शालींच्या मैत्रचे भाग वाचताना त्यातील पात्रांच्या तोंडात अनेक ग्रामीण शब्द वाचले. काही मजेशीर वाटले. प्रत्येक प्रांताची जशी आपली एक खाद्यसंस्कृती असते तशी एक भाषाही असते. त्यातल्या त्यात ग्रामीण भाषा तर अतिशय गोड असते. त्यात वापरले जाणारे शब्द रोजच्या व्यवहारात वापरले जात असले तरी ते प्रमाण मराठी भाषेत नसल्याने सहसा लिखानात येत नाही. शहरांमधे तर ते बोलण्यातही येत नाही. तर असेच वेगवेगळ्या प्रांतातील ग्रामीण भाषेतील मजेदार, वेगळे शब्द वाचायला मजा येईल. सांगली, कोल्हापुर, नागपुर, नगर, कोकण आणि महाराष्ट्रातील अनेक भागात वेगवेगळे शब्द वापरले जातात ते येथे लिहिले तर सर्वांना ते वाचण्यातला आनंद मिळेल तसेच त्यांचे अर्थही कळतील. उदा. आमच्या जुन्नर भागात वापरले जाणारे काही शब्द:
यळोमाळ: येथे तेथे किंवा दिवसभर
कव्हर: किती वेळ
उलसक किंवा उलीशीक: अत्यंत थोडे.
फिंद्री: खोडकर मुलगी
पाठ: शेळी
तुमच्याकडेही असे काही शब्द असतील तर अर्थासहीत व जमल्यास वाक्यासहीत येथे लिहा.
मुसकं: जनावराने काम करताना
मुसकं: जनावराने काम करताना शेतातले पिक खाऊ नये म्हणुन तोंडला बांधायची जाळी.
शेंबी: बैलांच्या शिंगाना लावायचे नक्षीदार पितळी टोपन.
पऱ्हाणी: काम करताना काही बैल मुद्दाम कामचुकारपणा करतात. त्यांना मागुन टोचण्यासाठी आसुडाच्या एका टोकाला टोकदार पोलादी भाग असतो त्याला पऱ्हाणी म्हणतात. बोली भाषेत पऱ्हाणी लावणे म्हणजे टुमणे लावणे. उदा. "मी करतो तुझे काम, तु सारखी माझ्या मागे पऱ्हाणी लाऊ नकोस."
रेवड: नविन घोंगडी विकत घेतली की तिच्या दोन्ही बाजुच्या दशा मोकळ्या असतात. त्या विणाव्या लागतात म्हणजे धागे निघत नाही. त्याला रेवड काढणे म्हणतात.
लाचकांड: पायात मोडलेला काटा काढण्यासाठीचा अत्यंत छोटा चिमटा. यात एक छोटा चिमटा, काटा कोरायला टोकदार सुई आणि कान कोरणेही असते.
अजुन आठवल्यावर लिहितो.
कोणाला दारकिंडा माहित आहे का
कोणाला दारकिंडा माहित आहे का ?
मला माहित आहे पण तरी विचारतोय!!
नाही.
नाही.
जुना ठाणे जिल्हा हा एके काळी
जुना ठाणे जिल्हा हा एके काळी आदिवासीबहुल होता. अनेक बोली इथे नांदत होत्या. वाडवळ, कोळी, सामवेदी, विश्वकर्मा पांचाल अशा अनेक बोली होत्या. ईस्ट इंडिअन कोळ्यांची वेगळी गोड बोली असे. अजूनही आहे. दळणवळण नसल्याने बाहेरच्या जगाशी दीर्घकाळ संपर्क राहिला नाही. त्यामुळे या बोली शतकानुशतके आपली मूळ रूपे टिकवून ठेवू शकल्या. काही संशोधकांच्यामते या बोलींचे यादवकालीन मराठीशी साम्य आढळते. कुठवेरी, तोवेरी असे शब्द कानावर आले की 'तयाचा वेलु गेला गगनावेरी' झटकन आठवणारच. आपणही तोंवर, कुठवर, इथपावेस्तों असे म्हणत होतोच की आता आतापर्यंत. पावेस्तों म्हणजे पोचेपर्यंत. पावणे म्हणजे पोचणे. पोचपावती हा शब्द आपल्याला माहीत आहेच. देवा पावरे म्हणजे देवा, तू माझ्यापर्यंत ये. कोंकणीत 'पावलें मूं?' असे विचारतात. म्हणजे (सुखरूप ) पोचलीस का? किंवा अमुक एक गोष्ट पोचली/मिळाली ना?
तर कोळ्यांची भाषा ही आजच्या मराठीच्या अनेक मध्ययुगीन रूपांपैकी एक रूप आहे. आपण सर्वांनी 'मी हाये कोली, सोरील्या दोली मुंबैच्या किनारी| मार्तिन कोलीन हानल्यान गोली चल जाऊ बाजारी|| हे कोळीगीत ऐकलंच असेल. यात सोरील्या डोली म्हणजे गुंडाळलेली जाळीं समुद्रात सोडलीं. छोट्या जाळ्यांना डोल म्हणतात. पुढे तर मजा आहे. मार्तिन कोलीन म्हणजे काय असू शकेल? तर ते मार्था या नावाचे ईस्टइन्डिअन रूप आहे. आणि हानल्यान गोली म्हणजे घोळी आणल्या. म्हणजे मार्तिन (मार्था) कोळणीने घोळ नावाचे मासे विकायला आणले आहेत.चला, आपण बाजारी जाऊ या! गंमत अशी की या गाण्याच्या विडिओत मार्तिन कोलीन हानल्यान गोली या ओळीवर चक्क एक चापटी लगावून दिल्याची अॅक्शन आहे! अर्थात हा विडिओ ऑथेंटिक कोळीनृत्याचा नाही. मला सुरुवातीला वाटत होते की हा कोणीतरी 'मार्टिन' असेल; पण ही तर 'मार्टिनी' निघाली! आणि हाणल्यान म्हणजे तर लगावूनच दिली असेल!. आपल्या चिपळूणकडे हाड, हाडते, हाडलेंस का? असे म्हणत असत. आपण आणणे म्हणतो तर कोळी लोक हान म्हणतात.
वा हीरा, उत्तम माहिती.
वा हीरा, उत्तम माहिती.
छान माहिती हीरा.
छान माहिती हीरा.
छान माहिती हीरा.>>>+१
छान माहिती हीरा.>>>+१
हिरा मस्तच .... ईस्ट इंडियन
हिरा मस्तच .... ईस्ट इंडियन कोळी म्हणजे समजले नाही.
छोट्या जाळ्यांना डोल म्हणतात.
छोट्या जाळ्यांना डोल म्हणतात. >>>
डोलकाठी म्हणजे शिडाची काठी का?
डोलकाठी = bowsprit
डोलकाठीमधला डोल वेगळा. तसे तर
डोलकाठीमधला डोल वेगळा. तसे तर डोलचे आणखीही अर्थ आहेत. पण ठाणे जिल्ह्यात कोळी जमातीत डोल म्हणजे मासेमारीचे जाळे. मोठ्या जाळ्याला पागेर म्हणतात.
मला या ठिकाणी ओल्ड मॅन अँड सी चे पु. ल. देशपांडे यांनी केलेले 'एका कोळियाने' हे भाषांतर आठवते. हेमिन्ग्वे जरी भाषाप्रभु असला-आणि तसा तो होताच-तरी त्याला मत्स्यव्यवसायातल्या शब्दांची इंग्लिशमध्ये तितकीशी कमतरता जाणवली नसावी. याला कारण ऐतिहासिकरीत्या तेथील समाजरचनेत आहे. तिथे नौकानौकानयन हे कधीच बहिष्कृत नव्हते. उलट त्याला धनवंतांचा आणि राजघराण्यांचा आश्रय होता. दर्यावर्दी असणे ही अभिमानाची गोष्ट होती. आपल्याकडे प्रमाण भाषेत व्यावसायिक शब्द किंवा कसब आणि हुनर व्यक्त करणारे शब्द फारसे नाहीतच. कारण या लोकांची जीवनशैली साहित्यनिर्मितीसाठी त्या काळात कदाचित फारशी आकर्षक ठरली नसावी. त्यातून मासा किंवा एखाद्या जातीचा उदरनिर्वाहाचा विषय तत्कालीन लिहित्यावाचत्या अशा अभिजनवर्गास वर्ज्यच. बंगालीत असे घडले नाही. तिथे साहित्यात मासे आनंदाने पोहतात. असो. तर 'एका कोळियाने' अनेकांना कृत्रिम वाटले याचे कारण हेमिन्ग्वेच्या मत्स्यविषयक जाणीवांसाठी समर्पक शब्द मराठीत उपलब्धच नव्हते, नाहीत. अशा शब्दांना प्रतिष्ठा नाही. कारण हे शब्द ज्या धंद्याचे, कसब/हुनराचे, जीवनशैलीचे प्रतिनिधित्व करतात, त्यालाच प्रतिष्ठा नाही.
अवांतराबद्दल क्षमस्व.
छान माहिती हीरा.>>> +१.
छान माहिती हीरा.>>> +१. धन्यवाद हीरा!
या धाग्यामुळे चांगली माहिती मिळत असल्याने धागाकर्त्याचे आभार!
अवांतर असले तरी योग्य मुद्दे.
अवांतर असले तरी योग्य मुद्दे. एका कोळीयाने का आवडले नाही याचे उत्तर मिळाले.
मोठ्या जाळ्याला पागेर म्हणतात.>>> "मासे पागायला जायचेय." असं वाक्य वाचल्याचे आठवते ते या पागेर मुळे आहे का?
मला येथे खानदेशी शब्दही
मला येथे खानदेशी शब्दही मोठ्या प्रमाणात वाचायला मिळतिल असे वाटले होते.
हीरा भाषाशास्त्र उत्तम जाणता.
हीरा भाषाशास्त्र उत्तम जाणता...
तुमचे प्रतिसाद जेवढे अर्थपूर्ण तेवढेच रंजक आहेत . या अनुषंगाने अजून लिहा. आम्ही आवडीने वाचत राहू.
हीरा, आपण देतां ती माहिती
हीरा, आपण देतां ती माहिती रंजक असूनही ऑथेंटीक असते हें विशेष. धन्यवाद इथं येत राहिल्याबद्दल .
*कारण हे शब्द ज्या धंद्याचे, कसब/हुनराचे, जीवनशैलीचे प्रतिनिधित्व करतात, त्यालाच प्रतिष्ठा नाही.* - इंग्लीशमधे फक्त जहाजविषयक शब्दानीच ती भाषा किती समृद्ध केलीय; जहाजाचा पुढचा व मागचा भाग, शीडाचा प्रत्येक प्रकार इ.इ.ला विशिष्ठ शब्द आहेत. महाराष्ट्रात नौकानयनाला प्रतिष्ठा नव्हती यापेक्षा त्या क्षेत्रातले जाणकार लिहीण्या- वाचण्याला वचित होते हे खरं दुर्भाग्य असावं. त्यामुळे, त्या क्षेत्रातली शब्द संपदा मराठी भाषा समृद्ध करूं शकली नाहीच पण त्या क्षेत्रातलं ज्ञान व कसबही लिखाणा अभावीं संकलीत न झाल्याने अविकसितच राहिलं असावं.
( अवांतरा बद्दल क्षमस्व)
वावे, रायगडातले आणि
वावे, रायगडातले आणि आमच्याकडचे (दापोली तालुका) बरेच शब्द सारखे आहेत. तुम्ही बेजं लिहिलंय त्याला आमच्याकडे बेडं म्हणतात. तुम्ही टेम्पररी लिहिलंय तसच एक कायमचं पण असतं. जे गेट असेल त्याच्या दोन्ही बाजूला गोल छिद्र असलेले गुडघ्याएवढ्या उंचीचे दोन लाकडी खांब पुरलेले असतात. त्या छिद्रातून आडवे दोन बांबू किंवा तत्सम लाकूड अडकवून ठेवतात. गरजेच्या वेळी ते लाकूड सरकवून बाहेर काढतात.
भाऊ, आपल्याकडे
भाऊ, आपल्याकडे दीर्घकालावधीपर्यंत समुद्रपर्यटन धर्मबाह्य होते. ते केल्यास प्रायश्चित्त घ्यावे लागे. श्रमक्षेत्रातले जाणकार शिक्षणास वंचित होते हे खरेंच. पण त्यांच्या जीवनव्यवहारांविषयी इतर कुणालाच आस्था नव्हती, इतकेच नव्हे तर तुच्छता होती, तो जीवनव्यवहार क्षुल्लक, महत्त्व न देण्यासारखा मानला जात होता हेही तितकेच खरे आहे. नाही तर त्यांचे इतरांनी केलेले चित्रण साहित्यात दिसले असते. कष्टकर्यांची दुनियाच वेगळी आणि दुर्लक्षित राहिली होती. अर्थात प्रत्येक संस्कृतीत असा एखादा काळ येतोच. घडलेल्या चुका दुरुस्त करतच पुढे जायचे असते.
मला तर वाटते की हे लोकव्यवहार जर अभिजनांच्या भाषेत आले असते तर आज आपण नवयुगातील संकल्पनांसाठी प्रतिशब्द शोधण्याचा जो आटापिटा करतो, तो करावा लागला नसता. इंग्लिशमध्ये असे अनेक शब्द जुन्या प्रक्रियांसाठी वापरल्या जात असलेल्या शब्दांमधूनच बनवले गेले आहेत.
*......भाषेत आले असते तर आज
*......भाषेत आले असते तर आज आपण नवयुगातील संकल्पनांसाठी प्रतिशब्द शोधण्याचा जो आटापिटा करतो, तो करावा लागला नसता. * 100% सहमत.
हीरा, भाऊकाका लिहीत रहा .नवीन
हीरा, भाऊकाका लिहीत रहा .नवीन माहिती मिळतेय ..
बऱ्याच दिवसांनी मायबोलीवर फॉलो करावा असा बाफ निघालाय .
शब्द वापरात नसले कि विसरले
शब्द वापरात नसले कि विसरले जातात. पांढरपेशा लेखकांव्यतिरीक्त शेतकरी किंवा बाकीच्या पार्श्वभूमी असलेल्या लेखकांच्या लिखाणात बरेच शब्द येतात. पण अश्या लेखकांचे प्रमाण फारच कमी आहे.
आणि आता मोट राहिली नाही त्यामुळे मोट, नाडा, सोंदूर, कणा, धाव हे कोणाला माहित असण्याचे प्रयोजन राहत नाही. बैलगाडी बरोबर जुकाट, शिवळा, धुरी, मुसक्या, वेसण पण गायब झाले. mortise and tenon joint मधला कुसे आणि दुसऱ्याचा प्रतिशब्द मलाही आठवत नाहीये. मध्यंतरी सेलबोट चालवायला शिकताना स्टारबोर्ड आणि पोर्ट ला मराठी शब्द भंडारी नावाचा तरुण शिक्षक होता त्याला देखील माहित नव्हता.
*जे गेट असेल त्याच्या दोन्ही
*जे गेट असेल त्याच्या दोन्ही बाजूला गोल छिद्र असलेले गुडघ्याएवढ्या उंचीचे दोन लाकडी खांब पुरलेले असतात. त्या छिद्रातून आडवे दोन बांबू किंवा तत्सम ..* - सिंधुदुर्गात याला 'आखडी ' म्हणतात. याला पर्याय म्हणून, विशेषत: शेतात/बागायतीत, काटक्या, गवत बांबूच्या पटटयांत बांधून हलकासा दरवाजाही बनवून कुंपणात लावतात. याला 'ताटी' म्हणतात.
शब्द आणि शब्दार्थांबरोबरच
शब्द आणि शब्दार्थांबरोबरच त्यांचे उपयोग, त्या त्या वस्तुंचे स्वरुप यावरही येथे वाचायला मिळते आहे. भारी. सगळ्यांनी या धाग्यात अप्रतिम भर घातलीच पण भाऊ आणि हीरा यांनी छान रंगत आणली आहे.
चिडकू, मला मोटेसंदर्भात शब्द माझ्या लेखनात वापरायचे होते, माहितही होते पण कितपत समजेल याची शंका आल्याने टाळले. मुळात मोट समजली तरी तिचे कार्य कसे चालायचे याची बहुतेकांना कल्पना नसणार असं समजुन मी ते टाळले. मी स्वतः मोट हाकली असुनही आता मला प्रत्यक्ष मोटेसंबंधीचे बरेच शब्द आठवत नाही. चामड्याच्या मोटेला वर असणारी लोखंडी रिंग, जेथुन पाणी बाहेर पडे तो भाग वगैरे.
मोटेवरुन पखाल शब्द आठवला. वरील प्रतिसादांमधे तो दिसला नाही. या पखालीचेही खांद्यावरुन वहायची चामड्याची पखाल, हेला किंवा घोड्यावरुन वहायची पखाल असे वेगवेगळे प्रकार होते. आता पखालीही गेल्या आणि ते शिवणारे चांभारही गेले. जोडाही असाच नामशेष झाला आहे. जोडा म्हणजे सर्रास चप्पल असा अर्थ लावला जातो पण जोडा अत्यंत विशिष्ठ पध्दतिने बांधला जायचा जो वजनाला अतिशय जड असे व त्याला पुढील बाजुस दोन गोल टोके असत. ते वळलेले असत मागील बाजुस.
बाराबंदी तसेच कोपरी शिवणारे कारागीरही नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत.
पुर्वी न्हावी गावोगाव जाऊन काम करत. ते वापरायचे त्या अनेक कप्पे असलेल्या चामड्याच्या पिशवीला धोपटी म्हणत. तसेच गाशा म्हणजे स्लिपिंग बॅगचाच प्रकार होता.
स्वयपाक घरातली अनेक भांडी आणि उपकरणे आता पहायला मिळत नाहीत त्यांची फक्त नावे ऐकायला येतात. तिही हळुहळू विस्मरणात जातील. जसे पिठ मळायची काठवट, डाळ शिजवायची तामतवली, ओगराळे नावाचा विशिष्ट आकाराचा चमचा, उखळ इत्यादी.
नमस्कार,मी इथे नवीन आहे,हा
नमस्कार,मी इथे नवीन आहे,हा धागा छान आहे.वाळूक हा काकडीचाच एक प्रकार आहे,पण वाळके ही छोटी,बुटकी,3-4इन्चाचीच असतात आणी काकडीपेक्षा चवदार(गुळचाट) असतात.यात आणी एक प्रकार आहे त्याला छन्नी म्हणतात.ते कडू असते,त्याला मीठ,हळद लावून वाळवतात आणी तव्यावर थोड्या तेलात तळून/भाजून तोंडीलावणे करतात. मोठ्या काकडीला शेंदाड म्हणतात आणी ते पिकल्यावर खातात,ते खरबूजासारखे लागते.सॉरी अवांतर झाले.
सोना पाटील मायबोलीवर स्वागत!
सोना पाटील मायबोलीवर स्वागत!
शब्द, वस्तु आणि त्यांची नावे आणि भाषेसंदर्भात काहीही येथे अवांतर नाही. तुमच्याकडे असलेली अजुनही माहिती वाचायला आवडेल.
मॅगी आणि भाऊ, ' गेट' या
मॅगी आणि भाऊ, ' गेट' या अर्थाने आमच्याइथे वेसकट असा शब्द सर्रास वापरतात. मग ते दार लोखंडी असो किंवा बांबूच्या कामट्यांचं. पण घराचं दार नाही. अंगणाचं किंवा बागेचं वगैरे.
हीरा आणि भाऊ, मस्तच प्रतिसाद आहेत तुमचे. शालीदा, तुमच्याही प्रतिसादांतून छान माहिती मिळते आहे.
मॅगी, बेडं/ बेडा हा शब्द मी जंजिरा मुरुडला ' गोठा' या अर्थाने ऐकलाय. आमच्याइथे गोठ्याला वाडा म्हणतात.
बेडं हा शब्द माझ्या मामाकडे
बेडं हा शब्द माझ्या मामाकडे गोठ्याच्या बाहेरच्या सारवलेल्या जागेसाठी वापरतात. मळणीच्यावेळी त्याच्या मध्यभागी खळं करायचे.
धन्यवाद.
..
धन्यवाद.
धन्यवाद.
म्होर-समोर
डहाळ(ड आणी हा जोडून उच्चार) -सोलावण (ओले हरभरे,घाटे)
नाचारी-गरिबी
पळभरानं-थोड्या वेळाने
हारा-बांबूची मोठी टोपली,याच्या खाली रात्री पाट,बोकडांना कोंडतात.
शाली मी मोट पहिली नाही पण आजी
शाली मी मोट पहिली नाही पण आजी व बाकीच्या लोकांच्या बोलण्यात येणाऱ्या उल्लेखावरून थोडी फार माहिती झाली. तेही मुख्यतः कुठल्यातरी अपघातासंदर्भाने आलेलं असायचा. "तुझा काका थारोळ्यातून पाय घसरून विहिरीत पडला होता मग आरडाओरडा झाल्यावर कोणीतरी येऊन बाहेर काढला. विहिरीला पायऱ्या नव्हत्या मग नाडा सोडला त्याला धरून बाहेर आले." मग यावर माझे प्रश्न चालत नाडा म्हणजे काय?
तुम्हाला जर आठवत असतील तर अजून शब्द तर नक्की लिहा.
लाकडी, लोखंडी नांगर, पाभर, कुळव, बैलगाडी, बैल आणि एकंदरीत शेती विषयी असंख्य शब्द आहेत. आठवतील तसे लिहितो.
बलुतेदारांपैकी कुंभार, सुतार आणि लोहार थोडेफार टिकून आहेत. आयकिया च्या जमान्यात फार काळ राहतील असे वाटत नाही.
मोट कशी चालते याचा विडिओ. https://youtu.be/hM5e4qujmzc?t=121
काम करणारे लोक चित्रपट कलाकार वाटत आहे पण बऱ्यापैकी बरोबर चित्र आहे. बाकी अशक्य विनोदी विडिओ आहे. फ्लॉवर ची पप्पी वगैरे भागाकडे दुर्लक्ष करा.
वाह! खरच सुरेख व्हिडीओ आहे
वाह! खरच सुरेख व्हिडीओ आहे चिडकू. यात अनेक गोष्टी दिसतायेत. मोट, तिफन, ज्यातुन धान्य जमिनीत सोडतात ते चौंडं, खळे वगैरे.
मोटेसाठी दोन लाकडी चाके असत. वरच्या कडीसाठी एक डोक्याच्या पातळीवर असे आणि दुसरे जेथे पाणी पडे तेथे असे. हे खालील चाक दोन अडीच फुट रुंद असे. ज्याच्या विहीरीवर तिन पेक्षा जास्त मोटा चालत तो ‘तालेवार’ समजला जाई. विहीरीला बारव देखील म्हणतात पण तिची बांधणी जरा वेगळी असे. बाव त्याहुन छोटी विहिर असे तर आड म्हणजे अत्यंत छोटी विहिर असे. दोन-तिन फुटांच्या आसपास व्यास असे. ही बरेचदा ब्राम्हणांच्या घरातच असे.
Pages