एका लहान मुलीने मला तिच्या मैत्रिणींबरोबर समुद्रावर बोलावलं. अगदी पोचल्या दिवशीचीच गोष्ट. मी सगळा जामानिमा बरोबर घेतला. स्विमिंग सूट घातला, पाण्यापाशी जाईपर्यंत वरून घालण्यासाठी जवळपास शरारा वाटेल असा स्कर्ट चढवला, पंचे वगैरे गोळा केले... मग त्या मुलीचे आई-वडील शोधून तिला समुद्रावर नेत्ये असं सांगायचं आणि फटावळ पोहायला न्यायची असं ठरवलं होतं. आवरून मी खाली उतरले तेव्हा तिच्या आईनेच मला तिचा निरोप कळवला : “तू येईपर्यंत आम्ही पोहत जिथवर पोचलो असू तिथे येऊन भेट!” त्या मासळ्या कधीच पाण्यात उतरल्या होत्या.
इथल्या किनाऱ्यावरच्या छोट्या गावांमध्ये हे रोज दिसतं. आपण फुलीगोळा खेळायला बसू इतकी सहज आणि अचानक कोणत्याही वयाची, आकाराची माणसं झट्कन पाण्यात उतरतात, आणि पोहून झाल्यावर तितक्याच लवकर अंग झटकून पुढच्या कामाला लागतात. पुढची-मागची तयारी नाही की डोकं पुसायला मागेमागे धावणाऱ्या आया नाहीत. इथला समुद्र खुला समुद्र नाहीये. आखात असल्यामुळे पाणी कधी चवताळलेलं नसतं. तरीही लहान मुलांना कुठपर्यंत जाऊ द्यायचं हे मला माहीत हवं म्हणून एका मुलीच्या आईला विचारलं तर मला म्हणाली, “तिला लाट कळेल की! घाबरू नकोस, तिची ती फिरेल मागे.”
अत्तापर्यंत माझं मनसोक्त पोहणं फक्त स्विमिंग पुलात होतं. औषधी वासाच्या पाण्यात फेऱ्या मारणं आणि डुंबणं! त्यात माणसं सोडून बाकी कोणाबरोबर पोहायची सवय नाही. सिक्याच्या समुद्रात पायाला गुदगुल्या व्हायला लागल्या म्हणून चश्मा घालून पाण्याखाली पाहिलं तर २०–२५ सुंदर मासे पायाशी घोटाळत होते. मला सेकंदभर इतका राग आला की बास! माझ्या आईने अख्ख्या समुद्राची फी भरलेली असताना आधीच्या बॅचमधली मुलं अजूनही माझ्या वाटेत येऊन पोहत असल्यासारखा राग आला. पण हल्ली खोलवर सूर मारल्यावर फक्त हे मासे दिसतात. हिरव्या-निळ्या अंधारात ती सोबत हवीशी वाटते.
जवळच्या शाळेतल्या दुसरी-तिसरीतल्या मुली रोज पाण्यात उतरताना मला हाक मारायला लागल्या आहेत. एकीने पाण्याखाली बुडी मारून बाकीच्यांनी चश्मा लावून ती किती खोल जात्ये ते बघायचं; पाण्याखाली पद्मासन घालून लाट येईल तसं उलटं-सुलटं व्हायचं; खांद्याला धरून एकीला पाण्यात ढकलायचं आणि आपण वरचेवर तिच्या डोक्यावरून उडी मारून पलिकडे जायचं असे पाण्यातले भोंडले पहिल्यांदाच माझ्या वाट्याला आले, आणि दोन दिवसांत त्या खेळांची चटक लागली. अक्वेरियम मध्ये पाणघोड्याभोवती छोटे छोटे मासे फिरताना दिसतात तशाच दिसत असू आम्ही खेळताना. सगळ्या जणी गोल गोल पोहत समुद्र ढवळत असलो की किनाऱ्यावरच्या आज्या येता-जाता “नाऽस्ते काला” (सुखी असा) म्हणतात. या पोरी मला माझं वय विचारतात आणि माझ्या गळ्याभोवती हात घालून पाण्यात लोंबकळतात… मला अन्विता दत्तचं ‘ख़ुद ही तो हैं हम किनारे’ आठवतं...
समुद्रापासून लांब फिरून यायचं म्हणून हॉटेलमधल्या काही पाहुण्यांना घेऊन आम्ही ‘मान्ना’ नावाच्या डोंगराळ गावात जाऊन आलो. सबंध घाट चढताना फक्त सफरचंद आणि डाळिंबाची दाट झाडं! गावकऱ्यांनी कौतुकाने हव्या त्या झाडाची थोडी फळं तोडून न्यायला सांगितली. आपण हिऱ्याच्या दुकानात आलोय आणि अचानक सगळंच परवडायला लागलंय असं वाटायला लागलं मला! आम्ही ‘नेरोत्रिव्हेस’ नावाचा प्रकार बघायला गेलो होतो. रोजच्या वापरातले कपडे घरी किंवा पाणवठ्यावर धुता येतात, पण गालिचे, रजया, सतरंज्या धुवायला पूर्वी ग्रीसमध्ये ही नेरोत्रिव्हेस नावाची सर्व्हिस असायची. काही गावांनी अजूनही ती राखली आहे, त्यांपैकी एक गाव मान्ना.
धबधब्याच्या पाण्याची गतिज ऊर्जा वापरून तिथे एक नैसर्गिक वॉशिंग मशीन तयार केलंय (माझ्या सातवीच्या विज्ञानाच्या बाईंना प्लीज माझा अभिमान वाटू दे आज. गतिज ऊर्जा हे शब्द वापरून मीच मला भारावून टाकलंय). तर, धबधब्याची धार जिकडे वेगात दगडावर आदळते, तिकडे मोठ्या वर्तुळाकारात लाकडाचं कुंपण केलंय. एका फळीपाशी पाणी आदळलं की ते जोराजोरात त्या वर्तुळात फिरत राहातं. त्यात गालिचे, गोधड्या असे जडजड कपडे मस्त घुसळून निघतात. बाकी साबण-बिबण काहीच नाही! ते पाणी वाहून जाताना त्यातली घाण दोन जाळ्यांमधे अडकवतात आणि जाळ्या दर पंधरा मिनिटांनी प्रवाहाबाहेर काढून धुतात.
हा धोबीघाट चालवणाऱ्या आजोबांचं नाव पानाहियोतिस ब्राकूल्यास. आमचे गालिचे चक्रात फिरत असताना ब्राकूल्यास आजोबा खास गावातल्या, अव्वल दर्जाच्या गप्पा मारत होते. माझा चॉकलेटी रंग बघून ते माझ्याशी आधी काही बोलायला धजावले नाहीत. उगाच कशाला “या विषयावर तुमच्याशी एकदा चर्चा करायची आहे” अशा थाटात बोला, म्हणून मीही नुसती धबधब्यापाशी उभी होते. मग मी कोणाशीतरी ग्रीकमधे बोलल्याचं बघून आजोबा तोंड भरून हसले आणि म्हणाले, “अरे! तुलाही येतंय होय ग्रीक?”. म्हणे आमच्या गेल्या चार पिढ्या याच गावात होत्या; उगाच कुठे बाहेर पडायचं आणि मग गावाची आठवण काढत बसायची? त्यापेक्षा आहे ते काम एकमार्गी करत राहायला काय हरकत आहे?
भारतात काय पद्धती असतात; गावं कशी असतात असं विचारत होते आजोबा मला. मी पण रंगात येऊन जरा ‘आमच्या म्हशी-तुमच्या म्हशी’ स्टाइलच्या गप्पा मारत बसले. गालिचे धुवून निघाल्यावर ब्राकूल्यास आजोबांनी एका गिरकाठलीने ते काढून दिले आणि आम्ही घरच्या गच्चीत ते वाळवले. महिना होत आला तरी त्या गालिच्यांना खूप छान वास येतोय. तो नक्की कसला आहे तेवढं मात्र अजूनही समजत नाहीये.
मस्त. गालिचा धुणं माहोल समोर
मस्त. गालिचा धुणं माहोल समोर उभा राहिला.
मला तुझा हेवा वाटतोय.ही
मला तुझा हेवा वाटतोय.ही लेखमालिका खुपच सुंदर होईल.शंकाच नाही.
खूप सुन्दर वेगवेगळे अनुभव
खूप सुन्दर वेगवेगळे अनुभव घेतले आहेत तुम्ही आणी ते आमच्या समोर मांडता आहात. छान लिहीलेय खूप....तुम्हीही लकी आणी आम्हीही.
खूप छान वर्णन... रंगीत मासे..
खूप छान वर्णन... रंगीत मासे.. मस्तच.
छान लिहिलय...
छान लिहिलय...
>आपण हिऱ्याच्या दुकानात आलोय
>आपण हिऱ्याच्या दुकानात आलोय आणि अचानक सगळंच परवडायला लागलंय असं वाटायला लागलं मला!
वा वा. काय छान लिहलंयस ! सगळी लेखमालाच सुरेख आहे. पण हे वाचल्यावर मलाही ते हिर्याच्या दुकानात आल्यासारखं झालं. I felt like a Kid in candy shop चं इतकं चांगलं मराठीकरण, नव्हे त्या कल्पनेला अजून उंचीवर नेणारं मराठीकरण वाचल्यावर मलाच खूप श्रीमंत झाल्यासारखं वाटतंय. मायबोलीवरचं एकेकाळचं शेंडेफळ, केवढं उंच झालंय !!
@komalrishabh तुम्हाला खूप आनंद होईल असं आहे हे.
>आपण हिऱ्याच्या दुकानात आलोय
>आपण हिऱ्याच्या दुकानात आलोय आणि अचानक सगळंच परवडायला लागलंय असं वाटायला लागलं मला!
वा वा. काय छान लिहलंयस ! >>>
हो हो अगदी, अशी सुंदर शब्दकळा असलेली अनेक वाक्ये विखुरलेली आहेत ह्या लेखमालेत
komalrishabh म्हणजे
komalrishabh म्हणजे अर्निकाची आई का? अर्निकाला नक्की काय खाऊ घातलं होतं लहानपणी त्यांनी
त्यांचे लंडनचे अनुभव, मुलांना कसे वाढवले ते अनुभव वाचायला आवडतील.
एका नुसता भूगोलात असलेल्या
एका नुसता भूगोलात असलेल्या देशाची ओळख होत आहे.खूप छान
हा पण भाग खूप छान. सगळं
हा पण भाग खूप छान. सगळं वाचकाला डोळ्यासमोर दिसेल असं लिहिताय.
>> मायबोलीवरचं एकेकाळचं
>> मायबोलीवरचं एकेकाळचं शेंडेफळ, केवढं उंच झालंय !! @komalrishabh तुम्हाला खूप आनंद होईल असं आहे हे.
@अजय , खरंच! खूप आनंद वाटतो ! कौतुकाचं खत पाणी घातलं म्हणून मायबोली आणि मायबोलीकरांचे मनापासून आभार.
मी म्हणेन, "Arnika, you will go a long way , but you have a long way to go! ... मार्ग चोख धरला आहेस हे बाकी खरं ... जीयो ! "
ए कित्ती गोड लिखाण आहे तुझं..
ए कित्ती गोड लिखाण आहे तुझं.. वाचतंच राहावं..
माझं हाॅलिडे चं नेक्स्ट डेस्टीनेशन पक्कं झालं.
च्यायला मी म्हणत्ये हे कोण
च्यायला मी म्हणत्ये हे कोण आहे माझ्या मित्राने मला म्हंटलेलं वाक्य तसंच्या तसं लक्षात ठेवणारं? आई, तू आहेस होय!
पहिलं शेंडेफळ म्हणून भरपूर लाड झालेत माझे मायबोलीवर, खरंच. चित्रकवितेपासून अत्ता ललितलेखनापर्यंत... मला नेहमी खूप मजा येते मायबोलीवर लिहायला.
》》 हे कोण आहे माझ्या मित्राने
》》 हे कोण आहे माझ्या मित्राने मला म्हंटलेलं वाक्य तसंच्या तसं लक्षात ठेवणारं?
खिक् खी खी खी...
भरपूर मजा कर, आणि लिहीत रहा...
ही माबो सदस्यांना टॅग
ही माबो सदस्यांना टॅग करण्याची सोय भारी आहे! असं कसं करता येतं? आणि मग टॅग केलं तर त्या सदस्याला संदेश जातो का?
Pages