घात (कथा)

Submitted by चैतन्य रासकर on 23 June, 2019 - 06:49

(व्हाट्सॲपवर पूर्वप्रकाशित)
...................................................................................

"मला वाच...."
सोमनाथ एवढचं म्हणू शकला, मग तो खोकू लागला.
मला वाच...का मला वाचव? याला नेमकं काय म्हणायचं?
सोमनाथची खोकल्याची उबळ कमी झाली, त्याच्या आईने त्याला पाणी दिले, तो खोकत कसंतरी पाणी पिऊ लागला, खोलीभर औषधांचा वास पसरला होता. मी सोमनाथकडे बघितले, त्याच्या डोळ्यांच्या खाचा झाल्या होत्या, गालफड बसली होती, चेहऱ्यावर सुरकुत्या वाढल्या होत्या, केस गळून पडले होते, हातापायांच्या काड्या झाल्या होत्या.

सोमनाथ कण्हत होता? का काही म्हणत होता?
मला सोमनाथकडे पाहवले नाही, मी नजर फिरवली, खोलीत अंधार पसरला होता, सोमनाथची आई, एकटक सोमनाथकडे बघत होती, त्याच्या आईच्या चेहऱ्यावरचे भाव कळले नाहीत, वाचता आले नाही.
कसला विचार करत होती?
सोमनाथची अशी अवस्था का झाली? कशी झाली?
ही परिस्थिती बघून मी गळून गेलो, तिथून उठायचा प्रयत्न केला पण.. माझ्या खांदे एकदम जड झाले, हाताचे स्नायू जड झाले, तिथून पटकन उठता येईना, माझ्या खांद्यावरचा भार हळूहळू वाढत गेला, खांदे का जड झाले?

सोमनाथने खोकल्याचं औषध घेतलं. मी त्याला झोपून राहायला सांगितलं. त्याच्या आईला काही पैसे देऊ लागलो, पण त्याच्या आईने हात जोडले, "आता नको" असं म्हणाली. मी निरोप घेऊन बाहेरच्या खोलीत आलो. तिथे रुपेश बसला होता. मोबाईलवर काहीतरी करत होता. मला बघताच रुपेश उभा राहिला, आम्ही सोमनाथच्या घराबाहेर आलो. सूर्यास्त झाला होता, अंधार पडायच्या आत घरी पोहचावे, असा विचार करत, मी किक मारून बाईक सुरु केली. रुपेश माझ्यामागे बाईकवर बसला. सोमनाथची अवस्था बघून तो सुद्धा घाबरला होता. आम्ही बाईकवरून हायवेला आलो, एका चहाच्या टपरीवर थांबलो.
"याला काय झालयं??" मी बाईकवरून उतरत रुपेशला विचारले.
"निपारीच्या घाटात अडकला होता" रुपेशने उत्तर दिले.
"मग?"
"तेव्हापासून आजारी ए..." रुपेश तोंड धूत म्हणाला.
"घाटात काय दिसलं का?"
"काय माईत" रुमालाने चेहरा पुसत रुपेश म्हणाला.
"मला म्हणत होता...मला वाचव.."
"हा.. मला पन म्हणाला, मला वाचव, त्यो मागे लागलाय..." रुपेश पटकन म्हणाला.
"तो मागे लागलाय? तो कोण?"
"काय माईत.."
सोमनाथच्या मागे कोण लागलं आहे?

निपारीचा घाट!! अरुंद रस्ता, नागमोडी वळणे, दुतर्फा वाहतूक, खड्डे, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला कठडा नव्हता, खोल दरी होती, धुकं एवढं गडद असे की गाडी चालवताना पुढचं काही दिसत नसे. हिवाळ्यात धुकं आणि पावसाळ्यात दरड कोसळत असे.
आमच्या गावाला एकच एसटी येत असे, एकदा रात्र झाली तरी एसटी स्टेशनला पोहचली नाही, म्हणून शोधाशोध सुरु झाली, तरी एसटी काही मिळेना, एक अख्खी एसटी गायब? कशी काय? शोधाशोध सुरु झाली. सगळ्यांची पावलं आपसूकच घाटाकडे वळाली, लोकांना एसटीचे अवशेष दरीच्या तळाशी दिसले. दरीने एसटी केव्हाच गिळून टाकली होती! महामंडळ एका एसटीला अन गाव सत्तावीस लोकांना मुकलं.
या घाटाने बरीच माणसे मार्गी लावली होती.

रात्री निपारीच्या घाटातून जाताना, एकाला चार फूट उंच बेडूक दिसला होता, हो बेडूकच!! चार फूट उंच बेडूक? असं असतं? का दुसरा कुठला प्राणी होता? बेडकासारखा दुसरा कोणता प्राणी असणार? तो ही चार फूट उंच?
तुम्हाला जर घाटात, रात्रीच्या वेळी, एखादं लहान मुल रडताना दिसलं, तर तुम्ही काय कराल? त्याची विचारपूस कराल? का गाडीत घ्याल? का दुर्लक्ष कराल? कारण घाटात कधी थांबायचं नसतं, जो थांबला तो खपला!!

सोमनाथ आणि रुपेशकडे स्वतःच्या चारचाकी गाड्या होत्या. गावातल्या लोकांना शहराकडे, शहरातल्या लोकांना गावाकडे पोहचवत असत. हे त्यांचं रोजचं काम होतं. त्यांना रोज निपारीच्या घाटातून ये-जा करावी लागे. मी सुद्धा ड्राइव्हर होतो, माझ्याकडे पण स्वतःची चारचाकी गाडी होती.

अजूनही ती रात्र लख्ख आठवते. त्या दिवशी, सोळा सतरा तास गाडी चालवली होती, पण काय करणार? मध्ये थांबता येत नव्हतं, घरी जायचं होतं, अंधार पसरत होता, तेवढ्यात निपारीचा घाट सुरु झाला. एकटाच गाडी होतो, हेडलाईटच्या प्रकाशात पुढचं काही दिसतं नव्हतं. कसातरी, गाडी हळू चालवत होतो, उजव्या हाताचं मनगट दुखत होतं, मान, पाठ अवघडली होती, भूक लागली होती, पाणी नव्हतं, घसा कोरडा होता, घरी पोहचायचं होतं, म्हणून गाडीचा वेग वाढवला, पण तेवढयात....
समोरून एक आकृती माझ्या गाडीकडे येत होती.

अंधार होता, ती आकृती अस्पष्ट दिसत होती. बाई आहे का माणूस? त्याचे कपडे फाटले होते, पाय अनवाणी होते, चेहऱ्यावर रक्त होतं? का आणखी काही? चेहरा नीट दिसत नव्हता. ही आकृती माझ्या गाडीकडे वेगाने सरकत होती? का चालत होती? का धावत येत होती? मी गाडीचा वेग कमी केला, डोळे मोठे करून बघू लागलो, हा भिकारी असावा का? पण असा का धावतोय? रस्त्याच्या मधोमध?

हॉर्न वाजवला पण त्या आकृतीने प्रतिक्रिया दिली नाही, आकृती तशीच पुढे सरकत माझ्या गाडीकडे येत होती, मी गाडीचा वेग कमी करत, रस्त्याच्या बाजूला गाडी लावली, त्या आकृतीकडे बघू लागलो, ती आकृती तशीच पुढे धावत येत होती का? सरकत येत होती का? गाडीतून बाहेर पडावे का.. कशाला? काय गरज नाहीये..

मी नीट बघितलं, ती आकृती मागे बघत पुढे धावत होती. बहुतेक पुरुष होता, बाई नव्हती. हा मागे वळून का पळतोय? याच्या मागे कोण लागलय? आकृती गाडीजवळ आली, तसं स्पष्ट दिसलं, ती आकृती मागे बघत नव्हती तर तिची मानच तशीच होती! मान सरळ नव्हती, डाव्या बाजूला कलंडली होती, वाकडी झाली होती, डोक्याचा मागचा भाग, केस दिसत होते, चेहरा दिसतच नव्हता, त्यामुळे ती आकृती मागे बघत आहे असं वाटलं...

हे बघून मी शहारलो, हात कापू लागले, स्नायू जखडले, पोटात गोळा आला, घाम फुटला, छातीतली धडधड वाढली, डोळे मिटून घेतले, देवाचा धावा केला, तेवढ्यात.... मोठा आवाज झाला. माझं डोकं स्टिअरिंगवर आपटलं, कमरेतून सणक थेट मेंदूत गेली, मेंदू बधिर झाला, झिणझिण्या आल्या, काही कळायच्या आत सगळं धूसर झालं, गुंगी आली... माझ्या गाडीला दुसऱ्या गाडीने मागच्या बाजूने धडक दिली होती.

या अपघातामुळे माझा मणका हलला, मानेला फ्रॅक्चर झालं, त्यामुळे दोन महिने बेडवरच होतो, माझी अवस्था बघून रेश्मा खचली, रेश्माने मला गाडी विकायला लावली, तिच्या डोक्यावर हात ठेवून, "स्टीयरिंगला हात लावणार नाही" असं वचन मागितलं. बायकोचं ऐकलं, गाडी विकली, बाईक घेतली, गावातल्या साखर कारखान्यात नोकरी करू लागलो.

तो वाकड्या मानेचा माणूस कोण होता? माझा भास होता? का ते भूत होतं का? का आणखी काही? त्याच्या सोबत काय झालं असेल? असं घाटात का पळत होता? बराच विचार केला, पण उत्तर कधी मिळालं नाही.

मी रुपेशला त्याच्या घरी सोडलं, मी माझ्या घरी परत आलो, रात्र झाली होती, घरी कोणी नव्हतं, कारण रेश्मा माहेरी गेली होती. रेश्माला फोन केला, वरण भातासाठी कुकर लावला, तिला सोमनाथबद्दल सांगितलं, "त्याला बाधा झाली असेल" असं रेश्मा म्हणाली. कसली बाधा? कशामुळे होणार? रेश्मा तिच्या माहेरी बोलवत होती. मला पण जायचं होतं, पण रेश्माच्या घरी जायचं, म्हणजे निपारीच्या घाटातून जावं लागणार, म्हणून तो विषय टाळून, तिला गुड नाईट करून झोपी गेलो.

रात्री झोप तर येत नव्हती, बाहेर पाऊस सुरु होता, घराच्या छतातून हलकेच पाणी गळू लागलं, हवेतील गारवा वाढला, गारवा वाढला, तशी मान दुखू लागली, मी हातानेच मान हलकेच दाबू लागलो, माझ्या शेजारी पडलेला मोबाईल हातात घेणार तेवढ्यात... माझे खांदे जड झाले, भरून आले, दुखू लागले, मान सुद्धा हलवता येईना, कुशी बदलता येत नव्हती, खांदे सुद्धा जड झाले होते.. हे खांदे का जड झाले? आधी तर असं होतं नव्हतं हे काय होतंय? कशामुळे?
मी तसाच पडून राहिलो.

मी एकटक घराच्या बंद दरवाजाकडे बघत होतो, तेवढ्यात काहीतरी आवाज ऐकू लागला. हा कसला आवाज? कुठून येत आहे? दारातून? कोणी दार वाजवत आहे का? मी कण्हत कसातरी बिछान्यातून उठलो, खांदे लय जड झाले होते..कसातरी चालत दारापाशी गेलो, हळूच दाराची कडी बाजूला केली, हलकेच दार उघडलं, दाराच्या फटीतून बाहेर बघितलं, बाहेर कोणी नव्हतं, संथ पाऊस पडत होता, बाहेर जाऊन बघायची हिम्मत झाली नाही, मी दार लावलं, परत येऊन झोपी गेलो.

रात्री स्वप्न पडलं, स्वप्नात निपारीच्या घाटातून धावत होतो, जोरात, वेगात, जीव तोडून, धावत असताना मी मागे वळून बघितलं आणि.... मला जाग आली. या स्वप्नाचा अर्थ काय असेल?

सोमनाथच्या घरी जाऊन दोन दिवस झाले होते. सोमनाथच्या प्रकृतीत थोडा सुधार झाला होता, त्याच्या आईने फोनवर कळवलं, तसं मला पण बरं वाटलं. रेश्माला सुद्धा घरी परत आणायचं होतं, पण परत त्याच घाटातून जायला लागणार, आता काय करायचं?
त्या दिवशी कारखान्यातून उशिरा घरी आलो, दमलो होतो म्हणून लगेच झोपलो, स्वप्न काही पडलं नाही, पण मला जाग आली, कसला आवाज आहे? रात्री पाऊस पडत होता, त्यात हा असा आवाज. कोणीतरी दार वाजवत आहे? उघडून बघू? नको कशाला उगीच असा विचार करत आवाजाकडे दुर्लक्ष केलं पण आवाज वाढला, तसा खडबडून जागा झालो, हळूच दार उघडलं, बाहेर बघितलं.....

"मला वाचीव"
रुपेश म्हणाला. तो बाहेर पावसात उभा होता, पूर्ण भिजला होता, त्याला थंडी वाजत होती, डोळे लाल झाले होते. हा का घाबरला आहे? काय झालं?
"त्यो मागे लागलाय..." रुपेश बरळला.
कोण तो? कोण मागे लागलाय? रुपेशचा टीशर्ट चुरगळला, फाटला, मळला होता. त्याच्या चपलांना चिखल लागला होता. त्याने धडपडत चपला काढल्या, मी त्याला घरात घेतले, दार लावले, तेवढ्यात रुपेशचा तोल गेला, तसं त्याला सावरलं, आधार देत खुर्चीत बसवलं.
"काय झालं?" मी परत विचारलं, पण उत्तर मिळाले नाही, रुपेशने पिण्यासाठी पाणी मागितले, मी पाणी दिले, त्याने एका घोटात ग्लास रिकामा केला, तसा त्याला ठसका लागला.

"अरे काय झालं? कोण मागे लागलय?" मी विचारले.
"घाट..." रुपेश एवढंच म्हणू शकला.
"घाट??"
रुपेश पुढे काय बोलू शकला नाही. त्याने वेळ घेतला, मी त्याला अंग पुसायला टॉवेल, मग कोरडा शर्ट दिला. अंग पुसताना त्याचे हात कापत होते, याने काय बघितलं? रुपेश माझ्यापेक्षा चार पाच वर्षाने लहान होता. बलदंड होता, एवढा पैलवान गडी कशाला घाबरला?
रुपेश खुर्चीत बसला होता, त्याने डोळ्याच्या कोपऱ्यातून दाराकडे बघितलं, मग माझ्याकडे बघितलं, मी त्याला शांत व्हायला वेळ दिला, रुपेश सांगू लागला. "मला भाडं मिळालं होतं..."
"गावातून?" मी विचारले
"नाय.. स्टेशनवरून"
"मग?"
"मी नऊच्या सुमारास घरून स्टेशनला निघालो, घाट लागला..." रुपेश दोन्ही तळहात एकमेकांवर घासत म्हणाला. त्याला थंडी वाजत होती, मी त्याला पटकन चादर दिली, त्याने लहान मुलासारखी चादर पांघरून घेतली, मी उठलो, गॅस सुरु केला, त्यावर तवा तापायला ठेवून रुपेशला विचारलं. "घाटात काय?"
"तिथं एकाने थांबवलं" रुपेश म्हणाला, तसा मी त्याच्यासमोर येऊन थांबलो.
"कोणी?"
"माईत नाय.. गावातला नव्हता"
"मग?"
"तो म्हणाला स्टेशनपर्यंत सोडा.. दोनशे देतो"
"तू त्याला गाडीत घेतलं?" मी पटकन विचारले.
"हा.. एकटाच होता, त्याच्याकडे एक बॅग पण होती" रुपेश म्हणाला.
"बॅग? कसली बॅग?"
"चौकोनी बॅग"
"सुटकेस?"
"हा... तो बॅग घेऊन मागं बसला, फोनवर सारखा बोलत होता" रुपेश म्हणाला, तसा मी गॅस बंद केला, बेडवरची दुसरी चादर काढली, तव्याभोवती गुंडाळली, रुपेशला तवा दिला, रुपेश तव्यावर हात ठेवून शेकू लागला, पुढे सांगू लागला. "तो फोनवर कोणासंग तरी बोलत होता, रडत बी होता..."
"रडत होता?"
"हा.. रडत सॉरी म्हणत होता"
"कोणाशी बोलत होता?"
"सगळं नाय कळलं, कन्नड का काय बोलत होता"
"मराठी नव्हता?"
"नाय"
"मग?"
"कॉल कट झाला, तसा तो बिथरला.. सारखा कॉल लावू लागला" असं म्हणून रुपेश त्या गरम तव्याने छाती शेकू लागला.
'कॉल लागला?"
"नाय ना.. मग त्याने मला माझा फोन मागितला"
"तू दिला?"
"हा.. कायतरी मॅटर व्हता.. मी माझा फोन दिला, पन माझ्या फोनने कॉल लागला नाय"
"मग?"
"मग त्यानं पानी मागितलं, मी दिलं तर पानी पितानाच....." एवढं म्हणून रुपेश थांबला, त्याने परत घराच्या बंद दरवाज्याकडे बघितले.
"काय झालं?"
"पानी पितानाच, तो छाती चोळायला लागला..." रुपेश स्वतःची छाती चोळत म्हणाला.
"छाती चोळायला लागला?" म्हणजे?"
"त्याच्या छातीत दुखायला लागलं"
"अटॅक आला?"
"हा अटॅकचं असल"

मी स्वतःला शांत करायचा प्रयत्न केला, फोन कट झाल्यावर अटॅक आला? काय झालं असेल? महत्त्वाचा कॉल असेल? पण मग? त्याला घाटात काय दिसलं का? काहीतरी भयानक? जसं सोमनाथला दिसलं होतं? तसं काही? त्यामुळे हार्ट वर प्रेशर आलं?
मी रुपेश कडे बघितलं, तो माझ्या घराच्या दाराकडे बघत होता

"मग काय झालं?" मी त्याला हलवत म्हणालो, तसा रुपेश दचकला, भानावर आला, पुढे सांगू लागला.
"त्याची छाती दुखत होती, माझी टरकली, मी लगोलग गाडी थांबवली" रुपेश म्हणाला.
"कुठं?"
"घाटातच"
"तू दवाखान्यात नेलं का?" मी विचारलं.
रुपेशने नाही म्हणून मान हलवली.
"मग काय केलंस?" मी वैतागलो.
"त्याची नाडी बंद झाल्ती" रुपेश मान खाली करून म्हणाला.
"दवाखान्यात का नाही गेला?" मी परत विचारलं.
"मी लय घाबरलो होतो..." रुपेश खुर्चीतून उठत म्हणाला, त्याने तवा हातात घेतला, त्यातून चादर बाजूला केली, गॅस परत चालू केला, त्यावर तवा ठेवला. त्याने खोलीभर एकदा नजर फिरवली. माझ्या खोलीतली एकुलती एक खिडकी त्याला दिसली, खिडकी अर्धवट उघडी होती, रुपेशने पटकन खिडकी पूर्ण लावली

"मग काय केलं?" मी विचारलं.
"चूक झाली मान्य ए, पन मला वाचव" माझा हात पकडत रुपेश म्हणाला.
"तू त्याला गाडीतून बाहेर काढलं??" मी माझा हात त्याच्या हातातून सोडवत म्हणालो.
रुपेश काही म्हणाला नाही, मला उत्तर मिळालं होतं.
"तू नीट चेक केलं का? मी विचारले
"मी चेक केलं, त्याला हलवलं, त्याच्या छातीवर भार देऊन बघितला, सगळं केलं.. पन तो उठलाच नाय" रुपेश एका दमात म्हणाला, त्याच्या डोळ्यात पाणी आलं. रुपेशने जे केलं ते चुकीचं होतं, त्या माणसाला दवाखान्यात घेऊन जायला हवं होतं, त्याला मेलेला बघून, रुपेश घाबरला. अनावधानाने चूक घडली. आता अपराधी, वाईट वाटतं होतं.
"पण मग.." असं म्हणून मी उभा राहिलो, माझ्या घराच्या दाराकडे जाऊ लागलो, तेवढ्यात रुपेश ओरडला
"नको उघडू"
मी रुपेशकडे बघितले, रुपेश हात जोडत म्हणाला "लेका पाया पडतो पन दार नको उघडू.."
"अरे पण..."
"माघारी येताना त्यो प्रत्येक वळणावर दिसला"
"तोच दिसला?"
"हा.. तो मागे लागलाय" रुपेश कापऱ्या आवाजात म्हणाला.
मी जागच्या जागी थबकलो, सोमनाथ सुद्धा असं म्हणत होता, "मला वाचव, तो मागे लागलाय" म्हणजे सोमनाथ जी अवस्था झाली तशीच रुपेशची होईल? सोमनाथ बरोबर असच झालं असणार. याच अपराधीपणाची भावना सोमनाथ मध्ये रुतत गेली. त्यामुळे तो आजारी पडला. म्हणजे तो अटॅक आलेला माणूस सोमनाथच्या गाडीत सुद्धा होता? तो भूत आहे?

मी रुपेशकडे बघितले, तो मोठ्या आशेने माझ्याकडे बघत होता, रुपेशने मोठी चूक केली होती, पण त्यासाठी एवढी मोठी शिक्षा? मी मोबाईल काढून बघितला, रेश्माचे काही "मिस यू" चे मेसेजेस आले होते, रेश्माची आठवण येत होती, तिच्याकडे जायचं होतं, पण त्या आधी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायला हवा.

मी पटकन दार उघडले, रुपेश दार बंद करायची विनवणी करत होता, बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता, विजा चमकत होत्या, पावसाला कसला सूड घ्यायचा आहे? रुपेशची पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी पावसात भिजत होती. मी गाडीकडे नीट बघितले. गाडीच्या मागच्या सीटवर.... कोणी होतं का? मी थिजलो. काय करावं ते कळेना. घराचा दरवाजा पटकन बंद केला, मागे फिरलो... रुपेश अवघडत दारापाशी बसला. मी घरातून छत्री शोधून काढली, दाराजवळ गेलो, तसं एकदम आठवलं, छत्री रुपेशला दिली, मागे फिरलो, एक हातोडा शोधून काढला. तो हातोडा बघून रुपेशने माझ्याकडे बघितले. मी मनातल्या मनात म्हणालो, घाबरायचं नाही. आता कोणी आडवा आला की त्याला आडवा करायचा.

उजव्या हाताने हातोडा पकडून, डाव्या हाताने दरवाजा उघडला. रुपेश बिचकत होता, त्याने कशीतरी छत्री उघडली, आम्ही घराबाहेर आलो,
जो समोर येईल त्याच्या टाळक्यात हातोडा घालायचा, असा विचार करून मी हातोडा घट्ट पकडला, गाडीकडे बघत पुढे जाऊ लागलो, पावसाचा जोर वाढला, खाली चिखल झाला होता, मी तसाच अनवाणी पायाने गाडी कडे जात होतो, मागून रुपेश येत होता.. गाडीजवळ पोहचलो, गाडीत डोकावून बघितलं, आत तसं कोणी नव्हतं.

रुपेशने गाडीचा मागचा दरवाजा उघडला, तसा कुबट वास नाकात शिरला, पण हा वास कुबट होता? का लाकूड जळल्यावर येतो तसा वास होता? मी गाडीचं मागचं सीट नीट बघितलं, तिथे काही नव्हतं, सीट खाली एक करड्या रंगाची सुटकेस पडली होती. मी पटकन सुटकेस उचलली, मी रुपेशकडे बघितले, तो सुटकेस कडे बघत होता, मी एका हातात सुटकेस अन दुसऱ्या हातात हातोडा घेऊन पळत घरात आलो..

आम्ही घरात आलो, दार लावून घेतलं, ही सुटकेस जड, भारीतली होती. सुटकेसला नंबर लॉक होतं. मी काहीतरी नंबर फिरवून सुटकेस उघडायचा प्रयत्न केला. सुटकेस उघडली नाही. तसं रुपेशने माझ्या हातातून हातोडा घेतला, सुटकेस जमिनीवर खाली ठेवली. तो सुटकेसवर हातोडा मारणार तेवढ्यात मी त्याला थांबवत म्हणालो
"काय करतोय?"
रुपेश गोंधळला, मी त्याच्या हातातून हातोडा काढून घेत म्हणालो "जर पोलीस आले, त्यांना ही उघडलेली सुटकेस मिळाली तर?"
"पोलीस कशे येतील?" रुपेशने विचारले.
"उद्या सकाळी ती डेड बॉडी कोणाला तरी दिसेल, पोलिसांना खबर मिळेल, शोध सुरु होईल, ते तुझ्यापर्यंत पोहचू शकतात, कशाला उगीच रिस्क घ्यायची?" मी रुपेशला समजावले, रुपेश मटकन खाली बसला डोक्याला हात लावून विचार करू लागला, सुटकेस उघडून बघणं धोक्याचं होतं. या सुटकेसमध्ये काय असेल? पैसे? सोनं? का आणखी काही?

तो माणूस कन्नड बोलत होता, फोनवर कोणाला तरी विनवणी करत होता, सॉरी म्हणत होता, फोनवर असं काही बोलणं झालं की त्याच्या जिव्हारी लागलं, त्याला अटॅक आला. ही सुटकेस महत्त्वाची असू शकते. कदाचित त्या माणसाला ही सुटकेस कोणाला तरी द्यायची असेल.
"ही सुटकेस परत जाऊन डेड बॉडी जवळ ठेवायला हवी" मी सुटकेस हातात घेत म्हणालो.
"कशाला?" रुपेश चरफडला.
"हे बघ.. आधी त्याच्या घरातले, मग पोलीस, त्याला शोधणार, सुटकेसला शोधणार, आपल्या गावात चौकशी होणार" मी परत एकदा रुपेशला समजावले, तो बधिर झाला होता, त्याला लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर पडायचं होतं, मला ही तेच हवं होतं.

रुपेशला घाटात जायचं नव्हते, त्याला भीती वाटत होती. ती डेडबॉडी अजून घाटातच असणार, जर डेडबॉडी सापडली तर सुटकेस त्याच्या शेजारी गुपचूप ठेवून द्यावी. म्हणजे कोणाला काही संशय येणार नाही. जर डेडबॉडी मिळाली नाही तर ही सुटकेस कुठे तरी घाटात फेकून द्यावी. अरे हो.. सुटकेसवरचे फिंगरप्रिंट्स पुसायला हवेत.

मी रुपेशला धीर दिला, सगळं काही ठीक होईल असं सांगितलं, पण पुढे काय होणार? हा मॅटर सॉल्व्ह झाला की रेश्माच्या घरी जावं, तिला सरप्राईझ द्यावं असा विचार करत आम्ही घराच्या बाहेर आलो. घराला कुलूप लावलं, पाऊस कमी झाला नव्हता, आम्ही परत भिजलो, तसेच ओल्या कपड्याने रुपेशच्या गाडीत बसलो.

रुपेश नीट गाडी चालवेल ना? एवढ्या पावसात मला गाडी चालवता आली नसती, सवय राहिली नव्हती, रुपेशने गाडी सुरु केली, मी रुपेशच्या बाजूच्या सीटवर बसलो, सुटकेस मांडीवर ठेवली, उजव्या हातात हातोडा होताच, रुपेशकडे रोखून बघत म्हणालो "सावकाश..."
तशी रुपेशने मान डोलावली, तो काही न बोलता गाडी चालवू लागला.

डोक्यातले विचार भुंग्यासारखे सतावत होते, मी त्या सुटकेसकडे बघत विचार करू लागलो, यात काय असेल? काहीतरी महत्त्वाचे? म्हणजे पैसेच असतील. किती असतील? कुठल्या नोटा आहेत त्यावर ठरणार. सुटकेस तर जड होती. एवढी कॅश? म्हणजे हा दोन नंबरचा, घरात लपवून ठेवलेला काळा पैसा असणार.
एवढ्या रात्री एवढे पैसे? काहीतरी विकत घ्यायला? नाही.. मग? हे पैसे कोणाला तरी द्यायचे असतील.
एखाद्याला एवढे पैसे अशा वेळी द्यायचे? मदत म्हणून? शक्यच नाही.

रात्रीचा तो माणूस एवढे पैसे घेऊन अशा निर्जन जागी? ते पण घाटात का आला असेल? अशा वेळी, पावसात, निपारीच्या घाटात कोणी का स्वतःहून येईल? काय गरज आहे?
पण कशावरून तो स्वतःहून आला असेल?
त्याला कोणी बोलावलं असेल तर? कोणी का बोलावलं? ते पण निपारीच्या घाटात?
कोणीतरी जबरदस्तीने बोलावलं असेल? हो.. म्हणूनच तो आला असेल.
जबरदस्तीने? म्हणजे त्याला कोणी ब्लॅकमेल करत होतं?

बहुतेक तो माणूस फोनवर ब्लॅकमेलरशी बोलत असणार, त्यालाच विनवणी करत असणार, म्हणजे ब्लॅकमेलरने त्याला पैसे घेऊन घाटात बोलावलं. म्हणूनच तो आला.

हा विचार करत असताना, निपारीचा घाट सुरु झाला, रुपेश गाडी सावकाश चालवत होता, घाटात बाकी कोणी नव्हते, फक्त अंधार होता, मधूनच काजवे चमकत होते, मला भीती वाटत होती, मी घाटाकडे बघण्याचं टाळलं आणि रुपेशकडे बघितलं, त्याचे हात अजूनही थरथरत होते.
पण तो तर आधीच मेला. सुटकेस रुपेशच्या गाडीतच राहिली. ब्लॅकमेलरला पैसे मिळाले नाहीत, म्हणजे ब्लॅकमेलर त्याला आणि सुटकेसला शोधत असणार. पण मग ब्लॅकमेलर त्याला असं काय म्हणाला? की त्याला अटॅक आला.

का ब्लॅकमेलरला हे पैसे नको होते? असं कसं होईल? पैसे नको होते तर काय हवं होतं? त्याने हा सगळा खटाटोप पैशासाठी केला नव्हता? मग कशासाठी केला होता?
ब्लॅकमेलरसाठी पैशापेक्षा जास्त महत्त्वाचं काय असणार?
पैशापेक्षा जास्त महत्त्वाचं काय असणार?
पैशापेक्षा जास्त महत्त्वाचं...
सूड...

मी डोळे मिटले, डोकं शांत करायचा प्रयत्न केला, दीर्घ श्वास घेऊन स्वतःला सावरलं.
"मर्डर..." मी पुटपुटलो.
तसा रुपेश दचकला.
"त्या माणसाचा मर्डर झाला" मी रुपेशकडे बघत म्हणालो.
"काय?" रुपेशने विचारले.
"हे बघ आधी त्या माणसाला घाटात चालायला लावलं, तो दमला, त्याच्या हार्टवर प्रेशर आलं..." मी रुपेशला समजावून सांगू लागलो "मग त्याला फोनवरून शॉकिंग बातमी दिली गेली"
"हां बरोबर..."
"म्हणून त्याला अटॅक आला" मी म्हणालो.
रुपेश यावर काही म्हणाला नाही, त्याला हे काही झेपत नव्हतं.

"फोनवरच्या माणसाला माहित होतं की हा हार्ट पेशंट आहे" येस्स.. मी हा गुंता सोडवला होता. तसं म्हणायला गेलं तर रुपेशचा यात काही दोष नव्हता, पण नकळत रुपेश या खुनाचा भाग झाला होता. खुनी चलाख होता, पोलीस त्याच्यापर्यंत कधी पोहचणार नाहीत, 'घाटात चालत असताना हार्ट अटॅक आला, दुर्देवी अपघात आहे' असं ठरवून पोलीस केस क्लोज करतील.
कोणाला कधी कळणार नाही की "हा परफेक्ट मर्डर होता" असं म्हणून मी स्वतःशीच हसलो.

मी हसत असताना, रुपेशने गाडीचा गियर बदलला, गाडीचा वेग वाढवला, तसं मी रुपेशकडे बघितलं, रुपेशने स्टीयरिंग पटकन डाव्या बाजूला वळवलं, गाडीने रस्ता सोडला, ती दरीच्या दिशेने जाऊ लागली, मला काही कळायच्या आत, रुपेशने त्याच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि गाडीबाहेर उडी मारली.....

माझ्यासकट गाडी थेट दरीत कोसळली.

कोसळण्याआधी दोन एक सेकंड गाडी हवेत होती, मग गाडी बम्परवर पडली, मग उपडी रूफवर आदळली, मग कोलांट्या उड्या घेत कर्कश आवाज करत दरीच्या तळाशी जाऊ लागली, विण्डशिल्डची काच फुटून माझ्या अंगात घुसली, गाडीतून धूर येऊ लागला, मी गाडीच्या आतमध्ये वाकडा तिकडा फेकला गेलो, तेवढ्यात विण्डशिल्डच्या फुटलेल्या काचेतून बाहेर फेकला गेलो.

मी बाहेर जमिनीवर डोक्यावर आदळलो, पण दरीत बरीच झाडं होती, मी कसंतरी झाडाझुडपांना पकडलं, त्यांचा आधार घेतला, तसा स्थिरावलो. मी खाली बघितलं, रुपेशची गाडी कोसळत थेट दरीच्या तळाशी गेली. माझ्या डोक्यावरून गरम असं काहीतरी तोंडापर्यंत येत होतं, सर्वांगातून वेदना येत होत्या, पण अजिबात हलता येत नव्हतं, कारण त्राणच नव्हते, मी बेशुद्ध झालो....

घाटात काहीतरी भयानक बघून सोमनाथ आजारी पडला. रुपेशने या गोष्टीचा फायदा घेतला. "तो मागे लागलाय" असं रुपेश म्हणाला, पण सोमनाथ असं कधी म्हणाला नाही. रुपेशने "तो" चा बनाव रचला, तो माणूस, त्याला अटॅक येऊन मरणे, हे सारं झूठ, खोटं होतं. असं काही घडलंच नाही.

रुपेशने जी काही ऍक्टिंग केली, ते सगळं मला खरं वाटलं, पण रुपेश घाबरला का होता? कारण त्याला मला मारायची भीती वाटत होती. पण पण मग ती सुटकेस? त्याचा काय संबंध? कारण रुपेशला अशा वेळी मला घाटात आणायचं होतं. सुटकेस नसती तर मी रात्रीचा घाटात आलोच नसतो.
परफेक्ट मर्डर!!

दरीत कोसळलेली गाडी रुपेशची होती, त्यामुळे कोणी त्याच्यावर संशय घेणार नव्हते, कोणालाही हा अपघातच वाटणार, आता रुपेश पोलिसांना सांगणार, बायकोला भेटायला जायचं म्हणून मी त्याची गाडी घेऊन गेलो, कारण रुपेशला माहित होतं की मला रेश्माकडे.....
एक मिनिट..
रेश्मा..
रुपेशचं कुठं एवढं डोकं चालणार?
म्हणून रेश्मा एवढे सारे "मिस यु" चे मेसेज करत होती, मला तिच्या घरी बोलवत होती, तिला सुद्धा हवं होतं की आज मी घाटात यावं. या दोघांनी जाळं विणलं, मी त्या जाळयात अलगद अडकलो.

मी डोळे उघडले तश्या वेदना सुरु झाल्या, पण मला मरायचं नव्हतं, असं मरणं तर अजिबात नको...
मी कसातरी, धडपडत, हळू हळू, झाडांचा आधार घेऊन, रांगत होतो, वर चढत होतो. पाऊस थांबला होता, चिखल झाला होता, त्यामुळे घसरून खाली पडत होतो, परत रांगत होतो, पुढे सरकत होतो, चिखलाने बरबटलो होतो, तोच चिखल जखमांवर लावला, तसं रक्त थांबलं, वेदना सहन केल्या, डावा हात हलवता येत नव्हता, सुजत चालला होता, बहुतेक मोडला असावा, डाव्या डोळ्याने दिसत नव्हतं, उजव्या डोळ्याने पुसट दिसत होतं, प्रत्येक पावलागणिक पाठीतून वेदनेची सणक डोक्यात शिरत होती, डोकं बधिर करत होती, म्हणून किंचाळत होतो, पण ओरडल्यामुळे अजून थकवा येत होता, म्हणून एका झाडाची बारीक काडी मोडली, दातांच्या मध्ये ठेवली, वेदना वाढल्या की तोंडातली काडी जोरात चावायचो, त्या काडीचा कडूशार रस कसातरी गिळत होतो.. मरायचं नाही.. आता फक्त मारायचं.

कसातरी घाटाच्या रस्त्यावर आलो, तसं बरं वाटलं, घाटाकडे बघितलं, कोणीच नव्हतं, अजून थोड्यावेळाने सूर्योदय होईल, मग कोणीतरी मदत करेल...पण तेवढ्यात रस्त्याच्या कडेला कोसळलो, तसाच पडून राहिलो, काही वेळाने उठावं लागलं, कारण परत पाऊस सुरु झाला, स्वतःला सावरत उभा राहिलो, काही करून मला या घाटातून बाहेर पडायचं होतं.

मी कुठे जाऊ? आधी सूड घेऊ? का दवाखान्यात जाऊ? आधी दवाखान्यात जायला हवं, म्हणून मी भरभर चालू लागलो, माझ्या एकाच पायात चप्पल होती ती काढून फेकून दिली. मी अनवाणी धावू लागलो, जोरात.. पण अचानक माझी मान डाव्या बाजूला कलंडली, सरळ होतं नव्हती, मानेमधल्या हाडाला काय झालं? दुखत तर नव्हतं, उजव्या हाताने मान सरळ करायचा प्रयत्न केला, पण ती वाकडीच राहिली, एका बाजूला कलंडली होती, सरळ काही होतं नव्हती, मी तसाच धावत राहिलो, धावताना लक्षात आलं की समोरून वेगात काहीतरी येत आहे... गाडी? ट्रक? पण मला दिसत कसं नाही? कारण वाकड्या मानेमुळे मला समोरच दिसतंच नव्हतं, मागचं दिसत होतं...
माझी मान..
माझ्या लक्षात आलं..
तसा मी धावायचो थांबलो..
ती गाडी माझ्या बाजूने निघून गेली..
माझ्या लक्षात आलं की मी हे सगळं आधी बघितलं आहे. हो.. त्या दिवशी घाटात एका मान मोडलेल्या माणसाला धावताना बघितलं, तो माणूस मीच होतो!! तेव्हा हा घाट मला माझं भविष्य दाखवत होता, पुढे होणाऱ्या संकटाची जाणीव करून देत होता.

हे लक्षात येताच मी खाली कोसळलो, दमलो होतो, आता उठता येणार नाही, मी डोळे मिटून घेतले, कायमचे...
घाटाला आणखी एक बळी मिळाला होता.

*समाप्त*
...................................................................................
चैतन्य रासकर
chaitanyaras@gmail.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. मनापासून धन्यवाद, प्रतिक्रिया वाचून फार छान वाटले, आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया माझ्या लेखनासाठी ऑक्सिजनसारख्या आहेत.

२. @JayantiP कोकण विद्यापीठ बसच्या दुर्देवी घटनेबद्दल बरंच वाचलं होतं, त्या घटनेचा प्रभाव या कथेवर आहे.
एकदा मी पुणे मुंबई जात होतो, रात्रीची वेळ होती, ड्राइव्हर कार भरधाव चालवत होता, मी मागच्या सीटवर बसलो होतो, ड्राइव्हरकडे बघत असताना, या कथेची संकल्पना मनात तयार झाली. पण आधी कळत नव्हतं की, ही कथा कथानायकाच्या दृष्टिकोनातून सांगू का रुपेशच्या दृष्टिकोनातून सांगू? त्यावर बराच विचार केला. या कथेत रुपेश अँटीहिरो आहे, पण त्याच्या दृष्टिकोनातून कथा अजून प्रभावशाली झाली असती. पण मग बऱ्याच वाचकांना कथा आवडली नसती. कारण खलनायकाच्या दृष्टिकोनातून लिहिलेल्या कथा वाचकांना आवडत नाही, त्याचा अनुभव संभ्रमध्वनी कथेच्या वेळेस आला होता.

३. वेगवान कार दरीत कोसळल्यावर काय होतं, हे माहित नव्हतं, त्यासाठी युट्युबवर व्हीडियो शोधले, पण एकच चांगला व्हिडिओ मिळाला, त्या व्हिडिओवरून अंदाज बांधून लेखन करता आलं.

४. "रुपेश ने गाडीच्या बाहेर उडी मारली ,गाडी माझ्यासकट थेट दरीत कोसळली" इथे या वाक्याला, कथा संपवायची होती. शेवटच्या शब्दावर किंवा वाक्यावर कथेचा शेवट किंवा कलाटणी देणं, असा मोह नेहमी होतो. पण असं केल्यावर "कथा अर्धवट आहे, कळाली नाही" अशा प्रतिक्रिया मिळतात, त्यामुळे शेवटी सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगितल्या.

५. खरंतर या कथेत दोन कथानक आहेत, एकतर सुटकेस घेऊन चाललेला माणूस त्याचा होणारा खून, दुसरी म्हणजे कथानायक अन रुपेशची कथा. ही दोन्ही कथानकं एकत्र करायची नव्हती, पण एक कथा प्रभावशाली करण्यासाठी करावं लागलं मला तर दोन स्वतंत्र कथा लिहायच्या होत्या

६. एकजण म्हणाला, याचा दुसरा पार्ट भारी होईल, लिहा, पण नाही याचा दुसरा पार्ट काही येणार नाही.

७. ही कथा विनोदी होऊ शकते, मी लिहायचा प्रयत्न पण केला होता, कारण दोन मित्रांची गोष्ट आहे. पण मग शेवट बदलला असता, विनोदी कथेचा शेवट दुःखद करणं फार म्हणजे फार अवघड काम आहे, ते जर फसलं तर वाचक विनोद विसरतो अन दुःखद शेवट लक्षात ठेवतो.

८. काथ्याकूटचा नवीन भाग लिहीत होतो, पण तो भाग खरंच खूप चांगला होतं गेला, त्यामुळे त्या भागाची आता स्वतंत्र नवीन कथा लिहित आहे. या भागाबद्दल मी कमालीचा उत्साहीत आहे, "क्लीनचिट" असं या कथेचं नाव आहे. आय कान्ट वेट टू पोस्ट इट

९. ही कथा वाचताना नेमकं काय वाटतं होतं किंवा तुमच्या मनात काय भावना होत्या हे मला जाणून घ्यायचं आहे. कथा वाचताना कोणाला भीती वाटली का?

धन्यवाद चैतन्य. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर सोमनाथ चं काही कळलं नाही. सोमनाथ तर तो मागे लागलाय असे म्हणत होता की रूपेश ने त्याच्या स्थितीवरून पुढचं प्लॅनिंग केलं?

@JayantiP
"तो मागे लागलाय" असं सोमनाथ कधीच म्हणत नाही.
हे रुपेश कथानायकाच्या डोक्यात पेरतो, कथेत तसं स्पष्ट नमूद केलं आहे, रुपेश सोमनाथच्या त्या स्थितीचा फायदा घेतो, त्यावरून "तो मागे लागलाय" असा बनाव रचतो.

भारीच.. आवडली.
ही कथा वाचताना नेमकं काय वाटतं होतं किंवा तुमच्या मनात काय भावना होत्या हे मला जाणून घ्यायचं आहे. कथा वाचताना कोणाला भीती वाटली का? हो सुरवातीला भीती वा॑टली..पण ट्विस्ट आवडला..
काथ्याकूट च्या पुढील भागाची आतुरतेने वाट बघतेय..
"क्लीनचिट" असं या कथेचं नाव आहे. आय कान्ट वेट टू पोस्ट इट.. आम्ही पण वाचायला उत्सुक आहोत..

८. काथ्याकूटचा नवीन भाग लिहीत होतो, पण तो भाग खरंच खूप चांगला होतं गेला, त्यामुळे त्या भागाची आता स्वतंत्र नवीन कथा लिहित आहे. या भागाबद्दल मी कमालीचा उत्साहीत आहे, "क्लीनचिट" असं या कथेचं नाव आहे. आय कान्ट वेट टू पोस्ट इट -> कान्ट वेट टू रीड इट! फायनली ज्या कथेमुळे मी मायबोली जॉइन केले,तिचा पुढचा भाग येणार... Happy

९. ही कथा वाचताना नेमकं काय वाटतं होतं किंवा तुमच्या मनात काय भावना होत्या हे मला जाणून घ्यायचं आहे. कथा वाचताना कोणाला भीती वाटली का? -> भिती नाही वाटली. सुरवातीला थोडी विनोदी अन्गाने जातेय असे वाटले.. पण नन्तर उत्सुकता वाढली. माझ्यासाठी तरी शेवट अनपेक्शित होता. कथा चान्गली होती.

चैतन्यदादा. जबरदस्त लिहिलीये कथा.
तुमची हिच कथा याआधी प्रतिलिपीवर सुद्धा वाचलीये. Happy तरी कथा परत वाचताना तीच भीती मनात दाटुन आली.

Kaddak
कथेचे नाव जर Ghat ठेवलेत तर...
(घाट & घात) Bw

>>कथा वाचताना नेमकं काय वाटतं होतं किंवा तुमच्या मनात काय भावना होत्या हे मला जाणून घ्यायचं आहे. कथा वाचताना कोणाला भीती वाटली का?

कथा वाचताना भीती नाही वाटली हो.पण आता कधी रात्रिच्या वेळी एखाद्या घाटातून जायची वेळ आलीच तर टरकेल त्याचं काय??:फिदी:मला ही भूतकथा म्हणून जास्त आवडली असती.

Pages