गेले कित्येक महिने माझं एफएम ऐकणं जवळपास बंद झालंय. घरची मंडळी आणि मित्रमंडळी ह्यांच्या धाकदपटशाला बळी पडून मी माझा बाबा आदमच्या काळातला स्मार्टफोन एकदाचा बदलला. नव्या फोनमध्ये स्पीलबर्गच्या ज्युरासिक पार्कातल्या तमाम डायनासॉर्सना पुरून उरेल इतकी जागा. आधी एखाद-दुसर्या पॉडकास्टचे एपिसोडस डाऊनलोड करून ऐकत होते. आता पॉडकास्ट अॅप इन्स्टॉल केल्यावर साहजिकच पॉडकास्टची संख्याही वाढली. तसंही आरजेजच्या बाष्कळ बडबडीला वैतागले होतेच. त्यामुळे एफएमला रामराम ठोकला. पण मध्यंतरी सर्दीने डोकं जाम झालेलं आणि खोकून खोकून बरगड्या दुखायला लागलेल्या अश्या ‘कुछ लेते क्यो नही’ स्थितीत पॉडकास्टस ऐकवेनात. तेव्हा पुन्हा एफएम लावायला सुरुवात केली. एक दोन वेळा गोल्डन एरातली गाणी मिळाल्यावर ‘इथेच टाका तंबू’ केलं. ही गाणी म्हणजे सर्दीवर व्हिक्स, टायगर बाम वगैरेंपेक्षाही अक्सीर इलाज आहेत. ‘कामधाम घरदार’ इतकंच काय तर ठणकणारं डोकं, दुखणारा घसा सुध्दा विसरले. अश्यातच कुठल्याश्या चॅनेलवर एकदा ‘खोया खोया चांद’ लागलं आणि एकदम लक्षात आलं ‘अरेच्चा! काला बाजार पाहिला नाहीये की अजून’. लगोलग डाऊनलोड केला, गेल्या विकांताला पाहिला. तेव्हा आता तुम्हांला बरोबर घेऊन जायला आलेय. येताय ना ‘काला बाजार’ बघायला? चला तर मग. पण छत्री घ्या बरं का सोबत. मुंबईचा पाऊस आहे. कधी येईल काही सांगता येत नाही.
मुंबईची तुंबई होत नव्हती तेव्हाच्या काळातले रस्ते. माणसांचा पूर नव्हता आलेला तेव्हा. रस्त्यावर उभी एक बस. आताचे कंडक्टर्स ‘पुढे चला’ चा घोष करतात. हा कंडक्टर उभ्या असलेल्यांना उतरायला सांगतोय. बहुतेक तेव्हा उभ्याने प्रवास करायला बंदी असावी. सगळे उभे प्रवासी उतरतात. एक मात्र कंडक्टरशी हुज्जत घालू लागतो. त्याच्या तोंडून अपशब्द बाहेर पडताच कंडक्टरही खवळतो. बाचाबाची होते. मारामारी होते. आणि त्याचं पर्यवसान म्हणून कंडक्टर रघुवीरची नोकरी जाते. घरी आजारी आई (ती तर तेव्हाच्या नायकांच्या पाचवीलाच पुजलेली असायची!), एक तरुण बहिण (नणंद नाही अशी हिंदी चित्रपटातली नायिका विरळाच!) आणि शाळेत शिकणारा लहान भाऊ. चरितार्थ चालवण्याची जबाबदारी रघुवीरवर. पैसा कसा मिळवावा ह्या विवंचनेत शहरात भटकत असताना रघुवीरची नजर चित्रपटगृहांच्या बाहेर तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्या लोकांकडे जातं. पैसा कमावण्याचा हा चांगला मार्ग आहे हे त्याच्या लक्षात येतं. बँकेतून ५००० रुपये काढलेल्या एका गृहस्थाचा, अॅडव्होकेट देसाईचा, त्याच्या हॉटेलपर्यंत पाठलाग करून रघुवीर त्याची बॅग लंपास करतो. ह्या पैश्यांचा उपयोग करून तो आणि तिकिटांचा काळा बाजार करणारा एक माणूस एका चित्रपटगृहातली ‘मदर इंडिया’ च्या प्रीमियरची तिकिटं खरेदी करतात. परिणामी चित्रपटगृहाच्या बाहेर ‘Sold Out’ ची पाटी लागते. रघुवीर ब्लॅकने तिकिटं विकायला माणसं गोळा करतो.
प्रीमियरच्या दिवशी चित्रपटगृहाबाहेर अफाट गर्दी जमते. तरीही रघुवीर आणि त्याच्या माणसांकडून तिकिटं घ्यायला कोणी येत नाही. पण जसजसे प्रीमियर पाहायला चित्रपटसृष्टीतले कलाकार येऊ लागतात तसतशी तिकिटांची मागणी आणि त्यांना मिळणारा भाव चढत जातात. शेवटच्या ५ उरलेल्या तिकीटांचा तर अक्षरश: लिलाव होतो. किंमत प्रत्येकी १०० रुपये.
रघुवीरचा धंदा धोधो चालायला लागतो. तो स्वत:चं घर घेऊन तिथे आपल्या कुटुंबियांना घेऊन येतो. आता मुंबईतल्या प्रत्येक चित्रपटगृहाबाहेर आपल्याच माणसांनी धंदा केला पाहिजे असं त्याला वाटू लागतं. इथे त्याला आडवा येतो गणेश. त्याचाही तिकिटांचा काळा बाजार करायचा धंदा असतो. पण रघुवीर त्यालाही धोबीपछाड घालतो. त्यामुळे गणेश आणि त्याचे लोक रघुवीरसाठी काम करायला तयार होतात.
आणि अश्यात एक दिवस रघुवीरच्या आयुष्यात अचानक अलका येते. होतं काय की एका चित्रपटगृहाबाहेर रघुवीर उभा असताना एक कॉलेज तरुण नंद आपल्या मित्रमैत्रिणींसोबत चित्रपट पाहायला येतो. तिकिटं शिल्लक नसतात तेव्हा तो ब्लॅकमध्ये तिकीटं घ्यायचं ठरवतो. त्याचा एक मित्र त्याला म्हणतो की अलकाला कळलं तर ती तिकिटं फाडून टाकेल. होतं तेच. अलकाला जेव्हा तिकिटं ब्लॅकमध्ये घेतल्याचं कळतं तेव्हा भडकून ती नंदसमोरच तिकिटं फाडून त्याच्या हातात देते. तिला अश्या गोष्टी अजिबात पसंत नसतात. अलकाच्या वागण्याने थोडा चकित झालेला पण तिच्याकडे आकर्षित झालेला रघुवीर दुसर्या दिवशी तिचा आणि नंदचा पाठलाग करतो. त्यांचं बोलणं ऐकून त्याला प्रथम जाणवतं की शिक्षणाचं माणसाच्या आयुष्यात काय महत्त्व आहे. त्याचे वडील गेल्यामुळे त्याच्या आईला त्याला आठवीतच शाळेतून काढून टाकावं लागलेलं असतं.
पण ही चूक सुधारायची संधी त्याला लवकरच मिळते. एके रात्री शहरातून फिरत असताना एका गरीब आजारी माणसाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारा एक तरुण त्याला दिसतो. रघुवीर त्या माणसाला डॉक्टरकडे घेऊन जायला त्या तरुणाला मदत करतो. तो तरुण चांगला शिकलेला दिसत असतो पण बेकार असतो म्हणून रघुवीर ‘त्याला मला शिकवशील का’ असं विचारतो. त्याला त्यासाठी आपल्या घरी रहायला घेऊन येतो. पण अभ्यास करत असतानाही रघुवीर नंद आणि अलकाचा पाठलाग सुरु ठेवतो. तेव्हा त्याला नंद पुढील शिक्षणासाठी २ वर्षं विलायतेला जाणार असल्याचं कळतं. अलका दोन वर्षं अलग राहावं लागणार म्हणून खट्टू होते. पण नंद तिला समजावतो की आपलं प्रेम खरंच आहे का नुसता अल्लडपणा आहे हे कळायला आपण असं वेगळं रहाणं गरजेचं आहे. दूर राहूनही आपलं प्रेम कायम राहिलं तर आपलं खरंच एकमेकांवर प्रेम आहे. नाही राहिलं तर लग्न व्हायच्या आधीच ते कळलं म्हणून देवाचे आभार मानू. नंद युनिव्हर्सिटीमध्ये पहिला येतो आणि ठरल्याप्रमाणे २ वर्षांसाठी विलायतेला निघून जातो. एयरपोर्टवर त्याला निरोप द्यायला आलेल्या अलका आणि तिच्या आईवडिलांच्या मागेच रघुवीरही उभा असतो. तिथेच त्याला अलका आणि तिचे आईवडिल उटीला चाललेत हे कळतं. मग काय विचारता? तो त्यांच्या ट्रेनमध्येच नाही तर चक्क त्यांच्या कंपार्टमेंटमध्ये बसून उटीला जायला निघतो. एव्हढंच काय तर अलकाच्या वडिलांना प्रवासात पाठीत दुखायला लागल्यावर त्यांची पाठ चोळून द्यायच्या निमित्ताने त्यांच्याशी ओळखही करून घेतो.
उटीत पोचल्यावर रघुवीर अलकाला पटवण्याचा बराच प्रयत्न करतो. आधी तर ती त्याला अजिबात धूप घालत नाही. पण नंतर मात्र तीही त्याच्या प्रेमात पडते. अर्थात जेव्हा रघुवीर स्पष्टपणे तिला आपल्या तिच्यावरच्या प्रेमाची कबुली देतो तेव्हा मात्र ती आपला नंदशी साखरपुडा झाला असल्याचं सांगून टाकते. तिचा नाईलाज असतो. व्यथित झालेला रघुवीर तिच्या आयुष्यातून निघून जायचा निर्णय घेतो. मात्र मुंबईला परतण्याआधी तो तिला सांगतो की ह्यापुढे तो कधीही कुठलंही वाईट काम करणार नाही. अर्थात अलकाला त्याच्या व्यवसायाबद्दल काहीच माहिती नसते म्हणा.
मुंबईला आल्यावर रघुवीरला कळतं की त्याच्या आईचं डोक्याचं दुखणं बळावलंय आणि तिचं ऑपरेशन करावं लागणार आहे. दरम्यान एका मारामारीत त्याच्या एका माणसावर चाकूहल्ला होतो आणि तो त्यात मरतो. त्याच्या अकस्मात मृत्यूने हादरलेला रघुवीर हा वाईट धंदा सोडून द्यायचं ठरवतो. अॅडव्होकेट देसाईना त्यांचे ५००० रुपये परत करतो. त्याच्यासोबतचे बाकीचे लोकही तिकिटांचा काळा बाजार सोडून देऊन प्रामाणिकपणे रस्त्यावर छोट्यामोठ्या वस्तू विकायचा धंदा करायला तयार होतात. पण खूप मेहनत करूनही पूर्वीइतका पैसा मिळत नाही. त्यामुळे गणेश त्या सगळ्यांना चिथावतो. रघूने कितीही समजावलं तरी काही परिणाम होत नाही. अगदी सुरुवातीला जो माणूस त्याच्यासोबत असतो तो सोडला तर बाकी सगळे तिकिटांचा काळा बाजार करायला पुन्हा सुरुवात करतात. पण रघुवीर सहजासहजी हार मानणाऱ्यातला नसतो. तो त्यांना पुन्हा चांगल्या धंद्याकडे वळवायचं आव्हान स्वीकारून त्यांच्यासाठी एक ‘सफेद बाजार’ काढतो जिथल्या दुकानांत ते लोक साड्या आणि इतर वस्तू नेकीने विकायला सुरुवात करतात.
नेमकी ह्याच वेळेस अलका पुन्हा त्याच्या आयुष्यात येते. अजूनही त्यांच्या नात्यावर नंदचं सावट असतं तेव्हा रघुवीर तिला काय तो एक निर्णय घे असं सांगतो. एव्हढ्यात विलायतेत नंद नापास झाल्याची बातमी येते. तो एखाद्या विदेशी स्त्रीच्या मागे लागून अभ्यासात दुर्लक्ष झाल्यामुळे नापास झाला असावा अशी समजूत करून घेऊन अलका त्याला ‘आपला संबंध संपला’ म्हणून पत्र घालते आणि रघुवीरला वडिलांना भेटायला घरी बोलावते. तोच नंद भारतात परत आल्याचं तिला कळतं. तिचा पुन्हा नाईलाज होतो. रघुवीरला तिच्या वडिलांना न भेटताच परत जावं लागतं. नंदला रघुवीरबद्दल कळलेलं असतं. अलकाचं रघुवीरवर प्रेम आहे हे त्याला जाणवतं. त्याचंही एका फ्रेंच मुलीवर प्रेम असतं. तो समजूतदारपणे अलकाच्या रस्त्यातून बाजूला होतो. अलका आणि रघुवीरच्या प्रेमाची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण व्हायची चिन्हं दिसू लागतात. तोच गणेशच्या तक्रारीवरून पोलीस रघुवीरच्या घरी येऊन थडकतात. काळा बाजार केल्याचा, गुंड लोक पदरी बाळगल्याचा, दंगेधोपे करवून आणल्याचा असे अनेक आरोप त्याच्यावर असतात. रघुवीरची आई हे सगळं ऐकते तेव्हा आपलं वैभव काळा बाजार केल्याच्या पैश्यातून आलंय हे त्याला तिच्यापाशी कबूल करावं लागतं. मी आता सुधारलोय अशीही कबुली तो देतो पण ती ते ऐकायला जिवंत रहात नाही. अलकासुध्दा हे सगळं ऐकून हादरते आणि निघून जाते. रघुवीरला अटक होते. क्षणार्धात त्याच्या आयुष्याचं होत्याचं नव्हतं होऊन जातं...
रघुवीरला आपलं आयुष्य सावरायची संधी पुन्हा मिळते? का त्याला पुन्हा काळ्या बाजाराकडेच वळावं लागतं? अलका त्याच्या आयुष्यात परत येते? का त्याच्या नशिबात एकाकी प्रवासच लिहिलेला असतो? कुठल्या वळणाने जाते ही कथा? देवियो और सज्जनो, इन तमाम सवालोंके जवाब पानेके लिये देव और विजय आनंद की लिखी हुई, देव आनंदद्वारा निर्मित और विजय आनंद द्वारा दिग्दर्शित ‘नवकेतन फिल्म्स’ की यह मुव्ही देखेंगे....आप लोग
खरं खरं सांगा मला. ‘काला बाजार’ म्हटल्यावर ‘खोया खोया चांद’ मध्ये दोन्ही हात सैल सोडून धावत सुटलेला देव आणि तळ्याकाठच्या बाकावर बसलेली प्रसन्न चेहेर्याची वहिदा आठवले? का ‘अपनी तो हर आह एक तुफान है’ मधला ‘लेकी बोले सुने लागे’ टाईप्स गाणं म्हणणारा देव आणि वरच्या बर्थवर झोपून ते ऐकणारी वहिदा आठवले? मी सांगू? दोन्ही गाणी आठवली असणार. बरोबर? ‘खोया खोया चांद’ चं शुटींग एव्हढं ढळढळीत प्रकाशात केलंय की बरेच दिवस मला ‘खोया खोया चांद’ म्हणजे ‘आकाशात चंद्र नाहीये, हरवलाय’ ह्या अर्थी आहे असंच वाटायचं. पण तेव्हढं सोडलं तर ते गाणं मला अतिशय आवडतं. विशेषतः ‘कोई जरा ये उनसे कहे ना ऐसे आजमाओ’ ह्या शब्दांवर मी पूर्णपणे फिदा आहे. ‘अपनी तो हर आह एक तुफान है’ बद्दल काय लिहू? एकेक शब्द आकाशातल्या देवाला आणि वरच्या बर्थवर पहुडलेल्या वहीदाला सारखाच लागू पडणारा. उगाच नाही तिची आई दुग्ध्यात पडत. पुन्हा वाद्यांचा आवाज आहे का ट्रेनचा आवाज हे कळणार नाही असं संगीत. गाण्याची माधुरी वाढवणारं. शांत, डोलायला लावणारं, मनातला कल्लोळ संपवणारं. देवाचं भजन म्हणून ऐका. प्रियेबद्दलची गोड तक्रार म्हणून ऐका. सारखंच भावतं. एस. डी. बर्मन आणि शैलेंद्रची किमया. ह्या दोन गोड गाण्यांसोबत ‘रिमझिमके तराने लेके आई बरसात’ हे पावसातलं, ‘सांझ ढली दिलकी लगी' हे रोमँटिक आणि ‘सच हुये सपने मेरे’ हे उडत्या चालीचं अशी आणखी ३ कर्णमधुर गाणी चित्रपटात आहेत. ‘ना मै धन चाहू’ हे ह्यातलं गाणं मी युट्युबवरची प्रत किती चांगली आहे हे तपासून पहाताना दिसलं तेव्हा नंदा आणि लीला चिटणीस ह्या दोघींना पाहून क्षणभर हा ‘हम दोनो’ आहे की काय अशीही शंका आली होती
अरेच्चा! गाण्यांबद्दल लिहायच्या नादात मी जवळपास सगळी कास्ट सांगून टाकली की. रघुवीरची भूमिका देवने आपल्या नेहमीच्या शैलीत केली आहे. आधी कसलाही विधिनिषेध न बाळगता काळा बाजार करणारा, मात्र अलकाला भेटल्यावर आपल्या अर्धशिक्षितपणाची, गुन्हेगारी प्रवृत्तीची जाणीव झालेला, जीवनाची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करणारा, फक्त आपलाच नव्हे तर साथीदारांचा विचार करणारा, अलकावर नितांत प्रेम करणारा उमद्या मनाचा रघुवीर त्याने चांगला साकारला आहे. वहिदा रेहमानने तत्त्वनिष्ठ, थोडी अवखळ, बालिश, प्रेम आणि कर्तव्य ह्यांच्या कात्रीत सापडलेली समजूतदार अलका समजून उमजून उभी केली आहे. नंद झालेल्या विजय आनंदला अभिनय करताना मी प्रथमच पाहिलं. त्याचा अभिनय खूप सहज वाटतो. बर्याचदा देवपेक्षाही कांकणभर अधिक चांगला. चित्रपटात चेतन आनंद असल्याचं सुरुवातीच्या श्रेयनामावलीवरून ध्यानात आलं होतं. पण हा बाबा ‘दिसतो कसा आननी’ हे ठाऊक नसल्याने मी आधी बुचकळ्यात पडले होते की हा आहे तरी कुठे. मग ध्यानात आलं की अॅडव्होकेट देसाई उर्फ ओव्हरअॅक्टिंग की दुकान म्हणजेच चेतन आनंद. प्रिया राजवंशचा भयाण अभिनय म्हणजे ‘ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या’ अश्यातली गत होती हे लगेच जाणवलं. तो थोडासा बलराज साहनीसारखा दिसतो आणि त्यांच्या अभिनयाची बरीचशी नक्कल करतो. शेवटच्या कोर्टातल्या सीनमधली त्याची पुढे झुकून बोलायची ढब पाहिली तर ते लक्षात येतं. ‘एक बार देखा है फिरसे देखनेकी तमन्ना नही’ एव्हढंच त्याच्या अभिनयाबद्दल म्हणेन. नंदा (रघुवीरची बहिण), मदन पुरी (गणेश), लीला चिटणीस (रघुवीरची आई), मुमताझ बेगम (अलकाची आई) हे इतर भूमिकांत दिसतात. हेलनही एका गाण्यात दिसते.
ह्या चित्रपटाबद्दल मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे ह्यात प्रेमकथेला टेकू म्हणून बाकीची कथा येत नाही तर मूळ कथेला जोड म्हणून प्रेमकथा येते. ही कथा परिस्थितीवश वाईट मार्गाला लागलेल्या पण त्यातून सावरू पहाणाऱ्या तरुणाची आहे. ह्या पठडीतले अनेक चित्रपट नंतर आले. पण हा चित्रपट त्यामानाने खूप संयत आहे. 2019 मध्ये हा चित्रपट पाहताना रघुवीरचं अध:पतन होतं तेव्हा आपण चकित होत नाही. किंबहुना ते होणार हे आपल्याला माहित असतं. तो त्यातून बाहेर पडू पाहतो तेव्हाचे त्याचे प्रयत्न मात्र थोडे melodramatic वाटतात. ६० च्या दशकातल्या प्रेक्षकांनासुध्दा असंच वाटलं असेल का? का रघुवीरला वाईट मार्गाला लागताना पाहून ते हळहळले असतील आणि तो सावरताना पाहून खुश झाले असतील? नंद आणि अलका ह्यांचं नातं फार सुरेख दाखवलं आहे. रुढार्थाने नंद नायक नसतानाही. नायिकेचा आधीचा मित्र नालायक, लोभी किंवा लंपट दाखवण्याच्या हिंदी चित्रपटांच्या परंपरेला इथे छेद दिलाय. त्या दोघांमधले संवादसुध्दा सहज वाटतात. त्यांचं अलग होणं सामंजस्याचं वाटतं. कुठेही अश्रुपात नाही की मोठमोठे डायलॉग्ज नाहीत. अर्थात नंदचं स्वत:चं दुसर्या मुलीवर प्रेम नसतं तर अलकाचं दुसऱ्या पुरुषावर प्रेम असणं तो समजून घेऊ शकला असता का हा प्रश्न उरतोच म्हणा.
चित्रपटातल्या काही गोष्टी मात्र खटकतात. उदा. अलकाने रघुवीरला बागेत पाहिलेलं असतं मग ती त्याला ट्रेनमध्ये कशी ओळखत नाही? नंद नापास झाल्याचं कळताच तो कुठल्यातरी दुसर्या मुलीत गुंतला असेल असा निष्कर्ष काढून ती लगेच त्याला आपला संबंध संपला असं पत्र घालते तेव्हा ती त्याच्यापासून दूर व्हायला निमित्त शोधतेय असं वाटतं. रघुवीरलाही ती ‘कभी हां कभी ना’ म्हणून झुलवत रहाते. ‘माझं रघुवीरवर प्रेम आहे आणि मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही’ असं नंदला स्पष्टपणे सांगण्याचं धाडस ती दाखवत नाही हे तिच्या बेधडक स्वभावाशी विसंगत वाटतं. रघुवीर काळा बाजार करायचा सोडतो तरी मोठ्या घरातच रहात असतो हे कसं? धंद्यातल्या त्याच्या बाकीच्या साथीदारांच्या मानाने तो जास्तच सुस्थितीत वाटतो. ५००० रुपये चोरल्यावर त्या पैश्यांतून त्याला एखादा इमानदारीचा धंदा सुरु करून ते पैसे नंतर फेडता आले असते. पण तसं न करता तो डायरेक्ट काळा बाजार करायला सुरुवात करतो हेही थोडं खटकतं. शेवटचा कोर्टाचा सीन बाकी चित्रपटाच्या मानाने बराच शब्दबंबाळ वाटतो. चेतन आनंदच्या ओव्हरअॅक्टिंगमुळे तर तो अधिकच लांबलेला वाटतो.
आणि हो, अलकाला आवडलेलं फूल (हे फूलसुध्दा इतक्या दुरून तिला कसं दिसतं हे मला एक कोडंच आहे!) आणायला गेलेला रघुवीर कड्यावरून खाली घसरतो तेव्हा त्याला वाचवायला अलका स्वत:ची साडी वापरते हा सीन पाहून आश्चर्य वाटलं. सी. आय. डी. तल्या एका गाण्याच्या चित्रिकरणाच्या वेळेस दिलेला ड्रेस आपल्या सभ्यतेच्या मर्यादेत बसत नाही म्हणून त्यावर घालायला ओढणी मिळेपर्यंत चित्रीकरण अडवून धरणारी वहिदा हे दृश्य द्यायला कशी तयार झाली काय माहित. तिच्या अंगावर आधी कोट दाखवलाय पण साडी सोडल्यावरही ती तो अंगावर चढवत नाही. असो.
‘मदर इंडिया’ च्या प्रीमियरचे खरे सिन्स ह्या चित्रपटात वापरलेले आहेत. निम्मी, नादिरा, शम्मी, गीता आणि गुरु दत्त, लता मंगेशकर, किशोरकुमार, कुमकुम, सोहराब मोदी, दिलीपकुमार, रफी, मुकरी, बेबी नाझ, राजेंद्रकुमार वगैरे नटनट्या प्रीमियरला येतानाचं दृश्य पाहून मस्त वाटतं. राजकुमारच्या मागून एक स्त्री येताना दिसते ती कोण ते मात्र कळलं नाही. त्याची पत्नी असेल तर तिला मी प्रथमच पाहिलं. पण विकीवर नसीम बानूचाही उल्लेख आहे - म्हणजे सायराबानूच्या आई - तेव्हा कदाचित त्या असाव्यात. नर्गिससोबत भाऊ अन्वर हुसेनला पाहून मला कळेना सुनील दत्त कुठे आहे. मग लक्षात आलं की ह्या चित्रपटानंतर त्यांचं लग्न झालं होतं गोल्डन एरातल्या अनेक चित्रपटांतून जुन्या मुंबईचं लोभसवाणं दर्शन घडतं ते इथेही पाहायला मिळतं आणि ‘जाने कहां गये वो दिन’ म्हणायला लावतं.
वाल्याचा वाल्मिकी होण्याची कथा आता नवीन राहिलेली नाही. किंबहुना वाल्मिकीचे वाल्या होण्याचे दिवस येऊनसुध्दा बराच काळ लोटलाय. तरी पण युगानुयुगे हिंदी चित्रपटांच्या केंद्रस्थानी राहिलेली प्रेमकथा थोडीशी का होईना पण बॅकसीट घेताना पहायची असेल आणि फारसा मेलोड्रामा न करताही एखादा चांगला विचार लोकांपर्यंत साध्यासुध्या संवादातून पोचवताना पाहायचा असेल तर हा चित्रपट एकदा पाहायला हरकत नाही.
चित्रपट नाही पाहीला,पण यातली
नेहमीप्रमाणे छान लेख. चित्रपट नाही पाहीला,पण यातली काही गाणी ऐकली आहेत.खोया खोया चांद , रिमझीम के तराणे ही गाणी नेहमी रेडीओ वर ऐकण्यात येतात.
{{{ अलका दोन वर्षं अलग राहावं
{{{ अलका दोन वर्षं अलग राहावं लागणार म्हणून खट्टू होते. पण नंद तिला समजावतो की आपलं प्रेम खरंच आहे का नुसता अल्लडपणा आहे हे कळायला आपण असं वेगळं रहाणं गरजेचं आहे. दूर राहूनही आपलं प्रेम कायम राहिलं तर आपलं खरंच एकमेकांवर प्रेम आहे. नाही राहिलं तर लग्न व्हायच्या आधीच ते कळलं म्हणून देवाचे आभार मानू. }}}
शब्दशः देवाचे (देव आनंद) आभार मानत असणार.
{{{ सी. आय. डी. तल्या एका गाण्याच्या चित्रिकरणाच्या वेळेस दिलेला ड्रेस आपल्या सभ्यतेच्या मर्यादेत बसत नाही म्हणून त्यावर घालायला ओढणी मिळेपर्यंत चित्रीकरण अडवून धरणारी वहिदा हे दृश्य द्यायला कशी तयार झाली काय माहित. तिच्या अंगावर आधी कोट दाखवलाय पण साडी सोडल्यावरही ती तो अंगावर चढवत नाही. असो. }}}
सीआयडी तिचा पहिलाच सिनेमा होता ना? पहिल्या सिनेमानंतर एकदा पैसा दिसू लागला की कलाकार बनचुके होतात. तेव्हा यात आश्चर्य काहीच नाही. तिचा धर्मेंद्र सोबत चा बाजी किंवा राजेंद्र कुमार सोबतचा धरती पाहा त्यातले तिचे पोशाख म्हणजे बोल्डनेसची कमाल आहे.
केव्ढी काँप्लिके टेड कथा आहे.
केव्ढी काँप्लिके टेड कथा आहे. आपला फक्त गाण्यांशी संबंध आहे. खोया खोया चांद रफी प्ले लिस्त मध्ये असतेच अस्ते. समहाउ पुकारता चला हुं मै नंतर हे गाणे ऐकते. वृद्ध आई व लग्नाळू बहीण हे हिरो लोकांचे पॅकेज आता नाहिसे झाले आहे. समाज बदलतो तो असा.
नेहमीप्रमाणे छान लेख. चित्रपट
नेहमीप्रमाणे छान लेख. चित्रपट जवळजवळ विसरून गेलेलो. म्हणजे काही दृश्यच आठवत होती. पण लेख वाचताना याददाश्त वापस आ गयी.
मी हल्लीच पाहिला ह सिनेमा.
मी हल्लीच पाहिला ह सिनेमा. मला नाही आवडला फारसा. खुप जास्त नाटकी वाटला. पुर्वी लोक तिकिटांचा काळा बाजार करायचे हे पाहून माझी खुपच करमणूक झाली. वहिदा तिकिट फाडते वगैरे तर मला डोक्यावरुन गेले.....अति आदर्श वादी टाईप्स वाटले. या पेक्षा देव आनंदचा असली नकली खुप आवडला . हलका फुलका आणि थोडा निरागस असा...
विजय आनंद बद्दल लिहिलय त्याला
विजय आनंद बद्दल लिहिलय त्याला अनुमोदन. तो अतिशय हँड्सम दिसलाय. आभिनय सुद्दा सुन्दर
मस्त लिहलंय नेहमीप्रमाणे
मस्त लिहलंय नेहमीप्रमाणे
> ह्या चित्रपटाबद्दल मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे......> हा पूर्ण परिच्छेद आवडला. नंद आणि अलकाचे नाते मलादेखील त्याकाळच्यामानाने (कबीर सिंगची कथा ऐकल्यावर तर वर्तमानकाळाच्यामानानेदेखील म्हणता येईल बहुतेक ;)) फारच पुढारलेले आणि मॅच्युअर वाटले होते मला.
> नंद नापास झाल्याचं कळताच तो कुठल्यातरी दुसर्या मुलीत गुंतला असेल असा निष्कर्ष काढून ती लगेच त्याला आपला संबंध संपला असं पत्र घालते तेव्हा ती त्याच्यापासून दूर व्हायला निमित्त शोधतेय असं वाटतं. रघुवीरलाही ती ‘कभी हां कभी ना’ म्हणून झुलवत रहाते. ‘माझं रघुवीरवर प्रेम आहे आणि मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही’ असं नंदला स्पष्टपणे सांगण्याचं धाडस ती दाखवत नाही हे तिच्या बेधडक स्वभावाशी विसंगत वाटतं. > नंदपण तिला पत्रांमधून झुलवतच असतो ना?
कालापानी आणि असली-नकली पण बघ.
भारीच लिहीलंय ग, असं विकांत
भारीच लिहीलंय ग, असं विकांत जवळ आला की लिहित जा म्हणजे सिनेमा पाहणं होतं
फार मस्त पिक्चर आहे हा.. आणि
फार मस्त पिक्चर आहे हा.. आणि गाणी तर लाजवाब !! रफी साहेबांचा आवाज........ हाय !!!!!!!!!! सुभानल्लाह
मध्यंतरी कुठल्या तरी बिभत्स आवाज असणार्या गायिकेने ते खोया खोया चांद आपल्या अती भसाड्या आवाजात गाण्याचे महापातक केलं होतं, ते गाणं ऐकल्यावर मला कान सुद्धा एरंडेल ने साफ करण्याची गरज वाटली होती, इतकं ते टुकार होतं
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
गाणीच फक्त पाहिली आहेत आणि पुनःपुन्हा ऐकली आहेत.
रच्याकने, पत्र 'घालणे' हा शब्द प्रयोग बर्याच दिवसांनी वाचण्यात आला
तुम्ही लिहिलेलं वाचलं कि
तुम्ही लिहिलेलं वाचलं कि चित्रपट पाहण्याची इच्छा होते.
तुम्ही लिहिलेलं वाचलं कि
तुम्ही लिहिलेलं वाचलं कि चित्रपट पाहण्याची इच्छा होते.>>>+111
कालच कटी पतंग बघितला....ते ही तुम्ही लिहिलेल्या लेखा मुळे....
आनंद movie बद्दल वाचायला आवडेल.
काला बाजार पण बघेन. छान लिहिलंय स्वप्ना ताई.
मस्त लिहिलय नेहमीप्रमाणे!
मस्त लिहिलय नेहमीप्रमाणे!
सीआयडी तिचा पहिलाच सिनेमा
सीआयडी तिचा पहिलाच सिनेमा होता ना?
सी आय डी हा तिचा हिंदीमध्ये पहिला चित्रपट होता, त्या आधी तिने दोन चार साऊथ सिनेमे केले होते आणि ते बहुतेक गाजले होते , एका पार्टित ती सी आय डी च्या डायरेकटरला दिसली व त्याने तिला तो रोल दिला, मग ती हिंदी सिनेमातच राहिली, परत साऊथ मध्ये गेली का माहीत नाही.
तदबीर से बिगडी हुयी तकदीर बनाले
खुद पे भरोसा है तो ये दाव लगा ले
गाणे अक्षरशः खरे ठरले.
छान लिहिल आहे. चित्रपट तसा
छान लिहिल आहे. चित्रपट तसा ठीकठाकच आहे पण देव, वहिदा आणि संगीत प्रचंड प्रिय विजय आनंद यात खूप आवडला. त्याचं आणि वहिदाचं नातं खूप सुरेख दाखवलं आहे.
{{{ सी. आय. डी. तल्या एका गाण्याच्या चित्रिकरणाच्या वेळेस दिलेला ड्रेस आपल्या सभ्यतेच्या मर्यादेत बसत नाही म्हणून त्यावर घालायला ओढणी मिळेपर्यंत चित्रीकरण अडवून धरणारी वहिदा हे दृश्य द्यायला कशी तयार झाली काय माहित. तिच्या अंगावर आधी कोट दाखवलाय पण साडी सोडल्यावरही ती तो अंगावर चढवत नाही. असो. }}}
वहिदाच्या मुलाखतीत ऐकलं होतं, ते गाणं म्हणजे कहीपे निगाहे कहीपे निशाना. चित्रीकरणाची तयारी झाली होती पण त्यातला ड्रेस खूपच झिरझिरीत आहे त्यामुळे मला ओढणी हवी अशी वहिदाने मागणी केली. देव आनंद प्रचंड वैतागला कारण त्याला लगेच चित्रीकरण आटपून परदेशी कल्पना कार्तिकच्या डिलीव्हरीसाठी जायचे होते. त्यांच्यात वादही झाले पण वहिदाने माघार घेतली नाही. शेवटी निर्माता गुरुदत्त मधे पडला आणि मग ओढणीची व्यवस्था झाली.
काला बाजार मधल्या त्या सीनवरूनही वहिदा आणि विजय आनंद यांचा वाद झाला होता. मग विजय आनंदने तिला विचारलं, अशी खरोखर तुझ्यावर कुणाला वाचवायची वेळ आली तर तू दुसरा कुठे दोर, कपडा दिसतोय का ते शोधत बसशील की काय करशील?, मग शेवटी वहिदा तयार झाली.
धरती सारख्या काही चित्रपटात वहिदाने वेस्टर्न कपडे, विग्ज घातले असले तरी ती कुठेच त्याच्यात भडक, चीप वाटत नाही..भले कितीही अवघडलेली वाटली तरी. मला स्वतःला तिचा black and white चित्रपटातला लूक सर्वात सुंदर वाटतो.
चित्रपट पाहिला नाही.
चित्रपट पाहिला नाही.
लिहील आहे छान. नेहमी प्रमाणे.
छान लिहिलंयस.
छान लिहिलंयस.
सिनेमा पाहिला नाहीये. पण त्याला नंद-वहिदाचा पार्ट भारीच वाटला.
<<<<<नंद तिला समजावतो की आपलं प्रेम खरंच आहे का नुसता अल्लडपणा आहे हे कळायला आपण असं वेगळं रहाणं गरजेचं आहे. दूर राहूनही आपलं प्रेम कायम राहिलं तर आपलं खरंच एकमेकांवर प्रेम आहे. नाही राहिलं तर लग्न व्हायच्या आधीच ते कळलं म्हणून देवाचे आभार मानू. >>> हे भारीच. सो मॅच्युअर.
असं काही हिरोइणीबद्दल दाखवणं म्हणजे ग्रेटच की.
छान.
छान.
खूप पूर्वी पाहिलाय हा सिनेमा,
चेतन-विजय आनंदसाठी परत बघायला हवा
बघायला हवा. खोया खोया चांद मी
बघायला हवा. खोया खोया चांद मी शैतान चित्रपटातले गाणे ओरिजिनल समजात होतो. सुमन श्रीधर वाले.
च्रप्स
च्रप्स
ह्या रीमिक्सवाल्यांमुळे असं होतंय.
जुनी गाणी उचलतात. त्यात आपले थोडे एडिशन करतात.
नव्या पिढीला किंवा ज्यांना गाणी माहित नाहीत त्यांना ही गाणी नवीच आहेत असं वाटत.
मस्त लिहीलंयस. हा पिक्चर बघेन
मस्त लिहीलंयस. हा पिक्चर बघेन की नाही माहित नाही पण वाचायला मजा आली.
मस्त लिहिलंय. कुछ लिया कि नही
मस्त लिहिलंय.
कुछ लिया कि नही
सूर्यगंगा, बिपीन चन्द्र हर...
सूर्यगंगा, बिपीन चन्द्र हर..., अमा, A M I T, मी अमि , ॲमी,किल्ली, प्रसन्न हरणखेडकर, मित, बोकलत ,Diyu, आसा., BLACKCAT, चीकू, 'सिद्धि' ,सस्मित , ललिता-प्रीति, च्रप्स,rmd,चिन्नु धन्यवाद
>>नंदपण तिला पत्रांमधून झुलवतच असतो ना?
हो ते पण आहेच. पण त्याचा स्वभाव तिच्याइतका बेधडक दाखवलेला नाहिये.
>>कुठल्या तरी बिभत्स आवाज असणार्या गायिकेने ते खोया खोया चांद आपल्या अती भसाड्या आवाजात गाण्याचे महापातक केलं होतं
हो, भारी कर्कश होता तो आवाज.
>>काला बाजार मधल्या त्या सीनवरूनही वहिदा आणि विजय आनंद यांचा वाद झाला होता. मग विजय आनंदने तिला विचारलं, अशी खरोखर तुझ्यावर कुणाला वाचवायची वेळ आली तर तू दुसरा कुठे दोर, कपडा दिसतोय का ते शोधत बसशील की काय करशील?, मग शेवटी वहिदा तयार झाली.
पण साडी सोडायला लागेल अशी सिच्युएशन का निर्माण करावी लागली? ते काही गरजेचं नव्हतं. तो पाण्यात पडतो आणि वहिदा उडी टाकून त्याला वाचवते असंही दाखवता आलं असतं की.
>>कुछ लिया कि नही
हां लिया ना.
स्वप्ना, छान लिहिलेस.
स्वप्ना, छान लिहिलेस. चित्रपट बघितला नाही.
त्याकाळातही नायिका ऑलरेडी बॉयफ्रेण्ड असतानाही दुसर्या मुलाच्या प्रेमात पडते हे वाचून गम्मतच वाटली. तेव्हाचा काळ अतिआदर्शवादी होता ना म्हणून.
५००० रुपये चोरल्यावर त्या पैश्यांतून त्याला एखादा इमानदारीचा धंदा सुरु करून ते पैसे नंतर फेडता आले असते. पण तसं न करता तो डायरेक्ट काळा बाजार करायला सुरुवात करतो हेही थोडं खटकतं. >>>>>>>>> तस झाल असत तर सिनेमाच्या शिर्षकाला अर्थच उरला नसता ना. चित्रपट तिकडेच सम्पला असता.
बरेच दिवसांनी आलो. पहिल्यांदा
बरेच दिवसांनी आलो. पहिल्यांदा तुझे लेख शोधून काढले.
मस्त! सहज सुंदर.
मी पण गाणी पाहिली आहेत पण चित्रपट नाही.
खोया खोया चांद माझ्या बाबांच लाडक गाण आणि ओळखही ते शिट्टिवर वाजवायचे.
रीमझिम के तराने.... म्हणजे राज नर्गीस सारखे एका छत्रीतून जातात ते गाणं का?
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.