भाग - ४
https://www.maayboli.com/node/69652
भाग ५ चालू.....
दिवस सहावा
सध्या दररोज सकाळी म्हणजे पहाटे चार वाजताच जाग येते आहे. त्यावेळी इतर कोणीही उठलेले नसते त्यामुळे आपल्याला आपला कार्यभाग नीटपणे पार पाडता येतो; उरकायला लागत नाही हा एक मोठाच फायदा. कार्यभाग उरकल्यावर, बाकीच्या कोणाचाही वावर नसलेल्या मोकळ्या वावरात हिमवर्षाव चालू असताना किमान पाच मिनिटे घालवणे हा माझा आवडता कार्यक्रम बनला आहे. त्या गूढरम्य वातावरणाची आपल्यावर पडणारी हिमभूल एखाद्या नशेपेक्षा कमी नाही. मला थंडी सोसवत नाही त्यामुळे वारं सुटलं की हुडहुडी भरून तंबूत परतायला लागायचं पण तरीही हट्टाने बाहेर राहावे असे वाटायला लावणारे अद्भुत वातावरण प्रत्येकाने एकदा तरी अनुभवायला हवे. आजही हिमवर्षाव चालू होता. पण ढगांचा थर जरा पातळ असावा. सुंदर असा प्रकाशही पसरला होता म्हणजे प्रकाश नाही तर दीप्ती किंवा ज्याला बहुतेक आभा म्हणतात तसा प्रकाश. निसर्गाचे इनडायरेक्ट लायटिंग. हिमभूल इतकी परिणामकारक होती की तंबूत परत जाईपर्यंत; हिमवर्षाव त्रासदायक ठरेल का, आज पुढे जायला मिळणार का नाही असे कुठलेही प्रश्न त्यावेळी डोकयात आलेच नाहीत.
आत गेल्यावर मात्र; आमच्यापैकी कोणालातरी भेटलेल्या कोण्या फिरंग्याने त्याला कमरेभर पाण्यातून जावे लागले असे सांगितल्याचे आठवले आणि मग एकीकडे पुढे जाऊन काय पहायचे गोठलेला धबधबाच ना, वाटेत पाहिलेच की, सुखरूप परत जावे हे चांगले असे वाटत होते तर दुसरीकडे इथवर आलोय तर ट्रेक अपूर्ण करून का परत जायचे फाईट तर मारून बघायला हवी, प्रयत्न न करताच मागे फिरवले नाही तर चांगले. शेवटी ईश्वराला काळजी असे म्हणून परत थोडी विश्रांती घेतोय तोवर ईश्वराने सहा वाजताच आम्हाला उठवले, सगळी मंडळी उठून आटपून नाश्ता करायला डायनिंग टेंट मधे एकत्र जमा झालो तरीही बर्फ पडणे चालूच होते तोवर ईश्वर देखील पुढे जायचे ना ह्या प्रश्नावर हो नाही काहीच बोलत नव्हता. शेवटी आमची अस्वस्थता आणि काळजी बघून स्थानिक वाटाड्यांसोबत गुप्त खलबतं मसलती करून जाहीर केले की आपण पुढे जातोय.... आम्ही सर्वांनी एकाच जल्लोष केला पण तितक्यात अगदी फिल्मी स्टाईलमध्ये तो म्हणे एक अट आहे. आम्ही सगळे शांत. काय, कसली? विचारून झाले असता त्याने सांगितले की त्यालाही आम्हाला नेरक पर्यंत घेऊन जाण्यात इंटरेस्ट आहे पण सध्याचे वातावरण पाहता त्यात संभाव्य धोके आहेत बर्फ असाच पडत राहिला तर सगळीकडे पडलेल्या ताज्या बर्फ़ामुळे योग्य वाट काढणे अधिक आव्हानात्मक होणार; बर्फ़ाची चादर वीक होण्याचे चान्सेस वाढतात; जास्तीचा बर्फ डोंगर उतारावरून आपण चालत असलेल्या नदीपात्रात घसरून येऊ शकतो; ह्या सगळ्याची तयारी ठेवावी लागेल. मग काय परत एकदा वातावरण टाइट. पण आमचे गंभीर चेहरे पाहून की काय त्याने अजून एक गोष्ट सुचवली की दोन दिवसातले आमचे चालणे पाहून त्याच्या डोक्यात एक कल्पना येत्ये ती म्हणजे पुढचा मुक्काम 'नेरक'ला करण्याऐवजी थोडा उशीर झाला तरी आज राहात आहोत तिथेच परत यायचे म्हणजेच दुप्पट चालायचे. एकाच दिवसात जवळपास ३० किमी. बोला आहात तयार? आमचा बर्फावर चालण्याचा सराव छान झाला होता आणि ताज्या बर्फामुळे चालणे थोडे सुकर ठरत आहे हे ताजे प्राप्त झालेले ज्ञानही होते त्यामुळे आम्ही सर्वानीच एकमताने होकार भरला. मग त्याने पुढे सांगितले की एकाच दिवसात जाऊन परत यायचे याचाच अर्थ आपल्याला आपले सर्व सामान बरोबर वागवायची गरज नाही. याचाच अर्थ आपले वजन रिमार्केबली कमी होणार. याचाच अर्थ आपण कालच्या पेक्षा जास्त भरभर चालू शकतो. त्यामुळे आपण सर्व जण मिळून नक्कीच हे करू शकतो. झाले आमच्यात उत्साहाची जोरदार लहर पसरली. मग त्याने सर्वसाधारणपणे बरोबर काय घ्यायला हवे हे सांगितले आणि काही झाले तरी परतायला रात्र झालीच तर म्हणून टॉर्च नक्की बाळगा असे सांगून आमची हवा परत जरा टाईट केली च वर परत लवकरात लवकर तयार होऊन या लगेच निघायचंय म्हणूनही सांगितले. झाले तंबूत आल्यापावली बरोबर काय न्यायलाच हवे ह्यावर मिनी चर्वितचर्वण झाले आणि मग मी आणि अरुण दोघात मिळून एकच सॅक घायची असे ठरले. दोघांचे काढून ठेवलेले जास्तीचे सामान एकाच्या सॅक मध्ये घालून तिकडेच ठेवले. नंतर पूर्ण रस्ताभर अरण्याने मला ती सॅक घेऊन दिली नाही त्यामुळे माझे त्या दिवसाचे चालणे अजूनच सुखद आणि सुकर झाले. मात्र पाठीवर सॅक नसल्याने थोडी वाढीव थंडी तेवढी वाजली. पण चालतंय की.
आजही चालायला सुरुवात केल्यावर जरा हळू चालणाऱ्या माशाला सगळ्यात पूढे ठेवण्यात आले. खरेतर तीही फार काही हळू चालत नव्हती पण मागे पडल्यावर तिचा उत्साह कमी होवून ती अधिकच मागे पडत जात असे ते टाळले गेले त्यामुळे आजही सगळ्यांनी एकत्र आणि एका लयीत चालायला खूपच मदत झाली. आजही तासाभरानंतर बर्फ पडायचे थांबले. आज जास्त अंतर कापायचे असल्याने नेहेमी वाटेत ह्याचा फोटो काढ त्याचा फोटो काढ करणारे देखील आज कमी फोटो काढत होते तरी मधल्या एका भागात चक्क नदीपात्रात ऊन पडल्यामुळे काही फोटो काढले गेलेच. नंतर मात्र जास्त वेळ न घालवता खाली मान घालून मार्गक्रमणा चालू असतानाच अचानक एका वळणानंतर आम्हाला ताज्या बर्फावर एका प्राण्याचे ताजे पायाचे ठसे बघायला मिळाले. ते ठसे बराच वेळ दिसत राहिल्याने शेवटी मी एका स्पष्ट ठसे दिसणाऱ्या ठिकाणी थांबून, मनाचा हिया करून, हातमोजे काढून त्यांचे फोटो काढलेच.
थोडे पुढे गेल्यावर आकाशात एकाच जागी अनेक म्हणजे शंभरएक पक्षी घिरट्या घालताना दिसत होते. ईश्वराच्या सांगण्यानुसार हिम-बिबट्याने केलेल्या शिकारीत भागीदारी करायला ते सर्व पक्षीगण असे तत्परतेने जमा होतात.
ह्या अतिरेकी थंडीत एरवी ते काय खात असतील त्यांचा कसा निभाव लागत असेल असे विचार मनात आलेच. जिथे वरती पक्षी घिरट्या घालताना दिसत होते तिथेच खाली आम्ही पाणी प्यायला वगैरे थोडे थांबलो होतो तोवर ईश्वर, अक्षय आणि सागर त्या टेकाडावर चढून काही दिसतंय का ते पाहून आले. अर्थात वाटले होते त्यापेक्षा ती जागा अजूनच उंचावर असल्याने आणि वेळ कमी असल्याने ते वर पर्यंत गेले नाहीत. पण ईश्वरने हे ठसे, घिरट्या घालणारे पक्षी ई. दिसणे हे देखील मोठ्या नशिबानेच पाहायला मिळते असे सांगितले. आजवर त्याने केलेल्या इतक्या खेपांमध्ये त्यालाही पहिल्यांदाच असे दृष्य पहावयास मिळाले होते. तिथला ब्रेक जरा अंमळ मोठाच झाल्याने परत एकदा स्वतःला आवरून पुढे चालू पडलो.
वाटेत एक ठिकाणी त्या फिरंग्याने सांगितलेले कमरेएव्हढे पाणी लागले. त्याठिकाणी नदीपात्राच्या कडेला पकडायकरता दोरखंडही बांधलेले होते. पण सुदैवाने तिथेच डोंगरावर चढून पुढे परत नदीपात्रात उतरायला रस्ता होता. त्यामुळे कमरेभर पाण्यातून चालण्याचा अनुभव हुकला.
आता अजून किती दूर जायचंय असं वाटत असतानाच एका वळणानंतर दूरवर गोठलेला धबधबा दिसला, त्या प्रथम दर्शनाचे फोटो काही जणांनी काढले आणि उत्साहात पुढे सरसावलो अर्थात तरीही तिथे पोचायला दहा पंधरा मिनिटे लागलीच.
जवळ पोहोचल्यावर जे समोर होते ते एकीकडे अत्यंत अविश्वसनीय तर दुसरीकडे अत्यंत विलोभनीय दृष्य होतं. किमान पाच सहा मजली इमारतीइतक्या उंचीचा आणि चांगला रुंद असा पाण्याचा प्रपात कोसळत असतानाच जागी थिजलेला आमच्या समोर होता. कित्येकदा असे होते की आपण एखाद्या स्थळाचे तिथे जायच्या आधी पाहिलेले उत्तमोत्तम कलाकारांनी काढलेले निवडक फोटो पाहून आपल्या मनात जी प्रतिमा निर्माण झालेली असते त्याच्या पुढे प्रत्यक्षात जे समोर येतं ते फिके वाटण्याची शक्यता असते. प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट म्हणतो तसे पण सांगायला अत्यंत छान वाटते आहे की इथे तसे अजिबात झाले नाही. त्याच्या भव्यते मुळे असेल की काय पण प्रतिमेपेक्षाही प्रत्यक्ष जास्त उत्कट होतं.
.
.
जेवण तिथेच करायचे असल्याने हाताशी वेळही होताच त्याचा फायदा उठवून आम्ही सगळ्यांनीच तिथे भरपूर वेळ घेऊन वेगवेगळ्या हरकती करत फोटो काढले. बहुतेक सर्वानी एकेकट्याचा, आपापल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत आणि सर्वात शेवटी आमच्या समुच्च गटाचा असे फोटो काढले. काही जण तिथेच असलेल्या पुलावर जाऊन धबधब्याचा वरतून फोटो काढून आले. आश्चर्यकारक रित्या आम्ही तिथे हे सर्व करेपर्यंत दुसरा कुठलाच ग्रुप तिथे आला नाही शिवाय भरपूर सूर्यप्रकाशही होता त्यामुळे ती जागा आमच्या फोटोसेशन करता राखीव आणि जणू मुद्दाम विशेष प्रकाशयोजना केली असल्याप्रमाणे मिळाली आणि निवांत आणि सुंदर फोटो काढता आले.
फोटो सेशन १
फोटो सेशन २
फोटो सेशन ३
फोटो सेशन ४
फोटो सेशन ५
असा बराच वेळ इकडे तिकडे करण्यात घालवल्यानंतर जेवायला एकत्र जमलो दबादबाके खाल्लं आणि थोडी विश्रांती घेऊन झाल्यावर मनात अजिबात इच्छा नसताना तिकडून परत प्रवासाला निघालो.
आता जितके अंतर चालून आलो तितकेच परत चालायचे होते पण त्याच दिवशी आलो होतो त्यामुळे आत्मविश्वास होता की रस्ता पायाखालचा आहे. पण असं समजणे ही मोठीच चूक होती. सकाळच्या तासाभरानंतर पडायचा थांबलेला बर्फ नंतरच्या उन्हामुळे वितळायला लागला होता. डोंगरावरून वितळलेल्या पाण्याचे थेंबाथेंबाने पडणे जसजसे पुढे जाऊ तसतसे काही ठिकाणी ओघळामधे आणि ओहोळामधे रूपांतरित होताना दिसले. मधेच त्यापाण्यासोबत न वितळलेले बर्फ आणि दगड सोबत घेऊन येतानाही आढळले. एक दगड का बर्फाचा गोळा अगदी आमच्या समोरच येऊन पडला आकाराने क्रिकेट च्या चेंडूइतकाच असेल पण जरा का हा डोक्यात पडला किंवा चालताना हिमदरड कोसळली तर काय होऊ शकते ह्याचे जाणीव अंगावर शहारा आणणारी होती आणि हा शहारा थंडीचा नसून भीतीचा होता. त्यावेळी पहिल्यांदाच थंडीचं बरी ऊन नको असे वाटून गेले. पण आता जे ऊन पडलेले होते त्याला काही अनडू करता येणार नव्हते. आमचा संपूर्ण रस्ता डोंगरातल्या नदीपात्रातून असल्यामुळे सिच्युएशन अशी होती की इंग्रजी व्ही आकाराच्या खालच्या मध्यातून आम्ही चालत जात असू. एका बाजूला वाहणारे पाणी दुसऱ्या बाजूला डोंगर. अशावेळी हिमस्खलन झाले तर संपलेच सगळे. अजून पुढे गेलो असता सकाळी जिथून आलो तिथूनच परत जाताना पायाखालच्या वाटेवरच्या पाण्याची पातळी वाढलेली जाणवत होती. नंतर तर एका ठिकाणी आम्हाला चक्क एका जागी थांबायला सांगितले गेले आणि आमचा गाईड थोडं पुढे जाऊन पुढचा रस्ता चालत जाण्याजोगा आहे की नाही ते पाहून आला. त्या पाच दहा मिनिटाच्या अवधीतही पायाखालच्या पाण्याला अधिक वेग आणि खोली प्राप्त होते आहे असे भासले. बरेचदा अशा प्रसंगी बाजूच्या डोंगरावर चढून काही मार्ग वरतून कापायचा असतो आम्हे ज्या ठिकाणी होतो तिथे अशी जागाही दिसेना. आमचा स्थानिक गाईडही लवकर येईना. (म्हणजे असे त्यावेळी तरी वाटले) हीच ती वेळ आपापल्या देवाचा धावा सुरु करायची अशी परिस्थिती निर्माण झाली.
पण आमचा वाटाड्या आला तोच ऑल वेल ची खूण करत पण अर्थातच पाणी खूप खोल नसले तरी गमबुटाच्या पाऊण इतके म्हणजे पोटऱ्यांपर्यंत पोचत होते त्यामधून जाताना पाय फार न उचलता, पाण्यात तरंग न उठतील जेणेकरून पाने बुटात शिरणार नाही याची काळजी घेत घेत आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत स्वतःला घसरू न देता चालायचे म्हणजे जरा ताणदायकच. जवळजवळ अर्धा तास भर अशा रीतीने पाण्यातून चालत जायला लागल्यावर अखेरीस जरा बर्फ़ाळ जागा मिळाली आणि आम्ही सगळ्यांनीच हुश्श केलं. त्यावेळी जरी कोणी काही बोलले नाही तरी नंतर कबूल केल्याप्रमाणे सगळ्यांनी मनातल्या मनात देवाचा धावा केला होता. सगळ्यात जास्त फेमस महामृत्युंजय मंत्र होता. मी आपला बनली तितकी हॅप्पनिंग लाईफ पुरे आता पुढची वाटचाल नीटपणे पार पडू दे रे देवा महाराजा असे म्हटलं. मग देवानेही माझे ऐकलं. आणि मग पुढे फार काही घडामोडी ना होता आम्ही परत तिब्बच्या गुहांजवळच्या आमच्या मुक्कामाच्या जागी पोचलो. इतके अंतर एकाच दिवसात पार पाडल्यामुळे आलेल्या थकव्यापेक्षा नेरक येथील गोठलेला धबधबा बघायला मिळाल्याचे समाधान कित्येक पटीने जास्त होते. आमच्यातले माशा आणि हिमांशू यांना मध्ये थोडा दम लागल्यासारखे झाले होते पण एकंदरीत फार जास्त त्रास न होता आम्ही सगळेच्या सगळे ईश्वराने आमच्यावर दाखवलेल्या विश्वासास पात्र ठरलो होतो. तो ही खूष होता आम्हीही खूष होतो. खुशीत दबादबाके जेवून खुशीतच झोपलो. झोपताना देखील हा इतका मोठा जलप्रपात कसा गोठला असेल हाच विचार सृष्टीचे कौतुक माझ्या मनी होता.
दिवस सातवा
आजचा दिवस कालच्या मानाने फार कमी अंतर चालायचे असल्याने अंमळ उशिराच उजाडला. आज जाताना आम्ही पाठीवर सामान असतानाही अधिकच हलके फुलके बनलो होतो. वाटेत येताना बघायच्या राहिलेल्या तिब्ब च्या गुहा बघून पुढे निघालो. कालपासून चालू झालेला हिंदी गाणी गातागात मार्गक्रमणा करण्याचा मोनीशनी चालू केलेला प्रकार आजही सुरु ठेवला. नव्हे त्यात भर घालून वाटेत आम्ही काही जणांनी भर बर्फात चक्क गरबा खेळला. फेर धरून गोलातल्या हालचाली असलेला स्थानिक लडाखी नृत्य प्रकारही स्थानिक वाटाडयांना आमच्या बरोबर सामील करून घेत आत्मसात करायचा प्रयत्न केला. एकंदरीत धमाल केली.
शिगारा कोमा येथे दुपारीच पोचलो तेव्हा भरपूर ऊन होते त्याचा पुरेपूर आनंद घेतला. सगळेच्या सगळे उन्हे खात बसलो. उन्हामुळे वारा सुसह्य भासत होता. समोर खूप सुंदर डोंगर होता अगदी नयनरम्य दृश्य. पण लवकरच सूर्य अगदी चित्रातल्या सारखा डोंगराआड मावळला.
चिंतामणीने काढलेले छायाचित्र
त्यानंतर लगेचच हवेतला गारवा जाणवेल इतका वाढला. मग डायनिंग टेंट मध्ये जमून गप्पा मारल्या, अंताक्षरी खेळलो. काही जणांना वाटत होतं आजच पुढच्या मुक्कामावर पोचू शकलो असतो आणि लवकर लेह ला पोचून अंघोळ केली असती. पण लेह ला नेणारी बस आज येऊ शकणार नव्हती. चिंतामणीने रात्री अंधार पडल्यावर सगळ्या तंबूतले दिवे लावून एक वाईड अँगल फोटो काढला. त्या करता त्याला बराच खटाटोप करायला लागला पण फोटो मस्त आला. झोपी जाताना मात्र चरचरून जाणीव झाली की हिमालयातल्या मुक्कामाचे हे दिवस आता संपत आले. पुरवून पुरवून वापरण्याकरता हिमालयाला स्वतःमधे मुरवून घ्यायला हवं.
दिवस आठवा -
आज शिंगरा कोमा ते तिलाड डो जिथे आम्हाला न्यायला बस येणार होती तिथवर जायचे अंतर केवळ पाचेक किमी असेल त्यामुळे खूपच आरामात निघालो आरामात चाललो. खूप आरामात चालूनही साडेअकरा वाजताच पोचलो. जरा वेळाने आम्हाला प्रेमाने खाऊपिऊ घालणाऱ्या, सुखरूपपणे परत आणून सोडणाऱ्या समस्त स्थानिक पोर्टर्स आणि वाटाड्यांचे आभार मानण्याचा कार्यक्रम पार पाडला. आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांच्याकरता काही रक्कम जमा केली होती ती त्यांना दिली. ग्रुप मधला सर्वात लहान राजा म्हणून त्याच्या हस्ते ती रक्कम दिली गेली. सर्वांच्या वतीने मी एक मनोगत व्यक्त करावे असेही ठरले तर मी एक छोटेखानी भाषणच ठोकले. आमचे चादरीवरचे आई बाप भाऊ मित्र असे सगळे असलेल्या आमच्या पोर्टर मंडळींमध्ये काही विद्यार्थी ही होते त्यांना शुभेच्छा दिल्या गृहस्थांना मुला-बाळांकरता घराकरता काही वस्तू खाण्याच्या गोष्टी घ्या म्हणून सांगितले. विद्यार्थ्यांना शिक्षणोपयोगी वस्तू घ्या म्हणून सांगितले. अजुनही काही जणांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. पोर्टर वाटाड्यांपैकी काही जण आमच्या सोबत लेह ला येणार होते तर काही जणांचा सहवास तिथेच संपणार होता. मग गळाभेटी झाल्या नीट रहा असं एकमेकांना सांगण्यात आलं. नाही म्हणता म्हणता डोळ्यात पाणी तरळलेच.
आमचे पोर्टर्स आणि गाईड
त्यांच्या सोबत आम्ही सगळे
मग तिकडे बराच वेळ टाईमपास केला. बर्फावर आडवे पडून वाहत्या नदीचे पाणी तोंडाने प्यायचा प्रकार काही जणांनी केला होता जो मी नको उगाच म्हणून टाळलेला होता पण आता शेवटच्या दिवशी तसे करायला काहीच हरकत नव्हती त्यामुळे अरण्या , संदीप, राजा आणि मी अशा आम्ही चौघांनीही तो प्रकार केला.
त्यावेळी एक गंमत झाली. असे आडवे पडून पाणी पिताना अरुण ची ओली झालेली दाढी जरा वेळाने त्या पाण्याचा बर्फ झाला. आता त्या उणे तपमानाची सवय झाली असली तरी पाहता पाहता असं ओल्यादाढीचे बर्फाळ दाढी होणे विस्मयकारकच होते . त्याशिवाय अरुण आणि राजा यांनी सामान वाहून नेण्याच्या घसरगाडीवर एकाने बसायचे आणि दुसऱ्याने ओढायचे हा ही प्रकार केला.
खूप काय काय केलं तरी बस येईना मग आम्ही चक्क रस्त्यावरून चालायला सुरुवात केली आणि बसला वाटेत गाठलं.
संध्याकाळी सहाच्या सुमारास लेह गाठलं. आम्ही जायच्या आधी राहात होतो तीच खोली आम्हाला मिळाली. आम्हाला ते हॉटेल, आमची खोली एकदम पंचतारांकित वाटली त्या दिवशी. तरीही काही मंडळी दुसऱ्या हिटर असलेल्या, गरम वाहत्या पाण्याची सोय असलेल्या हॉटेलात जाती झाली. मग बाजारात जायचे शॉपिंग करायचे रात्रीचे जेवण बाहेरच घेऊन परत यायचे असे ठरले. ईश्वरने आपण सगळे पार्टी करायला भेटू म्हणून सांगितले होते, ठिकाण कुठले हे तो नंतर सांगणार होता पण माझ्या मोबाईलची बॅटरी संपल्यामुळे आमच्यापर्यंत तो निरोप पोचलाच नाही आणि आमच्या चौघांची ती पार्टी हुकली. बरेच फिरूनही आम्हाला ते तिबेटी पताका / झेंडे मिळत नव्हत्या जाऊ दे आता नाही मिळत तर असे म्हणून निराश झालो असतानाच एका दुकानात आम्हा सगळ्यांना न्यायला लागतील तितक्या झेंडा पताका मिळाल्या. घरी आलो. उद्या सकाळी लवकर निघणाऱ्या लोकांच्या बरोबर गप्पा टप्पा आमंत्रणं आश्वासने ह्यात बराच वेळ गेला. त्यानंतर आणलेले आणि घेतलेले असे सर्व सामान पॅक करणे हा एक मोठाच कार्यक्रम पार पाडला आणि झोपलो.
दिवस नववा -
आज सकाळी उठून पहातो तर लेह मधेही हिमवर्षाव होत होता. काही त्यांच्या विमानाच्या वेळेनुसार लवकर निघून गेले होते तर काही तयारीत होते. ईश्वर आणि इतरही काही जणांकडून काल रात्रीची पार्टी हुकवल्याबद्दल ऐकून घ्यावे लागले. ईश्वर आम्हाला एअरपोर्टवर सोडायला येणार होता. एकीकडे हिमालयापासून आणि एकमेकांपासून दूर जाऊच नये असा वाटवणारा माहौल. तर दुसरीकडे हिमवर्षावामुळे खरंच राहायला लागतंय की काय असं वाटवणारा हिमवर्षाव. सुदैवाने सकाळी नऊच्या सुमारास बर्फ पडायचा थांबला. आमचे विमान अकरा वाजताच होते त्यामुळे आम्हाला त्याचा त्रास नाही झाला पण सकाळपासून एकही विमान उतरू न शकल्याने, त्या दिवशी परत न जाणारे एक दोन सोडले तर बाकी सगळे जण एअरपोर्ट वर परत भेटले. लडाखमधल्या लहरी हवामानाचा फटका बसल्याने त्यांना अडकून पडायला झाले होते. अपराजिता आणि अक्षय ह्या द्वयीला जम्मू ला जायचे होते. ते आमच्या पैकी सर्वात लवकर पोहोचणारे ठरणार होते त्यामुळे ट्रेकच्या शेवटी अपराजिताने आम्हाला आम्ही आपापल्या घरी पोचायच्या आत त्यांना सगळ्यात पहिल्यांदा गरम पाण्याने अंघोळ करायला मिळणार म्हणून खूप चिडवून झाले होते. तिला तिथे भेटून बऱ्याच जणांना आनंद झाला. त्यात उशीरा आलेल्या विमानांना उशीरा पाठवत होते त्यामुळे आमच्यातले काही जण तिच्या आधी निघाले. आमचे साडे अकरा वाजताचे विमान वेळेवर आले आणि वेळेवर सुटले. दिल्लीत एक मोठा थांबा घेऊन पुण्याला पोचलो तोवर रात्र झाली होती राम आणि राजश्री दोघेही आम्हाला घ्यायला आले होते रूढी परंपरेनुसार केकही होताच.
अशा रीतीने एक रौद्र सुंदर स्वप्न साकार करून आम्ही परतलो. अजूनही डोळे मिटले असता शुभ्र काही जीवघेणे समोर दिसतेच.
समाप्त
खूप छान ! अप्रतिम!! सुंदर!!!
खूप छान ! अप्रतिम!! सुंदर!!!
अगदी थरारक अनुभव. पण तितकाच किंवा म्हणूनच अविस्मरणीय.
हे सगळं नीटपणे पार पडलं, म्हणून देवाचे आभार.
वा.. काय अनुभव आहेत.. मस्त..
वा.. काय अनुभव आहेत.. मस्त.. फोटो तर अप्रतिम.. धन्यवाद इथे लिहील्याबद्दल..
हे वाचून मला पण एखाद्या
हे वाचून मला पण एखाद्या ट्रेकला जायची ईच्छा होतेय...
सुंदर फोटो
सुंदर फोटो
गोठलेला प्रपात निव्वळ अद्भुत!
गोठलेला प्रपात निव्वळ अद्भुत!!!
खुप खुप आवडली लेखमालिका. यु आर सिंपली ग्रेट!
फोटो अफलातुन आहेत.
तुमच्यामुळे हा ट्रेक करुन आल्याचं फीलिंग आलं इथे बसुनच. आता मला जायची गरज नाही (जशी काय जाणारच होते )
<<<डाँ लागल्यासारखे>>> म्हणजे काय??
बर्फावर आडवे पडून वाहत्या नदीचे पाणी तोंडाने प्यायचा प्रकार>>> ओहो स्टंट !
अ फ ला तू न !! काय जबरी झाला
अ फ ला तू न !! काय जबरी झाला ट्रेक !! अंतिम भाग असं बघून जरा वाईट वाटलं ... पण फोटो आणि एकेक वर्णन वाचून शेवट गोड झाला ! मला नुसत वर्णन वाचून ट्रेक संपल्याचं वाईट वाटलं ! तुम्हाला तर प्रत्यक्ष ट्रेक संपल्यावर लागलेली हुरहूर नक्की समजू शकते !!
खरंच काय निसर्गाची किमया ना !कसला दिसतोय तो गोठलेला धबधबा ... अ प्र ति म !! अश्या नजाऱ्याची भूल नाही पडली तरच नवल !!
फोटो सेशन तर मस्तच
एवढा खडतर आणि थरारक ट्रेक सुखरूप पार केलात त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन ! आणि इथे तो सविस्तर मांडल्याबद्दल धन्यवाद सुद्धा!
फार फार ज ब र द स्त ! ! ! !
फार फार ज ब र द स्त ! ! ! !
अंतिम हा शब्द वाचून मात्र वाईट वाटलं! जमल्यास एक तांत्रिक गोष्टींबद्दल पुरवणी लेख लिहावा, ही विनंती. ह्या लेखमालेचे कष्ट घेतल्याबद्दल खूप खूप आभार!!!
मस्स्तच
मस्स्तच
आम्हाला पण ट्रेक घडवल्याबद्दल धन्यवाद.
मस्त झालेत सगळेच भाग.
मस्त झालेत सगळेच भाग.
छान समारोप.
छान समारोप.
तुमच्यामुळे हा ट्रेक करुन
तुमच्यामुळे हा ट्रेक करुन आल्याचं फीलिंग आलं इथे बसुनच. आता मला जायची गरज नाही Wink (जशी काय जाणारच होते Lol )̇>>>>>> +१२३४ सस्मित मनातले लिहीलेस.
खरच हर्पेन, काय लिहू म्हणता म्हणता अतीशय रोमांचकारी लेखमाला लिहीलीस. गोठलेले धबधबे निव्वळ अप्रतीम. हिमालयाचा नजारा आपले मन अधिक मोठे व्हावे हा संदेश देतो. धन्यवाद !
तुमच्या या रौद्र सुंदर
तुमच्या या रौद्र सुंदर यात्रेत आम्हास सहभागी करून घेतल्याबद्दल धन्यवाद हर्पेन.
हे शुभ्र काही जीवघेणे आमच्या करिता फार रमणीय होते एवढं नक्की.
जबरदस्त !!
जबरदस्त !!
धबधबा आणि त्याच्या समोरचे फोटोसेशन, गरबा, बर्फाळलेली दाढी सगळंच भारी
त्या पाच दहा मिनिटाच्या अवधीतही पायाखालच्या पाण्याला अधिक वेग आणि खोली प्राप्त होते आहे असे भासले. >> वाचतानाच जाम भिती वाटली !
धन्यवाद प्राचीन, रश्मी..,
धन्यवाद मित, प्राचीन, रश्मी.., वेका, झेलम, किट्टू२१, मार्गी, अन्जली, सस्मित, सायो, पद्म, अनघा, अनया.
हे सगळं नीटपणे पार पडलं, म्हणून देवाचे आभार. >>> अगदी खरे आहे.
धन्यवाद इथे लिहील्याबद्दल >>> धन्यवाद मार्गीला, त्याने धागा काढला नसता; ज्यावर मायबोलीकरांनी वाचण्याची इच्छा जाहीर केली नसती तर मी एखादवेळी नसते लिहिले.
हे वाचून मला पण एखाद्या ट्रेकला जायची ईच्छा होतेय... >> पद्म, हीच ती वेळ. हिमालयातले हिंडण्याफिरण्याचे दिवस आताच सुरु होताहेत. हिमालयात फिरण्यायोग्य वातावरण साधारणपणे अक्षय तृतियेनंतर सुयोग्य होते.
सस्मित - ते 'डाँ लागल्यासारखे' म्हणजे 'दम लागल्यासारखे' होतं बदल केला आहे.
ट्रेकच्या बाबत नेव्हर से नेव्हर. हा ट्रेक जमणारच नाही इतका काही अवघड नाहीये. इतपत शारिरिक क्षमता आणता येऊच शकते. इथे खूप काही वातावरणाच्या लहरीपणावर अवलंबून राहते. ज्यापुढे कोणाचेच काहीही चालत नाही.
मार्गी - कष्ट खूप पडले हे खरे आहे. माझ्याकरता, हे लिहिण्यापेक्षा प्रत्यक्ष करणेच सोपे वाटते. तू तांत्रिक बाबींबाबत म्हणतो आहेस त्याबद्दल वेगळा पुरवणी लेख लिहिण्याइतपत माझा अधिकार नाही असे मला वाटते. तरी त्यातून तुला काही प्रश्न असतील तर तू इथेच विचार मला जमेल तर, जमेल तशी उत्तरे देईन.
मंडळी -
सविस्तर लिहिण्याखेरिज दुसर्या पद्धतीने मला लिहिताच येत नाही. आणि इतका पाल्हाळ कोण वाचणार असे वाटून लिहायचे टाळत होतो. एक वाचक म्हणून क्रमशः लिखाणातल्या दोन भागात खंड पडला की कसे वाटते त्याचा मला अनुभव आहे. तरी, तुम्ही सर्वांनी मला प्रोत्साहन देऊन माझा हुरुप वाढवलात , माझ्या लिखाणाच्या मंदगतीला सांभाळून घेतलेत त्याबद्दल धन्यवाद.
भारी भारी भारी. दुसरे शब्द
भारी भारी भारी. दुसरे शब्द नाहीएत.
काय सुंदर फोटो आहेत! वाह!
तो धबधबा आख्खा गोठतो ते दृष्य प्रत्यक्षात भारी असणार. ते स्वत:हाच तेथे जाऊन पहायला हवे. तुम्ही कितीही वर्णन केलं तरी नाहीच कळणार.
वेडे आणि भाग्यवान आहात तुम्ही. असे ध्यास लागतात तुम्हाला आणि तुम्ही ते पुर्णही करता.
मित्रही किती छान जमवलेत तुम्ही. मस्तच.
चला माझा पण चादर ट्रेक झाला
चला माझा पण चादर ट्रेक झाला ह्या सोबतच
हा ट्रेक जमणारच नाही इतका
हा ट्रेक जमणारच नाही इतका काही अवघड नाहीये. इतपत शारिरिक क्षमता आणता येऊच शकते. >>>>> माझी थंडी लागण्याची क्षमता तुम्ही कल्पनाही करु शकत नाही इतकी आहे. सो धिस इज नॉट फॉर मी. मला खरंतर थंडीचं आणि बर्फाचं वर्णन वाचुन भितीच वाटली
सस्मित ट्राय करायला काय हरकत
सस्मित ट्राय करायला काय हरकत आहे. दाढी गोठवणाऱ्या थंडीत मीही जाणार नाही. पण ते अंतीम दृष्य आहे त्यासाठी काहीही करायची तयारी आहे माझी.
शाली, केश्विनी धन्यवाद
शाली, केश्विनी धन्यवाद
शाली - गोठलेली नदी आणि धबधबा ह्या गोष्टी नक्कीच स्वतः अनुभवायच्या आहेत. माणसाने थोडंतरी वेडं असावंच आणि मित्रांच्या बाबतीत म्हणाल तर ‘समान शील, व्यसनेषु मित्रता’ हे लागू पडतंय. आम्ही सारेच वेडे
सस्मित, मलाही तशी भितीच वाटत होती, पण आपल्यालाच आपल्या क्षमतेची जाणीव नसते. शिवाय सध्या डिकॅथलॉन सारख्या दुकानात खास उणे तपमानाच्या थंडीकरता भरपूर चांगल्या प्रतिचे कपडे मिळतात शिवाय आयोजक / लिडर आपल्याला माहिती पुरवतात त्याचाही फायदा होतोच.
फार फार ज ब र द स्त ! ! ! !
फार फार ज ब र द स्त ! ! ! !
काय सुंदर फोटो आहेत! वाह!
अंतिम भाग आला...... आता वाचते
अंतिम भाग आला...... आता वाचते सगळे.
सगळ्या भागातले फक्त फोटो पाहिले होते न रहावून.
त्या बर्फात किती निरनिराळे, सुंदर आकार जाणवतायत.
सुंदर रे हर्पेन! फार सुरेख
सुंदर रे हर्पेन! फार सुरेख अनुभव. तूही सुरेख वर्णन केले आहेस. कधीकाळी मला हा ट्रेक करता आला तर फार भारी होईल.. तोवर ह्या लिखाणावर आणि फोटोंवर समाधान मानून घेते .
हिमबिबट्याचे ठसे भारीच.
हिमबिबट्याचे ठसे भारीच. त्याला म्हणावे खा मला पण दर्शन दे.
धन्यवाद शैलजा, कारवी,
धन्यवाद शैलजा, कारवी, pravintherider
शैलजा - येणार येणार हा ट्रेक करता येणार.
कारवी -लिखाणावरही अभिप्राय जरूर कळवा.
शाली कोणाला खा ?
शाली कोणाला खा ?
फोटो, वर्णन अप्रतिम !
फोटो, वर्णन अप्रतिम ! साॅल्लीड! जबरदस्त! खत्रा!
मला वाटतंय मीच करून आलेय ट्रेक ..... सारकुंडी पास ट्रेकमध्ये एक दिवस पूर्ण बर्फातून होता ट्रेक आजूबाजूला चोहोबाजूंनी पांढराशुभ्र पर्वतरांगा आणि हिमवर्षावही झाला होता..... ते सगळं आठवलं..... पण आता ते होणे नाही .... ह्याचं दु:ख हलकं केलंस....
( एक रौद्र सुंदर + अविस्मरणीय
( एक रौद्र सुंदर + अविस्मरणीय, नितांत सुंदर स्वप्न) सुंदर लेखमाला
हर्पेन मी असं म्हणतोय की
हर्पेन मी असं म्हणतोय की बिबट्यासाहेब मला खा तुम्ही. त्या निमित्ताने तुमचे दर्शन होईल. मी नॅशनल जीओवर हा प्राणी प्रथमच पाहीला. निव्वळ सुंदर आणि लय असलेले जनावर. हा बिहट्या पाच सहा महिन्यातुन एकदा शिकार करतो म्हणे. तुम्हाला तो प्रत्यक्ष नाही दिसला पण त्याचे ताजे ठसे दिसले.. मान गये.
सुंदर. अद्भूत. धन्यवाद.
सुंदर. अद्भूत. धन्यवाद. साष्टांग नमस्कार.
मस्त अनुभव.. सुंदर फोटो अन
मस्त अनुभव.. सुंदर फोटो अन लेखमालिका!
शीर्षकात अंतिम भाग वाचून अरेच्चा संपलं पण! असं वाटलं ..तुम्हाला तिकडून परत येताना काय वाटलं असेल ह्याची कल्पना आली : )
एवढा ट्रेक करायची हिंमत नाहीय तरीही किमान लेह लडाखला जावं असं वाटतय
Pages