पत्ते पे पत्ता

Submitted by mi_anu on 21 January, 2020 - 09:34

"वो 'अरे पिटल' का बोर्ड है ना उसके बाद अंदर लेफ्ट मारो और सौ मीटर आवो.ब्लु और सिल्व्हर कलर का पाटी है उधर से अंदर आव.गेट पर फोटो निकालके लो"
"अरे पिटल क्या है? पिटला भाकरी का नया हॉटेल खुला है क्या?"
"नही वो मॅक्सकेअर हॉस्पिटल है.लेकीन उसका बहुत सारा अक्षर बुझ गया है ना, पुरा नाम बोलूंगा तो आपको समझ मे नही आयेगा."

पलीकडे माझे हात शिवशिवत होते.या माणसाला फोनवर पत्ता सांगायला बसवायचा म्हणजे अवघड प्रसंग.खूप लांबच्या गोष्टी सांगतो पत्त्यात.दिड किलोमीटरवर असलेल्या हॉटेल च्या आपण नकाशात मागे असलो तरी तिथे मागे जायला रस्ता बराच फिरून आहे हे कोण सांगणार?ते माणसांना त्या हॉटेलच्या मागे जायला लागल्यावर रखवालदाराने हटकलं की कळणार.म्हणजे, 3 वर्षांपूर्वी होता हॉटेल च्या मागून रस्ता.पण मग हायवे च्या अर्धा किलोमीटर की काहितरी पर्यँत दारू प्यायची नाही असा नियम आल्यावर हॉटेल ने एकदम गोल गोल जंतर मंतर सारखा रस्ता बनवून त्याच्या मागच्या बाजूला हॉटेल ची एन्ट्री ठेवून लोकांना हायवेच्या अर्धा किलोमीटर लांब दारू पिता येईल अशी व्यवस्था केली.आणि आमच्या घरापर्यंत यायचा मार्ग लांबला.

त्यात हा शहाणा गेट वर ते नवं ऍप निघाल्या पासून बायका समारंभात एकमेकींना "जाताना हळदीकुंकू लावून घ्या हां ताई" सांगतात त्या उत्साहाने सगळ्यांना "आते टाईम गेट पर फोटो निकालके लो" सांगतो.

"मला दे बरं फोन"
"हां भैय्या, मै क्या बोलती हूँ, वो चाय की दुकान है ना, बहुत सारे लडका लडकी बैठके सिगारेट पी रहे दिखेंगे, वहा से मुडो. फिर एक बहुत बडा किराणा दुकान दिखेगा, उसपे बहुत सारे वेफर्स झाडू और पायपुसणे,सॉरी डोअर मॅट लटके होंगे, वहा से सीधा आव.फिर एक स्कुल लगेगा वहा पे बहुत सारा पीला गाडी पार्क किया दिखेगा वहा से आगे नीला सफेद पट्टा का गेट रहेगा वहा से अंदर आव."

"हा काय पत्ता आहे?सिगारेट पिणारी मुलं 24 तास असतात का?"
"अरे पिटल चा पत्ता सांगणं मला नाही पटत.त्याची वेगवेगळी अक्षरं बिघडतात.कार हॉस्पिटल, ऍक्स केअर हॉस्पिटल, मेयर ऑस्पिटल,मार ऑस्प,काई ऑस्प. ते खूप मिस गायडिंग ठरतं ना."

सगळ्या दुकानदारांनी ज्या उत्साहाने काही वर्षांपूर्वी चकचकीत पाट्या लावल्या, सगळ्यांच्या पाट्यातली अक्षरं विझायला लागलीत.एक "मूळव्याध क्लिनिक" मात्र एकही अक्षर न विझता ठसठशीत उभं आहे.पण ते काय आम्ही अजून तरी पत्त्यात सांगणार नाहीय.हायवे बनायच्या आधी आम्ही 'अँटिक वाइन शॉप च्या गल्लीत वळा' सांगितलं की कसं परफेक्ट कळायचं सगळ्यांना.

मला पत्ते सांगायचा आजार आहे.म्हणजे, कोणीही काहीही पत्ता विचारला की तो मला किंवा कोणालाही विचारला असला तरी सगळी कामं सोडून मी पत्ता सांगते.हावभावासहित. यातली काही रत्नं आमच्या उपद्रवी कुटुंब सदस्यांनी बरीच वर्षं लक्षात ठेवली आहेत.
"आता रस्ता वळेल.85% लोक तिथे वळतील.पण तुम्ही वळू नका.तुम्ही न वळल्याबद्दल बरीच गर्दी शिव्या घालेल. पण तसेच पुढे जा.मग आलाच रक्षक चौक."
"मोठी पांडबा पाटील स्मशानभूमी दिसली की गाडी स्लो करा.डावीकडे घ्या.जरा पुढे गेलं की लगेच आयुर्वेदिक नर्सरी."
"हापूस आंब्याची गाडी उभी आहे त्याच्या पुढच्या गल्लीत वळा."(गाडी आंबे विकून घरी गेली की रस्त्यातच तबला पेटी वाजवत बसा.)
"तो असा वळणा वळणाचा दोन एस आकार वाला रस्ता आहे त्याने सरळ या."
"तो लांबचा उजवा घेऊ नका, असा जवळचा उजवा घ्या मग हे असे इकडे वळा आणि खाली या सरळ."(हे असे इकडे ची दिशा फोनवर बोलताना हाताने दाखवलीय त्यामुळे पत्ता विचारणारे 'हे' लवकर घरी येण्याची अजिबात शक्यता नाही.)

हे खाली या सरळ आणि वर जा सरळ वाले पत्ते सांगायला मी पण हल्लीच शिकतेय.म्हणजे, असे पत्ते ऐकून 'वर म्हणजे कुठे' आणि 'खाली म्हणजे कुठे' हे मला अजून कळत नाही.मी स्टेशनवर उभी असायचे तेव्हा 'अप' म्हणजे नकाशात वर, राजस्थान,यूपी,गुजरात,जम्मू काश्मीर कडे जाणारी गाडी आणि 'डाऊन' म्हणजे नकाशात खाली पुणे, बंगलोर,कोल्हापूर, केरळ ला जाणारी गाडी हे खूप अभ्यासाने शोधून काढलं होतं.पण दुसऱ्याला सांगताना 'हे असे अमुक तमुक वरून खाली या सरळ' म्हणून दडपून द्यायचं.कुठे ना कुठे पोहचतील.कोणी ना कोणी पत्ता सांगेलच.नियतीच्या मनात असेल तर पोहचतील.

सर्वात भयंकर पत्ते ती मॅप वाली बाई सांगते."गोल चक्कर पे तिसरा निकास ले" म्हटलं की किंचाळून तिला गदागदा हलवून "गोलावर एक दोन तीन कोणत्या बाजूने मोजू?"म्हणून विचारावं वाटतं.तिसरा एक वेळ ठीक आहे, कधी कधी पाचवा निकास घ्यायला सांगते.असा पाच सहा आरे असलेला सूर्या सारखा दिसणारा चौक आपल्या इथे कुठे आहे याचा फार विचार करावा लागतो.परवा लोणावळ्याला पत्ता शोधताना बाईने आम्हाला एका अरुंद रस्त्याने एक मातीचा ढीग आणि एक नाला असलेल्या डेड एन्ड ला नेऊन सोडलं.मग नंतर चौकशी केल्यावर असं कळलं की बाईच्या सेटिंग मध्ये 'एक्सक्लुड नॉन पेव्हड रोडस' असा एक ऑप्शन होता तो ऑफ करायचा होता म्हणे.अशीच एकदा खरेदी करत घरी जायला उशीर झाला म्हणून मी पोळीभाजी केंद्र शोधत होते चालत.मग बाईने आधी मला रिलायन्स फ्रेश च्या गोडाऊन ला, मग पु ना गाडगीळ च्या दारात आणि मग कपड्याच्या दुकानात सोडलं.प्रत्येक वेळी ती गंतव्य 20 मीटर वर आहे सांगत होती.शेवटी पोळीभाजी केंद्राचा नाद सोडून कपडयाच्या दुकानाला ईश्वरी संकेत मानून 2 टॉप घेऊन टाकले.

आम्ही सोलापूर ला चाललो होतो.तेव्हा मराठी मॅपबाई ला सोलापूर चा पत्ता सांगितला.आणि ऐन वेळी जवळ पुढे दुसरीकडे जायचं ठरलं. बाईला बिचारीला माहितीच नाही.ती आपली 'आता वळा' 'आता यु टर्न घ्या आणि मग वळा' 'आता डावीकडे चक्राकार मार्ग घ्या मग यूटर्न घ्या' म्हणून गयावया करायला लागली.आम्ही बरेच पुढे आल्याचं तिला कळल्यावर 'शक्य असेल तर वळसा घेऊन मागे वळा' असं दोन तीन वेळा म्हणाली आणि मग गप्प बसली. 'मी माझं सांगायचं काम केलं, तुम्ही ऐकत नाही.आता जायचं तिथे जा,रस्ता चुका आणि मरा मेल्यानो' असं मनात म्हणाली असेल शेवटी.

परवाचीच गोष्ट.आम्हाला खेड शिवापूर पुढे जाऊन एक चिमुकलं वळण घेऊन गराडे ला जायचं होतं.आणि मॅप बाई ते वळण जवळ आलंय सांगत होत्या.पण जवळ आल्यावर तिथे काही वळण बिळण दिसलंच नाही.मॅट्रिक्स सारखं कोणत्या तरी वेगळ्या समांतर विश्वात ते वळण असेल.परत यु टर्न घेऊन परत वळण शोध असं करत आम्ही 3 वेळा खेड शिवापूर टोल नाक्यातून गेलो आणि टोल भरला.शेवटी तिसऱ्या वेळा एका माणसाने विरुद्ध बाजूला विरुद्ध दिशेला वळायचा एक वेगळाच रस्ता सांगितला आणि त्याने आम्ही गराडे ला पोहचलो.हा मला अजूनही दैवी चमत्कार वाटतो.

"इतकं कठीण नसतंय पत्ते शोधणं.आपण एका हेलिकॉप्टर मध्ये आहे असं समजून सगळ्या परिसराचा एरियल व्ह्यू मनात डोळ्यासमोर आणायचा.पत्ता लगेच सापडतो." अशी एक बहुमूल्य टीप आमच्या एका फॅमिली मेम्बराने दिली आहे.आता मी एकटीने पत्ता शोधण्याची वेळ यायची वाट बघतेय.म्हणजे मग लगेच मनाच्या हेलिकॉप्टर मध्ये बसणार.मग पुढे गाडीचं काय व्हायचं ते होऊदे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही रस्ता न चुकता पाहुण्याच्या दारात जातो आणि पिएमटीचे तिकिट दाखवून चकित करतो. "म्हणजे आमच्या घराजवळ बस येते?!!"
----
चौक चौकात असे शब्द न वापरल्याने तुमची 'विनोदी लेखिका' 'ही पदवी का काढून घेऊ नये?

हहपुवा

>>तो असा वळणा वळणाचा दोन एस आकार वाला रस्ता आहे त्याने सरळ या."
Proud
>>असे पत्ते ऐकून 'वर म्हणजे कुठे' आणि 'खाली म्हणजे कुठे' हे मला अजून कळत नाही.
मुंबई-पुणे-मुंबई १ ची आठवण झाली. खालच्या अंगाला, वरच्या अंगाला.. Lol

मस्त Lol
मला फार टेंशन येते पत्ता सांगायला. जणू जरा चुकीचा सांगितल्यास समोरचा पुन्हा मागे येऊन माझे बखोटच धरेन. म्हणून मी खुशाल खोटे बोलून मोकळा होतो. आयडीया नही है. मै
भी नया हू यहा पे.... भले मग मी माझ्या बिल्डींगखालीच का ऊभा असेना Proud

Lol
मस्तच!
परवा लोणावळ्याला पत्ता शोधताना बाईने आम्हाला एका अरुंद रस्त्याने एक मातीचा ढीग आणि एक नाला असलेल्या डेड एन्ड ला नेऊन सोडलं. >> गेल्या महिन्यात लोणावळ्याला असेच काही अनुभव अनेकांना आले Wink काही बिनसलं होतं की नेहमी असंच असतं माहिती नाही Happy
यावरून एक अत्यंत वैतागवाणा अनुभव आठवला. मला इथे बंगळुरात एका कॉलेजचा पत्ता शोधायचा होता. गाडी चालवत असताना एकीकडे फोनकडे बघणं मला त्रासदायक होतं म्हणून मी फोनवर गूगल बाई न लावता गाडीतली नेव्हिगेशन बाई लावली. घरून निघताना गूगलवरही ४२ किमी दाखवलं होतं आणि गाडीतल्या बाईनेही ४२ किमी दाखवले. ज्या दिशेने नेव्हिगेशन बया मला जायला सांगत होती, ती दिशा मला काही बरोबर वाटत नव्हती, पण म्हटलं असेल दुसरा रूट आपल्याला माहिती नसलेला. आणि जीपीएस बेस्ड नेव्हिगेशन कसं चुकेल? हा आंधळा विश्वास. शेवटी ४२ किमी गाडी चालवल्यावर (शहराच्या बाहेर पोचून) एका अरूंद रस्त्यावर ' युअर डेस्टिनेशन इज ऑन द राईट' म्हणे. आणि तिथे होता चक्क एक मोठा खडक! खाली उतरून एका टपरीवर चौकशी केली तर ते म्हणाले इथे जवळपास कुठलंच कॉलेज नाही. Sad शेवटी तसेच परत आलो. सुदैवाने तेव्हा अर्जंट काही काम नव्हतं. एका परीक्षेचं सेंटर त्या कॉलेजमध्ये होतं. आधी एकदा बघून यावं म्हणूनच गेलो होतो. ३-४ दिवसांनी गूगल maps वापरून परत गेलो आणि यावेळी मात्र बरोबर ठिकाणी पोचलो.
बंगळुरात माणसांची पत्ते सांगतानाची एक सवय म्हणजे 'डेड एंडला राईट / लेफ्ट घ्या' असं सांगतात. राईट/लेफ्टला वळता येत असेल तर त्याला डेड एंड का म्हणायचं??

Lol छान.
मला स्वतःला पत्ते / रस्ते पटकन कळत नाहीत. कुणाला पटकन सांगता येत नाही.
अगदी माझ्या घरी याय्चं असेल तर कसं येऊ असं कुणी विचारलं तरी जरा कंफ्युजनच होतं. आणि मला कुठे जायचं असेल तरी आधी रस्ता मनात विचार करुन बघते. काय लोच्या आहे डोक्यात कळत नाही.

गुगलबाईंचा मला मात्र छान अनुभव आहे. एकदा ताम्हीणीला जाताना तिने भलत्याच रस्त्याला काढले. आजूबाजूला सर्व शेती. रस्त्यावर एकही गाडी नाही. इतके वर्षे ताम्हीणी उतरत असल्याने मला हा रस्ता माहीत नाही हे शक्यच नाही असे वाटत होते. पण कुठे आलोय ते माहीत नसल्याने मागेही फिरता येत नव्हते. मॅप झुम आऊट करुन पाहीला नक्की कुठे आहे तर परीसर ओळखीचा दाखवत होते. शेवटी बाईंने सांगीतले तसे गेलो व चक्क नेहमीच्या वेळेपेक्षा कितीतरी लवकर मुख्य रस्त्यावर पोहचलो.
काही सेटींग मात्र करावी लागतात. नाहीतर गुगल फार फिरवून नेते.

परवाचीच गोष्ट.आम्हाला खेड शिवापूर पुढे जाऊन एक चिमुकलं वळण घेऊन गराडे ला जायचं होतं.>> कंदील हॉटेलच्या शेजारून वळायचे होते.

भारी लिहिलंय! मलाही ते वर या, खाली जा वगैरे कळत नाही. ऑस्ट्रेलिया मध्ये पण ते गोरे लोक 'गो डाऊन 200 मीटर्स' म्हणतात ते झेपत नाही. कहर म्हणजे गूगल बाई एखाद्या ठिकाणाहून बाहेर पडताना 'टर्न नॉर्थ' वगैरे म्हणते. एक तर गोल-गोल जिने उतरत येऊन गाडीत बसलो तर दिशा-भूल झालेली असते, त्यात सरळ उजवीकडे/डावीकडे सांगायचं सोडून ह्या बाई 'झेपावे उत्तरेकडे' म्हणायला लागल्या तर होकायंत्र आणणार कुठून!

बाकी वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे बंगलोरला डेड एन्ड राईट हा अजब प्रकार आहेच, शिवाय ते लोक प्रत्येक चौकाला (राउंड अबाउट नसला तरी) सर्कल म्हणतात हे पण अतर्क्य आहे.

मस्त लिहिलंय,
फापट पसारा न घालता अचूक पत्ता सांगणे हे कौशल्य बऱ्याच कमी जणांकडे असते.

एकाने कर्वे नगरात, चिंचवड ला जायचा रस्ता कोणता असे विचारून नॉन प्लस केले होते.

परवा सकाळी 6 वाजता प्रभात रोड ला एकाने कार थांबवून XYZ कॉलनी कुठे आहे विचारले, पुढचा पत्ता विचारला तर थांबा दाखवतो म्हणत मोबाईल पुढे धरला, त्यात 3 फोटो दिसले, 1) बिल्डिंग चे नाव 2) xyz कॉलनी असे लिहिलेला बोर्ड 3) P1 पार्किंग साइन.
या प्रचंड माहितीवर तो माणूस पत्ता शोधायला निघाला होता
असे पत्ते देणारे आणि ते ग्राह्य मानून शोधणारे दोन्ही लोक धन्य होत

मस्त लिहिलंय!

मला आंधळ्यालाही योग्य ठिकाणी पोचता येईल इतके व्यवस्थित पत्ते आणि directions सांगता येतात Happy Dead end ला लेफ्ट-राईट हे माझं आवडतं direction आहे Happy चुकायचा काही चान्स नाही.

Btw, तुम्ही महाराष्ट्रात हिंदीमध्ये का बोलता? मी तिथे आले की जळी-स्थळी सगळ्या public places ला आणि अनोळखी लोकांशी मराठीत बोलते.

भारी आहे हे!
एकदा मला नवर्‍याने कागदावर नकाशा काढून दिला. मी तो बघितला आणि घडी करून पर्समधे ठेवला. माझ्या नीट लक्षात राहिलाय या अतिआत्मविश्वानामुळे मी जो लक्षात राहिला होता त्या अंदाजे तीनदा चुकीची वळणं घेतली आणि भर उन्हात पाऊण तास पेट्रोल्पीट (पायपीट चालीवर) झाल्यावर त्याला फोन करून ''मी या चौकात आले आहे आणि इथून चुकीची वळणं घेतल्यामुळे तीनदा गंडले आहे, आता काय करू?" असं विचारलं होतं. एवढ्या वेळातही मी नकाशा बरोब्बर लक्षात ठेवलाय असंच मला वाटत होतं! Proud त्यामुळे "तुला मॅप नीट देता येत नाही का!" हेही वर त्यालाच सुनावलं! Wink
मग त्याने मला गाडीला बाजूला घ्यायला लावून मॅप नीट बघायला सांगितला आणि ३ मिनिटांत मी बरोब्बर पोहोचले. मुळात त्याला देवाने पृथ्वीवर धाडायच्या आधी डोक्यात जीपीएस चिप बसवून मग्च धाडलं असावं असं माझं ठाम मत आहे! त्यामुळे मी आता कुठलेही बिनकामाचे रस्ते लक्षात ठेवतच नाही! Proud

मला पण एकानं चुकीचा पत्ता दिला. इण्टरन्याश्णल शाळेजवळ वैगरे वैग्रे. म्हणं शेजारी जंगल हाये. म्यापवर पाहलं तर एक्दम उजाड परिसर. मला अगोदर त्यानं जंगलाचा जो पत्ता सांगितला होता तो माहित होताच की. पण त्याला ते आठवत नव्हतं.

३ वर्षांपूर्वी महाबळेश्वरला गेलेलो, तेव्हा परत येताना वाईच्या गणपतीला जायचं ठरवलं. नवरा आधी गेलेला, तरी गुगल मँपवाल्या बाईची मदत घ्यायची ठरलं. सरळ जायचं असतानाही बाई turn right, turn right सांगत होती. नवऱ्याला पटेना. पण गुगलवाली बाई चुकवणार नाही, या ठाम विश्वासाने मी नवऱ्याला गाडी वळवायला लावली. मग turn left, right करत आतल्या कुठल्यातरी कच्च्या रस्त्याने आम्ही ८-१० किमी मागे महाबळेश्वरच्या मंदिरात पोचलो. पतीदेव प्रचंड वैतागले होते दोघींवर. शेवटी तिथे दर्शन घेऊन सरळ घरचा रस्ता धरला.

बऱ्याचदा गुगल मॅप वर पत्ता फिड करताना नकाशा मोठा करुन योग्य ठिकाणी पॉईंट करत नाहीत. नंतर ठिकाण शोधताना दिलेलं ठिकाण दुसरीकडेच राहतं असं मला वाटतं.

नकाशात 'पॉईंट' नसून अर्ध्या किंवा एक किलोमीटर चं वर्तुळ असतं.
त्यामुळे बिल्डिंग च्या खिडकीत बसून ओला बुक केल्यास ती लोकेशन प्रमाणे येऊन मागच्या गल्लीतल्या बिल्डिंग च्या तोंडाला उभी राहणे, आपला ड्रायव्हर रामशास्त्री प्रभुणे वंशज असल्याने तत्वांपासून रेसभरही न ढळणे असे प्रकार होतात.
हे न व्हायला ओला मॅप वर टूणटूण उड्या मारणारी पिन मॅप झूम इन करून योग्य त्या ठिकाणी सरकवल्यास किंवा डायरेक्ट बिल्डिंग नाव सर्च करून दिल्यास फायदा होतो.(यासाठी पण तपस्या लागते.नाहीतर पिन सरकवत ड्राइवर ला घरामागच्या डबक्याचे लोकेशन जाणे असेही प्रकार होतात(मी नाही हां असं काही केलेली व्यक्ती))

Lol
पुपुवर diagonally opposite कोणी लिहिलं होतं?

मलापण एकाने कशाच्या तरी diagonally opposite यायला सांगितलेलं.

मला भुकेने व्याकुळ झालेले असताना किंवा कोणी गाडीत (मागे अथवा बाजूला बसूनही) आपल्या डोक्यावर बसलेले असताना वेगळ्या प्रदेशात (मग तो घरापासून २च कि.मी. पण फारसा माहिती नसणारा का असेना) असले तर नकाशे अगदी नकोसे वाटतात. आणि अश्याच वेळी बरोबर गूगलबाई हमखास संधी साधून चुकवते.
आमचं नशीब बरेच वर्षं असं होतं, की अनेक वेगवेगळ्या ठिकाणी राहूनही आमच्या इमारतींची नावं काहीतरी विचित्रच असायची (उदा. लज्जा अपार्टमेंट!!). शिवाय काही ठिकाणी नीट दिसणार नाही अश्या ठिकाणी ती नावाची पाटी. पत्ता सांगायची वेळ आली की एक सौम्य anxiety attack यायचा Happy

बाप्या पण आहे.पण लोकांना बाई जास्त समजूतदार वाटते.त्यातल्या त्यात हिंदी बाई.
इंग्लिश बाई कोकणे चौकाचा 'कोकेन चौक' करून भरपूर ध चे मा करते.

Pages