एका छोट्याशा गावात एक अत्यंत गरीब ब्राह्मण मुलगा रहात होता. आई-वडील लहानपणीच वारलेले. नातेवाईकांनीही त्याला दुर लोटलेले. जवळ एकही पै नाही. वडीलांचा पौरोहित्य हाच व्यवसाय असल्याने शेती-वाडी काही नाही. गावातच एका बाजुला वडीलोपार्जीत घर. तेही पडलेले. एक भिंत कशिबशी ऊभी होती. त्या भिंतीच्या आधारानेच हा मुलगा कसा तरी दिवस काढत होता. पुढे शिक्षण घ्यायची फार ईच्छा असल्याने माधुकरी मागुन आणि वार लावून शिक्षण घेत होता. गावातील अनेकांनी सांगुन पाहीले की “बाबारे, दिवस आता बदलत आहे. ऊपजिवीकेसाठी गरजेचे असलेले शिक्षण घे.” पण मुलाच्या मनात एकच विचार यायचा “पौरोहित्य हा आपला परंपरेने चालत आलेला व्यवसाय आहे. आजोबांनीही तो केला, वडिलांनीही तोच केला. मग आपण परंपरा मोडून कसे दुसरे शिक्षण घ्यायचे. जे ज्ञान पुर्वापार चालत आले आहे त्याचा प्रवाह मध्येच तोडायचा आपल्याला काय अधिकार आहे? भले मला कुणी कर्मठ म्हटले तरी चालेल पण मी हेच शिक्षण घेणार.
तो मुलगा रोज सकाळी पाच घरे माधुकरी मागत असे आणि जे मिळे त्याचा कुलदैवताला नैवेद्य दाखवून स्वतः जेवत असे. दुपारपर्यंत त्याचे ‘अध्ययन’ चाले. दुपारी तो ठरलेल्या घरी वाराने जेवायला जाई. थोडा वेळ वामकुक्षी झाल्यानंतर त्याचे पाठांतर चाले. संध्याकाळी तो एकुलत्या एक भिंतीच्या आधाराने पाणी पिवून झोपत असे. असेच दिवसामागुन दिवस गेले, वर्षे गेली. या बारा वर्षात त्याच्या ज्ञानात खुप भर पडली. वेद, वेदांची ऊपांगे, थोडेफार व्याकरण, ज्योतिष असे जमेल ते ज्ञानही त्याने आत्मसात केले. पण त्याची माधूकरी मागायची झोळी, एक-दोन धोतरे, आधाराची व पडायला झालेली भिंत यातमात्र काडीचाही फरक पडला नाही. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्याने गावातच पौरोहित्य सुरु केले. पण काळ बदलला होता. त्याच्या ज्ञानाची गावकऱ्यांना फारशी गरज भासत नव्हती. गावातीलच मंदिरात पुजेचे काम करुन मिळणाऱ्या मुठभर तांदुळ आणि काही फळांवर त्याची ऊपजिविका कशीबशी चालली होती. अशा या निष्कांचन अवस्थेमुळे त्याला कुणी मुलगीही देईना. लग्नाचे वय निघून गेले. वय ऊतारवयाकडे झुकू लागले. दातावर मारायलाही पैसा नव्हता. मंदिराचा ‘जुना पुजारी’ म्हणून गावकरी काही बाही देत. पण आता हातातून पुजाही होईना. वयोमानाने आलेल्या विस्मृतीमुळे आता पाठ केलेलेही आठवेणा. संसारच नव्हता त्यामुळे काळजी घ्यायला कुणीही नव्हते. येवून जावून ती एकूलती एक खचलेली भिंत, त्या भिंतीच्या खुंटीला टांगलेली झोळी, भिंतीतच असलेल्या कोनाड्यात असलेले देवघर, एक अंगावरचे व एक वाळत घातलेले असे धडके दोन पंचे एवढाच काय तो त्याचा संसार होता.
आज सकाळपासुनच पावसाने मुसळधार सुरवात केली होती. माधुकरीला जायला जमत नव्हते आजकाल त्याला, पण कुणीतरी गावकरी काही-बाही आणून देई. पण पावसामुळे आज कुणीही ईकडे फिरकले नव्हते. तो ऊपाशी होता तसेच देवघरातले त्याचे देवही ऊपाशी होते. वाळत घातलेला पंचा वाऱ्यावर फडफडत होता. त्याच्याही आता दशा निघायला लागल्या होत्या. पावसाचा जोर वाढत होता. वाऱ्यापासुन आणि पावसाच्या फटकाऱ्यांपासुन स्वतःला वाचवण्यासाठी तो आणखी आणखी भिंतीला खेटून, तिच्या पोटात शिरल्यासारखे करुन अंग जास्तीत जास्त आकसुन घेत होता. ईतक्यात विज कोसळल्यासारखा आवाज झाला. हळू हळू खचत ती भिंत धाडकन कोसळली. म्हाताऱ्या ब्राह्मणाच्या सगळ्या दुःखांचा, वेदनेचा क्षणात अंत झाला. ज्या भिंतीने त्याला आयुष्यभर आधार दिला तिनेच त्याला आपल्या पोटात घेतले. कोसळलेल्या भिंतिच्या ढिगावर पाऊस आपले पाणी ओततच होता. भिंतीतल्या दगड-विटांवरचा ईतक्यावर्षांचा मातीचा गिलावा पावसामुळे धुवून निघत होता.
सकाळी गावकरी जमले. भिंत कोसल्याचे त्यांच्या लक्षात आले. सगळे म्हाताऱ्याच्या काळजीने भिंतीकडे धावले. सगळे गाव गोळा झाले. आणि त्या कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाकडे पहात असताना गावकऱ्यांचे डोळे विस्फारले, तोंडाचा ‘आ’ झाला. समोरच्या ढिगातली प्रत्येक विट सकाळच्या कोवळ्या ऊन्हात लखलखत होती. अस्सल बावनकशी सोन्यापासुन बनवलेल्या त्या विटांखाली ‘गरीब, बिचाऱ्या’ ब्राह्मणाचा ऊपासमारीने सुकलेला देह कुस्करुन गेला होता.
(मार्मिक लघु कथा)
(कथासुत्र: अज्ञात, शब्दांकन: माझे.)
हायझेनबर्ग, तुम्हाला खरच मी
हायझेनबर्ग, तुम्हाला खरच मी काय म्हणतोय ते कळत नाही की तुम्ही गम्मत करत आहात तेच कळत नाही. या अगोदरच्या प्रतिसादामध्ये 'तुज आहे तुजपाशी' असं किल्ली यांनी लिहिले होते. त्यांनी तसे लिहिले नसते तरीही कथा वाचल्या वाचल्या कुणाच्याही हेच लक्षात येते. "भिंतीतल्या दगड-विटांवरचा ईतक्यावर्षांचा मातीचा गिलावा पावसामुळे धुवून निघत होता." असं मी याच अर्थाने लिहिले होते. बोधकथा, किंवा मार्मीक कथा यांचा अर्थ शब्दशः घेउन कसा चालेल? 'मार्मीक कथा' हे मी दिलेले नाव आहे, त्यांना 'रुपक कथा’ही म्हणतात. रुपक लक्षात घेतले तर अर्थ, मर्म समजेल.
मार्मीक कथेतलं मर्म काय हा प्रश्नही बराचसा निरर्थकच आहे. >> आँ म्हणजे मर्म नाही का?>> तुम्ही नक्कीच गम्मत करत आहात माझी. एखाद्या जेवणाऱ्या व्यक्तीला आपण "काय, जेवण चाललय का?" असं विचारतो तेंव्हा तो प्रश्न निरर्थक असतो, त्या व्यक्तीचे जेवण नाही. मार्मीक कथा इतक्या सोप्या असतात की त्या वाचल्यानंतर "यात मर्म काय?" असं विचारणे याच अर्थाने निरर्थरक आहे असं मला म्हणायचे होते.
मग बडबडकथेत आणि हिच्यात फरक तो काय?>> या कथा माझ्या नसुन त्या पिढ्यान् पिढ्या चालत आल्या आहेत म्हणजेच त्या नक्कीच निरर्थक नसणार. पण समजुन घ्यायचेच नाही असं ठरवलं तर मग खरच या कथांमध्ये आणि बडबडकथेत फारसा फरक नाही. आणि बडबडकथाही अर्थहीन असुनही योग्य ठिकाणी वापरल्या तर छान मर्मावर बोट ठेवून जातातच की. उदा. 'एक चिमणी आली, दाना घेऊन गेली. दुसरी चिमणी आली, दाना घेऊन गेली.'
मला तरी ब्राम्हण भुकेने खंगण्यात आणि भिंत खचून मरण्यात आणि भिंतीखाली वीटा सापड्ण्यात अर्थाअर्थी काहीही संबंध दिसत नाही.>> असं तुम्ही म्हणता तेंव्हाच लक्षात येते की तुम्ही ब्रह्मण, भिंत आणि तीचे कोसळणे यातच गुंतला. सोन्याच्या विटा हे आपले सामर्थ्य आहे फक्त त्यावरचा मातीचा गिलावा दुर करायची गरज आहे. हा प्रसंग लाक्षणीक अर्थाने लक्षात घेतला असता तर मर्म कळायला वेळ लागला नसता.
कथा वाचून संपली की प्रश्न पडतो.. बरं मग?>> "ज्या फांदीवर बसला होता ती फांदीच शेख चिल्लीने तोडली आणि तो खाली पडला." ही कथा जर तुम्ही एखाद्याला सांगितली आणि गोष्ट ऐकल्यावर ऐकणाऱ्याने तुम्हाला "मग शेख चिल्लीला लागले का खुप?" असा प्रश्न विचारल्यावर तुमची जी अवस्था होईल तशी अवस्था केली तुम्ही माझी.
समजा त्याला जिवंत असतांना वीटांचा शोध लागला असता>>तर मग या कथेचे प्रयोजनच राहीले नसते. त्याचे झाले तसे होवू नये, वेळीच आपल्याकडे काय आहे ते शोधा, त्याचा योग्य वापर करा हेच तर कथा सांगते.
ही कथा मी फारच ऐसपैस सांगितली पण हिच कथा माऊलींनी अगदी एकाच ओवीत सांगितली आहे ज्ञानेश्वरीत. ती ओवी देतो तुमच्यासाठी हायझेनबर्ग. आवडेल तुम्हाला. आपल्याकडे काय आहे, आपली क्षमता किती आहे हे लक्षात घेतले नाही तर काय होते हे सांगण्यासाठीच माऊलींनी हे रुपक वापरले आहे.
नातरी निदैवाचां परिवरी। लोह्या रुतलिया आहाति सहस्रवरी।
परि तेथ बैसोनि उपवासु करी। का दरिद्रें जिये॥ (लोह्या: सुवर्णमुद्रा)
वरील प्रतिसाद अगदी सहजतेने घ्यावा हायझेनबर्ग. इथुन पुढील कथाही वाचून नक्की प्रतिसाद द्या.
हव्या त्या वेळी गोष्टी मिळत नाहीत.अगदी साधे सोपे उपाय असतात, ते बरीच संकटं आणि दुःख पार केल्यावर आपल्याला दिसतात.>>धन्यवाद mi_anu
नाही हो मजाक आजिबात करत
नाही हो मजाक आजिबात करत नव्हतो. मी भयंकर आळशी माणूस आहे.. गरज नसल्यास एक जास्तीचा शब्दं सुद्धा खरडत नाही कोणासाठी.
असं तुम्ही म्हणता तेंव्हाच लक्षात येते की तुम्ही ब्रह्मण, भिंत आणि तीचे कोसळणे यातच गुंतला. सोन्याच्या विटा हे आपले सामर्थ्य आहे फक्त त्यावरचा मातीचा गिलावा दुर करायची गरज आहे. हा प्रसंग लाक्षणीक अर्थाने लक्षात घेतला असता तर मर्म कळायला वेळ लागला नसता. > हो बुवा त्यातच गुंतलो आहे अजूनही. त्यातली रुपकं काढण्यासाठी आधी मला त्यातला परस्पर संबंध तरी कळायला हवा ना.
अडला नडलेला माणूस सामर्थ्य मिळवण्यासाठी जमीन खोदेल, विहिर खोदेल पण भिंत का खोदेल ?
भिंतीमध्ये काही मौल्यवान आहे आणि आपण प्रयत्न्पूर्वक ते काढावे असे त्यास वाटेलच का? हा प्रश्न आहे. समजा त्याने आशेवर भिंत खोदली जरी असती आणि काहीच निघाले नसते तर मग आडोशाची एकमेव भिंतही गेली का? तेव्हा तरी 'तेलही गेले तूपही' अश्या मर्माची मालक लिहिता आली असती.
हां तुम्ही म्हणत असाल त्याच्याकडे जमिनीचा अगदी छोटासा तुकडा होता आणि त्याने नांगरट, पीक पेरणी न करता भिक्षुकीचाच मार्ग पत्करला. त्याने नांगरट केली असती तर त्याला सोन्याचा हंडा सापडला असता. मग 'तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी' लागू होते. तुझे सामर्थ्य तू शेती न करता भिशुकीत घालवले त्याचे तेवढेच फळ मिळाले.
आडोशाची एकमेव भिंत.. जगायचा एकमेव आधार ऊखडून त्यात सामर्थ्य शोधायचे.. Doesn't make any sense.
Maybe ti bhint mhnje comfort
Maybe ti bhint mhnje comfort zone asel..tyachya bahet ya asa suchvaycha asel kathela
अर्थ फक्त इतकाच की आपल्याकडे
अर्थ फक्त इतकाच की आपल्याकडे जे आहे त्याला आपल्या हयातीत आपल्याला काही कारणाने ऍक्सेस नाही.आपण मेल्यावर/एखाद्या गोष्टीतून स्टेप आउट झाल्यावर ती गोष्ट आपल्या मनासारखी झाली.पण आपण त्याचा फायदा करून घेऊ शकत नाही.दात आहेत तर चणे नाहीत सारखी परिस्थिती.
किंवा आपण ज्या गोष्टींच्या आशेत आयुष्यभर पायपीट केली ती आपली पाठ फिरल्यावर/आपण दमून बसल्यावर दुसऱ्याच कोणाला तरी मिळाली.
@हायझेनबर्ग
@हायझेनबर्ग
ही घ्या मर्मे:
१. पौरोहित्य हा व्यवसाय पोट भरायला फालतू आहे.
२. परंपरा मोडून दुसरे शिक्षण घ्यायची तयारी ठेवा.
३. ज्ञानात भर पडल्याने पोट भरत नाही. (corollary: पोट भरायला ज्ञानाची गरज असतेच असे नाही.)
अंतिम मर्म एकचः आंतरजालावरील कथा वाचून जास्त विचार करू नका.
उपाशी बोका, एक घाव चार तुकडे
उपाशी बोका, एक घाव चार तुकडे केलेत की हो तुम्ही.
हाब, सावकाश उत्तर देतो.
लोल.. उपाशी बोका ... बेस्ट !!
लोल.. उपाशी बोका ... बेस्ट !!!
त्या डासाच्या धाग्यावर पण धमाल प्रतिसाद होता तुमचा ☺️
अतिशय सुंदर कथा शाली.
अतिशय सुंदर कथा शाली.
ब्राह्मणाचे वाईट वाटले.
सगळ्याच कथा आवडल्या.
सगळ्याच कथा आवडल्या.
हाब, मर्म आणि तात्पर्य यांत घोळ होतो आहे का तुझा? यातून काही तात्पर्य काढायचं किंवा शिकवण घ्यायची नाहीये. आयुष्यात कितीतरी अकल्पितं, योगायोग, विरोधाभास हृदयंगम असतात - त्यांच्या कथा आहेत. आयुष्य अशा अनेक अतार्किक घटनांनी बनत वा बिघडत जातं हेच मर्म - आणखी काय अपेक्षित आहे?
हाब, मर्म आणि तात्पर्य यांत
हाब, मर्म आणि तात्पर्य यांत घोळ होतो आहे का तुझा? >> माझ्या मते नाही.. पण समजा एकवेळ समजले की मर्म म्हणून तात्पर्य शोधत होतो. तर तुम्ही म्हणता आहात ह्या कथात तात्पर्य नाहीये म्हणून ते सापडत नाहीये आणि शोधायचेही नाहीये.
ह्या कथातून बोध, तात्पर्य, शिकवण काहीही शोधायचे नाहीये. ओके, कळाले, गॉट ईट, डन.
आयुष्यात कितीतरी अकल्पितं, योगायोग, विरोधाभास हृदयंगम असतात - त्यांच्या कथा आहेत. आयुष्य अशा अनेक अतार्किक घटनांनी बनत वा बिघडत जातं हेच मर्म - आणखी काय अपेक्षित आहे? >> पण मग ह्या ओळीने मात्रं पुन्हा बुचकाळ्यात टाकले.
काही बनण्या बिघडण्याच्या वर्णनालाच कथा म्हणतात ना? वर्णनाची गाडी A point ला सुरू होऊन B point ला थांबते ज्यात अकल्पितं, योगायोग, विरोधाभास असतात मग ते हृदयंगम असोत वा नसोत. तुमच्या ह्या व्याख्येत जगात लिहिलेली प्रत्येक कथाच बसते. मग ईतर कथांपेक्षा वेगळे म्हणजे 'मार्मिक' हे विषेषण लावण्यासारखे ह्या कथांमध्ये काय आहे जे इतर लघूकथांमध्ये नसते तेच समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.
तर ह्या मालिकेत तलवारबाजांची कथा सोडून एकही कथा मला मार्मिक वाटली नाही आणि बाकीच्यांत मार्मिक- मर्माला -हृदयाला भावणारे- हृदयंगम म्हणून जे होते ते अनेक अंगांनी फ्लॉड होते.
ओके, तुला या कथा मार्मिक
ओके, तुला या कथा मार्मिक वाटल्या नाहीत, कळल्या नाहीत आणि आवडल्या नाहीत. गॉट इट.
लेखकाला आणि अनेकांना मार्मिक वाटल्या, कळल्या आणि आवडल्याही. त्याला तुझी हरकत असायचं कारण नाही.
धन्यवाद.
ओके, तुला या कथा मार्मिक
ओके, तुला या कथा मार्मिक वाटल्या नाहीत, कळल्या नाहीत आणि आवडल्या नाहीत. गॉट इट. >> मार्मिक वाटल्या नाहीत आणि कळल्या नाहीत हे बरोबर, तलवारबाजांची कथा सोडून. पण मर्म कळाल्या तर आवडतील असे खात्रीने वाटते म्हणूनच प्रश्न विचारतो आहे.
लेखकाला आणि अनेकांना मार्मिक वाटल्या, कळल्या आणि आवडल्याही. त्याला तुझी हरकत असायचं कारण नाही. >> माझी काहीच हरकत नाही.. का असेल ? आणि हरकत घेणारा मी कोण?ऊलट मी विंट्रेस्ट घेऊन जे अनेकांना कळतेय ते आपल्यालाही कळावे ह्यासाठीच हा प्रश्नप्रपंच चालवला होता.
असो. पुढ्च्या कथेतील मर्म समजून घेण्याचा माझ्यापरीनं जरा अजून प्रयत्न करीन.
विक्रम वेताळ चालू आहे का इकडे
विक्रम वेताळ चालू आहे का इकडे
आवडली !
आवडली !
मी हाबशी सहमत. यातले मर्म काय
मी हाबशी सहमत. यातले मर्म काय ते कळले नाही. ब्राह्मणाविषयी फार सहानुभूती देखिल वाटली नाही. He suffered because of his own bad decisions. भिंत सोन्याच्या विटांची होती की नाही याने काय फरक पडतो?
Alchemist पुस्तक आठवलं...
Alchemist पुस्तक आठवलं...
वाह! तुमच्या "मा.ल.क." सेरीज
वाह! तुमच्या "मा.ल.क." सेरीज मधली हि कथा मला खूप भावली. शेवट अगदी अनपेक्षित आहे. बाकी कथा अप्रत्यक्षपणे वाचनात आल्या हि नाही आली म्हणून असेल कदाचित. पण यातून खूप मोठा संदेश दिला आहे. अनेकदा सुखाची किल्ली आपल्याजवळच दडलेली असते. पण अनेकांना ती गवसत नाही. नशीब आहे, प्रयत्नांची दिशा आहे, वृत्ती आहे. अनेक गोष्टी कारणीभूत असतात. ज्याने त्याने आत्मपरीक्षण करूनच त्या जाणायला हव्यात इतकेच.
(माझे आपले एक मत: मा.ल.क. .... फारच बोअर आणि असंबंधित वाटणारे टायटल आहे. कथांची नावे दिलीत तर बरे होईल. मार्मिक कथा: <नाव> असे.)
@atuldpatil, प्रतिसादासाठी
@atuldpatil, प्रतिसादासाठी आभार!
फारच बोअर आणि असंबंधित वाटणारे टायटल आहे. कथांची नावे दिलीत तर बरे होईल. मार्मिक कथा: <नाव> असे.>>> हो खरय. मलाही हे नाव बोअर वाटते पण कथांना नावे काय द्यावीत ते सुचत नाही, त्यामुळे फक्त क्रमांक दिले आहेत. किल्ली यांनी काही नावे सुचवली आहेत. तुम्हीही काही सुचवा म्हणजे मला शीर्षकात क्रमांकांऐवजी छानसे नाव देता येईल. पुन्हा एकदा धन्यवाद!!
कथा छान आहे.
कथा छान आहे.
पण यात तात्पर्य / बोध असे काही नाही.
एक ट्विस्ट कथा आहे एवढेच.
यातून तुज आहे तुजपाशी किंवा असा काही बोध आहे असे बिलकूल वाटत नाही. जर का त्या ब्राह्मणाला हिंट दिलेली असती की घरातच कुठेतरी घबाड दडवून ठेवलेले आहे, तर गोष्ट वेगळी असती. आपल्याला वडिलोपार्जीत घर मिळाले की सर्व घर व भिंती खोदून पहाव्यात असा बोध होऊ शकत नाही.
मानव पृथ्वीकर, अहो या कथा मी
मानव पृथ्वीकर, अहो या कथा मी आजी आजोबांकडून ऐकल्यात. त्यांनीही अशाच कुठेतरी ऐकल्या असतील. माझे फक्त शब्दांकन आहे. मला या कथा आवडल्या, ईथेही कुणालातरी आवडतील म्हणून आवर्जुन दिल्यात इतकेच. कथा वाचावी आवडली तर ठिकचे नाही तर इग्नोर करावी. नाव लघू कथा ठेवायला हवे होते. मा.ल.क.मुळे गोंधळ होतोय. असो. हिच गोष्ट माऊलींनी नवव्या अध्यायात साडेतिन ओळींमध्ये सांगीतली आहे. ती ओवी देतो.
प्रतिसादांसाठी खुप आभार!
नातरी निदैवाच्या परिवरी। लोह्या रुतलिया आहाति सहस्रवरी।
परि तेथ बैसोनि उपवासु करी। का दरिद्रे जिये॥ (लोह्या - सुवर्णमुद्रा)
तुम्हीही काही सुचवा >>>>
तुम्हीही काही सुचवा >>>> कथुकली कसे वाटते ?
<<< तुम्हीही काही सुचवा >>>
<<< तुम्हीही काही सुचवा >>>
कशाला इतका अट्टाहास? लघुकथा असेच म्हणा. इंग्रजीत Short stories असतात ना, तसाच प्रकार.
कथा वाचावी आवडली तर ठिकचे
कथा वाचावी आवडली तर ठिकचे नाही तर इग्नोर करावी.
>>> मायबोली वर असे होत नसते हो ☺️
धन्यवाद साद!
धन्यवाद साद!
लघुकथा असेच म्हणा.>>> हरकत नाही. पण अगोदरच्या कथेंची संपादनाची वेळ संपलीये. म्हणून आहे तेच कंटिन्यू केलय.
मायबोली वर असे होत नसते हो>>> मग काय करावं म्हणता च्रप्स?
मग काय करावं म्हणता च्रप्स? >
मग काय करावं म्हणता च्रप्स? >>> अशा वेळी लेखकाने प्रतिसाद इग्नोर करावेत ☺️
अहो शाली मी तुमच्या कथेवर
अहो शाली मी तुमच्या कथेवर टीका करत नाहीय.
ती छान वाटली असेच म्हणालो.
त्यावरील आलेल्या प्रतिसादांवर मी माझे मत मांडले एचढेच.
मी या सर्व कथांकडे बोध कथा म्हणून बघत नाहीये. बोध असला तर ठीक नसला तर नसला. मी आवडीने तुमच्या मा ल क वाचतोय.
त्यावरील आलेल्या प्रतिसादांवर
त्यावरील आलेल्या प्रतिसादांवर मी माझे मत मांडले एचढेच.>>माझाच गोंधळ झाला वाटतं.
मी आवडीने तुमच्या मा ल क वाचतोय.>> थँक्यू!
आणि हो, मा.ल.क. म्हणजे
आणि हो, मा.ल.क. म्हणजे मार्मिक लघु कथा हे मला तुमच्या काही मा.ल.क. वाचल्या नंतर कळाले, कारण मी त्या क्रमाने वाचल्या नाहीत, काही वाचल्यानंतर मग मा.ल.क. १ वाचली, तेव्हा कळले. शीर्षक मा. ल. क. असायला माझीतरी काहीच हरकत नाही.
सुंदर दृष्टांत दिला आहे
सुंदर दृष्टांत दिला आहे कथेतून.
हि पण छान, मी आज वाचतेय
हि पण छान, मी आज वाचतेय तुमच्या मा ल क, यातील बर्याचश्या कुठेतरी वाचल्यत / ऐकल्यात, तरी पुन्हा एकदा वाचताना आवडल्या
<<<कथा वाचावी आवडली तर ठिकचे नाही तर इग्नोर करावी. >>>> हे मात्र अगदी खरे, मी ही शक्यतो निगेटीव्ह प्रतिसाद टाळते, कारण कशाला उगा कुणाला दुखवायचे,मला नाही आवडली तर काय झाले कुणाला तरी आवडली न मग
Pages