ग्रामीण बोली भाषांतील शब्द.

Submitted by कोदंडपाणी on 30 January, 2019 - 06:04

शालींच्या मैत्रचे भाग वाचताना त्यातील पात्रांच्या तोंडात अनेक ग्रामीण शब्द वाचले. काही मजेशीर वाटले. प्रत्येक प्रांताची जशी आपली एक खाद्यसंस्कृती असते तशी एक भाषाही असते. त्यातल्या त्यात ग्रामीण भाषा तर अतिशय गोड असते. त्यात वापरले जाणारे शब्द रोजच्या व्यवहारात वापरले जात असले तरी ते प्रमाण मराठी भाषेत नसल्याने सहसा लिखानात येत नाही. शहरांमधे तर ते बोलण्यातही येत नाही. तर असेच वेगवेगळ्या प्रांतातील ग्रामीण भाषेतील मजेदार, वेगळे शब्द वाचायला मजा येईल. सांगली, कोल्हापुर, नागपुर, नगर, कोकण आणि महाराष्ट्रातील अनेक भागात वेगवेगळे शब्द वापरले जातात ते येथे लिहिले तर सर्वांना ते वाचण्यातला आनंद मिळेल तसेच त्यांचे अर्थही कळतील. उदा. आमच्या जुन्नर भागात वापरले जाणारे काही शब्द:

यळोमाळ: येथे तेथे किंवा दिवसभर
कव्हर: किती वेळ
उलसक किंवा उलीशीक: अत्यंत थोडे.
फिंद्री: खोडकर मुलगी
पाठ: शेळी

तुमच्याकडेही असे काही शब्द असतील तर अर्थासहीत व जमल्यास वाक्यासहीत येथे लिहा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिडकू, मला शोधूनही मिळालं नाहीं तें नेमकं दाखवलंत. धन्यवाद.
*अजुन थोडा फार वापरात आहे की नामशेष झालाय?* पूर्ण नामशेष झाला नसला तरी त्या वाटेवर असावा ! Wink
हीरा, तुम्हाला आठवत नाही पण मला आठवतं असंही काही असूं शकतं, याचाच मला आनंद झालाय ! Wink

मस्त धागा!
@ शाली
आज्जी जात्यावर दळायची म्हणुन मला जाते आणि त्याचा खुंटा माहित आहे पण तो खुंटा ठोकायचा एक दगड असायचा त्याला काय म्हणतात तसेच पिठ गोळा करण्यासाठी कुंचा असे त्यालाही विशिष्ट नावे होते ते आता आठवत नाही.>>
त्या दगडाला काही विशिष्ट नाव होते का मलाही आठवत नाही पण त्या कुंच्याला माझी आज्जी आणि आई ‘सोडण’ म्हणत असत.
नारळाची जाड साल साधारण त्रिकोणी आकारात सुकवून देठाकडचा अरूंद भाग हातात धरत. दुसरी बाजू ब्रशसारखी पिंजलेली असे. ती पीठ गोळा करण्यासाठी, जाते झाडण्यासाठी वापरत असत.

भाऊ, तुमची चित्रं थोर असतात. तुम्ही चित्रांमधून अनेक गोष्टी मांडता. आम्हांला शब्दांचा फापटपसारा मांडावा लागतो. त्यात एखादा शब्द आठवला नाही की गेलंच सगळं आडात!
आ.रा.रा. , रहाट हा घरगुती वापरासाठीच असतो. घरी वापरायचे पाणी बायकांनाच आणावे लागे. म्हणून कदाचित हे रहाट छोटे असावेत. अर्थात घरगुती वापराचे पाणी शेती-बागायतीच्या पाण्याहून कितीतरी कमीच असणार म्हणूनही मोठ्या अवजड प्रकरणाची गरज भासत नव्हती असणार.

चंद्रा, तो कुंचा नारळाच्या आवरणापासून बनवत असत. आवरणाचा त्रिकोणी तुकडा घेऊन त्याच्या पसरट बाजूला जरा ठेचायचा म्हणजे त्यातला काथ्या मोकळा होतो. त्याने पीठ गोळा करता येते. त्याला पिठोरे असे काहीसे नाव होते. जात्याच्या दोन दळांनासुद्धा वेगळी नावे होती. पाळे की काहीतरी. आणखी एक घिरट नावाचा प्रकार असे. भले मोठे लाकडी जातेच असे ते. भात भरडण्यासाठी वगैरे बहुधा.
आणखी एक शब्द आठवला. निवणी बहुतेक. चुलीवरून उतरवलेले भांडे वाळलेल्या गवताच्या गोल चुंबळीवर ठेवायचे. गोल बुडाचे मडके असेल तर ते स्थिर राहाते.

जात्यावरून आठवली - जात्याची पाळी: 'जाते' हे आमच्याकडे सहसा एखाद्या भिंतीलगत रोवलेले असे. ते जाते आणि भिंत यामध्ये साधारण टीचभर जागा असते, - दळलेले पीठ जमा होण्यासाठी. ती नेमकी जागा म्हणजे जात्याची पाळी. छोट्या पण महत्त्वाच्या वस्तू ठेवण्याचे हक्काची जागा. अमुक सापडेना? बघ जत्याच्या पाळीला असेल. तमुक कुठेय? बघ जात्याच्या पाळीला.
तसेच 'कानाची पाळी' असाही शब्दप्रयोग वापरला जातो.

दिवळी = भिंतीत कोरलेली घनाकृती / पंचकोनाकृती पोकळी. सामान ठेवण्यासाठी. साधारण दोन खुंट्यांच्या मध्ये एक दिवळी असते.
पेव : भिंतीत बनवलेली धान्याची कोठारे.

पेव म्हणजे जमिनीखालची कोठारे. भिंतीतल्या कोठारांना बहुधा बळद म्हणतात. पण अर्थात प्रांताप्रांतात अर्थ बदलतात.

*पेव : भिंतीत बनवलेली धान्याची कोठारे.* पूर्वी जमीनीखालीं मुद्दाम तयार केलेल्या जागेत जे छुपें कोठार असे त्यालाही 'पेव' म्हणत, असं वाचलेलं आठवतं. ' पेंव फुटलं' शब्दप्रयोग त्यावरूनच आला असावा.

जात्याला तळी आणि पाळी असे २ भाग असतात. मध्ये लोखंडी कणी असते. घास आत जायला २ अजून भोकं असतात. त्यांनाही काहीतरी नाव आहे.

https://grindmill.org/

या लोकांनी अशक्य कष्ट करून लाखो ओव्या रेकॉर्ड केल्या आहेत.

हीरा, भाऊ, धन्यवाद.
पण अर्थात प्रांताप्रांतात अर्थ बदलतात, <<< हे खरं. आमच्या घरातील भिंतीतल्या कोठारांना कायम पेवं असं संबोधलं गेलंय. कोठाराचे खालचे तोंड चुकूनही उघडले गेले तरी (गुरुत्वाने) धान्य भळाभळा बाहेर येऊन ढीग लागे. त्याला आम्ही ‘पेव फुटणे’ समजत असू.

आगा गा! काय एक एक प्रतिसाद येतायेत. मस्तच.

आमच्याकडेही भिंतीत धान्य साठवायला जे करत त्याला बळद म्हणत. त्यात एका आड एक लाकडे लावलेली असत पायऱ्यांसारखी. खालील जमिनीजवळील तोंडावर कपड्याचा बोळा घट्ट बसवलेला असे. नेहमीचे दळण शक्यतो तेथेच बसुन करत. बोळा काढले की हवे तेवढे धान्य बाहेर येई.

याच प्रकारे धान्य साठवण्यासाठी सहा फुटांच्या आसपास कणग्या असत. त्या शेणाने सारवलेल्या असत. त्यालाही खालीच तोंड असे. हेही बळदासारखेच काम करी पण हे बाहेर असे. यात कमी उत्पादन होणारे धान्य असे शक्यतो. म्हणजे कडधान्ये, केलेल्या डाळी वगैरे.

आडावर जे रहाट असे ते होडीचे सुकाणू असते तशी दोन चक्रे एकमेकांना आडव्या लाकडी पट्यांनी जोडलेले असत. पाणी शेंदताना चाकावरच्या त्या खुंट्या ओढल्या की दोर त्या चाकाभोवती गुंडाळला जाई. कप्पीवरुन पाणी शेंदण्यापेक्षा हे खुप हलके जाई.

कप्पीवरुनही पाणी शेंदण्यात एक गम्मत असे. हुंऽ हुंऽ आवाज करत एका लयीत हात चालवला की पाण्याचा भार हलका होई. जमले तर चित्र रेखाटायचा प्रयत्न करतो.

माळवद: जुन्या वाड्यांवरील छप्पर, हे लाकडी खांबांच्या बीम्स, चुना मातीने भरून तयार होते
वरवंड: पत्रे किंवा कौले भिंतीला मिळतात तिथे आधारासाठी बांधलेले भिंतीचे एक्स्टेंक्शन
तावदान: खिडक्यांच्या काचा
देवळी: भिंतीना असणारे कोनाडे
बिन्नी: दरवाज्याच्या चौकटीवर शंक्वाकृती उंचवटे असतात त्यावर बसवलेले लोखंडी आच्छादन
इदुळा: या वेळेला

जुनी मापे: आदुली, पायली, चिपटं , मापटं, शेर, मण

मस्त मस्त, सर्व वाचलं नाही अजून. कुंचा आमच्याकडे केरसुणीलापण म्हणतात. मी दोन्ही शब्द वापरते कुंचा, केरसुणी. इथे जो शहरात केर काढायला रोजच्या वापरात असतो त्याला. पुर्वी तोंडात फार कुंचा हाच शब्द होता आईमुळे पण फार सर्वांना समजत नाही. त्यामुळे मी केरसुणी म्हणायची सवय लाऊन घेतली.

तो कुंचा नारळाच्या आवरणापासून बनवत असत. आवरणाचा त्रिकोणी तुकडा घेऊन त्याच्या पसरट बाजूला जरा ठेचायचा म्हणजे त्यातला काथ्या मोकळा होतो. >>> मस्त माहीती, हे नव्हतं माहीती मला. कोकणांत असतो हा घरोघरी पण काय म्हणतात याला, आठवत नाहीये मला.

शाली मस्त चित्र, ह्याला रहाटच म्हणतो आम्ही.

चिडकू यांचं चित्र पण मस्त आहे, प्रत्यक्षात हे बघितलं नाही कधी, अंदाज आला चित्रावरुन.

सिंधुदुर्गात झाडूला ' वाडवण' असंही म्हटलं जात/ जात असे. >>> हो काय, सासुबाईंना माहीती असेल, नवऱ्याला विचारेन, कदाचित त्यालाही माहिती असेल.

>>त्या कुंच्याला माझी आज्जी आणि आई ‘सोडण’ म्हणत असत.<<

कुंचा नाहि पण त्याला सोडण (सोडाण) म्हणतात ते आठवतंय. जात्यावर पिठ, मोस्टली कुळिथ दळुन झाले कि साफसफाई नंतर हि सगळी सामुग्री परत आपापल्या जागेवर एकत्रीत रित्या जायची. कोकणातल्या गांवच्या घरांचं अजुन एक वैशिष्ठ्य म्हणजे आतल्या एखाद्या खोलीत कांडण्याकरता केलेलं जमिनीतलं भोक. त्याची साईझ म्हणाल तर साधारण गॉल्फ ग्रीनवरच्या होल एव्हढी असायची. व्हाइन (इंग्रजी शब्द नव्हे) म्हणतात त्याला...

सिंधुदुर्गात झाडूला ' वाडवण' असंही म्हटलं जात/ जात असे. >>> हो हे सासरी म्हणतात, नवऱ्याला विचारलं.

व्हाइन (इंग्रजी शब्द नव्हे) म्हणतात त्याला... >>> आमच्याकडे वायन किंवा व्हायन म्हणतात. ह्यात लहानपणी गावाला सुट्टीत गेलो की, मला लसणीचे तिखट ( लसूण चटणी ) करायला खूप आवडायचे.

कोकणात माहेरी सासरी मोठी जाडी काकडी असते, तिला आम्ही तवस म्हणतो आणि ती काकडी आम्ही पातोळे करताना वापरतो. फार पूर्वी बाबा गणपतीत गावाला जायचे तेव्हा येताना तवस आणि हळदीची पाने घेऊन यायचे मग इथे पातोळे व्हायचे.

वाळूक माहिती नाही मला, पण इथे डोंबिवलीत लांबड्या, सडपातळ, वाकड्या काकड्या विकायला येतात त्याला वाळकं म्हणतो आम्ही. त्या मस्त लागतात तिखट मीठ लावून खायला.

शाली, रहाट अफाट काढलाय. इथं अशीच हौस भागवत रहा.
*आमच्याकडे वायन किंवा व्हायन म्हणतात.* - खरंय. बहुतेक घरात हें दगडी वायन असायचं.
* कुंचा नाहि पण त्याला सोडण (सोडाण) म्हणतात ते आठवतंय. * - सोडण म्हणजेच नारळावरचं जाड टरफल ज्यापासून कुंचा बनवतात.
* लांबड्या, सडपातळ, वाकड्या काकड्या विकायला येतात त्याला वाळकं म्हणतो आम्ही.* - चिपळूणात हया काकडया सातारा, कोयना इथून विकायला येतात व लोकप्रिय आहेत.

व्हायन! काय आठवण करून दिली आहे! लहानपणी आम्ही शहरी मुले गावाला गेलो की खेळण्याच्या नादात, धावाधावीत कितीदा व्हायनात पाय मुरगळत असे. आमची तिथेच राहणारी चुलत, चुलत-चुलत भावंडे मात्र सवयीने बरोब्बर व्हायन वगळून पार होत असत.
आम्ही मुलांनी रुसून, फुरंगटून आता जेवणार नाही म्हटले की आई एका जावयाच्या फजितीची गोष्ट सांगत असे. ती गोष्ट आता विसरले मी पण तिचा शेवट 'नको नको जावया, व्हायन चाटून खावया' या वाक्याने होत असे Happy

रहाट वेगळा आणि रहाटगाडगे वेगळें. रहाटाला फक्त रज्जू (राजू किंवा रस्सी) गुंडाळलेला असतो. गाडग्यांची माळ नसते. राज्जूचे एक टोक रहाटाच्या आंसाला कायमचे बांधलेले असते आणि तो मधल्या फळ्यांवर गुंडाळलेला असतो. दुसऱ्या टोकाला एक सरकफास असतो त्यात घागरीचे तोंड अडकवून फास आवळायचा आणि रहाट ॲंटिक्लॉकवाइझ गरगर फिरवून घागर विहिरीत सोडायची. पाण्याने भरल्यावर रहाटाच्या खुंट्या आपल्या अंगावर ओढायच्या. मग घागर विहिरीत जाताना उलगडलेला सुंभ पुन्हा गुंडाळला जातो आणि घागर वर येते.
वाडवण म्हणजे वाढवण. केरसुणीला लक्ष्मी समजतात. घरातला केरकचरा, मलीनता, अमंगळ बाहेर टाकून ती घरात सुखशांतीआरोग्य वाढवते म्हणून ती वाढवण. तिचा मान राखायचा. ती कधी जमिनीवर फेकायची नाही, तिला पाय लावायचा नाहीं. नव्या केरसुणीला हळदकुंकू लावून मग ती वापरायला काढायची. नव्या वर्षाच्या पहाटे वापरत्या झाडूने घरातला केर काढून सुपलीत भरायचा, त्यावर हळदकुंकूफुले वाहायची आणि जुन्या झाडूसकट ती सुपली बाहेर नेऊन टाकून नवी झाडू वापरायला काढायची अशी पद्धत होती.

बाय दी वे, पीठ करण्यासाठी जसे दगडी जाते असते तसे वरई कांडण्यासाठी एक जाते असते. त्याचा आजार शंकूसारखा खाली पसरट आणि वर निमूळता असतो. ते शेणाने सारवतात म्हणजे मातीचे असावे. जाणकारांनी अधिक माहिती द्यावी.

रहाटासंबंधी - काही गावांमध्ये ओढण्यासाठी दोरखंडाऐवजी लोखंडी साखळी असते.

आमच्याकडे -
साळुता = केरसुणी

हीरा, तुम्ही म्हणता तोच ' वाढवण'चा अर्थ असला (अर्थात, असणारच ), तर केरसूणी ऐवजी तोच शबद वापरणं , रूढ होणंच चांगलं !

हें वाचा जरा. आतां तरी हें काम रोज करून
लक्ष्मी प्रसन्न होतेय का बघा !20190207_221110.jpg

भाऊ Lol Lol Lol

Pages