ग्रामीण बोली भाषांतील शब्द.

Submitted by कोदंडपाणी on 30 January, 2019 - 06:04

शालींच्या मैत्रचे भाग वाचताना त्यातील पात्रांच्या तोंडात अनेक ग्रामीण शब्द वाचले. काही मजेशीर वाटले. प्रत्येक प्रांताची जशी आपली एक खाद्यसंस्कृती असते तशी एक भाषाही असते. त्यातल्या त्यात ग्रामीण भाषा तर अतिशय गोड असते. त्यात वापरले जाणारे शब्द रोजच्या व्यवहारात वापरले जात असले तरी ते प्रमाण मराठी भाषेत नसल्याने सहसा लिखानात येत नाही. शहरांमधे तर ते बोलण्यातही येत नाही. तर असेच वेगवेगळ्या प्रांतातील ग्रामीण भाषेतील मजेदार, वेगळे शब्द वाचायला मजा येईल. सांगली, कोल्हापुर, नागपुर, नगर, कोकण आणि महाराष्ट्रातील अनेक भागात वेगवेगळे शब्द वापरले जातात ते येथे लिहिले तर सर्वांना ते वाचण्यातला आनंद मिळेल तसेच त्यांचे अर्थही कळतील. उदा. आमच्या जुन्नर भागात वापरले जाणारे काही शब्द:

यळोमाळ: येथे तेथे किंवा दिवसभर
कव्हर: किती वेळ
उलसक किंवा उलीशीक: अत्यंत थोडे.
फिंद्री: खोडकर मुलगी
पाठ: शेळी

तुमच्याकडेही असे काही शब्द असतील तर अर्थासहीत व जमल्यास वाक्यासहीत येथे लिहा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही कामे केल्याने कागदी लक्ष्मी प्रसन्न होवो न होवो घरची लक्ष्मी मात्र नक्की प्रसन्न होईल.
(स्वानुभव Lol )

शाली, आपली रेखाचित्रे पाहून समस्त मायबोलीकर प्रसन्न होत आहेत. घरची लक्ष्मी कशी मागे राहील? मग कामे करा अथवा न करा!

भाऊ, व्यंगचित्र छानच. तुम्हांला सुचतं बरं हे सगळं! रंग,रेखा आणि शब्द सगळेच वश आहेत तुम्हांला.

भाऊ, व्यंगचित्र छानच. तुम्हांला सुचतं बरं हे सगळं! रंग,रेखा आणि शब्द सगळेच वश आहेत तुम्हांला.>>>+९९९

सोडण म्हणजेच नारळावरचं जाड टरफल >>> बरोबर.

वाडवण म्हणजे वाढवण. >>> मला पण असंच वाटलं, अपभ्रंश होऊन वाडवण शब्द प्रचलित झाला असावा कारण केरसुणी म्हणजे लक्ष्मीचं रूप. अजूनही चुकून पाय लागला की नमस्कार करते मी. हळदकुंकू वाहून लक्ष्मीपुजनाला पूजा करतात.

नव्या वर्षाच्या पहाटे वापरत्या झाडूने घरातला केर काढून सुपलीत भरायचा, त्यावर हळदकुंकूफुले वाहायची आणि जुन्या झाडूसकट ती सुपली बाहेर नेऊन टाकून नवी झाडू वापरायला काढायची अशी पद्धत होती. >>> ही आहे कुठे कुठे पद्धत अजूनही. वाचलं आहे.

भाऊकाका Lol , होणार लक्ष्मी प्रसन्न.

*तुम्हांला सुचतं बरं हे सगळं! * - मालवणीत सांगायचं तर - " दशावतारीच तो ! काय बेमालून सोंगां आणित सांगांक येवचां नाय. पण त्येचां कायैक खरां नाय. !! "
( 'दशावतारी' नाटकातला नटच तो. बेमालून सगळीं सोंगं आणतो. खरं नका समजूं तें ! ) Wink

सोडणाऐवजी आमच्याकडे चोड ( अनेकवचन चोडं) म्हणतात. जात्यावरचं उरलेलं पीठ झाडून काढायला वापरलं जायचं, बरोबर.
सुपारी झाडावरून काढल्यावर ती वाळत घालतात त्या आधी दोन बाजूची सालं सोलतात. याला आमच्याकडे सुपारी पिष्टळणं असं म्हणतात. रत्नागिरी जिल्ह्यात बहुतेक सोडे काढणं म्हणतात. श्री ना पेंडसे यांच्या कादंबऱ्यांतून हे शब्द वाचायला मिळतात. दुपारी वामकुक्षी घेण्याला ' आडे घेणं' , तडातड बोलण्याला घसरा घालणं, असे शब्द आठवतायत.

बोलीभाषेत स्थानिक संस्कृतीत मुरलेले जसे अनेक शब्द असतात तसेच असेही कांही मोजकेच शब्दही असतात, किंवा असावेत, जे त्या भाषेची व भाषिकांची ओळखच होवून रहातात. सिंधुदुर्गाच्या मालवणी भाषेतला असा शब्द म्हणजे-
' मेल्या ' ! मेल्याशिवाय जसा स्वर्ग दिसत नाही तसाच या 'मेल्या'शिवाय मालवणी खुलत नाही !

हा शब्द ' मेलेला'च संक्षिप्त रूप असलं, तरीही त्याच्या वापराचा व या अर्थाचा आतां काडीमात्रही संबंध राहिलेला नाहीं. प्रसंगानुरूप कोणत्याही नवरसात बुडवून तो सहजपणे वापरला जातो. ' मेल्या, जरा इकडे ये ' या साध्या संबोधनातमक वापरापासून ते ' मेल्या, तुझी कातडी सोलून व्हाण बनवतंलय ' या धमकीपर्यंत कुठंही 'मेल्या ' चपखलपणे बसतो. ' त्याच्या वाटेक जावू नकात, त्या मेल्याक शिंगां मारूःची खोड आसा ' असं नातवंडांना सावध करताना त्या मारक्या बैलालाही 'मेल्या ' वापरणारी आजी त्याच नातवंडाना ' मेल्यानु, तुमी मुंबैक गेलास कीं घर खांवक येता रे माका' असंही कळवळून सांगते. ' माकां मेल्याक त्या मोबाईलचां काय कळता', म्हणत स्वत:लाही ' ''मेल्या 'त जमा करणंही सर्रास चालतं. ' त्या मेल्या झाडाचो आंबो आंबटच ', ' ह्या मेल्या दरवाजाक काय झालांहा, इतको कुरकुरताहा !'- झाडं, गुरंच काय निर्जीव वस्तू पण या 'मेल्या 'च्या तावडीतून सूटत नाहीत.
कुठेही चार मालवणी भेटले आणि तुम्हाला 'मेल्या ' नाहीं ऐकायला मिळालं, तर खुशाल माझे कान पकडा ! तुमच्या बोलीभाषेतही असले सर्वव्यापक, खास शब्द असतीलच.

शिंकाळे, ताटाळे, निठवं हे शब्द राहीले का?
निठव्याबरोबर आठवा आठवतोय. डमरुच्या आकाराचा असायचा. मापटं, चिपटं हेही असायचे. पितळी काठ असलेले.
शिंकाळे आणि आठवा आजही वापरात आहे गावाकडील घरी.
माठ वगैरे ठेवायला तिवई असायची. चौरंग, पुजेसाठी वापरतात तो नाही तर जेवताना ताट ठेवायला घेतात तो. तोही अजुन वापरात आहे. चांदीची फुले ठोकलेले पाटही अजुन वापरात आहेत गावच्या घरी.

पायली, निठवं, टिपरी यांचा आकार उतरत्या क्रमाने असायचा.
रोजच्या भाताचा अंदाज १ किंवा दीड टिपरी असायचा बहुतेक. निठवं म्हणजे ४ तरी टिपऱ्या असाव्यात. १ पायली तांदूळ बहुतेक ३ किलो भरतात.

आमच्याकडे ही अशी मापे असत: पायली, आडशिरी, शेर, मापटे, चिपटे, कोळवे, नेळवे.
उजवीकडून डावीकडे वाचत जाताना पुढचे माप हे आधीच्याच्या दुप्पट भरते.

जेवणाचे ताट - पितळी
साप चावणे- पान लागणे
रविवार- ऐतवार
पुढे - म्होरं
या वेळी- औंदा
मुलगा - प्वार
गाबड्या- एखादा वांड मुलगा असल्यावर त्याला special हा शब्द वापरला जातो.
रस्ता - सडक
इंजेक्शन घेणे- टोचून घेणे
खूप - लय

आमच्या कामवाल्या काकू बसायच्या पाटाला ' पिडं ' म्हणायच्या . त्यावरून एक म्हणही आहे ,
'लापटाला मारलं पिडं , लापट म्हणतं बसायला दिलं'.

चांदीची फुले ठोकलेले पाटही अजुन वापरात आहेत गावच्या घरी.>>>>> माझ्या माहेरी,मुंबईत असे पाट होते म्हणजे अजूनही कदाचित असतील (माळ्यावर)

तुमच्या बोलीभाषेतही असले सर्वव्यापक, खास शब्द असतीलच.

>>>> आमच्याकडे “लका“
काय लका किती वेळ लावला

जुन्नर - मंचर भागात “ वला “

काय वला किती वेळ लावला

संध्याकाळी- सांच्याला
आज पर्यंत - आज पावतर
जनावरांना बांधायला जी दोरी वापरतात- दावं

मी आधीही सुचवलंय, कोणती बोलीभाषा हेंही सांगणं उचित. 'आमच्याकडे ' म्हणजे कोणत्या प्रांतात/ भागात हें कळणंही महत्वाचं.

संध्याकाळी- सांच्याला
आज पर्यंत - आज पावतर
जनावरांना बांधायला जी दोरी वापरतात- दावं
हे शब्द सातारा जिल्हयातील माण तालुक्यात वापरतात..

सुश्या, धन्यवाद.
हे तिन्ही शब्द मालवणी भाषेतही वापरतात. फक्त, 'सांच्याला' ऐवजी 'सांच्याक' म्हणतात इतकंच.

छान धागा. सर्व प्रतिसाद वाचले नाहीत. पण बहुतेक शब्द लहानपणी वापरलेले किंवा सतत कानावर पडलेले.
येरवाळी हा जो शब्द आहे त्याचे मूळ येळवारी म्हणजे वेळेत असे आहे. अपभ्रंश होऊन तो येरवाळी झाला. जसं नुकसानला सर्रास नुस्कान असं म्हणतात.
नाशिक जिल्ह्याच्या काही भागात पश्चिमेला वरल्यांगं (वरल्या अंगाला किंवा बाजूला), पूर्वेला खाल्ल्यांगं (खालच्या अंगाला किंवा बाजूला) असे म्हणतात.
'नाहा' किंवा 'नाहा रे' असा शब्द 'हो का रे' किंवा 'खरंच का' अशा अर्थाने वापरतात. आणि 'हा' (उच्चार आधी हलकासा आ आणि नंतर दीर्घ हा) हा शब्द 'नाही' या अर्थाने वापरला जातो. उदा. हे तू केलं का रे? उत्तर... आह पळ.. मी नई केलं.

Pages