अन्न, स्त्रीवाद आणि मी (मूळ लेखिका आर्किटेक्ट शीतल पाटील)

Submitted by अतुल. on 28 September, 2019 - 02:15

संस्कृतीच्या नावाखाली हजारो वर्षांचा लेप मनांवर बसला आहे. मनं अधू झाली आहेत. असंवेदनशील झाली आहेत. इतकी असंवेदनशील कि रांधा, वाढा, खरकटी काढा हि स्त्रियांची कामेच आहेत, यात बदलण्यासारखे काय आहे? असा कोडगा व निलाजरा प्रश्न सहजगत्या विचारला जाऊ शकतो. अनेक ठिकाणी स्वत: त्या स्त्रीला सुद्धा याची जाण नसते. मानसिक गुलामगिरी सारखा दुर्दैवी प्रकार नसेल. नांगराच्या शोधानंतर निर्माण झालेली जमिनीची मालकी. त्यासाठी पुरुषांच्या हाणामाऱ्या. ती मालकी पुढे नेण्यासाठी वंश नावाचा प्रघात. व त्यातून पुढे निर्माण झालेला स्त्रियांवरचा मालकीहक्क. असा हा स्त्री-पुरुषांतील सामाजिक समतोल ढासळलेला प्रवास आहे. आणि संस्कृती नावाच्या प्रक्रीयेखाली हि गुलामगिरीची पुटं मनांवर शिस्तबद्धपणे चढवली आहेत. हा जाडजूड लेप खरवडून निघून एक व्यक्ती म्हणून स्त्रीकडे पाहायला शिकण्यासाठी अजून कित्येक वर्षे जातील माहित नाही. पण त्यासाठी आधी जी जाणीव व्हायला हवी ती होणे महत्वाचे आहे. माही मैत्रीण शीतल पाटील हिच्या लेखातून हि जाणीव निर्माण करण्याचा व मनांवरील हि पुटं काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला गेलाय. समतोल समाजव्यवस्था निर्माण होण्यासाठी असे विचार समाजाच्या सर्व स्तरांत झिरपवण्याची नितांत गरज आहे. याच भावनेतून व तिच्या परवानगीने हा लेख इथे देत आहे (खाली मूळ लेखाची लिंक सुद्धा आहे).
------------------------------------------------------------------------------------

अन्न, स्त्रीवाद आणि मी

गात दोन प्रकारची लोकं आहेत असं म्हणतात - एक जे खाण्यासाठी जगतात आणि दुसरे - जगण्यासाठी खातात.मी एक सामान्य भारतीय स्त्री आहे आणि तरीही, जरा चवीत बदल किंवा दुधात मिठाचा खडा म्हणूया - मी दुसर्या प्रकारात मोडते . जगण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट (read, necessary evil) इतकाच माझा आणि खाण्याचा संबंध. मी आता जे लिहिणार आहे ते केवळ कॅथार्सिस सारखं काहीतरी असणार आहे, पण हे कधीतरी करायला हवंच होतं तेंव्हा....

गोष्टीची सुरुवात करायची तर सुरुवातीपासूनच करायला हवी! त्यासाठी साधारण चार लाख वर्षं तरी मागे जायला हवं. अवघ्या चराचरात होमोनिड कुटुंबातील होमो इरेक्टस हा प्राणी कृत्रिमरित्या अग्नी निर्माण करायला आणि हाताळायला सगळ्यात आधी शिकला. ही मानववंशीय प्रजातींच्या बौद्धिक क्षमतेची पहिली ठिणगी. त्यातूनच मग अंधारलेल्या गुहे मध्ये हवं तेंव्हा हवा तेवढा प्रकाश आणि ऊब मिळवता येऊ लागली असेल. त्याने निबिड अरण्यात जगणं बरंच सुसह्य झालं असावं.

मुळात Hunter gatherer असलेल्या माणूस नावाच्या प्राण्याची अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जेंव्हा निसर्गाशी दोन हात करण्यात आणि सतत च्या स्थलांतर करण्यात खूप शक्ती खर्ची पडू लागली तेंव्हा त्याच्या मादीने पिल्लं जगावी म्हणून गुहेत राहून शेतीचा प्रयोग करून बघितला. त्या प्रयोगाची फळं मिळायला लागल्यावर तो हळू हळू स्थिरावायला लागला. आणि इथेच स्त्रीच्या अधोगतीची बीजं –“संस्कृती” नावाच्या कसदार जमिनीत रुजली, वाढली, फोफावली. मूल हे स्त्री पुरुष संबंधांतून जन्माला येतं इतकं तोवर माणसाला कळायला लागलेलं होतं. पण स्त्रीला होणारं मूल नक्की कुठल्या पुरुषाचं आहे हे कळपात राहणार्‍या त्या बिचार्‍या प्राण्याला कळायला मार्ग नव्हता. (तेंव्हा DNA tests चा शोध अजून लागायचा होता अर्थातच.) त्यामुळे, कष्टाने मिळवलेली जमीन पुढच्या पिढीकडे सोपवायची तर समोरचं मूल आपलं आहे ह्याची खात्री तर असायला हवी नं ? मग आता हा पेच सोडवायचा कसा ? तर स्त्री इतर कुठल्याही पुरुषाशी संबंधच ठेऊ शकणार नाही अशी काहीतरी युक्ती करायला हवी होती. संबंधच काय तर इतर पुरुषांच्या संपर्कातही ती येऊ नये अशी चोख व्यवस्थाच करायला हवी होती.त्यासाठी एक फार धूर्त योजना आखण्यात आली, ती म्हणजे विवाह संस्था ! आणि अश्या तर्‍हेने अत्यंत स्वयंपूर्ण, सक्षम, स्वायत्त, स्वतंत्र आणि सबळ असलेली स्त्री ही अक्षरशः पुरुषाच्या दावणीला बांधण्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली . त्यातून मनुष्यबळ निर्मितीचा कारखानाच घरच्या घरी मिळाला वर जमिनीच्या वारसा हक्काचा प्रश्नही आपसूक मिटला. जश्या गोठ्यात गाई तशी घरात बाई !

आता ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला सहज लक्षात येईल की अग्नी, शेती आणि विवाह ह्या तिन्हींच्या संयोगाने मानवाच्या मादीचं विश्व बदलून स्वयंपाकघर नावाच्या खोली पुरतं सीमित झालं आणि जीवंत राहण्यासाठीची मुलभूत गरज असलेला साधा अन्न नावाचा घटक पाककला नावाच्या अती क्लिष्ट आणि वेळखाऊ उपद्व्यापात अडकला .

तेंव्हा अन्न आणि स्त्रीवाद हा अस्तित्वाच्या गाभ्याशी जाऊन भिडणारा विषय न होता तरच नवल .
अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या मुलभूत गरजा असल्या तरी आता ह्या तीनही गोष्टी अविश्वसनीय वाटाव्या इतक्या प्रमाणात बदलेल्या आहेत. आता त्या गरज ह्या संज्ञेला ओलांडून कधीच एका अत्यंत स्फोटक अश्या संस्कृती नावाच्या वेष्टनात गुंडाळल्या गेल्या आहेत .पुरुष धार्जिणी संस्कृती निर्माण करण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी कराव्या लागणार्या शोषणाची अत्यंत वस्तुनिष्ठ व्यवस्थाच निर्माण केली गेली. ती व्यवस्था एकाच वेळी अनेक पातळ्यांवर कार्यरत होती, अजूनही आहे . त्यामुळे अन्न आणि स्त्रीवाद हा विषय म्हणजे एक तीन पायाची शर्यत आहे . तो खरंच समजून घ्यायचा असेल तर स्त्री आणि अन्न ह्या दोन विषयांची जन्माची पडलेली गाठ सोडवून त्यांना तटस्थपणे वेगवेगळ करून बघता यायला हवं . हा झाला larger point of view. Larger premise.

पूर्वीच म्हणल्या प्रमाणे मी जे लिहितेय ते माझ्यासाठी कॅथार्सिस सारखं काहीतरी आहे But I also believe, the more personal you write , the more universal it becomes. And the first step you can take towards changing your story, is to tell your story. So, अत्यंत खाजगी किंवा व्यक्ती, ह्या पातळीवर चिकित्सा करायला गेलो तर अन्न हा अतिशय over rated, time and energy consuming प्रकार वाटतो मला.त्यातही स्त्री असल्याने अन्न शिजवणे किंवा स्वयंपाक ह्या विषयाशी माझं कळत्या वयापासून love-hate relationship होतं असं आता मागे वळून बघताना मला जाणवतं. I loved to hate food (&/or cooking) and Hated to have to love food (&/or cooking). अगदी लहान असताना पासून मी घरातल्या स्त्रीयांना चुली जवळ तासंतास हाडाची काड करताना बघत होते आणि इतकं करून जे पानात वाढलं जायचं ते मोजून १०-१५ मिनिटात घरातली मुलंबाळ कर्ते पुरुष फस्त करून आपापल्या कामाला लागलेले असायचे आणि बायका पुन्हा अनेक तास उष्टी खरकटी भांडी स्वच्छ करण्यात घालवायच्या . त्यातून बाहेर पडत नाही तोच पुढ्या जेवणावळीच्या तयारीला बिचार्या लागलेल्या असायच्या.मोठं झाल्यावर आपल्यालाही हेच करायला लागणार आहे की काय ह्याचा धसका माझ्या बालमनाने घेतला होताच आणि ह्यातून काहीही झालं तरी आपण आपली सुटका करून घ्यायलाच हवी तरच काही खरं आहे; हे सतत स्वतःला बजावत राहिले.माझं स्वतःचं aptitude गृहकृत्यदक्ष सुगरण वगैरे स्त्री असण्याचं नव्हतं आणि घरातल्यानीही फार मला त्या साच्यात बसवायचा प्रयत्न केला नाही . त्यांनी एक दोनदा सांगून बघितलं असेल इतकंच पण फार काही मला कुणी “सासरी गेल्यावर आमचा उद्धार करशील” ह्या सबबीखाली जाच केला नाही. त्यात अभ्यासात बर्यापैकी प्रगती होती तेंव्हा त्यांनी मला माझ्यावर सोडून दिलं, त्यांच्या ह्या ऋणात मी आजन्म रहायला तयार आहे .

माझी आई उत्तम स्वयंपाक करायची पण त्याहून उत्तम जर काही तिने आमच्या भरणपोषणा साठी केलं असेल, तर तिने वाचन ह्या प्रकाराचे संस्कार आमच्यावर न बोलता, तिच्या वागण्यातून नकळत केले. आमच्या घरात पुस्तकांच्या चळती सतत लागलेल्या असायच्या . स्वयंपाक जेवणं आवरली की आई कायम हातात कुठलं न कुठलं पुस्तक घेऊन बसलेली असायची. तिला मी कधीही शेजारी पाजरी जाऊन कुणाशी उगाचच गप्पा मारत बसलेली बघितलं नाही. कधी कधी तर ती एखादं engaging पुस्तक वाचत असेल तर स्वयंपाक देखील झटकन आवरून जवळ जवळ पळत जाऊन पुस्तक घेऊन बसत असे.

मला हे एक तिचे खूप आवडे . तिच्या स्वयंपाकापेक्षा मला तिचं हे , स्वतःच्या वाचना साठी लागणारा वेळ आणि अवकाश संसाराच्या व्यापातून मिळवण्यासाठी धडपडणं, फार लोभस वाटत असे आणि आदर्शही. ती तिच्याच पुस्तकांच्या जगात इतकी रमलेली असे की आमच्यावर उगाचच बाकीच्यांच्या आया करतात तशी चौकीदारी किंवा आईगिरी तिने कधी केली नाही . ह्यावर अती दक्ष आया कदाचित भुवया उंचावतील पण त्यामुळेच खरंतर आमचे आम्ही निर्णय घ्यायला आणि त्या निर्णयांची जबाबदारी घ्यायला शिकलो . याहून मोठं शिक्षणाचं प्रयोजन ते काय असेल??!!

आईचा स्वयंपाक minimalist म्हणता येईल ह्या categoryत मोडायचा. ती उगाचंच कधी स्वयंपाकघरात तासंतास घालवत बसत नसे. साधं सुटसुटीत पण व्यवस्थित पोट आणि मन भरेल असा स्वयंपाक ती करत असे आणि त्याचाही फार गवगवा करत नसे. स्वतःच्या पाक कौशल्याचा वापर तिने कधीही आम्हाला emotionally blackmail करायला अथवा स्वतःचा ego satisfy करायला केला नाही . हे फार महत्वाचं mental training मला घरबसल्या त्यामुळे मिळालं. अन्ना कडे बघण्याचा अलिप्त भाव त्यामुळेच आपोआप विकसित होत गेला. अन्न शिजवणे हा जगत राहण्यासाठीचा महत्वाचा भाग असला तरी तो आपल्या जगण्याचं प्रयोजन होऊ शकत नाही, होऊ नये, ह्याचं भान मला खूप लहानपणीच आलं होतं. त्यामुळे खाण्याच्या चवीपेक्षा त्याचं पोषण मूल्य तपासायला शिकले . जितका वेळ आणि शक्ती एखादी पाक कृती करायला लागते त्या प्रमाणात त्याचा उपयोग आपल्या शरीराला होतोय का ह्याचा ताळमेळ आपोआप मनात लागायला सुरु होत असे.

त्यातूनच नको त्या फापट पसार्यातून मोकळं होऊन शरीरास जे उपकारक ते स्वीकारणे आणि अपायकारक ते नाकारणे हे आपोआप घडायला सुरुवात झाली. मला कधीही कुठल्याही तळलेल्या किंवा चटपटीत किंवा गोड पदार्थांचं so called craving, instinctively सहसा होत नाही . त्यामुळे ठरवून diet (control) वगैरे प्रकार आजवर कधीही करायला लागले नाहीत. शरीरंच व्यवस्थित मार्गदर्शन करायला लागलं काय खायला हवं नको ते. शरीराचं ऐकलं तर मनाच्या स्वैर वागण्याला आपसूक चाप बसतो. आणि चवीचं म्हणाल तर ते बरंचसं mental construct आहे आणि त्यामुळेच फारच subjective आहे असंही मला हल्ली वाटायला लागलंय.

म्हणजे प्रत्येकाला आपल्याच आईच्या हातच्या आमटी किंवा वरणाची चव लक्षात असते, आवडते. मला माझ्या हातच्या आमटीची चव अजीबातच आवडत नाही पण माझ्या मुलांना मात्र ती फार आवडते. तर त्यात त्या आमटी पेक्षा ती मी केलेली असते हे त्यांना माहीत असेल तर त्यांच्या दृष्टीकोनात फरक पडतो. आमटी अतिशय सामान्य असते पण ती आपल्या आईने आपल्यासाठी केलीये ह्यात कदाचित मुलांचाही ego satisfy होत असेल. कुणीतरी आपल्यासाठी सगळी कामं बाजूला ठेऊन केवळ आपल्याला आवडते म्हणून एखादा पदार्थ करून आपल्याला वाढत असेल, किंवा तेच तिचं काम असेल, तर ह्यापेक्षा जास्ती validation काय असू शकेल ?!

पण मला आई म्हणून अजिबातच माझ्या हातच्या कुठल्याही पदार्थांचा कौतुक वाटत नाही. मी एक average स्वयंपाक करणारी average बाई आहे. त्यात आई झाल्याने फार काही फरक पडलेला आहे असं मला वाटत नाही. एकदा वीणा वर्ल्ड ह्या पर्यटन व्यवसायात अग्रगण्य असलेल्या कंपनीच्या सी.ई. ओ. वीणा पाटील ह्यांची मुलाखत मी बघत होते . तेंव्हा त्यांनाही इतर व्यावसायीक यश मिळवलेल्या कर्तबगार स्त्रीयांना विचारतात तसेच घरा-दारा-मुलां संबधीचे सुमार प्रश्न त्या मुलाखतकारानेही विचारले असता, त्यांनी अजिबात कुठलाही अपराध भाव चेहेर्यावर अथवा आवाजात न येऊ देता दिलेलं उत्तर माझ्यासाठी मनोहर सूर्योदय बघितल्याचा आनंद देऊन गेलं. त्या म्हणाल्या होत्या, “मला जर कुणी विचारलं की तुमचा आवडता पदार्थ कोणता, तर माझं प्रामाणिक उत्तर असतं , असा कुठलाही पदार्थ, ज्यासाठी मला स्वतःला स्वयंपाक घरात जाऊन फार वेळ घालवावा लागणार नाही, मला आवडतो.”

घराबरोबरच इतर अनेक व्यवधानं समर्थपणे सांभाळणार्या कर्तबगार मल्टी टास्किंग मास्टर्स असलेल्या अनेक मैत्रिणी मला लाभलेल्या आहेत . त्यातल्याच एकीने एकदा एक मजेशीर किस्सा सांगितला होता . ती म्हणाली, “नवीन लग्न होऊन मी जेंव्हा ह्या घरात आले तेंव्हा माझ्या सासर्यांनी मला सांगितलं होतं, तुला जर आयुष्यात खरंच सुखी व्हायचं असेल तर कुणाच्याही हातच्या कुठल्याही पदार्थाची चव आवडून घ्यायची सवय लाऊन घे, आणि त्यात उगाचंच कुठलाही अहंभाव किंवा न्यूनगंड मनात येऊ देऊ नकोस.”

माझ्यासाठी ही दोन्ही उदाहरणं माझ्या narrative शी अगदी चपखल मेळ खाणारी आणि म्हणून अत्यंत तार्किक वाटली मला आणि मी ती पडत्या फळाची आज्ञा समजून शिरसावंद्य मानली . कसोशीने पाळली आणि खरंच सुखी झाले .

आमच्या घरी स्वयंपाक करणार्या मावशी अतिशय उत्तम स्वयंपाक करतात. माझ्यापेक्षा नक्कीच जास्त सरस करतात हे मी नम्रपणे मान्य करून माझं स्वयंपाकघर निर्धास्त मनाने त्यांच्या स्वाधीन करून टाकलेलं आहे .जबाबदार्यांच delegation किंवा वेळखाऊ आणि repetitive processes चं outsourcing हे global economies मध्ये organisation building चे key factors समजल्या जातात. घर ही एक संस्था म्हणलं तर ती चालवण्याचे अनेक वेगवेगळे प्रकार असू शकतात. माझ्या आईकडे वेगळा उपाय होता, सासूबाईं कडे वेगळा आणि माझा वेगळा. सगळेच प्रकार एकाच वेळी तितकेच प्रभावी असूच शकतात . प्रत्येकीचं नियोजन कौशल्यंच असतं ते.

कुणी स्टार प्लेयर्स असतात कुणी टीम प्लेयर्स असतात. मी टीम प्लेयर आहे. मला एकटीच्या खांद्यावर विजय ओढून आणावा असं कधीही वाटत नाही तशी महत्वाकांक्षा नाही आणि इच्छा तर मुळीच नाही. I enjoy being part of a winning team , without having to keep performing all the time.

खांदे पालट होत राहिली तर कुणावरच अतिरिक्त ताण येत नाही आणि प्रत्येकाच्याच क्षमता अधून मधून घासून पुसून लख्खं होत राहतात . “मी घरी नसले तर माझ्या घराचं पानही हलत नाही” किंवा “आमच्या ह्यांना साधा चहा देखील करायला येत नाही”, “किंवा आमच्या घरी सगळ्यांना माझ्याच हातच्या गरम गरम पोळ्या/भाकरी लागतात” इत्यादी इत्यादी, असल्या dysfunctionality ला कौतुकांच्या वेष्टणात गुंडाळून स्वतःचं आणि इतरांचही जगणं दुर्धर करून टाकणार्या toxic feminity च्या जाळ्यात मी कधीच स्वतःला किंवा माझ्या घराला अडकू दिलेलं नाहीये. ह्याचा मला माफक अभिमान आहे. मी असली नसली तरी माझं घर व्यवस्थित सुरू राहावं ह्याची तजवीज मी केलेली आहे. मी स्वयंपाक घरात दिवस दिवस गेले नाही तरी सगळ्याचं सगळं व्यवस्थित होतंय की नाही ह्याकडे माझं माझ्या कामाच्या टेबलावरून लक्ष असतं. आणि तितकं पुरेसं असतं. स्वयंपाकघर हेच एकमेव आणि इतकंच जगण्याचं, कर्तव्यपूर्तीचं आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याचं मर्यादित क्षेत्र असलेल्या स्त्रियांच्या अनेक पिढ्यांचे “संस्कार” अगदी आजच्या पिढीपर्यंत लीलया पोहोचलेले आहेत. हे बघून गंमत वाटते.

अभिनयाच्या क्षेत्रात प्रथितयश असलेल्या एका तरुण दांपत्याची मुलाखत सोशल मीडिया फीड स्क्रोल करत असताना चुकून बघण्यात आली, तेंव्हाच्या ३० सेकंदात , मुलाखत घेणाऱ्या मुलीने नेहमीप्रमाणेच दोघांमधल्या तिच्यावर नेम धरून हमखास वर्मी बसणारा आणि प्रेक्षकांना खुश करणारा, ठेवणीतला प्रश्न भात्यातून काढला, “ तुम्ही दोघंही सतत इतके बिझी असता, तेंव्हा घरासाठी , एकमेकांसाठी वेळ कसा काढता आणि तो कसा घालवता?” त्यावर क्षणाचाही विलंब न लावता ती म्हणाली, “आम्हाला फार वेळ एकत्र मिळत नाही पण जेव्हा जेव्हा तो मिळतो तेंव्हा तेंव्हा आम्ही एकत्र जेवतो, त्यातही ह्याला गरम गरम पोळ्या करून वाढण्यात मला सगळ्यात जास्त आनंद मिळतो.” असं ती सांगत असताना, तो दोन्ही गालात गुलाबजाम असल्यासारखा गोड ब्लश करत होता, पुढे ती म्हणाली, “मला आठवतं माझी आई आम्हाला असं लहानपणी मस्त गरम पोळ्या वाढायची ते खाताना कोण सुख वाटायचं, तेच ह्यालाही मिळावं असं मला वाटतं आणि मलाही असं वाढायला आवडतं ” इतका सगळा प्रेमळ गोड गुलाबी संवाद ऐकून मला अर्धा क्षण कौतुक वाटलं खरं त्या आदर्श दांपत्याचं, पण तितकंच. त्यानंतर मात्र त्या गोडव्याने पोटात ढवळायला लागलं. ३० सेकंदाच्या वर काही मी ती मुलाखत पचवू शकले नाही आणि पुढे स्क्रोल करता करता विचार करू लागले , मिळत असेल कुणाला त्यात आनंद तर मिळो बापडा. आपल्या आईचं काय जातंय?

पण मला, प्रामाणिकपणे सांगायचं तर, कधीही पोळ्या लाटत बसण्यात किंवा त्या गरम गरम नवर्याला किंवा कुणालाही , अगदी स्वत:च्या मुलांनाही, वाढण्यात आनंद वगैरे अनुभवलाय असा एकही क्षण आठवत नाही. आमच्या घरात ज्याला गरम पोळ्या/ भाकरी खाण्याचा आनंद मिळवायचा असेल त्याने मावशी असतात त्या वेळेत जेवायला बसावे इतकाच नियम आहे . तोही कुणी पाळत नाही . प्रत्येक जण आपापल्या वेळेत आपापल्या सोईने लागेल तसं जेवण गरम करून वाढून घेतात . अगदी माझा १० वर्षाचा मुलगाही !

मला आठवतं नवीन लग्न होऊन जेंव्हा मी सासरी आले तेंव्हा हळदीचा रंग उतरल्यावर कुणीतरी मला विचारलं होतं, तुझी स्पेशालिटी डिश काय आहे , तीच आज सगळ्यांसाठी कर बघू . ते ऐकल्यावर खरंतर पोटात आधी गोळाच आला होता. सुचेचना उत्तर. कधी विचारच नव्हता केला ह्याबद्दल, कृती तर फार दूर. आपली तर कुठली स्पेशालिटीच नाहीये . तेंव्हा नवरा मदतीला धाऊन आला आणि दोघांनी मिळून कढी खिचडी का काय ती केली होती. सगळ्यांनी अर्थातच कौतुक करून वेळ साजरी केली पण i was so unimpressed with my culinary efforts. नवरा अतिशय समंजस मिळालाय हे एका अर्थी खरोखरीच ‘वर’दान म्हणायला हवं.

“पुरुषाच्या हृदयाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो”, ह्यासारखं sexist आणि crude वाक्य नाहीये जगात. माझ्या आयुष्यात महत्वाच्या असलेल्या एकाही पुरुषाला मी कधीही, काहीही खाऊ पिऊ घालून आपलंसं करायचा प्रयत्न तर सोडा तसा विचारही कधी केलेला नाहीये. आणि मुळात अश्या, हृदयाचा मार्ग पोटातून वगैरे जाणार्या पुरुषांबद्दल किंवा त्यांच्या हृदयाबद्दल मला कधीही यत्किंचीतही आकर्षण वाटलेलं नाहीये, त्यामुळे त्यांना आपलंसं करण्याचा प्रश्नच नव्हता उलट असे जे काही तुरळक पुरुष वाटेत आले त्यांना kindly excuse me म्हणून मी तिथून सहज सटकलेय.

एखाद वर्ष एकमेकांना ओळखल्यावर जेव्हा नवर्याने propose केले तेंव्हा मी त्याला पहिला प्रश्न विचारला होता, “ तुला तुझ्या आई किंवा वहिनी सारखी कुणी मुलगी हवी आहे का??” त्यावर क्षणाचाही विलंब न लावता त्याने शांतपणे उत्तर दिलं होतं, “नाही. मला आई आणि वहिनी already आहेत , मला तू हवी आहेस , life partner म्हणून हवी आहेस. तुझी तयारी असेल तर लग्न करुया .” मी अर्थातच ते उत्तर ऐकून मगच तयार झाले. त्यानंतर च्या एका भेटीत त्याने विचारले होते, “तू non veg खात नाहीस , पण तू non veg बनवू शकते का ?” त्यावर मी म्हणाले होते , “नाही. मला येत नाही.”
त्यावर त्याने विचारले , “माझी आईही खात नाही, ती शिवतही नाही , पण शिजवते. तसं तुला करायला जमेल का?"
मला आठवतं त्यावर मी तितक्याच शांतपणे उत्तर दिल होतं , “प्रयत्न केला तर कदाचित जमेलही मला, पण मला तो प्रयत्न करायला आवडेल असं वाटत नाही , एक तर ते माझ्या तत्वात बसत नाही आणि मी तुझी आई नाहीये.” त्यावर त्याने मला हसून long drive वर नेलं आणि त्याच्या आवडत्या एका restaurant मध्ये dinner date ला घेऊन गेला जिथे आम्ही architecture ह्या आमच्या अत्यंत आवडत्या विषयावर पोट भर चर्चा करून दिवस सत्कारणी लावला.

लग्ना आधी जेंव्हा सासरी भेटायला गेले होते तेंव्हा माझ्या नणंदेने मला विचारलं होतं, “स्वयंपाक येतो का ?” तेंव्हा मी “फार नाही, फक्त कामा पुरता, उपाशी रहायला लागणार नाही कधी इतकाच येतो.“ असं प्रामाणिक उत्तर दिलं होतं. त्यावर तिने पुन्हा विचारलं,
“पण आमच्या सचिन ला तर वेगवेगळ्या डिशेस खायला खूप आवडतात, मग कसं करणार तू ??” त्यावर मी पुन्हा तितक्याच शांतपणे म्हणाले होते “ ज्याला खायला आवडतं त्याने बनवायलाही शिकावं, मी मदत नक्की करीन, पण तेवढ्यासाठी मला स्वयंपाकात फार वेळ घालवायला नाही आवडणार"

तेंव्हा कदाचित कुणाला माझी उत्तरं आगाऊपणाची वाटली असतील पण माझ्यासाठी ती सगळीच उत्तरं खरी आणि महत्वाची होती, अजूनही आहेत. मला माझं स्त्रीत्व स्वयंपाकघराशी बांधून घ्यायचं नव्हतं अगदी प्रेमाखातर देखील नाही. ही clarity मला लहानपणापासूनच होती त्यामुळे ती उत्तरंही तितकीच स्वच्छ होती. केवळ पाककला कौशल्या च्या कसोटी वर जर कुणी माझ्या स्त्रीत्वाची पारख करणार असेल तर त्यांनी मला खुशाल शून्य देऊन टाकावा . आयुष्यभर तो क्रूस खांद्यावर घेऊन चालत बसण्यापेक्षा मला खांदे झटकून त्या ओझ्यातून मोकळं होणं जास्त परवडणारं, आवडणारं होतं.

त्यामुळेच जेंव्हा आमच्या नवीन घरातलं स्वयंपाकघर आम्ही design करत होतो तेंव्हा अत्यंत साधं logical brief आम्ही स्वतःला दिलेलं होतं. आपल्या घरातलं स्वयंपाकघर democratic असावं , open असावं . तिथे कुणीही कधीही काहीही येऊन शिजवावं. स्वतः खावं इतरांना खाऊ घालावं. स्वयंपाकघर हे भूक लागणार्या प्रत्येकासाठी, भूक शमवण्यासाठी लागणारं साहित्य असलेलं ठिकाण आहे. ते प्रत्येकाने मुक्तहस्ते वापरावं इतर कुणावरही स्वतःच्या भुकेचं, चवीचं ओझं न टाकता, मग ती आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी आई असो, बायको असो, गर्ल फ्रेंड असो, आजी असो किंवा कुणीही .

बहुसंख्य स्त्रियांची, त्यातही भारतीय स्त्रियांची, उमेदीची खूप वर्षं,कर्तृत्व,उर्मी, क्षमता, स्वयंपाक घर नावाच्या पोकळीत अक्षरशः शोषल्या जातात हे आपण सारेच जाणतो, ते मान्य करू न करू हा भाग वेगळा. त्यातल्या सगळ्याच स्त्रीयांना काही स्वयंपाकाची आवड असू शकत नाही, किंबहुना असत नाही किंवा त्या नैसर्गिकरीत्या स्वयंपाकासाठी designed असतात असंही नाही. स्वयंपाक ही काही gendered skill नाहीये, आणि असं असेल तर food industry चा विचार करता, तिथे सगळ्याच महत्वाच्या ठिकाणी पुरूषच दिसतात, हे कसे? 5 star हॉटेल्स चे शेफ्स असो किंवा लग्नात लागणारे जेवण बनवणारे आचारी /महाराज असो, किंवा सरकारी गेस्ट हाऊस मध्ये काम करणारे खानसामे असो, किंवा अगदी पाणीपुरी/ पावभाजी ची गाडी चालवणारे असो, सगळेच पुरुषच दिसतात. हे कसे ?

व्यवसाय म्हणून स्वयंपाक करणे किंवा एखाद दिवशी हौसेने एखादा पदार्थ करून बघणे आणि रोज तासंतास ओट्या समोर उभं राहून तेच thankless काम वर्षानुवर्ष , आयुष्यभर करत राहणं ह्यात perception चा खूप फरक आहे. करणार्यांच्या आणि ती सेवा विनासायास उपभोगणार्यांच्या देखील. म्हणूनच ज्या स्त्रिया ह्या एकरेषीय, एकसुरी gender roles, ना आव्हान देतात, त्यातून मार्ग काढतात, त्या जाळ्यातून मुक्त होण्याच्या शक्यता धुंडाळतात, त्यांचं स्त्रीत्व यत्किंचीतही दुय्यम दर्जाचं ठरतं असं मला अजिबातच वाटत नाही. उलट त्याच जगण्याच्या पद्धतींच्या नव्या शक्यता, विचारांच्या नव्या दिशा दाखवू शकतात .

बोलता बोलता मी असं एकदा म्हणाले असता माझा एक अत्यंत जिवलग फेमिनीस्ट मित्र म्हणाला होता, “ न जाणो असे किती आईनस्टाईन, शेक्सपीअर, कोलंबस आपण हरवून बसलोय.... स्वयंपाकघरात, आणि त्याहून मोठं दु:खं हे आहे की आपल्याला ते कधीच कळणारही नाही. त्यांची इतकी महत्वाची आयुष्यं केवळ तांदळातले खडे वेचण्यात निघून गेली असतील.” त्याचं ते वाक्य मनात घर करून राहिलंय ते कायमचं.
आईनस्टाईनच्या (त्याच्याच इतक्या कर्तबगार) बायकोवर ची documentary एकदा youtube वर बघण्यात आली. मलीव्हा मरीच तिचं नाव. अर्थात आपल्यापैकी बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी हे नाव ऐकलं असेल. ज्यांना अधिक जाणून घेण्यात रस असेल त्यांनी जरून गूगल करून बघावं म्हणजे मी काय म्हणतेय त्याचं गांभीर्य कदाचित थोड्या प्रमाणात पोहोचेल.
सिमोन दि ब्वाव्हा तिच्या सेकंड सेक्स ह्या पुस्तकांत ह्या प्रक्रियेचा व्यवस्थितच धांडोळा घेते. ती म्हणते, एकूणच आपल्या समाजात पुरुषाच्या कर्तृत्वाला नको तितके वलय प्राप्त झालेले आहे. स्त्री तीन चार तास खपून जगातला सर्वोत्तम केक जरी बनवत असेल तरी तो १०-१५ मिनिटात संपून जातो आणि त्याची इतिहासात कुठेही नोंद ठेवली जात नाही .

केवळ चूल आणि मूल ह्या टोकांवर झुलणारा स्त्रीत्वाचा डोलारा उतरवून फक्त व्यक्ती म्हणून स्त्री कडे बघता आलं तर अन्न ह्या एका छोट्याश्या गोष्टी साठी किती मोठी किंमत ती व्यक्ती मोजतेय ह्याचा अंदाज जरी आला तरी आपल्या अपेक्षा आटोक्यात ठेवता येतील. “तुला स्वयंपाक येतो का?” असा वर वर साधा वाटणारा प्रश्न एखाद्या तरुण मुलीला विचारण्या आधी आपण तो किती loaded आहे ह्याचा क्षणभर थांबून विचार करू शकलो त्या ऐवजी, तिला तिच्या कुठल्या क्षमता विकसित कराव्याश्या वाटतात ह्यावर चर्चा करू शकलो तरी ह्या लेखन प्रपंचाचं प्रयोजन कारणी लागलं असं म्हणायला हरकत नाही. नाही ??!!

- शीतल पाटील
(लेखिका गेली १७ वर्ष बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक प्रख्यात राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केल्या नंतर तिने मंथन डिझाईन स्टुडीओ ह्या नावाने कोल्हापूर येथे स्वतः ची प्रक्टिस स्थापित केली . शिक्षण क्षेत्रात रस असल्याने ती वेगवेगळ्या आर्किटेक्चर कॉलेजेस मध्ये विजिटिंग लेक्चरर म्हणूनही कार्यरत आहे . एकीकडे व्यवसाय नावारूपास आणताना एकत्र कुटुंबात राहून दोन मुलांची आई असण्याची तिहेरी कसरत करत झालेल्या तिच्या प्रवासातून आलेल्या अनुभवांचा उपयोग विध्यार्थ्यांना आणि व्यवसायात नव्याने उतरू बघणार्या मुलांना विशेषतः मुलींना व्हावा ह्यासाठी ती सतत प्रयत्नशील असते)

मूळ लेखाची लिंक:
https://punhastriuvach.blogspot.com/2019/09/blog-post_89.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हल्ली ( म्हणजे बरीच वर्षे झाली) कुणास किचनमधले डाइनिंग टेबल नको असते कारण बाहेरच्या मोठ्या खोलीत टिवी पाहात जेवायचे असते. एखादी खोली फक्त डाइनिंग रुम ठेवणे हे फक्त रेल्वे क्वार्टर्समध्ये सापडेल. आता डाइनिंग टेबलावर जेवणेही अशक्य कारण टेबल मोठे लागते. बुफे पद्धत रुळली आहे. आहे त्या बसलेल्या ठिकाणी प्लेट हातात घेऊन जेवतात, गप्पा मारतात.
यावर एक उपाय शोधलाय. तीन बाइ दोन फुटी टेबलास फक्त दोन बाजूस चाके लावली आहेत. त्यावर सर्व तयार पदार्थ भांडी ठेवून किचनमधून बाहेर /दुसऱ्या खोलीत टेबल (किंचित उचलून ) ओढायचे/ढकलायचे. त्या भांड्यांतून बुफेसारखं वाढून घ्यायचे. काम झटपट आणि गुडघे/कमर -दुखीवाले, लहानथोर खुश आहेत या टेबलावर.
इतर काही कामेही/ अभ्यास करताना पसारा आवरावा लागत नाही. टेबल दुसऱ्या खोलीत सरकवले की काम झाले. टेबलाच्या चारही कडांना एक सेंमि अडणापट्टी मारली आहे. उंची २८ इंच. कोणतीही वस्तू पातेलं/पेन्सील वगैरे कडेवरून खाली सहज पडत नाही. चाके दोनच पायांना आहेत. एका जागी राहाते, फार हलत नाही. दोन फुटी रुंदीमुळे कोणत्याही दारातून जाते. लांबी तीनऐवजी चारफुट ठेवू शकतो. जागा बदलल्यास आपले टेबल तिकडे घेऊन जाता येईल. सोडावे लागणार नाही.
( अवांतर वाटल्यास सोडून द्या.)

या लेखातील एका मुद्द्याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे ते म्हणजे " I loved to hate food (&/or cooking) and Hated to have to love food (&/or cooking). ".
अशी लोकं अल्पसंख्य असतात, विशेषतः जेवण/चवी याची टोकाची आवड व वैयक्तिक मते असणार्‍या भारतीय समाजात. त्या दृष्टिकोणातून या लेखाचा विचार व्हायला हरकत नाही.

टवणेंना अनुमोदन... आणि हा खालचा भाग सुद्धा चर्चेला यावा ही अपेक्षा.

त्यामुळे खाण्याच्या चवीपेक्षा त्याचं पोषण मूल्य तपासायला शिकले . जितका वेळ आणि शक्ती एखादी पाक कृती करायला लागते त्या प्रमाणात त्याचा उपयोग आपल्या शरीराला होतोय का ह्याचा ताळमेळ आपोआप मनात लागायला सुरु होत असे.
त्यातूनच नको त्या फापट पसार्यातून मोकळं होऊन शरीरास जे उपकारक ते स्वीकारणे आणि अपायकारक ते नाकारणे हे आपोआप घडायला सुरुवात झाली. मला कधीही कुठल्याही तळलेल्या किंवा चटपटीत किंवा गोड पदार्थांचं so called craving, instinctively सहसा होत नाही . त्यामुळे ठरवून diet (control) वगैरे प्रकार आजवर कधीही करायला लागले नाहीत. शरीरंच व्यवस्थित मार्गदर्शन करायला लागलं काय खायला हवं नको ते. शरीराचं ऐकलं तर मनाच्या स्वैर वागण्याला आपसूक चाप बसतो. आणि चवीचं म्हणाल तर ते बरंचसं mental construct आहे आणि त्यामुळेच फारच subjective आहे असंही मला हल्ली वाटायला लागलंय.

मुळ भारतीय ऊपखंडात जेवण बनवणे हे एक लांबलचक प्रोसेस ओरिएंटेड काम आहे.ते ही दिवसातून अनेकदा करावे लागते.. खटल्याची घरे, मॉनेटरी निर्णय पुरुषांच्या हातात ही अजूनही मेट्रो शहरांबाहेरची परिस्थिती आहे... कमी कष्टात कोणीही बनवू शकणार्‍या सॅलड बेस्ड गोष्टी खाण्याची परंपरा आणि सवय मी बघितलेल्या भारतीय घरांमध्ये (अर्बन असो वा रूरल) अतिशय कमी आहे. दिवसातून एक वेळा सोडा महिन्यातून एकदा जरी नुसते सॅलड, सूप वा ऊकडलेल्य भाजलेल्या गोष्टी खाण्याची वेळ आली तर पुरूष मंडळींच्या चेहर्‍यावर आठ्या पडतात. रोजच्या रोज घरी नव्याने ब्रेड (चपाती, भाकरी) बनवणारे, फोडणी देऊन ग्रीसी भांडी घासत बसणारे दुसरे फूड कल्चर पाश्चिमात्य देशात दिसले का ह्याचा विचार करतो आहे. ही खरं तर डबल व्हॅमी आहे. म्हणजे प्रोसेस्ड फूड खाऊन डायबेटिज, हदयरोग मागे लागल्याने ऊतारवयात जेष्ठांच्या परावलंबित्वाची जबाबदारी पुन्हा प्रामुख्याने स्त्रियांच्याच अंगावर पडते.
थोडक्यात कुटुंबातल्या अ‍ॅडल्ट लोकांनी आयएफ चा विचार करा.

मी देशावर वाढलो. व राहतोय. आमच्या घरी पुर्वी एकच पदार्थ कालवण/कोरड्यास/आमटी/भाजी बनवला जात असे. बरोबर सकाळी बाजरी किंवा ज्वारीची भाकरी. संध्याकाळी पोळी. भात हा पदार्थ फक्त सणावारी किंवा कुणी पाहुणे आले तरच. रोज भात खाणाराची परिस्थिती खराब आहे असं समजलं जाई. आमच्या घरच्या स्त्रिया मोजून एक तासात चुलीवर आठ दहा लोकांचा स्वयंपाक बनवुन बाकीच्या कामाला जात.
अलिकडे चोचले खूप निघाले आहेत. पोहे उपमा शिरा नाष्टा हवा वगैरे. आमची न्याहारी म्हणजे शेळीच्या दुधात भाकरी कुस्करून खायची. जेवणाबरोबर तोंडी लावायला कांदा, लोणचे, उडदाचे पापड, पेंडवड्या, शेरण्या असे पदार्थ असायचे तेव्हा. ना पोटाचा त्रास, ना बीपी, मधुमेह, मुळव्याधीसारखे आजार तेव्हा होते. गेले ते दिवस. आता सगळेच भात खातात. भाकरी कटाप झाली आहे.

त्या नुसार लेखिकेने बांधकाम क्षेत्रातील कौशल्य साठी दिल्या जाणाऱ्या पदवीचा आपल्या नावा समोर उल्लेख केला आहे त्याचे प्रयोजन काय आहे >>
त्यांना कायद्याने तशी मान्यता दिली आहे, ते त्यांच संबोधन आहे.

बाकी बरेचसे प्रतिसाद विनोदी आहेत.
बापाचा पैसा, नवर्‍याचा पैसा, वै वै. त्या बाईंचाही पैसा असेलच की.

व्यक्तीस्वातंत्र्य आणि निवडस्वातंत्र्य ह्यतही गफलत आहे. जसे की सगळ्या बारबाला हौसेने जातात नाचायला की त्यांना तेवढाच पैसा देणारं, त्यांच्या स्किललेवलचं दुसरं काय काम पर्याय म्हणून उपलब्ध आहे?
विवाहसंस्थेचे फायदे - तोटे हे बाईंनी जेवण करावं की त्यांच्या पतिने ह्यावर अवलंबून असतात होय.

स्त्रीवाद म्हणजे काय नक्की? पुरुषवाद म्हणजे काय?

काहीही म्हणा पण अशा धाग्यांवरील पुरुषांचे प्रतिसाद स्त्रियांना आवडत नाहीत.

सगळ्या बारबाला हौसेने जातात नाचायला की त्यांना तेवढाच पैसा देणारं, त्यांच्या स्किललेवलचं दुसरं काय काम पर्याय म्हणून उपलब्ध आहे?

बारबाला चा डान्स बघून त्यांना पुरुष कस्टमर पैसे देतात हे तुम्हाला कोण्ही सांगितलं .
तिथे स्त्री शरीराचा बाजार मांडलेला असतो .
डान्स च म्हणाल तर डान्स मधाल बारबाला ना ग, म,भ,म
पण माहीत नसतं

धागा व प्रतिसाद वाचले. लेख दीर्घ आहे पण विचार करायला लावणारा व प्रामाणिकपणे लिहिलेला लेख वाटतोय ताईंनी. ज्यांनी....... आता समाज खूप बदलला आहे/ आता हि समस्या राहिली नाही/ फार क्रांतिकारी वगैरे लिहिलेले नाही/ सत्तरीच्या दशकात असे लेख येऊन गेलेत........ व अशाच प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यांच्यासाठी:,.... इंग्लंड अमेरिका जपान कॅनडा म्हणजे समाज नव्हे. गेलाबाजार पुण्या मुंबै मध्ये सुद्धा आजकाल "समाज बदलला" आहे मान्य. पण भारतातली बहुतेक प्रजा निमशहरी व ग्रामीण भागात राहते. तिथे अजूनही जाऊन या व मग बोला. ताईंनी वर्णन केलेले चित्र तिथे अजूनही पाहायला मिळेल. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरयाणा इकडे बायकांची परिस्थिती अजूनही भीषणच आहे. राजस्थान मध्ये अजूनही घुंघट प्रथा आहे. चूल मुल यापलीकडे भारतात अनेकींचे विश्व विस्तारलेले नाही. कित्येक पिढ्यांचे सोपस्कार आहेत. स्त्र्री मुक्ती सत्तरीच्या दशकात सुरु झाली. त्याकाळात असे लेख वारंवार येत असत. पण तरी केवळ चाळीस पन्नास वर्षात "समाज बदलला" असा जनरलाईस्ड निष्कर्ष कसा काय काढू शकता?

बाकी, इतर धाग्यावर मोदींचा उदो उदो करणारे काही 'पुरुषप्रधान'वाले आयडी इथे स्त्रीमुक्ती विरोधात हुल्लडबाजी व पातळी सोडून शेरेबाजी करताना पाहून आश्चर्य अजिबात वाटले नाही. त्या दिशेनेच वेगाने वाटचाल सुरु आहे देशाची सध्या.

विवाहसंस्थेचे फायदे - तोटे हे बाईंनी जेवण करावं की त्यांच्या पतिने ह्यावर अवलंबून असतात होय.
घरातील कामाचा बोजा सर्वांनी वाटून घ्यावा असे मत आहे त्या पाठी मागे

प्रत्येक स्त्री पुरुष तथाकथित संस्कारांचे ओझे वहात जगत असतो. बारबालांसारख्या स्रिया हे ओझे झुगारून देऊन मनसोक्त जगत असतात. बाकीच्या धुणीभांडी करून का होईना चतकोर भाकर पोटाला मिळवत आयुष्य कंठत असतात.

तसले लेख किर्लोस्कर वगैरे मासिकांत सत्तर साल दशकात येऊन त्याचा कीस पाडून झाला आहे. << तरीही आजही कामानिमित्ताने प्रवास करणार्‍या बाईला 'अगं मग तुझ्या नवर्‍याच्या जेवणाचे काय?' हा प्रश्न भयंकर जगबुडी झाल्यासारखा विचारला जातो. सत्तरच्या दशकातल्या नवतरूणी आता आज्या झाल्या तरीही.

प्रचंड वेगाने बदलाचे वारे वहात असताना स्त्री विरुद्ध पुरूष असा विषय अजून का कवटाळला जातो हे मला समजत नाही. << नक्की कुठे आहेत हे बदलाचे वारे? सगळ्या घरांमधे अजूनतरी शिरले नाहीत. शिरले असतील तर माजघरात पोचले नाहीत.
हे थोडसं सवर्ण माणसाने कुठे उरलाय हो जातीयवाद असं म्हणण्यासारखं झालं ना?
आणि मुळात हा विषय स्त्री विरूद्ध पुरूष आहे हे कसे काय? हे समाजाच्या स्टिरिओटिपिकल जेण्डर रोल्सच्या विरूद्ध बोलणे आहे असे का लक्षात येत नाही?

शीतलच्या घरी मी अजून गेलेली नाही त्यामुळे तिचे डेमोक्रेटिक डिझाइन नक्की काय ते मला माहिती नाही. पण अशी अनेक किचने बघितलीयेत की जिथे वस्तूंच्या जागा अतिशय विचित्र प्रकारे आणि नको इतका 'पिक्चर परफेक्ट' साठी विचार करून आखलेल्या असतात.
सहज लागणार्‍या गोष्टी हाताशी आणि कमी लागणार्‍या मागे/ वरती. त्याप्रमाणे अतिशय ऑब्वियस होईल अशी कॅबिनेटसची रचना. एका दृष्टीक्षेपात जे काय लागेल ते सापडेल अश्या प्रकारे रचना. बाटल्या बरण्यांच्यातला ऐवज बाहेरून दिसेल म्हणजे जे ते उगाच उघडत बसावे लागणार नाही. उगाच खूप सोन्याच्या, प्लॅटिनमच्या, हिर्‍याच्या वस्तू नाहीत जेणेकरून एखादी तुटली, मोडली, खराब झाली तर कुणाला हार्ट अ‍ॅटॅक येणार नाही. नवीन माणसाला दडपण वाटेल इतका चकचकाट आणि शिस्त नाही. वगैरे वगैरे गोष्टी मला डेमोक्रेटिक किचन म्हणून महत्वाच्या वाटतात.
एक आहे की हे सगळे जमवायचे तर त्याला किचन थोडे ऐसपैस बांधता यायला हवे. जे तिला कोल्हापुरात शक्य झाले. मुंबईत अवघड आहे.
पण ही तत्वे लक्षात ठेवून किचनची रचना किंवा मांडामांड तरी असावी.
हाऊसकिपिंग जर्नल्स, ब्लॉग्ज मधल्या अति आवरलेल्या, सजवलेल्या, टापटिप किचनांना काही अर्थ नाही .

आवरलेल्या, सजवलेल्या, टापटिप किचनांना काही अर्थ नाही .
नवीन Submitted by नीधप on 30 September, 2019 -
>> मला तर बाथरूमचा फिल येतो अशी किचन बघताना.

आज रात्री जेवायला काय आहे आणि उद्या काय स्वयंपाक करायचा आहे, घरात भाज्या, फळफळावळ, धान्य, इतर वाणसामान किती आहे, गॅस कधी संपणार आहे, भांडी घासली आहेत का, जाग्यावर लावली आहेत का साऱ्या गोष्टींचा रोजच्या रोज अनेक वर्षं विचार करणारा आणि त्या प्रमाणे कृती करणारा, एकटा न राहणारा (विवाहीत किंवा अविवाहित असला तरी एकत्र कुटुंबात राहणारा) पुरूष हा भारतीय समाजात अजूनही फारसा दिसत नाही. बाई नोकरी करणारी असली तरी स्वयंपाकाचं व्यवस्थापन बहुतेक वेळा तीच बघताना आढळते.
गरमागरम ताज्या पोळ्या करून वाढणे या पंधरा मिनिटांच्या कृतीसाठी बाजारातून गहू आणणे, ते निवडणे, दळून आणणे इतर गोष्टी जाग्यावर उपलब्ध असणे या सर्व गोष्टींचा विचार कोणीतरी करावा लागतो. तेव्हा गरमागरम पोळ्या पानात पडतात. आपल्या व्यतिरिक्त चार जणांच्या उदरभरणाची सोय दररोज वर्षानुवर्षे करीत रहाणे हे सोपे काम नाही. हे काम करायला गर्भाशय हवे अशी मुळीच अट नाही. पण तरीही हे काम बाईच्याच गळ्यात का येऊन पडते याचा विचार स्री आणि पुरूष दोघांनीही करायला हवा आहे. पैशाशिवाय घर चालत नाही हे खरे पण केवळ पैसा टेबलावर ठेवला तर त्याचा चारीठाव स्वयंपाक बनत नाही हे ही तितकेच खरे आहे.
कळफलकावर बोटे बडवून प्रतिसाद वाढवणाऱ्यांनी ही कळफलक बडवायची शक्ती आज आपण कोणाच्या हातचं रांधलेलं अन्न खाऊन कमावली आहे याचा विचार करावा. स्वहस्ते रांधले असेल तर त्यासाठी शक्ती देणाऱ्या देवाचे आभार मानावेत. परहस्ते रांधलेलं अन्न ग्रहण करीत असाल तर ज्या व्यक्तीने तुम्हाला ते करून खाऊ घातले त्या व्यक्तीचे आभार मानावे. कधी तरी तुमच्या लक्षात येईल की ती व्यक्ती स्त्री आहे की पुरूष हे महत्वाचे नाहीच आहे!
देणाऱ्याने देत जावे,घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे
किती वर्षे बायका बिचाऱ्या देतच आहेत! त्यांचे देणारे हात घेणारे पुरूष आता तरी दिसावेत हीच इच्छा!
(अति दवणीय प्रतिसाद झालाय पण असूंदे!)

Submitted by इनामदार on 30 September, 2019 - 22:37 शेवटचा परिच्छेद वगळता

Submitted by नीधप on 30 September, 2019 - 23:15

प्रतिसाद आवडले.

ज्या ज्या स्त्रियांनी "आज रात्री जेवायला काय आहे आणि उद्या काय स्वयंपाक करायचा आहे, घरात भाज्या, फळफळावळ, धान्य, इतर वाणसामान किती आहे, गॅस कधी संपणार आहे, भांडी घासली आहेत का, जाग्यावर लावली आहेत का" हा त्रास सहन केला आहे, निदान त्यांनी कठोरपणे त्यांच्या मुलींना, सुनांना ही कामं करण्यापासून रोखले पाहिजे. जसा स्त्रियांनी मतदानाचा अधिकार, नोकरीत आरक्षण, अशा गोष्टी लढून मिळवल्या तसं स्वयंपाकाची जबाबदारी नाकारण्याचा अधिकार मिळवलाच पाहिजे.

कठोरपणे त्यांच्या मुलींना, सुनांना ही कामं करण्यापासून रोखले पाहिजे. >> नाही, ही कामे आलीच पाहिजेत मुलांना व मुलींना. ते करण्यापासुन रोखायची गरज नाही पण हे घरातल्या सर्वांच्या सहभागाने करायचे काम आहे हे शिकवायला हवे. भले अगदी समान वाटा नसु दे पण सहभाग हवाच. गरज असेल तेव्हातर हवाचहवा व तेसगळ्यांकडुन करुन घ्यायची स्वतःत ताकदही हवी हे शिकवायचे.

आणि वैयक्तिक मत लिहायचे राहिले. मला तरी विवाहसंस्था फार वाईट आहे असे वाटत नाही. आवडते. तोटे मान्य करुन. (लेखिकाही असे म्हणत नाहीये). इतर कोणीही इथे असे लिहिलेले वाचनात आले नाही.

ओपन किचन भारतात आता सर्रास दिसते का? नसावे असे वाटते.

मानवाच्या मादीचं विश्व बदलून स्वयंपाकघर नावाच्या खोली पुरतं सीमित झालं आणि जीवंत राहण्यासाठीची मुलभूत गरज असलेला साधा अन्न नावाचा घटक पाककला नावाच्या अती क्लिष्ट आणि वेळखाऊ उपद्व्यापात अडकला .
>>> या उपद्व्यापातून सुटण्यासाठीच स्त्रियांनी आपापल्या मुलींना स्वयंपाक अजिबात शिकवू नये. थायलंड सारख्या देशात अन्न घरी शिजवत नाहीत असे वाचलेले आठवते. तसेच आपल्याकडं करून स्वयंपाकघर घरातून हटवायचे. जागा वाचेल आणि स्रियांचा वेळ वाचून पिडा दूर होईल.

"एकावरच सगळा भार नको,सगळे मिळून जमेल तो वाटा उचलून किचन सांभाळू" या सजेशन चं उत्तर "किचन ठेवूच नका, बायका मुलींना स्वयंपाक शिकवूच नका, होऊदे काय वाट्टेल ते" अश्या टोकाला कसं जातं?
(किचन जाऊदे, बाहेरचं खाऊ,उपाशी राहू पण आम्ही वाटा उचलायला हो तोंड देखलं पण म्हणणार नाही असा काहीसा पवित्रा आहे का?I am not playing if I don't get to make all the rules of game?)

मी अनु ::: मी पण अगदी हेच लिहिता लिहिता थांबले.. झोपलेल्या उठवता येतं पण... असा विचार मनात आला... पण तू छान लिहिलंयस...

मी अनु, स्नेहमयी- मायबोलीवर एक पालथा घडा क्लब आहे. पाघ क्लब असा शॉर्टफॉर्म आहे त्याचा. त्या क्लबातले आजीवन मेंबर्स अशाच पोस्टी पाडतायत वर्षानुवर्ष. त्यांच्या पोस्ट्स न वाचता ओलांडून जाणं हाच उपाय आहे. वर म्हटल्याप्रमाणे ‘झोपेचं सोंग ...येत नाही‘.
अवांतर प्रतिसादाकरता क्षमस्व.

अहो क्रांती करायची असेल तर एकदम विरुद्ध विचार करावा लागेल. दोन्ही तीरावर हात ठेवून बदल कसा घडेल. बदल करण्याची हिंमत दाखवली तरच काही तरी घडेल. नाही तर बसा शतकानुशतके स्रीवरच्या अन्यायाची कॅसेट वाजवत. एकदम रामबाण उपाय सांगितला तर आम्ही पाघ क्लब मेंबर. Sad
काही देशांमध्ये अन्न घरी बनवत नाहीत तिकडं माबो महिला मंडळाचं शिष्ट मंडळाने जाऊन अभ्यास करावा. व फायदे तोटे याची चर्चा करावी.

नाही पटले अनेक विचार. काही खरच महत्वाचे आहेत. लेखनात कितीतरी ठिकाणी विरोधाभास आहे. प्रतिसाद वाचले नाही अजून. एकून लेख पटला नाही. निवांत स्पष्ट करेन काय खटकलं ते.

लेखापेक्षा प्रतिसाद वाचूनच दबकायला झाले. छान मुद्दे मांडलेत अनेकांनी. अनू, निधप वगैरेंचे प्रतिसाद पटले. अजुनही कुणी कुणी छान लिहिलय प्रतिसादात.

Pages