चित्रपट परीक्षण/रिव्यू : 'Tanhaji: The Unsung Warrior'

Submitted by भागवत on 15 January, 2020 - 03:53

श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्य उभे केले ते चतुराई, कर्तबगारी, खंबीर नेतृत्व, विचाराची कल्पकता, लढाऊपणा, गनिमी कावा, पराकोटीचा पराक्रम, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाख मोलाची स्वराज्या साठी घाम गाळणारी, पराक्रम आणि बलिदान देणारी माणसं त्यांनी जमा केली. त्यापैकी एक होते “नरवीर तानाजी मालुसरे”. हे नाव उच्चारताच फक्त एक नाव आठवते ते म्हणजे सिंहगड. त्यासोबत महाराजांचे प्रसिद्ध विधान आठवते “गड आला पण सिंह गेला”.

श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे कित्येक मावळे, सरदार, गनिमीकावा तंत्र, विविध आरपारच्या लढाई, किंवा त्यांच्या मोहिमे वर चित्रपट निघू शकतो. महाराजांनी आणि स्वराज्याच्या शिलेदारांनी असे कर्तृत्व आणि शौर्य त्यावेळेस गाजवले होते. अफाट कर्तृत्व, धैर्य, शौर्य, पराक्रमा मुळे “नरवीर तानाजी मालुसरे” यांचे नाव इतिहासात कोरले आहे. या चित्रपटात अजय देवगण यांनी तान्हाजी यांची भूमिका साकारली आहे. आपल्या दमदार अभिनयाने या ऐतिहासिक पात्राला योग्य न्याय दिला आहे. या भूमिकेसाठी अजय अतिशय योग्य असा अभिनेता आहे. अजयने आपल्या डोळ्यांचा, संवाद फेकीचा, अभिनयाचा उपयोग करून व्यक्तिरेखा साकारण्याचा आलेख उंचावत नेला आहे. एकदम कडकडीत, चुरचुरीत संवाद अजयने लीलया, सहजरीत्या आणि प्रभावीपणे उच्चारले आहेत. पूर्ण चित्रपट ‘तान्हाजी’ या व्यक्तिरेखे भोवती फिरतो. एक प्रेमळ पती, पिता, मित्र, सहकारी, लढवय्या सेनांनी, निष्ठावान, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा उजवा हात चांगल्या पद्धतीने उभारला आहे. “तान्हाजी” च्या विविध छटा टिपण्यात अजय अभिनेता म्हणून यशस्वी झाला आहे.

तान्हाजीच्या बरोबर उलट “उदयभान राठोड” आहे. निर्दयी, सूडबुद्धी, खुनशी, घातकी, दगाबाज, अक्षरश: अति दुष्ट आहे. ही व्यक्तिरेखा सैफ अली खानच्या अंगात भिनली आहे. तुम्ही या व्यक्तिरेखेचा द्वेष कराल इतका नैसर्गिक अभिनय सैफ ने साकारला आहे. मगरीचे मास खाणारा, शत्रूला चकित करणारा, पहारेकरी चुकला तर मृत्यूदंड देणारा, विधवेला पळवून आणणारा खुनशी खलनायक उत्कृष्ट उभारलेला आहे. “उदयभान” आणि “तान्हाजी” यांच्यातील संवादाची जुगलबंदी चित्रपटाला वेगळ्या उंची वर नेतात. “सैफ” ने खलनायकाची भूमिका अतिशय ताकदीने उभारलेली आहे. त्याची संवादफेक, अभिनय, वेषभूषा आणि डॉयलॉगबाजी मुळे या भूमिकेला वेगळीच उंची लाभली आहे. “दख्खन की हवा चली तो उठा देना” या वाक्यात तो भाव खाऊन जातो. भविष्यात सैफच्या या भुमिकेला विविध पुरस्कार नक्कीच मिळतील.

उत्तम सहकलाकाराची फौज या चित्रपटात आहे. शरद केळकर, पद्मावती राव, लुकॅ केनी, अजिंक्य देव, नेहा शर्मा, शशांक शेंडे आणि देवदत्त नागे. सगळ्यांनी आपले काम चोख बजावले आहे. पद्मावती रावचा “यशस्वी भव”, “जब तक कोढाणा पर फिर से भगवा नहीं लहराता, हम जूते नहीं पहनेंगे।” हा संवाद जबरदस्त आहे. त्यांनी डोळ्याचा, नजरेचा, अभिनयाचा उपयोग करून करारी जिजाऊ उभारली आहे. औरंगजेब बुद्धिबळ खेळतानाचा संवाद आणि दृश्य एकदम चपखल आहे. अतिशय संयत अभिनयाने शरद केळकर यांनी “छत्रपती शिवाजी महाराज” ही भूमिका पडद्यावर जिवंत केली आहे. शरद यांचे कास्टिंग अतिशय योग्य आहे. मित्र, छत्रपती, राजा अशी उत्तम भूमिका शरदने साकारली आहे. शशांक शेंडे यांनी शेलार मामा आणि देवदत्त नागे यांनी सूर्याजी मालुसरे उत्तम भूमिका साकारल्या आहेत. काजोल यांनी “सावित्रीबाई मालुसरे” ही व्यक्तिरेखा साकारली आहे. काजोल ची चित्रपटातील व्यक्तिरेखेची लांबी जरी कमी असली तरी काजोल चा वावर सुखकारक आहे. “कुत्ते की तरह जीने से बेहतर हैं... शेर की तरह मरना।” हे वाक्य परिणाम कारक उतरले आहे. अजय-काजोल ची पती- पत्नीची जोडी शोभून दिसते. त्यामुळे जोडी प्रभावी होऊन दोन्ही व्यक्तिरेखेला न्याय देते.

ओम राऊत यांनी अगोदर “लोकमान्य टिळक” हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चांगला चित्रपट होता. “तान्हाजी” या चित्रपटाची धुरा सुद्धा ओम राऊत यांनी आपल्या खांद्यावर समर्थपणे सांभाळली आहे. चित्रपटाचा पहिला भाग थोडा रेंगाळला आहे आणि संथ आहे. पण खरी कमाल दुसऱ्या भागात आहे. मध्यंतरा नंतर दुसर्‍या भागात दिग्दर्शकाने अतिशय उत्कंठा वर्धक, उत्तम मांडणी आणि VFX ईफेक्टची उधळण केली आहे. काही-काही ३डी ईफेक्ट अंगावर काटा आणतात. शेवटच्या लढाईचा प्रसंग जोमदार आणि एकदम करकरीत झाला आहे. लढाईचे एक्शन Sequences अतिशय उत्तम आहेत. चित्रपटात ४ श्रवणीय गाणी आहेत. ३ गाणी चित्रपटाच्या व्यवस्थित आणि उचित जागी आहेत. पण पार्श्वसंगीतात उणिवा आहेत. ऐतिहासिक कथांना दमदार पार्श्व संगीत हवेच. अश्या भव्य श्रेणीच्या चित्रपटातील प्रत्येक पात्राला, दृश्याला परिणाम कारक होण्यासाठी उत्तम पार्श्वसंगीत हवेच. पहिल्या भागाची व्यवस्थित मांडणी करून लांबी कमी केली असती तर चित्रपट आणखी धमाकेदार झाला असता.

काही गोष्टी खटकतात. त्यातील एक साधू लाकडी कुबडी फेकून मारतो ते दृश्य काही पटले नाही. तान्हाजी उदयभान पुढे जाऊन गाणे गाऊन नृत्य करतात. ही दुसरी गोष्ट काही पटत नाही. प्रत्येक भूमिकेला स्थापित करण्या अगोदर थोडा वेळ दिला पाहिजे होता. ऐतेहासिक कथा असल्याने थोडी सिनेमॉटीक लिबर्टी घेतली आहे पण जास्त उत्कंठावर्धक दाखवण्याच्या नादात कथेत जास्त तोड मोड केली नाही हे विशेष. जशी कथा आहे तशी दाखवण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला आहे त्याबद्दल दिग्दर्शकाचे अभिनंदन.

पण अजय-सैफ चा उत्तम अभिनय, ऐतिहासिक कथेची तोडमोड न करता चांगले दिग्दर्शन, अंगावर शहारे आणणारे लढाईचे उत्कृष्ट चित्रण, पटकथेला दिलेला योग्य न्याय आणि चांगले छायाचित्रण, सिनेमॅटोग्राफी, वेषभूषा, दमदार सादरीकरण, चांगली एडिटींग, उत्तम कास्टिंग, एका स्वदेशाभिमानी लढवय्याचे दमदार चित्रीकरण, एक उत्तम कलाकृती यामुळे तुम्ही चित्रपट कमीत कमी एकदा बघाच. चित्रपट बघितल्या नंतर देश प्रेम उफाळून आल्याशिवाय राहणार नाही. मी या चित्रपटाला ३.५ स्टार देतो. १.५ स्टार कमी केले आहेत. कारण म्हणजे पहिल्या भागाच्या संथ गतीला, पार्श्वसंगीत आणखी चांगले होऊ शकले असते, इतर कलाकारांना थोडा वाव देता येऊ शकला असता आणि VFX ईफेक्ट आणखी चांगले होऊ शकले असते.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

{थोडी सिनेमॉटीक लिबर्टी घेतली आहे पण जास्त उत्कंठावर्धक दाखवण्याच्या नादात कथेत जास्त तोड मोड केली नाही हे विशेष.}

काय बदल केलेत?

काय बदल केलेत? साधू लाकडी कुबडी फेकून मारतो ते दृश्य काही पटले नाही. तान्हाजी उदयभान पुढे जाऊन गाणे गाऊन नृत्य करतात. चित्रपटा शेवटी शिवाजी महाराज तान्हाजी सोबत सिंहगडावर दाखवलेत.

घोरपडी ऐवजी घोरपडे बंधू दाखवले आहेत.
सूर्याजी दोर कापतो ते दाखवले नाही.

'तानाजी मालुसरे'वर PHD केलेल्या कोणी डॉ. शीतल मालुसरे ची मदत घेतली आहे,कदाचित तसंच झालं असेल जसं सिनेमात दाखवलय.

प्रचंड आवडलाय सिनेमा. 3D मध्ये पहायला खूप मजा आली.

शाळेत शिकलेला इतिहास.
लढाईत तानाजी मरतो.
मावळे पळ काढू पाहतात.
शेलारमामा दोर कापून टाकतो.
लढाई. मावळ्यांचा जय.
गडावर आग पेटवून महाराजांना गड जिंकल्याचा संदेश.
तान्हाजी गेल्याचं कळल्यावर महाराज म्हणतात - गड आला पण सिंह गेला.
गडाचं नाव बदलून सिंहगड.

यातलं काय दाखवलं?
तानाजीने महाराजांच्या पायांशी प्राण सोडले होते?
उदयभान नक्की असा होता?

या लढाई वरूनच गडाचं नाव बदललं ,तरीही तान्हाजी अनसंग हिरो?

चांगला मनोरंजक चित्रपट आहे असं म्हणा.
ऐतिहासिक नाही.

ऐतिहासिक आहे कारण बाकीचा इतिहास पण दाखवला आहे. आपल्याला तानाजी आणि पूर्ण कथा माहीत आहे पण नॉन मराठी ऑडिअन्सला नीट समजायला छान दाखवलं आहे.खूप मस्त आहे. नक्की पहायला पाहिजे.
रायबा cute आहे एकदम Happy
सूर्याजी, शेलार मामा आणि मला सावित्री पण आवडली.
मी खूप fan झालीये ह्या सिनेमाची.

घोरपडी ऐवजी घोरपडे बंधू दाखवले आहेत.>> घोरपडे बंधुंकडे कोणत्याही कडा-कपारीला चिकटुन वर चढण्याचं कसब होते त्याचा वापर करुन तानाजींनी आपले सैन्य कोंढाण्यावर नेले असा इतिहास आहे. परंतु घोरपडे बंधुंचे नाव घोरपडीशी संबंधीत असल्याने ते इतिहासात तसे रुढ झाले असावे असे वाटते.

वास्तवीक जीवनात एवढ्याशा घोरपडीच्या शेपटीला दोर बांधुन एकतरी माणुस कडा चढु शकेल का हा विचार करुन बघितल्यास ते अशक्य वाटते. घोरपडे बंधुंचे कसब हेरुन तानाजींनी त्यांना ही कमगिरी दिली असेल.

बाकी चित्रपट अतिशय छान आहे.
१५० करोड खर्च करुन बनविण्यात आलेल्या या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात १०० कोटी कमवले आहेत... इट कुड बी ए बिग हिट. पानिपत चित्रपटाचं मात्र अपेक्षेप्रमाणे पानिपत झालं. १०० करोड खर्च झालेल्या पानिपतचे कसेबसे ४९ कोटी वसुल झाले. ए बिग लुजर..!

बाकीच्या वीरांचे सिनेमे काढायला पाहीजेत. बाजीप्रभू देशपांडे, महाराणा प्रताप, पृथ्वीराज चौहान, खुद्द शिवाजी महाराजांवर हिंदी सिनेमा बघायला आवडेल

घोरपडे बंधुंकडे कोणत्याही कडा-कपारीला चिकटुन वर चढण्याचं कसब होते त्याचा वापर करुन तानाजींनी आपले सैन्य कोंढाण्यावर नेले असा इतिहास आहे. ---ओहह

यातलं काय दाखवलं?
तानाजीने महाराजांच्या पायांशी प्राण सोडले होते?
उदयभान नक्की असा होता
याच कारणासाठी सिनेमा नाही आवडला. तान्हाजी हीरो करण्याच्या नादात इतिहासाची मोडतोड केली आहे.
पुढील पिढीला हाच इतिहास माहीत होईल

बाकीच्या वीरांचे सिनेमे काढायला पाहीजेत. बाजीप्रभू देशपांडे, महाराणा प्रताप, पृथ्वीराज चौहान, खुद्द शिवाजी महाराजांवर हिंदी सिनेमा बघायला आवडेल >> +१ बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर मराठीत चित्रपट येत आहे. https://www.loksatta.com/manoranjan-news/story-of-iron-warriors-baji-pra...

मोडतोड केलेले चित्रपट कचकुन आपटतात.. हाही इतिहास आहे Lol Lol Lol

घोरपडे बंधुंकडे कोणत्याही कडा-कपारीला चिकटुन वर चढण्याचं कसब होते त्याचा वापर करुन तानाजींनी आपले सैन्य कोंढाण्यावर नेले असा इतिहास आहे. परंतु घोरपडे बंधुंचे नाव घोरपडीशी संबंधीत असल्याने ते इतिहासात तसे रुढ झाले असावे असे वाटते. >> असेही होऊ शकते

अश्या सिनेमामुळे इतिहासाबद्दल आवड निर्माण होते. आमचं उदाहरण -दिवाळीत सगळेजण सिंहगडावर सहलीला गेलो होतो. मुलानी ट्रेक, भजी, पिठलं-भाकरी सगळं मस्त एन्जॉय केलं. तिथे जो इतिहास लिहिला होता तो काही त्याला डोक्यात आणि मनात जायला तयार नाही. शेवटी मी नाद सोडला.
हा सिनेमा बघून आल्यावर तोच म्हणाला की पुढच्या वेळेस तुम्ही मला historical आणि temple places ना नेणार असाल तर आधी मला त्याबद्दल मूवी दाखवायचा. आता सगळ्यांना तो सांगत फिरतोय, I have been to this place. You should come to my hometown and we will go there. You would enjoy it, it's mesmerizing place with good food.

>>बाकीच्या वीरांचे सिनेमे काढायला पाहीजेत. <<
अजय देवगणचा तोच प्लॅन आहे. चला हवा येऊ द्या मध्ये त्याने सांगितलेलं कि "अनसंग हिरो" हि चित्रपट मालिका त्याला बनवायची आहे. तानाजी त्या मालिकेतली पहिली शृंखळा...

छान रिवयु! आवडला!
मला सगळ्यात जास्त खटकलेली गोष्ट म्हणजे काजोल! प्रचंड कृत्रिम वाटत राहते.
काही गोष्टीही खटकल्या,(vfx, logic etc) पण नगण्य धरता येतील अशाच.
रेटिंग वाईज माझ्याकडून तरी ५ स्टारच. कारण हा एक वन्स इन अ लाईफटाईम experience च असू शकतो, शिवकालीन विश्वाचा. जसा कट्यार काळजात घुसली संगीत नाटकांमधील होता.

घोरपडे बंधुंकडे कोणत्याही कडा-कपारीला चिकटुन वर चढण्याचं कसब होते त्याचा वापर करुन तानाजींनी आपले सैन्य कोंढाण्यावर नेले असा इतिहास आहे.
>>>>>

ओह ! आणि मी आजवर खरेच घोरपडीच्या शेपटाला दोर बांधून बगैरे समजत होतो...

हे तर उलटे झाले.. चित्रप्टामुळे मला खरा ईतिहास समजला Happy

धन्यवाद अजय देवगण !

ओह ! आणि मी आजवर खरेच घोरपडीच्या शेपटाला दोर बांधून बगैरे समजत होतो... - मी सुद्धा!

हा सिनेमा बघून आल्यावर तोच म्हणाला की पुढच्या वेळेस तुम्ही मला historical आणि temple places ना नेणार असाल तर आधी मला त्याबद्दल मूवी दाखवायचा. >>खुपच छान
अजय देवगणचा तोच प्लॅन आहे. चला हवा येऊ द्या मध्ये त्याने सांगितलेलं कि "अनसंग हिरो" हि चित्रपट मालिका त्याला बनवायची आहे. तानाजी त्या मालिकेतली पहिली शृंखळा... >> अतिशय सुंदर विचार

गडाला यामुळे सिंहगड नाव पडले हेही चूक आहे
कोंढाणा आणि सिंहगड अशा दोन्ही नावांनी प्रचलित होता
आणि किल्ला सतत मुघल मराठे परत मुघल असा हस्तांतरित होत राहिला
नंतर मग पेशव्यांचे दप्तर ठेवले गेले
ट्रेलर मध्ये सांधण व्हॅली आणि तिथले देवगणचे सिंघमिय पराक्रम बघूनच हा बघायचा नाही असं ठरवलं होतं
पण सगळे इतके कौतुक करत आहेत तर एकदा बघावा वाटत आहे

ट्रेलरवरुन खरतर मुव्ही ओके वाटला होता पण सगळे रिव्ह्युज मात्र छान छान म्हणतायत तेव्हा पाहायलाच हवा.

डॉ . शीतल मालुसरे यांचा समावेश चित्रपटाच्या रिसर्च टीम मध्ये करण्यात आला आहे . त्या तानाजी मालुसरेंच्या बाराव्या पिढीतील सुनबाई आहेत .तान्हाजींच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलाचं रायबाचं लग्न स्वतः महाराजांनी लावून दिल . त्याला आपल्या गळ्यातील कवड्यांची माळ घातली . ती माळ अजूनही पिढ्यानुपिढ्या जपून ठेवलेली आहे . महाराजांनी रायबाचं लग्न लावून दिल आणि त्यांना किल्ले पारगडाच किल्लेदारपद दिल . हा किल्ला स्वराज्याच्या पार दक्षिण टोकाला आहे म्हणून किल्ल्याच नाव पारगड. . या पारगडावर तान्हाजींच्या दहा पिढ्या नांदल्या . पण त्यांची अकरावी पिढी व्यवसायाच्या निमित्ताने बेळगाव जिल्ह्यातील अनगोळ येथे स्वलांतरित झाली . बाळकृष्ण मालुसरे हे तान्हाजींच्या घराण्याचे अकरावे वंशज त्यांच्या सुनबाई म्हणजे डॉ शीतल मालुसरे. डॉ. शीतल यांची याच विषयावर "रायबा" नावाची कादंबरी येत आहे . चित्रपट अतिशय सुंदर आहे . परवाच पाहिला Happy

ट्रेलर मध्ये सांधण व्हॅली आणि तिथले देवगणचे सिंघमिय पराक्रम बघूनच हा बघायचा नाही असं ठरवलं होतं
पण सगळे इतके कौतुक करत आहेत तर एकदा बघावा वाटत आहे
>>>>>

लोकांना तेच आवडलेय बाहुबली टाईप्स. त्यात जोडीला मराठी लोकांना ईनोशनलीही रिलेट झाला.

बाकी दिपिकाचा छपाक पडावा म्हणून ही काही जण तान्हाजीशी तुलना करत याचे एक्स्ट्रा कौतुक करत आहेत हा एक वेगळाच सीन आहे.
या संदर्भात एक मजेशीर पोस्ट वाचली एफबीवर..
आपल्या मुलांना छपाक दाखण्यापेक्षा तान्हाजी दाखवा म्हणजे ते कुठल्या मुलीवर एसिड टाकायचा विचारही करणार नाहीत..... कपाळावर हात मारला मी !

अनसन्ग वॉरियर सिरिज करतोय हे खरच कौतुकास्पद आहे, अजय देवगण मला नेहमी प्रामाणीक अ‍ॅक्टर वाटलाय, डाउन टु अर्थ पण आहे , सगळ्या मुलाखती एकताना जाणवत.
तानाजी/तान्हाजी अनसन्ग हिरो आपल्यासाठी नसेल पण महाराश्ट्राबाहेर किती लोकाना माहित असेल?

माझ्या मित्र परिवार बहुसंख्येने चित्रपट पहायला गेले आणि जवळजवळ सगळेच कौतुक करत आहेत म्हणून मी बायको आणि मुला सोबत आज दुपारी जाणार आहोत पहायला तान्हाजी.
मुलगा पहिलीत शिकतोय म्हणून आता पासुनच त्याला थोडा फार का होईना आपला इतिहास दाखवण्याचा प्रयत्न करतोय. लहान लहान गडावर पण घेऊन जातो. विश्रामगड, लोहगड, ञिगंलवाडी, भंडारगड, अंजनेरी.

काल बघितला. ठीक ठीक वाटला.

मी सुद्धा खरेच घोरपडीला दोर बांधून तिला वर सोडले असे समजयचो. पण वर कुणी हेराने तो दोर मग झाडाला बांधला असावा आणि मग मावळे वर चढले असावे असे वाटायचे.

मी राहते त्या भागात अजिबात मराठी राहत नाहीत. थेटर पूर्ण भरलेलं होतं, तिकिटं अजूनही मिळत नाहीत. आम्ही पहिल्या रांगेत बसून बघितला. पब्लिक एकदम शांतपणे सिनेमा बघत होत. कुठेही टिपिकल टाळ्या-शिट्या नव्हत्या, सिंबा मुविला पूर्ण थेटर आवाज करत होत. शेवटचं काजोलच गाणं तसं काही catchy नाही, तरीही लोकं उठून गेले नाहीत. बहुतेक हा मी पाहिलेला पहिलाच हिंदी 3D मूवी.
सुजा, चांगली माहिती.
राज- मजा येईल unsung warrior series बघायला, चांगली बातमी.

हो हैद्राबादला सुद्धा आम्ही राहतो त्याभागात मराठी लोक जवळजवळ नाहीच. पण आमच्या भागातील शोज सुद्धा हाऊसफुल जात आहेत.

Pages