याआधीचे भाग येथे वाचा.
संघर्ष भाग १
संघर्ष भाग ४
_______________________________
पूर्वभाग-
बाप आतून पूर्णपणे एकटा झाला होता. तुफानात अडकलेल्या नावेसारखं त्याचं मन भावनांच्या लाटांवर हिंदकळत होतं, ज्यात त्याला मात देणार्या भावना सारख्या त्याच्यावर काबू मिळवत होत्या. वादळ शमायच्या आधीच बुडाली त्याची नाव. आणि आता हे वादळ आमच्याकडे त्वेषाने घोंगावत येत होतं!
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
आता पुढे -
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
बाप आम्हाला कायमचं सोडून गेला होता. उरल्या होत्या विषण्ण करणार्या आठवणी आणि काट्यासारखं बोचणारं वर्तमान. बाप गेल्यापासून माय सैरभैर झाली होती. तिला असं वाटत होतं, की बाप तिच्यामुळेच आत्महत्येला प्रवृत्त झाला होता. याने तिच्या मनावर खोलवर परिणाम केला होता. बापावर अंत्यसंस्कार झाले, अन् दोनच दिवसांत ती आजारी पडली. अगदी सडकून ताप भरला तिला. कितीतरी दिवस ती बेशुद्धच होती. तापात काहीतरी बरळायची. "म्याच मारलं तुमाला... मीपन येतंय तुमच्याकडं... " अशाप्रकारचं काहीही पुटपुटायची. काहीच दिवसांत ती फारच अशक्त झाली होती. पार रया गेली होती तिची. मी तिची फार काळजी घ्यायचो. तिचं एवढं वाढलेलं आजारपण पाहून मी बापाप्रमाणे तिलाही गमावतोय की काय, अशी भीती वाटायची. फार जपायचो मी तिला. पेजेचं पाणी तिला चमच्याने पाजायचो, खास तिच्यासाठी तांब्याभर गायीचं दूध आणायचो, मिठाच्या पाण्याच्या घड्या तिच्या कपाळावर ठेवायचो. काही दिवस घरगुती उपाय केल्यानंतर शेवटी डाॅक्टरांना झोपडीत घेऊन आलो. डॉक्टरांनी औषधं लिहून दिली, ती आणली. माय काही दिवसांनी शुद्धीवर आली. तिला बरं व्हायला बरेच दिवस गेले.
बापाच्या जाण्यानंतर जवळपास एक-दीड महिने माय अंथरूणालाच खिळली होती. बापाच्या अंत्यसंस्काराला लागलेले थोडे पैसे बापाच्या औषधांसाठीच्या साठवलेल्या पैशांतून घेतले होते, तर काही शेजाऱ्यांनी, आजाने दिले होते. आजी-आजोबा दोन आठवड्यात परत गेले. मायची ढासळती तब्येत पाहून खरंतर आम्हा दोघांना त्यांच्यासोबत यायला पुष्कळदा सांगितलं होतं त्यांनी; पण अजून धोंडूशेटचे फिटायचे पैसे आठवून मी त्यांना सारखा नकार देत होतो. शेवटी काहीशा अनिच्छेनेच ते दोघे परत गेले. आता झोपडीत पक्त मी आणि माय उरलो होतो. नाही म्हणायला अंगावर सारखी धावून येणारी गरिबीची परिस्थिती तेवढी होती जोडीला. मायने अंथरुण धरल्याने तिचे भंगारातून येणारे चार पैसेही बंद झाले होते. मीही जवळपास दोन आठवडे हाॅटेलात कामाला गेलो नव्हतो. त्यामुळे मालक हे पैसे देणारच नव्हता. नंतर जायला लागलो, पण त्याचे पैसेही महिन्याशेवटी मिळणार होते. लोकांचे पैसे तरी किती घ्यायचे अन् लोकं तरी किती देणार!
म्हणून शेवटी मी एका मित्राच्या ओळखीनं रात्री अडीच ते पहाटे चार मोठमोठ्या ट्रकमध्ये दगड, वीटा, वाळू, रेती भरायच्या मजुरीला लागलो. ह्या ट्रकांना बहुतेकदा लांब पल्ला गाठायचा असल्याने पहाटे लवकरच हे ट्रक निघायचे. म्हणून रात्रीच त्यांच्यात वहायचे दगड, रेती भरायचे असायचे. या कामाचे थोडे पैसे रोज यायचे, पण खूपच ढोरमेहनत करावी लागायची. वर मजूरी करुन लगेच एक-दोन तासात झोप काढून हाॅटेलात कामाला जावं लागायचं. आणि संध्याकाळी दमून-भागून आल्यावर मायची शुश्रूषा करायचो. तेव्हा थोडीशीच झोप मिळायची. परत दोन वाजता निघायचं असायचं. या धावपळीमुळे मी खूपच रोडावलो होतो. वजन कितीतरी घटलं असावं माझं. हातापायांच्या अगदी काड्या झाल्या होत्या. चेहरा काळवंडला होता. अगदी निस्तेज झाला होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळं आली होती. कायम अशक्त नि पेंगुळल्यासारखं वाटायला लागलं होतं. चालताना शरीराचा झोक जाऊन आपण पडतोय की काय असं वाटायचं. खाल्लेलं जणू अंगाला लागतच नव्हतं. पण तरीही मी कष्ट करायचो. कारण घराच्या रहाटगाडग्याचं ओझं अवचित माझ्या एकट्याच्या खांद्यावर आलं होतं, जे मला पेलून न्यायचं होतं.
काही दिवस गेले, नि धोंडूशेट आमच्याकडे आला. अशीच तिन्हिसांजेची कातरवेळ. आल्या आल्या तो माझ्यावर डाफरायला लागला.
"क्या बे साले? मेरेकु येडा समजा क्या? ***** साला! बाप गया उपर तो क्या मेरा पैसाबी गया क्या उसके साथ? हाॅटेलवाला बोलताsय की तू साला काम नय करता ठिकसे! ओर तेरा बेवडा बाप मरा ना? तू तो नय? तो दो हफ्ता किधर मरा था हां? जादा चरबी चढी हय क्या? मेरा इस महीने का पैसेमे घाटा आ गया साला! एक तो वो नलावडेने डाला अंदर उस डाका केस मै! मै इधर होता तो दुसरे दीनही भेजता तेरेकु कामपे. आजकल क्या उस पठाण के ट्रकपे काम करता हय क्या? मेरा इस महिनेका घटा पैसा तु उसी पैसेसे भरेगा, समझा? *** ****! आताय मै हफ्ते अंदर! " धोंडूशेटच्या आवेशाकडे बघून मी फार भेदरलो होतो. धोंडूशेटने खऱ्या अर्थाने आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती. आता त्याचा माझ्या इतर मिळकतीवरही डोळा होता. याचे पैसे कधी एकदाचे फिटतील, असंच मला राहून राहून वाटत होतं. खरंतर ते कधी फिटतील, हे मलाही माहीत नव्हतं. गरिबी, अडीनडीची परिस्थिती आणि अज्ञान यामुळे आम्ही डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवला होता. किती पैसे फेडायचे आहेत, किती फिटले आहेत, आम्हाला काहीच माहीत नव्हतं आणि धोंडूशेट सांगतही नव्हता. त्याला विचारायचीही सोय नव्हती. त्याची भीती वाटत होती. आता धोंडूशेटला दिल्यावर किती पैसे घरासाठी उरतील, या विचारातच मी दिवा मालवला, तसा अंधार माझी वाटच पाहत असल्यासारखा वस्सकन अंगावर आला. चाचपडतच वळकटी अंथरुन अंग टाकलं. अंधाराचं काही वाटलं नाही, कारण आयुष्यातही अंधाराशिवाय काय उरलं होतं म्हणा.
काही दिवस वाऱ्यासारखे झरझर निघून गेले. धोंडूशेट आला, त्याचे पैसे घेऊन गेला. त्याच्या चेहऱ्यावरचा लोभी भाव लपता लपत नव्हता. आणि ते पाहून माझ्या मनात अनामिक भीती वाटत होती. मायचा आजार बरा झाला होता. पण माय अगदीच शांत झाली होती. खूपच मोठा धसका घेतला होता तिनं, ज्यातून ती अद्याप सावरली नव्हती. कशातच लक्ष नसायचं तिचं. आजकाल ती भंगाराला पण जायला लागली होती. पण जोपर्यंत ती पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत मी रात्रीचं मजूरीचं काम चालूच ठेवलं होतं. तिच्यावर कमीत कमी भार यावा, हे मी बघत होतो. माय अगदी स्वतःच्यातच असल्यासारखी वागायची. कधी भाकऱ्या करताना हात भाजला तरी लक्ष नसायचं, भंगारातल्या काचा, गंजकं लोखंड पायात हातात भरुन भळाभळा रक्त वाहेपर्यंत ती हात चालवत सुटायची, भाकरीचं गाठोडं कुत्र्याने पळवून नेईपर्यंत दुर्लक्ष करायची, नजर कायम शून्यात! वस्तीतल्या भंगारवाल्या बाया तिला सांभाळून घ्यायच्या म्हणून! तिला 'काम करु नको. घरी बस.' म्हटलं तरी पटायचं नाही. " म्या काम सोडलं तं यास्नी कंच्या पैक्यातून बरं करनार! माहं कुकू रायला पायजे! तुजी सालंची फी पन भरायची हाय! " असं काहीच न कळणारं बडबडायची स्वतःतच! तिच्याबद्दल खूप वाईट वाटायचं.
बापाच्या जाण्यानंतर मी फारच जबाबदार झालो. आधीचा उडाणटप्पू, बेजबाबदार गण्या हाॅटेलात कामाला लागल्यानं फक्त घुमा झाला होता, त्याला परिस्थितीची एवढी जाण नव्हती. त्याचं मन बालिश होतं. आत्ममग्न, जगाची तमा नसणारा होता आधीचा गण्या. पण आता मात्र बरेच बदल झाले होते, नकळत. मी फारच जबाबदार झाल्यासारखं वागायला लागलो होतो. मिळकत, घरचा खर्च, उरणारे पैसे यांचा ताळमेळ घालून पैसे योग्य ठिकाणीच वापरायला शिकलो होतो. आधीचा मी हातात येणारे पैसे वायफळ खर्चात उडवायचो. पण आता मी योग्य, आवश्यक वस्तूंनाच पैसे खर्च करत होतो. मन अधिकाधिक घट्ट करायचा प्रयत्न करत होतो. चेहर्यावरचे उमटणारे भाव अजून निरागट्ट आणि यांत्रिक होत चालले होते. स्वप्नांच्या कवडशांचा विचार करणं सोडून देऊन नशीबात जे आलंय, त्याच्यातच जगण्यात धन्यता मानत होतो. शाळा कायमचीच सुटलीय, हे मनाला सतत पटवून देऊन पोटासाठी धडपडत होतो. पण जेव्हा शाळेत जाणारी मुलं पहायचो, तेव्हा माझा चढवलेला निरागट्टपणाचा मुखवटा गळून पडायचा अन् मला हमसून हमसून रडावंसं वाटायचं. मनात, स्वप्नात अक्षरंच दिसायची. चाळा म्हणून दुकानांवरच्या पाट्या वाचायचो, जे काही लिहिलेलं दिसायचं ते वाचायचा प्रयत्न करायचो. रस्त्यात पडलेले वर्तमानपत्राचे मळकट तुकडे खिशात घालायचो अन् जसा वेळ मिळेल तेव्हा चोरुन वाचायचो. माझं आयुष्यही या मळकट कागदापेक्षा काय वेगळं होतं म्हणा! सतत अवहेलना, इतरांच्या पायदळी तुडवलं जाणं अन् कुचंबणा! स्वतःचं वेगळं अस्तित्वच नाही जणू!
सततचे अश्रू नयनीचे
थांबतील का कधी
काळे ढग संकटांचे
ओसरतील का कधी
आजकाल मला फारच विचित्र स्वप्नं पडायची. कधी स्वप्नात यायचं, बाप मला हाक मारुन जवळ बोलवतोय. मी जवळ गेलो की माझ्याजवळ त्याच्या आत्महत्येची चूक मान्य करतोय. मला शाळेत न जाता आल्याचं दुःख व्यक्त करतोय. कधी अगदी धुसर, तेच जुनं, पण जरा वेगळंच आणि विचित्र स्वप्न पडायचं की मी नदीकाठच्या वाळूत वेडीवाकडी, थरथरणारी 'गणेश शाळेला जातो' अशी अक्षरं काढतो. यावेळी माझ्या डोक्यावर दगड-रेतीचं घमेलं आहे, खांद्यावर हाॅटेलातलं मळका फडका आहे, अंगातले कपडे जुनाट, मळलेले, फाटके आहेत. मी अत्यंत अशक्त, दमलेला आहे, पोटाला खड्डा पडला आहे. ती भयंकर लाट येताना दिसते अन् मी अक्षरांकडे पाहून विमनस्क स्थितीत क्षणभर हसतो, अगदी निराशेने, अक्षराबद्दलच्या आशा आधीच गमावून. ती अक्षरं मला अप्राप्य वाटत असतात. लाट जसजशी जवळ येते तसतसा मी त्या अक्षरापासून दूर जातो. हातपाय गाळून, अक्षरांच्या विरुद्ध दिशेने चालायला लागतो, त्यांच्याकडे पाठ करुन. मी पंधरा-वीस पावलं चालत जातो, इतक्यात मला मागून माय-बापाचा कण्हण्याचा आवाज येतो, तसा मी क्षणार्धात पलटून मागे पाहतो. माय-बाप अशक्त परिस्थितीत त्या अक्षरांजवळ उभे असतात. त्यांच्यात लाटेच्या वाटेवरुन बाजूला होण्याइतपत त्राण नसतं. मी त्यांच्या मागे पाहतो, अवघ्या काही पावलांवर असलेली ती क्रूर लाट त्वेषाने येत असते, माझ्या डोक्यावरचं घमेलं मी जागीच टाकतो, खांद्याचा फडका भिरकावतो, आणि "माssssssयss! बाsssss !" असा मी जोरात किंचाळतो. माय-बापाला वाचवण्यासाठी त्यांच्या दिशेने धावायला लागतो. पण धावतानाच मी आळीपाळीने त्याच्या डोळ्यात पाहतो, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत त्यांच्या बचावासाठीच्या मदतीचे भाव दिवत नाहीत, जणू ते सांगतायेत, की ही अक्षरं वाचव! त्यानेच आपण सारे वाचू! पण मला हे कळतं इतक्यात ती अक्राळविक्राळ लाट आमच्या सर्वांवर चाल करुन येते. आणि क्षणार्धात सगळं काही अंधारात बुडून जातं, माझा श्वास लाटेमुळे कोंडतो, आधारासाठी माझा हात मायने घट्ट पकडलेला जाणवतो, तिच्या कृश हाताची पकड मला जाणवते. बस्स, यानंतर मला दचकून जाग यायची!
असेच काही दिवस गेले. माय आता बर्यापैकी ठीक झाली होती. म्हणतात ना, काळ सर्व दुखाःवरचं औषध असतं.माय आताही तशी जास्तवेळ अबोलच असायची, पण आधीसारखी स्वतःच्याच गुंगीत नसायची. ती भंगारासाठी रोज जायची हल्ली. म्हणून मी पहाटेचं दगड-रेती भरायचं काम सोडलं. आजकाल माय मला म्हणायची-
"पोरा तुला साळंतून काढलं तेवा, आमी लय वंगाळ केलं बग! तुला सायब जालेलं बगायचं व्हतं रं मला! तुज्यासाटी जीव तुटतो रं! माजी काय, आर्दी हाडं मसनात ग्येली, पन तूजी जिंदगी बाकी हाय! पोरा.. पोरा म्या जीव देतंय.. तू निगून जा हिकडनं! धोंड्यानं मेल्यानं तुल्या आयूस्याचं वाटुलं केलं बग! चांगला चार कीताबं सिकला आसतास, सायेब होऊन सीरीमन्त जाला आसतास, तर मी खुसीत मेले आसते बग! " मी यावर निरुत्तर व्हायचो, विषय बदलायचो. कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात बेवारस गाठोड्यासारखी टाकलेली ही शिकण्याची इच्छा उफाळून यायची आणि ती दुर्लभ असल्याने डोळ्यांच्या कडा पाणवायच्या. मोठा साहेब व्हायचं स्वप्न माझंही होतंच, पण त्या क्षणी मला ती अतिशयोक्ती वाटायची.
आता मी फक्त हाॅटेलातच कामाला जात होतो. जूनचा महिना असावा तो. हाॅटेलाच्या मागे असलेल्या दगडी इमारतीत बहुधा याच वर्षी शाळा सुरू झाली होती. स्टेशनवरून बरीच दप तर घेतलेली मुलं जाताना दिसायची इकडे. काही वेळा ती मुलं लवकर येऊन हाॅटेलात गोळ्या, चहा-बिस्किटं, वडा खायला थांबायची. अगदी राजासारख्या रुबाबात आॅर्डरी सोडायची ती मुलं. त्यांना त्यांनी मागितलेलं नेऊन देताना मला मेल्याहून मेल्यासारखं व्हायचं. ती मुलंही माझी टर उडवायची. माझ्यावर विनोद करायची, मी शांतपणे सहन करायचो. एके दिवशी मला काय झालं माहीत नाही, पण मी त्यांना उलटून काहीतरी बोललो. तेव्हा त्यातला एक मला म्हणाला- "अबे भिकारी, हम इस्कुल जाता हय! तुझसे हमारी बराबरी ?" हे माझ्या मनाला खूप लागलं. मीही त्यांना आवेशात म्हणालो, "मै इस्कुल जाता नय तो क्या, मुझेबी पढना आता हय!" यावर त्यांनी माझ्याशी त्यांचं पुस्तक वाचून दाखवण्याची पैज लावली. मला वाटलं, हाॅटेलात मालकासमोर मी काम सोडून वाचताना दिसलो, तर तो मला फोडून काढेल. म्हणून मी मालकाचा डोळा चुकवत त्या मुलांना घेऊन हॉटेलच्या बाहेर गेलो. तिथं मी त्यांचं पुस्तक हातात घेतलं. कितीतरी काळाने मी पुस्तकाला हात लावला होता. मी खूप खुश झालो होतो. ते मराठीचं पुस्तक होतं. मी पहिलं पान काढलं. पहिल्या धड्याचं नाव वाचलं, अडखळत. हळुहळू ओळी वाचायला घेतल्या. चाचरत. जसजसा वाचत गेलो, तसतसा मला आत्मविश्वास येत होता. काही कठीण शब्द नव्हते जमत, तेव्हा ती मुलंच अभावितपणे योग्य उच्चार सांगत होती. मी पुस्तकाच्या जवळीकीने आसपासचं भान विसरलो होतो.
इतक्यात माझ्या पाठीवर कोणाचातरी जोरदार धक्का बसला. हे अचानक झाल्याने माझा तोल गेला. मी सावरलो. हे कोणी केलं, हे पहायला मी रागाने मागे बघणार, इतक्यात कानांवर शब्द पडले,
" साsल्या, ह्ये समदं करतू तू कामाच्या येळात! शिकायचंय व्हय रं तुला ****!"
हे ऐकूनच भीतीने माझी गाळण उडाली. मालकाचा आवाज होता तो!! मी घाबरत त्याच्या पाया पडलो, त्याच्याकडे गयावया करू लागलो. पण तो मला बेदम मारतच सुटला होता. सोबत शिव्यांच्या लाखोल्याही वाहत होता. "*****, काम। नको करायला! मी काय तुजा बा हाय का तुला फुकट पोसायला! तरी तो शंकऱ्या बोललेलाच की तू लपून कागदाचं चिटोरं वाचत आसतूस म्हनून. तेवाच बडवायला हवा होता तुला! *** "
माराने मी विव्हळत होतो. मालकाकडे कितीही गयावया केली तरी तो ऐकत नव्हता. मालक काठीने मारायला लागला होता. बघ्यांची गर्दी जमली होती आसपास! माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते. अंगभर वेदना होत होत्या. मार लागलेल्या जागी आग होत होती, अंग चुरचुरत होतं. हाता-पायांतून, पाठीतून रक्तही येत होतं. अंगावर बरेच वळ उमटलेले जाणवत होते. अंग सुन्न झालं होतं. मला हे सगळं नकोसं झालं होतं. एकदाचा जीव जावा नि मी या मरणप्राय मारातून सुटावं, असंच वाटत होतं. बघ्यांमध्ये खुसपुस सुरु होती. ती माझ्या सहानुभूतीबद्दल होती, काही मालकाच्या बाजूने असलेली वाक्यंही ऐकू येत होती.
"कितना मारताहे ये आदमी उस बच्चेको! मर जायेगा ना अयसे"
"अरेरे, कितना लगा हे बच्चेको! "
"ये लडकेने जरुर कोई चोरी किया होगा! तो मार खायेगाही ना! ऐसाईच चाहीये इनके साथ! तब्बी सुधरते हे ये! "
पण असं असलं, तरी मला वाचवायला यातलं कोणीही पुढे होत नव्हतं. इतक्यात कोणाचातरी मोठ्याने आवाज आला,
" अहो किती मारताय या बिचार्या पोराला! मरेल ना तो अशाने! सोडा त्याला आधी! "
मी वर पाहिलं. एक शर्ट, फुल-पॅन्टीतला उंच, गोरा इसम मालकाला बोलत होता. त्याचं ऐकून मालक म्हणाला,
"आवो नाय सायेब! याचं रोजचंच हाय! तुमी जावा! हा साला मेला तरी सोडनार नाय याला! "
तेव्हा त्या माणसाने मला त्याच्याकडे ओढून घेतलं. तो मालकाला म्हणाला, "मी याच्यावर उपचार करायला घेऊन जातोय! अडवलेत तर पोलिसात देईन तुम्हाला! "
तसा मालक वरमला असावा. तो काही बोलला नाही. या माणसाने मला आधार दिला. मला कुठेतरी घेऊन जाऊ लागला. मला म्हणाला," फार लागलेय तुला बाळा! चल आपण मलमपट्टी करुन घेऊ! "
मी मान डोलावली, आणि चालू लागलो. मला वाचवणाऱ्या या माणसामध्ये मला देव दिसत होता.
क्रमशः.....
_____________________________
-जुई नाईक.
द्वादशांगुला
सर्व हक्क सुरक्षित.
वा. छान.
वा. छान.
स्टार ऐवजी सरळ शिव्या लिहा की. कथेची गरज आहे ती.
पुढचा प्रवास वाचायला ऊत्सुक.
जुई मस्तच हि पण भाग... सुरेख
जुई मस्तच हा पण भाग... सुरेख लिहीतेयस... पुभाप्र...
सगळे भाग लागोपाठ वाचले आज,
सगळे भाग लागोपाठ वाचले आज, एकदम जबरदस्त लिहिलंय
व्वा खुप सुंदर !!!!
व्वा खुप सुंदर !!!!
चांगली पकड ठेवली आहे
स्टार ऐवजी सरळ शिव्या लिहा की. कथेची गरज आहे ती.>>> +१
निरागट्ट् शब्द पहिल्यांदा ऐकला!!!
छान झालाय भाग...
छान झालाय भाग...
संघर्ष वाचत आहे .. लिखाण
संघर्ष वाचत आहे .. लिखाण नेहमीप्रमाणे उत्तम ..:) विपु बघ
जुई, छानच लिहिला आहेस हा भाग.
जुई, छानच लिहिला आहेस हा भाग... उत्कंठा वाढली आहे.. पुढचा भाग लवकर येऊ दे
शालीजी, सिद्धी, कल्पेशकुमार
शालीजी, सिद्धी, कल्पेशकुमार जी, पंडितजी, परीताई, किल्लीताई सर्वांचे खूप खूप आभार!!
स्टार ऐवजी सरळ शिव्या लिहा की. कथेची गरज आहे ती.>> बरं प्रयत्न करीन! जमलं तर लिहीन! खरंतर हे माझं मलाच प्रशस्त वाटत नाहीये!
जुई, छानच लिहिला आहेस हा भाग.
जुई, छानच लिहिला आहेस हा भाग... उत्कंठा वाढली आहे.. पुढचा भाग लवकर येऊ दे >>> धन्स उमानु जी ! लवकर टाकेन पुढचा भाग!
फार दिवसांनी पुढचा भाग आलाय..
फार दिवसांनी पुढचा भाग आलाय..
फार दिवसांनी पुढचा भाग आलाय..
फार दिवसांनी पुढचा भाग आलाय.. >> हो! कल्पना आहे. उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते.