पत्ते पे पत्ता

Submitted by mi_anu on 21 January, 2020 - 09:34

"वो 'अरे पिटल' का बोर्ड है ना उसके बाद अंदर लेफ्ट मारो और सौ मीटर आवो.ब्लु और सिल्व्हर कलर का पाटी है उधर से अंदर आव.गेट पर फोटो निकालके लो"
"अरे पिटल क्या है? पिटला भाकरी का नया हॉटेल खुला है क्या?"
"नही वो मॅक्सकेअर हॉस्पिटल है.लेकीन उसका बहुत सारा अक्षर बुझ गया है ना, पुरा नाम बोलूंगा तो आपको समझ मे नही आयेगा."

पलीकडे माझे हात शिवशिवत होते.या माणसाला फोनवर पत्ता सांगायला बसवायचा म्हणजे अवघड प्रसंग.खूप लांबच्या गोष्टी सांगतो पत्त्यात.दिड किलोमीटरवर असलेल्या हॉटेल च्या आपण नकाशात मागे असलो तरी तिथे मागे जायला रस्ता बराच फिरून आहे हे कोण सांगणार?ते माणसांना त्या हॉटेलच्या मागे जायला लागल्यावर रखवालदाराने हटकलं की कळणार.म्हणजे, 3 वर्षांपूर्वी होता हॉटेल च्या मागून रस्ता.पण मग हायवे च्या अर्धा किलोमीटर की काहितरी पर्यँत दारू प्यायची नाही असा नियम आल्यावर हॉटेल ने एकदम गोल गोल जंतर मंतर सारखा रस्ता बनवून त्याच्या मागच्या बाजूला हॉटेल ची एन्ट्री ठेवून लोकांना हायवेच्या अर्धा किलोमीटर लांब दारू पिता येईल अशी व्यवस्था केली.आणि आमच्या घरापर्यंत यायचा मार्ग लांबला.

त्यात हा शहाणा गेट वर ते नवं ऍप निघाल्या पासून बायका समारंभात एकमेकींना "जाताना हळदीकुंकू लावून घ्या हां ताई" सांगतात त्या उत्साहाने सगळ्यांना "आते टाईम गेट पर फोटो निकालके लो" सांगतो.

"मला दे बरं फोन"
"हां भैय्या, मै क्या बोलती हूँ, वो चाय की दुकान है ना, बहुत सारे लडका लडकी बैठके सिगारेट पी रहे दिखेंगे, वहा से मुडो. फिर एक बहुत बडा किराणा दुकान दिखेगा, उसपे बहुत सारे वेफर्स झाडू और पायपुसणे,सॉरी डोअर मॅट लटके होंगे, वहा से सीधा आव.फिर एक स्कुल लगेगा वहा पे बहुत सारा पीला गाडी पार्क किया दिखेगा वहा से आगे नीला सफेद पट्टा का गेट रहेगा वहा से अंदर आव."

"हा काय पत्ता आहे?सिगारेट पिणारी मुलं 24 तास असतात का?"
"अरे पिटल चा पत्ता सांगणं मला नाही पटत.त्याची वेगवेगळी अक्षरं बिघडतात.कार हॉस्पिटल, ऍक्स केअर हॉस्पिटल, मेयर ऑस्पिटल,मार ऑस्प,काई ऑस्प. ते खूप मिस गायडिंग ठरतं ना."

सगळ्या दुकानदारांनी ज्या उत्साहाने काही वर्षांपूर्वी चकचकीत पाट्या लावल्या, सगळ्यांच्या पाट्यातली अक्षरं विझायला लागलीत.एक "मूळव्याध क्लिनिक" मात्र एकही अक्षर न विझता ठसठशीत उभं आहे.पण ते काय आम्ही अजून तरी पत्त्यात सांगणार नाहीय.हायवे बनायच्या आधी आम्ही 'अँटिक वाइन शॉप च्या गल्लीत वळा' सांगितलं की कसं परफेक्ट कळायचं सगळ्यांना.

मला पत्ते सांगायचा आजार आहे.म्हणजे, कोणीही काहीही पत्ता विचारला की तो मला किंवा कोणालाही विचारला असला तरी सगळी कामं सोडून मी पत्ता सांगते.हावभावासहित. यातली काही रत्नं आमच्या उपद्रवी कुटुंब सदस्यांनी बरीच वर्षं लक्षात ठेवली आहेत.
"आता रस्ता वळेल.85% लोक तिथे वळतील.पण तुम्ही वळू नका.तुम्ही न वळल्याबद्दल बरीच गर्दी शिव्या घालेल. पण तसेच पुढे जा.मग आलाच रक्षक चौक."
"मोठी पांडबा पाटील स्मशानभूमी दिसली की गाडी स्लो करा.डावीकडे घ्या.जरा पुढे गेलं की लगेच आयुर्वेदिक नर्सरी."
"हापूस आंब्याची गाडी उभी आहे त्याच्या पुढच्या गल्लीत वळा."(गाडी आंबे विकून घरी गेली की रस्त्यातच तबला पेटी वाजवत बसा.)
"तो असा वळणा वळणाचा दोन एस आकार वाला रस्ता आहे त्याने सरळ या."
"तो लांबचा उजवा घेऊ नका, असा जवळचा उजवा घ्या मग हे असे इकडे वळा आणि खाली या सरळ."(हे असे इकडे ची दिशा फोनवर बोलताना हाताने दाखवलीय त्यामुळे पत्ता विचारणारे 'हे' लवकर घरी येण्याची अजिबात शक्यता नाही.)

हे खाली या सरळ आणि वर जा सरळ वाले पत्ते सांगायला मी पण हल्लीच शिकतेय.म्हणजे, असे पत्ते ऐकून 'वर म्हणजे कुठे' आणि 'खाली म्हणजे कुठे' हे मला अजून कळत नाही.मी स्टेशनवर उभी असायचे तेव्हा 'अप' म्हणजे नकाशात वर, राजस्थान,यूपी,गुजरात,जम्मू काश्मीर कडे जाणारी गाडी आणि 'डाऊन' म्हणजे नकाशात खाली पुणे, बंगलोर,कोल्हापूर, केरळ ला जाणारी गाडी हे खूप अभ्यासाने शोधून काढलं होतं.पण दुसऱ्याला सांगताना 'हे असे अमुक तमुक वरून खाली या सरळ' म्हणून दडपून द्यायचं.कुठे ना कुठे पोहचतील.कोणी ना कोणी पत्ता सांगेलच.नियतीच्या मनात असेल तर पोहचतील.

सर्वात भयंकर पत्ते ती मॅप वाली बाई सांगते."गोल चक्कर पे तिसरा निकास ले" म्हटलं की किंचाळून तिला गदागदा हलवून "गोलावर एक दोन तीन कोणत्या बाजूने मोजू?"म्हणून विचारावं वाटतं.तिसरा एक वेळ ठीक आहे, कधी कधी पाचवा निकास घ्यायला सांगते.असा पाच सहा आरे असलेला सूर्या सारखा दिसणारा चौक आपल्या इथे कुठे आहे याचा फार विचार करावा लागतो.परवा लोणावळ्याला पत्ता शोधताना बाईने आम्हाला एका अरुंद रस्त्याने एक मातीचा ढीग आणि एक नाला असलेल्या डेड एन्ड ला नेऊन सोडलं.मग नंतर चौकशी केल्यावर असं कळलं की बाईच्या सेटिंग मध्ये 'एक्सक्लुड नॉन पेव्हड रोडस' असा एक ऑप्शन होता तो ऑफ करायचा होता म्हणे.अशीच एकदा खरेदी करत घरी जायला उशीर झाला म्हणून मी पोळीभाजी केंद्र शोधत होते चालत.मग बाईने आधी मला रिलायन्स फ्रेश च्या गोडाऊन ला, मग पु ना गाडगीळ च्या दारात आणि मग कपड्याच्या दुकानात सोडलं.प्रत्येक वेळी ती गंतव्य 20 मीटर वर आहे सांगत होती.शेवटी पोळीभाजी केंद्राचा नाद सोडून कपडयाच्या दुकानाला ईश्वरी संकेत मानून 2 टॉप घेऊन टाकले.

आम्ही सोलापूर ला चाललो होतो.तेव्हा मराठी मॅपबाई ला सोलापूर चा पत्ता सांगितला.आणि ऐन वेळी जवळ पुढे दुसरीकडे जायचं ठरलं. बाईला बिचारीला माहितीच नाही.ती आपली 'आता वळा' 'आता यु टर्न घ्या आणि मग वळा' 'आता डावीकडे चक्राकार मार्ग घ्या मग यूटर्न घ्या' म्हणून गयावया करायला लागली.आम्ही बरेच पुढे आल्याचं तिला कळल्यावर 'शक्य असेल तर वळसा घेऊन मागे वळा' असं दोन तीन वेळा म्हणाली आणि मग गप्प बसली. 'मी माझं सांगायचं काम केलं, तुम्ही ऐकत नाही.आता जायचं तिथे जा,रस्ता चुका आणि मरा मेल्यानो' असं मनात म्हणाली असेल शेवटी.

परवाचीच गोष्ट.आम्हाला खेड शिवापूर पुढे जाऊन एक चिमुकलं वळण घेऊन गराडे ला जायचं होतं.आणि मॅप बाई ते वळण जवळ आलंय सांगत होत्या.पण जवळ आल्यावर तिथे काही वळण बिळण दिसलंच नाही.मॅट्रिक्स सारखं कोणत्या तरी वेगळ्या समांतर विश्वात ते वळण असेल.परत यु टर्न घेऊन परत वळण शोध असं करत आम्ही 3 वेळा खेड शिवापूर टोल नाक्यातून गेलो आणि टोल भरला.शेवटी तिसऱ्या वेळा एका माणसाने विरुद्ध बाजूला विरुद्ध दिशेला वळायचा एक वेगळाच रस्ता सांगितला आणि त्याने आम्ही गराडे ला पोहचलो.हा मला अजूनही दैवी चमत्कार वाटतो.

"इतकं कठीण नसतंय पत्ते शोधणं.आपण एका हेलिकॉप्टर मध्ये आहे असं समजून सगळ्या परिसराचा एरियल व्ह्यू मनात डोळ्यासमोर आणायचा.पत्ता लगेच सापडतो." अशी एक बहुमूल्य टीप आमच्या एका फॅमिली मेम्बराने दिली आहे.आता मी एकटीने पत्ता शोधण्याची वेळ यायची वाट बघतेय.म्हणजे मग लगेच मनाच्या हेलिकॉप्टर मध्ये बसणार.मग पुढे गाडीचं काय व्हायचं ते होऊदे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हरे कृष्ण रोडला 'हेअर क्रिश्न' रोड म्हणते. (टॉर्टॉईज अँड हेअरमधला हेअर)
'भुवनेश्वरी नगर' ह्या नावासमोर गूगलच्या बाईने हात टेकले आहेत. ती सरळ स्पेलिंग वाचून दाखवते.

माझ्या बायकोने एकाला गल्लीतून आत वळला की थोड्याच अंतरावर समोरच हिरव्या रंगाचा पिवळा बंगला आहे असा पत्ता सांगितला होता Happy
तो माणूस इतका भंजळला की म्हणे तुम्ही दुसऱ्या कुणाला तरी देता का फोन Happy

नंतर या प्रकारावर तिचे स्पष्टीकरण की आपल्या घराला दोन्ही रंग आहेत ना? मग बरोबरच होतं माझं Happy

गुगल बाईने आज मला पण जाम वैताग आणला. कर्वे रोडला सतत कार्व्ह (exactly carve सारखं) रोड म्हणत होती.

हा धमाल धागा (खजिना) आणि हहपुवा प्रतिसाद वाचायचे राहिलेच होते.. Lol खूप हसले बाई वाचून ..दमले!

हा धमाल धागा (खजिना) आणि हहपुवा प्रतिसाद वाचायचे राहिलेच होते.. Lol खूप हसले बाई वाचून ..दमले! +१

Pages