मा. ल. क. - ४

Submitted by हरिहर. on 23 July, 2018 - 22:30

मा.ल.क. - ३

एका छोट्याशा गावात एक अत्यंत गरीब ब्राह्मण मुलगा रहात होता. आई-वडील लहानपणीच वारलेले. नातेवाईकांनीही त्याला दुर लोटलेले. जवळ एकही पै नाही. वडीलांचा पौरोहित्य हाच व्यवसाय असल्याने शेती-वाडी काही नाही. गावातच एका बाजुला वडीलोपार्जीत घर. तेही पडलेले. एक भिंत कशिबशी ऊभी होती. त्या भिंतीच्या आधारानेच हा मुलगा कसा तरी दिवस काढत होता. पुढे शिक्षण घ्यायची फार ईच्छा असल्याने माधुकरी मागुन आणि वार लावून शिक्षण घेत होता. गावातील अनेकांनी सांगुन पाहीले की “बाबारे, दिवस आता बदलत आहे. ऊपजिवीकेसाठी गरजेचे असलेले शिक्षण घे.” पण मुलाच्या मनात एकच विचार यायचा “पौरोहित्य हा आपला परंपरेने चालत आलेला व्यवसाय आहे. आजोबांनीही तो केला, वडिलांनीही तोच केला. मग आपण परंपरा मोडून कसे दुसरे शिक्षण घ्यायचे. जे ज्ञान पुर्वापार चालत आले आहे त्याचा प्रवाह मध्येच तोडायचा आपल्याला काय अधिकार आहे? भले मला कुणी कर्मठ म्हटले तरी चालेल पण मी हेच शिक्षण घेणार.
तो मुलगा रोज सकाळी पाच घरे माधुकरी मागत असे आणि जे मिळे त्याचा कुलदैवताला नैवेद्य दाखवून स्वतः जेवत असे. दुपारपर्यंत त्याचे ‘अध्ययन’ चाले. दुपारी तो ठरलेल्या घरी वाराने जेवायला जाई. थोडा वेळ वामकुक्षी झाल्यानंतर त्याचे पाठांतर चाले. संध्याकाळी तो एकुलत्या एक भिंतीच्या आधाराने पाणी पिवून झोपत असे. असेच दिवसामागुन दिवस गेले, वर्षे गेली. या बारा वर्षात त्याच्या ज्ञानात खुप भर पडली. वेद, वेदांची ऊपांगे, थोडेफार व्याकरण, ज्योतिष असे जमेल ते ज्ञानही त्याने आत्मसात केले. पण त्याची माधूकरी मागायची झोळी, एक-दोन धोतरे, आधाराची व पडायला झालेली भिंत यातमात्र काडीचाही फरक पडला नाही. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्याने गावातच पौरोहित्य सुरु केले. पण काळ बदलला होता. त्याच्या ज्ञानाची गावकऱ्यांना फारशी गरज भासत नव्हती. गावातीलच मंदिरात पुजेचे काम करुन मिळणाऱ्या मुठभर तांदुळ आणि काही फळांवर त्याची ऊपजिविका कशीबशी चालली होती. अशा या निष्कांचन अवस्थेमुळे त्याला कुणी मुलगीही देईना. लग्नाचे वय निघून गेले. वय ऊतारवयाकडे झुकू लागले. दातावर मारायलाही पैसा नव्हता. मंदिराचा ‘जुना पुजारी’ म्हणून गावकरी काही बाही देत. पण आता हातातून पुजाही होईना. वयोमानाने आलेल्या विस्मृतीमुळे आता पाठ केलेलेही आठवेणा. संसारच नव्हता त्यामुळे काळजी घ्यायला कुणीही नव्हते. येवून जावून ती एकूलती एक खचलेली भिंत, त्या भिंतीच्या खुंटीला टांगलेली झोळी, भिंतीतच असलेल्या कोनाड्यात असलेले देवघर, एक अंगावरचे व एक वाळत घातलेले असे धडके दोन पंचे एवढाच काय तो त्याचा संसार होता.
आज सकाळपासुनच पावसाने मुसळधार सुरवात केली होती. माधुकरीला जायला जमत नव्हते आजकाल त्याला, पण कुणीतरी गावकरी काही-बाही आणून देई. पण पावसामुळे आज कुणीही ईकडे फिरकले नव्हते. तो ऊपाशी होता तसेच देवघरातले त्याचे देवही ऊपाशी होते. वाळत घातलेला पंचा वाऱ्यावर फडफडत होता. त्याच्याही आता दशा निघायला लागल्या होत्या. पावसाचा जोर वाढत होता. वाऱ्यापासुन आणि पावसाच्या फटकाऱ्यांपासुन स्वतःला वाचवण्यासाठी तो आणखी आणखी भिंतीला खेटून, तिच्या पोटात शिरल्यासारखे करुन अंग जास्तीत जास्त आकसुन घेत होता. ईतक्यात विज कोसळल्यासारखा आवाज झाला. हळू हळू खचत ती भिंत धाडकन कोसळली. म्हाताऱ्या ब्राह्मणाच्या सगळ्या दुःखांचा, वेदनेचा क्षणात अंत झाला. ज्या भिंतीने त्याला आयुष्यभर आधार दिला तिनेच त्याला आपल्या पोटात घेतले. कोसळलेल्या भिंतिच्या ढिगावर पाऊस आपले पाणी ओततच होता. भिंतीतल्या दगड-विटांवरचा ईतक्यावर्षांचा मातीचा गिलावा पावसामुळे धुवून निघत होता.
सकाळी गावकरी जमले. भिंत कोसल्याचे त्यांच्या लक्षात आले. सगळे म्हाताऱ्याच्या काळजीने भिंतीकडे धावले. सगळे गाव गोळा झाले. आणि त्या कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाकडे पहात असताना गावकऱ्यांचे डोळे विस्फारले, तोंडाचा ‘आ’ झाला. समोरच्या ढिगातली प्रत्येक विट सकाळच्या कोवळ्या ऊन्हात लखलखत होती. अस्सल बावनकशी सोन्यापासुन बनवलेल्या त्या विटांखाली ‘गरीब, बिचाऱ्या’ ब्राह्मणाचा ऊपासमारीने सुकलेला देह कुस्करुन गेला होता.

(मार्मिक घु था)
(कथासुत्र: अज्ञात, शब्दांकन: माझे.)

मा.ल.क. - ५

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्णन वाचताना गावोगावी असलेले गरीब ब्राह्मण डोळ्यासमोर आले . सद्या खेडेगावात पौरोहित्य करुन जगणाऱ्या काही ब्राह्मणांची परिस्थिती खूप विदारक आहे . मग वाटतं आरक्षण आर्थिक आधारावर हवे .

मालक ला शीर्षक देता का, क्रमांक तर आहेच>>> मलाही हे वाटले होते पण काही सुचले नाही. तुम्ही सुचवा काही छानशी शीर्षके.

दत्तात्रय साळुंके, तुम्ही म्हणताय ते अगदी खरे आहे पण हे बोलणार कोण?

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे खुप आभार!

आरक्षण आर्थिक आधारावर हवे .
>>>>>>>>>
ह्या विषयावर शाळेत असताना मी वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घेतला होता Happy
नेगेटिव्ह बाजूने, आरक्षणाच्या कुबड्या नकोत हा मुद्दा मांडला होता, ९ वीत असताना!
असो , अवांतर आहे , धागा पेटू शकतो. इथेच थांबते.

अरे प्लिज ही गोष्ट गोष्ट म्हणून घ्या.
आरक्षण वाल्या मुद्द्यावर चर्चा सुरु झाली की धाग्याचे एम एच ३७० व्हायला वेळ लागणार नाही.मूळ विषय हिंदी महासागरात शोधावा लागेल Happy

आरक्षण वाल्या मुद्द्यावर चर्चा सुरु झाली की धाग्याचे एम एच ३७० व्हायला वेळ लागणार नाही.मूळ विषय हिंदी महासागरात शोधावा लागेल+११११११११११११

‘तुज आहे तुजपाशी’ हे शिर्षक छान आहे किल्ली. शिर्षकाची कल्पना सुचवल्याबद्दल धन्यवाद!

उमानु, mi_anu प्रतिसादाबद्दल खुप आभार!

गोष्टींना गोष्टीच राहूद्या, चर्चेसाठी वेगळा धागा काढूयात. साळुंकेंना प्रतिसाद देताना मीच म्हणालो होतो ‘पण बोलणार कोण?’ पण नंतर लक्षात आले ऊगाच चुकीच्या धाग्यावर चुकीची चर्चा होईल. आता संपादनाची वेळ संपलीये.

व्यत्यय, ब्राह्मण करायलाही हरकत नाही पण ब्राम्हण हा शब्दही फारसा चुकीचा नाही. सवयीप्रमाणे लिहीताना म ला ह जोडला जातो, ह ला म नाही. त्यामुळे तसं लिहिले गेले आहे. वाचताना तुम्हाला फारच खटकले तर नक्कीच बदल करेन.
प्रतिसाद आणि सुचनेसाठी खुप धन्यवाद!

(मराठी विषय उत्तम असुनही मला बरेचदा मायनस मध्ये मार्क मिळत. कारण माझ्या शुध्दलेखनाची बोंब आहे चक्क Happy )

शाली, आम्ही तुमच्या विनंतीला मान देऊन लिहायचे करायचे पण तुम्ही मात्र आमच्याकडे कायम दुर्लक्ष करता बुवा. Proud
मागच्या धाग्यावरही तुम्हाला विचारले होते. तुम्ही कथा लिहिता पण मर्म काही सांगत नाहीत आणि आमची जाड्यता काही केल्या आम्हाला मर्म सापडू देत नाही. तेव्हा जमत असल्यास आणि ईच्छा असल्यास मर्म लिहावे ही विनंती.

हायझेनबर्ग, पुढच्या कथेत नक्कीच 'मर्म'ही लिहिन. ईच्छा आहे हो पण जमत नाही कधी कधी. पण या वेळी तुमच्यासाठी जमवतोच नक्की Happy

च्रप्स, या बोधकथा नाहीत, मार्मीक कथा आहेत. आणि मार्मीक कथेतलं मर्म काय हा प्रश्नही बराचसा निरर्थकच आहे. कधी कधी नुसतं हसनं किंवा पहाणही मार्मीक असु शकते. विनोद ऐकला, समजला तर त्याची मजा आहे. तो समजुन द्यावा लागला की विनोदातली मजा जाते. काही कविता, शेर ही अशाच प्रकारचे असतात. ऐकल्याबरोबर दाद द्यावी वाटली तर ठिक नाहीतर सोडून द्यावे. समजुन घ्यायला गेले की मग नुसते शब्दांचे व्याकरण उरते. वरील कथाही तशाच आहेत. वाचल्यावर जर छान वाटली तर ठिक नाहीतर सोडुन द्यावी. हे असेच का? यात नक्की काय आहे? काय म्हणायचे आहे? काय संदेश आहे कथेत? असं कुठे असतं का? वगैरे प्रश्न पडले की कथेतली गम्मत गेली. हे सगळं थोडं तुमच्यासाठी थोडं हायझेनबर्ग यांच्या साठी लिहिलं आहे.
प्रतिसादासाठी मनापासुन आभार!

मार्मीक कथेतलं मर्म काय हा प्रश्नही बराचसा निरर्थकच आहे. >> आँ Uhoh म्हणजे मर्म नाही का?
मग बडबडकथेत आणि हिच्यात फरक तो काय? तुम्ही आधी ईसापनितीशी तुलना नाही पण त्यासारखेच अश्या अर्थाचे काही तरी म्हणाला होतात पण ईसापनितीच्या कथा नितीमुल्यांची शिकवण देतात.
मला तरी ब्राम्हण भुकेने खंगण्यात आणि भिंत खचून मरण्यात आणि भिंतीखाली वीटा सापड्ण्यात अर्थाअर्थी काहीही संबंध दिसत नाही.
समजा त्याला जिवंत असतांना वीटांचा शोध लागला असता आणि त्याने त्या विकून श्रीमंत झाला असता भिक्षुकी सोडली असती आनंदात राहिला असता मग? पण ह्यातही काय मर्म आहे का?
लोक छान छान नेमकं कश्याला म्हणत आहेत तेच समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे.

विनोद, कविता, शेर ह्यात काहीतरी साहित्य्क मूल्य किमानपक्षी काही तरी लॉजिक असल्याशिवाय त्या माण्साच्या साहित्यिक मेंदूला अपील होत नाहीत. तेच ईथे होत आहे. कथा वाचून संपली की प्रश्न पडतो.. बरं मग?

मर्म म्हणजे essence, crux of the matter काही तरी पिवोटल. आपण म्हणतो 'मर्मावर बोट ठेवले' किंवा 'ह्यातले मर्म ऊलगडले' म्हणजे काही तरी महत्वाचे आहे ते छेडले किंवा समजले. असे मर्म छेडणारे किंवा ऊलगडणारे ते मार्मिक.

हाब,
मोरल ऑफ स्टोरी लिहिलेले असावेच असे नाही
या ब्राह्मणाच्या आयुष्यात(मेल्यावर) आली तश्या परिस्थिती आपल्या आयुष्यात भरपूर वेळा येत असतात.हव्या त्या वेळी गोष्टी मिळत नाहीत.अगदी साधे सोपे उपाय असतात, ते बरीच संकटं आणि दुःख पार केल्यावर आपल्याला दिसतात.त्या अर्थाने कथा रिलेट झाली इतकेच.

हो ते पटलं... पण तुम्ही मार्मिक म्हंटल्यावर आम्ही मर्म शोधणार की नाही?
म्हणजे शोधू की नको असे विचारतो आहे...

Pages

Back to top