गोल्डन एरामधल्या माझ्या आवडत्या गाण्यांच्या लिस्टमध्ये एक गाणं आहे - कौन है जो सपनोमे आया. हे गाणं श्रवणीय आहे, प्रेक्षणीय अजिबात नाही. आपण खरोखरच जीप चालवतोय हे सिद्ध करायला अकारण स्टिअरिंग व्हील आडवंतिडवं फिरवत हातवारे करणारा मध्यमवयीन राजेंद्रकुमार उर्फ राकु नं. १ आणि आपण नेमकं काय एक्स्प्रेशन देणं अपेक्षित आहे ह्याची सुतराम कल्पना नसल्याने गोंधळलेला चेहेरा करून, कधी कपाळावर आठ्या घालत एक छोटी उशी कवटाळून बसलेली तरुण सायरा बानू हे विजोड जोडपं भोवती दिसणाऱ्या दार्जिलिंगच्या स्वर्गतुल्य निसर्गाची मजा घालवून टाकतं. राकुचं ते स्टिअरिंग व्हील पिरगाळणं अगदी असह्य होऊन मी एकदा आईला म्हटलं देखील 'हे स्टिअरिंग व्हील सुटून हातात येऊन हा माठ अपघातात दगावणार'. ह्यावर हसून आईने मला ह्या चित्रपटाची सुरुवातीची कथा ऐकवली. आमच्या आईसाहेबांचा राकु नं. १ फेव्हरेट बरं का. कथा ऐकून बरी वाटली. पण गोल्डन एरातल्या माझ्या पार मेंदूत जाणार्या नरपुंगवांच्या यादीत (भारत भूषण, राजकुमार उर्फ राकु नं. २, राजकपूर, प्रदीपकुमार) राजेंद्रकुमारचं नाव फार वरचं आहे. त्यामुळे ही मालिका लिहायला सुरुवात करेतो हा चित्रपट पाहायचं धाडस काही माझ्याच्याने झालं नव्हतं. ते कसंबसं गोळा करून २ दिवसांपूर्वी शेवटी एकदाचा पाहिला.
तर ही कहाणी आहे संजयची. संजय दार्जीलिंगमध्ये एक टूरिस्ट गाईड असतो. फावल्या वेळात तिथल्या एका हॉस्टेलमध्ये राहून शिकत असलेल्या प्रियावर प्रेम करत असतो. तिच्यावर तो एव्हढा लट्टू असतो की पैश्याची तंगी असूनही तिला आणि तिच्या मैत्रिणींना फिरवून आणायचे पैसेही तो घेत नाही. मग दोस्त असलेल्या हनुमानकडून पैसे उधार घेणे, देणेकर्याना चुकवायच्या नवनवीन युक्त्या शोधून काढणं वगैरे आलंच. अर्थात जीपच्या दुरुस्तीचे पैसे न दिल्याने एक दिवस मेकॅनिक त्याची ती जीप घेऊन जातोच. नेमकी तेव्हाच प्रियाला कोलकात्याहून एक तार येते. तिचे वडील तिथे ज्या कंपनीमध्ये काम करत असतात तिच्या मालकाने त्यांना खोट्या आरोपावरून अटक करवलेली असते. विमान दीड तासाने बागडोगरा एयरपोर्टवरून सुटणार असतं. पण तेव्हढ्या वेळात दार्जीलिंगवरून तिथे पोचणार कसं? प्रिया संजयला विनंती करते. तो हनुमानच्या मामाची जीप उसनी घेतो आणि तुफान वेगाने ड्राईव्ह करून प्रियाला वेळेत पोचवतो. दुर्दैवाने तिथून दार्जीलिंगला परत येत असताना त्याच्या जीपची एका वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाशी टक्कर होते आणि जीप दरीत कोसळून संजयचा मृत्यू होतो.
संजयचा आत्मा यमदूतासोबत यमलोकात जातो पण तिथे लोकांच्या पापपुण्याचा हिशोब करत बसलेला चित्रगुप्त जेव्हा आपल्या वहीतलं संजयची नोंद असलेलं पान उघडतो तेव्हा त्याच्या फोटोशेजारी 'तरुणकुमार' हे नाव पाहून काहीतरी गफलत झाल्याचं त्याच्या ध्यानात येतं. संजयचे प्राण घेऊन येणारा यमदूत ह्याआधी आपण पशुंचे प्राण हरण करत होतो आणि माणसाचे प्राण घेऊन यायची आपली ही पहिलीच वेळ आहे हे कबूल करतो. त्याच्या चुकीमुळे तरुणकुमारऐवजी हुबेहूब त्याच्यासारखं दिसणाऱ्या संजयचा हकनाक बळी गेलेला असतो. तिथे असलेले एक स्वामीजी संजयच्या आत्म्याला 'आपण तुला तुझ्या शरीरात परत घालू यात' म्हणून पृथ्वीवर घेऊन येतात खरे. पण एव्हाना हनुमान आणि त्याच्या मामाने संजयच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केलेले असतात. स्वामीजी आणि संजयचा आत्मा पुन्हा यमलोकात येतात. सप्तर्षी नामक ऋषींचा ह्यावर सल्ला घेतला जातो. ते संजयचा आत्मा तरुणकुमारच्या शरीरात घातला जावा असं सुचवतात. हो ना करता करता संजय तयार होतो. दुसरा पर्यायच काय असतो म्हणा त्याच्यापुढे? प्रियात जीव अडकलेला असतो ना.
स्वामीजी आणि संजय पृथ्वीवर तरुणकुमारच्या घरी येतात. तर तिथे प्रिया तरुणकुमारला भेटायला आलेली त्यांना दिसते. कारण हा तरुण कुमार सक्सेना उर्फ टी.के. हाच तिच्या वडिलांचा बॉस असतो. टी.के. चा धाकटा भाऊ प्रेम तिला भावाला भेटायला त्याच्या खोलीत पाठवतो खरा. पण त्याने आधीच टी.के. ला गोळी घातलेली असते. आणि प्रियाला खुनाच्या आरोपाखाली अडकवायला पोलीस बोलावलेले असतात. पण स्वामीजी ऐन वेळी संजयचा आत्मा टी.के. च्या शरीरात घालतात आणि टी.के.ला जिवंत पाहून पोलीस प्रियाला जाऊ देतात. संजयच्या लक्षात येऊन चुकतं की प्रिया आता आपल्याला टी.के. समजून आपला तिरस्कार करणार. अंतर्धान पावण्याआधी स्वामीजी संजयला सांगतात की नव्या शरीराच्या पूर्वकृत्यांचे भोग त्याला जरी भोगावे लागणार असले तरी प्रयत्न केला तर त्याला त्याचं प्रेम परत मिळू शकेल.
टी.के. चं आयुष्य जगायला सुरुवात केल्यावर संजयला तो किती नीच, लंपट आणि पैश्यांचा लोभी होता ह्याची कल्पना येते. तो आपल्या परीने टी.के. च्या चुका सुधारायचा प्रयत्न करतो. प्रियाच्या वडिलांची तुरुंगातून सुटका करतो. टी.के.ने घराबाहेर काढलेल्या त्याच्या आजीला सन्मानाने परत घरी घेऊन येतो. आजीच नव्हे तर घरातले जुने नोकरचाकरसुध्दा परकी स्त्री किंवा दारूला स्पर्श न करणाऱ्या, सन्मार्गाला लागलेल्या टी.के. ला पाहून चकित होतात, सुखावतात. वैतागतो तो एकटा प्रेम. संजय दार्जिलिंगहून हनुमानला बोलावून घेऊन त्याला सगळी परिस्थिती समजावून सांगतो. पण तरी प्रियासमोर यायचं धैर्य काही त्याला होत नाही.
आणि मग एके दिवशी त्याची आणि प्रियाची अचानक भेट होते. ती त्याला संजयच समजते. तोही तिला आपण टी.के. असल्याचं सांगत नाही.पण तिचे वडील तिला त्याच्यासोबत पाहतात आणि संजय हाच टी.के. असल्याचं तिला सांगतात. आधी तिचा विश्वास बसत नाही. पण पार्टीत संजयच्या गळ्यात पडणाऱ्या बायका पाहून तिला वडील खरे सांगत आहेत ह्याची खात्री पटते. प्रिया आता आपल्याला कायमची दुरावली ह्या कल्पनेने संजय निराश होतो. त्याची ही अवस्था त्याच्या चाणाक्ष आजीच्या नजरेतून सुटत नाही. बरेच उन्हाळे-पावसाळे पाहिलेली ती वृध्द स्त्री हा प्रेमाचा मामला आहे हे बरोबर ओळखते. आपण जिच्यावर प्रेम करतो ती तरुणी आपला तिरस्कार करते हे जेव्हा संजय तिला सांगतो तेव्हा ती त्याला ह्या सगळ्याला त्याची आधीची गैरवर्तणूक जबाबदार आहे आणि त्या वागण्याचं मूळ म्हणजे त्याची संपत्ती ती दान करून टाक असा सल्ला देते.
तिच्या सल्ल्यानुसार संजय चुकवलेला प्राप्तीकर भरतो. मिलच्या कामगारांना आपला भागीदार करून घेतो. पेपरात एक capitalist कसा socialist झालाय हयाबद्दल रकाने भरभरून लिहून येऊ लागतं. इथे प्रेम मात्र संपत्ती अशी हकनाक बाहेर जाताना पाहून अस्वस्थ होतो. त्यातून संजय उर्फ टी.के. त्याला खर्चासाठी हवे असलेले ३ लाख रुपये द्यायला नकार देतो तेव्हा तर आगीत आणखी तेल पडतं. खरं तर हा प्रेम त्याचा सख्खा भाऊ नसतो तर त्याच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा असतो. फक्त टी.के. च्या आई आणि आजीने त्याला वाढवलेलं असतं इतकंच. पण त्यानेच टी.के.ला वाईट मार्गाला लावलंय हे आजीला पक्कं ठाऊक असतं. त्यामुळे प्रेम टी.के.च्या दानधर्माबद्दल आजीकडे तक्रार करायला जातो तेव्हा ती त्याला हाकलून लावते. टी.के.ची प्रेयसी दुसरी-तिसरी कोणी नसून प्रिया आहे हे कळताच आजी तिच्या वडिलांकडे जाऊन तिला टी.के.साठी मागणी घालते. टी.के.तला बदल पाहून सुखावलेली प्रिया लग्नाला होकारही देते. पण टी.के.चं लग्न ठरल्यामुळे त्याच्याशी अफेअर असलेली त्याची पर्सनल सेक्रेटरी बिथरलेली आहे हे पाहून प्रेम तिला चिथवतो. ती टी.के.ला 'आपण स्वित्झर्लंडला गेलो होतो तेव्हा लग्न केलं होतं त्याचं सर्टिफिकेट माझ्याकडे आहे. ते सर्वाना दाखवून आपलं लग्न जगजाहिर करेन. हे टाळायचं असेल तर संध्याकाळी माझ्या घरी ये' अशी धमकी देते. हवालदिल झालेला संजय तिच्या घरी जातो. आणि मग ........
आणि मग पुढे नेमकं काय होतं ते हिंदी चित्रपट पाहिलेल्या वाचकांच्या लक्षात आलं असेलच. म्हणून हा चित्रपट पाहाच असं मी अजिबात सुचवणार नाही. कारण "यमदूताच्या चुकीने एका माणसाचा प्राण जातो आणि मग त्याच्या आत्म्याला त्याच्यासारख्याच दिसणार्या दुसर्या व्यक्तीच्या शरीरात राहावं लागतं" ही कल्पना हेच ह्या चित्रपटाचं नाविन्य आहे आणि मूळ कल्पना चमकदार असली तरी सादरीकरणात चित्रपट थोडा गंडलाय. So you can give it a miss by all means.
संजयची भूमिका ज्युबिलीकुमार उर्फ राजेंद्रकुमारने केलेली आहे. ह्याच्यापेक्षा विश्वजित बराच सुसह्य आहे असा शोध मला हा चित्रपट पाहून लागला. निदान मी पाहिलेल्या चित्रपटांत तरी विश्वजित हिरोचं काम करताना तरुण होता. पण पस्तिशीच्या पुढे गेलेल्या राजेंद्रकुमारला विशीतल्या सायराबरोबर रोमान्स करताना, गर्ल्स हॉस्टेलमध्ये बागडताना पाहणं मुश्कीलही नही, नामुमकीन है. सायराला टिपिकल हिरॉईनचं काम आहे आणि ते तिने यथास्थित पार पाडलं आहे. टी.के.च्या प्रेमळ आजीच्या भूमिकेत दुर्गा खोटे आहेत. तर प्रेम सक्सेनाची भूमिका प्रेम चोप्राने निभावली आहे. राजेंद्रकुमार सूटाबुटात जेव्हढा गबाळा दिसतो तेव्हढा प्रेम चोप्रा dapper दिसतो. सहाय्यक भूमिकांत डेव्हिड (स्वर्गातले स्वामीजी), गजानन जहागीरदार (प्रियाचे वडिल), राजेंद्रनाथ (संजयचा मित्र हनुमान), ब्रह्म भारद्वाज (ह्याला नोकराच्या रोलमध्ये पहिल्यांदा पाहिलं!), हरी शिवदासानी म्हणजे अभिनेत्री बबिताचे वडिल (टी.के.च्या वर्तुळातली एक काळे धंदे करणारी व्यक्ती) आणि जगदीश राज (अर्थात पोलीस इन्स्पेक्टर!) दिसतात.
गाण्यांत टायटल सॉंग 'कौन है जो सपनोमे आया' तसंच 'मेरे तुम्हारे बीच मे’, 'कहां चल दिये इधर तो आओ' आणि 'उनसे मिली नजर के मेरे होश उड गये' ही सुश्राव्य गाणी आहेत. बाकीची काही मला खास आवडली नाहीत.
आता बाकी चित्रपटात मोठी त्रुटी म्हणाल तर चित्रपटाच्या सुरुवातीला म्हणजे संजय मरायच्या आधी त्याला प्रिया आवडते हे कळून येतं. पण तिला त्याच्याबद्दल नेमकं काय वाटतं ते पुरेसं स्पष्ट झालेलं नाही. राजेंद्रकुमारला उगा माकडचेष्टा करताना दाखवायच्या ऐवजी कथानकात प्रियाच्या मनाचा थोडा अंदाज द्यायला हवा होता. संजयने एयरपोर्टवर सोडल्यावर ती त्याला 'तू कलकत्त्याला ये, मी तिकीट पाठवेन' असं सहजपणे का म्हणते ते कळत नाही. मुळात तो एक टुरीस्ट गाईड आणि प्रियाचा आर्थिक स्तर त्याच्यापेक्षा बराच वरचा दिसतो. मला असं म्हणायचं नाहिये की भिन्न आर्थिक स्तरांत विवाह होऊ नयेत किंवा असले प्रेमविवाह यशस्वी होणार नाहीत. पण ह्या पूर्ण नात्यात ह्या भिन्नतेचा जराही लवलेश जाणवत नाही किंवा त्याचा उल्लेख होत नाही हे अतार्किक आहे. हिरॉईन गांवकी गोरी आणि हिरो शहरी बाबू असले चित्रपटसुध्दा मला बुचकळयात पाडतात. पण बहुतेक भारतीय पुरुषांना (काही सन्माननीय अपवाद असलेच तर ते वगळून!) आपली बायको कुठल्याही बाबतीत वरचढ असलेली खपत नाही, ती कमी पडत असेल तर चालतं (किंवा धावतं!) हे वास्तव आजूबाजूला लख्ख दिसत असल्याने (पटत नसलं तरी!) असे चित्रपट एव्हढे टोचत नाहीत हे कटू असलं तरी माझ्याबाबतीतलं सत्य आहे.
त्यापुढला मुद्दा हा की एखाद्याचा चेहेरा तुमच्या चेहेऱ्याशी कदाचित थोडाफार मिळताजुळता असू शकतो. पण तो अगदी हुबेहूब कसा असेल? आणि तो असला तरी तुम्ही दोघे identical twins असल्याखेरीज अंगकाठी, उंची हे सगळं कसं जुळेल? आवाजाचं काय? कारण हे सगळं जुळत नसेल तर प्रिया टी.के.ला संजय समजायची चूक करणारच नाही ना.
संजयच्या मृत्यूनंतरचे यमलोकातले प्रसंग निदान सध्याच्या काळात तरी अतिशय बालिश वाटतात – उदा. चित्रगुप्ताच्या वहीत संजय/टी. के. चा फोटो असणे, यमलोकात सगळ्यांनी escalator वर चालल्यासारखं सरकत चालणं, तिथून पृथ्वीवर येताना आणि परत जाताना सुपरमॅनसारखं एक हात पुढे आणि एक पाय वर करून उडणं. त्यातून बिचार्या टी. के. च्या आत्म्याला तर अनुल्लेखाने मारलंय. चित्रगुप्तासमोरची पापपुण्याचा हिशोब करून घ्यायला थांबलेली भलीथोरली लाईन बघून ह्यांनी आणखी थोडे प्रोसेसिंग काऊन्टर्स उघडायला पाहिजेत असं वाटून गेलं. ६० च्या दशकात एव्हढी लाईन तर आता काय हालत असेल?
असो. विनोदाचा भाग सोडून द्या. पण एका चांगल्या कल्पनेच्या सादरीकरणावर थोडी अधिक मेहनत घेतली असती तर हा चित्रपट अधिक प्रेक्षणीय झाला असता हे नक्की.
लहानपणी कधीतरी पाहीलेला.
लहानपणी कधीतरी पाहीलेला.
याच टायटल साँग एका इंग्लिश गाण्यावरून सही सही उचललयं. हू मेक्स माय हार्टबिट्स लाईक थंडर...
हेहे, शेवटचे 2 पॅरे वाचून
हेहे, शेवटचे 2 पॅरे वाचून हसायला आले. छान लिहिले आहेस.
संजय मेला हे प्रियाला कुणी सांगत नाही का?
सायरा बालपणी खूपच गोड दिसायची. नंतर भारी जाड व थोराड झाली.
तू जुळे लिहिले त्यावरून आठवले, आई मिलनकी बेला हा एकमेव चित्रपट असावा ज्यात जुळे भाऊ असूनही ती कामे धर्मेंद्र व राकुने केली आहेत. नाहीतर हिंदीत जुळे म्हणजे 100 टक्के ऐडेंटिकल ट्विन्स असणारच.
कौन है जो सप्नोन्मे आया...हे रफीचे एपिक गाणे आहे. माझे प्रचंड आवडते. बाकी त्यात राकूने जो (न) अभिनय केलाय त्याबद्दल तू दुसऱ्या एका धाग्यावर लिहिले आहेस.
तुम कमसिन हो नादान हो.. पण यातलेच की आई मिलनकी मधले आठवत नाही... या गाण्यात राकू इतका ग्रेट अभिनय करतो की त्याची कंबर लचकते की काय असे वाटत राहते.
https://youtu.be/t6IGdiXw7qg
https://youtu.be/t6IGdiXw7qg
एल्विस प्रिसले
एल्विस प्रिस्टले चे मूळ गाने
एल्विस प्रिस्टले चे मूळ गाने आणि कौन है जो सपनोमे आया इथे तुम्हाला एकामागोमाग बम्पर टू बम्पर ऐकता येतील
https://www.youtube.com/watch?v=uR3ci3CMS9s
याला इन्स्पिरेशन न म्हणता चोरीच म्हणावी लागेल.
एन सी इ आर टी ने भारतभराच्या
एन सी इ आर टी ने भारतभराच्या देवनागरी लिपीचे प्रमाणी करण करण्यापूर्वी, हिन्दी प्रदेशात काही अक्शरे वेगळ्या पद्धतीने लिहिली जात. उदा> ण हा ए सारखा दिसे पन त्याला उभ्या तीन रेघा असत, ' अ' स्त्र सारका दिसे ,५ च्या आकड्याला खाली गाठ मारलेली असे तसेच ' झ ' अक्षर लिहिताना 'भ' ला अर्धा ' फ ' जोडलेला असे. . ह्या चित्रपटाचे पोस्टर व जाहिरातीचे ब्लॉक्स कुठल्या हिन्दी प्रेस मध्ये असल्याने जाहिरातीत व पोस्तर्वर हे भुक गया आसमान असे आम्ही वाचत असू. तसेच पायलकी भंकार.
(No subject)
(No subject)
बापरे बाबा कामदेव.कसले किचकट
बापरे बाबा कामदेव.कसले किचकट आहे हे वाचायला.
हा पिक्चर मला आवडतो खूप.फ्रेश लूक आहे.
मराठी साठी असलेल्या
मराठी साठी असलेल्या देवनागरीत ही अक्षरे नव्हती. मुळात मराठीची लिपी होती मोडी. नन्तर देवनागरी अडॉप्ट केली .तिला सुरुवातीला बाळबोध लिपी म्हनत. नन्तर एन सी इ आर टी ने देशातील सर्व देवनागरी लिपीचे प्रमाणी करण केले. त्यात आपल्याला एका बाजूचा ' ल' , खालून जोडलेला ' ख' आणि बिन शेंडीचा ' श' स्वीकारावा लागला.... आणि त्याच वेळी हिन्दी पट्ट्यात ली वरील तिरपागडी अक्षरे बदलण्यात आली...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तसेच ५, ९ हे अंकही बदलले. पूर्वीचा ९ तर चक्क ६ सारखा दिसे
तो हिंदी मधला ८ पण भयंकर
तो हिंदी मधला ८ पण भयंकर दिसायचा.आणि 5 पण.
5 वी ते 8 वी हिंदी ही आयुष्यातली भयंकर वर्षं होती.
गुजरातला जातो तेव्हा गुजराती
गुजरातला जातो तेव्हा गुजराती बोर्ड्स वाचताना अशीच तारांबळ उडते, अ, ब,ख, ज, झ इत्यादि.
भुंजई सभायार ☺️☺️☺️☺️
भुंजई सभायार ☺️☺️☺️☺️
असाच गोंधळ उडतो.
मी विकत घेऊन वाचायचे ना
मी विकत घेऊन वाचायचे ना प्रत्येक ट्रेन मध्ये भुंजई सभायार.मजा यायची.
गुजरात कडे जाणाऱ्या गाड्यात प्रवास करणे हे एक वेगळे कल्चर आहे.
(No subject)
काँग्रेसमा कुंकावा मांडयो
काँग्रेसमा कुंकावा मांडयो परिवर्तननो पवन
इराकमां अपहृत 38 भारतीय सुरक्षित, मुक्ती माटे सरकार सक्रिय
(मज्जा!!)
साधना, संजय किंवा हनुमान संजय
साधना, संजय किंवा हनुमान संजय अपघातात गेला होता हे प्रियाला कधीच सांगत नाहीत. एल्व्हिसच्या गाण्याबद्दल माहित नव्हतं.
बाबा कामदेव, ही लिपीबद्दलची माहितीही माझ्यासाठी नवीन आहे. धन्यवाद!
> ह्याच्यापेक्षा विश्वजित
> ह्याच्यापेक्षा विश्वजित बराच सुसह्य आहे असा शोध मला हा चित्रपट पाहून लागला. > हा हा +१
छान लिहिले आहे. फार पूर्वी पाहिला आहे हा सिनेमा.
<<याच टायटल साँग एका इंग्लिश
<<याच टायटल साँग एका इंग्लिश गाण्यावरून सही सही उचललयं. हू मेक्स माय हार्टबिट्स लाईक थंडर…>>
त्याचीच पुढे "बाजीगर मै बाजीगर!" अशी भ्रष्ट आवृत्ती निघाली.
11 chya adhiche lekh kuthe
11 chya adhiche lekh kuthe aahet ?
अतिशय छान लेख. आवडला.
अतिशय छान लेख. आवडला.
----
बाबांच्या कामदेवांनी दिलेली 'माहिती' देखील माहितीपूर्ण आहे.
त्याचीच पुढे "बाजीगर मै
त्याचीच पुढे "बाजीगर मै बाजीगर!" अशी भ्रष्ट आवृत्ती निघाली.>>
सत्ते पे सत्ता मधलं 'दिलबर मेरे' गाणं आहे त्यातली शेवटची ओळ 'के पलमे पिघल जाओगे' आणि 'बाजीगर ओ बाजीगर' याच्या चालीत कमालीचं साम्य आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोंग्रेसमां फुंकाव्या मांडो
कोंग्रेसमां फुंकाव्या मांडो आहे ते.
Mi lahaanpani ha movie
Mi lahaanpani ha movie paahila hota. 1 number torture vaatla hota
सरि, माझ्या प्रोफाईलमध्ये
सरि, माझ्या प्रोफाईलमधल्या 'लेखन' ह्या सेक्शनमध्ये आधीचे सगळे लेख मिळतील. प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!
इंटरेस्टिंग वाटतोय सिनेमा. पण
इंटरेस्टिंग वाटतोय सिनेमा. पण हा बघेन की नाही ते माहित नाही. राकु फारसा आवडत नाही![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पूर्वी गाड्यांना पॉवर
पूर्वी गाड्यांना पॉवर स्टीअरिंग्स नव्हते. साधे मॅन्युअल स्टीअरैंग आणि त्यातही जीपच्या स्टीअरिंगचा गीअरबॉक्स हेवी असे. त्यामुळे स्टीअरिंग व्हील फिरवायला जड जाऊ नये याकरिता स्टीअरिंग व्हीलचा व्यास मोठा असे आणि त्यात प्ले देखील भरपूर असायचा. शिवाय व्हील अलाइन्मेंट बॅलन्सिंग हेदेखील वेळच्या वेळी होत नसे. त्यामुळे गाडी रस्त्यावर सरळ ठेवणेदेखील फार प्रयत्नाने साध्य होत असे. त्याकरिता स्टीअरिंग व्हील थोडे थोडे सतत फिरवायला लागायचे. डोंगराळ भागात घाटांचे रस्ते आणि त्या रस्त्यांच्या प्रत्येक वळणावर असलेली कर्वेचर एंबँकमेंट यामुळे स्टीअरिंगनेमुळे चाकांची दिशा बदलण्याऐवजी कित्येकदा चाकांच्या धक्याने स्टीअरिंगच हलत असे. त्यामुळे जर ड्रायव्हर स्टीअरिंग व्हील उजवीकडे फिरवत असताना दिसत असला तरी प्रत्यक्षात तो डावीकडे झुकायला लागलेले स्टीअरिंग स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करीत असे.
इतका विचार रा कु ने कुठला
इतका विचार रा कु कुठला करायला.....................![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इतका विचार रा कु कुठला करायला
इतका विचार रा कु कुठला करायला >>>>>
लेखात लिहीलंय ना की राकु एवढं आडवं तिडवं स्टीअरिंग फिरवतो, त्यावर बिपीन चंद्रहर यांनी स्पष्टीकरण दिलंय.
बाबा कामदेव
बाबा कामदेव
छान माहिती दिलीत. आम्ही पण प्यार भुकता नहीं, भुक गया आसमान वगैरे म्हणायचो.
बिपीनचंद्रंनी देखिल चांगली माहिती पुरवली.
स्वप्ना
तू या चित्रपटावर लिहीलं हे पाहूनच हसलो. ते गाण्याच परीक्षण आठवलं. ते कुठे मिळेल?
तुम कमसिन हो ना, नादां हो... हे गाण कुठल्या चित्रपटातल. त्यात राकु१ आणि सायराच आहेत.
त्यातही कमसिन, नादां, नाजूक, भोली वगैरे सगळे हातवारे आहेत.