भक्तपराधीन

Submitted by पुरंदरे शशांक on 16 June, 2019 - 22:54

भक्तपराधीन

नाही भुलत स्तुतीला
ना ते बाह्य दिखाव्याला
शुद्ध भाव उमजोनी
विठू येई चाकरीला

काय कुंभार तो गोरा
जाणे काय स्तुती मोठी
शुद्ध भाव घाली धाक
देव मळतसे माती

नसे जनाबाईपाशी
पंचपक्वान्न जेवण
रानी तिच्यासंगे हरी
पायी फिरे वणवण

माळी सावता महान
आवडीने नाम घेई
मळा राखण्यास काठी
सर्सावून देव जाई

एकनाथा घरी देव
पाणी भरी कावडीने
शेले कबिराचे विणी
फेडी दामाजीचे देणे

सारे संत हाकारीती
जीवेप्राणे त्या विठ्ठला
सोडी वैकुंठाचे सुख
भावासाठी तो विकला

काय सांगावे कौतुक
संत मांदियाळी धन्य
पुढे मागे हरी उभा
करी चाकरी अनन्य

संतांपाशी थोर भाव
नाही उपचार मोठे
जीवप्राण ओवाळोनी
लौकिकाते विसरते

भक्तीभावासी भुलोन
देव धावे लागवेगे
भक्तपराधीन नामे
ऋण फेडितो निजांगे
_____________________

लागवेगे... तातडीने

भक्तपराधीन... भक्ताच्या स्वाधीन झालेला

ऋण फेडितो निजांगे... भक्ती ऋण फेडण्यासाठी देव स्वतः अंग झडझडून भक्ताघरी राबतो.

_____________________

Group content visibility: 
Public - accessible to all site users