राडा
______
स्टेशनबाहेर पडलो. डोळे अर्धवट झोपेतच होते. आकाशातला प्रकाश डोळ्यावर पडला तसे आणखी आखूड झाले. अंदाजानेच गर्दीसोबत पावले टाकत चालू लागलो. अन ईतक्यात, डोळे उघडावेसे वाटणारा आवाज कानावर पडू लागला. सकाळी सकाळीच छानपैकी भांडण चालू झाले होते.
आवाज रिक्षास्टॅण्डच्या दिशेने येत होता, एक बाई रिक्षात अडून बसली होती. ना रिक्षातून उतरत होती ना रिक्षाला जाऊ देत होती. तिच्या भितीने आणखीही कोणी त्या रिक्षात चढायला धजावत नव्हते.
"रिक्षा स्टॅण्डला लावली आहे ना तुम्ही’..."
"असा धंदा करता काय?.."
"बस्स झाली ही तुमची मुजोरी, आता आणखी सहन नाही करणार.."
"पंचवीस वर्षे झाली मुंबईत आम्हाला.."
"ए, तू आवाज चढवून बोलू नकोस.. हात खाली कर आधी.."
हळूहळू चढत्या आवाजाची काही वाक्ये कानावर पडत होती. नक्की काय प्रकरण आहे. कोणाची चूक आहे, कोण मुजोरी करतेय, काही समजायला मार्ग नव्हता. कोणाला प्रश्न विचारायचा प्रश्नच नव्हता. फक्त कोलाहल वाढत होता. आणि तो कोलाहलरुपी हलाहल आवडीने पचवायला बघ्यांची गर्दी भोवताली वाढत होती. एक लांबची सीट मी देखील माझ्यासाठी बूक केली होती.
मागची ट्रेन आली तसे त्यातील दहा टक्के जनता वेळात वेळ काढून तिथे वळली. आसपासचे रिक्षावालेही जमू लागले.
"ए, तू हात तर लाऊन दाखव मला.."
"ए हरामखोर, बाईला बघून नडतोस का?"
"ईन लोगोंका अभी ज्यादा हो गया है बॉस....."
मूळ वादाशी संबंध नसलेले प्रवासी सुद्धा आता मध्ये पडू लागले होते. बायकांमुळे रामायण महाभारत घडले असे म्हणायची एक पद्धत आहे आपल्याकडे, ईथे खरोखरच एक छोटीमोठी चकमक घडायची चिन्हे दिसू लागली.
वादावादीने दुसरा गिअर टाकला आणि ते पाहून शेजारचा भजीवाला काही काळापुरता भजी तळायचा थांबला. भुर्जीवाल्याने आपली अंडी सांभाळून आत ठेवली. सरबतवाला नुसतेच सरबत घुसळत राहिला. रस्त्यावरच्या फेरीवाल्यांनी संभाव्य धक्काबुक्कीच्या भितीने आपला धंदा सावरून घेतला. मिनिटाला दोन भेल बनवणारया भेलवाल्याचेही हात थबकले. ईथे माझेही पाय थांबले. अन कान!, ते तर आधीपासूनच टवकारले होते.
"ए अंगाला हात लावायचे काम नाही भडXXव्या..."
"कॉलर सोड ए भोसXXडीच्या..."
ज्या शब्दांची, ज्या वाक्यांची मन आतुरतेने वाट पाहत होते ते आता कानात पडू लागले होते.
नक्की काय होतेय हे घोळक्यात दिसत नव्हते. पण घोळका आता डावीकडून उजवीकडे आणि पुढे मागे सरकू लागला होता. बहुधा धक्काबुक्कीला वा लाथाबुक्कीला सुरुवात झाली होती. जवळच्या पूलावरून काही मोबाईल कॅमेरे सरसावले गेले. काही साहसी स्वयंछायाचित्रकारांनी गर्दीतच हात वर करून चित्रण सुरू केले. त्यात आपल्या कोणी ओळखीचा दिसतो का हे माझी नजर शोधू लागली. जेणेकरून नंतर ते चित्रण पाहता येईल. मी पुन्हा आजूबाजूला बघ्यांच्या जमावावर एक नजर टाकली. आणि काय पाहिले तर जे कुत्रे उगाचच रोज गर्दीच्या अध्येमध्ये लुडबुडताना दिसायचे, चहापोहेवाल्याच्या आजूबाजूला आशेने घुटमळताना दिसायचे. ते आज मात्र या निर्दयी माणसांच्या भांडणात नाहक आपण तुडवले जाऊ या भितीने पूलाखालच्या कपारीत जाऊन बसले होते.
ईथे एव्हाना भांडणाने टॉप गिअर टाकला होता. लांबच्या स्टॅण्डवरून चारपाच रिक्षावाले धावत आले. आणि त्या गर्दीत मिसळले. त्यांचा आवेश पाहता आता एकदोघांच्या बॅगा हवेत फेकल्या जातील, शर्ट टराटरा फाडून उडवले जातील या आशेने मी श्वास रोखून पाहू लागलो. अचानक झाडांवरचे पक्षीही फडफड करून आडोसा शोधताहेत असे जाणवले, अन ईतक्यात ....
टप ! टप ! टप ....
धो धो धो ...
बघता बघता तो आभाळातून कोसळू लागला. रिक्षांच्या टपावर, स्टेशनच्या छतावर, टपर्यांच्या पत्र्यावर आणि कोरड्या पडलेल्या रस्त्यावर त्याचा नाद घुमू लागला. भिजलेल्या पानांच्या सळसळीलाही एक वजन आले. भांडणाची मजा थांबवून मी आडोसा शोधत पळू लागलो. ऑफिसची बस दूरहून येताना दिसली. धावत जाऊन त्यात चढलो. खिडकीशेजारच्या सीटवर आपले बस्तान बसवून एक नजर बाहेर टाकली आणि काय आश्चर्य!
ज्या जागी काही काळापुर्वी घनघोर युद्ध पेटले होते, जणू हाडामासांचा चिखलच जमा होईल असे वाटत होते, तिथे आता माणसांचा लवलेशही नव्हता. नुसता पाण्यामातीचा चिखल रस्त्यावरून वाहत होता आणि त्याला चुकवून दोनचार लोकं ईथेतिथे पळत होती. भजीवाल्याच्या आडोश्याला दहाबारा लोकं जमली होती. आणि त्याने संभाव्य गिर्हाईक लक्षात घेत कढईत भजी सोडली होती. पूलाखाली कुत्र्यांच्या सोबतीला आता काही माणसांनीही आसरा घेतला होता. अवेळी अन अचानक आलेला पाऊस सर्वांची धांदल उडवून गेला होता. एक वणवा पेटायच्या आधीच विझला होता. चोहीकडे फक्त पावसाचेच थैमान चालू होते. निसर्गासमोर कोणाचाच राडा चालत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले होते.
- ऋन्मेष
तो केरळवाला मोसमी वारा टाईप्स
तो केरळवाला मोसमी वारा टाईप्स पाऊस आता पोहोचत असेल पण मुंबईत पाऊस येऊन गेलाय.
भारत ऑस्ट्रेलिया सामन्याच्यावेळी रात्री टाटा स्कायची विकेट घेण्याईतपत आलेला.
तर दुसरया रात्री जरा जास्तच वीज चमकून गडगडाट होत तासभर आलेला.
आमच्याकडे दोन्ही रात्री पावसात पुर्ण भिजायचा आनंद लुटून गरम पाण्याने आंघोळ करून झालीय. त्या आंघोळीचे व्हॉटसपवर स्टेटसही टाकून झालेय.
मॉरल ऑफ दी स्टोरी - लेख वॅलिड आहे.
वैधानिक ईशारा - ऋन्मेषवर अविश्वास दाखवाल तर ईतका पाऊस पडेल ईतका पाऊस पडेल की मुंबई तुंबून जाईल आणि तुमचा ईंटरनेट पुरवठा खंडीत होत मायबोली वाहून जाईल.
ऋन्मेषवर अविश्वास दाखवाल तर -
ऋन्मेषवर अविश्वास दाखवाल तर ----- ओ ऋन्मेश भौ...आवो तुमचाच मायबोलीवर भरोसा नाय
ऋन्मेष अरे ह्याला पाउस
ऋन्मेष अरे ह्याला पाउस म्हणतात का?
भारीच वर्णन केलंय की.
भारीच वर्णन केलंय की.
येऊद्यात असेच छोटे-मोठे प्रसंग तुमच्या लेखणीतुन.नक्की वाचायला आवडतील.
कळत नकळत एकाच घटना वर्णानात
कळत नकळत एकाच घटना वर्णानात बरच काही लिहुन गेलास ! अगदी आल्टर इगो सकट! उपजत टॅलेंट झाली ! आणि काही प्रतिसाद वाचुन मात्र अवघ्या 15-16व्या वर्षी लिहिणारे ज्ञानदेवांचे बोल आठवतात 'जो जे वांछिल तो ते लाहो..'... आणि सगळ्यांना काहीतरी मिळेल असं सद्यस्थितीचं छान वर्णन...
मस्त लिहिलं आहे.
मस्त लिहिलं आहे.
तुकाराम छान प्रतिसाद. धन्यवाद
तुकाराम छान प्रतिसाद. धन्यवाद
सर्वांचेच धन्यवाद
Pages