पाकिस्तानी होता. आम्ही इंडियन आहोत हे कळताच त्याने मस्त हिंदीतून गप्पा मारायला सुरूवात केली. वेलिंग्टनमध्ये फारसे भारतीय पर्यटक येत नाहीत, म्हणाला. तुम्हाला इथे फिरायला गाडी हवी असेल तर सांगा; माझा हाच व्यवसाय आहे; असं म्हणून त्याने त्याचं व्हिजिटिंग कार्डही दिलं. रस्त्यात तो वेलिंग्टन शहराची थोडीफार माहिती सांगत होता; वाटेत दिसणार्‍या शहरातल्या जागा, रस्ते, काही इमारती, त्यांची नावं, वगैरे.
वाटेत व्हिक्टोरिया टनेल आला. माऊंट व्हिक्टोरिया ही वेलिंग्टन शहरातली प्रसिद्ध जागा आहे, इत्यादी बोलत बोलत टनेलच्या बाहेर निघालो आणि एका ठिकाणी उजवीकडे वळलो. ड्रायव्हर डाव्या हाताला इशारा करत म्हणाला- “हे दिसतंय ते आहे the biggest round-about of the Southern Hemisphere... त्याला the Basin Reserve म्हणतात...” ते नाव मेंदूपर्यंत पोचायला काही क्षण लागले; आणि मी आनंदानं उडालेच. त्याला म्हणावंसं वाटलं, अरे नुसतं round-about काय, round-about?? फेमस क्रिकेट ग्राऊंड आहे ते!!

का कोण जाणे, The Basin Reserve या नावानं कॉलेजच्या दिवसांपासून मनात घर केलं होतं. (आत्ता लिहितानाही उचंबळून आल्यासारखं झालं.) माझ्या आठवणीप्रमाणे, late 80’s मध्ये आपल्या टीमच्या ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधल्या टेस्ट-मॅचेसचं दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण सुरू झालं. वेळेच्या फरकामुळे ते मध्यरात्री दोन-अडीच वाजता सुरू व्हायचं. तेव्हा २४ तास टीव्ही नव्हता. त्यामुळे त्याचं फार अप्रूप वाटायचं. शिवाय channel-9 चं तेव्हा out of the world वाटणारं प्रक्षेपण, स्लो-मोशन्स, रिची बेनॉची कॉमेंट्री, ॲनालिसीस वगैरेंमुळे ट्रीट असायची. त्या टेस्ट-मॅचेस असतील तेव्हा मी रात्री २ चा गजर लावून उठायचे आणि पहिलं सेशन पाहून सकाळच्या कॉलेजला जायचे. कॉलेजमध्ये आणखी एक क्रिकेटवेडी मैत्रीण होती. ती पण पहाटे मॅच बघून आलेली असायची. मग आम्ही दोघीच त्याच्या गप्पा मारायचो.
या सगळ्यात MCG, SCG, Gabba, WACA, या नावांच्या तुलनेत The Basin Reserve हे नाव फारच artistic वाटायचं. ऑस्ट्रेलियातल्या स्टेडियम्सच्या तुलनेत ते चिमुकलं असल्यामुळे फार आवडायचं सुद्धा...

हे सगळं त्या दिवशी परत आनंदात उचंबळून वर आलं. त्याच्या पुढच्याच चौकात आमचं हॉटेल होतं. ग्राऊंडपासून हॉटेल इतकं जवळ आहे म्हटल्यावर काय, तिथे जायचं हे obvious होतं. दुपारी ४ च्या सुमारास बाहेर पडलो; अंतर जेमतेम अर्धा किमीच होतं. तिथे सिक्युरिटी वगैरे असणारच, मग आपल्याला just like that आत शिरू देतील का, वगैरे प्रश्न होतेच. पण म्हटलं जाऊन बघू; कुणी मनाई केली तर परत येऊ. तर तिथे टोटल शुकशुकाट होता. तरी आम्ही मेन एन्ट्रन्सपाशी पाच-एक मिनिटं घोटाळलो; गेट उघडं होतं, पण आत जावं की नाही कळत नव्हतं. तेवढ्यात १-२ माणसं त्या गेटमधून ये-जा करताना दिसली. मोठा चौक ओलांडून इकडून तिकडे जावं तशीच ती त्या गेटमधून निघून गेली. ती जागा ’क्रिकेट ग्राऊंड’ म्हणून कुणाच्याही खिजगणतीत नव्हती. मग आम्हीही बिन्धास्त आत शिरलो.

IMG_20171111_085234_compressed.jpg

प्रथमच एका आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचेससाठीच्या स्टेडियमच्या आत पाय ठेवला होता. जाम भारी वाटत होतं.

IMG_20171111_085255_compressed.jpg

उजव्या हाताला छोटंसं पॅव्हेलियन, विरुद्ध बाजूला elevated lawns, मागे माऊंट व्हिक्टोरिया. बस्स! इतकंच. बराच वेळ मी तिथे उभ्या उभ्या तो परिसर नुसता न्याहाळत होते. टेस्ट-मॅच असेल तेव्हा इथे कसं दृश्य असेल ते इमॅजिन करत होते.

IMG_20171111_085411_compressed.jpg

मग पॅव्हेलियनच्या कडेकडेने चालायला सुरूवात केली. पॅव्हेलियन संपलं तिथे त्या ग्राऊंडची माहिती सांगणारा एक विभाग दिसला. जुने-जुने २०व्या शतकाच्या सुरूवातीचे क्रिकेट सामने, त्यातले प्रसिद्ध खेळाडू वगैरे माहिती डिस्प्ले केली होती.

20171111_162619_compressed.jpg

या ग्राऊंडवरचा सर्वाधिक टेस्ट स्कोअर आणि न्यूझीलंड टीमचा इथला सर्वाधिक टेस्ट स्कोअर असा एक मोठा डिस्प्ले दिसला.

20171111_162807_compressed.jpg

तो ३०२ स्कोअर कोणत्या टीमचा ते तिथे लिहिलेलं नव्हतं. (आम्ही पाहून आल्यानंतर हे आकडे बदललेही असतील.)

पायाखालच्या वाटेवर डांबरात २ पाट्या बसवलेल्या दिसल्या.

IMG_20171111_090645_compressed_0.jpgIMG_20171111_090851_compressed.jpg

ब्रँडन मॅकलमचं debut पासून सलग १०० टेस्ट्स खेळण्याचं रेकॉर्ड, आणि १९९१ सालच्या न्यूझीलंड-श्रीलंका टेस्ट मॅचमधली मार्टिन क्रो-अँड्रू जोन्सची रेकॉर्ड पार्टनरशिप - याबद्दल तिथे माहिती लिहिलेली होती.

IMG_20171111_090024_compressed.jpg

’मनाई’ कॅटेगरीतला एकमेव बोर्ड इथे होता (ग्राऊंडच्या देखभालीचं काम सुरू आहे, ग्राऊंडमध्ये प्रवेश करण्यास मनाई आहे.) तिथला बाऊंड्री रोप उचलून लाकडी कंपाऊंडवर ठेवलेला होता.

IMG_20171111_085350_compressed.jpg

मी जाऊन त्या रोपला हळूच हात लावून आले. अगदी बाऊंड्री अडवून ४ रन्स वाचवल्याचं फीलिंग आलं! Lol

लांबवर elevated lawns वर एक-दोघं उन्हात निवांत पडलेली होती. बाकी तिथे अक्षरशः चिटपाखरूही नव्हतं. मॅचेस असतील तेव्हा या ग्राऊंडची शान, नसतील तेव्हा किस झाड की पत्ती! त्याचीच फार मजा वाटत होती. पण त्यामुळेच आम्ही त्या जागी निवांत फिरू शकलो होतो.
(तिथून मग माऊंट व्हिक्टोरियावर फिरायला गेलो. वरून परत बेसिन-रिझर्व दिसलं. त्याचा फोटो https://www.maayboli.com/node/69265 (न्यूझीलंड-५ : किवी शहरांतल्या डोंगरांवर) या धाग्यावर आहेच.)

----------

त्यानंतर एक आठवड्यानं क्वीन्सटाऊनमध्ये पोचलो. तिथला हॉटेलचा मालक सत्तरीचा, पण फार उत्साही होता. हॉटेल सिटी सेंटरपासून थोडं लांब होतं. तर त्यानं आम्ही पोचलो त्यादिवशी संध्याकाळी आम्हाला सिटी सेंटरमध्ये त्याच्या कारमधून फ्री-राइड देऊ केली. वाटेत एका जागी गाडी थांबवून, क्वीन्सटाऊन लेक दाखवलं, थोडी माहिती सांगितली; लेकच्या मध्यभागी एक बेट आहे, त्यावर गोल्फ कोर्स आहे, वगैरे. मी त्याला ’गोल्फ कोर्स वगैरे जाऊ दे’ अशा आविर्भावात क्वीन्सटाऊन क्रिकेट ग्राऊंड कुठे आहे असं विचारलं. त्यानं ती दिशा दाखवली. ते उलट दिशेला जरा लांब होतं.
आम्ही क्वीन्सटाऊनमधून निघायच्या दिवशी त्यानं आम्हाला एअरपोर्टपर्यंत पुन्हा फ्री-राइड देऊ केली. ’जरा १०-१५ मिनिटं आधी निघणे शक्य असेल तर वाटेत क्रिकेट ग्राऊंड दाखवतो’ म्हणाला. मी टुण्णकन उडीच मारली. ते तर बेसिन-रिझर्वपेक्षाही चिमुकलं ग्राऊंड निघालं. पण अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य.

IMG_20171122_092349_compressed.jpgIMG_20171122_092444_compressed.jpg

आम्हाला ऑकलंडचं विमान पकडायचं होतं, त्यामुळे तिथे बेसिन-रिझर्वइतका वेळ घालवता आला नाही. तरी पॅव्हेलियनमधल्या खुर्चीवर मी जरा वेळ बसून घेतलंच.

----------

ऑकलंडमध्ये माऊंट ईडन समीटला पोचता पोचता दुसर्‍या बाजूला खाली अचानक ईडन पार्क स्टेडियम दिसलं, अगदी त्या ’EDEN PARK’ अक्षरांसहित...

IMG_20171123_132337_compressed.jpg

याबद्दलही आधीच्या धाग्यात लिहिलं आहेच. (https://www.maayboli.com/node/69265)

(क्रिकेट टेलिकास्टच्या वेळेस या फोटोच्या विरुद्ध बाजूला कॅमेरा असतो. त्यामुळे माऊंट ईडन हमखास दिसतं. आधी कधी असं मुद्दाम पाहिलं नव्हतं. पण तिथे जाऊन आल्यावर ते लक्षात आलं.)
ध्यानीमनी नसताना अशी आकारत गेलेली किवी क्रिकेट थीम त्या दृश्यानं शेवटाला आली.

यात आमचं मुख्य हुकलं ते ख्राइस्टचर्चचं हॅगली पार्क. ॲकारोआ टूरहून परतल्यावर ख्राइस्टचर्च सिटीत आम्ही जिथे बसमधून उतरलो तिथून ते ग्राऊंड फार लांब नव्हतं. अर्थात हे नंतर कधीतरी नकाशा बघताना कळलं. शिवाय एकूणच (ॲकारोआला एक अख्खा दिवस खर्ची पडल्यामुळे) ख्राइस्टचर्चमध्ये ग्राऊंड कुठे आहे ते शोधून तिथे भटकायला जायला वेळ मिळालाच नसता. नंतर जरा हळहळायला झालं खरं, पण ’गोडी अपूर्णतेची’ म्हणून ते सोडून दिलं, झालं!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या आठवड्यात न्यूझीलंड टूरच्या दोन टी-२० मॅचेस झाल्या; त्यामुळे मला परत जाग आली. आणि आज आज्ञाधारकपणे हे लिहून पोस्ट केलं Proud

अगदी बाऊंड्री अडवून ४ रन्स वाचवल्याचं फीलिंग आलं! >> Happy मस्त लेख.
मलापण लॉर्डस वर बाउंड्री लाइनच्या बाहेरून आतल्या गवताला हात लावताना टॉस करून नाण उचलतोय अस वाटल होतं Happy

बायदवे. ऑकलंड्च ग्राउंड टी २० साठी न्यूझिलंड मधील सगळ्यात भारी ग्राउंड आहे अस माझ मत पहिल्या दोन सामन्यांनंतर झालं आहे.

मी क्रिकेट फॅन नाही, पण तुमच्या ह्या सीरिजच्या लेखांची वाट पाहत असतो.

आता ब्रेक न घेता पुढील भाग लिहिणार आहात असे समजतो Happy

मस्त मस्त!

बेसिन रिझर्व्ह नावाबाबत टोटली सहमत! क्वीन्सटाउनचे ग्राउण्ड अतिशय सुंदर आहे. या फोटोत तेथे खुर्च्या वगैरे दिसत आहेत. पाच वर्षांपूर्वी मी गेलो होतो तेव्हा बघितल्याचे आठवत नाही. अर्थात आम्ही त्या दुसर्‍या बाजूने पाहिले होते. मागे ती बहुधा "रिमार्केबल्स" नावाची पर्वतरांग आहे.

मस्तच !! असे क्रिकेट ग्राऊंड्स आतमधून पाहून येणे भारीच. ऑस्ट्रेलियामधली ग्राऊंड्स जितकी पाठ आहेत तितकी न्युझीलंड मधली नाही झाली त्यामुळे ही ओळख खुपच आवडली.

मस्त लेख! न्युझिलंड मधल्या मॅचेस पहाताना एक वेगळी मजा येते. लहानशी ग्राऊंड्स, आक्रमक पण रसिकतेनं खेळणारे खेळाडू आणी तितक्याच रसिकतेनं दाद देणारे प्रेक्षक पहाताना खूप रिलॅक्स्ड वाटतं. लेखातले फोटोज आणी वर्णन छान जमलंय.

छानच !
* रात्री २ चा गजर लावून उठायचे आणि पहिलं सेशन पाहून सकाळच्या कॉलेजला जायचे. * - असं वेड हवं, मग ते कुठल्याही खेळाचं असो !!