आठवणीतला क्रिकेट विश्वचषक

Submitted by तुषार कुटे on 31 May, 2019 - 14:26

आमची क्रिकेट पाहायला सुरुवात 1993 मधली... याच वर्षी भारताने वेस्ट इंडिजला हीरो कप च्या अंतिम सामन्यात हरवलं होतं. त्यानंतर थेट 1996 च्या विश्वचषकात क्रिकेटची आणि आमची गाठ पडली. हा विश्वचषक आहे तसा आठवणीतलाच. श्रीलंकेचा क्रिकेटमधली एक नवी शक्ती म्हणून याच वर्षी उगम झाला. शिवाय केनियाची एन्ट्री ह्याच विश्वचषकातली. उपांत्य सामन्यामध्ये श्रीलंकेकडून झालेली आपली हार कायम लक्षात राहील अशीच होती. भारतीय क्रिकेट विश्वामध्ये सचिन तेंडुलकर नावाचं वादळ घोंगवायला सुरुवात झालेली होती आणि या विश्वचषकाच्या पराभवानंतर खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेट संघ बांधायला सुरुवात झाली. सौरव गांगुली, राहुल द्रविड सारखे खेळाडू यानंतर संघात आले. 1996, 1999, 2003, 2007, 2011 आणि 2015 असे सहा विश्वचषक आजवर मी अनुभवले आहेत. परंतु खऱ्या अर्थाने लक्षात राहिला तो 2003 चा विश्वचषक! याबाबतीत आमच्या पिढीतले अनेक जण माझ्याशी पूर्णतः सहमत असतील. 2003 चा विश्वचषक भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला माइल स्टोन म्हणावा असाच होता. सौरभ गांगुलीने आक्रमकपणे भारतीय संघाचे नेतृत्व हातात घेतलेलं होतं. चार वर्षांमध्ये त्याने चांगलीच संघबांधणी केली होती. शिवाय परदेशी भुमीवरती ही भारत विजय मिळू लागला होता. 1999 ते 2003 या काळामध्ये अनेक थरारक सामने पाहायला मिळाले. त्यामुळे 2003 च्या विश्वचषकाचा भारत एक प्रमुख दावेदार बनला होता. हा विश्वचषक पहिल्यांदाच आफ्रिका खंडात खेळला गेला. यातले काही सामने केनिया आणि झिम्बाब्वे मध्ये झाले होते तर बहुतांश दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळविण्यात आले. भारतीय संघात सेहवाग, तेंडुलकर, द्रविड, गांगुली, कैफ, दिनेश मोंगिया, युवराज, हरभजन, झहीर खान, अनिल कुंबळे, श्रीनाथ, नेहरा, आगरकर, पार्थिव पटेल आणि संजय बांगर असे खेळाडू होते. यातले बहुतांश खेळाडू सौरव गांगुलीने घडवलेले आहेत. आगरकर, पटेल आणि बांगर यांना मात्र पूर्ण विश्वचषकात एकही सामना खेळायला मिळाला नव्हता. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राहुल द्रविड या विश्वचषकामध्ये यष्टीरक्षक होता! यापूर्वी त्याने कधीच यष्टीरक्षण पूर्णवेळ केले नव्हते. परंतु, संघासाठी त्यांनी ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पडली. दिनेश मोंगिया आणि संजय बांगर यांच्या बद्दल सांगायचं तर दोघेही विश्वचषक यापूर्वीच्या दोन तीन सामन्यांमध्ये चमकून संघात समाविष्ट झाले होते. इतरांची मेहनत मात्र खूप मोठी होती. वीरेंद्र सेहवाग क्रिकेट विश्वातला सर्वात आक्रमक सलामी फलंदाज होता. स्वतः कर्णधार गांगुली तिसऱ्या क्रमांकावर खेळायचा. राहुल द्रविडचं चौथं स्थान पक्क होतं आणि युवराज व कैफ हे मधली बाजू सांभाळायचे. फलंदाजाप्रमाणे गोलंदाजांची फळी ही आपली भक्कम होती. झहीर आणि हरभजन च्या जोडीला श्रीनाथ आणि अनिल कुंबळे सारखे अनुभवी गोलंदाज होते.

wc-2003-1.jpg

या विश्वचषकाचा प्रमुख दावेदार म्हणून ऑस्ट्रेलिया तर होताच पण भारतही तितकाच तोडीस तोड होता. भारत, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हे तीनही सघ एका गटामध्ये होते. शिवाय आपल्याच गटात हॉलंड आणि नामिबिया सारखे छोटे देशही खेळणार होते. या काळात आम्ही भारताचा एकही सामना चुकवायचो नाही. त्या वेळी मी इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होतो. हॉस्टेलच्या मेसमध्ये विद्यार्थ्यांनी एकत्रित पैसे जमवून एक टीव्ही लावून घेतला होता. तोही खास विश्वचषकासाठी! भारताचा सामना असेल तर इतकी भयंकर गर्दी व्हायची किती व टीव्ही हा मेसच्या च्या बाहेर ठेवावा लागायचा! विश्वचषकातील भारताचा पहिला सामना होता हॉलंड सारख्या कमजोर संघाविरुद्ध. हॉलंड अर्थात नेदर्लंड्स म्हणजे मॅन इन ऑरेंज म्हणून उदयास आलेला संघ. या पहिल्याच सामन्यात भारताला 200 धावा गाठता गाठता नाकी नऊ आले. विश्वचषकाची अडथळ्याने सुरुवात झाली. भारताने हा सामना मात्र जिंकला. परंतु, अपेक्षित खेळी न झाल्यामुळे क्रिकेट रसिक नाराज झाले होते. नंतरचा दुसरा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होता. आपली या सामन्यातही अवस्था मात्र खूपच बिकट झाली. तेंडुलकरच्या चाळिशीतल्या धावा वगळता इतर कोणताही फलंदाज तग धरू शकला नव्हता. आणि सामन्यात भारताचा तब्बल नऊ विकेटने पराभव झाला! विश्वविजयी अशी आस लावून बसलेल्या भारतीय क्रिकेट रसिकांसाठी हा मोठा धक्का होता. अर्थात या पराभवामुळे भारतात क्रिकेटपटूंच्या घरासमोर जाळपोळी चालू झाल्या. भारतीय क्रिकेटप्रेमींचा भावना त्यातून प्रतीत झाल्या होत्या. भारत आता विश्वचषकात फारशी मजल मारू शकणार नाही, अशी सगळ्यांची भावना झाली होती. तिसरा सामना मात्र सुदैवाने नामिबिया विरुद्ध झाला. या सामन्यात सौरभ गांगुलीचे शतक आणि सचिन तेंडुलकरचे दीड शतक भारताला विजय देऊन गेले. विजयासाठी फारसे कष्ट पडले नाहीत. यानंतरचा आपला सामना होता झिंबाब्वे संघाविरुद्ध. झिम्बाब्वेला एकच चांगली गोष्ट होती की, ते स्वतःच्या भूमीवर हा सामना खेळणार होते. परंतु त्यांना फारसा फायदा झाला नाही. तेंडुलकरच्या 81 धावांनी भारताला चांगली धावसंख्या उभारून दिली व आपण हा सामना 83 धावांनी जिंकला. आता चौथा सामना होता इंग्लिश क्रिकेट संघासोबत. सचिन तेंडुलकरला डिवचण्यासाठी इंग्लंडच्या मुख्य गोलंदाज अँडी कॅडीकने म्हटले होते की नामिबिया आणि झिम्बाब्वेविरुद्ध विरुद्ध कोणी शतक करू शकतो. त्याच्या बोलण्याचे फलित मात्र त्याला पुढच्या सामन्यात भेटले. इथून पुढच्या सामन्यात सचिन तेंडुलकरने पकडलेल्या गिअर मात्र कधीच सोडला नाही. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्याने वेगवान 50 धावा फटकावल्या. कॅडिकला त्याने पूर्ण नामोहरम करून सोडले होते. स्टेडियमच्या बाहेर त्याला मारलेला एक षटकार मात्र अप्रतिम होता. एखाद्याला सणसणीत कानाखाली लागावी असा! प्रत्यक्ष कॅडिकचा हा शेवटचा विश्वचषक ठरला. भारताने हाही सामना सहजासहजी शिकला नव्हता. या सामन्यात सामनावीर होता गोलंदाज आशिष नेहरा! कारण त्याने या सामन्यात तब्बल सहा विकेट घेतल्या होत्या! नेहराला हिरो बनवणाऱ्या सामन्यांपैकी हा एक सामना होय. यानंतरचा सामना मात्र क्रिकेटरसिक कधीच विसरू शकत नाहीत. दिवस होता एक मार्च 2003 आणि सामना होता भारत विरुद्ध पाकिस्तान! अर्थात या सामन्याची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत होता. भारत त्यावेळीही पूर्णपणे फलंदाजीवर अवलंबून होतात आणि पाकिस्तानच्या गोलंदाजीमध्ये वसीम अक्रम, वकार युनूस आणि शोएब अख्तर सारखे वेगवान गोलंदाज होते. त्यामुळे हा सामना भारतीय फलंदाजी विरुद्ध पाकिस्तानी गोलंदाजी असा होणार होता! अर्थात ही मेजवानी क्रिकेटरसिकांना दुसऱ्या डावात पाहायला मिळाली. हॉस्टेलच्या मेसमध्ये लावलेल्या त्या टीव्हीवरचा तो सामना मला आजही पूर्णपणे आठवतो. सुमारे 400 ते 500 विद्यार्थ्यांनी ती पूर्ण खोली भरुन गेली होती! भारताच्या नावाचा जयघोष चालू होता. जणू काही आम्ही क्रिकेट स्टेडियम मध्येच बसून सामना बघत आहोत, असं वाटत होतं. पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करून 273 धावा फटकावल्या. यात सईद अन्वर च्या शतकाचा सर्वात मोठा वाटा होता. त्या काळात अडीचशेच्या वर धावा या आव्हानात्मक मानल्या जायच्या. त्यामुळे सामन्याची रंगत वाढणार, हे तेव्हाच निश्चित झालं होतं. भारताची फलंदाजी चालू झाली आणि पहिल्याच षटकापासून सेहवाग आणि तेंडुलकरने धडाकेबाज फलंदाजी चालू केली. त्यामुळे चौथं षटक गोलंदाज बदलून शोएब अख्तरला देण्यात आले होते. त्याची हालत पहिल्या दोघांपेक्षा वाईट झाली! वीरेंद्र सेहवाग मनात काहीतरी ठरवून आल्यासारखंच खेळत होता! वकार युनूस आणि अख्तरने तर जोरदार मार खाल्ला होता. वसीम अक्रमची अवस्था मात्र त्यामानाने चांगली होती. दोघांनीही थर्ड मॅनच्या दिशेने मारलेले षटकार नेत्रदीपक असे होते. यावेळी स्टेडियममध्ये होणारा जल्लोष मात्र पाहण्यासारखा होता. फटकेबाजीच्या नादात सेहवाग आऊट झाला आणि त्यानंतर फलंदाजीस आलेल्या सौरव गांगुलीही पहिल्याच चेंडूवर बाद झाला! मोहम्मद कैफ ने जवळपास 35 धावा केल्या व तोही माघारी परतला. पाकिस्तानने सामन्यावर पकड मिळवायला सुरुवात केली होती. परंतु 'ग्रेट वॉल ऑफ इंडिया' म्हणून ओळखला जाणारा राहुल द्रविड फलंदाजीस आला होता आणि दुसऱ्या बाजूने सचिन तेंडुलकर त्याचा किल्ला लढवत होता. तेंडुलकर चा पूर्णपणे जम बसला होता व तो शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता. त्यावेळी पाकिस्तानी कर्णधाराने गोलंदाजीत बदल केले व त्यापूर्वी फटकेबाजीचा अनुभव घेतलेल्या शोएब अख्तरला पाचारण करण्यात आले. त्याने टाकलेल्या पहिल्याच बाऊन्सरवर सचिन तेंडुलकरची विकेट गेली. केवळ दोन धावांनी सचिनचे शतक हुकले होते! पाकिस्तानी खेळाडूंनी जोरदार जल्लोषाला सुरुवात केली. या विकेटमुळे त्यांच्या आशा जवळपास दुपटीने वाढल्या होत्या. मग मैदानात आला नव्या दमाचा युवराज सिंग. युवराज हा भारताच्या मोजक्या भरवशाच्या फलंदाजांपैकी एक. मग काय राहुल द्रविड आणि युवराज सिंग यांनी खिंड लढवायला सुरवात केली. विजय जसजसा जवळ येत गेला तसे तसे फटकेबाजीला सुरुवात झाली. दोघांनीही जवळपास शतकी भागीदारी करून भारताला विजय प्राप्त करून दिला. अखेरच्या चेंडूवर युवराज सिंगचे अर्धशतक पूर्ण झाले होते. भारताने विश्वचषकात आजवर कधीही पाकिस्तान कडून पराभव स्वीकारला नव्हता. त्यातीलच हा एक रोमहर्षक सामना! या सामन्याचा सामनावीर अर्थातच सचिन तेंडुलकर ठरला. या विजयाने भारताचा सुपरसिक्स मध्ये प्रवेश निश्चित झाला होता. अ गटातून भारत, ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे असे तीन संघ आणि ब गटातून श्रीलंका, केनिया व न्यूझीलंड असे तीन संघ सुपर सिक्स फेरीमध्ये पोहोचले. सहापैकी झिंबाब्वे व केनिया यांचा समावेश मात्र धक्कादायक होता. पहिल्याच सामन्यात केनिया विरुद्ध भारताने सहज विजय मिळवला. सामन्यामध्ये सौरभ गांगुलीने शतक झळकावले होते व तेंडुलकरनेही सत्तरी पार केली होती. सुपर सिक्सच्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध भारताने विजय मिळवला. याही सामन्यात सचिन तेंडुलकरने 97 धावा केल्या होत्या व त्याचे शतक तीन धावांनी पुन्हा हूकले भारताच्या 292 गावांसमोर श्रीलंकेने केवळ 125 धावा केल्या होत्या! श्रीलंकेच्या पाच फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. भारताची विजयी घोडदौड कायम राहिली. सुपर सिक्समधला शेवटचा सामना न्यूझीलंड विरुद्ध होता. भारताने न्यूझीलंडला 146 धावांमध्येच गारद केले. त्यामुळे विजय सोपा होईल, असे वाटत असतानाच भारताचे 21 धावात 3 बळी गेले. डेरेल टफीला सलग तीन चौकार मारल्यानंतर चौथ्या चौकारांच्या वेळेस सचिन तेंडुलकर बाद झाला आणि नंतर धावसंख्या अतिशय कमी वेगाने वाढायला लागली. आपण हा सामना हरतोय की काय? अशीही शंका वाटत होती. परंतु मोहम्मद कैफ आणि राहुल द्रविड यांनी फलंदाजी लावून धरली दोघेही चिकट अर्थात एकाच पठडीतल्या खेळाडू होते. दोघांच्या अर्धशतकी खेळीने भारताने हा विजय प्राप्त केला. या सामन्यात सामनावीर होता... चार बळी घेणारा जहीर खान. भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित झाला होता. आणि त्याहूनही विशेष म्हणजे आपल्या प्रतिस्पर्धी होता केनिया संघ! केनिया या विश्वचषकामध्ये अतिशय फॉर्ममध्ये दिसला. 1996 च्या विश्वचषकात पदार्पण करून 2003 मध्ये उपांत्य फेरीत त्यांनी गाठली होती. उपांत्य फेरीत तसा सोपा प्रतिस्पर्धी भारताला मिळाला होता. तेंडुलकरच्या 83 आणि गांगुलीच्या शतकाच्या जोरावर भारताने 270 धावांचे आव्हान उभं केलं. अर्थात केनिया सारख्या नवख्या संघाला ते पेलवले नाही. भारताने हा सामना 91 धावांनी जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
wc-2003-2.png

इथपर्यंतचा एकंदरीत प्रवास रोमहर्षक आणि प्रगतिशील राहिला. परंतु त्यापेक्षा मोठे आव्हान होते अंतिम फेरीत खेळणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाबरोबरच! ऑस्ट्रेलियाने पूर्ण विश्वचषकात एकही सामना गमावला नव्हता आणि भारताला केवळ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता! ही ऑस्ट्रेलियाची सर्वात जमेची बाजू ठरली. विश्वविजयाचे स्वप्न बघताना ऑस्ट्रेलिया सारख्या संघाला त्यावेळी हरवणे फार अवघड होते. शेवटी हे स्वप्न स्वप्नच राहिले. प्रथम गोलंदाजी करताना भारतीय संघाने पहिल्याच षटकांमध्ये 19 धावा दिल्या आणि तिथूनच ऑस्ट्रेलियाने सामन्यावर पकड घ्यायला सुरुवात केली. त्यांनी जोरदार फटकेबाजी करत साडेतीनशेची धावसंख्या पार केली. त्यामध्ये कर्णधार रिकी पॉंटिंग चा दीडशे धावांचा हातभार होता! विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदाच इतकी मोठी धावसंख्या उभारली गेली होती! हा भार भारतीय फलंदाज कसे पेलतील, हाही प्रश्न होताच. अर्थात न व्हायचे तेच झाले. ग्लेन मॅग्रा च्या पहिल्या षटकातील एका चेंडूवर सचिन तेंडुलकर बाद झाला आणि भारतीय क्रिकेट रसिक सुन्न झाले. यानंतर भारताला या सामन्यावर ती कधीच पकड मिळवता आली नाही. वीरेंद्र सेहवागने मात्र एका बाजूने किल्ला लढवत ठेवला होता. त्याचा फारसा उपयोग झाला नाही. सामन्याच्या मध्ये एकदा पाऊसही भारताच्या मदतीला धावून येईल, असं वाटलं होतं. परंतु सर्वांची साफ निराशा झाली. भारताने हा सामना सव्वाशे धावांनी गमावला आणि एका रोमहर्षक प्रवासाचा शेवट अतिशय दुःखद झाला. परंतु संपूर्ण विश्वचषकात भारताने केलेली कामगिरी मात्र अविश्वसनीय अशी होती. ऑस्ट्रेलिया वगळता इतर प्रत्येक संघात आपण धूळ चारली होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सचिन तेंडुलकरने या विश्वचषकात 673 धावा केल्या होत्या. आजही हा क्रिकेट विश्वचषकातला वर्ल्ड रेकॉर्ड आहे. मालिकावीराचा पुरस्कार सचिन तेंडुलकरला मिळाला. परंतु या पुरस्काराचा आनंद मात्र सचिन तेंडुलकरला त्यावेळेस दिसला नाही. तोंडात आलेला घास हिरावला गेला होता, याचे दुःख वाटते. शेवट गोड व्हावा अशी सर्वांची इच्छा असते. परंतु, या विश्वचषकात ते मात्र जमले नाही. कर्णधार सौरव गांगुलीची संघबांधणी सर्वोत्तम होती. परंतु अनेक खेळाडू प्रथमच विश्वचषकात खेळत होते आणि अंतिम सामन्यात खेळण्याचा दबावही होता. कदाचित हाच दबाव ते पेलू शकले नसावेत. 2011 मध्ये सचिन तेंडुलकर संघात असताना भारताने विश्वचषक जिंकला. परंतु द्रविड, गांगुली आणि कुंबळे यासारख्या दिग्गजांच्या उपस्थितीत भारताला एकही विश्वचषक जिंकता आला नाही, याचेही दुःख वाटते.
wc-2003-3.jpg
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा वर्ल्ड कप मी शाळेत असताना पहिला होता. द्रविड मला नेहमीच साधारण प्लेयर वाटतो. सचिन बद्धल वाईट वाटले 98 वर आऊट झाला ते. सुंदर लिहिला आहे लेख तुम्ही.

माझ्या आवडीचा वर्ल्ड कप 2011, माहि माही ...

सुंदर लेख!
तो वर्ल्डकप परत डोळ्यासमोरुन तरळून गेला!

"आवरा!" - स्वरूप, प्रश्न इतकाच होता की तू का मी? मी इग्नोर मारायचं ठरवलं, तू नुसतच मारायचं. Happy

द्रविड मला नेहमीच साधारण प्लेयर वाटतो.>>>>सहमत, द्रविड फलंदाजी करायला आला कि मी टीव्ही बंद करायचो नाहीतर लवकर आऊट होऊ दे म्हणून प्रार्थना तरी करायचो कारण तो खूपच टुकूटुकू खेळायचा. प्रतिस्पर्धी खेळाडूसुद्धा गाफील राहायचे हा हळूहळू खेळणार म्हणून. मग हा मधेच कधीतरी बॅट फिरवायचा आणि चौकार जायचा.

मी इग्नोर मारायचं ठरवलं
>> मी पण...

वर्ल्डकपच्या रँडम आठवणी:

१९९२:
शाळेतून सायकल स्टँडच्या कंपाऊंडवरून उडी मारून जाऊन सायकल दुकानदाराच्या घरातल्या टीव्हीवर बघितलेला स्कोअर
जडेजा नी घेतलेला कॅच
जॉण्टीचे रन-आऊट्स
२२ रन्स इन १ बॉल

१९९६:
केनिया, ऑस्ट्रेलिया, विंडीज, श्रीलंका, झिम्बाब्वे, पाकिस्तान अन श्रीलंका अगेन... एक एक मॅच, एक एक रन, एक एक विकेट, एक एक क्षण
कॅप्टन्सीसाठी क्रोनिएला मिळालेली मॅन ऑफ द मॅच अ‍ॅवॉर्ड्स
कोलकत्याच्या बाटल्या
फायनलला चेस करायचा डिसीजन
जयसूर्या, डिसिल्वा, रणातुंगा

१९९९:
राहुल द्रविड
सचिन चे वडील
स्टीव्ह वॉची फायटिंग इनिंग्स
क्लूसनर ची घाई
वॉर्न ची फिरकी

२००३:
इंडियन हडल
जॉन राईट - संदीप पाटील
दादाची टीम
शोएब ची धुलाई
झाहीर ची पहिली ओव्हर
फायनलला बाहेर बसलेला कुंबळे अन नसलेला लक्ष्मण

२००७:
बांगलादेश-कॅनडा
बॉब वुल्मर
फिका पडलेला निळा युनिफॉर्म

२०११:
युवराज
सचिन, झहीर, सेहवाग, कोहली
गंभीर, धोणी
वानखेडेला शेवटचा हॅलिकॉप्टर शॉट