गाणी आणि आठवणी

Submitted by अतुल. on 18 May, 2019 - 06:31

खूप लहानपणीची एक घटना आठवते. ती एक अतिशय उदासवाणी सकाळ होती. पावसाळा नव्हता. तरीही वातावरण कुंद. ढगाळलेले. जाग आली तीच बाहेर सुरु असलेल्या कसल्याश्या गोंधळ आणि गलक्यामुळेच. उठून पाहिले. घरातल्या व शेजारपाजारच्या मोठ्या माणसांच्या चेहऱ्यांवर धक्का बसल्याचे काळजीचे भाव होते. सगळेजण गंभीरपणे कसलीशी कुजबुज आणि चर्चा करत होते. त्याचवेळी रेडीओवर लता मंगेशकरांचे ते 'गाईड' मधले गाणे लागले होते "काँटों से खिंच के ये आँचल, तोड़ के बंधन बांधी पायल. कोई ना रोको दिल की उड़ान को, दिल वो चला, आज फिर जीने की तमन्ना है. आज फिर मरने का इरादा है". तसाच बाहेर आलो. बाहेरच्या दरवाजापासून पुढे काही अंतरावरच गावातला खाजगी दवाखाना होता. त्यासमोरचे छोटे पटांगण सारे माणसांनी भरून गेलेले दिसत होते. कोणीतरी बोलले, "किल्लेदारांच्या ताईला अपघात झालाय. दवाखान्यात आणली आहे". काळजात लक्क झालं.

तेंव्हा मी दुसरी किंवा तिसरीला असेन. ताई चौथीच्या वर्गात. आपल्या लहान भावाला कडेवर घेऊन शाळेत यायची. नेहमी चेहरा हसरा. भावाला खाली ठेवून बाजूला खेळत बसायची. तो रडायला लागला कि खेळ सोडून पट्कन उठून त्याला कडेवर घेऊन फिरवायची. शांत करायची. ताई होतीच तशी. एवढीशी पोर. पण वयाच्या मानाने फार समंजस. शाळेत सर्वानाच खूप प्रिय होती. त्या दिवशी सकाळी सकाळी ताईच्या घरचा नोकर मोठ्या घागरींतून विहिरीतून शेंदून आणलेले पाणी भरत होता. वाटेत मध्येच अंथरुणात ताई झोपली होती. लगबगीत जात असताना भिंतीत बसवलेल्या खुंटीला कसा कुणास ठावूक त्याच्या घागरीचा धक्का लागला. त्यासरशी पाण्याने भरलेली ती जडशीळ घागर त्याच्या खांद्यावरून निसटली आणि थेट खाली झोपलेल्या ताईच्या डोक्यात आदळली. आरडाओरडा झाला. तिला घेऊन ते सगळे कुटुंबीय दवाखान्यात आले. ताईला आपल्या छातीशी कवटाळून तिची आई घेऊन आली होती. आईच्या खाद्यावर डोके टाकून ताई निपचित पडली होती. हां हां म्हणता हि बातमी वाऱ्यासारखी सगळ्या गावभर पसरली. दवाखान्याच्या प्रांगणात बघता बघता सारे गाव जमा झाले. दुर्दैवाने ताई यातून वाचली नाही. अतिशय मनहूस असा दिवस होता तो. पण त्यानंतरची कितीतरी वर्षे "आज फिर जीने की तमन्ना है. आज फिर मरने का इरादा है" गाणे ऐकले कि ती खिन्न सकाळ जशीच्या तशी आठवायची. असे वाटायचे कि हे गाणे कुणीतरी ताईसाठीच तर लिहिले नसेल ना? आज इतक्या वर्षांनी त्या कटू घटनेच्या स्मृती खूप पुसट झाल्या असल्या तरी ते गाणे ऐकले कि कुठेतरी मनाच्या एका छोट्याश्या कोपऱ्यात हि घटना आठवतेच.

गाण्याशी आठवण एखाद्या घटनेशी तीव्रतेने जोडली जाण्याचे माझ्या आयुष्यातले हे कदाचित पहिले उदाहरण असेल. असे अनेकदा आपल्या आयुष्यात घडते. एखादा हृदयस्पर्शी प्रसंग असेल, विनोदी प्रसंग असेल, भयंकर घटना असेल, धक्कादायक गोष्ट असेल. किंवा अगदी साधी सामान्य घटना असेल. पण कशी कोणास ठावूक, अनेकदा ती एखाद्या गाण्याशी नकळत जोडली जाते. बरं, प्रत्येकवेळी त्या गाण्यातले भाव त्या घटनेशी जुळतीलच असे नाही. कधीकधी विसंगत सुद्धा असतात. पण ते गाणे ऐकले कि आपल्याला ती घटना मात्र हमखास आठवते.

त्या काळात दादा कोंडके यांची गाणी खेडेगावांत फार लोकप्रिय होती. पण अश्लीलतेकडे झुकणारी, डबल मिनिंग वाली, असा शिक्का बसल्याने सुशिक्षित घरांत ती ऐकली जात नसंत. मुलांनी चुकून जरी गुणगुणले तरी मार पडायचा. पण घरासमोरच एक मंदिर होते. त्यासमोरच कायमस्वरूपी लग्नमंडप. गावातली तसेच आसपासच्या इतर गावातली लग्ने तिथे उरकली जात. तेंव्हा मे महिन्यात लग्नसराईच्या दिवसांत लाउडस्पीकरवर हीच गाणे तिथे जोरजोरात लावली जात. दिवसभर कानावर आदळत राहत. त्यामुळे झाले असे कि या गाण्यांशी त्या दिवसांच्या आठवणी जोडल्या गेल्या. पुढील आयुष्यात अर्थात ही गाणी फारशी कधी ऐकली नाहीत वा ऐकायला मिळालीही नाहीत. शाळा मग कॉलेज मग विद्यापीठ मग नोकरी. यात बराच काळ निघून गेला. एव्हाना ती गाणी विस्मरणातसुद्धा गेली. करता करता पुढे अनेक वर्षांनी परदेशात गेलो. परदेशांतले दिवस तसे रुक्षच होते. त्यात आणि त्या ऑफिसात मी एकटाच भारतीय होतो. दिवसभर कामांत गुंतवून घ्यायचो. पर्याय नव्हता. कधीकधी तर शनवार रविवारी सुद्धा ऑफिसात जाऊन बसायचो. शनवार रविवारी सगळे ऑफिस सुनसान असायचे. तेंव्हा आंतरजाल नुकतेच हातपाय पसरायला लागले होते. आजच्यासारखी युट्युब व गाण्यांची वारेपाम संकेतस्थळे अद्याप सुरु झाली नव्हती. तरीही जालावर दादांची फार मोजकी गाणी कुठून कशी हाताला लागली कोण जाणे. बहुतेक कुठल्याश्या याहू ग्रुपवर वगैरे मिळाली असावीत. नक्की आठवत नाही. त्यांची क्वालिटी सुद्धा फारशी चांगली नव्हती. पण तरीही कोण आनंद झाला म्हणून सांगू. अधाशीपणे डाऊनलोड केली. आणि इतक्या वर्षांनी तेही थेट परदेशात ऐकली तेंव्हा बालपणीचे गावाकडचे दिवस आठवले. कित्तीकित्ती वर्षांनी ऐकत होतो. ऐकताना अगदी गावाकडेच आहोत असे वाटायचे. "आहे घरासचि असे गमते मनास, ह्या येथल्या सकळ वस्तु उगीच भास" अशी गतकालविव्हल अवस्था. पुढे या गाण्यांकडे बघण्याचा माझा दृष्टीकोनच बदलला. अश्लीलतेपेक्षाही त्या गाण्यांतील कलात्मकता आणि मुख्य म्हणजे दादांची ओरिजिनलिटी मला जास्त भावू लागली. गावात कधीकाळी जबरदस्तीने कर्कश्श आवाजात कानावर पडलेली गाणी, परदेशांत मात्र मी वारंवार आवडीने ऐकू लागलो. परदेशात असताना, त्यातही आपण एकटेच असू, तर आपला देश आपली माती आपली माणसे याविषयी अपार प्रेम आपल्या मनात उफाळून येते. आपल्या मातीचे अस्सल मराठमोळेपण, रांगडेपण या गाण्यांत ठासून भरले आहे, वगैरे वगैरे मला विचार माझ्या मनात येऊ लागले. तिथे असताना मी ती गाणी सतत ऐकायचो. इतक्या वेळा ऐकली इतक्या वेळा ऐकली कि नंतर नंतर त्या गाण्यांवरचा गावाकडचा ठसा पार पुसूनच गेला. त्यानंतर भारतात परत आलो. आता तर त्यालाही काळ झाला. पण आज जर हि गाणी माझ्या कानांवर पडली तर मला लहानपणीचे गावाकडचे दिवस नव्हे तर मध्य लंडनमध्ये असलेल्या त्या ऑफिसातले दिवस आठवतात! हि मोठी गम्मतच म्हणायची. गाण्यांचे हे असे असते. अलीकडच्या काळात एकदा माझ्याकडून कारमध्ये दादा कोंडकेंची हि गाणी अभावितपणे लावली गेली. थोरला भाऊ बाजूलाच बसला होता. तो उडालाच. म्हणाला, "काय रे, तुझी अभिरुची बदलली कि काय?". आता त्याला कसे माहित असणार ह्या गाण्यांबाबतच्या माझ्या दृष्टीकोनात काय स्थित्यंतरे होत गेली आहेत.

"दिल ढूँढता है फिर वही" हे असेच अजून एक गाणे. विशेषतः या गाण्याचे सुरवातीचे लतादीदींचे आलाप. "ओऽऽऽओ. ओऽऽअओ. ओऽऽअओऽऽओ ओऽऽऽओ..." रणरणत्या उन्हात तापलेल्या कुठल्याश्या अनामिक दरीखोऱ्यांतून थंडगार वाऱ्याची एखादी झुळूक आल्यासारखे हे आलाप. अक्षरशः बखोटीला धरून फरफटत ओढून नेल्याप्रमाणे चांगली वीसबावीस वर्षे मला मागे नेऊन सोडतात. कॉलेजच्या आवारातल्या त्या हिरवळीवर कुठेतरी मला नेऊन टाकतात. शेवटच्या सेमिस्टरच्या प्रोजेक्टचे, रात्रंदिवस केलेल्या जागरणाचे, सबमिशनचे, व्हायवाचे दिवस आठवतात. बाजूला कॅसेट प्लेअरवर सतत हे गाणे वाजत असायचे. अगदी एप्रिल में महिन्याचेच दिवस. मी म्हणणारे ऊन. प्रचंड उकाडा. थंड वाटायचे ते केवळ त्या सुरांमुळे. "या गरमियों की रात जो पुरवाईयाँ चलें..." वाःह भाई. क्या बात! खरंच आहे. या पुरवाईयाँ मनात अजरामर झाल्यात. काय झाले असते तेंव्हा हे गाणे नसते तर? आज कधीमधी कानावर हे सूर पडतात तेंव्हा ते दिवस अजूनही जसेच्या तसे मनात ताजे होतात.

"नफरत कि दुनिया छोडकर" हे "हाथी मेरे साथी" मधले गाणे. या गाण्यात सुरवातीला रफीसाहेबांनी उच्चरवात जो प्रील्युड गायलाय. बापरे! अंगावर काटा येतो ऐकताना. तो तसा गाणे कुण्णाकुणालाच शक्य नाही. धाकट्या भावाच्या एका हसत्याखेळत्या धडधाकट वर्गमित्राचा अचानक मृत्यू झालाची बातमी एकदा अचानक आली. कसलासा विषाणूवाला डांस का काय मानेवर चावल्याचे निमित्त झाले. ताप आला. अन त्यात हा तडकाफडकी गेला. मन विश्वास ठेवायला तयार नव्हते त्या बातमीवर. बोर्डिंग स्कूल होते. बाकी सगळ्या पालकांमध्ये घबराट पसरली होती. बातमी ऐकली तेंव्हा रफींचे हे गाणे आसपास कुठे वाजत होते का काय आठवत नाही. पण त्या गाण्याशी हि आठवण जोडली गेलीय खरी. त्यानंतर कित्येक वर्षे "नफरत किऽऽऽ" चे काळजाला हात घालणारे सूर कोठून जर कानावर पडले कि ती घटना आठवत असे. काळाच्या ओघात त्या आठवणी क्षीण झाल्यात. पण अजूनही काही प्रमाणात ते होतेच.

बाबूजी सुधीर फडकेंनी गायलेलं "त्या तरूतळी..." मुळे अशाच गूढ आठवणी जाग्या होतात. "मदालसा तरूवरी रेलुनी, वाट बघे सखी अधीर लोचनी, पानजाळी सळसळे, वळे ती मथित हृदय कवळीत...." कोण जाणे कुठले झाड? कोण ती? तिथे का उभी होती? कोणाची वाट पाहत होती? काही काही माहित नाही. मुळात आयुष्यात जे कधी घडलेच नाही ते आठवेल तरी कसे? तरीही हे सगळे घडलेले आहे असे उगीच का वाटत राहते? पण नाही. हे गाणं ऐकले कि इतक्या वर्षांनीसुद्धा 'ती' अनामिका 'त्या' अज्ञात ठिकाणी 'त्या' मोठ्या झाडाच्या घनगर्द सावलीत अजूनही तशीच व्याकुळ होऊन उभी असेल, डोळ्यांत प्राण आणून वाट पाहत असेल असे वाटत राहते. काही गाणी फार विचित्र असतात बुवा. कधीही न घडलेल्या घटनेच्या आठवणी सुद्धा जाग्या करतात.

"मै ना भूलुंगा..." आठवते हे गाणे? प्रश्नच मजेशीर आहे ना? "रोटी कपडा और मकान" मधले. मुकेशजी आणि लतादिदींनी गायलेले. रेडिओवर लागायचे. खूप वर्षे झाली. पावसाळ्याचे दिवस होते. आयुष्यातला एक उदासवाणा कालखंड होता. खिडकीतून बाहेर भकासपणे बघत बसायचो. रेडीओने चांगली साथ दिली त्या काळात. दुसरे होतेच काय म्हणा. "अरे क्या बात कही. वो देखो रात ढली. ये बातें चलती रहें. ये रातें ढलती रहें" अशी वळणे घेत हे गाणे कधीतरी संपून जायचे. त्याची आवर्तने मात्र आजही तशीच कानात घुमत आहेत. त्या रेडीओवर ऐकू येणाऱ्या खरखरीसहित. रात्री अकरा वाजता उर्दू सर्विस सुरु व्हायची. त्यावर एकापेक्षा एक मधुर गीते बरसत राहायची. एके रात्री रेडीओ सुरुच राहिला. झोप कधी लागली कळलेच नाही. जाग आली तेंव्हा रात्री साडेबारा एक झाला असेल. बाहेर वळीव पडून गेला होता. सारे चिंब झाले होते. खिडकी. तावदाने. झाडे. निथळत होती. मातीचा गंध आसमंतात दरवळत होता. रेडीओ तसाच सुरु होता. आणि कुठेतरी शेकडो का हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या उर्दू सर्विसच्या उंच मनोऱ्यातूनर प्रक्षेपित झालले लतादीदींच्या आर्त आवाजातले चिंब सूर कानावर पडत होते "आजा रेऽऽऽ अब मेरा दिल पुकारा. रो रो के गम भी हारा. बदनाम न हो प्यार मेरा. आजा रेऽऽऽ"

गाणी त्या त्या वेळी जरी संपून गेली तरी मनात अशी जिवंत राहतात. तो क्षण, तो दिवस, ती रात्र, तो काळ आपल्या मनात जसाच्या तसा घेऊन येतात. गुलजार यांनी एके ठिकाणी चार शब्दांत किती सुंदर लिहून ठेवलंय:

एक मुड़ एक कैफियत
गीत का चेहरा होता है
कुछ सही से लफ्ज़ जड़ दो
मौज़ू सी धुन की लकीरें खींच दो
तो नगमा सांस लेने लगता है
ज़िन्दा हो जाता है
बस इतनी सी जान होती है गाने की
एक लम्हें की जितनी
हां कुछ लम्हें
बरसों जिंदा रहते हैं
गीत बूढ़े नहीं होते
उनके चेहरे पर झुर्रियां नहीं गिरती
वो पलते रहते हैं
चलते रहते हैं
सुनने वालों की उम्र बदल जाती है तो कहते है
हां वो उस पहाड़ का टीला
जब बादलों से ढक जाता था
तो एक आवाज सुनाई दिया करती थी
-गुलज़ार

तुमची कोणती अशी गाणी आहेत. कोणत्या आठवणी आहेत. प्रतिसादांमध्ये जरूर लिहा....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ अनघा.
धन्यवाद

@ॲमी
हो. फारच वाईट घटना घडून जातात आयुष्यात काही काही...

तुम्ही अतिशय संवेदनशील मनाच्या विविध वयातल्या , विशिषठ घटनांच्या मनावर कोरल्या जाणार्या आठवणींच्या ठशांचे अप्रतीम शब्दांकन केलयं. आणि या मनाला जोड मिळाली आहे सुरांनी प्रभावित होणार्या चित्तव्रुत्तींची !
ही अत्यंत घातक युती आहे. त्यामुळे मन हळवेपणाने भूतकाळातच रमत रहाते !!
अशा आठवणींच्या सावटातून बाहेर पडायलाही हे सूरच उपयोगी ...

माझ्या अशा कित्येक आठवणी आहेत.
शाळेत असताना आमच्या पेक्षा एक वर्ष आधीच्या वर्गातल्या हसत्या-खेळत्या मुलीचे असेच एका छोट्या किरकोळ अपघाताने निधन झाले .. हे कळले तेव्हा विविधभारतीवर "यूं हसरतों के दाग मुहोबत में धो लिये " लागले होते.. लताजींचा काळजावर सुरी चालवल्यासारखा येणारा निषाद आणि षड्ज .. आणि मदनजींची खोल प्रभाव सोडून जाणारी सुरावट यांचा व्ह्यायचा तो परिणाम झाला. त्यानंतर परत केव्हाही हे गाणे ऐकले कि एक अनामिक हुर-हुर , असहायता , अनिष्चितता असे मिश्र भावांचे सावट जाणवत रहाते !

बारावी नंतर S.P. college सोडून इंजिनीरिंग ला प्रवेश घेउन शिवाजीनगरच्या शासकीय महविद्यालयात दाखल झालो. तिथे अनोळखी परिसर , अनोळखी सहाध्यायी - निरुपायाने जुळवून घेतलेले , यामुळे पहिले सहा महिने अक्शरशः तुरुंगात अडकल्याप्रमाणे गेले . नेहेमी दुपारी कँटीन मधे चहाचा कप घेऊन बोटक्लबवर नदीकडे बघत एकटाच बसायचो.. आठवण येत रहायची बारावीच्या वर्गाची , मराठी - इंग्रजीच्या तासांची .. कवितांची .. आणि अशाच एका दुपारी कँटीनच्या रेडिओच्या कर्कश आवाजात गाणे वाजत होते "ए जाने वफा ये जुल्म ना कर , गैरोंपे करम , अपनो पे सितम .." हे गाणे या वेळेस नेहमीच लागायचे ! ते सूर ; तो एकाकीपणा - चिंता , भकासपणा या सार्याचा एकत्रित असा भाव बनून यायचा ! अजुनही इतक्या वर्षांनीही ते सूर आठवले कि ते सारे द्रुष्य लख्ख डोळ्यांसमोर उभे रहाते.

खुप छान शब्दांकन!
ताईची आठवण वाचुन डोळे भरुन आले.

साधारण अशाच प्रकारची माझी, माझे बाबा गेले तेव्हाची आठवण आहे. २००९ मधे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी माझे बाबा गेले. जाण्यापुर्वी १५ दिवस बाबा मेडीपॉईन्ट हॉस्पिटलमधे आय सी यु मधे होते. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असे साधे नाव असलेला रोग पण उशीरा डिटेक्ट झाल्याने पसरला होता. त्यात एक हार्ट अ‍ॅटॅक येउन गेला होता. डॉक्टर त्यान्च्या परीने प्रयत्न करत होते. नाशिकची बहीण तिच्या नवर्यासोबत येउन राहिली होती. पण त्यांची सुट्टी संपत आल्याने ते त्या दिवशी निघणार होते. हॉस्पिटलमधे आम्ही वेटीन्ग एरियात बसलेलो असतांना कसे कुणास ठाउक बहिणिच्या नवर्याने त्याचे आवडते गाणे लावले, " चढता सुरज धीरे धीरे, ढलता है ढल जाएगा." अन यातले, 'साँस टूटते ही सब रिश्ते टूट जायेंगे..., "मुठ्ठी बांधके आनेवाले, हाथ पसारे जाएगा' या ओळी ऐकल्या मात्र आम्हा बहिणींना जे रडु कोसळले, ते कितीतरी वेळ. अन त्यानंतर दोनच दिवसांनी बाबा गेले.
सुतकात असतांना, एकदा घरात, कुठुनतरी, आम्रपाली सिनेमातल्या गाण्याची " तुम्हे याद करते, करते, जाएगी रैन सारी.." हे गाणे कानावर आले. अन नन्तर जवळ जवळ वर्षभर या गाण्याने पिछा पुरवला.

अजुनही ही दोन गाणी कानावर पडली की काळिज गलबलुन येते.

अशीच आठवण मोलकरीण अन आशिर्वाद सिनेमातल्या गाण्याची. राहुरी कृषी विद्यापीठात लहानपणी हे सिनेमे कधितरी पाहिले होते. मोलकरीणमधले, 'देव जरी मज कधी भेटला' हे गाणे आणी त्यावरचा सुलोचना यांचा अभिनय, आणी चित्रपटाचा शेवट.. काळजाला हात घालायचे.
अशोक कुमारचा आशिर्वाद सिनेमा बघायला गेलो होतो. आई बाबा सोबत होते, अन बाबांशी जास्तच अ‍ॅटॅचमेन्ट होती.
त्या सिनेमातील 'बाबांची' परवड, " एक था बचपन, एक था बचपन' हे गाणे अन त्यातली ही ' बचपन के एक बाबुजी थे, अच्छे सच्चे बाबुजी थे' ही ओळ तर हमखास रडवणारी.

आताही हे लिहतांना अश्रु आवरत नाहीयेत.

तुम्ही अतिशय संवेदनशील मनाच्या विविध वयातल्या , विशिषठ घटनांच्या मनावर कोरल्या जाणार्या आठवणींच्या ठशांचे अप्रतीम शब्दांकन केलयं=+११११११

छान लेख.
तुम्ही अतिशय संवेदनशील मनाच्या विविध वयातल्या , विशिषठ घटनांच्या मनावर कोरल्या जाणार्या आठवणींच्या ठशांचे अप्रतीम शब्दांकन केलयं >> अनुमोदन.
संवेदनांच्या तारा सुरांनी छेडल्य की त्यातून तयार होणार्‍या भावनांचा मिलाप मनावर खोल आणि कायमची छाप सोडून जातो.

लहान असतांना मी जोवर अनुक्रमे प्रहार आणि अंकुश सिनेमे पाहिले नव्हते तोवर 'हमारी मुठ्ठी मे आकाश सारा' आणि 'ईतनी शक्ती हमे देना दाता' मधल्या दु:खद छटेची मला कल्पना नव्हती. ही गाणी कानांवर पडत आणि कधामधी गुणगुणल्या जात. पण ज्यावेळी (नकळत्या वयात) हे सिनेमे बघितले तेव्हापासून कधीही ह्या गाण्यांचे सूर कानांवर पडले की फार ऊदास वाटते. त्यानंतर अनेक ट्रॅजिक सिनेमे पाहिले पण ह्या गाण्यांचा नॉस्टॅल्जिक ईफेक्ट अजूनही कमी होत नाही.

तुमची पहीली आठवण वाचून वाईट वाटले. आता ही आठवण कायमची त्या गाण्यासोबत येणार हे तर फारच वाईट.

माझ्या आयुष्यातला एक फार महत्वाचा दिवस होता. मी महत्वाच्या बातमीची वाट पहात होतो. ती बातमी माझ्या मनासारखी माझ्यापर्यंत पोहचली तेंव्हा नेमकी शेजारील दुकानात अत्यंत थिल्लर आणि अश्लीलतेकडे झुकणारे गाणे सुरू झाले. आजही ते गाणे ऐकले की त्या दिवशीच्या आनंदाचा आठव येतो आणि फार छान वाटते. ते गाणे ऐकताना माझ्या चेहऱ्यावरचे भाव जर कुणी अनोळखी व्यक्तीने पाहीले तर त्याचा माझ्याविषयी काय समज होईल? याचा विचार करुन हसू येते. Happy

२००४ साली धूम पिक्चर आला होता. त्यातल्या धूम मचाले या गाण्याने दोन-तीन वर्ष पोरं पार येडी झालती. माझं ते दहावीचं वर्ष होतं. आमची कॉलनीत बहुतेक सर्व घरे सरकारी अधिकाऱ्यांची आहेत. समोरच्या बंगल्यातील काका लांब बदली असल्याने तिकडेच राहत असत. त्यांची पोरं कॉलेजला होती आणि घरी कोणी नसल्याने नुसता धिंगाणा चालायचा. त्यात साऊंड सिस्टीमवर दिवसभर गाणी वाजवत बसायचे. हे गाणं त्यांचं तर फार फेवरीट. त्यांना दरवेळी आवाज कमी करा म्हणून विनंती करावी लागे. शेवटी मी बोर्डाचा निकाल घेऊन घरी आलो. ८९% पडले पण बोर्डात न आल्याने सर्व सुतक पडल्यासारखे बसले होते . माझा जिवलग मित्र नगर मध्ये तिसरा आला होता त्यामुळे अजून निराशा होती अपयशाची. तेवढ्यात या पोरांनी गाणी सुरु केली मोठ्या आवाजात आणि पहिलंच गाणं होत-"धूम मचाले धूम "

सर्वच प्रतिसादकर्ते.... धन्यवाद Happy

>> ही अत्यंत घातक युती आहे. त्यामुळे मन हळवेपणाने भूतकाळातच रमत रहाते !!

हो हे खरे आहे. पूर्वी हा परिणाम जास्त जाणवायचा. पण आजकाल असे होत नाही. कामातल्या व्यग्रतेमुळे म्हणा किंवा काळ जाईल तसे वैचारिक परिपक्वता येते त्यामुळे असेल.

>> अनोळखी परिसर , अनोळखी सहाध्यायी - निरुपायाने जुळवून घेतलेले , यामुळे पहिले सहा महिने अक्शरशः तुरुंगात अडकल्याप्रमाणे गेले .

हे अग्गदी सेम पिंच Happy अनुभवले आहे. फारच बोअर दिवस होते ते. नंतर ओळखी झाल्या. मित्र झाले. पण आता आठवले कि मात्र हसायला येते. आणि कँटीनमधल्या गाण्यांच्याबाबत सुद्धा माझा अनुभव असाच आहे. इ टीव्ही नावाचे म्युझिक च्यानेल नुकतेच सुरु झाले होते. सुरवातीचे काही दिवस सतत जुनी गाणी लावत असत. कधी जाईल तेंव्हा "गुजरा हुवा जमाना आता नहीं दोबारा" सारखे लागलेले असायचे.

>> Submitted by मी_आर्या on 20 May, 2019 - 15:08

शब्द नाहीत. डोळ्यात पाणी आणणारा प्रतिसाद आहे... 'देव जरी मज कधी भेटला' माझ्या आईचे आवडते गाणे. नेहमी म्हणत सुद्धा असे. ती गेल्यानंतर आजतागायत ते गाणे ऐकायचे धाडस झालेले नाही.

>> Submitted by हायझेनबर्ग on 20 May, 2019 - 18:51

प्रहार आणि अंकुश मी पाहिले नाहीत. पण हो, असे घडते मात्र.

>> Submitted by शाली on 20 May, 2019 - 19:24

अगदी अगदी. असे होते बरेचदा Lol

>> Submitted by जिद्दु on 20 May, 2019 - 19:54

भारीच Biggrin ह्या चित्रपटाने आणि गाण्यांनी वेड लावले होते हे खरे आहे. गाण्यांच्या नादात माझ्या ओळखीतल्या एक दोघांचे अपघात झाले होते तेंव्हा.

काही काही गाण्यांच्या आठवणी विनोदी असतात. माझ्याबाबत विशेषत: स्नेहसंमेलनाच्या काळातल्या आहेत ह्या आठवणी...

वर्गातला एक "संगीतकार" माझ्याकडून अरुण दाते यांच्या "मान वेळावुनी..." गाण्याची रिहर्सल करून घेत होता. अर्थात ते गाणे प्रसिद्धच होते. पण तेंव्हा मी कधी फार ऐकले नव्हते. त्याने त्याच्या प्लेअरवर मला ते ऐकवले खरे. पण तरीही काही ओळी त्याच्या अपेक्षेप्रमाणे माझ्याकडून येत नव्हत्या. त्यातल्या त्यात "दृष्ट लागेल गं" या शब्दांची गाण्यात वेगवेगळ्याप्रकारे तीन वेळा होणारी पुनरुक्ती. तो म्हणायचा "आर्वज येऊ दे आवाजात आर्जव". आता अजून किती आर्जव आणायचे? सात आठ वेळा रिहर्सल करून झाली. अखेर मी कंटाळून त्या शब्दांपुरती चाल सोडली आणि फक्त आर्जवच ठेवले Lol त्यानंतर रिहर्सल राहिली बाजूला आणि आम्ही दोघेही दोन मिनटे फक्त हसतच होतो. असेच येसुदास यांचे "जाने मन जाने मन" गाणे. तेंव्हा पण अशीच धमाल आली होती. फार ऐकले नसल्याने मला काही गाता येत नव्हते आणि गायचे तर होतेच. अजूनही हि गाणी ऐकताना ते प्रसंग आठवून हसायला येते.

तेंव्हा "हम्मा हम्मा" गाणे प्रसिद्ध होते ("इक हो गए हम और तुम" Bombay मधले) . मी आणि माझा मित्र. दोघांनी गायचे ठरवले होते. शेवटची रिहर्सल करताना सगळे छान झाले. शेवटी हा म्हणाला "ते शेवटचे 'हम्मा' दोघांनी जोर देऊन एकत्र म्हणायचे आहे. टायमिंग आहे. पंच आहे तिथे. लक्षात ठेव. नाहीतर 'हम्मा' 'हम्मा' अशी फजिती होईल" ते ऐकून मला जाम हसू फुटले. जे डोक्यात नव्हते ते डोक्यात आले. दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष गाण्याच्या वेळी शेवट जवळ येईल तसे मला हसू आवरेना. आणि शेवटी तो "हम्मा" म्हणाला आणि मी "हम्म हा हा हा हा..." Lol

आणि हो. हा सुद्धा एक प्रसंग...

निरोप समारंभ. म्हणजे शेवटच्या वर्षाची बॅच कोलेज सोडून जाणार तेंव्हा ज्युनियर बॅचेस च्या मुलांनी मिळून त्यांना सेंडऑफ द्यायचा असा शिरस्ता ठरलेलाच असे. त्यानुसार आम्ही शेवटच्या वर्षाला असताना त्या सर्वांनी निरोप समारंभ आयोजित केला होता. सगळा कार्यक्रम मस्त झाला. निरोप समारंभात शेवटी सगळे थोडे भावनावश होत हा दरवर्षीचाच अनुभव. त्यावर्षी पण असेच झाले. आणि शेवटी कोणीतरी "अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती" गाणे म्हटले. खूप गंभीर आणि खोल अर्थ असलेले गाणे. झाले! सगळे एकसाथ सेंटी झाले. काही मुली तर रडायलाच लागल्या. Sad

कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही सगळी मुलं बॉईज होस्टेलवर एकत्र झालो. जेवायला एकत्र बसलो होतो. फारच गंभीर वातावरण. पण एका मित्राला असले प्रकार फारसे आवडत नसंत. त्याचे बोलणे अतिशय साधेसुधे. ग्रामीण भाषा. पण अतिशय हुशार होता. अनेकदा त्याचे मत इतरांपेक्षा वेगळे पण सर्वाना पटणारे असायचे. त्यामुळे त्याच्याबद्दल सर्वाना खूप रिस्पेक्ट पण होता. तो म्हणाला,

"अशी पाखरे येती म्हणायचे कुणाच्या डोक्यातून आले रे? पाखरं हाय व्हय आम्ही आता? मिसरुडं फुटली की राव. कायपण म्हणत्यात आणि रडत्यात"

त्याबरोबर सगळे एकदम फुटून हसू लागले Lol Biggrin आणि वातावरणातला तणाव एका क्षणात निघून गेला. "अशी पाखरे येती" गाणे ऐकले कि हे आठवते.

नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीत आमच्या सेन्ड ऑफ ला 'आगे भी जाने न तु, पिछे भी जाने न तु' हे गाणे लावले होते. तेव्हाही सगळे असेच सेन्टी झाले होते हे आठवले. Happy

अरे कसली बोअर गाणी लावायचे तुमच्या कालेजात Light 1
आमच्याकडे पुरानी जीन्स और गिटार लावलं होतं आणि होस्टेलचे मुलगे रडत होते Rofl

गाण्यांच्याच आठवणी सांगायच्या तर एकदा कॉलेजला असताना एका मुलीने "निसर्गराजा, ऐक सांगते" म्हटले होते. ती जेंव्हा 'निसर्गराजा' असे म्हणायची तेंव्हा मुलांमधे बसलेला एकजण जोरात "ओ" म्हणून ओ द्यायचा. नंतर नंतर तर सगळेच कोरसमधे म्हणायला लागले. विषेश म्हणजे त्या मुलीनेही ते गाणे कोरसला मिळवून घेत गायले आणि धमाल केली.

पण एकदा मात्र दारुण प्रसंग आला होता. मित्राचा एक मित्र होता. त्याच्या लग्नाला गेलो होतो. लॉनवर बुफे सुरु होते. एका बाजुला लहान स्टेज होते आणि तेथे एक जण गाणी म्हणत होता. मागे बँड होता. कुणाचे फारसे लक्ष नव्हते त्याच्याकडे. आम्ही खुर्च्या घेवून त्याच्या समोर बसलो आणि फर्माईशी करायला सुरवात केली. त्यालाही बिचाऱ्याला श्रोते मिळाल्याने उत्साह आला. बरीच गाणी म्हणून झाल्यावर आमच्या पैकी कुणीतरी "तु औरो की क्यु हो गयी" या गाण्याची फर्माईश केली. गायकही रंगात आला होता. त्याने खुप दर्दभरा सुर लावून "तु हमारी थी , जानसे प्यारी थी, तु औरो की क्यु हो गयी" सुरु केले. दुसऱ्या बाजुला नवरा नवरी येणाऱ्या पाहुण्यांना भेटत होते. भेटवस्तु स्विकारणे, फोटो काढणे सुरु होते. हे गाणे सुरु झाल्यावर एकदम पिन ड्रॉप सायलेंन्स पसरला. मग अचानक गायकाच्या आणि नंतर आमच्या लक्षात आले काय झाले ते. गायकाने क्षणात मुड चेंज करणारे शादीचे गाणे घेतले. अर्थात लोकांनी फार समजुतीने घेतले नाहीतर गोंधळ व्हायला वेळ लागला नसता. Lol Lol Lol

@शालिदा Lol धमाल किस्सा.
असाच किस्सा 'दुले का सेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है!' या गाण्याच्या बाबतीत झाला होता. आणि कहर म्हणजे दुल्हनही हे गाना ऐकून रडत होती.

छानच लेख नेहमी प्रमाणे.

सर्व गाणी एक इंडि पेंडंट क्रिएटिव्ह एक्स्प्रेशन म्हणून ऐकायची आपले काही त्याला जोडायचे नाही हे मी आत्ता आता शिकले आहे. पण अजूनही गाण्या गाण्याला भरपूर आठवणी आहेतच.

मी १९९१ मध्ये चेन्नैला ट्रेनिन्ग ला गेले होते पेंट कंपनीत नवा जॉब लागला म्हणून. तिथे मार्केट मधून फिरत असताना दुकानातून चंटी सिनेमातले
एन्निनो आंदालो का असे काहीतरी गाणे ऐकू आले. ह्या सिनेमातली तेलुगु गाणी एकदम एकापेक्षा एक फार जबरी आहेत. व ह्या गाण्यात घराबाहेर कधीच न पडलेली हिरॉइन शेतात मोकळे पणी हिंडते अशी सिचुएशन आहे. तेव्हा मला असेच एकदम हैद्राबादची आठवण आली. मूळ पुण्याची आठवण दूर राहिली.

नवरा गेल्यानंतर, तो मे मध्ये गेला व मी जुलैत पहिल्यांदाच एकटीच मुंबईला येत होते. आता काय होते वगैरे बाकबुक होतीच. तेव्हा जेट एअर्वेज होती व चांगले टीव्ही, संगीत वगैरे उपलब्ध असलेले विमान होते. तर गाणी ऐकायला घेतली. मुलीला सिनेमा काहीतरी लावून दिला. एकदम ओ हंसिनी मेरी हंसि नी गाणे सुरू झाले. हे म्हणजे त्याचे एकदम फेवरिट पैकी गाणे. मला बंदही करता येइना ऐकवेना पण. खिडकीतून बाहेर बघत राहिले तर भले मोठे ढगांचे संस्थान हळू हळू मागे फिरत होते. एकदम हृदय फाटते म्हणजे काय होते असा अनुभव आला.

पहिले त्याची माझी फेवरिट गाणी ऐकली की हमखास विचित्र वाटे पण आता वाट्ते की ही माणसे आपल्याला त्या गाण्यातून भेटतात सुद्धा.
नो नीड टु फील सॅड ऑल द टा इम. देस परदेस सिनेमातले तू पी और जी गाणे असेच वन ऑफ द फेवरिट्स. व तेव्हा आमच्याकडॅ १९८६-८७ मध्ये पैसे साठवून स्टीरीओ घेतला होता स्पीकर्स वर काय मस्त लागायचे हे गाणे. लै भारी.

तसेच पंकज उदास ची पैमाना कॅसेट. खूप उदाहरणॅ आहेत.

मस्त धागा आहे!

सॉरी गं अमा वाईट वाटलं वाचून तुझे पती गेल्याचे Sad

अमा, तुमच्या दोन ओळी वाचुन अस्वस्थ झालं. Sad

पैमाना या कॅसेटभोवती मात्र अनेकांच्या आठवणी असणार. पंकज उदास ऐकणे केंव्हाच बंद केले पण चुकून एखादी गझल कानावरुन गेली तरी हुरहूर वाटते. कसली ते माहीत नाही.

Ek song ahe dushman movie mdhe... Chitthi na koi sandesh.... Aadhipasun aikayla aavdaych... Singer jagjit singh ... Bt 2017 la bhavane suiside attempt keli..... Tyanantar he song kdhihi aikl tri aksharsha rdun rdun jiv Java vatato ... Khup aathvn yete .. pratek shabd manavr ghav ghalto as vatat.... Missing my brother ..... Very badly

कसला जबरी धागा आहे हा. खुप छान लिहिल्यात आठवणी अतुलजी. प्रतिसादही मस्त.

गाणं आणि माणसाचा मूड, व्यक्ती, प्रसंग सगळं किती एकमेकात गुंतलेलं असतं.
अशा बर्‍याच आठवणी आहेत गाण्याशी रिलेटेड.
त्यातल्या काही:

वर उल्लेखलेलं चिठ्ठी ना कोई संदेस तर मी हल्ली अजिबात ऐकत नाही. माझे बाबा अचानक गेल्यानंतर मी २-३ वेळा ऐकलं कधी मुद्दाम तर कधी चुकुन कानावर पडलं. जेव्हा जेव्हा ऐकलं तेव्हा तेव्हा वाटलं की यातला शब्द न शब्द माझ्या सिच्युएशनला तंतोतंत जुळत होता. ते ऐकून मी इतकी सैरभैर व्हायचे की ज्याचं नाव ते.. खूप त्रास व्हायचा. बंद केलं शेवटी पण भावना तशाच आहेत मनात अजून त्या गाण्याच्या.

दाटून कंठ येतो हे पण यातलंच एक. हमखास रडणारच मी हे ऐकून.

लहानपणी वॉकमन वर बर्‍याच जणांनी ऐकली असतील गाणी. तर तो पहिलावहिला माझा वॉकमन प्राणप्रिय होता. त्या वेळी अकेले हम अकेले तुम गाण्यांची चलती होती. एकदा लाईट गेले होते तर भर अंधारात मेणबत्ती ही न लावता मी ती गाणी ऐकत बसले होते. व्हाय डिड यू ब्रेक माय हार्ट हे ऐकलं त्या वेळी आणि मी फुल्ल टू फिदा झाले त्या गाण्यावर. माझं काहि ब्रेकप वगैरे नव्हतं झालं तरीही ते गाणं इतकं टची वाटलं. मस्तच. तो अंधार,
कुमार सानू चा चॉकलेट हिरोवाला आवाज दिल मेरा चुराया क्यूं... ओह! अफलातून क्षण!

टेपरेकॉर्डच्या जमान्यात एक अष्टविनायक सिनेमाच्या गाण्यांची कॅसेट होती माझ्याकडे . त्यातलं अष्टविनायका तुझा महिमा कसा गाण्यातलं शेवटचं मोरया मोरया आणि सगळ्या गणपतींची नावं तेवढाच भाग परिक्षेला निघायच्या आधी ऐकायचे मी नेहमी न चुकता. खूप छान वाटायचं.

दिवाळीच्या पहाटे उठी उठी गोपाळा बहुतेक वेळा लागायचं रेडीओवर. तो माहोल पण खासच असायचा.
अजूनही ते गाणं ऐकलं की आमच्या वाड्यातली सुंदर पहाट आठवते.

सांज ये गोकुळी सावळी सावळी हे ऐकलं की उगीच कातर भाव दाटून येतात. एका ट्रीपमधे असताना गाडीत संध्याकाळी हे गाणं लावलं होतं तेव्हापासून खुप आवडतं.

तनहा तनहा यहां पे जीना हे असंच ट्रीपमधे असताना फुल्ल स्पीड कार मधे ऐकलेलं. ते बीट्स, आशा भोसलेचा आवाज मस्त काँबिनेशन जुळून आलं.

हे लिहून पण मस्त मोकळं वाटलं. Happy

छान आहे धागा.

लता, हृदयनाथ, शिवाजी महाराज, बाबासाहेब पुरंदरे ही मंडळी वेगवेगळी आवडीची असतानाही 'शिवकल्याण राजा' माझ्या आयुष्यात खूप उशीरा आले. त्यातली एक दोन गाणी सुटी ऐकली होती पण 'म्यानातून उसळे तलवारीची पात' हे गाणे पहिल्यांदाच ऐकले ते वालावल नावाच्या गावी माझ्या मित्राच्या घरी कॅसेटवर आणि एकदा ऐकून समाधान न झाल्याने ते गाणे सलग दहा बारा वेळा ऐकले असेल.

आजही ते गाणे ऐकले की ते नितांत सुंदर वालावल गाव, माझा मित्र राजू, त्याचे गर्द झाडीत लपलेले घर हे सगळे त्या परिसराच्या रंग, गंधासकट आठवते.

खुप सुंदर लिहिलंय.
गाण्यांशी जोडलेल्या अनेकोनेक चांगल्या वाईट आठवणी आहेत.

Pages