“पर्थी”ची वाट! भाग २ - मुरो कट्टा

Submitted by kulu on 14 August, 2018 - 02:37

भाग १ https://www.maayboli.com/node/67051

मार्कोचं जंगलातलं घर एकदम आरामशीर होतं, म्हणजे टुमटुमीत कि काय ते तसलं. दोन मजली अलिशान. त्यामुळे माझी चैनच! खालच्या मजल्यावर मी ठाण मांडले आणि त्याच्या म्युजिक रूम मध्ये माझ्या सतारीने. माझा मुळातला आळशी स्वभाव ओसंडून वाहू लागला. काम जास्त कसे करता येईल पेक्षाही ते टाळता कसे येईल याकडे जास्त कल असल्याने मी माझी येण्याची वेळ अतिशय चाणाक्ष पद्धतीने ठरवली होती, बरोब्बर सुट्टी सुरु व्हायच्या एक दिवस आधी आलो म्हणजे अ‍ॅडमिशन पुरता वेळ मिळेल पण काम करायला लागणार नाही असं! त्यामुळे १५ दिवसांच्या या सुट्टीत आम्हाला तिघाना भरपूर फिरायला मिळणार होते. पर्थ मध्ये अशी श्रद्धा आहे कि इथे आल्यावर पहिल्या आठवड्यात किंग्ज पार्क ला जाऊन पार्केश्वराला दहीभात दिला कि इथलं वास्तव्य सुखाचं होतं म्हणे. म्हणून आम्ही सुद्धा तेच करायचं ठरवलं.

१६ ची सुंदर सकाळ उजाडली भरपूर सूर्यप्रकाश घेऊन! पर्थ मधला सूर्यप्रकाश फार वेगळा वाटतो, म्हणजे एकदम नितळ. आपल्याकडे कधी जोरात पाऊस पडून झाल्यावर श्रावणात ऊन पडत तसं! शिवाय समुद्रकिनारी असूनही त्याला दमटपणाचं गालबोट लागलेलं नाही त्यामुळे अंग मोकळं मोकळं वाटतं! मार्कोच्या बमव मधून आम्ही किंग्ज पार्क ला गेलो तर तिथे पार्किंग खचाखच भरलेलं! “लोक म्हणजे काय विचित्र झाले आहेत हल्ली, सुट्टी आहे म्हणून लगेच पडले बाहेर फिरायला आणि सगळे येऊन किंग्ज पार्कलाच कडमडले, गप घरात बसायचं तर ते नाही; आले लगेच आमच्या मागे मागे, आता पार्किंग कसं मिळणार आम्हाला?” असा विचार करत असतानाच पार्किंग ला जागा मिळाली आणि सगळे लोक मला एकदम चांगले वाटू लागले.

मौंट एलिझा नावाच्या टेकडी वर किंग्ज पार्क वसलेला आहे. एक अतिशय योगायोगाची गोष्ट म्हणजे या जागेला अबोरीजनल भाषेत मुरोकट्टा म्हणतात, आणि त्याचा अर्थ म्हणजे मुरो लोकांच्या भेटण्याची जागा असा होतो. हा म्हणजे आपला मराठीतलाच कट्टा! हा मी मार्को ला पण अर्थ सांगितला आणि मार्कोला जे मोजून १३ मराठी शब्द येतात त्यातला हा एक! अबोरीजनल न्युंगार लोकांची श्रद्धा सगळी निसर्गपुजेशी निगडीत आहे, वीज, समुद्र, वारा, तळी, दगड सगळे देव. पण या सर्वांचा करविता देव म्हणजे इंद्रधनुरुपी नाग वौगल. तो स्वप्नात सगळ जग घडवितो. त्याने सरपटुन तयार झालेल्या स्वान आणि कॅनिंग या दोन नद्या मुरो कट्ट्या च्या पायथ्याशी जुळतात, त्यामुळे गेल्या तीस हजार पेक्षाही जास्त वर्षांपासून हि जागा म्हणजे अबोरिजनल लोकांसाठी पुण्य प्रयाग च ! तरीही अबोरीजनल बायका प्रयागावर कुठे सोळा सोमवार चे उद्यापन करताना किंवा सत्यवौगल घालताना दिसल्या नाहीत! न्युन्गार लोक इथे भेटायचे, शिकार करायचे, उत्सव साजरे करायचे! आणि मग १७०० च्या काळात युरोपियन्स आले. त्यांनी हा भाग मृगयेसाठी आणि लाकडासाठी वापरायला सुरु केला! जाराह नावाची फक्त ऑस्ट्रेलियाच्या याच भागात सापडणाऱ्या निलागिरीच्या लाकडाची दरवर्षी अन्दाजे ५ टन याप्रमाणे निर्यात केली जाऊ लागली अबोरिजनल लोकांच्या विरोधाला न जुमानता. शेवटी १८७१ मध्ये माल्कम फ्रेजर या अधिकाऱ्याच्या प्रयत्नाचे फळ म्हणून जवळ जवळ पावणे दोन चौरस किलोमीटर्स ची हि जागा पब्लिक रिझर्व म्हणून घोषित करण्यात आली. आणि नंतर १० ऑगस्ट १८९५ या साली माझ्या जन्मतारखेला या पार्क चे उद्घाटन झाले. (यात फक्त १० ऑगस्ट हि माझी जन्मतारीख आहे, मी काही एवढा जुना नाही आहे, अगदी अलीकडचा आहे).

20151220_114334.jpg

किंग्ज पार्क मध्ये आधी दिसते ते युद्धस्मारक, पहिल्या महायुद्धात जे ऑस्ट्रेलियन धारातीर्थी पडले त्यांच्या स्मरणार्थ. एक ओबेलीस्क च्या आकारातलं मोठ सेनोटाफ पूर्ण पर्थ वर नजर ठेवत उभे आहे. त्याच्या समोर आठवणी जाग्या राहाव्यात म्हणून एक पेटती मशाल. आणि ज्यावर सेनोटाफ उभी आहे त्याच्या बेस वर सैनिकांची नावे लिहिली आहेत.

20151220_114710.jpg

किंग्ज पार्क ज्या गोष्टीसाठी फेमस आहे ते म्हणजे इथले वनस्पती उद्यान! वेस्टर्न ऑस्ट्रेलियातल्या प्रत्येक भागातल्या वनस्पती इथे प्रेमाने जपलेल्या आहेत. आधी तिकडे जायचं ठरवल. सुरुवातीला दिसलं ते गिजा जुमुलू हे अजस्र बाओबाब झाड. पर्थ च्या उत्तरेला सवातीन हजार किलोमीटर वर किंबर्ले मधल्या वार्मून या गावी हायवे चं बांधकाम सुरु असताना तिथे हे साडेसातशे वर्षे जुनं झाड उभे होते. तिथले अबोरीजनल गिजा लोकांशी बोलणी करून ते झाड तिथून आणून किंग्ज पार्क मध्ये रीप्लांट करण्यात आले. तिथल्या गीजू लोकांनी याला समारंभपूर्वक निरोप दिला. त्यांच्या घरचा माणूस लांब चालला होता; पण सात दिवसाच्या प्रवासानंतर गिजा इथे आला तेव्हा इथल्या न्युनगार लोकांनी त्याचा तितक्यात आदराने आणि समारंभपूर्वक स्वीकार केला आणि आपल्या घरात जागा दिली. त्या झाडाच्या रिप्लन्टेशन च्या वेळी तीन हजार लोक आले होते बघायला! ३००० लोक पर्थ मध्ये म्हणजे चिक्कार गर्दी! समोर आता ते अजस्र झाड दिसत होते. आता पाने नव्हती पण डिसेंबरएंड ला हा बाओब फुलायला लागतो जानेवारीपर्यंत पांढर्‍या फुलांनी बहरून जातो, अंगा-खांद्यावर अनेक पक्ष्यांना खेळवतो आणि जून च्या दरम्यान इकडचा हिवाळा सुरु झाला कि पाने झाडून पुन्हा निष्काम कर्मयोग्यासारखा तटस्थ उभा राहतो!

तो बघ सूर्य आणि हा बघ बाओबाब!
20151220_125621.jpg

त्यानंतर नंबर आला तो फक्त आणि फक्त ऑस्ट्रेलियात असणाऱ्या या ग्रास ट्री चा! गवताचे झाड या शिवाय त्याला योग्य नाव नाहीच! इतक एक्झोटिक झाड मी कधीही आधी कुठे बघितलं नव्हत! आता येऊन तीन वर्षे झाले तरी प्रचंड कौतुक वाटत या ग्रास ट्रीज च!
Webp.net-compress-image.jpg

या नंतर दुसर म्हणजे ट्री फर्न्स! खरतर हि आपल्याकडे पण जंगलात असतात पण तरी फर्न्स ला बघितल कि उगाच प्री-हिस्टोरिक काळात आल्यासारख वाटत! अगदी आता मागून टी-रेक्स आलाच!

20151220_122052.jpg

कोरफड तर सगळीकडेच आहे पण एवढी झाडासारखी वाढलेली कुठे बघितली नाही मी!

20151220_125955_0.jpg

आणि मला लांबून अननसाचं झाड दिसलं! मला भयंकर आनंद झाला! आयुष्यात पहिल्यांदा अननसाचं झाड बघणार. म्हणजे घरी आहे माझ्या पण ते गेली अनेक वर्षें इंचभर सुद्धा वाढलेलं नाही, महाखडूस आहे. त्यामुळे अननसाने लगडलेले झाड बघायला मिळणार म्हणून मी धावत गेलो (म्हणजे जोरात चालत, उगाच धावणे वगैरे चार चौघात माझ्या आकाराला शोभून दिसणारे नाही!) तर अननस वेगळाच दिसायला लागला अननसाची पेरं एवढी हिरवी आणि मोठी कशी हे कळेना! म्हटल असेल बुवा ऑस्ट्रेलियातला एक्झोटिक अननस. खाली नाव बघितल्यावर लक्ष्यात आलं कि तो अननस नव्हेच तर पाण्डानस नावाचा त्याच्यासारखा दिसणारा दुसराच फळोबा!

20151220_125902.jpg20151220_125912.jpg

आता आले बन्क्सिआ नावाचे फक्त इथे आढळणारे झुडूप! याला कणसासारखी सुंदर फुले येतात, मधाने भरपूर! पांढरट पाने आणि पिवळट तपकिरी फुले! पाईन कोन प्रमाणे याच्या कोनवर देखील कारागिरी करता येते! सध्या मात्र डायबॅक नावाच्या बुरशीमुळे होणार्‍या रोगामुळे एकेकाळी इथे सगळीकडे कॉमन असणारी ही झुडुपे आता धोक्यात आली आहेत!

20151220_125328.jpg20151220_125348.jpg

हे सोडूनही तिथे अजून बरीच फुलझाडे होती!

20151220_121756.jpg20151220_124211.jpg20151220_124319.jpg20151220_124947.jpg20151220_130955.jpg

तिथे असलेला हा विशालकाय!

20151220_114714.jpg

वसंताची नवी पालवी ल्यालेल्या फांद्या!

20151220_115814.jpg

किंग्ज पार्क च्या माथ्यावरून पार्थ चा दिसणारा हा नजारा! या फोटोत ज्या त्या १०-१२ मोठ्या बिल्डिंग्ज सोडल्या तर पूर्ण पर्थ मध्ये असे स्काय स्क्रापर्स नाहीतच! आख्खं पर्थ असंच सपाट पसरलेलं! The most isolated city in the World! The most isolated असेल म्हणून मोस्ट निवांत पण! उगीचच कुठेतरी जाण्याची आव आणुन केलेली घाई गडबड इथे मला कधीच बघायला मिळालेली नाही आजवर! निळाई आंदण म्हणून मिळालेला ऑस्ट्रेलियातला भाग आहे हा! इथे जेव्हढं दिसतोय किंबहुना त्याहूनही निळं मोकळं आकाश मी इथे जवळजवळ रोजच बघत आलोय!

20151220_114959.jpg

तापमान त्यादिवशी ३९ होत तरीही अंगावर घामाचा ठीपूस आलेला नव्हता! पर्थ च्या कोरड्या उष्णतेनं पहिल्याच दिवशी मन जिंकून घेतलं! रात्री पाव्लोवा हे ऑस्ट्रेलियन डीझर्ट खात "कासल" हा अतिशय ऑस्ट्रेलियन मुव्ही बघितला.

20151216_190233.jpg

आणि गुडूप झोपी गेलो कारण उद्या पहाटे उठुन लेक क्लिफ्टन ला जायचं होतं!

“पर्थी”ची वाट! भाग ३ – क्विनाना, लेक क्लिफ्टन, वार्नब्रो https://www.maayboli.com/node/67226

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहाहा कसलं गोड वर्णन.. वाचून झाल्यावर मस्त वाटत राहतं बराच वेळ
ग्रासट्री किती क्यूट दिसतीये.. हेअरकट हे आपलं.. ग्रासकट तर एकदम कोरियन ढाच्याचा Happy

मस्त वर्णन !!! आणि शेवटच्या फोटोमध्ये जे काही आहे ते अगदी झकास दिसतंय ....

म्हणजे टुमटुमीत कि काय ते तसलं. >>> टुमदार

आमचीही पर्थीची वाट सुरू करून दिलीस रे बाबा या निमित्ताने... मस्त वर्णन केलंयस... पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत...

लिखाण आवडले,
आकाशाची नितळ निळाई ही मस्तच!

प्रतिसादाबद्दल सर्वांचे खूप खूप आभार!

ग्रासकट तर एकदम कोरियन ढाच्याचा >>>> वर्षु Biggrin

शेवटच्या फोटोमध्ये जे काही आहे ते अगदी झकास दिसतंय ....>>>> हो ते चवीलाही झक्कास असतं खरंच! पावलोव्हा म्हणतात. स्ट्रॉबेरी पेक्षाही आपला हापूस वापरून केलं तर अजून भारी लागतं.

मीसुध्दा फिरले बघ तुझ्याबरोबर>>>> तोच हेतू होता अंजु! तुझा प्रतिसाद वाचून भारी वाटलं त्यामुळे!

सायो धन्यवाद!
अतिशय ऑस्ट्रेलियन मुव्ही >>> ????>>>> काका, त्या मुव्ही मध्ये एक ऑस्ट्रेलियन कन्ट्रीसाईड मधला माणूस आपलं घर वाचविण्यासाठी लढतो. विमानतळ विस्तारीकरणासाठी जी जमीन घेण्यात येते त्या जागेवर त्याचं घर असत. तर तो अख्ख्या लॉबी शी लढून स्वतःच घर वाचवण्यात यशस्वी होतो. ऑस्ट्रेलियन मेड मुव्ही आहे. सगळी ऑसी स्लँग आहे त्यात. खूप विनोदी!

छान लेख. इतक्या वेळा किंग्ज पार्कला जाऊनही बर्‍याचशा गोष्टी माहिती नव्हत्या त्या कळाल्या. नव्याने पर्थची सफर करायला मिळते आहे तुमच्या लेखातुन. लिहीत रहा. पावलोव्हा कुठल्या रेस्टॉरंटमधे खाल्लात मग?

कुलु मस्त रे
आणि बिलेटेड हॅपी बर्थ डे: Happy
बाओबाब बघताना तत्वमसी आठवलं मला

पावलोव्हा कुठल्या रेस्टॉरंटमधे खाल्लात मग?>>>> रेस्टॉरंट मध्ये नाही घरीच बेक केला होता एकदम इझी आहे!

आणि बिलेटेड हॅपी बर्थ डे:>>>> थँक यु व्हेरि मच अवल Happy

मस्त मस्त चालुय! खरोखर निवान्त वाटतय पर्थ!
झाडे भारीच.. गवताचे झाड आणि फर्न फारच आवडले. Happy

शकुन, वावे धन्यवाद Happy

ग्रास ट्रीचा फोटो बघून मला अस्वल आठवलं >>>> वावे तुम्ही सांगितल्यावर आता मला पण त्यात अस्वल दिसत आहे!

Back to top