खड्ड्यातील कोंबडी अथवा डब्ब्यातील कोंबडी

Submitted by अ'निरु'द्ध on 12 November, 2018 - 12:46
dabyatali kombadi

खड्ड्यातील चिकन
खड्ड्यातील कोंबडी अथवा डब्ब्यातील कोंबडी

Dabba Chicken..

(पाककृती)

साहित्य: (५ कोंबड्यांसाठी)

दालचिनी पावडर : ६ चमचे
वेलची पावडर : १० ते १२ वेलच्यांची
खसखस : २ चमचे
कोथींबीर : ८ ते १० काड्या
आले -एक इंची : अदमासे १० नग
काळीमिरी पावडर : १ चमचा
लसूण : ४ ते ५ आख्खे कळे

वरील सर्व साहित्याचे वाटण करून घ्यावे

अर्धी वाटी ओल्या नारळाचे दूध
तूप : २०० ग्रॅम
तेल : पाव किलो (५ पळी)
१० ते १२ कांदे किसलेले किंवा मिक्सर मधून जाडसर काढलेले
६ चमचे वाटलेले शाही जिरे गरम मसाल्याच्या सामानात वाटलेले

वरील सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावे.

कोंबडी शिवण्यासाठी सुई आणि धागा.
५ कोंबड्या मावतील एवढा ॲल्युमिनियमचा डबा घट्ट बसणाऱ्या झाकणासहित
कणिक
फुंकणी
२ चमचे हळद पावडर + काळीमिरी पावडर ४ चमचे
सुकलेल्या लाकडाच्या ढलप्या आणि सुके कोळसे
चवीप्रमाणे मीठ
चिकन मसाला पावडर ४ चमचे

(कृती लेखामध्ये सुयोग्य जागी पाहावी) Wink

माझ्या मित्राचं येऊरच्या जंगलात फार्म हाऊस आहे. बरेच दिवस तो आमच्या ग्रुपला तिथे बोलवत होता.
मग येऊरला अशा मस्त, थंड, निवांत जागी जाऊन करायचं तर काय करायचं….?
तर ठरवलं की खड्ड्यातलं चिकन करायचं.
ह्या खड्ड्यातील चिकनला एक जुना आणि नॉस्टॅल्जिक संदर्भ होता.

आमचा हा ग्रुप आहे तो साधारणपणे कॉलेजच्या काळात बनला होता पण तो एका वेगळ्याच कोर्ससाठी / उद्दिष्टासाठी होता. त्यामुळे सगळ्याच मुलांची कॉलेजेस, कोर्सेस वेगवेगळे होते.
आणि सगळ्यांच्या वयातही साधारणतः चार-पाच वर्षाचा फरक होता.
यातला एक मुलगा, संजय वाड्याचा होता (वाडा तालुका), जातीने विश्वकर्मा पांचाळ म्हणजे सुतार होता आणि वाड्यामध्ये त्याच्या काकांच्या लाकडाच्या सॉ-मिल्स (वखारी) होत्या.
त्यांच्याकडे दर होळीला मोठा प्रोग्राम असायचा आणि आमची ओळख वाढल्यावर त्याने आम्हाला सगळ्यांना त्याच्या गावच्या होळीला घरी यायचं आमंत्रण दिलं ज्याचं सगळ्यात मोठे आकर्षण होतं खड्ड्यातलं चिकन.
हे चिकन त्याचे गावचे शशीकाका बनवायचे आणि ते या कामात एकदम एक्स्पर्ट होते. त्या चिकनच्या आशेने आम्ही सगळ्यांनी आपापल्या स्कुटर्स, मोटरसायकल्स भिवंडीच्या पाईप लाईन रोडने काढल्या.
हा रस्ता आम जनतेच्या प्रवासासाठी निषिद्ध होता आणि म्हणूनच या रस्त्याने वॉचमनला गयावया करून किंवा त्याच्या हातावर पाच दहा रुपये टेकवून प्रवास करण्याची मजा काही औरच होती. (तसंही ते वय नियम पाळण्याचं नव्हतंच).

एकतर या रस्त्याला ट्रॅॅफिक नाही, खड्डे खुड्डे नाहीत. त्यामुळे आम्ही सुसाट सुटायचो आणि अपेक्षेपेक्षा लवकर वाड्याला पोहोचायचो.

वाड्याला पोहोचल्यावर आधी मित्राच्या घरी चहापाणी झालं, त्याच्या सख्ख्या कुटुंबीयांची ओळख झाली आणि मग तिथून अगदी पाचंच मिनिटांवर असलेल्या त्याच्या काकांच्या वखारीवर आम्ही पोहोचलो.

वखारीचा मधला अंगणासारखा भाग एकदम झाडून लोटून स्वच्छ करून ठेवला होता. अर्थात सॉ मिल असल्यामुळे लाकडाचा बारीक भुसा सगळीकडे पसरला होताच. त्या अंगणा मध्ये मध्यभागी एक खड्डा बनवलेला होता.

आम्ही आल्यावर त्यांनी त्यांची ती जगप्रसिद्ध चिकन बनवायला सुरुवात केली.

एक ॲल्युमिनियमचा झाकण असलेला मस्त मोठा डबा घेतला. त्याच्यामध्ये मॅरीनेट केलेल्या आणि मसाला भरलेल्या आख्ख्याच्या आख्ख्या कोंबड्या टाकल्या. डब्याचं झाकण लावलं. त्याच्या जोडाच्या ठिकाणाहून वाफ बाहेर पडू नये म्हणून कणकेचं अस्तर लावलं.
त्या समोर आलेल्या चिकनला काय मसाला लावला, कसं मॅरिनेट केलं याची त्यावेळेला मला अजिबात कल्पना नव्हती पण शिजवायचा तो सोहळा मात्र अगदी डोळे भरून पाहिला होता. खरंतर डोळ्यात जीभ आणून पाहिला होता असं म्हणा नं.

त्या काकांनी आधीच खणलेल्या खड्ड्यामध्ये वखारीतल्याच मस्त सुकलेल्या लाकडाच्या कापताना खाली पडलेल्या चपट्या ढलप्यांचे पातळ तुकडे तळाशी पसरले आणि त्याला आग लावून त्याचा कोळसा केला.
मग चिकन भरलेला ॲल्युमिनियमचा डबा झाकणाला कणकेचं अस्तर लावून बंद केला. तो डबा हलक्या हाताने खड्ड्यातल्या त्या कोळसा झालेल्या ढलप्यांवर ठेवला. डब्याच्या चारी बाजूने असलेल्या गोलाकारात सुकलेल्या लाकडाच्या चपट्या लांब ढलप्या खुपसल्या. त्यामध्ये बाजूबाजूने जशी जागा मिळेल तसे सुक्या लाकडाचे लहान मोठे तुकडे कोंबले आणि या सर्वांवर तिथेच पडलेला सॉ-मिल मधला भुसा पसरला. मग डब्याच्या झाकणावर आणि आजूबाजूला पण चपटी लाकडं पसरली आणि मग त्याला आजूबाजूने काडी लावून टाकली.
आगीच्या ज्वाळा डब्याच्या चारी बाजूने लवलवायला लागल्या

आणि मग आम्हा मुलांचा वेटिंग पीरियड सुरू झाला. किती वेळ असं केलं लक्षात नाही पण अंदाजे पाऊण किंवा एक तासानंतर त्यांनी ती आग विझवायला घेतली. त्यानंतरही दहा मिनिटं थांबून मग चिमट्याने डब्याच्या वरची आणि थोडी आजूबाजूची लाकडं काढून घेतली. एव्हाना ते कणकेचे सील एकदम सुकं कोरडं झालं होतं. खरंतर त्याची एक लांबट चपातीची पट्टी झालीच होती. ते सील हलक्या हाताने बाजूला काढून डब्याचं झाकण हळूच उघडलं. खरंतर चिकन मस्त शिजल्याची पावतीच झाकण उघडल्या उघडल्या येणाऱ्या वासानेच दिली होती पण तरीही काकांनी त्यातल्या एका पीसला काटा टोचून बघितला आणि स्वतःशीच पसंतीची मान हलवली.

मसाल्याचा आणि अंगच्या चरबीचा मस्त लालसर तवंग त्या डब्यामध्ये पसरला होता. जेवढी माणसं होती तेवढ्या ताटांची, कांदा-लिंबाची आणि पाणी पिण्यासाठी पेल्यांची व्यवस्था आधीच केली होती. नंतर तो अख्खा डबा एका मोठ्या परातीत उपडा केला आणि आम्हा मुलांना एक एक पिस वाढला. नंतर मात्र ज्याच्या त्याच्या भुकेप्रमाणे प्रत्येकाने त्या परातीतून पिसेस उचलायचे होते. सोबत तांदळाच्या पांढऱ्या धोप भाकर्‍या तर होत्याच. त्यावेळी खाल्लेलं ते खड्ड्यातलं चिकन आम्ही कधीही विसरू शकलो नाही.
आणि मी आणि प्रमोद बाकी सर्व लोकं खाउन उठले तरी शेवटपर्यंत ते पिसेस खात बसलो होतो ते ग्रुपवाले आम्हाला कधी विसरु देत नाहीत..

आता येऊरला पार्टी करायची म्हटल्यावर त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि ठरवलं या वेळेला आपण करायचं ते,
तेच खड्ड्यातलं चिकन.

मग संजयला बाबापुता करून त्याच्या काकांची ती खास रेसिपी मागवून घेतली आणि मग यादीनुसार वस्तू जमा करायला घेतल्या; ती यादी लेखाच्या सुरुवातीला दिलेली आहे.

त्या यादीतल्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही येऊरच्या फार्म हाऊस कडे कूच केले. सामान ठेवल्याठेवल्या पहिल्यांदा खड्ड्यांसाठी जागा शोधायला सुरुवात केली. तशी जागा किचनच्या मागच्या मोकळ्या जागेत मिळाली. कुदळ फावड्याची सोय फार्म हाऊस वाल्या मित्राने आधीच करून ठेवली होती.

वाड्यातून ह्या सुतार लोकांची जी पुढची पिढी बाहेर पडली होती ती मात्र लोहार काम करत होती म्हणजे थोडक्यात लेथ मशीन आणि तत्सम मशिनरी ऑपरेट करत होती. आमचा संजय सहाजिकच याच लेथ मशीनच्या व्यवसायात होता. त्याने डोकं चालवून त्याच्या वर्कशॉप मधला एक हवा मारणारा पंप (Blower) ही आणला होता जेणेकरून आम्हाला कोणाला ती आग फुंकणीने फुंकत बसायला नको.

या खड्ड्यातल्या कोंबडीची पाककृती

कृती :

पाचही कोंबड्या साफ करून घ्याव्यात.
पोटाला संपूर्ण छेद देऊन आतला अनावश्यक भाग, पित्त वगैरे काढून टाकून तेही सर्व स्वच्छ करावे.
वरील पद्धतीने बनवलेले मिश्रण कोंबडीच्या पोटामध्ये भरून कोंबडी सुई धाग्याने शिवून घ्यावी.
ॲल्युमिनियमच्या डब्ब्यामध्ये ह्या ५ कोंबड्या टाकाव्यात.
प्रत्येक कोंबडी टाकताना तिला तेलाचा आणि तुपाचा हात फिरवावा.
७ चमचे तेल वरून टाकावे.
त्यावर ४ चमचे काळीमिरी पावडर आणि २ चमचे हळद भुरभुरावी.
नंतर वरून एक लहान तांब्या पाणी टाकावे.
हे झाल्यावर झाकण लावून डबा बंद करावा.
झाकणाच्या बाजूने डब्याला कणकेचा घेर लावावा, अस्तर लावावे म्हणजे शिजवताना आतली वाफ बाहेर जाणार नाही.

तत्पूर्वी एक अधिकची कामगिरी म्हणून साधारणपणे १२" X १२" किंवा थोडा मोठा खड्डा जमिनीत करून घ्यावा.

त्यात तळाशी कोळसे आणि चपट्या सुकलेल्या लाकडाच्या ढलप्या टाकून विस्तव पेटवावा. विस्तव रसरशीत लाल रंगाचा झाला कि त्यात कोंबडी भरलेला, झाकण लावलेला, कणिक लावलेला डबा ठेवावा. बाजूच्या फटीत सुक्क्या लाकडाच्या चपट्या ढलप्या रचाव्यात व त्यांनाही आग लावावी.

डब्यावर जाळी ठेऊन वरतीही सुकी लाकडे ठेवून जाळ करावा. साधारणपणे अर्ध्या तासात कोंबडी बऱ्यापैकी शिजते.
अर्ध्या तासांनी झाकण काढून चवीप्रमाणे मीठ टाकावे. परत झाकण लावून डबा मंद आचेवर शिजत ठेवावा.

कोंबडी शिजली का हे समजण्यासाठी शिवलेला दोरा ओढावा. जर दोरा अलगद निघाला कि समजावे कोंबडी शिजली म्हणून.
त्यानंतर वरून ४ चमचे चिकन मसाला पावडर टाकावी.
एक एक चिकन सोडवून, तिचे पिसेस करून गरमा गरम सर्व्ह करावी.

(हीच कृती शिजलेल्या पूर्ण कोंबडी ऐवजी त्यांचे लेग पिसेस, ब्रेस्ट वगैरे इतर तुकडे टाकूनही करता येते. ह्याने सुरुवातीचा व्याप आणि तुकडे करून वाढायचे कष्ट कमी होतात.)

ह्या कृती नुसार मग आमचा खड्डा खणून झाला. त्याला Blower बसवून झाला. आणि मग सुरुवात झाली ती खड्ड्यातली ती कोंबडी शिजवायला..

प्रचि ०१ : खणलेल्या खड्ड्याशेजारी ब्लोअरने कोळसे पेटवताना..

प्रचि ०२: खणलेल्या खड्ड्यात कोळसे टाकून, ब्लोअर तिरका बसवून अंगार फुलवताना...

प्रचि ०३: खड्ड्यात सुक्या लाकडांची भर...

प्रचि ०४: कोंबड्या, ॲल्युमिनियमचा डबा आणि बाकीचे साहित्य...

प्रचि ०५: मुर्गीयाँ,मुर्गीयाँ ....

प्रचि ०६: साफ केलेल्या आणि पोटाला छेद दिलेल्या कोंबड्या.
पाकसोहळा आणि खाद्यसुखाच्या आशेने आलेलं चेहऱ्यावरचं हसू ...

प्रचि ०७: डब्यात कोंबडीच्या पोटात भरायचा मसाला आणि मसाला भरलेली कोंबडी..

प्रचि ०८: मसाला भरलेली कोंबडी सुई दोऱ्याने बंद करताना...

प्रचि ०९: Active And Passive Members...

प्रचि १०: पाचही कोंबड्या ॲल्युमिनियमच्या डब्यात भरल्यावर तो झाकण लावून बंद केला आणि त्याला कणकेचं सील/ अस्तर लावलं.

प्रचि ११: भानगड नको म्हणून आम्ही पहिलटकर वीरांनी वरूनही उरलेली कणिक झाकणाला थापली.. (कपाळावर हात मारणारी बाहुली)

प्रचि १२: कडेने छोटी छोटी लाकडं तर भरलीच होती आणि काही लांब फांद्याही डबा हलू नये म्हणून खुपसल्या होता.

आमचा ब्लोअर ऑपरेटर संदीप..

प्रचि १३: धुमसत्या आगीत शिजत ठेवलेलं चिकन ...

प्रचि १४: आता थोडा निवांतपणा आला आणि येऊरच्या त्या थंडीत, कोंबडी शिजतानाच्या सुवासात आणि ती खायच्या सुखकल्पनेत गप्पा बहरल्या...

प्रचि १५: अधूनमधून हवा / वारा घालायचं काम चालूच होतं
(उगाच नंतर न शिजण्याची भानगड नको....)

प्रचि १६: जसजसं चिकन शिजायला लागलं तसतशा पहिलटकरांच्या शंका कुशंका वाढायला लागल्या.
झाकण पुरेसं घट्ट आहे नं ...?

कणकेचं अस्तर सुटून वाफ बाहेर गेली तर चिकन कच्च राहून पुन्हा सगळे उप्दव्याप करायला लागणार कां ......?

मग शेवटी कोळसे फुलवायला आणलेलं बिडाचं जड भांडच त्या डब्याच्या झाकणावर ठेवून दिलं..

लफडाही नही मांगता.....

प्रचि १७: मग डबा ठेवल्यापासून साधारणपणे पाऊण तास झाल्यावर डब्याचं झाकण उघडून बघितलं.
कणकेचं अस्तर आता धगीमुळे पूर्ण सुकलं होतं...

प्रचि १८: कोंबडी शिजल्यासारखी तर वाटत होती

प्रचि १९: वाफेमधून अर्धवट दिसणारी कोंबडी...

प्रचि २०: अजूनही वाफ आहे...

प्रचि २१: अब कुछ दिख रहेला है !!!!!

प्रचि २२: येस्स.... शिजलीय !!!!

प्रचि २३: मग डबा बाहेर काढला आणि झाकण उघडून कोंबड्यांवर चिकन मसाला वरतून टाकून परत झाकण लावून मुरत ठेवल्या.

ह्या Waiting Period मध्ये मग फार्महाऊस मालकांनी डुलकीही काढली.....

प्रचि २४: येऊरच्या त्या थंडीत मग शेकोटी पेटवणे मस्ट होते. त्या खड्ड्यातल्या उरल्यासुरल्या लाकडांना, कोळशांना मग आमच्या ब्लोअर मॅन ने हवा दिली
(रसरसून पेटलेली खड्ड्यातली शेकोटी)

मग काही मेंब्रं पाय शेकायला लागले आणि कुडकुडणारे मालकही उबेला आले...

अशी फर्स्टक्लास तयार झालेली कोंबडी त्या येऊरच्या मस्त थंडीत हाणताना मग कोणालाही फोटो काढायची आठवणही राहिली नाही.

प्रचि २५: कोंबडीवर ताव मारून झोपल्यानंतरची प्रसन्न पहाट -०१..

प्रचि २६: फार्महाऊस आणि प्रसन्न पहाट -०२...

प्रचि २७: प्रसन्न पहाट -०३ आणि थंडीत कुडकुडणाऱ्या दव भिजल्या आमच्या गाड्या....

हा होता आमचा उधारच्या रेसिपीवर स्वतः खड्ड्यातली कोंबडी बनवायचा पहिला प्रयत्न.
पहिलाच प्रयत्न असल्यामुळे, प्रत्यक्ष अनुभव नसल्यामुळे थोडी गडबड झाली. सॉफीस्टीकेशनही नव्हतं.
चवही शशीकाकांच्या त्या नोस्टॅल्जिक कोंबडी सारखी नसली तरी छानच होती.

आता मात्र हात बऱ्यापैकी सरावलाय . मेहनत बरीच असल्यामुळे दरवेळी आम्ही ही कोंबडी बनवतो असं नाही. पण निवांतपणे एखाद्या फार्महाऊसवर गेलो तर वर्षातून निदान दोनदा तरी हि रेसिपी ट्राय केली जातेच.

आता तर ज्याच्या त्याच्या फार्महाउसवरचे केअर टेकर्सही खड्डा करण्यापासून ते बाकी पूर्वतयारी करण्यात पटाईत झाले आहेत.

तेव्हा तुम्हीही हि रेसिपी आवडल्यास हा प्रयोग करून बघा.
आणि काही Improvement, Enhancement केल्यात तर त्याही इथे जरूर सुचवा.

आणि हो, ही कोंबडी बनवल्यानंतर तिची चव कशी लागते ते सांगायला विसरू नका.

(काही प्रचिंचे फोटो क्रेडिट माझा मित्र गिरीश याचे)...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Slurp..
सहीच दिसताय सगळे प्रचि वाह.. आरण्यकची सैर करावी लागेल लवकरच असं दिसतंय..
मस्त लिहलंय निरू..
हा प्रयोग करून पाहण्याची खुमखुमी आलीय आता.. पेशंस तेवढा गोळा करावा लागेल..

टीना, पहिल्या वहिल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद...
आणि येस... प्रयोग करुन पहावा याची खुमखुमी यावी असाच हा सगळा प्रकार आहे..

मी व्हेज आहे. Proud पण तुमचे इतर लिखाण आणी फोटो याची पंखा आहे. Happy तुमची कृती झकास आहे, घरच्यांना फोटो दाखवते, ते कट्टर नॉनव्हेजी आहेत. बाकी कोंबडी सोडा, पण तुमच्या जंगल ट्रिपचा नक्कीच हेवा वाटला. Proud

लेखनशैली आणि फोटो, दोन्ही मस्त !
शाकाहारी असल्याने करणे/खाणे बाद. पण वाचायला मजा आली. वाचताना डॉक्टरांची इंजेश्कन वाली कोंबडी आठवली.. Happy
https://www.maayboli.com/node/57035

भयंकर ! दारुण ! यम्मी ! डेलीशीअस ! कातिल !
प्रचि 22 बघून एक पीस उचलण्यासाठी स्क्रीन कडे हात गेला. स्लर्प !!!!!

लेखनशैली आणि फोटो, दोन्ही मस्त !
शाकाहारी असल्याने करणे/खाणे बाद. पण वाचायला मजा आली.+११११११

अफाट पाकृ आहे.
असंच ड्ब्याऐवजी मडक्यातलं चिकन पण करतात. पोपटी म्हणतात.

छान आहेत प्रचि आणि रेसिपी करतानाचे वर्णन !!! कोंबडी शिजल्यावर तो विणलेला धागा आपोआप सुटतो का ?

छान.उत्साही रसिक आहात>>>>>

निरु आयुष्याची मजा तब्येतीत घेणारे आहेत....

रेसीपी व फोटो एकदम तोंपासू. दळणाचा डब्बाही कृतकृत्य झाला असेल आपला असा उपयोग पाहून.

असंच ड्ब्याऐवजी मडक्यातलं चिकन पण करतात. पोपटी म्हणतात.>> येस्स ! मला पण अगदी हेच आठवलं ...
हा सगळा खटाटोप पोपटी करताना हि करावा लागतोच त्यामुळे "कष्टाविण फळ ना मिळते " चा पुरेपूर अनुभव येतो Happy Wink
माझा पण कोंबडीला पास .. पण दिसतेय बाकी मस्त! वर्णन आणी फोटो पण आवडले

त्या बावीस नंबरच्या फोटोत,
त्या पाचही कोंबड्यांचा, अगदीच लगदा झालेला दिसतोय. कोंबडी गावठी होती की ब्रॉयलर ?
---
रेसीपी आवडली.

किती छान, अगदी तोंपासु

मी खाल्लेय हे एकदा गावी, पण त्यांनी सुद्धा चिकन मडक्यात शिजविले होते. तुम्ही पण एकदा मडक्यात बनवुन बघा. मातीमुळे एक वेगळीच चव येते Happy

@ प्राजक्ता : खटाटोप भारी असतो, पण अगदी वर्थ आहे..

@ मित : इंजेक्शन कोंबडी पण मस्तच...

@ अंकु : येस्स्. एकदम तोंडाला पाणी सुटणारीच..
लिहिता लिहिता आता या थंडीत लवकरात लवकर कुठे बनवावी या विचारात जास्त मशगुल होतो...

@ मीरा.. भयंकर, भिषण धन्यवाद... Bw

@ शाली, किल्ली .... धन्यवाद

@ रश्मी.. : <<तुमची कृती झकास आहे, घरच्यांना फोटो दाखवते, ते कट्टर नॉनव्हेजी आहेत. >>

घरच्यांचे अभिप्रायही अवश्य कळवा...

@ सस्मित : <<असंच ड्ब्याऐवजी मडक्यातलं चिकन पण करतात. पोपटी म्हणतात.>>
हो पोपटी ही माहितीये. पण तिच्यात माझा पहाण्यापुरताच आणि अर्थात खाण्यापुरताच संबंध असतो. तिचा चार्ज आमच्या आगरी मित्रांकडे त्यांच्या शेतावर असताना असतो. ते आणि त्यांचे केअरटेकर यात मास्टर.
जिथे भांबुर्डीचा पाला सहज मिळतो अशा पनवेल, पळस्पे पट्ट्यात आम्ही पोपटी जास्त अनुभवतो..
जमल्यास एखादा फोटो देतो इथे...

@ गोल्डफिश : << कोंबडी शिजल्यावर तो विणलेला धागा आपोआप सुटतो का ? >>
अजून पर्यंत आपोआप तर नाही सुटला, पण शिजली की अंग मऊ झाल्यामुळे अगदी सहज, अलगद सुटतो..

@ साधना : <<रेसीपी व फोटो एकदम तोंपासू. दळणाचा डब्बाही कृतकृत्य झाला असेल आपला असा उपयोग पाहून.>>
हो ना.. पण ज्या माऊलीचा (वहिनीचा) डबा असेल, तीची मात्र ही प्रतिक्रिया नसावी.. Wink

anjali_kool, दक्षिणा .... धन्यवाद.

@ अनिरुद्ध.. : हो स्वतः करायचा पहिला प्रयत्न होता म्हणून ब्राॅयलर होत्या. कारण त्या पटकन शिजतात. गावठी कोंबडीला वेळ ह्यापैकी जास्त लागतो पण टेस्ट अप्रतिम..
आम्ही माणसं जास्त असली तर ब्राॅयलर घेतो कारण त्या जास्त असल्या तरी पटकन होतात. मग भर मसाल्यांवर ठेवतो.
कमी जण असले तर गावठी घेतो आणि मसाले कमी वापरुन अंगच्या चवीला प्राधान्य देतो. फक्त किरकोळ फ्लेश साईझ हा तीचा ड्राॅबॅक; पण त्याची भरपाई अस्सल गावरान चवीमुळे नक्कीच होते..

@ VB : हो पोपटी ची चवही मस्त असते..

दोघांनाही अभिप्रायाबद्दल धन्यवाद..

कमी जण असले तर गावठी घेतो आणि मसाले कमी वापरुन अंगच्या चवीला प्राधान्य देतो. फक्त किरकोळ फ्लेश साईझ हा तीचा ड्राॅबॅक; पण त्याची भरपाई अस्सल गावरान चवीमुळे नक्कीच होते..
<<
कॉकरेल नावाची एक चिकनची जात आहे. ती किंवा सगुणा चिकन वापरून पहा. गावराणी सारखी चव येते, अन कमी निबर असते.

रच्याकने,

आमच्या खड्डा कोंबडीची रिक्षा. फक्त रेस्पि दुसर्‍या साईटवर आहे, त्याबद्दल दिलगिरी.

***

ता.क.

फोटोमधे फक्त एकच बाटली, तीही नारंगी रंगाच्या सॉफ्टड्रिंकची दिसतेय, हे पाहून हळहळ वाटली. पण असो. पसंद अपनी अपनी Wink

जबरी.... Happy

@ आ.रा.रा.
<<<ता.क.

फोटोमधे फक्त एकच बाटली, तीही नारंगी रंगाच्या सॉफ्टड्रिंकची दिसतेय, हे पाहून हळहळ वाटली. पण असो. पसंद अपनी अपनी Wink >>>

साहेब, तो गनिमी कावा आहे....

काॅकरेल, सगुणा वापरतो.. पण घरी..
लांब लांबच्या फार्म हाऊसच्या ठिकाणी त्या मिळतातंच अस नाही..

तुमची मिपा वरची चिकन पण लय भारी आहे..
फोटो ही छान आणि लिखाणाची शैली पण मस्तच.
आवडेश..
तो मडक्याचा खड्डा पण आता मी Permanently बनवूनच घेतो.

Pages