हे पुणेरी भाषेचं प्रकरण काय आहे? मला माहिती असलेल्या पुण्यात फक्त पुण्यापुरतीही प्रमाण भाषा नाही. महाराष्ट्राचे राहूच द्या.
शुक्रवार पेठेत राहात असताना आमच्या प्रमोदबनमधे एक मराठी होती. समोरच्या पारेकर टेलरच्या दुकानात एक वेगळी मराठी होती. त्याहून वेगळी समोरच्या वस्तीतली होती. रात्री येडा अप्पा (वेडा नव्हे. येडाच) दारू पिऊन यायचा आणि रस्त्यावर मधोमध बसून अभंग म्हणत दुनियेला शिव्या द्यायचा. त्याच्या शिव्या पण वारकरी ढंगाच्या होत्या.
समोरच्या वस्तीत पुण्याच्या ग्रामीण भागाचा हेल होता. हाय, नाय वगैरे असायचं पण मला आठवतंय त्याप्रमाणे आमची कांताबाई, तिची पुष्पा कधीही साडी "घालायच्या" नाहीत. नेसायच्याच. त्यांच्या ग्रामीण मराठीतही होती दोन वेगळी क्रियापदं.
जवळच्या नातेवाइकांच्यात वेगवेगळी मराठी. आईचे वडील; बापू मूळचे कोकणातले, दादरला वाढलेले नंतर आयुष्य सदाशिव पेठेत राह्यलेले. जेवायला वेळ लागला, बाकीचे उठून गेले की ते म्हणायचे "मागासलीस तू!" मला अजून हसायला यायचे आणि मग जेवायला अजून वेळ लागायचा. त्यांच्याशी बोलताना उलथने की काविलथा हा घोळ असायचाच. वाक्याच्या शेवटी हो लावायची खास त्यांची पद्धत. म्हणजे "अमुक कर हो!" वगैरे. मावशी आणि क्वचित आईही हे 'हो-अंत' प्रकारचे बोलत असत.
सुधाआजी; माझ्या वडिलांची आई ती वाक्याचा शेवट हो ने करत नसे. तिच्या आधीच्या काही पिढ्या बहुतेक पुण्यातल्याच. बोलणे थोडे घाईघाईचे असे. पण ते खास सुधाआजी फिचर पण म्हणता येईल. तिचे तिन्ही मुलगे म्हणजे बाबा आणि माझे दोन काका आज एकत्र असतील तर तीन वेगळ्या रिदमचे, तीन वेगळ्या प्रकाराचे मराठी ऐकू येईल.
हे झालं घरातलं. थोडी शिंगे फुटल्यावर पुणेभर उंडारणे सुरू झाले. पुलापलिकडच्या कॉलेजात जाऊ लागले. एरंडवण्यातल्या लोकांचे नाजूक साजूक मराठी ऐकून जरा दडपणच वाटले. म्हणजे "शिंगे फुटल्यावर उंडारणे" असे जे पेठेत म्हणत तसे म्हणणे हे पुलापलिकडे "सो मिडलक्लास"(माया साराभाईसारखे म्हणा) म्हणून बघितले जात असावे. तन्मय-चिन्मय मराठी ही या नाजूक एरंडवणे मराठीचीच पुढची पिढी.
पेठेतून पुलापलिकडे जायचे वेगवेगळे मार्ग. एका मार्गात दत्तवाडी पानमळा वगैरे लागतो. "तर ना एड्या काय सांगू तिथली मराठी राव! आपल्या टपोरीपणाशी एकदम जवळची ना एड्या!"
शिंगे फुटून स्थिरस्थावर होता होता कसबा पेठ, बोहरी आळी, गंज, भवानी, रविवार वगैरे पेठा फिरणेही सुरू झाले होते. तिथला ठसका वेगळा. चार वाक्ये बोलल्यावर लग्गेच कळणार बेणं कसब्यातून आलंय ते. मंडई आणि आसपासच्या रविवार, शुक्रवार, बुधवार वगैरेंमधे पुण्याच्या आसपासच्या ग्रामीण भागाचा संपर्क भरपूर त्यामुळे तिथली भाषाहि असायचीच त्यात. किंवा निदान तो ढंग तरी.
बुधवार, रविवार, गंज, भवानी वगैरे व्यापारी पेठांमधे असंख्य गुजराथी वा मारवाडी वा बोहरी व्यापारी आहेत. बरेचसे पेशव्यांच्या काळापासून आहेत त्यामुळे ते सगळे मराठीच बोलतात. तेही जुन्या मराठी सिनेमातल्या पगडी घातलेल्या, मारवाडी सावकारासारखे बोलत नाहीत. ते त्या भागाच्या खास लहेजाचेच मराठी बोलतात.
क्याम्पातले मराठी.. हो क्याम्पात गेल्यावर आपण हिंदी मोडमधे नाही गेलो तर पूर्वी दुकानदार मराठी बोलायचे. तर वंडरलॅण्डमधला कापड दुकानदार सरदार आहे त्याच्या दुकानातले सगळे सरदार मराठी बोलू शकायचे. थोडं मिक्स होतं पण होतं.
अजूनही एरंडवणी मराठी आणि पेठी मराठीमधे फरक आहे. अजूनही वरती सांगितलेले मराठीचे वेगवेगळे रंग पुण्यात आहेत. एवढेच नव्हेत तर आणखीही असतील. पुण्याबद्दल आकस काढून टाकून, उजमेखून ऐकले तर ऐकूही येतील.
बघा काय जमतंय ते. नाहीच तर पुणेरी म्हणत पिंका मारणं सोप्पंच आहे.
- नी
मस्त जमलंय हो, नीधप.
मस्त जमलंय हो, नीधप.
मस्त! थोडं अजून सविस्तर
मस्त! थोडं अजून सविस्तर लिहायचं होतं की! 'तन्मय चिन्मय मराठी' आवडलं.
माझ्या बहिणीच्या घरासमोरच्या बिल्डिंगमध्ये वरच्या मजल्यावर एक राधेय नावाचा लहान मुलगा रहायचा. तिसरी-चौथीत असेल. त्याचा एक मित्र त्याला रोज खालून हाक मारायचा, '" ए राधेssय, खेळायला येतोssस का? " राधेय हे नाव आणि ती हाक ही खास तन्मय चिन्मय मराठी होती
भारी जमलंय एकदम!!
भारी जमलंय एकदम!!
मस्त! थोडं अजून सविस्तर
मस्त! थोडं अजून सविस्तर लिहायचं होतं की!.......+111
मस्त लिहीलंय, नी! खूप
मस्त लिहीलंय, नी! खूप दिवसांनी दिसलीस.
ए राधेssय, खेळायला येतोssस का? >>> आमच्या इथे असा एक प्रद्युम्न होता. हाकेचा प्रकार डिट्टो.
मस्त लिहीले आहे! आवडले आणि
मस्त लिहीले आहे! आवडले आणि सहमतही!
तन्मय चिन्मय मराठी म्हणजे काय
तन्मय चिन्मय मराठी म्हणजे काय ते कळलं नाही. आमच्या ऑफिसमधली एक मुलगी स्वच्छ, शुद्ध आणि स्पष्ट मराठी बोलते, तिला सगळे विचारतात तू पुणेरी आहेस का आणि पेठी आहेस का. पुण्यात जास्त न राहिल्यामुळे बाकी काही माहिती नाही भाषेबद्दल. एक सांगायचं राहिलं, आम्ही रिक्षात बसून जातो तर माझी वहिनी रिक्षेत बसून जाते
आहे का आता... पुणेरी म्हणलं
आहे का आता... पुणेरी म्हणलं तर पिंका मारल्या म्हणून आम्ही बदनाम... और वो कत्ल भी करते है तो चर्चा नही होता....
आमच्या इथे असा एक प्रद्युम्न
आमच्या इथे असा एक प्रद्युम्न होता. हाकेचा प्रकार डिट्टो. >> बरं, पाचवी-सहावी नंतर सेलफोन असले तरी ह्या हाका कमी होत नाहीत.. आणि उलट हाका सहसा जात नाहीत. म्हणजे नेहमी प्रद्युम्नला पॅरोल मिळायला हाकेची गरज पडते. आणि जो कोण तन्मय चिन्मय असतो तो मात्र अगदी घड्याळ लावावं इतक्या निष्ठेने चार वाजता ओरडतो. त्याची हाक नाही ऐकू आली की आया चिन्मयच्या आईला टेक्स्ट "तापलाय का ग?". जसं काही हो म्हणलं तर मुक्ताबाईसारख्या ह्या चिन्मयच्या पाठीवर मांडे भाजणार...
सी
सी
सीमंतिनी
सीमंतिनी
आणि उलट हाका सहसा जात नाहीत.
आणि उलट हाका सहसा जात नाहीत. म्हणजे नेहमी प्रद्युम्नला पॅरोल मिळायला हाकेची गरज पडते. आणि जो कोण तन्मय चिन्मय असतो तो मात्र अगदी घड्याळ लावावं इतक्या निष्ठेने चार वाजता ओरडतो>> होय होय
पुणेकरांची मराठी ही
पुणेकरांची मराठी ही पुणेकरांचीच मराठी असते.
ते ती कशीही बोलले तरी चालत पण आपण चुक केली की लगेच भाषेच पुस्तक काढतात.
बघा काय जमतंय ते. काहीही हा
बघा काय जमतंय ते. >>>> काहीही हा नी
नाहीच तर पुणेरी म्हणत पिंका मारणं सोप्पंच आहे. >>>> हेच काय ते खरं
मस्त लिहीलंय..
मस्त लिहीलंय..
थोडं अजून सविस्तर लिहायचं होतं की! ' +११११
सीमंतिनी,
सीमंतिनी,
पुण्यात 'असणार-नसणार-बसणार
पुण्यात 'असणार-नसणार-बसणार-घासणार-पुसणार' ला अशणार-नशणार-बशणार-घाशणार-पुशणार का म्हणातात हे एक न उलगडलेलं कोडंच आहे.. हे असे उच्चारण वरण(गोडं बरं का..!)-भातावर जास्त तुप पडल्यामुळे होत असावं का..?
तुप पितात म्हणे ती लोक किंवा
तुप पितात म्हणे ती लोक किंवा भाकरवडी तुपात बुडवुन खात असतील
चपाती ला पोळी पुण्यातच
चपाती ला पोळी पुण्यातच म्हणतात.
जे जे उत्तम उदात्त उन्नत
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधूर ते ते
सगळे असे पुणेरी ते
अशी अखिल महाराष्ट्राची भावना झाली असल्यास तुम्ही काय करणार नीधपतै. असूदे ना.
मे जेंव्हा नुकताच वाई- पुण्याहून मुंबईला आलो होतो तेंव्हा मला माझे मुंबईचे मेहुणे तू फार शुद्ध मराठी बोलतोस अस म्हणायचे. मुंबईच्या लोकांच एक ठिक आहे, त्यांच्या सायनला कुणी शीव म्हणले तर त्यांच्या अंगावर काटा येणारच ना.
मस्त लिहिलंस, आवडलं.
मस्त लिहिलंस, आवडलं.
थँक्स ऑल!
थँक्स ऑल!
थोडं अजून सविस्तर लिहायचं होतं की! <<
इतकंच सुचलं सध्या. बघू वाढवेन पुढे वाटलं तर.
>> 'तन्मय चिन्मय मराठी' आवडलं. << फेबु वर फेमस आहे ही फ्रेज सध्या.
रू, तशी हाक आल्यावर राधेयच्या आईने तो अभ्यासाला बसलाय असे सांगितले की समजावे प्रकार बोर्डू आहे.
सी
काहीही हा नी<< लगेच प्रत्यय आलाच.
विकाका,
मुंबईच्या लोकांच एक ठिक आहे,
मुंबईच्या लोकांच एक ठिक आहे, त्यांच्या सायनला कुणी शीव म्हणले तर त्यांच्या अंगावर काटा येणारच ना. >>>> हे म्हणजे मी कळ काढणार आणि माझी कळ काढली तर भोकांड पसरणार!
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय
पुण्याची अशी एक प्रमाण मराठी
पुण्याची अशी एक प्रमाण मराठी आतां राहिली नाहीं, हें एकदम मान्य. पण त्यावरून तशी एक वैशिष्ट्यपूर्ण प्रमाण मराठी पुण्यात कधीं नव्हतीच , असा निष्कर्ष खरंच काढतां येईल का ? तशी पुणेरी पगडीही आतां पुण्यात दुर्मिळ झाली असली तरी ' पुणेरी पगडी' असं कांहीं नसतंच, असं तर नाहीं ना म्हणतां येणार.
आणि, खरंच 'पुणेरी मराठी ' म्हणणं फक्त आकसापोटीच होतं व असतं कीं, केवळ वैशिष्ठ्य अधोरेखित करण्यापुरतं ?