ताम्हिणी घाट, पावसाळी माहोल

Submitted by पुरंदरे शशांक on 15 September, 2019 - 10:42

ताम्हिणी घाट, पावसाळी माहोल

तलम तलमसे जलद उतरती मधेच धरणीवर
हिरवे कुंतल माळून बसले मोत्यांची झालर

भर माध्यान्ही रवि किरणही येती ना भुईवर
मेघ अडविती वाट तयांची विरविरती चादर

झरे वाहती अगणित नाजूक खळखळती सुस्वर
विराट रुपे घेऊनी काही कोसळती भूवर

ओलावा हा भरुन राहिला इथवरुनी तिथवर
एक चिमुकला पंख वाळवी ऊडून वरचेवर

पागोळ्या ओंजळीत वेची पोर कुणी अवखळ
रानफुले डोलती घुमूनीया तरुतळी त्या निश्चळ

...........................................................

जलद..... ढग

कुंतल.... केस

विरविरती.....विरलेली

तरु ...... वृक्ष, झाड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख शब्दचित्र!
कवितेची पार्श्वभुमीही वाचायला आवडली असती.

खुप सुंदर..
शब्दचित्रण आवडलं..

माध्यान्ही ऐवजी मध्यान्ही हवंय का? Happy

सुरेख...

अर्रे काय सुरेख कविता आहे.
>>ओलावा हा भरुन राहिला इथवरुनी तिथवर
एक चिमुकला पंख वाळवी ऊडून वरचेवर
अत्यंत मोहक आणि चित्रमय!

माध्यान्ही ऐवजी मध्यान्ही हवंय का?
मन्याs
नाही.. माध्यान्ह बरोबर आहे.. माध्यान्ह म्हणजे दुपारची वेळ.. किंवा भर दुपारी म्हणतात तसं