ती आज कित्येक वर्षांनंतर संध्याकाळी घरी होती. तिला संध्याकाळी दारात बघून नानी सुद्धा चक्रावून गेल्या. कित्येक वर्ष त्यांना ती नसण्याची सवयच झाली होती. ती, नंदिनी राजाध्यक्ष, एक यशस्वी उद्योजिका. स्वकर्तृत्वावर, स्वबळावर आज तिने अत्यंत ताकदीने स्वतःचा उद्योग फूड इंडस्ट्री मध्ये उभा केला होता. देश-विदेशात तिच्या कंपनीची उद्पादने, बाजारपेठेत दिमाखात मिरवत होती. नंदिनीला प्रश्न विचारलेले आवडणार नाहीत हे नानी ओळखून होत्या. त्यांनी चहा करायला घेतला. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नंदिनी आवरून आली. त्यांनी तिच्यापुढे चहा ठेवला. फारसा काहीही संवाद न होता चहा संपला. नानी काही बोलत नसल्या तरी, त्यांचे थकलेले डोळे, नंदिनीच्या बारीकसारीक हालचालींची नोंद घेत होते. नंदिनी कुठल्या तरी विचारात बुडली होती. थोडी अस्वस्थ दिसत होती. एरवी कामाचा कुठलाही ताण असला की एकतर नंदिनी दिवसच्या दिवस घरीच येत नसे किंवा आलीच तरी घरातल्या तिच्या कामासाठी राखून ठेवलेल्या खोलीत बुडून जायची. तिचं सगळं खाणंपिणं नानी त्या खोलीतच पाठवत असत. तिला त्याचीही शुद्ध नसे. तेव्हाही ती कधी अस्वस्थ असे पण कामात बुडालेली असे. आजसारखा अस्वस्थपणा त्यांनी या आधी कधीही नंदिनीच्या चेहऱयावर पाहिलेला नव्हता. कसलीतरी समाधी लावल्यासारखी नजर. खोलवर काहीतरी खळबळ नक्कीच होती. पण या समुद्राच्या उधाणाला हात घालायचा तरी कसा. शेवटी त्यांनी व्यवहार पुढे केला, "नंदिनी, आज घरी आहेस तर जेवायला काय करूया." नंदिनीच लक्षच नव्हतं. "अगं, लक्ष कुठे आहे तुझं? तू घरी आहेस तर, जेवायला काय करू?", "तू नेहमीसारखं तुझ्यापुरतं कर. एकजण भेटायला येणार आहेत. तेव्हा त्यांच्याबरोबरच जेवण होईल." नानीना वाटलंच तरी काम सोडून आज ही लवकर घरी कशी? "काम झाल्यावर जेवायला आहेत का? स्वयंपाकाच्या बाईना बोलावणं पाठवलं आहेस का बाहेर जाणार आहात? नाहीतर मी करते. दोन माणसांचं करणं जमेल अजून या म्हातारीला. तुझ्याबरोबर राहून, तेवढी टिकले आहे बरं मी." नंदिनीला नानीच कौतुक वाटलं. या सत्तरीच्या बाईला अजूनही लोकांना खायला करून घालण्यात काय उत्साह आहे. "नानी, तू अशी आहेस म्हणूनच माझ्याबरोबर आहेस. बाकी कोण आहे नाहीतर? आज तुला हवं ते कर जेवायला. आणि कामाची मीटिंग नाहीये ही. त्यामुळे साधंसच कर काहीही." नंदिनीला माहिती होतं साधं म्हटलं तरी नानी ४-५ प्रकार करेल. त्यांच्या घरी असं सहज म्हणून भेटायला कोणीच येत नसे. येत असत ती नंदिनीच्या कामाची माणसं नाहीतर तर नानीच्या आजूबाजूला राहणाऱ्या २-४ मैत्रिणी. त्यामुळे चुकून असं कधी कोणी आलंच तर नानी खुश होत असे. तिला लोकांची फार आवड. नानीला वाटलं, नंदिनी जेवायला कर असं म्हणाली खरी, पण मनातलं खरं काही ओठावर येऊ द्यायची नाही. मागे जेव्हा नंदिनी त्यांना हट्टाने इथे रहायला घेऊन आली तेव्हा त्यांना तिचं काय कौतुक वाटलं पण नंतर असं वाटलं आपल्या जबाबदारीमुळें तर ही कोणाबरोबर लग्न करत नाही का? त्यांनी एक दोनदा तिला सुचवलं देखील. अशी एकटी किती दिवस राहणार? त्याही वेळेस नंदिनीची तिशी उलटली होती. आता तर चाळीशीही उलटून गेली. तिचा आणि त्यांचा दोघींचाही एकटेपणा त्या घरालाच कधी कधी एकटं करत असे. नानींनी अनेकदा नंदिनीला सांगितलं, माझं तारुण्य आनंदात, साथीदाराबरोबर गेलं ग. तरी हा एकटेपणा नको वाटतो. तू का अशी एकटी राहते आहेस? त्रास होईल. पण नंदिनीने कधीही लक्षच दिलं नाही. माझं काम हाच माझा साथीदार म्हणत पुढे चालत राहिली. तरी आज कोणीतरी घरी येणार म्हणून त्या आनंदातच तयारीला लागल्या.
नंदिनीला संध्याकाळी घरी असण्याची सवयच राहिली नव्हती. त्याने तिच्या अस्वस्थतेमध्ये अजूनच भर घातली. तिला कळतच नव्हतं स्वतःचंच वागणं. दोन दिवसांपूर्वी अवधूत तिला अचानक ऑफिसमध्ये भेटतो काय आणि आज तो घरी येऊ का असं म्हटल्यावर आपल्याला त्याला नकार का देता आला नाही? त्याला ऑफिसमध्ये पहिल्यांदा पाहिल्यावर आपण नक्की काय शोधत होतो? तो ओळख दाखवेल का? की त्याने ओळख दाखवावी असं वाटत होतं. जरी इतरांच्या लक्षात आलेलं नसलं तरी, तो आल्यावर कामातलं लक्ष मधेच दुसरीकडे जात होतं, हे नंदिनीला स्वतःशी कबूल करण्यावाचून पर्याय नव्हता. इतकी वर्ष कुठलाही पुरुष, तिच्या मनावर इतके पडसाद उठवू शकला नव्हता. नाही म्हणायला, आलेले शरीरसंबंध, मनावर कधीच मोहिनी घालू शकले नव्हते. त्यामुळे नंदिनीच्या आयुष्यात साधा तरंग सुद्धा उठला नव्हता. पण अवधूत, तिने निकराने मागे टाकलेला भूतकाळ समोर घेऊन फिरत होता. तिच्याही नकळत, डोळ्यासमोर अल्लड वयातले तिचे ते अजाणते दिवस सतत तरळून जात होते. खरं म्हणजे आता त्याचा काही मागमूसही राहिला नाहीये. तरीही अवधूतला भेटल्यापासून, मनाने हे असं सतत मागं जाणं तिला अस्वस्थ करत होतं की त्याहीपेक्षा आज अवधूतला भेटून तिला, तिच्या ह्या एकटेपणाची जाणीव जास्त अस्वस्थ करत होती हेच तिला कळत नव्हतं. एकदा तिने अवधूतला येऊ नकोस, असं कळवाव असा विचारही केला पण तेही तिच्या स्वभावात बसेना. मग तिने उठून गाणी लावली. त्यावरही नेमक्या आशाताई "जुत्सुजू जिसकी थी उसको तो न पाया हमने...” त्या आवाजाने तर तिला आणखीनच हरवून जायला झालं. एक वेळ कुठलाही मोठा व्यावसायिक पेच परवडला पण ही असली मनाची कोडी नकोत, असं तिला झालं. शेवटी ती स्वतःलाच काही बजावत, निर्धाराने उठली. तिने गाणी बंद केली. असली भावनिक गुंतवणूक तिला परवडली नसती. तिने लॅपटॉप चालू करून, कामात डोकं घातलं. एक बरं होतं, कामांची यादी कधीही न संपणारी होती. इतरांना काम संपवून कधी घरी जातो असं होई, तिथे तिला ह्या कामाचाच आधार होता. तिने स्वतःच्या उद्योगामध्ये गेली १५ वर्ष स्वतःला झोकून दिलं होतं, ते परत मागे वळून न बघण्यासाठी. तिने एकामागून एक कामं हातावेगळी करायला सुरवात केली. तिची तंद्री मोडली ती दारावरच्या बेलमुळे. तिने एक दिर्घ श्वास घेतला आणि स्वतःच ठरवलेल्या काही गोष्टींची स्वतःलाच आठवण करून दिली. आता ती अवधूतला सामोरं जायला तयार झाली होती.
नानींनी दार उघडलं. दारात चाळीशीच्या बाहेरचा, चेहऱयावर मोकळं हास्य असलेला, हातात फुलांचा गुच्छ घेऊन अवधूत उभा. नानींना पाहून तो थोडा गडबडला. "नंदिनी राजाध्यक्ष. हेच घर ना?" नानींना त्याचा गोंधळ कळला. त्या हसून म्हणाल्या, “हो. घर बरोबर आहे. तुम्ही आत या. मी नानी. नंदिनीबरोबर इथेच राहते. नंदिनीला पाठवते. तुम्ही बसा." "मी अवधूत, नंदिनीचा मित्र. मी नंदिनीच्याच वयाचा आहे." त्यांनी हसून मान डोलवली. “मला अहो-जाहो नका करू. याआधी आपण कधी भेटलो नाहीये. त्यामुळे नंदिनीबरोबर तुम्ही इथे राहता हे माहिती नव्हतं." त्याने झटकन हातातला पुष्पगुच्छ नानींना दिला. "हा, तुमच्यासाठी. म्हणजे मी तो नंदिनीसाठी आणला होता. पण तिच्यापेक्षा तुमच्या हातात जास्त शोभेल." नानी म्हणाल्या, " तिलाच दे. लक्षात ठेवून, तिच्या आवडीची फुलं आणली आहेस" नंदिनीच्या आवडीनिवडी अवधूतला माहिती आहेत याची नोंद नानींनी बिनचूक केली होती. एवढ्यात नंदिनी आली. नानी आतमध्ये कामाला निघून गेल्या. "बस. घर शोधायला काही त्रास नाही ना झाला?" अवधूत हसला." तुला शोधायला जितका झाला, त्यापेक्षा नक्कीच कमी." नंदिनीने मुद्दामच याकडे दुर्लक्ष केलं. "काय घेणार? जे माझ्या स्टॉकमध्ये आहे आणि तुला हवं असेल, ते काहीही घे." अवधूतच्या मनात आलं, काही उत्तरं हवी आहेत, पण ती तू देशील का नाही माहित नाही. तो काहीच बोलत नाही बघून नंदिनीच पुढे, "नानीला सवय आहे मी घरी ड्रिंक्स घेते त्याची. तू तिच्याकडे बघून नाही म्हणायची गरज नाही." "नाही. पण आज नको." नंदिनीला अवधुतचं असं हक्कानं येणं, तिच्याकडे बघणं, तिथे त्याचं असणंच तिला स्वीकारता येत नव्हतं. काय बोलाव हा विचार करत असतानाच अवधूत म्हणाला, "तू स्वतःला छान maintain केलं आहेस? अजूनही तितकीच सुंदर दिसतेस." "दिसतं तितकं सुंदर काही राहिलं नाहीये." इतक्या वर्षानंतर एकमेकांसमोर असे आल्यावर, दोघानांही पुढे कुठून सुरवात करावी कळत नव्हतं. नंदिनीला ही शांतता सहन होईना. "तू का आला आहेस भेटायला? म्हणजे ऑफिसमध्ये न बोलण्यासारखं काही काम?" "मी कामासाठी आलो नाहीये हे तुलाही चांगलच माहितेय. इतक्या वर्षानंतर सापडलीस. तुला भेटावसं वाटणार नाहीये का मला? का मी तुझा कधी कोणी होतो हे विसरलीच आहेस तू?" नंदिनीने कितीही ठरवलं तरी मन मागे धावत होतं.
अवधूत तसाच होता, हसतमुख, तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा. कॉलेजमधली ओळख आणि हळूहळू जुळलेले धागे. दोघांच्याही नकळत ते एकमेकांमध्ये गुंतत गेले होते. नंदिनी स्वतंत्र विचारांची, आणि कुठलीही भीड न बाळगता स्वतःची मत तितक्याच समर्थपणे मांडणारी. अवधूत तिच्या ह्याच गुणांच्या प्रेमात होता. नंदिनीच्या वडिलांचा छोटा व्यवसाय होता आणि तोही फारसा चालत नव्हता. सगळं घर त्या व्यवसायावरच होतं. नंदिनीला एक भाऊ, विवेक. नंदिनीचा सगळा जीव विवेकमध्ये. विवेक तिच्यापेक्षा २ वर्षांनी लहान आणि जन्मतःच बुद्धीने कमी. नंदिनी विवेकला जीवापाड जपायची. आई विवेकमुळे घरातच अडकून पडलेली पण तरीही जमेल त्यात संसार चालवत होती. आईला नंदिनीच फार कौतुक, तिच्या हुशारीवर त्यांचा फार भरवसा. आईच्या आठवणीने नंदिनीला भरून आलं. तिच्या डोळ्यासमोरून घराची चित्र एका क्षणात सरकून गेली. कित्येक वर्ष तिने हे सगळं आतल्या आत दाबून टाकलेलं होतं आणि स्वतःच स्वतःशी लढत होती. हे अवधूतला समजू नये म्हणून तिने पटकन, "गाणी लावू का रे तुझ्या आवडीची? तुझा लाडका किशोर. collection आहे माझ्याकडे." “चला, म्हणजे तू सगळंच विसरली नाहीयेस तर."
अवधूतला प्रश्न होतेच आणि त्याची उत्तर शोधण्यासाठीच तो आला होता. किंबहुना त्याचा तो हक्कच होता. कारण निदान त्याच्यासाठीतरी नंदिनीच एका महिन्यात काहीही न सांगता गायब होणं आणि परत हे असं इतक्या वर्षांनंतर दिसणं याचा काहीही संदर्भच नव्हता. त्याचं असं काय चुकलं म्हणून नंदिनी त्याला सोडून निघून गेली, या प्रश्नाने तर त्याची एकही दिवस पाठ सोडलेली नाही. "नंदिनी, ४ महिन्यांपूर्वी मी तुझ्या आईला भेटलो. त्यांनी तुझ्याबद्दल काहीही सांगायला नकार दिला. इतकी अढी का आहे? असं काय आहे की तू मला, तुझ्या घरच्यांना सोडून गेलीस? तू गेल्यावर, माझ्या बाबाच्या बदलीमुळे आम्ही गावातून बाहेर पडलो. मी वेड्यासारखं शोधत राहिलो तुला, मग अनेक वर्ष वाट बघितली. तू आली नाहीस ना तुझी काही बातमी कळली. हळूहळू गावाशी फारसा संबंध राहिला नाही. चार महिन्यापूर्वी गेलो आणि कळलं तुझी आई गावात परत राहायला आली आहे. आणि विवेक कधी? म्हणजे कसा? गावात कळलं की तू एकदा आलीस आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी..." अवधूतच्या प्रत्येक वाक्याबरोबर नंदिनीच्या मनात असंख्य विचारांची दाटी होतं होती आणि एका मागून एक पचवलेले आघात पुन्हा वार करत होते आणि हा शेवटचा विवेकचा आघात मात्र तिला कधीही सहन झालेला नाही. त्याही दिवशी ती परत आली होती ते निव्वळ विवेकसाठी. तिला माहिती होतं, इतर कोणी नाही तरी विवेकच तिच्यावर खरं प्रेम होतं. तिला तो दिवस, ती रात्र आजही जशीच्या तशी आठवते.
ती निघून गेल्यावर घरची परिस्थिती अजूनच खालावली होती. तिने निघून गेल्यावर, महिन्याभरानंतर पत्र पाठवली होती. ज्यात तिने ती १-२ वर्षात परत येईल असंही कळवलं होतं. पण तिच्या वडिलांना हा धक्का सहन झाला नव्हता आणि ते अंथरुणाला खिळले. आईला एका ऐवजी दोघांची काळजी घेणं आलं. मधल्या काळात बरीच उलथापालथ झाली. तिच्या आईने, तिने पाठवलेले पैसे न बोलता स्विकारले होते पण तिच्या कुठल्याही पत्राला उत्तर दिलं नव्हतं. तिलाही या सगळ्याने घरी जायचं धाडस होईना. ४ वर्षानंतर, मनाची तयारी करून ती घरी आली. तिला वाटलं होतं इतक्या वर्षांनंतर, आई भेटते आहे तर आईला कडकडून मिठी मारावी. आईचा हात एकदा डोक्यावरून फिरला की, तिचा इतक्या वर्षांचा थकवा एका क्षणात नाहीसा होईल. तिला वाटलं होतं, आई पत्राला उत्तर देत नसली तरी समोर आल्यावर मागचं सगळं विसरून जाईल. पण आई इतकी परकी वाटली तिला. आईने तिला घरात यायला नकार दिला नाही आणि स्वागतही केलं नाही. जणू काही त्यांचा एकमेकांशी काही संबंधच नाही. तिला असं वाटलं यापेक्षा आई तिच्याशी भांडली तरी चालेल, घराबाहेर काढलं तरी चालेल पण हा तोंड दाबून बुक्यांचा मार कसा सहन करायचा. तिच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आईचं हे रूप तिला सहन होईना. तिला एकदा असं वाटलं की आईला सगळं खरं सांगावं. पण कदाचित ते सगळं खरं तिला पचवता येणार नाही किंवा ती कायमची दुरावेल. तिला पुढे शिकायचं होतं, स्वतःच्या पायावर उभं राहून घरची परिस्थिती बदलायची होती. सगळ्यांना आनंदात ठेवायचं होतं. त्याआधी परिस्थितीला शरण जाऊन लग्न करायचं नव्हतं. पण वडिलांना हे सगळं पटलं नसतं आणि पटलं असतंच तरी तिच्या शिक्षणाचे पैसे त्यांच्याकडे नव्हते. तिला ती लाचारी आवडत नव्हती आणि स्वतःच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास होता. पण तिने घेतलेले निर्णय सामान्य घरात न रुचणारे होते याची तिला पूर्ण कल्पना होती. आणि म्हणूनच तिने हा तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करायची तयारी दाखवली. तिचा उरला सुरला आधार विवेक. खरं म्हणजे सगळयांना वाटायचं, हा असा डोक्याने मंद म्हणून हा आईला, तिला जड झालाय. पण अगदी लहान असल्यापासून त्या दोंघाची नाळ फार घट्ट होती. कधी कधी तर बाकी कुणालाही कळली नाही तरी विवेकला तिची चलबिचल कळत असे. लोकांच्या दृष्टीने ज्याला काहीच समजत नाही, त्याला नंदिनी मात्र बरोबर समजली होती. आजही जेव्हा आईचा नकार पचवून, भरल्या डोळ्यांनी ती त्याच्या खोलीत गेली, तेव्हा तिने हाक मारायच्या आधी त्यानेच तिला हाक मारली. तिला विवेकला बघून धक्काच बसला. त्याची तब्बेत फारच खालावली होती. एरवी तो सगळं आपलं आपण करू शकत होता. आता तो कित्येक दिवस पलंगावरून उठलाच नाहीये असा दिसत होता. गालाची, मानेची हाडं वर आली होती. तिला बघून डोळ्यात आलेली चमक, खूप दिवसांनी आली आहे हे तिच्या लगेच लक्षात आलं. त्याचा आवाजही खालावला होता. ती क्षणभर घाबरली. तिने पटकन त्याला जवळ घेतले तर अंगात ताप. तिला गलबलून आले, ढसाढसा रडायला आले. विवेकनेच तिला थोपटले. जणू काही क्षणांसाठी तोच तिची आई झाला होता. ही इतकी समज या मुलाला कुठून आली हेच तिला कळेना. आणि ह्याला मंद बुद्धी का म्हणावं? त्याला एकट्यालाच कळलं होत, तिला फक्त प्रेमाचा हात हवा होता. ती रडता रडता त्याला सांगत होती. आता सगळं नीट होईल. मी आहे रे, तुला बरं वाटेल. मी तुझी सगळी काळजी घेईन. आई लांबून सगळं पाहत होती. नजरेत तोच कोरडेपणा. सगळयांनी कसेबसे जेवून घेतले. विवेकचा ताप उतरतच नव्हता. आईकडून तिला कळलं, गेले आठ दिवस तो तापाने फणफणलेला आहे. औषंधाचा म्हणावा तसा गुण नाही. उद्या ताप उतरला नाही तर दवाखान्यात ठेवावं लागेल. ती तशीच उठली, रात्री जाऊन डॉक्टरना घेऊन आली. उद्यापर्यंत वाट बघू असं ठरलं. तिने विवेकला औषध दिली आणि त्याच्या उशाशी बसून राहिली. पहाटे कधीतरी तिचा डोळा लागला. सकाळी जाग आली. तिने विवेकाला उठवलं पण तो झोपेतच त्यांना सोडून गेला होता. पुढचे सगळे दिवस ती आणि आई जिवंत असूनही, प्राण गेल्यासारख्या त्या भिंतीमध्ये राहत होत्या. कदाचित त्या भिंती एकमेकींशी जास्त बोलत असतील पण इथे मात्र श्वास घेण्याचाही आवाज नव्हता. तिच्याबरोबर येण्याच्या कल्पनेला आईने अर्थातच नकार दिला. ती तिथून निघाली ते परत न येण्यासाठीच. घराचं दार उघडं असलं तरी मनाचं दार तिच्यासाठी कधीच बंद झालं होतं.
अवधूतने विचारलेले प्रश्न नाकारता येणार नाहीत हे तिला माहिती होतं. प्रश्न इतकाच होता की किती खोलात जाऊन उत्तर द्यायची. विवेकची शेवटची भेट सांगताना, तिच्याही नकळत डोळ्यात पाणी दाटून आले तिच्या. बहुधा त्या दिवसानंतर परत आजच. मधल्या काळात तिला रडायला सुद्धा वेळ मिळणार नाही याची खबरदारी तिने घेतली होती. अवधूतला एक क्षण असं वाटलं मधली सगळी वर्ष गळून गेली आहेत आणि पूर्वीची तीच नंदिनी त्याच्यापुढे आहे. ऑफिसमध्ये जेव्हा तो नंदिनीला भेटला तेव्हा त्याला विश्वास बसत नव्हता. हीच का ती, कॉलेजच्या सगळया कार्यक्रममध्ये उत्साहाने भाग घेणारी, कधी कडकडून भांडणारी, कधी बिनधास्त आपली मते परखडपणे मांडणारी, कोणाच्याही मदतीला धावून जाणारी आणि मुख्य म्हणजे सतत आनंदी असलेली नंदिनी. तिच्या चेहऱ्यावरचं हसू पार गायब झालं होतं. माणसाचं हसणं बदललं की बहुधा माणूस बदलेला असतो. तिच्या चेहऱ्यावर हुशारीचं तेज आजही होतं पण भावना जणू नव्हत्याच. त्याला वाटत होत ऑफिस असलं तरी माणूस इतका वेगळा वागू शकत नाही. त्याला खोलवर कुठेतरी उगीचच वाटत होत, नंदिनी काहीही झालं तरी इतकी बदलणार नाही. जेव्हा नंदिनीच्या डोळ्यात विवेकविषयी सांगताना पाणी दाटून आलं, तेव्हा त्याला एका गोष्टीसाठी बरचं वाटलं. कारण याचा अर्थच नंदिनी अजूनही कुठेतरी, कधीतरी भावनेने विचार करत होती. माणूस म्हणून जगण्याचं लक्षणच नाही का भावना व्यक्त करता येणं किंवा निदान भावनांना वाट करून देणं. पूर्वी नंदिनीच्या डोळ्यातल्या पाण्याने अवधूतच जास्त कासावीस होत असे. आज तेच डोळ्यातलं पाणी त्याला कुठंतरी सांगत होतं सगळंच काही विरून गेलेलं नाही. नंदिनीने स्वतःला सावरलं. "अवधूत, तुला आईच्या मनात एवढी अढी का? याचं उत्तर मिळालं आता. माझ्या निघून जाण्याने आम्ही बाबांना गमावलं आणि मग विवेकला. आणि तिच्या दृष्टीने हा अक्षम्य गुन्हा आहे. त्याची तिने जन्मठेप दिली आहे मला." काही क्षण शांततेत गेले. अजूनही खऱ्या प्रश्नाला ते आलेच नव्हते. नंदिनीने अत्यंत हुशारीने त्या प्रश्नाला बाजूला ठेवले होते. प्रश्न असा होता की नंदिनीला जर शिष्यवृत्ती मिळणार होती तर तिला घरी सांगून जाता आलं असतं म्हणजे तिने निदान तसा प्रयत्न करायला काहीच हरकत नव्हती. निदान तिच्या घरच्यांना, अवधूतला ती कुठे आहे, काय करते आहे हे तरी कळलं असतं. आणि त्याहीपेक्षा अनाकलनीय होतं ते वडील गेल्यावरही नंदिनीचं घरी न येणं आणि मग चार वर्षानंतर येणं. अवधूत काही बोलणार एवढ्यात नानींच्या आवाजाने त्या दोघांना आपापल्या विचारांमधून बाहेर काढलं. त्यावरून अवधूतला आठवलं, "आणि ह्या नानी कोण? ह्या इथंच राहतात म्हणाल्या. कोणी नातेवाईक आहेत का?" नंदिनीला अवधूतचे हसू आले. त्याचे समाधान करणे अवघड आहे हे तिला माहितीच होते. "तुला सगळ्या प्रश्नाची उत्तर लगेच हवी आहेत? सांगते. नानी माझी नातेवाईक नाही. एका वृद्धाश्रमात भेटली. तिला मुलबाळ नाही. नवरा गेल्यावर एकटी पडली. तिला कोणी नाही, मलाही कोणी नाही. कसे माहिती नाही पण आमचे धागे जुळले. गेले दहा वर्ष घरातलं सगळं तिचं बघते. झालं समाधान? “नंदिनी मनापासून हसली. जे हसणं अवधूत शोधत होता आल्यापासून. इतकी वर्ष मध्ये गेली, नंदिनीने कुठलाही संपर्क ठेवला नाही, तरीही त्याला तिचा राग येत नव्हता. त्याहीपेक्षा जास्त तो दुखावला होता तिच्या वागण्याने. "नाही झालं समाधान. तू असं कोणाला अचानक घरी आणशील हे मी एक वेळ समजू शकतो पण तू असं अचानक मला सोडून का गेलीस? निदान मला सगळं सांगावं असं वाटलं नाही का तुला?" यावेळेस नानी नंदिनीच्या मदतीला धावून आल्या. दोघांना हाक मारून अजून जेवायला आले नाहीत, त्यामुळे नानी स्वतः बोलवायला आली. "अरे, गप्पामध्ये किती बुडून गेला आहात? जेवून घ्या. म्हणजे मला तरी आता भूक लागली आहे. आज किती दिवसांनी जेवायला बरोबर आहे कोणी. चला, एकत्र जेवू. म्हणजे चालणार आहे ना तुम्हाला दोघांना." "चल नानी. तुला जेवायला उशीर होईल.” अवधूत पण नाइलाजाने उठला.
नानींनी हौसेने सगळा स्वयंपाक केला होता. नानींना कोणाशीही जुळवून घ्यायला फारसा वेळ लागत नसे. त्यामुळे त्यांच्या आणि अवधूतच्या गप्पा छान रंगल्या. अवधुतचं लग्न झालं आहे आणि बायको, मुलं आहेत हे त्यांना या गप्पांमधूनच कळलं. नानी त्याला आग्रह करून जेवायला घालत होत्या. नंदिनीला मनातून बरेच वाटले. निदान अवधूत आल्यामुळे तरी नानीला कोणीतरी बोलायला मिळालं होतं आणि तेवढयाश्या गोष्टीने ती किती खुश झाली होती. अलीकडे नानी थकली आहे आणि तिच्याकडे इतक्या लक्षपूर्वक आपणही खूप दिवसांनी पाहतो आहे हे तिला जाणवलं. ती काही बोलत नाही म्हणून आपणही तिच्याकडे लक्ष देत नाही. इथून पुढे जमेल तसा निदान नानीसाठी तरी वेळ काढायला हवं, असं नंदिनीने ठरवलं. ," नंदिनी तुला काय वाढू ग? अगं संपलंच नाहीये तुझं?" अवधूत पण नंदिनीची चेष्टा करत होता, “तिचं डाएट असेल अगं. तू मला वाढ. मला घरचं आवडतं. मस्त झालंय सगळंच." नानीला भरभरून वाढायला मिळालं आणि अवधूतला इतक्या प्रेमाने वाढणार कोणी नंदिनीबरोबर आहे हे कळलं. नंदिनीला अवधूतला घरी येऊ देऊन आपण कुठेही चूक केली नाहीये असं वाटलं. वरवर जेवण आनंदात सुरु असलं तरी नंदिनी आणि अवधूत यांच्यामध्ये एक विलक्षण अस्वस्थ करणारी शांतता पसरली होती, न सापडलेल्या, न दिलेल्या उत्तरांची.
जेवण झालं, नानी झोपायला निघून गेली. नंदिनीने अवधूतचे मनापासून आभार मानले. त्याच्यामुळे आज नानीला इतका आनंद मिळाला. "अवधूत. मी नानीला कधी परकं मानलंच नाहीये. पण म्हणूनच कदाचित फार दुर्लक्ष केलंय. थँक यू. तुझ्यामुळे आज ती मनापासून जेवली." अवधूत म्हणाला, " आता हे आभार प्रदर्शन सुरु केलं आहेस म्हणजे मी इथून जावं असंच नाही का? पण मी जाणार नाहीये. मला अजून काही बोलायचं आहे आणि तू मगाशी न दिलेली उत्तरं हवी आहेत. “नंदिनीने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे उठून त्या दोघाच्या आवडीची गाणी लावली. नकळत त्यांना दोघांनाही पूर्वी एकत्र घालवलेले दिवस आठवू लागले. तसे तेव्हा ते सगळ्यांनाच फुलपाखरासारखे वाटत असतात आणि तरीही आपले वेगळे आहेत असंही वाटत असतं. खरंतर कोणीच काहीही बोलत नव्हतं पण त्या गाण्यांच्या लहरी त्यांना बांधून ठेवत होत्या. न बोलताही बरंच काही सांगून जात होत्या. अवधूतला वाटलं तिला वेळ हवा आहे. पण आता ही शांतता सहन न होणारी होती. "नंदिनी, तुझ्या इतकं सगळं लक्षात आहे तर का सोडून गेलीस? आता सगळं बदललं आहे. तरी एकदा सगळं सांग. निदान मला ह्या एका प्रश्नातून तरी मोकळं कर" "अवधूत, तेच तर. आता सगळं बदललं आहे. तुला उशीर होतोय. तुझ्यासारख्या संसारी माणसाने माझ्यासारख्या बाईकडे इतक्या उशिरापर्यंत थांबणं, बरोबर दिसणार नाही. तू घरी जा आता." अवधूतने आत्तापर्यन्त ठेवलेला संयम सुटला. त्याला फक्त उत्तर हवं होतं आणि तेही त्याचा विश्वास होता नंदिनीवर की, ती काहीही वेडंवाकडं करणार नाही. पण त्याला तिच्याकडून ऐकायचं होतं फक्त एकदा आणि त्याची तिच्याकडून कसलीच अपेक्षा नव्हती. नंदिनी त्यालाही टाळत होती. अवधूतचा आवाज चढला, “नंदिनी, तुझ्यासारख्या बाईकडे म्हणजे काय?” नंदिनीने तितक्याच शांतपणे उत्तर दिले, “म्हणजे चाळीशी उलटूनही लग्न न केलेल्या. इतरांच्या बघण्याचा दृष्टीकोन मी तुला सांगायची गरज नाही. तुला ते समजणं फारसं अवघड नाही." अवधूत उपहासाने हसला, "लोकांना काय वाटतं याची काळजी तुला कधीपासून वाटायला लागली. आणि माझी, माझ्या संसाराची काळजी मी घेईन. पण मला आज उत्तर हवं आहे. समजतंय तुला नंदिनी? इतके दिवस सहन केलाय मी तो प्रश्न. तू का पळून गेलीस अशी? तुझा माझ्यावर विश्वास नव्हता की स्वतःवर? तुझ्या घरची परिस्थिती मला माहिती होती ना? माझी ऍडमिशन दुसऱ्या गावाला झाली, तुझ्या पुढच्या शिक्षणासाठी पैसे नव्हते तुमच्याकडे, हे माहिती होतं मला. मी तुझ्या घरच्यांना सगळं सांग असंही सांगितलं होतं तुला. मग काय झालं? नंदिनी, लग्न ठरवलं होतं का तुझं? पण मग मला का नाही सांगितलंस? कुठे निघून गेलीस? आणि कुठली scholarship? माझा तुझ्या हुशारीवर पूर्ण विश्वास आहे. पण अशी अचानक कुठून मिळाली? आणि मग त्यात न सांगण्यासारखं काय होतं? का पळून गेलीस अशी? सांग ना." अवधूतला टाळण आता अशक्य होतं. “पळून गेले नव्हते अवधूत मी. कधीच जायचं नव्हतं पळून मला. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं आणि त्याआधी लग्न करायचं नव्हतं. जन्मल्यापासून मी घरात लाचारी बघत होते. माझ्यापेक्षा कमी मार्क मिळालेल्या अनेकांनी पुढे काही सुरु केलं होतं. फक्त scholarship मिळून माझ्या घरचे प्रश्न सुटणार नव्हते. आणि ते मलाच सोडवायला हवे होते. मला सगळ्यांना आनंदात पाहायचं होतं रे. तुला सांगून, तुझ्या खांदयावर माझं ओझं टाकणं, मला पटत नव्हतं. कळलंय तुला, आता का तुला सांगितलं नाही ते. माझ्यामते मी तुला उत्तर दिलय अवधूत." अवधूतने हसून खोट्या टाळ्या वाजवल्या. ," वा, नंदिनी राजाध्यक्ष. आपण फारच योग्य आणि पटेल असं उत्तर दिलंय. मी विसरलोच होतो की, मी माझ्यावर कधीतरी प्रेम करणाऱ्या नंदिनीशी बोलत नसून एक यशस्वी उद्योजिका नंदिनी राजाध्यक्ष यांच्याशी बोलत आहे. त्या त्यांना हवं तेवढं आणि हवं तितकंच उत्तर देणार. तरीही माझ्यासारख्या सामान्य माणसाला काही प्रश्न अजूनही पडलेले आहेत. माझ्यावर ओझं टाकू नये असं वाटणं जरी पटवून घेतलं तरी तू प्रश्न सोडवलेस कसे? तुझ्या वडिलांच कर्ज तू फेडलस हे कळलंय मला. तू कुठून मिळवलीस मदत? आणि तूला अमेरिकेला शिक्षणासाठी कुठली scholarship मिळाली? तेव्हा सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या नक्कीच नव्हत्या. नंदिनी राजाध्यक्ष, माझा अजूनही तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही कुठलही चुकीचं पाऊल टाकणार नाही, निदान त्यावेळी जेव्हा मी तुम्हाला ओळखत होतो." नंदिनी विचारात बुडलेली, टाळू म्हणून न टळलेलं, समोर आलंच शेवटी. अवधूत तरी आता सगळं ऐकून काय करणार होता? त्याला जेव्हा सांगायला हवं होतं तेव्हा तिने तिचे निर्णय घेतले होते. तिने अवधूतला जन्मभराची जखम दिली होती, एवढं मात्र नक्की आणि म्हणूनच आता इतक्या समोर आल्यावर हे सगळं सांगणं अपरिहार्य होऊन बसलं होतं, जरी त्यातून काही बदलणार नसलं तरी. तिलाही त्रास झालाच होता की पण तो तिचा निर्णय होता आणि तिला ती काय, कशासाठी करते आहे याची पूर्ण कल्पना होती. त्या बदल्यात तिने हा उच्च शिक्षण, व्यवसायाचा पसारा असं काही मिळवलं खरं पण मधल्या वर्षांमध्ये त्याबरोबरीनेच, माणसं हरवली आणि हा कोरडेपणा वाट्याला आला होता. तक्रार तरी कोणाकडे करणार?
त्या दिवसांमध्ये नंदिनीची खूप घालमेल होत होती. शेवटच्या वर्षाचे निकाल लागून, सगळे पुढच्या मार्गाला लागले होते. नंदिनी काय करणार हा प्रश्न होता तिच्यापुढे. वडिलांनी २-४ स्थळ आणली. नंदिनी दिसायला चांगली, हुशार, तरुण. त्यामुळे लग्न ठरायला, पैशाची दुबळी बाजू सोडली तर काहीच अडचण नव्हती. आणि तशातच एका ठिकाणहून होकार आला. नंदिनीने आई, वडिलांना लग्नाची तयारी नाही असं सांगतील. पण त्यांचं म्हणणं होतं, पुढचं शिक्षण लग्नांनंतर कर. त्यांच्यादृष्टीने एक जबाबदारी कमी होणार होती. नंदिनीचा जीव अवधूतमध्ये आणि पुढे स्वतःच्या पायावर उभे राहण्यामध्ये. आणि लग्न करून आधीच असलेल्या कर्जामध्ये भर घालणंही तिला पटेना. पण ती एकटी तरी कुठून आणणार होती पैसे? ती कितीतरी छोट्या नोकऱ्याच्या जाहिराती पाहायची, पण तिचं काही जमेना. जसा जसा वेळ जात होता, तशी तिला भीती वाटायची की आपण खरंच लग्न करून पुढे काहीच करू शकणार नाही. तिची स्वप्नही मोठी होती. तिला फूड प्रोसेसिंग मधेच काम करायचं होतं. पैश्याची एक बाजू सोडली तर लागणारी बुद्धी, करायला लागणारे कष्ट सगळ्यांची तिची तयारी होती. अनेक वेळा तिला अवधूतशी बोलावं असंही वाटलं पण तोही त्याच्या नव्या विश्वात. त्याला त्रास द्यावा असंही वाटेना तिला. आणि तशातच तिच्या हातात एक बातमी लागली.
अवधूतला स्वतःच्या बदललेल्या आवाजाची जाणीव झाली, "नंदिनी, आता तरी बोल. जरी काहीही बदलणार नसलं तरी किती दिवस आपण स्वतःला फसवत राहणार आहोत?" अवधूतच्या बोलण्याने नंदिनी विचारांमधून बाहेर आली. "अवधूत, तुझा माझ्यावर विश्वास आहे अजूनही? तुला खरंच असं वाटतं की मी काही...” "विश्वास नसता तर तुला भेटायला आलो नसतो आणि आलो असतोच तर तुझा फक्त राग आला असता. तुझ्या आईला भेटलो तेव्हा, त्या काही बोलल्या नाहीत. पण तुझ्यापेक्षा खरी जन्मठेप त्यांनी स्वतःलाच दिली आहे. तुला निदान तुझं हे विश्व आहे. त्यांच्याकडे काय आहे? त्यांना भेटून कुठेतरी असं वाटलं, तुला शोधलंच पाहिजे. तू इतकी माणूसघाणी नक्कीच नाहीस. ज्या नंदिनीला मी ओळखतो, ती कोणासाठीही मदतीला धावून जाणारी आहे. तू काहीही सांगितलंस तरी माझी ऐकायची तयारी आहे." नंदिनीला अवधूतच कौतुक वाटलं. तिला वाटलं, कधीकाळी तिने योग्यच व्यक्तीवर प्रेम केलं होतं. इतक्या वर्षांनंतर कोण कोणावर इतका विश्वास टाकतो? आणि तेही असं नातं तोडून निघून गेल्यावर. "अवधूत, तुला सरोगेट मदर बद्दल काय माहिती आहे?" अवधूत आश्चर्याने नंदिनीकडे बघत राहिला. "काय? सरोगेट मदर?" "आज इतक्या वर्षांनंतरही तुला धक्का बसतो आहे. तुला उत्तर हवं होतं ना? मी काय केलं? शिष्यवृत्ती कशी मिळाली? कर्ज कसं फेडलं? पेपरमध्ये बातमी वाचली. नंबर मिळवला. खूप खटपटी करून, सगळे सोपस्कार पार पाडून मग मी तो निर्णय घेतला. आणि हे सगळं पार पडेपर्यंत कसलीच खात्री नव्हती. तरीही मला ती रिस्क घ्यायची होती. त्याबाबतीत मला जसं हवं तसं नशीब साथ देत होतं. मी सरोगेट मदर झाले. यामध्ये मी काहीही चुकीचं करत नव्हते आणि माझी पैशाची गरज भागणार होती. मला घरातल्या लाचारीचा कंटाळा आला होता. विवेक, आई, बाबा सगळ्यांना आनंदात ठेवायचं होतं. पण त्यांना हा निर्णय पटला नसता. त्यामुळे मला कुणालाही न सांगता, घर सोडून जाण्यावाचून पर्याय नव्हता. अवधूत हे ऐकून सुन्न झाला होता. अवधूतला नंदिनीच्या धाडसाचे कौतुक करावं की हे सगळं कुणाचाही सोबतीशिवाय करणं खरंच गरजेचं होतं का हे विचारावं, या संभ्रमात. "नंदिनी, तू एकटीने हे सगळं कसं केलंस? कुठून आणलस एवढं धाडस?" जी गोष्ट आजही इतक्या वर्षांनंतर सुद्धा फारशी रुळलेली नाही, ती नंदिनीने तेव्हा एकटीने निभावली. आता मात्र इतका वेळ दाबून ठेवलेली घुसमट, दुःख, अश्रू असा सगळा कल्लोळ नंदिनीच्या डोळ्यातून सैरावैरा वाहायला लागला. कित्येक वर्ष आतल्या आत सहन केलेली जखम आता वाहायला लागली होती. इतक्या वर्षांचं ओझं आज उतरलं होतं. "मला वाटलं होतं की मी २-३ वर्षांत परत येईन आणि मग सगळं नीट होईल. आईबाबा रागावतील पण, त्या २-३ वर्षात मी त्यांना पैशानी मदत करेन, विवेकला चांगली treatment मिळेल. मला माझी स्वप्न पूर्ण करता येतील. पण बाबा टिकलेच नाहीत रे तितके. माझं चुकलं अवधूत. मी गृहीत धरलं. मला त्यांच्या भावनांचा अंदाज बांधता नाही आला. इतका धक्का बसेल आणि त्याचे असे परिणाम होतील असं मला खरंच वाटलं नव्हतं. बाबा गेले तेव्हा मी आले नाही म्हणालास ना तू? कशी येणार होते मी? आणि काय सांगणार होते सांग? आणि आले तेव्हा विवेकही सोडून गेला. आई असून माझी राहिली नाही. तिचा तरी काय दोष? मी हरले रे. सगळं मिळवूनही हरले." अवधूतलाही काय करावं समजेना. त्याने नंदिनीला थोपटलं. काही वेळा शब्दांनी बोलणं कठीण होत पण स्पर्श भावना सहज पोचवतात. "सांग अवधूत, तुला हे सगळं आधी सांगितलं असतं तर, तू करू दिलं असतंस? नाही ना?" "शांत हो नंदिनी. मागे जाऊन काही बदलणं तुला किंवा मला आता शक्य नाहीये. त्या जर-तरला काही अर्थ नाहीये. तू चुकीच्या गोष्टी केल्या नाहीयेस. फार कमी लोकांकडे वेगळं तरीही योग्य काही करण्याचे धाडस असतं. अजून स्वतःला किती त्रास करून घेशील? “नंदिनी थोडी सावरली तरी डोळ्यातलं पाणी काही थांबेना.
दोघांच्या चढलेल्या आवाजाने नानीला जाग आली आणि ती पाहायला आली. तिच्या कानावर सगळंच पडलं होतं. नंदिनीची अवस्था तिला बघवेना. तिने न बोलता सगळ्यांसाठी कॉफी केली. नानीला पाहून दोघांना आश्चर्य वाटलं, "नंदिनी, ऐकलंय मी सगळं. निदान साचलेलं वाहून तरी गेलं आहे आज. आता मोकळा श्वास घे. अवधूत, तुझे आभार मानून तुला परकं करायचं नाही पण या माझ्या लेकीला आज पहिल्यांदा मी मोकळेपणाने रडताना पाहिलं आहे. मला माहिती आहे ना, जी माझ्यासारख्या काहीही नातं नसलेल्या बाईला घरी आणते, प्रेमाने सांभाळते, ती आपणहून स्वतःच्या माणसांना दुरवणार नाही." तिथे एक वेगळीच शांतता पसरली. भूतकाळ बदलता येत नाही आणि भविष्यकाळ ठरवता येत नाही. समोरचा क्षण तेवढा खरा. हाच त्या शांततेचा आवाज होता. त्या तिघांपेक्षा हे कुणाला समजणार नव्हतं कि कुठले बंध आहेत हे. काही नाती अशीच असतात ज्याला काही नाव नाही पण अगदी जवळची असतात.
बंध
Submitted by _तृप्ती_ on 31 December, 2019 - 23:56
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
भावनांची उत्तम मांडणी
भावनांची उत्तम मांडणी
सुंदर कथा.
सुरेख जमलीय कथा
सुरेख जमलीय कथा
कथेची मांडणी चांगली आहे.
कथेची मांडणी चांगली आहे.
सई ताम्हणकर आणि भार्गवी चिरमुलेची सिरीयल होती - अनुबंध. सेम विषय सरोगेट मदर.
@सुबोध खरे, @मनीम्याव,
@सुबोध खरे, @मनीम्याव, @सस्मित अभिप्रायाबद्दल मनापासून आभार.
@सस्मित, अनुबंधचे काही भाग पाहिले आहेत.
सुंदर मांडलीये कथा!!
सुंदर मांडलीये कथा!!
रोचक आहे!
रोचक आहे!
कथा छान आहे. पण फार जास्त
कथा छान आहे. पण फार जास्त लांबवल्यासारखी वाटली.
कथा फार मस्त फुलवली आहे
कथा फार मस्त फुलवली आहे.वेगळाच विषय आहे.
खुप सुंदर कथा
खुप सुंदर कथा
सुंदर कथा!
सुंदर कथा!
ॲमी, अजिंक्यराव पाटील, सामो,
ॲमी, अजिंक्यराव पाटील, सामो, भिकाजी, अज्ञातवासी, कथा वाचून अभिप्राय दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !
@अजिंक्यराव पाटील, तुमच्या मताचा विचार करून बघते. असेच मोकळेपणाने मते कळवत रहा आणि मुख्य म्हणजे वाचत राहा म्हणजे मला पुढे लिहायला मजा येते
वेगळ्या विषयावरची कथा छान
वेगळ्या विषयावरची कथा छान रंगवली आहे!
जमलीये. आवडलीपण!
जमलीये.
आवडलीपण!
छान आहे कथा ...आवडली. पुलेशु.
छान आहे कथा ...आवडली. पुलेशु.
स्वाती २, Akshay, जेम्स बॉण्ड
स्वाती २, Akshay, जेम्स बॉण्ड, अभिप्रायाबद्दल खूप आभार !
कथा चांगली आहे पण फार मोठी
कथा चांगली आहे पण फार मोठी आहे.