अभंगगाथा नव्हे झु़ंजगाथा ...

Submitted by पुरंदरे शशांक on 17 March, 2014 - 18:54

अभंगगाथा नव्हे झु़ंजगाथा ...

"तुकाराम बोल्होबा अंबिले" या नावाचा कोणी येक या सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील देहूग्रामी होऊन गेला.
सद्यकाळात हाच तुकाराम "संतश्रेष्ठ तुकाराम महाराज" यानावाने ओळखला जातो त्याच्याच जीवनझुंजीची गाथा समजून घेण्याचा हा एक अल्पसा, बालकवत प्रयत्न - या झुंजाचे वर्णन शब्दात करु शकणे हे जिथे अवघड तिथे या झुंजाची सखोलता कोणाच्या सहज ध्यानी येईल हे तर अजून अवघड - कारण ही झुंज अगदी जगावेगळीच होती, त्या झुंजीची महता सांगायची तर ती पार आकाशाहून थोर झालेली आहे एवढेच म्हणता येईल ......

...... तर बोल्होबा अंबिलेंना सावजी, तुकाराम व कान्हा अशी तीन मुले. मोठा सावजी वृत्तीनेच विरक्त. संसारात त्याने कधी लक्ष घातलेच नाही.

सहाजिकच बोल्होबांचा सगळा भार आणि भरवंसा तुकारामावर होता. तुकोबांचेही त्या विश्वासाला साजेसे असे जीवन सुरु होते. त्यामुळे सर्वत्र अगदी आलबेल होते, अंबिले घराणे मोठे नामांकित असे होते...

....अकस्मात ....बोल्होबा आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नीचे निधन झाले - तुकारामाची पाठराखण संपुष्टात आली.

.... आणि तुकाराम यातून सावरत आहेत तोच त्यांच्यावर दुष्काळाचा निष्ठुर घाला पडला... यात त्यांच्या व्यवसायाचे तर पार दिवाळे निघालेच पण तुकोबांची पहिली बायको आणि तिचे मूल अन्नान्न करीत मरण पावली...

एकेकाळची संसारातील अतिशय संपन्नता आणि आता पूर्ण टोकाची निर्धनता यातून जन्म झाला एका झुंजार योद्ध्याचा...
कारण या वावटळीतून सावरण्यासाठी तुकोबा त्यांच्या धनवान सासर्‍यांकडे न जाता थेट एकांतवासात भामगिरीवर गेले - ज्या विठ्ठलाला ते जगन्नियंता समजत होते त्या विठ्ठलालाच साकडे घालायला ....
ही त्यांच्या झुंजीतली पहिली चकमक - पण फार अद्वितीय ...मुलुखावेगळी ...
कारण !!!
- कोणाशी आणि कसे झुंजायचे हेच त्यांना ठाउक नव्हते..
- आसपास आधारासाठी, मार्गदर्शनासाठी पाहावे तर तथाकथित बुवाबैराग्यांपैकी कोणाचाही इथे काहीही उपयोग नाही याची व्यवस्थित जाणीव तुकोबांना झालेली होती...
- सहाजिकच ते अगदी अगदी एकटे होते...

या पहिल्या पण अतिशय महत्वाच्या लढाईत त्यांनी आपल्या प्राणांचेच जे निर्वाण मांडले ते थेट विठ्ठलापाशीच ....
ते पंधरा दिवस बुवांनी कसे काढले हे त्यांचे त्यांनाच ठाउक... पण या झुंजीनंतर बाहेर पडलेले बुवा म्हणजे अग्नीतून तावून -सुलाखून बाहेर पडलेले बावनकशी सोनेच होते जणू - अगदी झळाळणारे आणि निष्कलंक ....

आता त्यांच्या मुखातून जो अभंगांचा दोदाणा वाहू लागला तो त्यांचा त्यांनाही आवरेना असा होता ...
पण बुवांचा दिनक्रम आता पक्का ठरला होता - एका अचळ विश्वासाने ते जगत होते खरे.. पण झुंज काही संपले नव्हते तर झुंजीचा नवीन अध्याय सुरु झाला होता.... फक्त एक झाले होते - बुवांना आता वैराग्याचे चिलखत सापडले होते, भक्तिचे वर्म गवसले होते, झुंजायाची निरनिराळी साधने सापडली होती - ती सदा परजूनच तयारीत राहिले पाहिजे हेही लक्षात आले होते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे दुर्दम्य आत्मविश्वासाचे बळ गाठीला होते ... आता ते कुठल्याही झुंजाला तोंड देण्यास अगदी पूर्णपणे तयार होते - सावध होते आणि कोणाचीही फिकीर करीत नव्हते ....
एकीकडे विठ्ठल सांगातीला आणि सद्गुरु पाठीशी असतानाही - हे सगळे सगळे एकट्यानेच लढायचे हे सूत्र ते मनोमन जाणून होते .....

झुंजीच्या या नव्या अध्यायात ते कधी घरातील मंडळींच्या (कान्हा आणि आवली) मनोधर्माशी झुंजत होते - त्यांना विवेकाच्या, नीतीनियमांच्या चार गोष्टी सांगून .. - तर कधी प्रत्यक्ष विठ्ठलाशीही भांडत होते - प्रेमबळावर..

रात्रंदिन ते स्वतःच्या मनाला अगदी तिर्‍हाईतासारखे पारखत होते की न जाणो हे आपल्या पतनाला कारण होतंय का उद्धाराला - कधी त्याला शब्दांनी फटकारत होते तर कधी त्याला देवरुप देऊन त्याचे चरण धरत होते ...

कित्येक भौतिक आकर्षणे समोर असताना त्याकडे बुवा असे पहात होते की त्या आकर्षणांनाही जणू धाक बसला होता - ती इंद्रिये आता बुवांच्या अशी काही कह्यात होती की जिभेवर साखर जरी पडली असती आणि बुवांनी जिभेला "नाही" असे ठामपणे सांगितले असते तर ती साखरही तिथे न विरघळता वार्‍यावर भुरुभुरु उडून गेली असती बिचारी !! .... काय करणार ती बिचारी इंद्रिये तरी - तो योद्धाच असा कसलेला आणि अति दक्ष लाभला होता त्यांना ...

पूर्वायुष्यात ते किर्तनाला उभे रहात होतेही - पण जे काही त्यांनी ऐकलेले, वाचलेले होते त्या संतांचे दाखले देऊन ते सादर करायचे त्यांना ठाउके होते -
पण आता जेव्हा ते कीर्तनाला उभे रहात तेव्हा इतर कोणाची वचने आधाराला न देता "तुका म्हणे" असे स्वानुभूतीचे बोल त्यांच्या मुखातून बाहेर पडू लागले.. एखादा कच्च्या गुरुने इतरांची विधाने सांगून लोकांना शाब्दिक ज्ञानाने भुलवणे वेगळे आणि या पक्क्या - मुरलेल्या योद्ध्याने स्वानुभवाचे बोल जनाला सांगणे हे पूर्णपणे वेगळे होते - जनांच्याही ते सहज लक्षात येत होते.......

- गावोगाव शेंदूर फासून जे दगड मांडलेले होते - ज्यापुढे पशुहत्या करण्यात येत होती त्याविरुद्ध बुवांनी मोठीच मोहिम सुरु केली - "खरा देव" असले काही मागत नसतो व तो देव मुळचा निर्गुणच पण केवळ भक्तासाठी तो सगुणरुप धारण करतो. पंढरीचा विठ्ठल हे सगुणात आलेले परब्रह्म असून त्याच्या चरणी पूर्णपणे लीन होण्यातच जीवनाचे कसे सार्थक आहे हे नीट समजावून देऊ लागले .. सगुणभक्ति करीत असता असता निर्गुणाकडे वाटचाल करणे कसे महत्वाचे हे पटवून देऊ लागले..

-नीतीधर्माच्याच पायावर उभारलेले निर्मळ जीवन व पुढे स्वतःचे नेहेमीचे कामकाज अतिशय सावधतेने करत असतानाच या विठ्ठलाच्या चरणी मन कसे ठेवायचे हे बुवा प्रत्यक्ष जगून दाखवत होते - तेच कीर्तनातून सर्वांना सांगत होते..

- आपण स्वतः हा ब्रह्मरस चाखला असून आता त्याची इतकी गोडी लागलीये हे कीर्तनातून सांगताना ते ब्रह्मरुप होऊ लागले ...

-वेदांचा अधिकार जर सर्वसामान्यांना नसेल तर त्यांनी धर्माचे आचरण नेमके कसे केले पाहिजे हे ते नीट समजावू लागले - जे अतिशय साधे व सोहोपे होते ...

-धर्माच्या नावाखाली उगाचच कुठल्या तरी विचित्र रुढी निर्माण झाल्या होत्या त्याचा ते प्रतिकार करु लागले - लोकांना त्यापासून परावृत्त करु लागले ...त्या विचित्र रुढींवर - प्रथांवर असे काही कोरडे ओढत की अवघा समाज अंतर्मुख होत होता - कसं काय हा तुकोबा इतका परखड बोलतोय, रुढींची पर्वाही करत नाहीये या विचारांनी अवघा समाज ढवळून निघत होता...
-नवसें कन्यापुत्र होती । तरि कां करणें लागे पती - अशा प्रकारे कीर्तनातून लोकांना विचारीत होते - लोकांना विचार करायला भाग पाडत होते

-बुवांचा परमार्थ एककल्ली तर नव्हताच पण कर्मकांडीही नव्हता. त्यातील सर्वच्या सर्व तत्वे लोकांनी नित्य आचरणात आणावीत यासाठी त्यांचा सारा खटाटोप होता. जी परमार्थतत्वे आचरणात आणता येतात तीच शाश्वत तत्वे हे बुवांचे ठासून सांगणे होते - दैववादावर विसंबून न रहाता स्वतःच विचार करा, तसे वागण्याचा प्रयत्न करा - काही चुका होताहेत का हे अंतर्मुख होऊन तपासा - असे चिंतनशील -प्रयोगशील जीवन बुवा स्वत: जगत होते व तेच लोकांना शिकवित होते - सत्य असत्याशी मन केले ग्वाही विचारिले नाही बहुमता - असा परखड विचार जगून ते लोकांना सांगणारे अतुलनीय सेनापती होते ....

-सगळे जग जरी आडरानात जात असेल तरी त्यांना उजू (सुयोग्य) मार्ग मीच दाखवीन अशा प्रतिज्ञेवर कीर्तनातून समाज प्रबोधन करीत होते ... आम्ही मूळचे वैकुंठवासीच - पण केवळ हे संतांचे मार्ग नीट झाडून, त्यावरुन इतरांची वाटचाल सोपी कशी होईल हे दाखवण्याकरताच भूतलावर आलेलो आहोत - अशा भूमिकेतून हे मार्गदर्शन होते

-ते गावोगाव कीर्तने करायची खरे पण ते एक व्रत म्हणूनच - त्या कीर्तनाचे अतिशय खडतर नियम त्यांनी स्वतःला घालून घेतले होते - त्यामुळे कुठेही कुणाचे मिंधेपण न स्वीकारता अतिशय कटु सत्ये ते मोठ्या धीटपणे मांडत होते. हे सर्व त्याकाळाच्या मानाने फार फार उंचीवरचे होते - त्यामागचे धगधगीत वैराग्य पाहून लोक चकित होत होते - इतकेच काय पण प्रत्यक्ष शिवाजीराजांनी मोठ्या आदराने पाठवलेला नजराणाही त्यांनी अतिशय निरिच्छपणे तस्साच परत पाठवला हे पाहून हा योद्धा कुठल्याही झुंजाला तोंड देण्यास किती समर्थ आहे हे पाहून त्यांच्याविषयींचा आदर जनसामान्यात वाढतच होता - बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले - हे आधी करुन मग बोलणारा असा विरळा झुंजार वीर लोक प्रथमच पहात होते....

-कधी कधी तर वेदांचा अर्थ आम्हालाच माहित आहे आणि इतर तथाकथित पंडित त्याचा व्यर्थ भारच वहात आहेत असेही कीर्तनातून गर्जून सांगायला बुवा कमी करत नव्हते.

याचा परिणाम स्पष्टच होता - उच्चवर्णीयांच्या रोषाला, काही समाज घटकाच्या रोषाला ते बळी पडू लागले. त्या लोकांनी कितीही त्रास दिला तरी ते त्यांना प्रतिकार करत नव्हते व कीर्तनाचे व्रतही सोडत नव्हते - या झुंजीतही ते सगळ्यांना पुरुन उरले होते. त्यांच्या मनोबलाइतकेच परमेश्वरचरणी अविचल श्रद्धा यावरच त्यांचा पूर्ण भरवंसा होता.

या सगळ्या झुंजीत त्यांच्या ह्रदयातला प्रेमाचा झरा आटलेला तर नव्हताच उलट तो झरा जास्त खळाळूनच वहात होता - भगवंताचे प्रेम लाभल्यामुळे ते आंतबाहेर प्रेमाने न्हाऊन निघाले होते - जे का रंजले गांजले त्यांना आपले म्हणवून घेण्यातच ते कृतार्थता पावत होते ... विठ्ठल-प्रेम आणि सर्वसामान्यांविषयींचे प्रेम त्यांच्या दृष्टीने एकच होते. "ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रिती" - या उक्तिचा अनुभवच जणू त्यांच्या आसपासचे लोक घेत होते...
पण त्याचवेळेस "नाठाळाच्या माथी हाणू काठी" असे जोरकसपणे सांगत समाजपुरुषाला जागृतही करीत होते, त्याचा स्वाभिमान पुन्हा जागेवर आणू पहात होते... असे ते प्रेमळ ह्रदयाचे अद्वितीय योद्धा होते ....

समाजही केवळ आश्चर्ययुक्त नजरेने या झुंजाकडे पहात होते - यापूर्वी ना कोणी असे झुंज पाहिले होते ना ऐकले होते - ना कोणा धर्मग्रंथात ते लिहिलेले होते ना कुठल्या वेदग्रंथात .... - पण जे घडत होते ते त्यांच्या समोर आणि हे सगळे केवळ धाडसाचेच काम होते - एका वेगळ्याच धैर्याची मूर्ति त्यांच्या समोर घडत होती - ती जिती -जागती मूर्ति सर्वसामान्यांच्या मनाला इतकी मोह घालणारी होती की बुवांच्या मुखातून अनवरत बाहेर पडणार्‍या अभंगांनी ती सर्वसामान्य जनह्रदये केव्हाच काबीज केली आणि ......
... ती अभंगवाणी केव्हा जनांच्या नित्य वापरात आली हे ना त्या लोकांना कळले ना बुवांनाही ... त्या झुंजीची गाथा केव्हाच सर्वमान्यता पावली - अजरामर झाली ..... इतकी सरळ, साधी-सोहोपी, रोखठोक पण ह्रदयाला स्पर्श करणारी वाणी त्याकाळातच समाजभाषेचे लेणे होऊन गेली हे त्या झुंजाचे अजून एक वैशिष्ट्य .....

- ही अभंगवाणी आपली नसून विठ्ठलच तिचा बोलविता धनी आहे याची बुवांना मनोमन खात्री होतीच पण समाजालाही ते पटले होते हे विशेष ...

बुवांसारखा झुंजार योद्धा आता केवळ आतबाहेर पेटलेला असा राहिला नव्हता तर त्या अंगाराने इतरांनाही पेटवणे सुरु झाले - तो जणू सहज पसरणारा वणवा झाला होता - ज्यात विठ्ठलभक्तिची शीतळता होती- विवेकयुक्त जीवन हा गाभा होता - आपले नित्याचे काम प्रामाणिकपणे करणे ही त्या विठ्ठलाची पूजा होती - कोणाही जीवाचा मत्सर घडणार नाही हा तिथला नियम होता - तुळशीमाळा गळ्यात घालून एकादशी व्रत करता करता भागवत म्हणून मिरवणे - एकमेकांच्या पाया पडणे अशी रीतभात रुजू लागली ..... एक असा महान प्रयोग समाजात घडला की त्यातील सहजसुलभ तत्वे अजूनही तशीच अकलंकित राहून, कालातीत वर्चस्व गाजवून आहेत .... नव्हे या समाजपुरुषाच्या भाळावर कस्तुरी टिळकासारखी मिरवली जात आहेत .... भागवतधर्माची पताका मोठ्या डौलाने फडकू लागली - कारण ती पेलणाराही तसाच बहाद्दर होता - बळिवंत होता ...

या झुंजगाथेतले शेवटचे प्रकरण मात्र फार वेगळे होते - ही धगधगीत झुंजगाथाच इंद्रायणीच्या डोहात स्वहस्ते बुडवण्याची आज्ञा बुवांना झाली - अतीव कोमल अंतःकरणाच्या या झु़ंजार योद्ध्याने हा घावही झेलला मात्र - तो परतवणे वा ढाल पुढे करणे हे सर्व काही त्या जगन्नियंत्यावरच सोपवून ते साक्षीमात्र राहिले -
या जलदिव्याला सीतामाईच्या अग्निदिव्याचीच उपमा देता येईल इतकी ती श्रेष्ठ घटना होती - ती झुंजगाथा आता जनसागराच्या मुखातून अशी काही आंदोळू लागली की तिला बुडवणे वा नष्ट करणे हे काळाच्याही हाताबाहेरची गोष्ट होऊन गेली - झुंजगाथेला अमरत्वच प्राप्त झाले.... मर्‍हाठी भाषेला एक नवा वेदग्रंथच प्राप्त झाला ....

त्या साक्षीभावानंतर बुवा त्या झुंजाकडे अशा त्रयस्थपणे पाहू लागले की जणू कोणा दुसर्‍याच तुकारामाकडे बघताहेत - ते वैराग्याचे चिलखत तर केव्हाच गळून पडले होते आणि ती झुंजीतली साधने आता पूर्णता पावल्यासारखी अंतर्धान पावली होती... आणि आता त्यांना माहेराचा अनावर आठव होऊ लागला.. हात उभारुन पालवणारी विठूमाऊली ठायी ठायी जाणवू लागली....
...आणि ....एखादे बालक कसे आपल्या आईच्या कुशीत सहज आणि अति सुखाने पहुडते तसे बुवा त्यांच्या माहेरास पावते झाले - खरं तर एका दृष्टीने हे झुंज निमाले होतेही ... पण दुसरीकडे त्या झुंजाचा झंझावात चालूच राहिला ....
.
.
......आता त्यांचे चरित्रच, त्यांचे अभंग एक झुंजगाथा बनून या महाराष्ट्राच्या मातीत असा काही ठसा उमटवून राहिले की - अनेक योद्ध्यांना पेटवणारे, त्या सनातन झुंजाला पुनः पुन्हा प्रवृत्त करणारे एक गाथातत्व बनूनच, एक झुंजतत्व बनूनच .... नित्यनूतनत्व लाभलेले असे विचारधन होऊनच ......

"रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन" - या मंत्राचा वापर किती साधकांनी केलाय आणि अजूनही करत राहतील हे एक सर्वसाक्षी विठुरायाच जाणे ...

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बुवांच्या या आगळ्या वेगळ्या झुंजाकडे ज्या काही अभंगांनी माझे लक्ष वेधले त्यातले काही अभंग इथे देत आहे. तसे पाहिले तर बुवांचे संपूर्ण पारदर्शी जीवन त्यांच्या गाथेतून प्रगट होतेच होते...

... बुवांच्या चरणी हे वाक्पुष्प समर्पित करताना त्यांचेच प्रेम लाभावे एवढीच इच्छा प्रगट करतो ...

हरि ॐ तत् सत् ||

(अभंगगाथेतील अभंगांचे क्रमांक व त्यापुढे त्यातील काही चरण दिलेले आहेत - जिज्ञासूंनी अधिक अभ्यासाकरता कृपया त्यानुसार गाथा पहावी ही विनंती)

१४८८ - आम्ही वीर जुंझार । करूं जमदाढे मार । तापटिले भार । मोड जाला दोषांचा ॥१॥
जाला हाहाकार । आले हांकीत जुंझार । शंखचक्रांचे शृंगार । कंठीं हार तुळसीचे ॥ध्रु.॥
रामनामांकित बाण । गोपी लाविला चंदन । झळकती निशाणें । गरुडटके पताका ॥२॥
तुका म्हणे काळ । जालों जिंकोनि निश्चळ । पावला सकळ । भोग आम्हां आमचा ॥३॥

१४९३ - जुंझार ते एक विष्णुदास जगीं । पापपुण्य अंगीं नातळे त्यां ॥१॥
गोविंद आसनीं गोविंद शयनीं । गोविंद त्यां मनीं बैसलासे ॥ध्रु.॥
ऊर्ध पुंड भाळीं कंठीं शोभे माळी । कांपिजे कळिकाळ तया भेणें ॥२॥
तुका म्हणे शंखचक्रांचे शृंगार । नामामृतसार मुखामाजी ॥३॥

११३६ - वीर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळ पायां पडे ॥१॥
करिती घोष जेजेकार । जळती दोषांचे डोंगर ॥ध्रु.॥
क्षमा दया शांति । बाण अभंग ते हातीं ॥२॥
तुका म्हणें बळी । ते चि एक भूमंडळीं ॥३॥

१४७५ - नम्र जाला भूतां । तेणें कोंडिलें अनंता ॥१॥
हें चि शूरत्वाचे अंग । हरी आणिला श्रीरंग ॥ध्रु.॥
अवघा जाला पण । लवण सकळां कारण ॥२॥
तुका म्हणे पाणी । पाताळ तें परी खणी ॥३॥

३८६० - जुंझायाच्या गोष्टी ऐकतां चि सुख । करितां हें दुःख थोर आहे ॥१॥
तैसी हरिभक्ति सुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥ध्रु.॥
पिंड पोसिलियां विषयांचा पाइक । वैकुंठनायक कैंचा तेथें ॥२॥
तुका म्हणे व्हावें देहासी उदार । रकुमादेवीवर जोडावया ॥३॥

१५३६ - भक्ति तों कठिण शुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥१॥
जेथें पाहें तेथें देखीचा पर्वत । पायाविण भिंत तांतडीची ॥ध्रु.॥
कामावलें तरि पाका ओज घडे । रुचि आणि जोडे श्लाघ्यता हे ॥२॥
तुका म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दिस जागृतीचा ॥३॥

२४३६ - सतीचें तें घेतां वाण । बहु कठीण परिणामीं ॥१॥
जिवासाटीं गौरव वाढे । आहाच जोडे तें नव्हे ॥ध्रु.॥
जरि होय उघडी दृष्टि । तरि गोष्टी युद्धाच्या ॥२॥
तुका म्हणे अंगा येतां । तरी सत्ता धैर्याची ॥३॥

२३४९ - जळती कीर्तनें । दोष पळतील विघ्नें ॥१॥
हें चि बळिवंत गाढें । आनंद करूं दिंडीपुढें ॥ध्रु.॥
किळ पापाची हे मूर्ति । नामखड्ग घेऊं हातीं ॥२॥
तुका म्हणे जाऊं । बळें दमामे ही लावूं ॥३॥

४४ - ब्रम्हादिक जया लाभासि ठेंगणे । बळिये आम्ही भले शरणागत ॥१॥
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१] http://www.maayboli.com/node/47996 - भक्ति तों कठिण सुळावरील पोळी....

२] http://www.maayboli.com/node/47954 - तुका म्हणे देह वाहिले विठ्ठली .....

३] http://www.maayboli.com/node/41828 - श्री तुकोबारायांचे दर्शन - त्यांच्याच अभंगातून ....

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम लेख !!
सन्त तुकारामान्च्या जीवनाचा व साहित्याचा फार सखोल अभ्यास केला आहे.

छान लिहिले आहे. अगदी कळकळीने. बुवांनी तुम्हाला सुंदरच भुल घातली आहे...

पागनीसांचे तुकाराम, ११वीच्या दिवाळी अंकात आलेलं एक कायम स्मरणात राहिलेलं तुकाराम चरित्र, तुका आकाशाएवढा आणि आनंद ओवरी या सगळ्यांमधून हा माणूस वेगवेगळ्या पद्धतीने पोचलाय आणि मनावर शब्दशः कोरला गेला आहे.

तुकाराम महाराजांनी तुमच्या दिनचर्येवर तद्वत एकूण आयुष्यावरच किती प्रभाव टाकला आहे त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हा समयोचित लेख. तुकारामांच्या अभंगवाणीने गेली साडेतीनशे वर्षे महाराष्ट्राला अक्षरशः जागविले आहे असे जे म्हटले जाते त्यातील सार्थकता वरील लेखात प्रकटली आहे. तुकाराम महाराजांच्या नावामागे आपण अत्यंत आदराने "संत" उपाधी लावतो पण त्याबरोबर हेही जाणले पाहिजे की त्याना मिळालेले संतपण हे काही सहजासहजी प्राप्त झालेले नाही. त्या पदापर्यंत येण्यासाठी त्यानी जी अग्निकाष्ठे भक्षण केली आहे त्याविषयी बरीचशी माहिती श्री.शशांक पुरंदरे यानी दिली आहे, जी सखोल म्हटली पाहिजे.

चंदन जसे अखेरपर्यंत चंदनच राहते, त्याच न्यायानुसार तुकारामाचे अभंग कधीही भंगू शकणार नाही इतकी ताकद त्या रचनांत स्पष्टपणे दिसून येते. त्याची उदाहरणे वर दिली गेलेली आहेतच. मन प्रसन्न करून टाकणार्‍या गटातील असे हे दीर्घ लेखन म्हणजे वाचकाच्या दृष्टीने मोठा असा लाभच म्हटले पाहिजे, त्याबद्दल श्री.पुरंदरे यांचे आभार.

अप्रतिम. खरं म्हणजे शशांकजी हे शब्द तोकडेच आहेत मला काय म्हणायचे ते सांगायला.

मी तीन दिवस तीन टप्पे करून वाचले, माझी आकलनशक्ती कमी आहे असं मला वाटते त्यामुळे मी सलग न वाचता टप्प्याटप्प्याने वाचले. तरी अजून एकदोनदा वाचेन.

तुम्हाला _____/\_____.

अद्वितीय लेखन...!!!
बुवांचे प्रेरणादायी, स्फूर्तीदायी आणि संघर्षमय आयुष्य अगदी जिवंत उभं केलंत आपण...
तुकोबांनी परब्रम्ह विठ्ठलास जाणले आणि तुम्ही.. संतश्रेष्ठ तुकोबांस...
फार सुंदर..!

अप्रतिम. किती अभ्यास करून लिहिले आहे हे.. तुकारामांच्या आकाशाएवढ्या व्यक्तिमत्वास असं शब्दांत साकारणं सोपं नाही.

तुकोबा, माउली ने
तुमच्याही जिव्हेला आशिर्वाद दिलाय ते जाणवते.
अप्रतिम शब्दांकन, अगदी मनाचा बांध फुटावा आणि शब्दात कैद व्हावा असेच लिखाण..
अनेक धन्यवाद...

फारच सुरेख आढावा घेतला आहे अनंततत्व सद्गुरू माऊलींचा ! हे असं लिहिणं आणि लिहिलेलं आचरणं कधी जमणार काय माहिती. तुकाराम बीज दिवस आहे नं उद्या, हे वाचण्यात आलं किती बरं झालं.

अतिशय अतिशय सुंदर लेख. आज वाचनात आला.
लेखाविषयी लिहायला शब्दच नाहीत. कितीतरी भावना उचंबळून आल्या. 'विठ्ठल हे निर्गुणातून सगुण झालेले परब्रह्म ' अशा अनेक सोप्या उदाहरणांनी भक्तीचे मर्म सांगितले आहे ह्यात. आणि जीवनसंघर्षाला म्हणजे लौकिक व्यवहाराला कसे भिडावे तेही.
लेखातला प्रत्येक शब्द हा माणिक मोत्यांच्या तोलाचा आहे.
किती लिहू? इतक्या उत्तम लेखाला माझ्या प्रतिसादाचे ठिगळ जोडणे योग्य नव्हे म्हणून पूर्ण विराम.

खूपच अभ्यासपूर्ण लेख आहे. वेगळ्याच मुशीतून अशी माणसे जन्माला येतात. का परिस्थिती बनवते काय माहीत. नेचर वा नर्चर काहीही असो वेगळच रसायन निर्माण होते. मग ते शेणगोठ्यात सापडलेले गोरखनाथ असोत अथवा आई-वडीलांचे दु:ख उघड्या डोळ्यांनी पाहीलेले , वाळीत टाकले गेलेले ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई असोत.
यांच्या मानसिक जडण्घडणीबद्दल विलक्षण कुतूहल आहे मला. अर्थात कोणी म्हणेल मानसिकता कसली धरुन बसलाय, कार्य पहा, साहीत्य पहा. तो मुद्दाही आपल्या जागी उचितच आहे.

किती सुंदर!!

अभन्ग व चित्रपट आणि षालेय अभ्यासज्रमातील एक धडा सोडता तुकारामांबद्दल शुन्य माहिती होती. अभंगावरुन हे प्रकरण साधए नाही याची कल्पना येते पण असे़ झुन्झार असतील हे माहित नव्हते. आपल्याकडे प्रत्येकावर इतका मुलामा चढवला जातो की तो खरवडुन आतिल सत्य पाहणे व जाणणे कठिण होउन बसते. तुकारामांना संतपद दिल्याने त्यांच्या झुन्जीकडे सामान्य नजरेने पाहणे कठिण होउन बसते.