एखादी शोभिवंत सागवानी वस्तु किंवा हस्तीदंत ज्याप्रमाणे काळ जावा तसे जास्त शोभिवंत होत जावे, जास्त दुर्मिळ वाटावे तसे रफीसाहेबांच्या आवाजाचे झाले आहे. आज या सुरांच्या बादशहाला जाऊन तब्बल अडतीस वर्षे झाली. पण जसजसे त्याची गाणी ऐकत जावे नवनवे काहीतरी गवसत जाते. एखादी नवीनच जागा मनाला भिडते. या आवाजाची गोडी काळागणिक वाढतच चालली आहे. आज रफीला अभिवादन करताना त्याने गायिलेली प्रेयसीची आठवण करणारी काही गाणी निवडली आहेत. आमच्या काव्यशास्त्रात प्रतिभावंतानी विरहात देखिल शृंगार पाहिला आहे. कालिदासाच्या यक्षाला तर मेघ अचेतन आहे याचेदेखिल भान राहिले नाही इतका तो या विप्रलम्भ म्हणवल्या जाणार्या शृंगाराच्या भावनेने भरून गेला होता. जुन्या हिन्दी चित्रपटात जेव्हा अशी परिस्थिती असते आणि कमाल अमरोही,गुलजार, मजरूह सुलतानपुरी, हसरत जयपुरी यांच्यासारखी नामी मंडळी गीत लिहितात तेव्हा त्याचे सोने होणार हे ठरलेले असतेच. त्यातून जेव्हा कसलेली मंडळी संगीत देतात आणि त्यात रफीचा स्वर प्राण भरतो तेव्हा त्याच सोन्याला स्वर्गीय सुगंधच प्राप्त झाल्यासारखे होते. मूळात मी निवडलेल्या गण्यांना दु:खाची किनार नाही. प्रेयसी दूर आहे. तिची आठवण येते आहे. आणि काही सुचत नाही. रफीसाहेबांचा आवाज अशावेळी कॅलिडोस्कोपप्रमाणे भावनांच्या छटा बदलत जातो. सर्वप्रथम मखमली स्वर म्हणजे काय याचा प्रत्यय देणारे "शंकर हुसेन" चित्रपटातील "कहीं एक मासूम नाजुक सी लडकी" हे गाणे मी निवडले आहे.
जुबांसे कभी उफ निकलती तो होगी, बदन धीमे धीमे सुलगता तो होगा,कहीं के कहीं पाओ पडते तो होंगे जमीं पर दुपट्टा लटकता तो होगा,कभी सुबहा को शाम कहती तो होगी, कभी रात को दिन बताती तो होगी...अशासारखे कमाल अमरोहींचे शब्द आणि खय्यामची सिग्नेचर धून म्हणता येईल अशी संथ चाल. अशा चाली खय्यामच बांधु जाणे. त्यात रफीने लावलेला प्रियकराचा हळवा स्वर. आवाज तर रेशमाच्या लड्या उलगडल्यासारखा मृदु मुलायम लागला आहे. आपल्या विरहात प्रेयसी काय करीत असेल याचे चित्र रंगवणारे हे गाणे ऐकताना प्रियकराची अवस्थाही अवघड झालेली आहे हे कंवलजीतसारख्या अतिशय गुणी कलावंताने गाण्यात दाखवून दिले आहे. सिनेमात फारसा न स्विकारलेला हा कलावंत पुढे बुनियादसारख्या मालिकेत चमकला. पण मला वाटते माणसाचे भाग्य असावे तर असे. रफीच्या निवडक गाण्यांची यादी करायला सांगितली तर अनेक रसिक या गाण्याला आपल्या यादीत स्थान देतील अशी माझी समजूत आहे. आणि जर ते गाणे कुणी पाहिल तर कंवलजीतही लोकांच्या लक्षात राहिल. यानंतरचं गाणं आहे तरण्याबांड हँडसम फिरोज खानचे. हॉलिवूडमध्ये असता तर गडी वेस्टर्नपटात चमकला असता. "उंचे लोग" चित्रपटात खानसाहेब रफिचे "जाग दिले दिवाना" सारखे नितांत सुंदर गाणे गावून गेले आहेत.
दो दिलके कुछ लेके पयाम आयी है, चाहत के कुछ लेके सलाम आयी है,दरपे तेरे सुबहा खडी हुई है दिदारकी, जाग दिले दिवाना रुत जागी वस्ले यार की...मजरूह सुलतानपुरीचे हे गीत आणि त्यातील प्रेयसीच्या गोड आठवणी जागवणारे शब्द.फिरोजखान तर गाण्याचा स्वतःच आनंद घेतल्यासारखा हे गाणे म्हणताना पडद्यावर दिलखुलास वावरताना दिसतो. संगीतकार चित्रगुप्तने मोजक्याच हिन्दी चित्रपटांना संगीत दिलं आहे. पण त्याची गाणी अगदी अस्सल बावनकशी आहेत. त्यातलंच हे एक. रफीसाहेबांचे सुरुवातीचे गुणगुणणे अगदी आवर्जून ऐकण्याजोगे. प्रेयसीची आठवण करताना आपोआपच स्वप्नाळू होत गेलेला स्वर लागला आहे. प्रिय माणसाच्या तरल आठवणींमध्ये रमताना स्वरसुद्धा तसाच ठेवणे, गीतामधील काही शब्द वेगळ्या प्रकारे उच्चारून त्यातून विलक्षण परिणाम साधणे हे रफीसाहेबांच्या गाण्यात पहावे. या गाण्यात देखील "जाग दिले दिवाना" म्हणताना त्यांनी काही ठिकाणी ही किमया केली आहे. प्रेयसीशी हलक्या आवाजात कानगोष्टी कराव्यात, कुजबुजावे अशा तर्हेने काही वेळा रफी "जाग दिले दिवाना" म्हणतो ते मस्त वाटते. हे गाणे देखील रफीप्रेमी आपल्या यादीत नक्की घेतील असे वाटते. पुढचे गाणे पाहताना आपले जानीसाहेब पडद्यावर दिसतात. मात्र ते गाणे म्हणत नाहीत. जुना देखणा राजबिंडा राजकुमार आणि "लाल पत्थर" मधील "उनके खयाल आये तो आते चले गये" हे ते गाणे.
गाण्याच्या सुरुवातीला राजकुमार स्वतः तबला वाजवताना दाखवला आहे. अमिर उमराव माणुस आणि त्यात कलावंत रसिक. अशावेळी हेमा मालिनीसारखी अप्सरा जर मनात भरली असेल तर तो " होशो हवास पे मेरे बिजलीसी गिर पडी, मस्ती भरी नजरसे पिलाते चले गये" असे म्हणेल त्यात नवल ते काय? हसरत जयपुरींच्या शब्दांना शास्त्रीय संगीताचा बाज चढवला आहे शंकर जयकिशन यांनी. या गाण्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे खुद्द रफिचा जो आदर्श होता त्या जी एम दुर्राणीने हे गाणे रफीच्या आवाजात पडद्यावर पेश केले आहे. रफीची शास्त्रीय गाण्यातली सहजता येथे दिसून येते. यात ताना, आलापी नाहीत मात्र रफीने " उनके खयाल आये तो आते चले गये" या ओळीतल्या निरनिराळ्या शब्दांवर केलेले चमत्कार मात्र आहेत. पुन्हा खास शब्दांवर रफीसाहेब विशेष ठसा उमटवतात तो आहेच. राजकुमारला मद्याच्या प्याल्यामध्ये हेमामालिनी दिसते आणि त्यावेळी "मस्ती भरी नजरसे पिलाते चले गये" मध्ये "पिलाते" वर रफीसाहेब किंचितकाल रेंगाळून मदहोशी किती परिणामकारकरित्या दाखवतात ते खास ऐकण्याजोगे.
शेवटचे गाणे बहुतेकांना माहित असलेले आहे. १९७१ सालच्या "सिमा" चित्रपटातले "जब भी ये दिल उदास होता है". त्यावेळचा दाढी नसलेला मर्दानी कबीर बेदी आणि सीमी गरेवालसारखी रती. अस्सल रती मदनाचा जोडा म्हणता येईल.गुलजारच्या नेहेमीप्रमाणेच आकर्षित करणार्या आणि विचार करायला लावणार्या शब्दांना साज चढवला आहे पुन्हा शंकर जयकिशन यांनीच. हे गाणं मला चिमटीत न गवसणारं वाटतं. मी अनेकदा त्याबद्दल विचार केला आहे. रफीच्या आवाजाचा जोरकसपणा प्रामुख्याने यात दिसून येतो. रफीचा येथे लागलेला पहाडी आवाज आणि पार्श्वभूमिपण पहाडीच. त्यात पहाडासारखा बलदंड कबीर बेदी. पडद्यावर गाणे कुणीच गात नाही. कधी कधी असं वाटतं पुराणातल्या आकाशवाणीचा आवाजदेखिल असाच धीरगंभीर असेल. त्यासाठी तर रफीसाहेबांनी हा खास आवाज लावलेला नसेल? प्रेयसीचे विचार मनात येताहेत. पण ते गंभीर माणसाच्या मनात. कुणी चॉकलेट हिरो नाही तेथे. अशावेळी निसर्गाच्या सानिध्यात पर्वतराजींमध्ये जेव्हा हा तालवृक्षासारखा उंच माणुस हात मागे बांधून फिरतो तेव्हा त्याचे विचार व्यक्त करायला असाच आवाज हवा जो येथे रफीचा आहे.
आज अडतीस वर्षानंतर जाणवतं आहे कि माझे रफी व्यसन वाढतच चालले आहे. व्यसनमुक्तीवर लिहिणारा मी, हे व्यसन मात्र कधीही सुटणार नाही याची मला खात्री आहे. लेखाचे नाव " फिर तुम्हारी याद आयी ऐ सनम" या "रुस्तम सोहराब" मधील गाण्यातून घेतले आहे. सज्जद हुसेन नावाच्या अवलियाने संगीत दिलेले हे गाणे. यातही प्रेमनाथला आपली प्रियाच आठवत असते आणि तो अल्ला कसम घेऊन म्हणतो "हम न भूलेंगे तुम्हे". कधी कधी वाटतं आमच्या सारख्या रफीच्या चाहत्यांनीदेखील याच सुरात आळवणी करावी, म्हणावं देवाशप्पथ रफीसाहेब आम्हीही तुम्हाला विसरणार नाही. हम न भूलेंगे तुम्हे अल्ला कसम. पण मग जाणवतं हे म्हणण्याची गरज नाही. फिर तुम्हारी याद आयी म्हणण्यासाठी मूळात आम्ही रफीसाहेबांना कधी विसरलोच नाही हेच खरे.
अतुल ठाकुर
वाह! अतिशय सुंदर आणि आवडत्या
वाह! अतिशय सुंदर आणि आवडत्या गाण्यांची आठवण करून दिलीत! सुरेख समयोचित लेख!
धन्यवाद जिज्ञासा
धन्यवाद जिज्ञासा
कधी कधी वाटतं आमच्या सारख्या
कधी कधी वाटतं आमच्या सारख्या रफीच्या चाहत्यांनीदेखील याच सुरात आळवणी करावी, म्हणावं देवाशप्पथ रफीसाहेब आम्हीही तुम्हाला विसरणार नाही. हम न भूलेंगे तुम्हे अल्ला कसम. पण मग जाणवतं हे म्हणण्याची गरज नाही. फिर तुम्हारी याद आयी म्हणण्यासाठी मूळात आम्ही रफीसाहेबांना कधी विसरलोच नाही हेच खरे. >>>>> +११११११११
अप्रतिम रीतीने तुम्ही रफी साहेबांबद्दल चे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी व्यक्त करता. यासाठी तुमचे विशेष आभार. लिहीत रहा, आम्ही वाचत राहू.
फार कळायचे वय नव्हते. पण इतके
फार कळायचे वय नव्हते. पण इतके आठवते कि मी आजोळी होतो. आणि हातात त्या दिवशीचा सकाळी नुकताच आलेला पेपर धरून मामा माझ्या आईला म्हणाले "रफी गेले" तेव्हा आईचे उद्गार अजून आठवतात. उदासवाण्या स्वरात ती म्हणाली, "एकेक चांगली माणसे चालली आहेत". ऐंशीच्या आधी शैलेंद्र, जयकिशन, मुकेश आणि मराठीमध्ये गदिमा म्हणजे एकापेक्षा एक दिग्गज कलाकार कायमचे सोडून गेले.
"नफरत कि दुनिया को छोडके" या गाण्याची सुरवात जसे राफिसाहेबानी गायले आहे ते कुणाला कुणालाच शक्य नाही. अगदी आजच्या दिग्गज गायकांनासुद्धा (त्यांच्या विषयी मनात सन्मान आहेच तरीही) असे गाता येणे शक्य नाही. राफिसाहेबांचा आवाज काळीज हलवून सोडतो.
>> आज अडतीस वर्षानंतर जाणवतं आहे कि माझे रफी व्यसन वाढतच चालले आहे
+१११...
वा अतुल.. मस्त आठवण..
वा अतुल.. मस्त समयोचित आठवण..
माझे बाबा अजूनही रफी म्हणजे रफी म्हणत तासनतास रफीची गाणी ऐकत बसतात.
मला 'जला दो ईसे फूंक डालो ये दुनिया' म्हणत तार स्वरात शब्दातून डागण्या देणारा रफी सर्वात जास्तं आवडतो... गीतकारांनी आणि दिग्दर्शकांनी त्या रफीला अजून समोर आणायला हवे होते असे खूप वाटते. तुम्हाला रफीची अशी गाणी माहित असल्यास एक-दोन द्या ईथे नक्की.
मन तरपत है मधला शेवटचा मिनिटभराचा तुकडा 'मोहे दर्शन भिक्षा दे दो' मी दिवसभर ऐकू शकेन.
छान लेख। रफी कलावंत आणि माणूस
छान लेख। रफी कलावंत आणि माणूस म्हणून सुद्धा खूप मोठे होते। एक एक गाणं म्हणजे एक एक रत्न आहे। किती म्हणून यादी करणार? मन शांत करणारा आवाज। hats off Rafi ji।
तुम मुझे युं भूल ना पाओगे। जब
तुम मुझे युं भूल ना पाओगे। जब कभीभी सुनोगे गीत मेरे संग संग तुम भी गुनगुनाओगे।
धन्यवाद. काही गाणी माहिती
धन्यवाद. काही गाणी माहिती नाहीत. शोधुन ऐकणार.
मला ‘आज मौसम बेईमान है बडा‘ प्रचंड आवडते. रफीने फारच जीव तोडून रोम्यान्टिक म्हटले आहे धर्मेंद्रसाठी. युट्युबवर आत्ता लगेच लावले आणि आता रफीने गायलेले सगळे मोती युट्युब आपोआप लावत बसलंय.
रफी, किशोर... आठवण आली तरी कळ येते. काही गरजच नव्हती त्यांना इतक्या लवकर जायची.
>>मला 'जला दो ईसे फूंक डालो
>>मला 'जला दो ईसे फूंक डालो ये दुनिया' म्हणत तार स्वरात शब्दातून डागण्या देणारा रफी सर्वात जास्तं आवडतो... गीतकारांनी आणि दिग्दर्शकांनी त्या रफीला अजून समोर आणायला हवे होते असे खूप वाटते. तुम्हाला रफीची अशी गाणी माहित असल्यास एक-दोन द्या ईथे नक्की.
टूटे हुए ख्वाबो ने
ओ दुनिया के रखवाले
>> तार स्वरात शब्दातून
>> तार स्वरात शब्दातून डागण्या देणारा रफी सर्वात जास्तं आवडतो
खरं आहे. त्यांनी गायलेले काही काही आलाप/प्रील्युड याबाबत केवळ अप्रतिम आहेत. हृदयाला हात घालणारा सूर काय असतो ते इथे कळते. हे केवळ रफीच गाऊ शकतात...
१. जानेवाले कभी नाही आते जानेवालोंकी याद आती है
२. दिल शाद था के फूल खिलेंगे बहार
३. तुझको पुकारे मेरा प्यार
४. शबाब पें मै जरासी शराब फेकुंगा
श्री ४२० मधील रमैया वस्तावैया गाण्यातील सुरवातीचा पंधरा वीस सेकंदांचा रफींच्या आवाजातला प्रील्युड तर केवळ स्वर्गीय आवाज
रफी साहेब म्हणजे मखमली
रफी साहेब म्हणजे मखमली आवाजाची जादु!
<<<सिमी गरेवाल सारखी रती>> ही कल्पना मात्र करवत नाही!
सर्वांचे खुप खुप आभार
सर्वांचे खुप खुप आभार
मला 'जला दो ईसे फूंक डालो ये दुनिया' म्हणत तार स्वरात शब्दातून डागण्या देणारा रफी सर्वात जास्तं आवडतो... गीतकारांनी आणि दिग्दर्शकांनी त्या रफीला अजून समोर आणायला हवे होते असे खूप वाटते. तुम्हाला रफीची अशी गाणी माहित असल्यास एक-दोन द्या ईथे नक्की.
एक लगेचच आठवलंय. शोला और शबनम मधलं धर्मेंद्रच्या तोंडी असलेलं बहुधा खय्यामचं " जाने क्या ढुंढती रहती है ये आंखे मुझमें". सुरुवातीला संथ असलेलं हे गाणं शेवटच्या कडव्यात वेग पकडतं. "आरजू जूर्म वफा जूर्म तमन्ना है गुनाह" म्हणत रफी इतक्या टिपेला जातो की नुसतं ऐकताना देखील दम लागल्यासारखे होते.
लिहीत रहा, आम्ही वाचत राहू.
असुफ तुमचा प्रतिसाद येणार हे ठावूक होतं. खुप धन्यवाद
मला 'जला दो ईसे फूंक डालो ये
मला 'जला दो ईसे फूंक डालो ये दुनिया' म्हणत तार स्वरात शब्दातून डागण्या देणारा रफी सर्वात जास्तं आवडतो... गीतकारांनी आणि दिग्दर्शकांनी त्या रफीला अजून समोर आणायला हवे होते असे खूप वाटते. तुम्हाला रफीची अशी गाणी माहित असल्यास एक-दोन द्या ईथे नक्की>>
मुहब्बत जिंदा रहती है, मुहब्बत मर नही सकती - चित्रपट चंगीज खान
जिंदाबाद जिंदाबाद ए मोहब्बत जिंदाबाद - चित्रपत मुघले आझम
दोन्ही गाण्यात शेवटच्या कडव्यात रफीचा आवाज एकदम टिपेला लागला आहे.
रमय्या वस्तावय्या ह्या
रमय्या वस्तावय्या ह्या गाण्यात शेवटी (सुरवातीला नव्हे) महंमद रफीसाहेब जी तान गातात ती क्षणभर पण प्रचंड तेजाने तळपणार्या विजेची आठवण करुन देते!
फिर तुम्हारी याद आयी ए सनम हे गाणेही मला प्रचंड आवडते. सज्जाद हुसेनने कमाल केली आहे.
अजून एक लक्षात राहणारे गाणे मदन मोहनचे तुम जो मिल गये हो. पावसाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत वेगवान चाल आणि अर्थातच महंमद रफी!
ज्या नटाकरता आपण गातो आहे त्याप्रमाणे आवाजात एक अचूक बदल करून ते गाणे गायचे हे एक वैशिष्ट्य. शम्मी कपूरला सुपरस्टार पदी पोचवण्यात रफी साहेबांचाही वाटा आहेच.
अत्यंत दैवी सुरेल आवाजाचा हा प्रतिभावान गायक ४० वर्षे हिंदी सिनेमात गात होता हे आपले भाग्य! हिंदी चित्रपट संगीताचे सुवर्णयुग अशा थोर लोकांमुळेच घडले. अर्थात इतकी वर्षे गात असूनही तो फार लवकर आपल्याला सोडून गेला असेच वाटते. नंतर महंमद रफीची भयाण नक्कल करणारे काही गायक ऐकले की हे फार जाणवते!
रमय्या वस्तावय्या ह्या
रमय्या वस्तावय्या ह्या गाण्यात शेवटी (सुरवातीला नव्हे) महंमद रफीसाहेब जी तान गातात ती क्षणभर पण प्रचंड तेजाने तळपणार्या विजेची आठवण करुन देते!
अगदी खरं आहे.
आणखी एक गाणं आठवलं,
आणखी एक गाणं आठवलं,
चाचाचा मधलं इकबाल कुरेशीचं " सुबहा न आयी शाम न आयी". शेवटी "जैसे भी हो तुम आ जाओ " सुरु झालं की रफीचं गारुड आणखीनच गडद व्हायला लागतं.
रफी म्हणजे स्वर्गीय आवाज!
रफी म्हणजे स्वर्गीय आवाज! हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळातलं अमुल्य रत्न. त्या काळच्या गायकांमधे मला जाणवणारा एक विशेष गुण म्हणजे प्रत्येकाचा वेगळेपणा. रफी, किशोर, मन्नाडे, हेमंतकुमार, मुकेश - सगळ्यांनी आपआपला वेगळेपणा जपला -किंवा त्यांना तशी गाणी मिळाले असं म्हणू.
रफी केवळ आवाजातून त्या गीताची भावना कशी पोहोचवायचा ह्याला मला आलेला पहिला अनुजे: लहानपणी एकदा रेडिओवर बेगाना चित्रपटातलं, 'फिर वह भुली सी याद आयी है' गाणं लागलं होतं. त्यातल्या पहिल्या कडव्यात 'बात इतनी सी है कहानी में, हम भी मारे गये जवानी मे' नंतर 'आग सीने मे खुद लगायी है' ही ओळ ऐका. त्या 'खुद' वर रफी ने जी जागा घेतलीये ती ऐकताना आपल्यालाही काहीतरी कोंडून आल्याचा फील येतो. सुबहानल्ला! त्या एका जागेसाठी ते गाणं मी अनेकवेळा ऐकलय.
धन्यवाद धन्यवाद... अतुल
धन्यवाद धन्यवाद... अतुल (ठाकुर + पाटील), प्रविण आणि चीकू. सगळी गाणी शोधून ऐकणार...
अँग्री यंग मॅन बच्चनच्या सगळ्या फाईट एकीकडे आणि 'जला दो ईसे फूंक डालो' म्हणणारा गुरूदत्त एकीकडे असे माझे एक काका म्हणत. मला ते काही तेव्हा पटत नसे पण आता...
मस्त लिहिलं आहे शेंडेनक्षत्र आणि फेरफटका..एकदम सहमत.
>>धन्यवाद धन्यवाद... अतुल
>>धन्यवाद धन्यवाद... अतुल (ठाकुर + पाटील), प्रविण आणि चीकू. सगळी गाणी शोधून ऐकणार...<< +१
मी सुद्धा काल हि सगळी गाणी आय्ट्युन्स मध्ये आहेत याची खात्री केली आणि पुनःप्रत्ययाचा आनंद मिळवला...
अँग्री यंग मॅन बच्चनच्या
अँग्री यंग मॅन बच्चनच्या सगळ्या फाईट एकीकडे आणि 'जला दो ईसे फूंक डालो' म्हणणारा गुरूदत्त एकीकडे असे माझे एक काका म्हणत. मला ते काही तेव्हा पटत नसे पण आता...
मस्तच.
क्या बात है
>> 'आग सीने मे खुद लगायी है'
>> 'आग सीने मे खुद लगायी है' ही ओळ ऐका. त्या 'खुद' वर रफी ने जी जागा घेतलीये...
वाऽऽऽ... क्या बात! पहिल्यांदाच ऐकलं हे... सुंदर.
अजुन हा एक प्रील्युड मी कसा काय विसरू शकेन? यात आवाजातले जे ताजेपण आणि नजाकत उतरली आहे त्यामुळे हे माझं लव्ह अॅट फर्स्ट हियरिंग
पहिल्यांदा ऐकून आज इतकी वर्षे झाली तरी अजूनही ऐकून मन भरत नाही....
अपने रुख पर निगाह करने दो
वा अतुलजी मस्त गाणं.
वा अतुलजी मस्त गाणं. जितेंद्रने पडद्यावर गायलंय पण झोकात
रफीबद्दलच्या मतांशी सहमत, पण
रफीबद्दलच्या मतांशी सहमत, पण यातील (मूळ लेखातील) ऑल्मोस्ट सगळी गाणी ही नावडती आहेत
फिर तुम्हारी याद आयी एक दोन वेळा ऐकले असेल - ते आवडत नाही असे नाही पण तितके ऐकलेच नाही कधी 
आणखी एक गाणं आठवलं..कसं
आणखी एक गाणं आठवलं..कसं विसरलो कोण जाणे.
"ऊडन खटोला" मधलं "ओ दूरके मुसाफिर हमको भी साथ ले ले"
मेरे हुजुर मध्येच अजून दोन
मेरे हुजुर मध्येच अजून दोन गाणी आहेत. अप्रतिम आलाप आणि तार सुरातली तान
१. क्या क्या न सहे हमने सितम वाह! काय रुबाब आहे. इतके सुंदर आलाप गाऊन अशा शब्दात जर कोणाला प्रपोज केले तर नकार येण्याची शक्यता तरी आहे का?
रोमॅंटीक गाण्यासाठी याहून सुंदर आलाप आणि सुरवात अजून कुठे असेल काय? 
२. गम उठाने के लिये... दु:खाची दग्धता पराकोटीची आहे. ती आयुष्यभर पुरून उरेल इतकी आहे. ती व्यक्त करण्यासाठी सूर अपुरे पडत आहेत.... इतक्या वरच्या पट्टीत गाणारे रफीसाहेब आणि केवळ त्यांच्या आवाजासाठीच अशा रचना बनवणारे शंकर-जयकिशन या दोघानाही सलाम!
वाचनात आलेली एक गोष्ट: रफी गेले तेंव्हा त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जी गर्दी जमली होती तितकी हिंदी चित्रपटसृष्टीतील अन्य कोणत्याही कलाकाराच्या अंत्यसंस्कारासाठी जमली नव्हती. हे रेकॉर्ड अगदी परवा परवा पर्यंत म्हणजे बॉलीवूड मधली पहिली सुपरस्टार श्रीदेवीच्या अंत्यसंस्कारापर्यंत कायम होते.
मस्त गाणी सुचवलीत अतुलजी
मस्त गाणी सुचवलीत अतुलजी
शंकर जयकिशनकडे गाणारा रफी वेगळाच वाटतो. "मेरे हुजूर" साठी जेव्हा "अपने रुखपर निगाह करने दो" सुरु होतं तेव्हा रफीची जादू म्हणजे काय ते कळायला लागतं.
त्याच धर्तीवर हताश भावना दाखवावी ती ही रफीनेच. प्यासा त "तंग आ चुके है कशमकशे जिंदगीसे हम" म्हटल्यावर समोरून एक उंट म्हणतो " ये क्या बेदिली का राग लगा रक्खा है" तेव्हा तात्काळ " देंगे वोही जो पायेंगे इस जिंदगीसे हम" असे उत्तर जाते. येथे गुरुदत्त आणी रफीशिवाय कुणाची कल्पना करवत नाही.
सुबह न आयी शाम न आयी
सुबह न आयी शाम न आयी लिहिलेला कलंदर म्हणजे नीरज जी.... काय कोंबो आहे!!!!!
धन्यवाद अतुलजी
धन्यवाद अतुलजी
>> देंगे वोही जो पायेंगे इस जिंदगीसे हम
हे माहित नव्हते. शेअर केल्याबद्द्ल धन्यवाद
क्या बात !
पुन्हा पुन्हा वाचण्यासारखे.
पुन्हा पुन्हा वाचण्यासारखे. म्हणून वर आणत आहे.
Honestly this is becoming a
Honestly this is becoming a bit much. I am a Rafi fan too.
Pages