युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३१

Submitted by मी मधुरा on 15 August, 2019 - 10:08

आकाश महालात सुर्यमहाराजांचे गमन-आगमन होत राहिले. ना दुर्योधन बदलला, ना भीम आणि दुर्योधनाचे वैर. होणाऱ्या भांडणात मध्ये पडून न्यायाचे अमृत ओतत दोघांना शांत करण्याचे काम नित्यनियमाने करणारा युधिष्ठिरही बदलला नाही, आणि काहीही झालं की भीष्माचार्यांच्या कुशीत शिरणारा अर्जुनही नाही.....

ते ना महालात बदलले ना गुरुकुलात!

आचार्य द्रोणांचा अश्वत्थामाप्रती असलेला स्नेह पराकोटीचा होता. अश्वत्थामाच्या कपाळावरचा मधोमध असलेला पांढरा शुभ्र हिऱ्याचा खडा पाहून तो शिवशंकरांचा तिसरा नेत्र असल्याचा भास होत असे. सगळेच त्याचा आदर करायचे. शेवटी गुरुपुत्र होता तो. दुर्योधनाचा घनिष्ट मित्र बनल्यापासून ते दोघे सतत सोबत असायचे.

"बाणाची दिशा आणि धनुष्याची पकड, प्रत्यंचेवरचा ताण योग्य हवा. बाणाची गती ही प्रत्यंचेवरचा ताण ठरवतो. बाणाची दिशा तुमचं लक्ष ठरवते आणि धनुष्याची पकड तुमचा आत्मविश्वास दर्शवते. आज आपण धनुर्विद्येचा सराव करणार आहोत."

"गुरुदेव, आपले लक्ष काय आहे आज?"

"आपले लक्ष त्या पक्षाचा डोळा आहे." द्रोणाचार्य म्हणाले तसे सगळे त्यांनी बोटाने दाखवलेल्या झाडाच्या फांदीवरील लाकडी पक्षाकडे बघू लागले.

"हे कसं जमेल आपल्याला?" "कसं शक्य आहे..." मागे कुजबुज सुरु झाली.

"दुर्योधन, मला सांग, तुला काय दिसते?"

"झाड, पान, फुलं, लाकडी पक्षी, त्याच्या मागचा खरा पक्षी."
"युधिष्ठिर, तू सांग, काय दिसते आहे."

"लाकडी पक्षी....आणि फांदी आणि झाड... आणि गुरुदेव मागचा पक्षी आत्ताच उडला." आपलं काहीतरी सुटत तर नाही ना ते बघत त्याने पुढे सांगितले, "गुरुदेव, आत्ताच सुर्यदेवांना ढगाने झाकलेले आहे."
आपण किती योग्य आणि खरं उत्तर दिलं म्हणून युधिष्ठिराला शांत आणि समाधानी वाटत होतं.
"धन्य आहेस. भीम तुला काय दिसते?"
"गुरुदेव, मला भविष्यातली फळे दिसत आहेत."
"काय?"
"ती बघा गुरुदेव, ती झाडांवरची फुले. डाळिंबाची आहेत. काही वेळात त्याच मस्त डाळींब बनेल." त्याने पोटावर हात फिरवत म्हटले.
"भीम, आपण इथे भोजनाकरता आलेलो नाही."
"क्षमा असावी गुरुदेव."
"अर्जुन, तुला काय दिसते आहे?"
"फक्त डोळा दिसतो आहे गुरुदेव...."
द्रोणाचार्य मनातून आनंदित झाले.
"बाण संधान कर."
अर्जुनाने धनुष्य उचलले, विशिष्ट अंशात पकड घट्ट केली. बाणाच्या एका बाजूला अंगठा तर तर्जनी- मध्यमा दुसऱ्या बाजूला धरून बाण प्रत्यंचेवर नेमत ताणला. ताण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आल्यावर बाणावरचा सगळा ताण एकदम काढून घेतला. साप्प्प....
सर्वजण बघत राहिले. पक्षाच्या बुबुळाला छेदून बाण आरपार घुसला होता. द्रोणाचार्यांनी आनंदाने मान डोलावली.
"धनुर्विद्येत निपुण झाला आहेस तू, अर्जुन. सर्वश्रेष्ठ धनुर्धारी. आयुष्यमान भवं!"
भीष्माचार्यांना द्रोणाचार्यांनी दिलेले वचन आज त्यांच्या शिष्याने पूर्ण केले होते. अर्जुनला सर्वोत्तम धनुर्धारी बनवण्यात यशस्वी झालेले द्रोणाचार्य ही वार्ता भीष्माचार्यांना ऐकवायला आतूर झाले होते.
वनातून ते निघणार तितक्यात एक कुत्रा दिसला. द्रोणाचार्य बघतच राहिले. त्याचे तोंड बाणांनी भरलेले होते. आणि आश्चर्य म्हणजे.....ना त्याला कुठे जखम झाली होती आणि ना रक्त आलेले दिसत होते. ते ती अद्वितीय कला स्तब्धपणे बघत उभे राहिले.
'या वनात असा कोण आहे जो इतक्या कुशलतेने बाण चालवू शकतो?' त्यांनी इकडे तिकडे नजर टाकली. दूर कुठेतरी कोणीतरी असल्याचा भास झाला. द्रोणाचार्य तिथे गेले. समोर एक त्यांच्या शिष्याच्या वयाचा तरूण उभा होता.
"प्रणाम" त्याने द्रोणाचार्यांना पाहताच पुढे येऊन नमस्कार केला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद दाटून आला होता.
"तू कोण आहेस?"
"एकलव्य!"
त्यांना काहीतरी आठवलं...'आपला शिष्य बनण्याची इच्छा घेऊन आलेला लहान वयातला हिरण्यधनूचा पुत्र! शृंगबेर राज्यातला.... आज इतका कुशल धनुर्धारी झाला?'
"तू.... तोच ना?"
"हो."
"त्या श्वानाच्या मुखात बाण तूच मारलेस?"
"हो, माझ्या साधनेमध्ये व्यत्यय येत होता त्याच्या भुंकण्यामुळे."
"अतिसुंदर! कोण आहेत तुझे गुरु? मला त्यांची भेट घ्यायला आवडेल."
"हे बघा गुरुदेव...." त्याने पुर्वेच्या दिशेने बोट दाखवले. तिथे एक पुतळा होता. तंतोतंत द्रोणाचार्यांसारखा दिसणारा.
"हा तर माझ्या सारखा दिसणारा पुतळा आहे."
"कारण तुम्हीच आहात माझे गुरु."
"काय? पण मी तर तुला शिकवले नाही काहीच. आणि मला आठवतयं, मी तुला नकार दिला होता...."
"हे सांगून की तुम्ही केवळ कौरवांना शिक्षा देण्यास बांधिल आहात आणि मी कौरव नाही." शांत चेहऱ्याने वाक्यपूर्ण करत तो म्हणाला. "आठवते आहे, गुरुदेव."
"मग इथे माझा पुतळा कसा?"
"गुरुदेव, तुम्ही मला शिष्य मानले नाहीत पण माझ्यासाठी तुम्हीच माझे गुरु आहात. या तुमच्या पुतळ्याकडे बघत तुमची प्रेरणा घेऊन मी लक्ष भेद करायला शिकलो गुरुदेव. "
"तू बनवलास हा पुतळा?"
त्याने होकारार्थी मान हालवली.
लांब राहून धनुर्विद्येत पटाईत झालेल्या, न शिकवताही आपल्याला गुरु मानणाऱ्या शिष्याकडे द्रोणाचार्य कौतूकाने बघत होते. एकाएकी त्यांच्या डोळ्यात चिंता उतरली हस्तिनापुरची.... उद्या याने हस्तिनापुर विरूध्द हत्यार उचलले म्हणजे? त्यांच्या कानात घोळू लागला भीष्माचार्यांना दिलेला शब्द.....! 'अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनेल.'
....आणि काही क्षणात चेहऱ्यावरचे भाव बदलले.
"पण तू हे सगळे केलेस ते गुरुंची आज्ञा आणि अनुमती न घेता?"
"क्षमा असावी गुरुदेव. पण एकदा तुम्हाला गुरु मानल्यावर दुसऱ्या कुणाला गुरु बनवणे पाप होते माझ्यासाठी."
"तू मला खरचं गुरु मानतोस?"
"हो, गुरुदेव." तो हात जोडून उभा होता.
"मग गुरूदक्षिणा देणार नाहीस?"
"का नाही गुरुदेव? सांगा, काय देऊ शकतो हा एकलव्य त्याच्या गुरुंना ज्याने गुरु प्रसन्न होतील?"
त्याचा नम्रपणा, लाघवी बोलणं..... एकीकडे शब्द आणि एकीकडे एकलव्य! शब्दांचं पारडं नेहमीच जड का होते अश्यावेळी? त्यांनी मन कठोर केले.
"उजव्या हाताचा अंगठा."
"जशी आपली आज्ञा...." त्याने नमस्कार केला. कंबरपट्याला बांधलेला सुरा काढला. डाव्या हातात धरला. उजव्या हाताच्या अंगठ्याच्या बुंध्यावर सरर् कन फिरवला. 'आह्ह..' ऱक्ताचा फवारा उडला. रक्ताळलेला अंगठा द्रोणाचार्यांसमोर धरत म्हणाला, "गुरुदेव, आपली गुरुदक्षिणा!"
द्रोणाचार्यांच्या डोळ्यांत पाणी उभे होते. मनात कोलाहल माजला होता...... 'हे काय केलं आपण! आपल्या शब्दाची किंमत एकलव्य सारख्या सर्वोत्तम धनुर्धाऱ्याला चूकवावी लागते? ते ही अशी? हे काय केलेस द्रोण? कश्याकरता? अर्जुनाकरता? आपली परवानगी न घेता एकलव्य आपल्याला गुरु मानून शिकला म्हणून ही शिक्षा? त्याच्या विद्येचा वापर त्याला लिलया करता येऊच नये म्हणून ही दक्षिणा मागितलीस? की.....आपणही हस्तिनापुरचे दास झालेलो आहोत.....भीष्माचार्यांसारखे? ज्याला हस्तिनापुर, स्वतःचा शब्द आणि कौरव इतकेच दिसतात. बाकी सारे कवडीमोल. मग हा एकलव्य असो, अथवा त्याची आपल्यावरची श्रद्धा. ज्याला खरतर आपण काहीच शिकवले नाही, त्याने एकही प्रश्न न विचारता अशी भयंकर गुरुदक्षिणा द्यावी? चेहऱ्यावर एकदाही रागाचा लवलेश नाही.... गुरुबद्दलच्या विश्वासात तसूभरही फरक नाही..... असेही शिष्य मिळू शकतात? इतकाही भाग्यवान कुणी गुरु असू शकतो? .... आणि इतका दुर्दैवी कुणी शिष्य असू शकतो? तू सर्वोत्तम धनुर्धारी होतास, एकलव्य. आणि आता सर्वोत्तम शिष्य आहेस. अभिनंदन तरी कसे करू मी तुझे??? कारण सर्वोत्तम असण्याचा मान तू इथेही पटकवलास माझ्या सर्व शिष्यांना हरवून!'
त्यांच्या तोंडून नकळत बाहेर पडले, "किर्तीमान भवं, पुत्र! किर्तीमान भवं!!"
एकलव्याच्या हातातून होणाऱ्या रक्तस्त्रावाकडे त्यांचे लक्ष गेले. तो अजूनही हातात कापलेला अंगठा घेऊन उभा होता..... नम्रपणे, मान खाली घालून आणि गुरुंची भेट घडली हे समाधान घेऊन!

©मधुरा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जेव्हा पासून मी द्रोणाचार्यांचा हा प्रसंग वाचला आहे तेव्हा पासून गुरु शिष्या चा आदर्श दाखला म्हणून द्रोण अर्जुन कधीच नाही सांगत, यापेक्षा परशुराम-भीष्माचार्य नक्कीच श्रेष्ठ.
तसेच एके ठिकाणी वाचल्याचे आठवते अश्वत्थामाला आणि अर्जुनाला एकत्र शिकवत असताना, ब्रह्मास्त्र केवळ आपल्या मुलालाच मिळावे/शिकवावे म्हणून दोघांकडे एक पात्र देत नदी वरून पाणी आणण्यासाठी, अर्जुनाला छिद्र असलेले पात्र, साहजिकच त्याला वेळ लागे, तोपर्यंत ते ब्रह्मास्त्राचे मंत्र आपल्याला मुलाला शिकवीत असत.

च्रप्स, शितल, तुमचा राग मी समजू शकते. राग येण्यासारखेच आहे ते. आणि म्हणूनच कदाचित द्रोणाचार्यांचा अधर्माने वध करणे कृष्णालाही अयोग्य वाटले नाही.

खरे आहे, अशोक.

युद्धाने ज्यांच्या बळी घेतला त्यांच्यातल्या काही जणांनी त्यांच्या पापाची शिक्षा भोगली आणि काही जण खडतर शापित जन्मापासून मोकळे झाले.

एकलव्याला (हे त्याला द्रोण प्रकरणानंतर मिळालेले नाव आहे) द्रोणांच्या पुतळ्याने विद्या शिकवली का? Proud

द्रोणांनी एकलव्याला अनुग्रह नाकारल्यानंतरही, कौरव-पांडवांना शिकवतांना द्रोणांची शिकवण चोरून ऐकून कपटाने विद्या आत्मसात केल्याबद्दल एकलव्याला द्रोणासारख्या ब्राम्हणाकडून खरं तर शाप मिळायला हवा होता. पण लहानांना शाप देऊ नये म्हणून कपटाने मिळालेल्या विद्येचा ऊपयोग करता येणार नाही अशी सौम्य तजवीज द्रोणांनी केली. ह्याच कृतीसाठी (कपटाने विद्या मिळवण्यासाठी) परशूरामांनी कर्णाला जीवावर बेतणारा शाप दिला होता.
सत्याच्या जवळ जाणारे लिहायचे आहे की आपल्या आवडत्या वा सहानुभूती असलेल्या पात्रांबद्दल सोयीस्कर सत्य लिहायचे असे आहे? Lol

सौम्य तजवीज>>> सौम्य तजवीज????? मग सरळ स्वतःचा दास का बनवून घेतले नाही? अंगठा का मागितला???
आणि विद्या अशी लपून शिकता येते? आणि वर त्यात इतके तरबेजही होता येते? जितके तरबेज त्यांचे स्वतःचे शिष्य झाले नाहीत?

जितका वेळ एकलव्याने धनुर्धारी शिकायला लावला असेल, तो किमान १ वर्ष असेल असे धरू. त्या एका वर्षात हे द्रोणाचार्यांच्या लक्षात आले नसते का, की कोणीतरी चोरून पाळत ठेवतो आहे?

जे करणे खुद्द द्रोणाचार्यांना करणे अशक्य वाटत होते, ते त्यांच्याकडून चोरून विद्या शिकलेल्या एकलव्याला जमेल????
स्व अध्ययन केले होते त्याने.

आणि शापाचे म्हणाल तर शाप देण्याकरता राग यायला हवा. द्रोणाचार्यांना राग आला नव्हता, असेच सिद्ध होते.

बाकी तुम्ही लिहिलात तो मुद्दा द्रोणाचार्यांच्या मुखी लिहिला आहेच की आज्ञेविना आणि अनुमती विना गुरु मानले होते त्याने. ते ही चूकीचे आहे. पण इतकी मोठी शिक्षा देण्याइतके नाही.

हायझेनबर्ग, तुमचे म्हणणे मान्य केले तर मग पडलेले प्रश्न:
एकलव्याला द्रोणाचार्यांचा पुतळा बनवण्याची गरज काय होती?
चोरूनच शिकला होता, तर तुम्हीच माझे गुरु हे त्याने द्रोणाचार्यांना का सांगितले?
चोरून केलेली गोष्ट कुणी अभिमानाने सांगेल का?

एकलव्य धनुर्विद्या एडिसन प्रमाणे शिकला असावा, हजारो प्रयोग करून तंत्रशुद्ध व अतिशय यशस्वी पध्दत शोधून तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनला. पण द्रोणाचार्यांच्या पुतळ्याला साक्ष ठेवून, त्या पुतळ्याला गुरू मानून तो हे शिकला ही त्याची श्रद्धा होती. जी आपल्याला अंधश्रद्धा वाटते.
गुरू द्रोणाचार्य यांना अर्जुनाने पेचात टाकले की तुम्ही केवळ मलाच सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनविण्याचे वचन दिले आहे मग हा एकलव्य तुम्हाला गुरू मानतोय, त्यामुळे तोच तुमचा सर्वश्रेष्ठ धनुर्धर शिष्य ठरत आहे. नाईलाजाने अर्जुनाचे समाधान करण्यासाठी द्रोणाचार्यांनी एकलव्याकडे गुरुदक्षिणा मागितली. असे मला वाटते.

एकलव्य धनुर्विद्या एडिसन प्रमाणे शिकला असावा, हजारो प्रयोग करून तंत्रशुद्ध व अतिशय यशस्वी पध्दत शोधून तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनला. पण द्रोणाचार्यांच्या पुतळ्याला साक्ष ठेवून, त्या पुतळ्याला गुरू मानून तो हे शिकला ही त्याची श्रद्धा होती.

>>>> द्रोण - एकलव्य या प्रकरणावर हे सर्वात जास्त तार्किक विवेचन वाटतय. एकलव्याविषयी नेहमीच सहानुभुती वाटत आलीय.

सत्याच्या जवळ जाणारे लिहायचे आहे की आपल्या आवडत्या वा सहानुभूती असलेल्या पात्रांबद्दल सोयीस्कर सत्य लिहायचे असे आहे?>>>> अगदी सहमत...
शास्त्रांवर आपल्या मर्यादीत मन, बुद्धी आणि अनुभवांनुसार लिहिणे केवळ अशक्य आहे.

सत्याच्या जवळ जाणारे लिहायचे आहे की आपल्या आवडत्या वा सहानुभूती असलेल्या पात्रांबद्दल सोयीस्कर सत्य लिहायचे असे आहे? Lol

Submitted by हायझेनबर्ग on 15 August, 2019
>> हाब भाऊ, आपल्या सारख्या जेष्ठाकंडून असे प्रतिसाद मला अपेक्षित नाहीत. Sad

एकलव्य धनुर्विद्या एडिसन प्रमाणे शिकला असावा, हजारो प्रयोग करून तंत्रशुद्ध व अतिशय यशस्वी पध्दत शोधून तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनला. पण द्रोणाचार्यांच्या पुतळ्याला साक्ष ठेवून, त्या पुतळ्याला गुरू मानून तो हे शिकला ही त्याची श्रद्धा होती.>>>>>>> सहमत.

पद्म, हायझेन, मी दोन्ही बाजू दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. पुढचा भाग वाचा आणि ठरवा की मी खरचं एकांगी लिहिते आहे का ते!
मी कोणत्या एकाच पात्राच्या बाजूने नाही.

<<<ह्याच कृतीसाठी (कपटाने विद्या मिळवण्यासाठी) परशूरामांनी कर्णाला जीवावर बेतणारा शाप दिला होता.>>> कर्ण परशुरामाकडे राहून विद्या शिकला होता.. खोटा बोलून परंतु एकलव्य काय खोटा बोलला? लपून विद्या शिकता येते?
हे म्हणजे असा झाला गूगल वर स्टडी करून upsc pass झालेल्याने गूगल ला ट्युशन fee द्यावी.

आणि विद्या अशी लपून शिकता येते? आणि वर त्यात इतके तरबेजही होता येते? जितके तरबेज त्यांचे स्वतःचे शिष्य झाले नाहीत? > चोरून शिकून त्यात तरबेज न होता येण्यास काय झाले? अभिमन्यू चक्रवुव्ह रणनिती कसा शिकला? गुरूच्या मुर्तीकडून शिकली ह्याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा चोरून शिकली हे पटणे कितीतरी सोपे आहे.
मुर्ती कडूनच शिकायचे होते तर तो आपल्या स्वतःच्या राज्यात (मगध, ज्याचा जरासंध राजा होता आणि एकलव्याचे वडील त्याच्या पदरी सेनेत होते.) जाऊन शिकला असता. हस्तिनापुरात जिथे द्रोणाचार्य कुरू राजकुमारांना शिकवत तिथे एकलव्याचे असण्याचे काय प्रयोजन? प्रयोजन एकच त्याला चोरून ज्ञान मिळवायचे होते.

ईथे तुम्ही म्हणाल गुरूच्या मुर्तीने विद्या शिकवली पुढच्या लेखात तुम्ही म्हणत आहात एलकव्य 'स्व-अध्यापनाने' शिकला. "स्वअध्यापन " ??? हे काय असते. अध्यापकाने जे आधी शिकून घेतले आहे त्याचे तो अध्यापन करतो. म्हणजे जे एकलव्य जे शिकला होता तेच त्याने स्वतःला शिकवले असे म्हणायचे आहे का Lol

दुर्दैवाने गूगल वगैरे तेव्हा अस्तित्वात नसल्याने गुरूचा अनुग्रह झाल्याशिवाय ज्ञान मिळवता येत नसे. कृष्ण सर्वज्ञ देव होता असे तुम्ही म्हणालात पण तसे असूनही ज्ञान मिळण्यासाठी तो सांदिपनी ऋषींच्या आश्रमात गेलाच.
आणि अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर त्या काळी ही होते. स्वतः भीष्म होते, परशुराम होते...कर्ण आला.. पुढे भीमाचा नातू बाबरिक वगैरे आले ज्याचा कृष्णाने कपटाने अंत केला.

मला वाटले एवढ्या पॅशनने अभ्यासातून तुम्ही काही लॉजिकल गोष्टी सांगाल पण हे तर टीवी मालिकांमध्ये पाहिलेले चमत्कारपूर्ण महाभारतच झाले. लोकांना लॉजिकपेक्षा चमत्कार वाचायला आवडते तेव्हा चालू द्या.

हायजेनबर्ग भाऊ जबरदस्त. मला आपण महाभारत लिहावं असं वाटतं. प्रत्येक वेगळ्या नजरेतून लिहिलेले महाभारत आनंद देईल व माबोवर सकस साहित्यात भर पडेल.

अक्कु Lol Lol

हायझेनबर्ग, एडिसन कसा शिकला? आर्यभट्ट कसे शिकले?

आणि एक महत्त्वाचा प्रश्न.... जर तुम्हाला यात लॉजिक वाटत नाही, तर कश्यात वाटते?

स्पायडर मॅन दाखवला की मस्त आणि शक्तीमान दाखवला की बालिश ?

अमर म्हणतात, तसे खरचं तुम्ही लिहा की तुमच्या दृष्टीने महाभारत हे नाही पटत तर....

अजून एक.... यात काहीच चमत्कार नाही. स्वतःचं स्वतः शिकणे यात कसला आलाय चमत्कार?

आणि अभिमन्यू चोरून शिकला नाही. एकदा प्रतिक्रिया देण्या आधी विचार करा, वाचा किंवा निदान लोकांना विचारा.

अभिमन्यूच्या शिकण्यात, कर्णच्या शिकण्यात आणि एकलव्याच्या शिकण्यात फार मोठ्ठा फरक आहे.

वनात एकाग्रतेने शिकता येते म्हणून तो वनात होता जसे हे राजकुमार वनात होते राजवाड्या ऐवजी.

इडिसन कसा शिकला? आर्यभट्ट कसे शिकले? >> ते शास्त्रज्ञ होते. प्रयोगातून शिकले त्यांना शिकवायला पुस्तके, ईतर मार्गदर्शक, प्रौढ वयात अभ्यासातून आलेले शहाणपण होते. ते जे शिकले ते ज्ञान होते, विद्या नव्हे. ज्ञानार्जन आणि विद्याभ्यास वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांची तुलना अयोग्य आहे.
ही मुले आहेत आणि ती शास्त्रज्ञ नाहीत. धनुर्विद्या ही विद्या आहे जशी कुस्ती, क्रिकेट, फुटबॉल. ते काही पोथ्या-पुराणे, वेद वाचून विज्ञान किंवा धर्मज्ञान शिकण्यासारखे "ज्ञान" नाही. जसे पुस्तक वाचून क्रिकेटचे ज्ञान मिळेल पण क्रिकेट खेळता येणार नाही तसे.

आचरेकरांचे शिष्य एखादा तेंडुलकर बनतो एखादा कोणीच बनत नाही. समजा एखाद्याने त्यांच्या क्लासची फी न भरता ग्राऊंडवर बाजूला ऊभे राहून त्यांच्या सूचना नुसत्या ऐकल्या आणि घरी जाऊन त्यांच्या फोटोसमोर बॅटिंग प्रॅक्टिस केली ह्याचा अर्थ त्याला फोटोने शिकवले किंवा तो "स्वअध्यापनाने" शिकला असा होत नाही.

आणि अभिमन्यू चोरून शिकला नाही. एकदा प्रतिक्रिया देण्या आधी विचार करा, वाचा किंवा निदान लोकांना विचारा.> चोरून शिकला असे मी म्हणालो नाही. गुरूने थेट न शिकवता देखील विद्या मिळवता येते ह्याचे उदाहरण सांगितले. कोणी तरी विद्या सांगितली तेव्हाच अभिमन्यू ती आत्मसात करू शकला ना? की त्यानेही "स्वअध्यापनाने" स्वतःला चक्रव्यूह भेदणे शिकवले असे तुम्ही म्हणता आहात.

अभिमन्यूच्या शिकण्यात, कर्णच्या शिकण्यात आणि एकलव्याच्या शिकण्यात फार मोठ्ठा फरक आहे. >> काय फरक आहे? सांगता का?

वनात एकाग्रतेने शिकता येते म्हणून तो वनात होता जसे हे राजकुमार वनात होते राजवाड्या ऐवजी.>> मगध आणि हस्तिनापूर मधल्या शेकडो मैलांमध्ये एकाग्रता साधण्यासाठी एकच वन होते असे म्हणायचे आहे का?.

Pages