हवामान बदलाचे दुष्परिणाम हे आता दूर कुठे तरी हिमालयात हिमनद्या वितळाताहेत, उत्तर / दक्षिण ध्रूवावरचे हिमनग सुटून निघत आहेत असं काहीतरी केवळ वाचायची गोष्ट राहिली नाही. लेहला झालेली ढगफुटी, केदारनाथ प्रलय, अशा केवळ फिरायला जायच्या ठिकाणांच्या ठिकाणी घडणार्या गोष्टींसोबतच, मोठ्या भूस्खलनामुळे सह्याद्रीच्या कुशीतील माळीण सारखे आख्खेच्या आख्खे गाव नाहीसे होणे, पुण्यासारख्या उत्तम हवामानाकरता प्रसिद्ध असलेल्या शहराचे ४५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलेले तपमान असे आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपले आहेत. मागे एकदा, भविष्यात पिण्याच्या पाण्यावरनं युद्धं होतील असे मी जेव्हा वाचले तेव्हा माझ्या हयातीत काही असे होत नाही म्हणून मी माझी समजूत काढलेली जी खोटी ठरण्याची वेळ आलेली आहे.
ह्या सगळ्या मानव निर्मित / मानवी हस्तक्षेपामुळे होणार्या नैसर्गिक घडामोडी चालू असताना आपल्या देशातली स्थिती माध्यमांवर नजर टाकता तरी अशी भासते की जगात जास्त महत्वाचे काही असेल तर ते म्हणजे नटनट्यांचा एअरपोर्ट लूक, कोणत्या क्रिकेटवीराला किती जाहिराती मिळतात आणि त्यामुळे त्याची ब्रँड व्हॅल्यु कशी वधारते आहे आणि राजकीय घडामोडी. राजकीय घडामोडी तर 'अराजकी'य होत चालल्या आहेत. एखाद्या सरकारने केलेले काम चांगले आहे की नाही हे ते सरकार कोणत्या पक्षाचे आहे ह्यावर ठरते. सर्वसाधारणतः आपल्याकडच्या बहुतेक शहरी माणसांचा समज असा असतो की कर भरला म्हणजे आपले काम / कर्तव्य संपले बाकी जे काही करायचे आहे ते त्या भरलेल्या करांच्या बदल्यात सरकारने करावे. सरकारला (स्थिर असेल तर / तरीही) लोकांना चटकन दाखवायला सोपी पडतील अशी कामे करण्यात रुची असते. शाश्वत विकास वगैरे गोष्टी बोलाची कढी म्हणून च राहतात. ह्या सगळ्यात पर्यावरणाबाबत आपण काहीतरी करायची वेळ आलेली आहे असे वाटत असतानाच माझ्या वाचनात आले मियावाकी पद्धतीने बनवता येणार्या जंगलाबाबत.
मियावाकी प्रकारच्या जंगलाचे कमीत कमी शब्दात वर्णन करायचे झाले तर ते असे असेल.
जैवविविधता राखून स्थानिक झाडे जवळजवळ लावणे. ह्याने होणारे फायदे असे मातीतून घेत असलेल्या पोषणाबाबत परस्परपुरक वातावरण आणि झाडे जवळजवळ लावल्याने वाढीच्या बाबतीत (जमीनीवर फांद्यांची आणि खाली मुळांची वाढ) स्पर्धा केल्याने होणारी जलद वाढ. दावा असा आहे की हे जंगल, आपण लावलेल्या सहा इंच ते दोन फूटी रोपांना वणवा, चराई पासून जपले आणि पाणी घालत राहिले तर केवळ तीन वर्षात १०-१२ फुटांहून जास्त उंच वाढते आणि पाण्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण होते.
मला मिळालेली बहुतांश सर्व माहीती https://www.afforestt.com/ ह्या वेब साईटवरून मिळवलेली आहे. भारतात सर्व प्रथम शुभेंदू शर्मा नावाच्या एका इंजीनियर ने तो त्यावेळी काम करत असलेल्या एका जपानी ऑटो उत्पादक कंपनी करता त्यांच्या आवारात अशा प्रकारचे जंगल तयार केले; त्यानंतर ह्या पद्धतीमुळे तो इतका प्रभावित झाला की त्याने ती नोकरी सोडून स्वतःच एक कंपनी स्थापन केली ज्यायोगे तो आज अनेक ठिकाणी अशा प्रकारचे जंगले तयार करण्याचे काम पैसे घेऊन करतो अर्थात तरीही ज्याला कोणाला स्वतः चे स्वतः हे काम करण्याची ईच्छा आहे अशा लोकांकरता अत्यंत सुलभ प्रकारे वर्णन केलेली माहीती ह्याच वेबसाईटवर दिलेली आहे. https://www.dropbox.com/sh/4l3sqwd3b9j3pmq/AAAa6kbi3r7yY9QnDgrnj5BMa?dl=0 इथुन ती डाऊनलोड देखिल करता येऊ शकते.
माझ्या पाहण्यात आलेला मियावाकी बाबतचा पहिला व्हिडिओ
https://youtu.be/jf3YXoMZ76o
आणि अलीकडेच पाहण्यात आलेला हा एक व्हिडिओ
https://youtu.be/j7PbJYJXRuI
हे पाहून काय करायचे असते ते अधिक चांगल्या प्रकारे कळू शकेल.
मियावाकी पद्धती ने तयार केलेले आणि पारंपारिक पद्धती ने तयार केलेले जंगल यामधला फरक उलगडून दाखवणारा हा अजून एक व्हिडियो
मी ही ठरवले आहे की आपणही हे करून बघायला हवे. माझ्याकडे ज्यावर असे जंगल तयार करता येईल अशी जमीन आहे फक्त २ गुंठे त्यामुळे आणि त्याव्यतिरिक्तही, 'पण' ने सुरु होणारे अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि नेहेमी प्रमाणे बापूंना आठवले. गांधीजी, त्यांच्याकडे एखाद्या उपक्रमाबाबत 'हे कसं होईल' वगैरे शंका घेऊन कोणी माणूस आला की म्हणायचे 'करके देखो'
मी माझ्याकडे असलेल्या (फक्त २ गुंठे) जागेत असे जंगल तयार करू शकलो तरी त्याचा वातावरणावर खूप मोठा प्रभाव पडणार आहे असे काही नाही पण आपल्याकडे रामाच्या सेतूला मदत करणार्या खारीची गोष्ट, खुलभर दुधाची कहाणी अशा अनेक गोष्टींनी प्रेरित होऊन ही हिंमत एकवटत आहे. नेहेमी प्रमाणेच माझ्या अनेक वैयक्तिक उपक्रमांना देता तशा शुभेच्छा द्याल अशी आशा आहे.
लावू पहात आहे अशी झाडे निवडण्याकरता माझ्या एका मैत्रीणीची व्यावसायिक मदत मिळाली आहे. सर्व झाडे अर्थात च देशी असणार आहेतच पण त्यातही अशी काही निवडली आहेत ज्यामुळे पक्षी , कीटक, फुलपाखरे अशा निसर्ग साखळी तील सर्व घटकांना पोषक असे पर्यावरण तयार होईल.
झाडांबाबत अधिक माहिती खालील वेब साईटस् वरून मिळवता येईल. (विशेषकरून भारतीय झाडांकरता पहिल्या दोन वेब्साईट अधिक उपयुकरता)
https://indiabiodiversity.org/
http://www.flowersofindia.net/
http://tropical.theferns.info/
आपल्या मायबोलीवर अनेक निसर्गप्रेमी, पर्यावरण प्रेमी मंडळी आहेत; असेही अनेक जण आहेत ज्यांच्याकडे भरपूर जमीन आहे; काहीजण शहरातील थोडीफार मोकळी जागा असलेल्या सोसायटीत रहात असतील त्यासर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवावी म्हणून हा खटाटोप.
तर मंडळी चला जंगल तयार करू या.
तळटीप - मियावाकी जंगलासंदर्भात वेळोवेळी वाचनात आलेल्या बातम्या देखिल ह्याधाग्याखाली संकलित करुया.
स्तुत्य उपक्रम आणि खूप सार्
स्तुत्य उपक्रम आणि खूप सार्या शुभेच्छा हर्पेनदा..
नेहमीप्रमाणे वेळोवेळी सचित्र माहितीच्या धाग्यांच्या पुलेशु.
मुंबईत ओशिवडा (राम मंदिर -
मुंबईत ओशिवडा (राम मंदिर - गोरेगाव) भागात असे मियावाकी जंगल तयार केले गेल्याची फोटोसकट बातमी गेल्या एक दोन आठवड्यांत वाचली होती. आपल्या उपक्रमास शुभेच्छा.
खूप धन्यवाद. मलाही दहा गुंठे
खूप धन्यवाद. मलाही दहा गुंठे क्षेत्रावर जंगल तयार करायचं आहे. जंगलाची व्याख्या सरमिसळ असलेल्या वनस्पती, वृक्ष वेली, झुडपे इ. एकाच प्रकारची झाडे लावतो त्याला वन म्हणतात. झाडे लावताना सीसीटी म्हणजे लांब चर खोदून मातीचा वरंबा तयार होतो त्यावर लावले तर वाढ चांगली होते. वर पाणीही जमिनीत मुरते. आजकाल पाषाण टेकडीच्या बातम्या वाचून वृक्षप्रेमी लोकांना धन्यवाद द्यावेसे वाटतात.
माझं बालपण लिंब, आंबा, वड या झाडांशी निगडित आहे. किती आनंद देतात झाडं हे दुपारच्या सावलीत मस्त झोपा काढणाराच सांगेल. पौडच्या पुढे एका कुटुंबाने खाजगी जंगल तयार केले आहे. लोक पैसे देऊन सहलीला जातात तिथे.
स्तुत्य उपक्रम ... खूप
स्तुत्य उपक्रम ... खूप शुभेच्छा...
यांना भेटून अनुभव विचारु शकता
https://www.loksatta.com/pune-news/forestry-on-60-acres-of-naturalist-do...
स्तुत्य उपक्रम आणि खूप सार्
स्तुत्य उपक्रम आणि खूप सार्या शुभेच्छा हर्पेनदा.. >>> + १२३४५६७८९
स्तुत्य उपक्रम आणि खूप सार्
स्तुत्य उपक्रम आणि खूप सार्या शुभेच्छा ....
इको टूरिझम तसेच फॉरेस्ट कंझर्वेशनसाठी काम करणारी बरीच मंडळी ओळखीत आहेत. काहीही मदत लागली तर नक्की सांगू शकता.
मी कालच झी२४तास वर
मी कालच झी२४तास वर विज्ञानवार्ता का असं काहीतरी कार्यक्रमात दुपारी हि बातमी पाहिली पण आता लिंक सापडत नाहीये. औरंगाबादला हि चळवळ चालू आहे त्याच वार्तांकन होतं त्यात. तुम्हाला यासाठी शुभेच्छा .
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwad...
अतिशय सुंदर कल्पना. उपक्रमास
अतिशय सुंदर कल्पना. उपक्रमास शुभेच्छा. आम्ही गावाकडे एक डोंगरच लागवडीखाली आणायचा उद्योग चालवला आहे. मियावाकी हा प्रकार करुन पाहीन आता. स्पर्धेमुळे झाडांची वाढ नक्की वाढत असेल.
“माझ्या हयातीत होत नाही” म्हणून स्वार्थीपणे बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष केले पण त्यातल्या बऱ्याच गोष्टी आता उंबरठ्यापर्यंत आल्यात.
धन्यवाद मित, हीरा, शक्तीराम,
धन्यवाद मित, हीरा, शक्तीराम, दत्तात्रय साळुंके, मी नताशा, वीक्ष्य, जिद्दु, शाली
गोरेगाव ची बातमी व्हॉटसअॅपवर वाचनात आली होती.
समतल चर खणून त्याखाली झाडे लावली असता केवळ पावसाच्या पाण्यावरती जगण्या ची शक्यता जास्त असते
शाली तुमचा मियावाकी बाबतचा प्रत्यक्ष अनुभव नक्की लिहा ह्या धाग्यावर.
“माझ्या हयातीत होत नाही” म्हणून स्वार्थीपणे बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष केले पण त्यातल्या बऱ्याच गोष्टी आता उंबरठ्यापर्यंत आल्यात. >>> हे बाकी अगदी खरे
माहीती बरीच जम(व)ली आहे आता वेळ आली आहे प्रत्यक्ष कृतीची
प्रतिक बावडेकर (९७६४००५४६३)
प्रतिक बावडेकर (९७६४००५४६३) यांनाही एकदा संपर्क करून पाहा.
कोल्हापुरात असतात. खास देशी झाडं लावून देण्यासाठी सगळी मदत करतात.
जून-अनुभव अंकाच्या 'स्वतःपलिकडे' सदरात त्यांच्या कामाची ओळख आली आहे. फोन नंबरही आहे.
खूप शुभेच्छा. सध्या तरी एवढंच
खूप शुभेच्छा. सध्या तरी एवढंच करता येईल मला.
छान माहिती आणि उपक्रम.
छान माहिती आणि उपक्रम. मियावाकी करण्याचा प्लान होताच,सुरुवात झाली आहे पावसाची वाट पहात होतो, तोही झालाय. डोंगराच्या माथ्ययावर काम करायचे असल्याने पावसाची वाट पहावी लागली. उर्जा मिळाली. नक्कीच जंगल तयार करू. माबो करांनी आपापल्या परिसरात प्रयत्न करावा.
हा डोंगरमाथ्याचा फोटो. १ २
हा डोंगरमाथ्याचा फोटो.
१
२
मागच्यावर्षी भैय्याने
मागच्यावर्षी भैय्याने (कोदंडपाणी) बरीच झाडे जातीने पाणी घालून जगवली होती. कुणा कर्मदरिद्री माणसाने आग लावली पठाराला. वृत्तीवर उपाय नाही हेच खरं. एकतर लावलेले प्रत्येक रोप जगेलच याची शाश्वती नाही. जी जगतात त्यांना असा त्रास होतो. पण आम्ही लावत रहाणार.
मस्त कल्पना हर्पेन!
मस्त कल्पना हर्पेन!
आपल्या चिपळूणजवळच शिरवली गावाला नंदू तांबे यांनी ३२ एकरात असे जंगल तयार केले आहे.
पुढच्या ट्रिपमध्ये नक्की भेट देऊन या तिकडे. बरीच माहिती मिळेल.
उत्तम कल्पना आहे. तुला
उत्तम कल्पना आहे. तुला मनापासून शुभेच्छा!
धन्यवाद अनया, मॅगी, कोदंडपाणी
धन्यवाद अनया, मॅगी, कोदंडपाणी, प्राचीन, ललीता-प्रीती
मॅगी - नंदू तांब्यांविषयी खूप ऐकून आहे, आता एकदा जायलाच हवे.
शाली - डोंगरमाथ्याचे फोटो मस्तच. वृत्तीला उपाय नाही हे खरेच. अशा ठिकाणी रोपांपेक्षा, बिया वापरून पहा म्हणजे मुद्दाम लावलेली वगैरे वाटणार नाही अशी झाडे उगवतील तर काही फरक पडेल तर बघायचे.
कोदंडपाणी - भैय्या मलाही एखादा रवीवार श्रमदानाला यायला आवडेल.
ललीता - प्रतिक बावडेकर यांचा नंबर साठवून ठेवत आहे योग्य वेळी उपयोग जरूर करणार. सध्या असलेली जागा फारच कमी असल्याने त्यांची लगेच गरज पडेल असे नाही. मोठ्या जागेच्या शोधात आहे, त्यावेळी नक्की वापर करणार.
फोटो भैय्याने काढले आहेत.
फोटो भैय्याने काढले आहेत.
हर्पेन हे काम जास्तीत जास्त प्रसारीत व्हायला हवे. तुम्ही मियावाकी पध्दत अवलंबता की अजुन कोणती, त्याला महत्व नाही. झाडे लावा. कुणी लावली असतील तर त्यांची काळजी घ्या.
स्तुत्य उपक्रम.. अनेक
स्तुत्य उपक्रम.. अनेक शुभेच्छा
सध्या मी पामर एवढेच म्हणू शकते
आताच रानात जा पाऊस पडायच्या
आताच रानात जा पाऊस पडायच्या अगोदर. भरपूर बिया फळे मिळताहेत. वेलींचे कटिंगज हवे. करवंदी,
भोकर, रानजांभळे, आंबे. झुडपे हवीतच.
फारच छान उपक्रम! हार्दिक
फारच छान उपक्रम! हार्दिक शुभेच्छा.
Submitted by मॅगी on 10 June, 2019 - 15:50>>
३२ एकर म्हणजे खूप झाले की! भारीच!! बघायला हवं जाऊन.
भारी कल्पना हर्पेन. शुभेच्छा
भारी कल्पना हर्पेन. शुभेच्छा!
काही वर्षाम्नी कायापालट झालेल्या जमिनीचा फोटो बघायला खूप आवडेल.
शाली तुम्हालाही शुभेच्छा!
सीड बॉल्स बनवून ठेवा
सीड बॉल्स बनवून ठेवा
पाऊस पडला की जंगलात / मोकळ्या डोंगरावर / ओसाड जागेत टाकायला.
ही चर्चा चालूच ठेवा पण
ही चर्चा चालूच ठेवा पण मियावाकी पध्दतीची सविस्तर माहिती मायबोलीत लिहा. मला लिंक वरून समजलं नाही.
हर्पेन, तुम्हाला खुप साऱ्या
हर्पेन, तुम्हाला खुप साऱ्या शुभेच्छा.
शाली दा, रोप जाळली वाचुन वाईट वाटले. , तुमच्या ह्या उपक्रमाला खुप साऱ्या शुभेच्छा.
महत्वाच आणि अत्यंत कष्टाच
महत्वाच आणि अत्यंत कष्टाच कार्य आहे हे.
मुळात ही कल्पनाच सुंदर आहे.
खुप खुप शुभेच्छा तुमच्या उपक्रमासाठी.
शालीदा तुम्हालाही शुभेच्छा.
हार्पेन, अतिशय स्तुत्य उपक्रम
हार्पेन, अतिशय स्तुत्य उपक्रम. खूप शुभेच्छा.
झाडे जवळ जवळ लावल्याने वणवे
झाडे जवळ जवळ लावल्याने वणवे जास्त लागतात. रादर कॅलिफोर्निआ मधल्या वार्षिक आगींना फॉरेस्ट थिनिंग हे उत्तर आहे असं कायम सगळीकडे ऐकतो. या पद्धतीत तेच केलं आहे. थिनिंग आणि वणवे याचा अभ्यास केला असेल तर उत्तम, नसेल तर जरूर करावा.
थिनिंग आणि उन्हाळ्याच्या आधी
थिनिंग आणि उन्हाळ्याच्या आधी गवत, पालापाचोळा हटविणे. वनखाते असे ठराविक अंतरावर गवताचे पट्टे साफ करते. म्हणजे आग लागली तर पसरत नाही.
गवत हटवणे +११
गवत हटवणे +११
Pages