श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्य उभे केले ते चतुराई, कर्तबगारी, खंबीर नेतृत्व, विचाराची कल्पकता, लढाऊपणा, गनिमी कावा, पराकोटीचा पराक्रम, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाख मोलाची स्वराज्या साठी घाम गाळणारी, पराक्रम आणि बलिदान देणारी माणसं त्यांनी जमा केली. त्यापैकी एक होते “नरवीर तानाजी मालुसरे”. हे नाव उच्चारताच फक्त एक नाव आठवते ते म्हणजे सिंहगड. त्यासोबत महाराजांचे प्रसिद्ध विधान आठवते “गड आला पण सिंह गेला”.
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे कित्येक मावळे, सरदार, गनिमीकावा तंत्र, विविध आरपारच्या लढाई, किंवा त्यांच्या मोहिमे वर चित्रपट निघू शकतो. महाराजांनी आणि स्वराज्याच्या शिलेदारांनी असे कर्तृत्व आणि शौर्य त्यावेळेस गाजवले होते. अफाट कर्तृत्व, धैर्य, शौर्य, पराक्रमा मुळे “नरवीर तानाजी मालुसरे” यांचे नाव इतिहासात कोरले आहे. या चित्रपटात अजय देवगण यांनी तान्हाजी यांची भूमिका साकारली आहे. आपल्या दमदार अभिनयाने या ऐतिहासिक पात्राला योग्य न्याय दिला आहे. या भूमिकेसाठी अजय अतिशय योग्य असा अभिनेता आहे. अजयने आपल्या डोळ्यांचा, संवाद फेकीचा, अभिनयाचा उपयोग करून व्यक्तिरेखा साकारण्याचा आलेख उंचावत नेला आहे. एकदम कडकडीत, चुरचुरीत संवाद अजयने लीलया, सहजरीत्या आणि प्रभावीपणे उच्चारले आहेत. पूर्ण चित्रपट ‘तान्हाजी’ या व्यक्तिरेखे भोवती फिरतो. एक प्रेमळ पती, पिता, मित्र, सहकारी, लढवय्या सेनांनी, निष्ठावान, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा उजवा हात चांगल्या पद्धतीने उभारला आहे. “तान्हाजी” च्या विविध छटा टिपण्यात अजय अभिनेता म्हणून यशस्वी झाला आहे.
तान्हाजीच्या बरोबर उलट “उदयभान राठोड” आहे. निर्दयी, सूडबुद्धी, खुनशी, घातकी, दगाबाज, अक्षरश: अति दुष्ट आहे. ही व्यक्तिरेखा सैफ अली खानच्या अंगात भिनली आहे. तुम्ही या व्यक्तिरेखेचा द्वेष कराल इतका नैसर्गिक अभिनय सैफ ने साकारला आहे. मगरीचे मास खाणारा, शत्रूला चकित करणारा, पहारेकरी चुकला तर मृत्यूदंड देणारा, विधवेला पळवून आणणारा खुनशी खलनायक उत्कृष्ट उभारलेला आहे. “उदयभान” आणि “तान्हाजी” यांच्यातील संवादाची जुगलबंदी चित्रपटाला वेगळ्या उंची वर नेतात. “सैफ” ने खलनायकाची भूमिका अतिशय ताकदीने उभारलेली आहे. त्याची संवादफेक, अभिनय, वेषभूषा आणि डॉयलॉगबाजी मुळे या भूमिकेला वेगळीच उंची लाभली आहे. “दख्खन की हवा चली तो उठा देना” या वाक्यात तो भाव खाऊन जातो. भविष्यात सैफच्या या भुमिकेला विविध पुरस्कार नक्कीच मिळतील.
उत्तम सहकलाकाराची फौज या चित्रपटात आहे. शरद केळकर, पद्मावती राव, लुकॅ केनी, अजिंक्य देव, नेहा शर्मा, शशांक शेंडे आणि देवदत्त नागे. सगळ्यांनी आपले काम चोख बजावले आहे. पद्मावती रावचा “यशस्वी भव”, “जब तक कोढाणा पर फिर से भगवा नहीं लहराता, हम जूते नहीं पहनेंगे।” हा संवाद जबरदस्त आहे. त्यांनी डोळ्याचा, नजरेचा, अभिनयाचा उपयोग करून करारी जिजाऊ उभारली आहे. औरंगजेब बुद्धिबळ खेळतानाचा संवाद आणि दृश्य एकदम चपखल आहे. अतिशय संयत अभिनयाने शरद केळकर यांनी “छत्रपती शिवाजी महाराज” ही भूमिका पडद्यावर जिवंत केली आहे. शरद यांचे कास्टिंग अतिशय योग्य आहे. मित्र, छत्रपती, राजा अशी उत्तम भूमिका शरदने साकारली आहे. शशांक शेंडे यांनी शेलार मामा आणि देवदत्त नागे यांनी सूर्याजी मालुसरे उत्तम भूमिका साकारल्या आहेत. काजोल यांनी “सावित्रीबाई मालुसरे” ही व्यक्तिरेखा साकारली आहे. काजोल ची चित्रपटातील व्यक्तिरेखेची लांबी जरी कमी असली तरी काजोल चा वावर सुखकारक आहे. “कुत्ते की तरह जीने से बेहतर हैं... शेर की तरह मरना।” हे वाक्य परिणाम कारक उतरले आहे. अजय-काजोल ची पती- पत्नीची जोडी शोभून दिसते. त्यामुळे जोडी प्रभावी होऊन दोन्ही व्यक्तिरेखेला न्याय देते.
ओम राऊत यांनी अगोदर “लोकमान्य टिळक” हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चांगला चित्रपट होता. “तान्हाजी” या चित्रपटाची धुरा सुद्धा ओम राऊत यांनी आपल्या खांद्यावर समर्थपणे सांभाळली आहे. चित्रपटाचा पहिला भाग थोडा रेंगाळला आहे आणि संथ आहे. पण खरी कमाल दुसऱ्या भागात आहे. मध्यंतरा नंतर दुसर्या भागात दिग्दर्शकाने अतिशय उत्कंठा वर्धक, उत्तम मांडणी आणि VFX ईफेक्टची उधळण केली आहे. काही-काही ३डी ईफेक्ट अंगावर काटा आणतात. शेवटच्या लढाईचा प्रसंग जोमदार आणि एकदम करकरीत झाला आहे. लढाईचे एक्शन Sequences अतिशय उत्तम आहेत. चित्रपटात ४ श्रवणीय गाणी आहेत. ३ गाणी चित्रपटाच्या व्यवस्थित आणि उचित जागी आहेत. पण पार्श्वसंगीतात उणिवा आहेत. ऐतिहासिक कथांना दमदार पार्श्व संगीत हवेच. अश्या भव्य श्रेणीच्या चित्रपटातील प्रत्येक पात्राला, दृश्याला परिणाम कारक होण्यासाठी उत्तम पार्श्वसंगीत हवेच. पहिल्या भागाची व्यवस्थित मांडणी करून लांबी कमी केली असती तर चित्रपट आणखी धमाकेदार झाला असता.
काही गोष्टी खटकतात. त्यातील एक साधू लाकडी कुबडी फेकून मारतो ते दृश्य काही पटले नाही. तान्हाजी उदयभान पुढे जाऊन गाणे गाऊन नृत्य करतात. ही दुसरी गोष्ट काही पटत नाही. प्रत्येक भूमिकेला स्थापित करण्या अगोदर थोडा वेळ दिला पाहिजे होता. ऐतेहासिक कथा असल्याने थोडी सिनेमॉटीक लिबर्टी घेतली आहे पण जास्त उत्कंठावर्धक दाखवण्याच्या नादात कथेत जास्त तोड मोड केली नाही हे विशेष. जशी कथा आहे तशी दाखवण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला आहे त्याबद्दल दिग्दर्शकाचे अभिनंदन.
पण अजय-सैफ चा उत्तम अभिनय, ऐतिहासिक कथेची तोडमोड न करता चांगले दिग्दर्शन, अंगावर शहारे आणणारे लढाईचे उत्कृष्ट चित्रण, पटकथेला दिलेला योग्य न्याय आणि चांगले छायाचित्रण, सिनेमॅटोग्राफी, वेषभूषा, दमदार सादरीकरण, चांगली एडिटींग, उत्तम कास्टिंग, एका स्वदेशाभिमानी लढवय्याचे दमदार चित्रीकरण, एक उत्तम कलाकृती यामुळे तुम्ही चित्रपट कमीत कमी एकदा बघाच. चित्रपट बघितल्या नंतर देश प्रेम उफाळून आल्याशिवाय राहणार नाही. मी या चित्रपटाला ३.५ स्टार देतो. १.५ स्टार कमी केले आहेत. कारण म्हणजे पहिल्या भागाच्या संथ गतीला, पार्श्वसंगीत आणखी चांगले होऊ शकले असते, इतर कलाकारांना थोडा वाव देता येऊ शकला असता आणि VFX ईफेक्ट आणखी चांगले होऊ शकले असते.
भन्साळीने नाही काढला हा
भन्साळीने नाही काढला हा चित्रपट हे एक बरेय >>अगदी बरोबर. छान परिचय आहे. आता तान्हाजी बघावासा वाटतो आहे.
मुळात आतापर्यंत शिकलेलं
मुळात आतापर्यंत शिकलेलं "तानाजी" हे नाव बरोबर की नवीन इतिहासानुसार "तान्हाजी" हे नाव बरोबर?
इतिहासाची तोड्फोड केलेली नाही
इतिहासाची तोड्फोड केलेली नाही?
तानाजी उदयभानू कसा आहे ते बघण्यासाठी गडावर जातो?
घोरपडे बंधू आपण समजू शकतो.
साधू सीन ही तर कमालच झाली. किती जवळीक असली; तरी असा छछोरपणा महाराजांबरोबर कुणी करू शकेल का?
नारळाची झाडे पाडून, त्यांची गलबते तयार करून त्यातून ' सिंहगड ते राजगड' पल्ला गाठू शकणारी तोफ न्यायची. तर्काच्या पलिकडचे आहे सारे.
उदयभभानू ची 'प्रेमकथा" म्हणजे पराकोटीची कल्पना शक्ती म्हणावी लागेल.
मिलिटरी तत्वांची तर ऐशी की तैशी करून टाकलीय.
लहान मुलांना मात्र खूप आवडेल.
मला पण आवडला. 'बाजीराव मस्तानी' दहा पटीने आणि 'उरी' शंभर पटीने आवडला होता.
मुळात आतापर्यंत शिकलेलं
मुळात आतापर्यंत शिकलेलं "तानाजी" हे नाव बरोबर की नवीन इतिहासानुसार "तान्हाजी" हे नाव बरोबर?>>>
मला देखील हाच प्रश्न पडलाय. एक अमराठी ग्रुप मध्ये मी Tanaji लिहिलेलं पाहून एकाने Tanaji ki Tanhaji असे विचारले. जो पर्यंत नक्की कळत नाही तो पर्यंत Tanaji च म्हणणार असे तिथे मी सांगितले.
मला असं वाटतं की तान्हाजी
मला असं वाटतं की तान्हाजी असावं (पूर्वी मुलं मोठं व्हावे म्हणून विरुद्ध नावं द्यायची फॅशन होती बारक्या, लहान्या, दगडू इ.) आणि अपभ्रंश होऊन कदाचित तानाजी झालं असेल. आपण तानाजी म्हणायला हवं, आपण तसंच ऐकत आलोय. ( अचानक एक दिवस अंतू आजोबांचे नाव अनंत आहे कळल्यावर आपण काही अनंत आजोबा म्हणायला लागत नाही )
तान्हाई देवी वरून तान्हाजी
तान्हाई देवी वरून तान्हाजी नाव ठेवले असे वाचनात आले मध्यंतरी
नवीन माहिती साठी धन्यवाद सुजा
नवीन माहिती साठी धन्यवाद सुजा!!!
इतिहासात,पुस्तकात, पुण्यात परिसराला दिलेले नाव "तानाजी" आहे. पण चित्रपटात तान्हाजी.
कोणत बरोबबर आहे हा कळीचा मुद्दा आहे? इतिहासकार यावर काय बोलतात बघू?
तानाजीच होते सिनेमाचे नाव
तानाजीच होते सिनेमाचे नाव
न्यूमरॉलॉजीने बदलले .
https://www.indiatoday.in/movies/bollywood/story/taanaji-the-unsung-warr...
Name changed for
Name changed for numerological reasons!!
Taanajee तरी करायचं मग, वेलांटीला मान देऊन.
ज्याने सांगितले त्याचेही
ज्याने सांगितले त्याचेही स्पेलिंग विचित्रच आहे
सध्या whatsapp वर फिरत असलेले
सध्या whatsapp वर फिरत असलेले या चित्रपटाचे एक जोरदार परीक्षण (लेखकाच्या नावासह देत आहे.)
---------------------------------------------------------
तानाजी पाह्यला. शिन्मासमीक्षण म्हणून उदाहरणार्थ दोनतीन गोष्टी. मुख्य गोष्ट म्हणजे ओम राऊत या गृहस्थांनी डायरेक्शन म्हणजे अगदी तंतोतंत डैरेक्षण केले आहे. पुलंच्या नामू परटाच्या भाषेत सांगायचं तर ‘क्यामेरा नुसता असा गार गार गार घुमिवलेला आहे’. दोन डोंगरांच्या मधल्या अतिशय अरुंद घळीतून किंवा फॉर द्याट म्याटर कसल्याही भकी-बरगडीतल्या फटींतून सटासट थ्रीडीत घुसणारा क्यामेरा म्हणजे निव्वळ जबरी गोष्ट आहे. बाकी यातली तानाजीची गोष्ट (रायबाच्या लग्नाचं निमंत्रण आणि कोंढाण्याची मोहीम हा एकमेव मुद्दा वगळता) मूळ तानाजीच्या गोष्टीच्या केप ऑफ गुड होपला इतका लांबलचक वळसा घालून गेलेली आहे, की शिवसेनेच्या ‘कशातच काही नसण्याच्या केप ऑफ गुड होपला' तसलाच भलामोठ्ठा वळसा घालून शिवसेनेचा मुख्यमंत्री घडवून आणणा-या संजय राऊतांचीच आठवण व्हावी. राऊत-राऊत भाई भाई असतीलही कदाचित, आपल्याला माहित नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे आजे देवगण यात नेहमीसारखा म्हणजे अग्गदी सिंघमसारखाच दिसला आणि वागलासुद्धा आहे. एका दृश्यात तो भगवी ड्रेसभूषा करून खुद्द महाराजांवर लाकडी दांडका फेकतो आणि वर महाराजांनाच एक सणसणीत भाषणही देतो तेव्हा तर तो महाराजांच्या पुढ्यात उभा नसून पणजीला जयकांत शिक्रेपुढे ‘आता माझी सटकली’ म्हणतोय की काय, असाच भास होतो. त्यामानाने सैफ अली खानाने रंगवलेला उदेभानडाकू जोरकस वाटतो. (आम्ही मराठवाडेकर कसल्याही व्हिलनला ‘डाकू’च म्हणतो. यात डाकूंचा किंवा उदेभानुचा किंवा डैरेक्टरचा किंवा रैटरचा उपमर्द करण्याचा हेतू नाही, हे आगाऊ सावधगिरीस्तव इथे नोंदवून ठेवतो आहे, ते असो-) या दोघांतली लाष्टची फायटिंगही कोणत्याही हिंदी शिन्माच्या आजवरच्या चक्करम्याड कीर्तीस साजेशीच आहे. म्हणजे आमच्या लहानपणी पायात इस्प्रिंगचे बुटं घालून मिथुन चक्रवर्ती खालून तिस-या मजल्यावरच्या डाकूवर जंप खायचा तसलीच, पण तंतोतंत आडवी जंप हवेतल्या हवेत खाऊन तलवारीच्या एकाच रपाट्यात सैफ अलीखान आजे देवगणचं तलवारीसकट मनगट छाटतो आणि त्याच्या दुस-या हातातल्या ढालीवर इतके भयानक भयानक वार करतो की तितक्या माराने पाकिस्तानच्या मिल्ट्रीतल्या सबंध हत्तीदळातले तमाम हत्ती स्वखुशीने मरून गेले असते. इतका आडमाप मार खाऊनही एक हात गमावलेला आजे देवगण जोर एकवटून उठतो आणि जी तोफ ओढायला एरवी हत्ती वापरलेला दाखवला आहे, ती नागीण तोफ किल्ल्याचा बुलंद तट केवळ अंगच्या बळाने रेटून फोडून सैफ अलीखानासकट कितीतीतीतरी हजारो फूट खोल दरीत ढकलून देऊन उदेभानाचा किलेरकट काटा काढतो आणि जागच्या जागी भगवा फडकावतो. मग महाराज येतात आणि ‘गड आला पण सिंह गेला’ वगैरे होतं, हा भाग इतका अतोनातच प्रेक्षणीय झालेला आहे की आपण स्वत: खुद्द इतिहासातच पोश्टग्राज्वेट केलेलं असूनही आपल्या अंगावर शहारा उमटतो, यातच काय ते समजा. बाकी सूर्याजी-शेलारमामाचं लढणं, ‘मी सगळे दोर कापलेले आहेत, तुमचा बाप इथे मरून पडला आहे आणि तुम्ही पळून जाताय? अरे, ठ्यां तुमच्या जिनगानीवर’ वगैरे चौथीच्या इतिहासातल्या पुस्तकातल्या गोष्टी समूळ बाद करण्यात आलेल्या आहेत.
ही लाष्टची फायटिंग थ्रीडीमध्ये मात्र भयानक वाटते फार. तिथे लढाईत एकमेकांकडे फेकले जाणारे खूंख्वार भाले, तलवारीचे सपासप वार आपल्या स्वत:च्या अंगावर इतक्यांदा येतात की निदान सातआठ वेळा मी स्वत: जबर जखमी होता होता वाचलो. शेजारी बसलेल्या एका अनोळखी सुंदरीच्या (अंधारात नीटसं दिसलं नाही, पण अनोळखी असली ती सुंदरीच असणार असा मला विश्वास आहे.) दिशेने येणारे दोनतीन बाण तर मी स्वत: पुढाकार घेऊन अत्यंत तडफदारपणे माझ्या स्वत:च्या छातीवर झेलले.
असो.
आजे देवगण किंवा सैफ अली खान किंवा त्या दोघांमधली लाष्टची फायटिंग हे काही आपल्या शिन्मा बघायला जाण्याचं मुख्य कारण नव्हतं. आपले सख्खे दोस्त कैलाश वाघमारे या शिन्मात एका कळीच्या भूमिकेत आहेत, म्हणून आपण तिकडं गेलेलो. तर गेल्यावर ‘कशाला गेलो?’ असं झालं. कारण की आमच्या दोस्ताने त्यात आजे देवगणच्या साईडकडून फितुरी करून सैफ अलीच्या साईडला जाऊन दगा करणा-याची भूमिका केलेली. त्यामुळे शिन्मा बघायला थेटरात आलेले मर्दप्रेक्षकगण आजे देवगणची तारीफ कमी आणि कैलासरावांना शिव्या जास्ती घालताना दिसले. वाईट वाटलं! आपल्या दोस्ताला डाकूच्या भूमिकेत बघून कुणाला आनंद होईल, च्यायला? आज ना उद्या, हा शिन्मा बssघबघून जाज्वल्य तानाजीभक्त झालेल्या एखाद्या टोळक्याच्या हातचे चारसहा तरी सटके बिनबोभाट खाणार तुम्ही. कैलासभाऊ! लिहून ठेवा, तंतोतंत!
बाकी शिन्मात इतिहास वगैरे शोधण्याचा प्रयत्न करणं ही गोष्ट तुम्हाला जबर वैफल्याकडे घेऊन जाणारी ठरू शकते. तेव्हा त्या फंदात नच पडलेलं बरं!
आजे देवगण आणि सैफअलीखान यांच्यातल्या वैयक्तिक दुश्मनीची ऐतिहासिक कपडेपट वापरून केलेली ष्टोरी, अशा अंगाने या शिन्माकडे पाहत राहणे, हीच एक गोष्ट इष्ट आणि हितावह आहे.
करिता हे दोन शब्द लांबलेले शिन्मासमीक्षण इथे संपले असे जाहीर करतो.
जय हिंद! जय महाराष्ट्र!
- बालाजी सुतार
(No subject)
"बालाजी सुतार" यांनी लई भारी
"बालाजी सुतार" यांनी लई भारी समीक्षण लिहिले आहे. हसता हसता पुरेवाट झाली.
काही point मात्र पटले. दुसरी गोष्ट म्हणजे आजे देवगण यात नेहमीसारखा म्हणजे अग्गदी सिंघमसारखाच दिसला आणि वागलासुद्धा आहे. >> +१ काही दृश्यात वाटते.
एका दृश्यात तो भगवी ड्रेसभूषा
एका दृश्यात तो भगवी ड्रेसभूषा करून खुद्द महाराजांवर लाकडी दांडका फेकतो आणि वर महाराजांनाच एक सणसणीत भाषणही देतो तेव्हा तर तो महाराजांच्या पुढ्यात उभा नसून पणजीला जयकांत शिक्रेपुढे ‘आता माझी सटकली’ म्हणतोय की काय, असाच भास होतो.>>>>>>खरंच असे वाटते.
पिक्चर सुरु झाल्यापासून
पिक्चर सुरु झाल्यापासून मध्यांतर पर्यंत जी जोरदार बॅकग्राऊंड म्युजिक आहे ते जर शेवटच्या फायटिंगच्या वेळी असती तर अजून छान वाटले असते पण शेवटची फायटिंग खूपच प्लेन वाटते.
आपले सख्खे दोस्त कैलाश
आपले सख्खे दोस्त कैलाश वाघमारे या शिन्मात एका कळीच्या भूमिकेत आहेत, म्हणून आपण तिकडं गेलेलो. तर गेल्यावर ‘कशाला गेलो?’ असं झालं. कारण की आमच्या दोस्ताने त्यात आजे देवगणच्या साईडकडून फितुरी करून सैफ अलीच्या साईडला जाऊन दगा करणा-याची भूमिका केलेली. त्यामुळे शिन्मा बघायला थेटरात आलेले मर्दप्रेक्षकगण आजे देवगणची तारीफ कमी आणि कैलासरावांना शिव्या जास्ती घालताना दिसले. >>>
सॉलिड लिहिलंय.
बाकीच्या वीरांचे सिनेमे
बाकीच्या वीरांचे सिनेमे काढायला पाहीजेत. बाजीप्रभू देशपांडे, महाराणा प्रताप, पृथ्वीराज चौहान, खुद्द शिवाजी महाराजांवर हिंदी सिनेमा बघायला आवडेल >>>>>> अक्षय कुमार पृथ्वीराज चौहानचा बायोपिक करत आहे यशराज बॅनरचा. मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर नायिका आहे त्यात.
https://www.youtube.com/watch?v=usXPIBxtKGE
ओह ! आणि मी आजवर खरेच घोरपडीच्या शेपटाला दोर बांधून बगैरे समजत होतो... >>>>>>>> मी सुद्दा
शेजारी बसलेल्या एका अनोळखी सुंदरीच्या (अंधारात नीटसं दिसलं नाही, पण अनोळखी असली ती सुंदरीच असणार असा मला विश्वास आहे.) दिशेने येणारे दोनतीन बाण तर मी स्वत: पुढाकार घेऊन अत्यंत तडफदारपणे माझ्या स्वत:च्या छातीवर झेलले. >>>>>>>
बालाजी सुतारच परीक्षण हह्पुवा. एकदम फारएण्ड स्टाईल परीक्षण! मी व्हॉटसपवर नाहीये, पण बालाजी सुतार हे नाव कुठेतरी वाचल्यासारख आठवतय.
तानाजी का तान्हाजी हा गुंता
तानाजी का तान्हाजी हा गुंता नंतर सोडवू... आधी त्या बालाजींना घेऊन या मायबोलीवर... ह ह पु वा
>>ओह ! आणि मी आजवर खरेच
>>ओह ! आणि मी आजवर खरेच घोरपडीच्या शेपटाला दोर बांधून बगैरे समजत होतो...
हे तर उलटे झाले.. चित्रप्टामुळे मला खरा ईतिहास समजला Happy
धन्यवाद अजय देवगण !
+१
खरंय.
बालाजी सुतारांचं अत्यंत
बालाजी सुतारांचं अत्यंत संपृक्त, सखोल, अभ्यासपूर्ण, त्रिमितीय वगैरे षिणेप्रिक्षण वाचून डोळ्यांच्या कडा (हासून हासून) पाणावल्या. थोड्यावेळानी हापिसात बसल्या बसल्या डोळ्यातल्या पाण्याचं, प्रत्येक किल्ल्यावर जसा कुठलातरी एक कडा दाखवून गाईडलोकं 'हे टकमकटोक. इथून शिवाजी महाराज गद्दारांचा कडेलोट करायचे' असं दाखवतात, तसा कडेलोट होईल की काय अशी काळजी वाटत होती.
असो.. तर कालपासून इथल्या प्रतिक्रिया वाचून घाबरलो होतो की आपला होरा चुकला की काय. पण ब्यालन्स रिष्टोर झालेला आहे आता. बॉलीवूडकरांनी (हिंदी, मराठी) चरित्र (ज्याला हल्ली बायौपिक म्हन्त्यात), आणी हिष्ट्री (ऐतिहैशिक) गोष्टींच्या नादी लागू नये. लऊष्टोरीज, झालंच तर हिष्ट्रीशीटर्स च्या कथा वगैरे गोष्टी - ज्या आपल्याला झेपतात, कुणाच्या भावना वगैरे न दुखावता दाखवता येतात, लोकांना आवडतात ते दाखवावं.
तान्हाजीच्या गोष्टीतलं घोरपडीला दोर बांधून जाणं, महाराजांनी अचानकपणे समोर आलेल्या इतक्या दु:खद प्रसंगी, 'गड आला, पण सिंह गेला' वगैरे साहित्यिक 'स्टेटमेंट' देणं हे नंतर झालेल्या अॅडिशन्स आहेत. मुळात तान्हाजी, शिवाजी महाराज, वगैरे 'लार्जर दॅन लाईफसाईझ' लोकोत्तर व्यक्तिंचं सादरीकरण करताना एखाद्या महाकाव्याच्या दृष्टीनं ते मांडावं. जरी ती हाडामांसाची माणसं असली तरी त्यांच्या कर्तृत्वानं त्यांच्यात आणी बाकीच्या हाडामांसाच्या माणसात एक कौतुकाचं, आदराचं, प्रेरणेचं असं खूप मोठं अंतर पडतं. त्या अंतराकडे 'पहात', त्याची जाणीव ठेवत त्या व्यक्तिरेखा सादर कराव्या. उगाच काहीतरी अचाट किंवा आचरट दाखवून त्या व्यक्तिरेखा हास्यास्पद करू नयेत - असं मला वाटतं.
अगदी सहमत
अगदी सहमत
मुळात या लढाईत इतके नाट्य आधीच असताना त्यात बळच मसाला भरण्याची गरज काय होती
त्या काळातील सर्जिकल स्ट्राईक होता तो
गडावरील सैन्याची पर्वा न करता दोराच्या सहाय्याने रात्रीतून गुप्त पणे दुर्लभ असा कडा चढून जाणे, पहारे चुकवत सैन्य गडावर आणणे, हातघाईची लढाई, ढाल तुटली असताना शेला गुंडाळून उदयभान ला मारणे आणि सुभेदार पडल्यावर शेलार मामाने दोर कापून पाळणारे सैन्य पुन्हा माघारी वळवणे आणि जिवाच्या कराराने मावळ्यांनी गड जिंकणे हे कसले रोमांचक आहे
एकट्या तानाजी ला लार्जर दॅन लाईफ बनवून बाकी मावळे असेच जागा भरायला घेऊन काय साध्य करणार
हा विजय जसा तानाजी चा होता तसाच त्यावेळी लढलेल्या आणि महाराजांसाठी रणांगणावर मृत्यू ला कवटाळणाऱ्या प्रत्येक सैनिकांचा होता
नेता पडला तरी जिवाच्या आकांताने लढणाऱ्या शुरांचा होता
बालाजी सुतार परीक्षण
बालाजी सुतार परीक्षण
कोण है ये बालाजी सुतार?
Facebook प्रसिद्ध लेखक
Facebook प्रसिद्ध लेखक
ओके. बघते.
ओके. बघते. धन्यवाद.
बालाजी सुतार यांनी लिहलेले
बालाजी सुतार यांनी लिहलेले परीक्षण खरंच आहे.
इथे आहे बालाजी सुतारांचा लेख
इथे आहे
बालाजी सुतारांचा लेख
आजे देवगण आणि सैफअलीखान
आजे देवगण आणि सैफअलीखान यांच्यातल्या वैयक्तिक दुश्मनीची ऐतिहासिक कपडेपट वापरून केलेली ष्टोरी>>>>>>
आजे
शिन्मासमीक्षण
शिन्मासमीक्षण
काल पाहीला लेकाच्या
काल पाहीला लेकाच्या अतिआग्रहास्तव...!!
Submitted by आशुचँप on 17 January, 2020 - 01:09
>>>>>>पोस्टशी पुर्णपणे सहमत!
Pages