प्रायश्चित्त

Submitted by मुग्धमानसी on 19 July, 2016 - 05:05

पायरीवर निवांत पाय पसरून बसला होता तो. समोरच्या रेताड मातीत अस्ताव्यस्त सांडलेल्या उबदार सोनजर्द उन्हासारखा. दुपारचे तीन वाजले असावेत. पायरीभोवतालच्या गार सावलीत रेंगाळणारा आळसावलेला थोडा थोडा कंटाळा... आणि त्यातच मिसळणारा त्याच्या सिगारेटचा धूर. एकेका झुरक्यासोबत अथर्व तल्लिन होत चालला होता! हे असं सगळंच जमून आलेलं असलं की त्याचं असं ’हरवणं’ अगदी हमखास. ’तंद्री लागणं’ हा अथर्वला अगदी लहानपणापासून जडलेला जुनाट रोग. त्यापायी कित्येकदा घात झाला... पण हे ’तंद्री लागणं’ काही सुटलं नाही. नाकातोंडातून निघणार्‍या धुराच्या एकेका वलयासोबत त्याची पायाकडल्या रेताड वाळूत मिसळलेली नजर शुन्य होत चाललेली...

रेताडातल्या एकेका गोल गोल गुळगुळीत खड्याचं चमकदार बी झालं. कुणी थेंब झालं तर कुणी अण्णांच्या जपमाळेतल्या मण्यासारखं... निसरडं. कुणी उन्हाची पिवळीजर्द शाल पांघरून स्वत:च देव झालं. बी झाले ते खोल गेले... मातीच्या आतल्या आतल्या कुशीत. जगाला विटल्यासारखे. थेंब झाले ते निमुटपणे गेले त्यांच्या पाठोपाठ... बीच्या गर्भातून स्वत:च्या मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी. उरले ते मणी आणि काही स्वयंघोषित देव! त्यांच्या कचर्‍यातून दोन गोरटेले अशक्त हात थरथरत पण उत्साहाने वेचत होते काहितरी निराळंच....
"दादा... हे बघ काय मिळालं मला..."
कमूच्या धुळीनं बरबटलेल्या कृष हातांत धडधडत होतं एक सोनसळी हृदय! त्यातून ओसंडणारी एक लांबच लांब माळ... श्वासांची... थेट अथर्वच्या छातीशी येऊन थांबणारी. जपमाळेचे सगळे मणी लज्जेनं गारगोटी झालेले आणि दगडाच्या देवांनी स्वत:चे नस्तित्व पुन्हा एकदा चाचपडलेलं. आणि अथर्व... पुन्हा तिथेच... तसाच! एक शुन्य!

आजही असाच तिथेच बसला असता तो कितीही वेळ. वाडेकर साहेबांनी एका तासात हॉलवर पोचायला सांगितलंय हे पार विसरून. पंधरा मिनिटांनी खिशातला फोन वाजू लागला असता मग कदाचित अथर्व भानावर आला असता. फुलांनी मढलेली कार घेऊन हॉलवर पोहोचायला तरिही उशीर झालाच असता आणि सगळी वरात त्याच्यापायी खोळंबली असती. पण यावेळेस त्याच्या नशिबाने असं काही व्हायचं नव्हतं. कुणाच्या तरी वस्सकन ओरडण्याच्या आवाजानं अथर्व भानावर आला. अचानक झोपमोड झाल्यासारखं दचकून जागं झाल्यावर त्याला हळूहळू त्या आवाजाचा उगम त्याच्या समोरच दिसू लागला. चकचकीत रेशमी लाल सोवळं नेसलेले ते गृहस्थ अत्यंत तुच्छ नजरेने अथर्वकडे बघत होते. त्यांच्या हातात पितळेचं पुजेचं साहित्य होतं. कपाळावरल्या आठ्यांत खोचलं गेलेलं गंध आणि गळ्यात माळ.... गुळगुळीत चमकदार मण्यांची!
"काय झालं?" अथर्वने विचारलं तसं अत्यंत तुच्छ स्वरात उत्तर आलं, "देवळाच्या पायरीवर बसला आहात श्रीमान आपण... बूट घालून! वर सिगरेट फुंकताय. आणि कहर म्हणजे मलाच विचारताय ’काय झालं?’. उठा आणि दुसरी जागा बघा जरा बुड टेकायला."
अथर्वने गर्रकन मागे वळून पाहिलं. ते खरंच देऊळ होतं. अथर्व हसला आणि निमुट पायरीवरून खाली उतरला. सोवळ्यातले गृहस्थ ’काय होणार या विश्वाचं कुणास ठाऊक’ अश्या अर्थाने गंभिरपणे मान डोलवत देवळाच्या आत प्रवेश करते झाले. गाभार्‍यातल्या नटून थटून थाटात बसलेल्या देवाला पाहून अथर्व मनापासून हसला. सिगरेट बोटांत धरलेल्या हातानेच त्या देवाला एक कडक सलाम ठोकून तो हसतच मागे वळला.

"ए भाऊ, झाला काय मेकप पूर्ण? चल बाबा निघायचंय लवकर."
"ये क्या तैय्यार है ना भाय गाडी. देखो कैसी मस्त लग रैली हय."
अथर्वने गाडी पाहिली. मुळचीच सुंदर सोनेरी रंगाची भारदस्त रांगड्या सौंदर्यानं उमदी दिसणारी त्याची लाडकी ’होंडा सिटी’ आता बिचारी फुलांनी लडबडून गेली होती. अथर्वला हे असलं काही मुळीच आवडायचं नाही. हे म्हणजे बाप्यानं लिपस्टीक लावल्यासारखं... किंवा रेड्याला झूल पांघरल्यासारखं. अगदी विजोड... विद्रुप... विकृत.
त्यानं निमुटपणे फुलवाल्याच्या हातात पैसे दिले आणि किल्लीने गाडीचं दार उघडून आत बसला.
आपल्या एवढ्या सगळ्या मेहनतीला कौतुकाच्या एकाही शब्दाची पावती न मिळाल्याने फुलवाला काहिसा हिरमुसलाच. हातातल्या पैश्याकडे पहात त्यानेही अगदी त्या सोवळेवाल्या गृहस्थासारखीच मान हलवली आणि पैसे कपाळाला लावून मग खिशात टाकून कामाला लागला.

अथर्वला वाडेकरांकडे ड्रायव्हर म्हणून कामाला लागून फक्त एकच वर्ष झालेलं होतं. एम्प्लॉयमेंट एजन्सी तर्फ़े ’अथर्व अभ्यंकर’ अश्या शुद्ध साजुक तुपाचा गंध येणार्‍या नावाचा गृहस्थ ’ड्रायव्हर’ च्या नोकरीसाठी पाठवण्यात आला आहे यावर वाडेकरांचा पहिल्यांदा विश्वासच बसला नाही. प्रत्यक्ष भेटीत तर त्याची इतर माहीती मिळाल्यावर वाडेकर अवाक् झाले होते. वडिलांचे नाव - शार्दुल अभ्यंकर. त्यांचा व्यवसाय पौरोहित्याचा. आई-वडिल गोव्यातल्या कुठल्याश्या खेड्यात असतात. तीन मोठ्या बहिणींची लग्ने झालेली आहेत आणि एक अजून लग्नाची आहे. भाऊ नाही. हा सर्वात धाकटा! वयाच्या सातव्या वर्षी एका मोठ्या ऑपरेशनमधून जाऊन शेवटी आईबापानं कसाबसा जगवलेला हा एकुलता एक पोरगा. तब्येतीमुळं शिक्षण अर्धवट राहिलेलं. आणि नंतर काही कारणानं शिक्षणातला रसच निघून गेलेला. पण मुलगा जात्याचा मात्र अत्यंत हुशार! गोरा रंग, कृष देहयष्टी, विक्षिप्त डोळे आणि त्याखाली असंख्य काळी वर्तुळे....
नाही म्हणायला थोडा विचित्र आहे मुलगा. तिशी उलटून बरीच वर्षे झालेली तरी लग्न केलेले नाही. विचारलं तर हसला. म्हणाला.... "तेवढा एक विषय सोडून बोला साहेब!".

वाडेकरांना वाटले एवढ्या चांगल्या घरातल्या मुलाला ड्रायव्हरची नोकरी करावी लागते आहे म्हणजे आर्थिक प्रश्न बराच बिकट असावा. पौरोहित्य करून असे कितीसे उत्पन्न मिळणार? त्यातून तीन बहिणींच्या लग्नातच सगळी पुंजी संपली असेल. अजून एक पोरगी आहेच लग्नाची. अश्या परिस्थितीत बिचार्‍याला असली कामे करण्याखेरीज उपाय उरला नसेल...
आणि लग्नाचे काय... बहिणीचे लग्न झाल्याशिवाय कसा विचार करिल बिचारा? ते काम झाले की करिलच लग्न... आपल्या ऑफिसमधल्या त्या मंदार जोशाची पोरगी आहे अजून लग्नाचं वय उलटून गेलेली.....
अर्थात यातले काहीच ते अथर्वसमोर बोलले नाहीत. पण अथर्व सहज वाचू शकत होता त्यांचे विचार आणि मनातल्या मनात हसतही होता. ही नोकरी आपल्यालाच मिळणार यात त्याला काही शंका नव्हती. ’अभ्यंकर’ आडनावाचा आणि एका भटजीच्या सुसंस्कृत घरात वाढलेला मुलगा प्रामाणिक असणार यात शंकाच नाही. त्यातून ’कीव’ हा फॅक्टर होताच. अखेर अथर्वच वाडेकरांच्या रथाच्या सारथीपदावर नियुक्त झाला, आणि वर्षभरातच त्यांचा अतिशय प्रिय आणि विश्वासू सहाय्यकही बनला.

अथर्वला बरेचदा सांगावं वाटे वाडेकरांना... स्वत:चं सत्य! सांगावं वाटे त्यांना की प्रेम आणि विश्वास कधी असं आडनाव पाहून वाटू नये! हेही सांगावं की... प्रायश्चित्त घ्यावंच लागतं! कुठंही जन्मलात तरी... कुणाच्यातरी स्वार्थाच्या जन्माचं आणि कुणाच्यातरी परोपकारांच्या श्वासांचं देणं आयुष्यभर फेडत राहणं चुकत नाही! फेडल्याशिवाय मरता येत नाही.... आणि फेड झाल्यासारखं मरतानाही वाटत नाही! यापेक्षा अवघड प्रायश्चित्त नाही!

आज वाडेकर साहेबांच्या एकुलत्या एका पोराचं लग्न. अथर्व कालच नवर्‍यामुलाला आणि घरच्यांना घेऊन तो लग्नगावी आला होता. ६-७ तासांचा प्रवास. याची ’होंडा सिटी’ आणि त्यामागून येणारी वर्‍हाडाची मोठी बस अशी शंभरएक माणसांची वरात. आज आता थोड्या वेळाने पुन्हा नवपरिणित जोडप्याला घेउन त्याला तेवढाच प्रवास करून वाडेकरांच्या घरी परतायचे होते. ’होंडा सिटी’त फक्त नवपरिणीत जोडपे असणार होते आणि ड्रायव्हर म्हणून अर्थातच हा! बाकी सगळे वर्‍हाड वेगळ्या बस मध्ये. वाडेकर साहेब आणि त्यांच्या पत्नीदेखिल येताना बसमध्येच असणार होते. गेला आठवडाभर तो वाडेकर साहेब आणि त्यांच्या पत्नींकडून या बाबतीत निरनिराळ्या सूचना ऐकत होता. वेळेत कसं निघायचं, कुठे थांबायचं, कार मागून बसने येणार्‍या इतर वर्‍हाडाच्या आणि त्यांच्या सतत संपर्कात कसं रहायचं... वगैरे वगैरे.
येतानाचं एवढं काही वाटलं नाही... पण परतताना काम खरंच जोखमीचं होतं. संध्याकाळी निघायचं म्हणजे पोचेपर्यंत रात्र होणार! वाट तशी घाटाची आणि जोखमिची. चोर्‍या-मार्‍या दरोड्यांची भिती. त्यात गाडीत नवपरिणित जोडपं, वधूच्या अंगावर बरेचसे दागिने. च्यामारी त्यातून या लोकांना गाडी सजवायची भारी हौस. उगाच कशाला नको त्या लोकांच्या नजरेत भरा?.... पण नाही. असो. अथर्व सगळं ऐकून होकार भरत होता. वाडेकर साहेबांचा आपल्यावर प्रचंड विश्वास आहे हे त्याला ठावूक होतं. भरपूर सुचनांचा भडीमार ते करत असले तरी ’अथर्व सगळं व्यवस्थित निभाऊन नेईल’ या एका श्रद्देवर ते निर्धास्त आहेत याची त्याला पुरेपूर कल्पना होती.

संध्याकाळी ५.३० च्या बेताला अथर्वची ’होंडा सिटी’ मार्गस्थ झाली होती. फुलांची सजावट उडून जाऊ नये म्हणून बेताच्याच वेगाने अथर्व गाडी चालवत होता. त्याच्या शेजारच्या सीटवर लग्नात मिळालेले फुलांचे बुके एकावर एक ठेवलेले होते. ’हे कश्यासाठी सोबत घेतले बाईंनी कुणास ठावुक. बायांना मोह सुटत नाही कशाचा हेच खरं. बाहेरून गाडी म्हणजे चालता फ़िरता धावता मोठ्ठा पुष्पगुच्छ वाटत असणार.... आणि आपण म्हणजे त्यात बसलेला भुंगा...’
अथर्वचे विचार कारसोबत धावायला लागले होते. मागच्या सीटवर बसलेलं नवपरिणित जोडपं आपल्याच विश्वात. गाडी निघाली तेंव्हा पाठिमागून येणारे मुसमुसण्याचे आवाज हळूहळू शांत झाले. कदाचित समजूत निघाली असावी किंवा नववधू थकून झोपली असावी...

अथर्वने अगदी लहान आवाजात गाडीतला MP3 ऑन केला. देवकी पंडित जीव पिळून गाऊ लागली....
अगन भयीSSS रैन बरखाकी....
काSसे कहूं सखी... काSसे कहूं...
मनकी पीर नैन नीर बन आयी.... अगन भयी....

गाडीतल्या चमत्कारिक शांततेत देवकीची ती ठुमरी शांत अविचल तळ्याला आतल्या आत ढवळत एखादा भवरा वर वर उगवावा तशी उमटली.... हात पाय कवटाळून करकचून त्या शांततेला जीवघेणं व्यापू लागली. सुंदर... पण तरी विसंगत! त्या मागं बसलेल्या दोन जीवांना या विसंगतीचा अर्थही लागत नसला तरी....
अथर्व पुन्हा नकळत त्याच्या ’तंद्री’ मोड मध्ये गेला....

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना घनदाट काळोखं जंगल असल्याप्रमाणे.... झाडांच्या उंचच उंच शेंड्यांवरून तो भन्नाट उड्या मारत बेभान निघालेला. रस्ता तरी कसा... निळाशार! जणू नदीच. अरेच्च्या... नदीच की! त्यातून वर बेभान बरसणारा पाऊस. लाकडाची नाव... लाल रंगाची. आणि त्यावर पांढर्‍या रंगात काढलेली नाजूक नक्षी. कमू काढते अशी नक्षी. तिच्या वह्यांचे सगळे कोपरे अश्याच नक्षीने भरलेले... बरबटलेले. पानाफुलांची, कोयर्‍यांची नक्षी वेल होऊन नावेला बिलगून राहिलेली. नावेत बसुन कमू पाण्यावर पुन्हा तशीच नक्षी रेखाटायला जाते. पण काढलेली प्रत्येक रेघ पाऊस धुवून नेतो... प्रत्येक रेष पाण्यात बुडून विरघळून जाते.... कमू हिरमुसते.
’बघ ना रे दादा....’
उंचच उंच झाडांच्या शेंड्यावरून तो सुळ्ळकन उडी मारून नदीच्या पाण्यात पाय रोऊन उभा राहतो. पाण्यात बुडालेल्या कमूच्या सगळ्या रेघा त्याच्या अंगांगावरून वळवळत वर चढतात. कमू डोळे विस्फारून पहात राहते....

अगन भयीSSS

"अथर्व...."
मागून हळूच आलेली हाक आणि डाव्या खांद्यावर हात जाणवून अथर्व भानावर आला.
"हं? काय झालं?"
"हिला... जरा वॉशरूमला जायचं होतं. थांबता येईल का कुठं?"
अथर्वने मनगटावरल्या घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे नऊ वाजत आले होते. घरी पोचायला या वेगाने नाही म्हटले तरी अजून तीन-साडेतीन तास लागलेच असते. दुपारचं जेवण फारच उशिरा झाल्याने भुकेच प्रश्न नव्हताच... पण...
साहेबांनी शक्यतो कुठे थांबू नका असे सांगितलेलं आहे. पण बसमधल्या इतरांचाही हा प्रॉब्लेम असणारच...
अथर्वने वाडेकर साहेबांना फोन केला. १० मिनिटांच्या अंतरावर एक मॉटेल होतं तिथे ५ मिनिटे थांबायचं ठरलं.

मॉटेलच्या समोरच्या अंधार्‍या पार्किंगमध्ये गाडीला टेकून अथर्व सिगरेट फुंकत होता. वर्‍हाडाची बस थोड्याच अंतरावर थांबली होती. त्यात डुलक्या घेणारी काही डोकी सोडली तर इतर कुणीच नव्हतं. सगळे चहा प्यायला आणि पाय मोकळे करायला खाली उतरून कुठे कुठे गेलेले. बसचा ड्रायव्हरसुद्धा चहा पित कुणाशीतरी फोनवर बोलत जरा लांब गेला होता. सगळ्या पार्किंगमध्ये जागृतावस्थेत असलेला अथर्व बहुदा एकटाच! त्याने एक क्षणही त्याची गाडी सोडली नाही. आजूबाजूला कुणी नाही बघून तो गाडीच्या मागेच आडोशाला मोकळा होऊन आला आणि पुन्हा सिगारेट ओढू लागला. त्याच्याच सिगारेटच्या वलयांतुन त्याच्याभोवती साचत चाललेल्या धुरकट थरथरणार्‍या अंधारात आणि देवकीच्या ठुमरीनं मेंदूत खोल उमटवलेल्या कल्लोळमय शांततेत अथर्व पुन्हा नकळत शोधू लागला काहितरी... सवयीनं! काय हरवलंय ते ठाऊक नसताना जिद्दीनं शोध घेत राहणं फारच कठीण! आणि जावं जरा खोल तर ती येते पुन्हा... कमू... छातीचा पिंजरा ठोठावत...

धडधड धडधड....
आता काय?
धडधड धडधड....
काय होतंय?
धडधड धडधड.... धडधड धडधड....
अगं......

कसलाश्या आवेगाने अथर्वनं गर्र्कन् मागं वळून पाहिलं. गाडीच्या मागच्या झाडीमागं अंधारात एक पांढरी व्हॅन त्याला दिसली.
’मगाशी मुतायला गेलो तेंव्हा नाही दिसली ही गाडी...’ अथर्वच्या कपाळावर आठ्या उमटल्या.

तेवढ्यात खिदळण्याचा आवाज आला. अथर्वनं समोर पाहिलं. वाडेकरांची नववधू बायकांच्या गराड्यात मध्यभागी राहून चालत येत होती. अथर्वनं आता पहिल्यांदाच तिला जरा व्यवस्थित पाहिलं. भरजरी शालूनं आणि अंगभर दागिन्यानं प्रौढ दिसत असली तरी मुळची खेळकर खोडकर मुलगी चमकदार टपोर्‍या डोळ्यांतुन डोकावत होतीच. अपुर्‍या प्रकाशात तिचे ते डोळे तिच्या अंगावरल्या शालूपेक्षाही जास्त चमकत होते... नाजुक चणीवर अवजड शालू सांभाळताना तिची गंमतशीर तारांबळ होत होती. कोपरापर्यंत मेंदीनं रंगलेले हात... प्रवासात म्हणून काहीसे सैलसर सोडलेले, विस्कटलेले केस आणि ओठांवरचं निर्व्याज खळाळतं हासू....

साज सिंगाSर मन नाही भाSए
हाथ मे मेहेंदी... रंग नाही लाSए
सूनी सेSज.... शामबिन आSSज.... बैरन भयी....

रस्ताभर चांदण्यात माखून बरबटलेली कमू.... ओंजळीत फुटलेल्या चंद्राचे काही तुकडे घेऊन भरल्या डोळ्यांनी आकाशभर रडणारी...!
ओठांवर मात्र अंतराळाला लाजविल, अवकाशाला तेजविल आणि अंधाराला विझविल असं झगझगतं हासू पांघरलेली कमू!
"दादा.... हे तुझ्यासाठी...."
"नको मला... नको कमू..... कमूSSS"
तिच्याकडे असलं नसलेलं सगळं त्याच्या छातीवर पेरून ती आकाशाएवढी उंच होत जाते. इतकी उंच... इतकी उंच...

अगन भयीSSS

"अण्णा.... कमू कशी गेली? काय झालं तिचं?"
चंदन उगाळताना दचकून थांबलेले आण्णांचे हात. दाराशी अचानक घुटमळलेली आईची अस्वस्थ सावली...
आणि छातीत उगाचच धडधडलेलं काहितरी....
------------

"चला, अथर्व. जास्त वेळ नको थांबायला. पुढचा प्रवास पट्कन उरकायला हवा."
वाडेकरांच्या आवाजाने अथर्व भानावर आला. त्यानं घाईनं पुन्हा मागच्या झाडीच्या दिशेनं पाहिलं. त्या पांढर्‍या व्हॅनमध्ये कुणी चार माणसं घाईघाईनं येऊन बसताना त्यानं पाहिली. अथर्वच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. हे लक्षण ठीक नाही. बसच्या ड्रायव्हरशी बोलायला हवे.

धडधड धडधड....
हं....

"मी आलोच साहेब."
"अरे कुठं चाललास? चल निघायला हवं बाबा आता..."
"तेवढं जरा या बसच्या ड्रायव्हरशी बोलून आलो."
"अरे पण..."
"आलोच साहेब..."

अथर्व वाडेकरांच्या चेहर्‍यावरचे प्रश्न बघायलाही थांबला नाही. बसच्या ड्रायव्हरशी अथर्व काही मिनिटे बोलत होता. पहिल्यांदा हसणारा त्या ड्रायव्हरचा चेहरा नंतर काहिसा गंभिर झाला एवढंच त्यांनी पाहिलं. काय चाललं असावं दोघांचं? तेवढ्यात पुन्हा खिदळण्याचा आवाज आला आणि वाडेकर त्या किलबिलाटात सामिल व्हायला निघून गेले.
’काही का असेना... अथर्व आहे ना.... बघेल काय ते!’

अथर्व गाडीत बसला आणि त्याने झाडीमागची व्हॅन पुढे निघून जाताना पाहिली. ती गाडी पुरेशी पुढे गेल्यावर अथर्व पुन्हा खाली उतरला आणि त्याने गाडीची सगळी फुलांची सजावट ओरबाडून तिथल्याच झाडीत फेकून दिली. वाडेकरांच्या पत्नी म्हणाल्या, "बरं केलंस अथर्व. तरी मी आधीच म्हणत होते... कशाला उगीच कुणाच्या नजरेत भरा....?"
अथर्व हसला.

गाडी पुन्हा रस्त्यावर धावू लागली.

गाडीच्या मागुन येणारी बस आता थोड्याच वेळात दुसर्‍या रस्त्याला वळणार होती. बसमधलं वर्‍हाड जास्त होतं. लहान मुलं, दागिन्यांनी नटलेल्या बायका आणि बरचसं मौल्यवान सामान आणि पैसा-अडका बसमध्ये होता. बसचे संरक्षण जास्त महत्वाचे वाटून अथर्वने बसच्या ड्रायव्हरला जरा हळू बस चालवत पुढच्या वळणावर अचानक रस्ता बदलून जुन्या, जरा लांबच्या रस्त्याला लागायला सांगितलं होतं. तो स्वत: मात्र ठरलेल्या रस्त्यानेच जाणार होता. मगासच्या व्हॅनमधली माणसं जर दरोडेखोर असतील तर त्यांची नजर अथर्वच्या कारवरच असणार याची त्याला खात्री होती. बसचे आणि कारचे मार्ग वेगळे होईपर्यंत पुढे गेलेली व्हॅन पुन्हा मागे येऊन बसच्या मागे जाण्यात वेळ घालवण्या ऐवजी तिथेच किमान कारची वाट बघणे पसंत करील असा अथर्वचा अंदाज! उलट बससोबत कारनेही मार्ग बदलला तर दरोडेखोरही त्यांचा मार्ग बदलण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. अथर्वने धोका पत्करायचा ठरवला. छातीतल्या ठोठावणार्‍या हाकांसोबत अथर्वच्या मेंदूतले विचार धडधडत रस्त्यावरून धावत होते...! तेवढ्यात मागे नववधूचा मोबाईल वाजला.
"हं बाबा... हो अगदी ठिक आहे सगळं. वाटेत जरा थांबलो होतो. निघालोय आता परत.
नाही ओ बाबा... अगदी पाचच मिनिटं थांबलो.
हो सगळेच थांबलो होतो.
तुम्ही नका हो काळजी करू.
आईला सांगा.
हो पोचल्यावर लगेच फोन करते.
दादाला सांगा.
हं. ठेऊ फोन? तुम्ही झोपा आता."
फोन ठेवल्यावर पुन्हा मुसमुसण्याचा थोडा आवाज...

बघितलंस कमू... बाप कसा असतो ते! आण्णांनी असं नको होतं गं करायला....

------------------
"परमेश्वरी योजना होती ती अथर्व! तुझ्यासाठी तुझ्या शरिराबाहेर एक निरोगी हृद्य घेउन जगत होती ती... तुझी ठेव जपत होती असं म्हण फारतर! तिचं जिवितकार्य तेवढंच. ते संपल्यावर तुझं देणं तुला सोपवून निघून गेली ती. आता ती नाही. एक तप झालंय तिला जाऊन. विसरून जा तिला. देवाच्या इच्छेचा मान ठेव!"
"काय????" अथर्वचा स्वत:च्या कानांवर विश्वास बसत नव्हता.
"कमू गेली? कुठे गेलीय आण्णा? इथं आहे ती आण्णा इथं!" अथर्व छातीवर हात मारत संतापानं बेभान होऊन बापावर ओरडत होता.
"एका मिनिटाला १०० वेळा इथं माझ्या छातीचा पिंजरा ठोठावून ती जाब विचारते आहे.... सतत! बाप म्हणून तो जाब तिनं तुम्हाला विचारायला हवा ना आण्णा? लाज नाही वाटली तुम्हाला? सात वर्ष जगवलित तिला... केवळ तुमचा वंशाचा दिवा जगवण्यासाठी? आणि आई तू सुद्धा? ’आई’ होतीस ना तू?"
"फक्त तुझ्यासाठी बाळा... चार पोरिंवर नवसासायासानं झालं तेही जुळं. नेमकी मुलगी निरोगी अन् मुलाला जन्मत: हृद्यरोग.... काय करणार होतो आम्ही? मुलाच्या हव्यासापायी...."
"हव्यास... हो हव्यास.... हे एवढं बरोबर बोललीस आई!"
"मुर्खासारखं बडबडू नकोस अथर्व! स्वत:जवळची सगळी पुंजी वेचली आम्ही. एका लेकराचा बळी द्यावा लागला. तुझ्या जीवापायी केलं सगळं."
"माझ्यासाठी? खरंच माझ्या जीवासाठी केलंत आण्णा हे पाप? स्वत:च्या विवेकाला विचारा आण्णा.... कुणापायी केलंत हे सारं? तुमचा घाणेरडा वंश टिकावा म्हणून ना?"
"देवाची जशी इच्छा होती तसं झालं..." आई हमसून हमसून रडत होती.
"देव? कुठला देव? माझ्या अशक्त दुबळ्या बहिणीच्या खुनाच्या पातकानं बरबटलेल्या हातांनी तुम्ही रोज केलेली त्याची पूजा... तो तिथं देव्हार्‍यात बसून सोवळ्यानं स्वीकारतो! तोही तुमच्या पातकात सहभागी आहे आण्णा!"
"अथर्व!!!"
-------------------------------

"दादा...."
एका नाजुक हळुवार हाकेसरशी अथर्व दचकून भानावर आला. लालबुंद झालेले डोळे... गालावर ओघळलेलं पाणी त्यानं चट्कन पुसलं.
"हं... काय झालं ताईं?"
"बिस्किट खाणार?" त्याच्या डाव्या खांद्याकडून एक मेंदीनं भरलेला नाजुक हात बिस्किटाच्या पुड्यासह बाहेर आला.
अथर्वनं किंचित मागं पाहिलं. नवरामुलगा गाढ झोपला होता.
"नाही नको...."
मेंदीभरला हात पुन्हा मागं गेला.
अथर्व गाडी चालवू लागला.

तेवढ्यात वाडेकर साहेबांचा फोन अथर्वच्या मोबाईलवर वाजला. बस अचानक ठरल्यापेक्षा दुसर्‍या रस्त्याला वळल्यामुळे वाडेकर साहेब साहजिकच बुचकळ्यात आणि काळजीत पडले होते.
"मीच सांगितलंय तसं ड्रायव्हरला साहेब. काळजी करू नका. विश्वास ठेवा."
अथर्वनं फोन ठेवला.

धडधड धडधड....
कमू... ऐकतोय गं! तुझंच ऐकतोय! गेली कित्येक वर्ष!
तुझ्या माझ्यातल्या अस्तित्वानं मला जिवंत ठेवलं फक्त. जगण्यासाठी नालायक केलं.
मला जिवंत ठेवण्यासाठी तू मेलीस. आता केवळ तुला माझ्यात जगवण्यासाठी मी जिवंत राहतोय इतकंच. इतका त्याग कुणी कुणासाठी करू नये गं....! ओझं पेलवत नाही एवढं....

रात्रीचे साडेदहा वाजत होते. कारच्या प्रकाशात दूर एक पांढरी व्हॅन रस्त्याच्या कडेला थांबलेली अथर्वने पाहिली. हि तीच व्हॅन. मगासची.... झाडीमागची. अथर्वला खात्री पटली. हायवेवर पूर्ण अंधार होता आणि पुढे मागे सुद्धा कुठलेही वाहन लांबपर्यंत दिसत नव्हते. या व्हॅनमधल्या लोकांचे हेतू अथर्वच्या अपेक्षेप्रमाणेच फारसे चांगले नव्हते हे आता उघड होतं.
अथर्वनं गाडीचा वेग जरासा वाढवला आणि विचारांचाही.

धडधड धडधड....
होय! तु जगली पाहिजेस! मी तुला जगवण्यासाठी जगतोय कमू...!! एक वंश... काळोखा... विकृत... तो तर कधीच विझला. विझायचाच होता. नाहितर केवढं आक्रीत झालं असतं! तुझ्या अवांछित त्यागानं बाटलेल्या कित्येक पिढ्यांची बरबटलेली फरफट स्वत:च्या गर्भातून जन्माला घातल्याच्या पापातनं आपल्या आईला या जगाच्या अंतापर्यंत मुक्ती मिळाली नसती.....

"ताई... जरा खाली वाकून झोपा. काही झालं तरी मी सांगितल्याशिवाय मान वर करायची नाही. दोघांचेही बेल्ट लावा. साहेबांनाही खाली वाकवा. उठले तरी कालवा करू नका म्हणावं." अथर्वनं जरा जरबेच्या आवाजातच मागे न पाहता आदेश सोडले.
"पण का? काय झालं?" घाबराघुबरा प्रश्न आलाच.
"घाबरू नका ताई... सांगतोय तेवढं करा. मी गाडीचा स्पीड वाढवतोय."
प्रतिसादाची वाट न बघता अथर्वनं गाडीचा वेग वाढवायला सुरुवात केली. एक क्षणभर मागे वळून त्यानं पाहिलं. दोघंही सीटवर वाकून झोपले होते. मुलगा उठला असावा बहुतेक. पण त्याला काही प्रश्न पडण्याआधीच मुलीनं त्याला गप्प केलं.

धडधड धडधड....

९०...१००...१२०... १४०....

व्हॅन बर्‍यापैकी जवळ येताच चार माणसं रस्त्यावर दिसू लागली. एक गाडीत बसलेला असावा. चौघांच्या हातात काठ्या किंवा कोयत्यासारखी हत्यारं होती.
गाडीचा अचानक वाढलेला वेग पाहून भांबावलेल्या त्या माणसांना भर रस्त्यात उभं राहताना कापरं भरलंच असणार.
रस्त्याच्या मधोमध उभं राहिलेली ती माणसं गाडीच्या अगदी वीस फूट जवळ राहिली तरी अथर्वनं वेग जराही कमी केला नाही. अखेर ती माणसं बावचळून रस्त्यावरून दूर होऊ लागली. सुसाट वेगात अथर्वने त्यांच्या अंगावर गाडी घातली. धाडकन् आवाज झाला. नक्की किती जण ठोकरले गेले कुणालाही कळलं नाही. अथर्व त्याच स्पीडने पुढची १० मिनिटे गाडी चालवत राहिला. धडधड धडधड.... धडधड धडधड....

मरताना कमूला नक्की काय वाटलं असेल? तिला समजलं असेल का...? जगणं समजायच्या आधीचं तिचं मरण? कळालं असेल का कि ती नक्की कशासाठी जिवंत होती? जिवंत ठेवली गेली होती? नक्की कशापायी मारण्यात आलं तिला? कुणी मारलं तिला?
तिला माहितच नसेल काही तर तो गुन्हा! साधा सरळ सोपा! देहान्त प्रायश्चित्त!!!
पण तिला ठाऊक असेल तर... तर तो ’त्याग’!! एक अवांछित त्याग! भयंकर अवघड!
आणि तिने क्षमाही केलेली असेल तर... मग तर हे प्रायश्चित्त पूर्ण होणे निव्वळ अशक्य!
तिला खरंच माहीत असेल? जाणवलं असेल काही?
तसं असेल तर तीच होती एक साक्षात संपूर्ण आयुष्य जगलेली. आयुष्याचं, जगण्याचं इप्सित कळालेली. अस्तित्वाचं कारण समजलेली. म्हणूनच कदाचित ती मरूनही मेली नाही! देहाच्या सर्व बंधनांच्या पल्याड... भावभावनांचे सर्व अभिशाप, नात्यागोत्यांचे सर्व जंजाळ, पापपुण्याची सगळी अडगळ माझ्या इवल्याश्या छातीत कोंबून... ती केवळ अनादी होऊन धडधडते आहे! निराकार होऊन माझ्या श्वासांतून आत बाहेर वाहते आहे. मला मात्र तिच्या त्या निरागस त्यागाचे... उदात्त नस्तित्वाचे ओझे वहायचे आहे....! जन्मभर...! प्रायश्चित्त म्हणून!

"दादा! आमचा जीव वाचवलात आज! तुमचे ऋण आयुष्यभर उतरणार नाहीत!"

आता कुणी सांगावं हिला... कुणाचा जीव मी कोण वाचवणार?

मी कमूला मरू दिलं नाही.... इतकंच!
_______________________

पूर्वप्रसिद्धी - माहेर - मे २०१५

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तरी शेवट आवडला - हे वाक्य :
आता कुणी सांगावं हिला... कुणाचा जीव मी कोण वाचवणार?

मी कमूला मरू दिलं नाही.... इतकंच!

पूर्वी वाचली होती. तेव्हा प्रतिसाद का दिला नाही माहित नाही. मला तुमचे लेखन जरा जास्तच शब्दबंबाळ वाटते पण हे कथाबीज चांगले आहे. आवडले.

> तुझ्यासाठी तुझ्या शरिराबाहेर एक निरोगी हृद्य घेउन जगत होती ती... तुझी ठेव जपत होती असं म्हण फारतर! तिचं जिवितकार्य तेवढंच. ते संपल्यावर तुझं देणं तुला सोपवून निघून गेली ती. आता ती नाही. एक तप झालंय तिला जाऊन. विसरून जा तिला. देवाच्या इच्छेचा मान ठेव!" > My Sister's Keeper आठवलं.

> सुसाट वेगात अथर्वने त्यांच्या अंगावर गाडी घातली. धाडकन् आवाज झाला. नक्की किती जण ठोकरले गेले कुणालाही कळलं नाही. > अरे बापरे.

वा...

सॉलिड कथा आहे.
वाचून घाबरायला आणि घश्यात गुदमरायला झालं.
याची एक मिनी युट्युब फिल्म बनू शकेल.

मस्त..

जितक्या वेळी ही कथा वाचली तितक्या वेळा ही अजूनच भिडत गेली...
तुझी शब्दांवरची हुकुमत जबरदस्त आहे... तळ ढवळून काढतेस...

Pages