साठवण

Submitted by आस्वाद on 22 January, 2020 - 14:56

तुझं मला माहित नाही पण मी तरी घट्ट धरून ठेवलेयेत ते क्षण...
वाढून घेते पानांत तुझ्या-माझ्या कडू-गोड आठवणी...
मग चवी चवीने चाखत बसते
जगून घेते ते क्षण पुन्हा पुन्हा ...

तुझं मला माहित नाही पण मी तरी अजूनही जपलाय तो गंध...
लावून घेते हाताला ते अत्तर
मग गंधाळलेला हात हुंगत असते अधून-मधून
श्वासांत भरून घेते तो सुवास पुन्हा पुन्हा...

तुझं मला माहित नाही पण मी तरी संभाळलेयत ते सूर...
तुझ्या-माझ्या आवडीचे गाणे
ऐकत असते मी रोजच
कानांत साठवून घेते ती सुरावट पुन्हा पुन्हा..

तुझं मला माहित नाही पण मी लिहून ठेवलेयत ते शब्द
तू मला बोललेले, माझ्याबद्दल बोललेले
वाचत असते मी कधीकधी
हरवून जाते मी त्या दिवसांत पुन्हा पुन्हा..!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> तुझं मला माहित नाही पण मी तरी संभाळलेयत ते सूर...
तुझ्या-माझ्या आवडीचे गाणे
ऐकत असते मी रोजच
कानांत साठवून घेते ती सुरावट पुन्हा पुन्हा

हे सर्वात जास्त आवडलं. Happy

अप्रतिम!
कुठलाही तक्रारीचा, नाराजीचा सूर नाही, उलट प्रसन्न वाटलं वाचून. खरंच असं प्रगल्भ आयुष्य जगता आलं तर किती छान होईल.

@आस्वाद, तुमची कविता ललितलेखनाच्या ग्रुपवरुन कवितेच्या ग्रुपवर हलवाल का?