सिंगापोर म्हणजे खवैय्यांची पंढरी. भारतीय, चिनी आणि मलाय खाद्यसंस्कृती इथे गुणगोविंदाने नांदतात. त्यांची स्वतःची स्वभाववैशिष्ट्ये तर आहेतच पण त्यांच्या एकमेकांशी झालेल्या संगमातून काही नव्या आणि चविष्ट खाद्यपदार्थांनीही जन्म घेतला आहे.
या खाद्यपदार्थात सर्वात वरचा मान राखून आहे तो म्हणजे लक्सा. या लक्साचा जन्म झालाय तोच मुळी दोन संस्कृतींच्या मिश्रणातून. पेरानाकॅन संस्कृतीतून. पेरानाकॅन लोक म्हणजे काय? तर असं सांगितलं जातं कि जुन्या काळी जे चायनीज खलाशी दक्षिणपूर्व देशात येऊन राहिले(मलेशिया, सिंगापोर, इंडोनेशिया) त्यांनी पुढे तिथल्या स्थानिक स्त्रियांबरोबर लग्न करून संसार थाटले. त्यांच्या ज्या पुढच्या पिढ्या तयार झाल्या ते हे पेरानाकॅन लोक.
चीनी जेवणाचा सूप हा एक अविभाज्य घटक आहे. नूडल सूप हि त्यांची खासियत. पेरानाकॅन स्त्रियांनी आपल्या नवर्यांकरता नूडल सूप बनवलं त्यात त्यांनी दक्षिणपूर्व आशियात सर्वात जास्त वापरला जाणारा स्थायी मसाला अर्थातच ताजा नारळ वापरला. ताज्या नारळाचं दूध आणि तिखट लाल मिरच्या. त्यांच्या संगमातून तयार झाला हा लक्सा. लक्साचा स्थायीभाव सूप हा. पण त्याला चव मात्र आपल्या करीची असते.
लक्साचे दोन प्रकार आहेत. एक करी लक्सा आणि एक असम लक्सा. यातला करी लक्सा नारळाची ग्रेव्ही घालून बनवला जातो आणि असम लक्सा चिंचेचं आंबट सार घालून बनवला जातो. बाकीचे घटक म्हणजे राईस नूडल्स, काॅकल्स(एक प्रकारचे शिंपले), फिश केक, प्राॅन्स आणि बीन कर्ड आणि सोबत झणझणीत लाल मिरच्यांची पेस्ट. करी लक्सा त्यातल्या नारळाच्या ग्रेव्हीमुळे घट्ट बनतो आणि असम लक्सा थोडासा पातळ असतो.
सिंगापोरमध्ये ह्या लक्साची अनेक मित्रमैत्रिणींकडून गुणवर्णने ऐकली होती. त्यामुळे लक्सा खाऊन बघायचाच होता. शेवटी तो मुहूर्त ऐन रविवारचा मिळाला.
सिंगापुरात लक्सा मिळणारी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. त्या त्या ठिकाणी मिळणाऱ्या लक्सावरून आणि त्यांच्या चवीवरून लोकांच्या पैजा लागतात म्हणे. कोण म्हणतं कताॅंग लक्सा सगळ्यात मस्त. कोण म्हणत नाही जांगुट लक्सा त्यापेक्षा चांगला तर कोण म्हणतं सुंगेई रोड लक्सा सगळ्या जगात भारी. अर्थात मी खाल्ला तो सुंगेई रोड लक्सा.
दुपारी जेवायच्या वेळेला सुंगेई रोड लक्साला पोहोचले. आधीच सिंगापोरची दुपार म्हणजे आल्हाददायक! ऊन आणि दमटपणामुळे आधीच जीव अर्धा झालेला. मेट्रोच्या एसी मधून बाहेर पडलं आणि सिंगापोरच्या रस्त्यांवरून चालायला लागलं कि सिंगापोरियन वेदर काय चीज आहे ते खरंच कळतं.
जागेवर पोहोचले तर तिथे खरंच मारुतीच्या शेपटीएव्हढी लांब रंग होती. अर्थात ती रांग त्या लक्साची माहिती पटवायला पुरेशी होती. माझा नंबर तब्बल पंधरा वीस मिनिटे थांबल्यावर आला. मी एक लक्सा म्हणून सांगितलं तर मागे उभे चायनीज अाजोबा “एकच?!” म्हणून मिश्किल हसले. मग मी दोन सांगितले. म्हटलं आवडला तर परत या रांगेत उभं राहावं लागेल.
काउंटरच्या सुरुवातीला एका मोठ्या रांजणासारख्या भांड्यात सूप उकळत होतं. कॉउंटरवर तीन सर्व्हर्स होत्या. एक प्राॅन्स, कॉकल्स आणि फिश केक बोलमध्ये भरायला, एक त्यावर ते गरम नूडल सूप ओतायला आणि एक वरती चिली पेस्ट आणि इतर सजावट करायला.
माझे दोन बोल्स मिळाले आणि समोरचंच रिकामं टेबल पकडून मी बसले. चिली पेस्ट मिसळली आणि पहिला सूपचा चमचा भुरका घेत तोंडात घातला आणि खाॅक्क!! जोरात ठसका लागला. पाणी आणलं होतं सोबत म्हणून नशीब. शेजारच्या टेबलवरची म्हातारी आपले चिनी डोळे मिचमिचत हसली. मीही तिच्याकडे, काय करणार! माझं हे असंच म्हणून बघत कसनुसं हसले. पण मग मात्र त्या लक्साच्या चवीने जीभ, पोट आणि मनाचाही ताबा घेतला. फिश केक, कोकल्स आणि प्राॅन्स त्या नारळाच्या दुधात मस्त मुरले होते आणि त्यातल्या नूडल्स तर त्यातच शिजवल्यामुळे एकजीव झाल्या होत्या.
दोन बोल्स संपवल्यावर अजून एक बोल घ्यायला हवा होता असं वाटलंच!
पण आता हळहळून उपयोग नव्हता. पुढे परत ती मारूतीच्या शेपटीएव्हढी रांग होती. मनातल्या मनात त्या आद्य पेरानाकॅन सुगरणींना धन्यवाद देत बाहेर पडले.
छान लिहिलंय...
छान लिहिलंय...
ट्राय करायला पाहिजे...
मस्तच! शाकाहारी पर्याय नाहीत
मस्तच! शाकाहारी पर्याय नाहीत काय? फिश केक काय प्रकार आहे.
छान वर्णन ! हा विडिओ त्या
छान वर्णन ! हा विडिओ त्या ठिकाणाविषयी - https://www.youtube.com/watch?v=XXymkzNu30Y
धन्यवाद निरू, अमर आणि च्या
धन्यवाद निरू, अमर आणि च्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाकाहारी पर्याय नाहीत काय? फिश केक काय प्रकार आहे.>>> मांसाहारीच ओरिजिनल प्रकार आहे. शाकाहारी असेल पण कधी खाल्ला नाही. फिश केक माशाचे टिक्के बनवल्यासारखा बनवतात आणि त्याचे काप करून घालतात लक्सामध्ये.
च्या लिंकसाठी धन्यवाद.
छान लिहिलंय...>+१११
छान लिहिलंय...>+१११
खूपच छान लिहिलंय, गेल्यावर
खूपच छान लिहिलंय, गेल्यावर नक्की ट्राय करून पाहणार.
भाग १ आहे म्हणजे पुढील लेखाची प्रतीक्षा. पुलेशु
Thanks again.
Thanks again.
वा! वर्णन आवडलं.
वा! वर्णन आवडलं.
वाह, मस्तच तोंपासु वर्णन
वाह, मस्तच तोंपासु वर्णन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मलाही लाक्सा आयाम प्रचंड प्रिय आहे, मायनस द फिश साॅस