जगात सर्वानाच झोपाळ्याचं आकर्षण असतं. झोपाळ्याचे उल्लेख अगदी रामायण महाभारतात ही आहेत. राधा कृष्णा च्या रास क्रीडेत झोपाळा असतोच. मराठीत ही झुला / झोपाळा ह्या विषयावर झुलवू नको हिंदोळा, झुलतो झुला, उंच उंच माझा झोका या सारखी अनेक प्रेमगीत, बालगीत, कविता लिहिल्या गेल्या आहेत. कोकणातल्या माणसांना हे झोपळ्याचं वेड जरा जास्तच असत. पिढ्यान पिढ्याच्या दारिद्र्यामुळे, कोकणात असलेल्या द्ळण वळणाच्या कमतरतेमुळे कोकणी माणसाचं आयुष्य तसं खडतरच असत. झोपळ्याच्या हिंदोळ्यावर त्याच मन स्वप्न रंजनात रमत असेल म्हणून कदाचित कोकणी माणसाला झोपाळा जास्त आवडत असावा. पुढील दारी तुळशी वृंदावन, मागच्या आगरात फुलझाडं आणि घराच्या दर्शनी भागात असलेल्या पडवीत झोपाळा नसलेलं घर कवचितच सापडेल कोकणात.
आमच्या कोकणातल्या घरी पुढल्या दारी पडवी नसल्याने ओटीवरच्या मुख्य वाशाला आमचा झोपाळा लावलेला आहे. काही घरात दिवाळी नंतर खळ्यात मांडव पडला की झोपाळा ही खळ्यात च आणला जातो . पण आमच्याकडे खळ्यात झोपाळा लावायची सोय नसल्याने तो कायम ओटीवरच लावलेला असतो. हा आमचा झोपाळा जाड सागवानी लाकडापासून बनवलेला आहे. एका वेळी एका बाजूला तीन जणं आरामात बसू शकतील एवढा लाम्ब रुंद आहे. झोपाळयांच्या फळीला एखाद इंच उंचीची चौकट आहे. झोपाळ्यावर पाणी सांडलं किंवा छोट्या बाळाने शु वैगरे केली तर फळी थोडी तिरपी केली की सगळं पाणी निघून जावं यासाठी काही झोपळ्याना कोपऱ्यात एक छोटंसं भोक असत. आमच्या झोपाळ्याला नाहीये तस भोक आणि असत तरी उपयोग झाला नसता कारण अधिक आरामदायी होण्यासाठी आम्ही झोपाळ्यावर गादी घालतो. झोपळ्याच्या कड्या लोखंडीच आहेत. झोपळ्याच्या कड्या कुरकुरत असतील तर झोके घेताना मोठाच रसभंग होतो. तसेच कड्या कुरकुरण अशुभ ही समजलं जात. कड्या कुरकुरु नयेत यासाठी त्यामध्ये वंगण घालावं लागत. वंगणाचे डाग कपड्याना लागू नयेत म्हणून आज अनेक वर्षे तेच विको वज्रदंती चे रिकामे डबे दोन्ही बाजूंना कापून घरच्या घरी बनवलेले ( कोब्रा ना आम्ही ) सिलेंडर्स कड्यांवर घातले आहेत. ते सिलेंडर गोल गोल फिरवण्याचा खेळ करताना लहान मुलं खूप वेळ रमतात हा त्यांचा आणखी एक फायदा ( स्मित ).
पावसाळ्यात पहाटेच्या धूसर प्रकाशात घरात इतरत्र शांतता असताना झोपळ्यावर बसून हलके झोके घेत, ओटीवरच्या रेज्यातून बाहेरच्या पागोळ्यांच्या मुंडावळ्या बघत चहा पिणं म्हणजे माझ्यासाठी तो अगदी “मी टाईम” असतो. बाहेर पावसाची लय आणि मनात मंद झोक्यांची लय ! बघता बघता मन हलकं होऊन जात. काही अपवाद वगळता घरातल्या सगळ्यांनाच झोपाळा आवडत असल्याने दिवस उजाडला की झोपाळ्यावरची वर्दळ पण वाढत जाते. संध्याकाळी झोपाळ्यावर बसून खळ्यात रंगलेला मुलांचा खेळ पहाताना आपण ही मनाने लहान होऊन जातो. कधी कामाचा कंटाळा आलाय म्हणून, कधी काही काम नसण्याचा कंटाळा आलाय म्हणून, कधी एकट वाटतय म्हणून, कधी कोणाचा तरी राग आलाय म्हणून, कधी लाईट गेले की उकडतय म्हणून सतत कोणी ना कोणी तरी बसलेलं असतंच झोपाळ्यावर. आणि झोपळ्याची जादूच अशी आहे की पाच दहा मिनिटं झोका घेतल्या की आपोआपच मुड सुधारतो. झोपाळा फक्त घरातल्या माणसांनाच आवडतो अस नाही तर अंगाचं मुटकुळ करून गुरगुटून झोपण्याची मनीची सर्वात आवडती जागा झोपाळाच आहे. आणि जॉनी झोपाळ्यावर बसत नसला तरी त्याची ही आवडती जागा झोपाळ्या खालचीच आहे.
लहान मुलं पाळण्यात झोपे नाहीशी झाली की त्यांना झोपवायला झोपाळा लागतोच. थोड्या मोठया मुलांचा अभ्यास, खेळ, भांडण सगळं झोपाळ्यावरच चालत. रात्री आईच्या नाहीतर काकूच्या मांडीवर डोकं ठेवून झोके घेता घेता झोपाळ्यावरच झोपी जातात मुलं. आमचा झोपाळा ओटीवरच असल्याने आणि ओटीवर सतत मोठया माणसांचा ही राबता असल्याने फार उंच झोका घ्यायला मात्र मुलांना मिळत नाहीत. मुलांना मोठे झोके घेऊन मजा करता यावी म्हणून खालच्या घरात आणखी एक झोपाळा आहे आमचा. मे महिन्यात सगळी जमली की त्या झोपाळ्यावर खुप खेळतात मुलं. झोपाळयावर कधी बस बस चा तर कधी भातुकलीचा खेळ रंगतो. गाणी म्हटली जातात. भेंड्या खेळल्या जातात. उंच उंच झोक्यांचा खेळ ही रंगतो. मला त्या झोपाळ्यावर दुपारी वाचत पडायला फार आवडतं. असो. आमचा झोपाळा चांगला लांब रुंद असल्याने दुपारची वामकुक्षी घ्यायला किंवा खूप जास्त पाव्हणे असतील तर रात्री ही झोपायला उपयोगी पडतो.
माझ्या तिथे रहाणाऱ्या सर्वच सासुबाईना झोपाळा फार आवडत असे पण त्या वेळी स्त्रियांवर एकूणच अनेक बंधन असल्यामुळे त्यांची ही अतिशय साधी, बिन खर्चाची हौस ही पुरवली गेली नाही. एक तर तेव्हा घरात कामं खूप असत त्यामूळे सवडच नसे त्याना आणि त्यात ओटीवर कोणी पुरुष माणूस नसेल तेव्हाच त्या बसत असत झोपाळ्यावर थोडा वेळ . आता काळ बदललाय, आता आम्ही मनात येईल तेव्हा झोपळ्यावर बसतो त्यावेळी हे फार जाणवतं आणि खूप वाईट ही वाटत. असो. आम्ही घरातल्या बायका रोज दुपारी जेवण झालं की दोघी तिघी झोपाळ्यावर, दोघी त्या समोरच असणाऱ्या बाकावर, एक दोघी खुर्चीवर अशा बसून थोडा वेळ तरी गप्पा मारतो आणि मगच झोपायला जातो. रात्री ही कधी कधी गप्पा रंगतात आमच्या झोपळ्यावर. कधी तरी रात्री घरातल्या सर्वांची निजानीज झाल्यावर एकट्यानेच झोपळ्यावर बसून झोके घेत ओटीवरच्या रेज्यातून घरात येणारे शांत, स्निग्ध, दुधाळ चांदण्यांचे कवडसे पहाण स्वर्गीय सुखाचा आनन्द देत.
घरात कुणाचं डोहाळजेवण जेवण असेल तर तो दिवस झोपळ्यासाठी ही अगदी खास दिवस असतो. झोपाळ्याच्या कड्याना आंब्याचे टाळे, झेंडूची फ़ुलं लावून सुशोभित करतात. झोपाळ्यावरच्या गादीवर नवीन चादर घातली जाते. बाजूला लोड, तक्के ठेवले जातात. आमचा झोपाळा तसा जमिनीपासून उंच आहे त्यामुळे उत्सव मूर्तीचे पाय लोंबकळुन तिच्या पायाला रग लागू नये म्हणून खाली छोटसं स्टूल ठेवलं जातं. ओटीवर निमंत्रित बायकांच्या गप्पा, गाणी, उखाणे, फराळ सगळं झोपाळ्याच्या साक्षीने रंगत. त्या नवीन जीवाच्या स्वागतासाठी जणू काही झोपाळा ही अधीर झालेला असतो.
आमच्या घरात जेव्हा एखादं कार्य असत तेव्हा मात्र झोपाळा तेवढया पुरता काढून ठेवला जातो. झोपाळा न काढता ही मॅनेज करायचा आटोकाट प्रयत्न केला जातो पण झोपाळा काढल्या शिवाय पर्याय नसतो. घरात एवढी माणस असतात, शुभकार्याची लगबग असते, ओटीवर बसायला जागा नाही इतकी माणसं असतात तरी ही झोपाळ्याशिवाय ओटी फार सुनीसुनी वाटते. कार्याची लगबग सम्पली की पहिलं काय केलं जातं , तर झोपाळा लावला जातो. तेव्हाच घरातल्यांचा जीव झोपाळ्यात पडतो. झोपाळ्याशिवाय ओटीला शोभा नाही आणि आता झोपाळा लावल्यावर कशी ओटी छान दिसतेय यावर गप्पा ही रंगतात. त्या ही अर्थातच झोपाळ्यावर बसूनच.
तसं बघायला गेलं तर झोपाळा ही घरातली एक वस्तू. पण ह्याच स्थान घरातल्यांच्या ह्रदयात आहे. म्हणूनच झोपाळ्याशिवाय आमच्या घराला शोभा नाही हेच खरं !
हा फोटो .. हा आमच्या झोपाळ्याचा नाहीये. माबोकर शोभा हिने मला दिला आहे. हा विषय ही मला तिनेच सुचवला आहे. शोभा त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
मी पहीला.
मी पहीला.
ममो वाचुनच मुड रिफ्रेश झाला. झोपाळा माझा विक पाॅईंट आहे. तेवढे पुस्तकाचे मनावर घ्या.
पहिल्या वहिल्या प्रतिसादा
पहिल्या वहिल्या प्रतिसादा बद्दल पाफा खूप खूप धन्यवाद.
हो पुस्तक काढायचं आहे मनात. माझ्या पेक्षा ही जास्त यजमानांच्या मनात आहे. बघू कधी योग येतो ते.
ममो योग जुळवून आणावे लागतात.
ममो योग जुळवून आणावे लागतात.
वाह! खरच खुप छान लिहिलय. अगदी
वाह! खरच खुप छान लिहिलय. अगदी आवडले. मस्तच.
ममो, धन्यवाद। खूप छान लेख.
ममो, धन्यवाद। खूप छान लेख.
झोपाळा माझाही फार आवडता. इथे एका मैत्रिणीकडे झोपाळा आहे, मी तिच्याकडे गेले की प्रथम झोपाळाच पडते.☺
ह्या फोटोतल्या झोपाळ्यावर माझे पणजोबा, आजोबा, वडील, व आम्ही सगळेच खेळालोय. अजूनही तो पुढच्या पिढयांची सेवा करतोय. सहज १५०/२०० वर्षांपूर्वीचा आहे.
किती मस्त आहे लेख.असा झोपाळा
किती मस्त आहे लेख.असा झोपाळा आजी आजोबांकडे होता.पण घर नवं बांधायला काढल्यावर तो काढला.
वाह परत एकदा पोचवलंत कोकणात.
वाह परत एकदा पोचवलंत कोकणात. मस्तच.
झोपाळा मला माहेरच्या कोकणात घेऊन जातो. मी लहानपणापासून दरवर्षी कोकणात जायचे तेव्हा दोन ठिकाणी पडीक असायचे एकतर झोपाळ्यावर नाहीतर माडीवर पुस्तकं वाचत, मिठातले आवळे खात. आजीला मदत पण करायचे हा उरलेल्या वेळात.
सकाळी उठल्यावर आधी झोपाळ्यावर बसायचं मग काफी प्यायची आणि फुलं काढायची, रात्री मी झोपाळ्यावर झोपायचे बरेचदा. रात्री शेजारी पाजारी जमायचे, आम्ही मुलं झोपाळ्यावर बसायचो आणि मग भुताच्या गोष्टी ऐकायचो. तेव्हा लाईट नव्हते, कंदील.
मला लांब झोके घ्यायला आवडायचे. पुढच्या पडवीत झोपाळा, लांब झोके घ्यायचे मी.
सासरी पण झोपाळा आहेच पण माझं जाणे कमी होतं तिथे. कधी वेळ मिळाला तर तिथेही रमते झोपाळ्यावर.
वेताचा सिंगल झोपाळा म्हणजे झुला नालासोपारा, श्रीरामपूर आणि इथे ही होता. दुधाची तहान ताकावर तसा. लेक जास्त बसायचा मात्र दिवसरात्र त्यावर.
मस्त लेख.
मस्त लेख.
माझ्या आजोळी, आईच्या घरी वर फोटोत आहे तसाच मोठा, पाय असलेला मजबूत झोपाळा आहे, काळ्या शिसवी लाकडाचा. किती जुना आहे देव जाणे पण मला आठवतंय तेव्हापासून तो आहे. लहानपणी पोटात ढवलायला लागेतो मी झोके घ्यायचे त्यावर.
मी इकडच्या माझ्या घरात पण मोठा झोपाळा बनवून घेतलाय.
खूपच छान वाटलं वाचून ! बरीच
खूपच छान वाटलं वाचून ! बरीच वाक्यं वाचताना पुनःप्रत्ययाचा आनंद झाला.
) मोठे झोके घेण्याचा क्रायटेरिया म्हणजे हात वर करून वरच्या भालाला ( भाल म्हणजे वाशांच्या ९० अंशांमधे असलेलं मोठं जाड लांब लाकूड) हात टेकवणं. काही शूरवीर पायही टेकवायचे ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
. मग एक ड्रायव्हर ( जी/ जो झोके घेणार) कागदाचे कपटे तिकीट म्हणून देणारा/री कंडक्टर आणि बाकी लिंबूटिंबू पब्लिक म्हणजे प्रवासी ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमच्या झोपाळ्यावर आम्ही खूप मोठे मोठे झोके घ्यायचो. ( आता आमची मुलं घेतात तिकडे गेलो की
आईची जुनी लालसर रंगाची साडी झोपाळ्याला गुंडाळायचो. ही आमची एस्टी
माझ्या आईच्या आजोळी भलामोठा मजबूत घरंदाज असा झोपाळा आहे. त्याला एक दोरी बांधून बसल्या बसल्या झोके काढायची सोय आहे. आम्हीही आमच्या झोपाळ्यावर नुसती मांडी घालून बसून पुढे मागे तोल देऊन कितीही मोठे झोके घेऊ शकतो म्हणा
खूप छान ....
खूप छान ....
मस्त वर्णन आहे.
मस्त वर्णन आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
लहानपणी कच्चा लिंबू म्हणून मला झोपाळ्यावर बसायला दिलं जात नव्हतं. क्वचितच कुणा दादा-ताई किंवा बाबांसोबत बसायला मिळायचं. पण ते मुद्दाम मोठा झोका काढून घाबरवायचे आणि उतरायला लावायचे. आता मीही तेच करते म्हणा सध्याच्या कच्च्या लिंबांसोबत
हा आमचा झोपाळा.
मस्त आहे चिन्मयी झोपाळा,
मस्त आहे चिन्मयी झोपाळा, तुमचा बंगलाही छान दिसतोय.
मस्त लेख.
मस्त लेख.
माझ्या गावच्या घरीही आहे सागवानी मोठा झोपाळा.
छान आहे लेख.
छान आहे लेख.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमच्या घरीही झोपाळा होता. बंगई म्हणायची आजी त्याला. सतत कुणीना कुणी बसलेले असायचेच..
खूपच छान लेख ! छान आठवणी
खूपच छान लेख ! छान आठवणी जाग्या झाल्या वाचून !
झोपाळा म्हणजे तर सगळ्याच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय !
आमच्या घरी हि झोपाळा आहेच ; पण मी मात्र माझ्या आजोळी मामेभावंडांसोबत खूप मज्जा केली आहे
हा लेख वाचताना मी आत्ता मनाने त्याच झोपाळ्यावर झोके घेतेय !
वा ! झोपळा आवडला.. खुप सुरेख
वा ! झोपळा आवडला.. खुप सुरेख लिहीता हेमा ताई.
सर्वाना धन्यवाद.
सर्वाना धन्यवाद.
आज लोकसत्ता वास्तुरंग मध्ये हा लेख आणि फोटो दोन्ही छापून आलं आहे. इथे लिंक डकवून ठेवतेय म्हणजे कायम स्वरूपी राहील. शोभा तुझ्या झोपाळ्याचा फोटो बघ प्लिज.
https://www.loksatta.com/vastu-lekh-news/swing-for-relaxation-and-enjoym...
सुरेख लिहिलंय...
सुरेख लिहिलंय...
हा धागा आधीच वाचला होता.पण
हा धागा आधीच वाचला होता.पण प्रतिसाद दिला नव्हता.बाल्कनी आणि झोपाळा माझे विक पाॅईंट्स आहेत.या शनिवारी वास्तुरंगमधे तुमचा लेख परत वाचला.खूप सुरेख! असा झोपाळा माझ्या एका आजीकडे होता.तोही दक्षिण मुंबईत! त्यांच्याकडे जायला मी कायम उत्सुक असे.आम्ही जवळच रहात असल्याने आई बरेचदा त्यांना भेटून येत असे आणि मी त्यावेळी झोपाळ्यावर झोके घेत असे.असो.तुमचा लेख वाचून ते सारं परत आठवलं!
मी इकडच्या माझ्या घरात पण मोठा झोपाळा बनवून घेतलाय.>>>> प्रचंड हेवा! हलकं घ्या.
मी चिन्मयी, बंगला खूप मस्त आहे.मुख्य म्हणजे झोपाळा झकास आहे.
शशांक, देवकी धन्यवाद
शशांक, देवकी धन्यवाद प्रतिसादाबद्दल.