कला क्षेत्रातली गुणवत्ता लोप पावत चालली आहे ?

Submitted by पशुपत on 29 June, 2018 - 07:32

मला बर्याच पूर्वीपासून एक गोष्ट जाणवते.
सर्व क्षेत्रात, गुणवत्ता मिळवणे किंवा उत्तमतेचा ध्यास घेणे हे समाजातून , माणसातून दिवसेंदिवस कमी होत चाललय. उलट्पक्षी प्रेझेंटेशन उत्क्रुष्ठ करणे याकडे सगळ्यांचा कल दिसतो.
याचाच आणखी एक चेहेरा म्हणजे , कसेही करून यश मिळवणे !

गंमत म्हणजे या सगळ्यात जे अपवादात्मक आहेत , सर्वसाधारणांपेक्षा उत्तम आहेत , ते यशस्वी होताना दिसत नाहीत.

कुणी एक सर्वोत्तम म्हणून टिकून रहात नाही , आणि सर्वसाधारण गुणवत्ता असलेले खूप लोक थोड्या काळासाठी चमकतात आणि लुप्त होतात.

उदाहरण घ्यायच तर साहित्य क्षेत्राचं घेता येइल. पूर्वी पु. ल. , अत्रे , शिरवाडकर , जी.ए., श्री.ना., ( नमुन्यादाखल काही नावे घेत आहे) अशी नावे होती. त्यांच्या लिखाणात सातत्य होते , गुणवत्ता होती. त्यांच्या हयातभर त्यांचे लेखन हे लोकप्रियतेत राहिले.
संगीतात सुधीर फडके , खळे , मंगेशकर कुटूंब , कुमार , भीमसेनजी अशी नावे होती.

आता च्या काळात नावे खूप दिसतील पण सातत्य नाही ... कामगिरीही उत्तमतेचे शिखर गाठणारी नाही....
काय असावे याचे कारण ?
चिंतन करण्याची , अथक कठोर परिश्रम घेण्याची , ध्येयासाठी झोकून देण्याची मानसिकता लोपली आहे ? लांब पल्ले गाठण्याचे स्वप्न पाहण्याचा धीर नाही म्हणून ?
का समाजातून गुरू लोप पावताहेत ? गुरुकुलाची जागा क्लासेसनी घेतली आहे म्हणून ?

विचार करण्याची गोष्ट आहे ......

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ता उपलब्ध झालेले जास्तीचे पर्याय हे एक उत्तर असू शकते का?
तांत्रिक प्रगती हे दुसरे कारण असावे.
म्हणजे पूर्वी एक लता प्रसिद्ध झाली, दुसर्र्या मुलीला लॉंचिंग पॅड मिळायला वेळ लागत होता,
आज एक श्रेया घोषाल प्रसिद्ध होते ना होते तो अजून 10 मुली तिला पर्याय म्हणून लोकांना माहीत आहेत,
आता श्रेया ला मेहेनत करून स्वतःला सिद्ध करायला वेळच नाही, तिचा परफॉर्मन्स पूर्ण भरात येण्या आधीच तिला मंचावर रिप्लेस केले जाईल

तसेच श्रेया पेक्षा बऱ्याच कमी प्रतीची गायिका घेऊन, तांत्रिक गिमिक करून उच्च दर्जाचा औटकम देता येतो, मग कोणी प्रीमियम देऊन अनुभवी/म्हणून महाग गायिका का घेईल?
(* इकडे श्रेया चे नाव एक उदाहरण म्हणून घेतले आहे, गायन क्षेत्रातील शिखर या अर्थाने घेतले नाही आहे).

शास्त्रीय संगीत जिकडे या तांत्रिक कारामतींना वाव नसतो तिकडे आजही कित्येक वर्षे मेहेनत करणारे कलावंत असेच बरीच वर्षे टिकून राहिले दिसतात.

गुणवत्ता आहे म्हणजे माझ्याकडे यश चालत येईल असा हा जमाना नाही. कधीही नव्हता. प्रचंड स्पर्धेमुळे फक्त गुणवत्ता असून चालत नाही. तर तुम्ही किती कँपेन करू शकता, तुमचा ग्रुप प्रभावशाली आहे का ? मीडीयात संपर्क आहे का ? त्या त्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी असलेल्या व्यक्ती, संस्थांपर्यंत तुम्ही पोहोचता का असे बरेच फॅक्टर्स आहेत. तुमच्याकडे जर यापैकी काही नसेल तर स्ट्रगलची तयारी ठेवावी लागते. जर इंन्फ्लुएंशिअल असाल तर स्ट्रगल काळ कमी असेल. नसाल तर कितीही असेल.

रिअ‍ॅलिटी शोज सुरू झाल्यामुळे पारंपारीक नृत्ये, गायन शिकवणा-या क्लासकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे. पालक आपला मुलगा टीव्हीवर दिसला पाहीजे यासाठी बॉलीवूड टाईल नृत्ये शिकवणा-या क्लासला प्राधान्य देताना दिसतात. त्यामुळे हा प्रकार मस्ट झालेला आहे. आता तुम्ही यालाच गुणवत्ता म्हणू शकता किंवा मग गुणवत्तेला किंमत नाही असेही म्हणू शकता. कालाय तस्मै नमः

पशुपत,

धाग्यातील मुद्दे फार महत्वाचे आहेत पण तुम्ही ते किंचित विस्कळीतपणे मांडले असावेत असे वाटले. कृपया राग नसावा.

असे सगळे होण्याची असंख्य कारणे आहेतच व ती सर्वजण करतील त्या चर्चेत येतीलच. मात्र मला एक कारण त्यातल्यात्यात अधिक महत्वाचे वाटते ते नुसते नोंदवून ठेवतो.

मुळातच समाजाची एकुण अभिरुची फार स्वस्त झाली आहे. उदाहरणार्थ, पूर्वी ज्या पातळीच्या नृत्याला, ज्या पातळीच्या गायनाला, ज्या पातळीच्या लेखनाला / शिल्पकलेला, वक्तृत्वाला (इत्यादी) एक अर्थपूर्ण, जाणकार दाद मिळायची त्यापेक्षा गुणवत्तेने खूप कमी असलेल्या कलाकृतींना आता सहजगत्या (व कदाचित तात्कालीन, कृत्रिम, कळपप्रवृत्तीतून वगैरेही आलेली, अज्ञानमूलक वगैरे अशी) दाद मिळते. आता ह्यात सगळेच सापेक्षही वाटेल. जसे, काहीजण म्हणतील की पूर्वीच्या चित्रपटातील मेलोडियस, कथा पुढे नेणारी, काव्याने रसरसलेली, अभिनयाने ओथंबलेली वगैरेच गाणी श्रेष्ठ कशावरून, आमच्या काळातील आयटेम साँग्जही श्रेष्ठच आहेत आमच्यामते! त्याला कोणी काही करू शकणार नाही. उदाहरणार्थ पद्मावत चित्रपटातील 'खलीबली होगया है दिल' हे अनावश्यक व प्रचंड धांगडधिंगा असलेले गीत आणि 'अभी ना जाओ छोडकर' (दोन्हीत कोणतेही साधर्म्य आहे असा दावा नाही, केवळ अर्थपूर्णता व मेलडी ह्या अनुषंगाने उदाहरणे घेतली आहेत) ह्यातील काय चांगले वाटते हे प्रामाणिकपणे मान्य करण्याची दानतही आता दिसणार नाही.

कलाकृतीने फक्त स्वतंत्ररीत्या (सर्वमान्य निकषांवर) चांगले असणे अपेक्षित नसते तर तिने रसग्रहण करणार्‍यांची अभिरुची समृद्ध करण्याचे कामही करायला हवे. गेली काही वर्षे नेमके उलटे घडत आहे. जितेंद्र श्रीदेवीने केलेली नृत्ये असोत किंवा एक हात फिरवला की वीसजण पार उलटे पालटे झाल्याचे दृश्य असो, गणपतीत नाचण्यापुरते 'चिपकाईले सैंया'गाणे असो किंवा हगण्या-पादण्याच्या विनोदांवर हसायला भाग पाडणे असो, अशी उदाहरणे फार दुर्मीळ आहेत की उत्तम दर्जाचे काहीतरी देण्यासाठी आवश्यक असलेला संघर्ष करण्याची कलाकारांची व संलग्नांची तयारी आहे. पुन्हा ह्याची कारणे व्यावसायिकच असणार, हेही खरे!

तंत्रज्ञानाचा अभाव किंवा वानवा होती तेव्हा समाजात आपुलकी, माणसांमधील नात्यांमध्ये असणारे शेकडो कंगोरे हे जिवंत होते. त्यामुळे पुल वगैरेंसारख्या प्रभृतींना विषयांची कमतरता तर नव्हतीच पण ट्रिगर पॉईंट्सही खूप मिळायचे. आता एखादी गोष्ट घडली की तासाभरात जगभर पोचत असेल तर इतक्या भाऊगर्दीत कोण संयमाने कला साकारत बसणार, हा एक दुसरा मुद्दा आहे.

तिसरा मुद्दा म्हणजे (पुन्हा तंत्रज्ञानामुळेच) एक पिढी आमुलाग्रच बदललेली आहे. आधी जो बदलाचा वेग होता त्याच्या कितीतरी पटीने वेगात बदल झाल्यामुळे संभ्रमित अवस्थेत असणारा समाज जे दिसेल त्याने क्षणभरापुरता झपाटून जात आहे व लगेच पुढेही जात आहे. अनेक चांगल्या कलाकृतींचे शेल्फ लाईफ आकुंचलेले आहे. त्यांच्यातील रसरशीतपणा तेवढा उचलून त्याची नक्कल करत पुढची कलाकृती निर्माण होत आहे.

आता मागे जाणे अशक्य आहे. पण प्रामाणिक लिहिणे शक्य आहे. प्रामाणिक कला सादर करणे शक्य आहे. करणार्‍यांनी तेवढे करावे असे वाटते.

-'बेफिकीर'!

योग्य मुद्दे मांडलेत पण काही सुटलेही आहेत. या सगळ्याला दुसरी आणि ऊत्तम, आशादायक बाजू सुध्दा आहेच. सविस्तर प्रतिक्रिया देईनच. सध्या ईतकेच.
चर्चा व्हायला हवी असा धागा.
धन्यवाद!

खूप दिवसांनी अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारं काहीतरी वाचायला मिळालं..
जर विशिष्ठ क्षेत्रात जम बसलेल्या बद्दल बोलायचं तर व्यावसायिक गणितं आहेत.
जम बसवू पाहणाऱ्या बद्दल बोलायच झालं तर प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे.
आणि एक समाज म्हणून बोलायच तर मागच्या पिढीतील यशाची व्याख्या आणी मोजायची परिमाण आता बदलेली आहेत.

हा विषय चर्चेसाठी घेतल्या बद्दल धनयवाद..

झी युवा वरचे संगीत सम्राट पहा.

कालच्या एपिसोडमधे नागपूरचा करमरकर नावाचा मुलगा आहे. कॉलेजात जाणारा वाटतो. आधी एकदा गाणं गायला आला. ते चांगले गायले.
काल दिलरूबा वाद्य वाजवून दाखवायला आला. ३ वर्षे स्वतःच शिकतो आहे म्हणे, अजून गुरूजींकडे शिकत वगैरे नाही . तरी अतिशय उत्तम वाजवत होता.

हा मुलगाही बघा.
https://www.youtube.com/watch?v=R7RcyPdI6Co

रिअ‍ॅलिटी शोजला सरसकट नावे ठेवण्यापेक्षा जे चांगल्या पद्धतीने शिक्षण चालू ठेवतात, तेच पुढे टिकतात असे म्हणावे लागेल. झी मराठीच्या लिटील चॅम्प्स चे उदाहरण आहे. त्यातली काही मुले/मुली अजूनही शिकत असून उत्तम प्रगती करत आहेत असे वाटते. ह्या शोजमधे त्यांना तिथले गुरु कधीकधी खूप चांगले सल्लेही देताना दिसतात.

अर्थात स्वत:ची जिद्द, घरची परिस्थिती, संगत (आणि पॉलिटिक्स) इ. बर्‍याच गोष्टींचा परिणाम होत असल्याने इतके सहज विश्लेषण करता येणार नाही. पण तरीही इतकी काही वाईट परिस्थिती नाही असे म्हणावेसे वाटते. "उम्मीद पे ..." वगैरे...

पशुपत, खुपच चांगला व विचार करायला लावणारा विषय मांडला आहेत. बेफिंनी म्हटल्या प्रमाणे एकूण समाजाची अभिरुची स्वस्त झाली आहे. आता आमच्या वेळचे ते सोने आणि तुमच्या पिढीचा तो कचरा हा वाद अनंत काळापर्यंत चालुच रहाणार. पण तरिही ज्याला पुर्वी "उत्तेजनार्थ" म्हणायचे ते हल्ली "एक नंबर" झाले आहे असे सतत जाणवतेच.
शेवटी सगळ्या वाहिन्यांना आपापला नाचाचा, गाण्याचा, विनोदाचा कार्यक्रम सुपर हिट दाखवायचा असतो. मग जज म्हणून बोलावलेल्या कलाकारांना (तेही हल्ली कोणालाही तज्ञ म्हणून उभे करतात म्हणा) अभिनय करायला लावतात. समोरचे सादरीकरण कसेही असले तरी त्यांनी चांगलेच म्हणायचे, चाबुक, खल्लास वगैरे म्हणून कौतुकाची खिरापत वाटायची असे केले कि एकूणच कलेचा दर्जा कमी असला तरी तोच फार भारी असे आपसुकच लोकांवर ठसवले जाते.
पुर्वी एक "मेरी आवाज सुनो" किंवा "सा रे ग म" होते. आज अगणीत वाहिन्यांवर लोक रोज गात आहेत. एवढे प्रचंड टॅलेंट भारतात असले तर लता, रफी, श्रेया वगैरेंचा महापुरच यायचा कि हो! अनेक विनोदी मालिकां मधे (हवा येऊ द्या तर त्यात नं एक वर), विषेश अतिथी आणि संयोजक सगळ्यात जास्त हएअत असतात आणि घरी बसून बघणारा प्रेक्षक उभ्या चेहर्‍यानी बघत असतो असे सारखे जाणवत रहाते. पण रोज विनोदाचा रतीब घालायचा म्हटला तर किती नविन सुचणार हो?
वाहिन्यांच्या पैशाच्या गणितामुळे कलेचा आणि अभिरुचीचा भेंडीबाजार होत चालला आहे हेच खरे.

रच्याकने - रोज दखवल्या जाणार्‍या मालिका तर आपल्या देशाचा एकूणच सामाजिक बुद्ध्यांक कमी करतात असे माझे मत आहे. स्वतःच्या मुलाचा संसार मोडायला टपलेल्या आया वगैरे बिनडोक प्रकार युद्ध कैद्यांना रोज सतत दाखवले तर ते छळछावणी पेक्षा कमी नसावे.

रच्याकने - रोज दखवल्या जाणार्‍या मालिका तर आपल्या देशाचा एकूणच सामाजिक बुद्ध्यांक कमी करतात असे माझे मत आहे. स्वतःच्या मुलाचा संसार मोडायला टपलेल्या आया वगैरे बिनडोक प्रकार युद्ध कैद्यांना रोज सतत दाखवले तर ते छळछावणी पेक्षा कमी नसावे >> +१ या मालिकांचा आणि कलेचा काहीच संबंध नाही.

<<< गंमत म्हणजे या सगळ्यात जे अपवादात्मक आहेत , सर्वसाधारणांपेक्षा उत्तम आहेत , ते यशस्वी होताना दिसत नाहीत. >>>
मुळात तुम्ही उत्तम आणि यशस्वी कुणाला ठरवता? खूप बक्षिसे जिंकली तर तो उत्तम असतो का? खूप कार्यक्रम केले, बिदागी जास्त घेतो, पेपरमध्ये जास्त फोटो येतात तर तो यशस्वी होतो का? जो यशस्वी आहे, तो उत्तम असतो का?

मुळात कला हा प्रकारच फार सब्जेक्टिव्ह आहे. एखादा गायक्/गायिका, वादक, चित्रकार, जादूगार, नट्/नटी हे सगळ्यांनाच आवडतील असे नाही, नेहमीच आवडतील असे नाही. मग तो कलाकार उत्तम नाही असे म्हणणार का? लोकांना तो आवडत नाही किंवा माहीत नाही म्हणून तो यशस्वी नाही का? बिस्मिल्ला खान सगळ्यांना माहीत आहेत म्हणून ते उत्तम आणी यशस्वी आहेत आणि रमेश खळदकर फारसे कुणाला माहीत नाहीत म्हणून ते मेहनत घेत नाहीत आणि त्यांच्याकडे गुणवत्ता नाही, असे आहे का? आत्ता काही दिवसांपूर्वी एका टेलरचा (शिवणकाम करणारा शिंपी) व्हिडियो बघितला होता, ज्यात तो केवळ शिलाईचे मशीन वापरून कशीदाकाम करतो आणि उत्तम पेंटिंग बनवतो. लोकांना तो माहीत नाही, म्हणजे तो उत्तम नाही का? पॉल क्ली या जगप्रसिद्ध कलाकाराची पेंटिंग्ज मी बघितली आहेत आणी मला ती एकदम भंगार वाटली. पण म्हणून तो फालतू ठरतो का की फक्त एलिट लोकांनी ठरवायचे असते, कोण यशस्वी आहे आणि कोण उत्तम आहे आणि कोण यशस्वी + उत्तम आहे.

असो, जगात असे भरपूर कलाकार आहेत जे उत्तम आहेत, कदाचित सगळ्यांना माहीत नसतील.
हे एक उदाहरण बघा, भले ती लता मंगेशकरइतकी प्रसिद्ध नसेल. https://youtu.be/uEqYzdz3Zvg
असे अनेक गुणवान कलाकार प्रत्येक श्रेत्रात आहेत.

सिनेमा आणि सिने/सुगमसंगीतात नवनवीन प्रयोगांचे प्रमाण आजच्या काळात वाढले आहे असे मला वाटते. त्यामुळे विविध जॉनर ऐकायला पाह्यला मिळतात.
साहित्यात विशेषतः मराठीत कादंबरी कथांत दर्जेदार नवीन वाचलेले नाही वा ऐकले नाही. पण यात मला माहिती नसणे हे कारण असू शकते, उपलब्धता नाही.

उलट आता, कला अभिजन वर्गाच्या, संसाधने ताब्यात ठेवणाऱ्या घटकांची मक्तेदारी राहिली नाहीये. काही ठरावीकच कलाकार त्या त्या क्षेत्रात मांड ठोकून बसले आहेत आणि त्यांच्यामुळे बाकी गुणवंतांना संधि मिळत नाही असे आजकाल बहुधा होत नाही. शिवाय प्रस्थापित माध्यमे, जिथे वशिलेबाजीशिवाय किंवा क्विड प्रो क्वो शिवाय कामे मिळणे पुर्वी अवघड असायचे त्या माध्यमालाच समांतर पर्याय उपलब्ध झाले आहेत. ही समांतर माध्यमे कमी खर्चीक, बऱ्यापैकी लोकशाहीवादी आणि सहज ॲक्सेसिबल आहेत. वेब सिरीज, युट्युब, इतर समाज माध्यमे यांतून किती कलाकार उदयाला येतात अर्थात त्यांची कारकिर्द फार मोठी असतेच असे नसते कारण प्रचंड स्पर्धा आहे आजकाल. प्रस्थापित माध्यमातून आलेले सगळेच महान व समांतर माध्यमातले सगळेच उथळ, सुमार असा माज आजकाल प्रस्थापितांनादेखिल राहिलेला नाही, तेदेखिल या माध्यमात शिरकाव करण्याचा प्रयत्न करतात. दुसरी गोष्ट अशी की सातत्याने काम करणारे अनेक कलाकार आजही आहेत पण त्यांना सातत्याने प्रसिद्धी मिळणे दुरापास्त झाले आहे.

सर्वांचे प्रतिक्रिया दिल्याबद्दल आणि त्याहिपेक्षा यावर विचार केल्याबद्द्ल धन्यवाद.
मी स्वतः या धाग्यात माझे वैयक्तिक विष्लेषण न लिहिण्याचे कारण असे कि वाचकानी पूर्वग्रह न ठेवता विचार करावा आणि ते बोलते व्हावेत.
एक गोष्ट स्पष्ट दिसते आहे कि प्रेक्षकांची / श्रोत्यांची अभिरुची खालावत चालली आहे. किंबहुना ती तशी होण्यात प्रसार माध्यमे आणि त्यांचे व्यावसायिक गणित यांचा मोठा वाटा आहे.

प्रतिक्रीयांमधून आणखीन एक पुढचा विचार सुचला .
गुणवत्तेचा आणि उत्तमतेचा ध्यास घेतलेले कलाकार असणार आहेतच. प्रश्ण आहे यांना या भाउगर्दीत शोधायचे कसे ? कदचित कमी प्रतीच्या कलाकारांना मिळणारे यश पाहून आणि त्यांची स्वतःची दुर्लक्षित स्थिती यामुळे हे खरे कलाकार नाउमेद , निराश होत असतील.
त्यांना प्रोत्साहित करणे हे कदचित अग्रक्रमाचे ठरेल.
मला उगाचच अ‍ॅन रँड यांच्या " जॉन गॉल्ट" आणि त्याच्या "विष्वाची" आठवण होते आहे....

एक गोष्ट स्पष्ट दिसते आहे कि प्रेक्षकांची / श्रोत्यांची अभिरुची खालावत चालली आहे. किंबहुना ती तशी होण्यात प्रसार माध्यमे आणि त्यांचे व्यावसायिक गणित यांचा मोठा वाटा आहे.>>>>
हे एखाद्या उदाहरणाने विषद करू शकाल का?

>>>>>हे खरे कलाकार नाउमेद , निराश होत असतील.
त्यांना प्रोत्साहित करणे हे कदचित अग्रक्रमाचे ठरेल.>>>>>
वर जसे बोकोबांनी म्हंटले आहे हे "खरे कलाकार" चा निकष वैयक्तिक अभिरुची प्रमाणे असणार ना? म्हणजे आपण परत त्याच चौकात आलो

कालपरत्वे मापदंड बदलत जातात. प्रत्येकवेळी एकच मापदंड घेऊन चालत नाही.
अगदी बहुतेकांना माहिती असलेले क्रिकेटचे उदाहरण घेऊयात. आज स्पर्धा वाढली तरी उत्तमोत्तम खेळाडू येत आहेत!
गायन लिखाण इत्यादी क्षेत्रात तसेच आहे. किशोरकुमार सारख्या गायकाला नौशादजी गायक मानत नव्हते 'तो काय गातो का किंचाळतो नुसता!' असे त्यांचे मत होते. तसेच आहे आजही गायक येत आहेत पुर्वी देखिल आजच्या सारखी गाणी होती चोरल्या ट्युन्स वरची होती . निरर्थक शब्दरचना असलेली देखिल होती. तसेच आजही काही अत्यंत उत्तम अर्थपुर्ण गाणी देखिल आहेत आणि उत्तमरित्या गायलेली आहेत. उत्तमोत्तम लिहणारे आहेत. पुर्वीसारखे रसिक मात्र कमी झाले आहेत कलावंत नाही असे मला काहीसे म्हणावे वाटते.
पुस्तके घेऊन वाचणार्‍यांची संख्या रोडावली आहे. वृत्तपत्रे लेखकांपेक्षा उत्पन्नावर लक्ष देणारी झाली.
संख्या कलाकारांची नाही कमी किंबहुना वाढली असावी असे मला वाटते.
आणि ह्या कलाकारांना देखिल रसिकाश्रय मिळेल तेंव्हा ते देखिल नांव मिळवतील

<<< मी स्वतः या धाग्यात माझे वैयक्तिक विष्लेषण न लिहिण्याचे कारण असे कि वाचकानी पूर्वग्रह न ठेवता विचार करावा आणि ते बोलते व्हावेत.
एक गोष्ट स्पष्ट दिसते आहे कि प्रेक्षकांची / श्रोत्यांची अभिरुची खालावत चालली आहे. >>>

लेखकाने स्वतः पूर्वग्रह न ठेवता विचार करावा की परिस्थिती खरोखर तशी आहे का? काळानुसार आवडीनिवडी बदलतात. पूर्वी संगीत नाटके होत आणि तेव्हा रसिकांना ती आवडत असत. आता संगीत नाटक होत नाही म्हणून मग हल्लीची नाटकं खालावलेल्या अभिरुचीची होतात काय? पूर्वीची नाटके, पुस्तके फार भारी आणि आता फक्त गल्लाभरू कचरा असे समजणे योग्य नाही.

रसिकांना काय आवडते आणि काय नाही, हे त्यांना स्वत:ला ठरवू द्यावे. कॉमन मॅनला शैलीचं ऐतिहासिक महत्त्व कदाचित कळत नसेल, पण त्याला काय आवडते आणि आवडत नाही ते कळते. सैराट्मधले गाणे आवडते, पण माहेरची साडीमधले आवडत नाही, असे तो म्हणू शकतो. जर एखाद्या रसिकाला दादा कोंडकेचे चित्रपट आवडत नसतील पण "चला हवा येऊ द्या" हा कर्यक्रम आवडत असेल तर त्याला उच्च अभिरुचीचा म्हणणार की खालावलेल्या अभिरुचीचा?

गुणवत्ता किंवा Quality विषयी थोडं,

Robert M Pirsig याने त्याच्या Zen and the Art of Motorcycle Maintenance या पुस्तकात सुरुवातीलाच Quality या विषयावर दीर्घ चर्चा केली आहे. त्याचा मतितार्थ काढला तर तो त्याच्याच शब्दात असा आहे
Quality is something which can not be described in definition , can not be quantified nor be measured, yet every one knows what Quality is !

उदहरण द्यायचे झाले तर मी सांगेन कि सर्वच जातीचे आंबे सुंदर , चविष्ट असतात , पण कोकणाच्या हापूस चे स्थान हे राजाचे आहे यात कुणाचेही दुमत होउ शकत नाही ; भले कुणाला वैयक्तिक पणे लंगडा , पायरी किंवा इतर कोणतातरी वेगळाच आवडत असेल !

कलेची गुणवत्ता लोप पावण्यापेक्षा लोकांची अभिरुची खालावलीय हे जास्त खरे आहे. समोर इतके काही वाढून ठेवलेय की त्यातला एक पदार्थ उचलून तो चवीने खाऊन त्याचा आनंद घेणे अशक्य झालेय. त्यामुळे कलाकार कलेविषयी न्यूनगंड तयार होतो. आपले काम चांगले होतेय की नाही, कुठे चांगले होते, कुठे चुकतेय काहीही प्रतिसाद मिळत नाही. त्यात जर झटपट प्रसिद्धी मिळाली तर ती गुणवत्तेमुळे की अजून काही बाह्य कारणांमुळे हे न कळल्यामुळे कलाकारांची वाढ खुंटते, झटपट प्रसिद्धी झटपट ओसरली की जास्त त्रास होतो.

गुणवत्ता खालावलेली नाही. कित्येक व्हिडीओज पाहिलेत, जिथे कलाकारांची गुणवत्ता दिसते. जास्त प्रसिद्धी म्हणजे जास्त गुणवंत हे गृहीतक मांडू नये. लता मंगेशकरकडे अफाट गुणवत्ता होती/आहे यात वाद नाहीच, पण ती तेव्हा एकटीच त्या शिखरावर विराजमान होती, तेवढी गुणवत्ता इतरांकडे नव्हती हेही तितकेच आहे. इतर गायिका होत्या पण प्लॅटफॉर्म एकच होता व तिथे प्रयोग करत बसायची कुणाला इच्छा/वेळ नव्हता.

आज तेवढ्याच गुणवत्तेचे अनेकजण आहेत, त्यामुळे यशोशिखरावर कुणी एकच दीर्घकाळ बसलाय असे होत नाही. माणूस बदलत राहतो. मुळात लोकांना एकच जण तिथे जागा अडवून बसलेला पाहणे आवडत नाही. त्यांना इतर ऑप्शन हवे असतात.

संख्या कलाकारांची नाही कमी किंबहुना वाढली ">>>

आता लेखनाचे बघा. लेखक बेसुमार झालेत अन वाचक शोधावे लागता हेत ।

कला शाखेकडे गुणवान मुलांचा ओढा नसणे, याचा काही संबंध आहे का घसरलेल्या दर्जाशी ? हल्ली कलेकडे यूपीएससी किंवा अन्य सरकारी परीक्षांचा अभ्यासक्रम या दृष्टीनेच पाहिले जाते. अशा परिस्थितीत साहित्यसेवा काय डोंबलाची करणार...
मग पुढे एखादा चेतन भगत सारखा एखादा आपल्याच आयुष्यातल्या टवाळक्यांना मसाला लावून पुस्तकं काढतो आणि त्यांना साहित्य म्हणायची पाळी येते.

चेतन भगत ला इतके सुमार का मानले जाते?
प्रत्येक पुस्तकाने आयुष्याचे सार बिरच सांगायला हवे का?
चेतन भगत ची नंतरची पुस्तके (रेव्हॅल्यूशन 2020, हाफ गर्लफ्रेंड,वन इंडियन गर्ल) ही मसालापट फॅक्टरी झाली तरी आधीच्या 4 मध्ये त्याची निरीक्षणे/प्रसंग मजेशीर आहेत.)

कलेची गुणवत्ता ही सापेक्ष संकल्पना आहे.
एखाद्याला जे उत्तम वाटेल ते दुसऱ्याला वाटेल च असे नाही आणि त्यात गैर काही नाही.
प्रत्येकाची आवड आणि समजून घेण्याची, आस्वाद घेण्याची कुवत प्रवृत्ती वेगवेगळ्या पातळीची असू शकते.

सचिन तेंडुलकर इतकी चांगली फलंदाजी येत नाही म्हणून इतर खेळणं सोडणार नाहीत.
लता मंगेशकर इतकं छान गाता येत नाही म्हणून इतर गाणं सोडणार नाहीत
त्याच्या परिने ते स्वतःचे प्रयत्न सुरु ठेवतात आणि त्यातून आनंद आणि लोकमान्यता मिळवण्याचा प्रयत्न करत असतात.

आपल्याला जे आवडेल ते घ्यावे बाकीचे सोडून द्यावे.

सर्वच क्षेत्रात स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे आणि यात टिकून राहण्यासाठी लोक वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत असतात. कोणी मेहनत करतो, सचोटीने प्रयत्न करतो,
काही जण सोपे मार्ग घ्यायला बघतात.
वशिलेबाजी, भ्रष्टाचार इत्यादी सगळीकडेच आहे. कलेच्या क्षेत्रात ही असणारच.
फक्त या मार्गाने जर कोणी जात असेल तर ते फार काळ टिकून राहणार नाहीत.

गुणवत्ता ही सापेक्ष संकल्पना आहे >> अगदी बरोबर.
पण कलेची गुणवत्ता ही सापेक्ष नसावी असे वाटतेय. कारण कला गुरूकडून शिकावी लागते. त्याचे मापदंड आज तरी ठळक आहेत. तिथून प्रत्येक कलाकाराची स्वतःची अभिव्यक्ती सुरू होते. त्यात त्याचं टॅलेंट दिसतं. तरतमभाव वगैरे वगैरे अस्तित्वात असतंच की. कलानिपुणता ठळक असते.
लता मंगेशकर यांच्या आवाजापेक्षा त्यांची गायकी कशी आहे ही गुणवत्ता. पार्श्वगायनाच्या बाबतीत त्यांनी मापदंड स्थापित केले आहेत. त्यावरून तुलना करता येतेच. अनुराधा पौडवाल आणि लतादिदी यांची वरच्या सुरात आवाज लावण्याची क्षमता, बारीक हरकती घेण्याची क्षमता अशी तुलना केली तर समजते. अलिकडे काही नव्या गायिका आहेत त्यांची गुणवत्ता कमी नाही असे वाटते.

शब्बीर, मुन्ना अझीझ सारखे गायक चमकले आणि गेले. उदीत नारायण, सोनू निगम यांनी त्यांना रिप्लेस केले. अरिजित सिंगचा एकसुरी आवाज लवकरच रिप्लेस होईल असे वाटते.

दुर्दैवाने कलेच्या क्षेत्रात प्रचंड पैसा आलेला आहे त्याचबरोबर स्पर्धाही. स्पर्धेमुळे कमी मानधन घेणारे पण तुलनेने कमी गुणवत्ता असणारे चमकतात. पण काही काळच. लंबी रेस का घोडा असण्यासाठी गुणवत्ता असणे आवश्यक आहे.

गुणवत्ता, अभिरुची व मूल्यमापन व्यक्तिसापेक्ष आहेतच व हे सगळ्यांनीच वर लिहिलेले आहे

एकूण चर्चा वाचून असे वाटते की बहुधा सर्व कलाकृतींचा रसिकांच्या गळ्यातील ताईत होण्याचा कालावधी वेगाने कमी कमी होत चालला आहे

ह्याचे मूळ जितके प्रचंड बदललेल्या जीवनशैलीत आहे तितकेच कलाकृती वेगवान व मूल्यरहीत जीवनशैलीसाठी निर्माण होण्यातही आहे

आता , सध्याची जीवनशैली मूल्यरहीत आहे की नाही आणि मुळात मूल्य कसली ह्यावर नक्कीच मतमतांतरे असतील

मूल्ये 'लगे हाथ' चेक करण्यासाठी राज, ऋषी, रणवीर ह्यांच्या चित्रपटांमधील कथानके उपयुक्त ठरावीत

उदाहरणार्थ, आवारा, बॉबी आणि वगैरे

प्रत्येकाने आपल्यातला काही दशकांपूर्वीचा माणूस आणि आजचा माणूस ह्यामधील फरकाबाबत सोयीस्कर असेल ती थिअरी लागू करावी इतकेच आता होईल व होणार

ज्या कलाकृतींना तात्कालिक, प्रचंड व स्वस्त दाद मिळते त्यांचे आयुष्यमान क्षणभंगुर का असते हे मात्र पाहायला हवे असे प्रामाणिकपणे वाटते

दादा कोंडकेनी समाजाच्या मुळात असलेल्या अभिरुचीचाच फायदा घेऊन गल्ला कमावला, मंजुळेंनी क्राईम पॅट्रोलचा चित्रपट केला

पण दादा कोंडकेच्या कविता वाचलेल्या नाहीत, मंजुळेच्या कविता घुसतात

एक शाप असतो, एक वरदान! शाप आणि वरदान दोन्ही गाजतात. पण आयुष्याच्या सायंकाळी वरदानच स्मरते.

उदहरण द्यायचे झाले तर मी सांगेन कि सर्वच जातीचे आंबे सुंदर , चविष्ट असतात , पण कोकणाच्या हापूस चे स्थान हे राजाचे आहे यात कुणाचेही दुमत होउ शकत नाही ; भले कुणाला वैयक्तिक पणे लंगडा , पायरी किंवा इतर कोणतातरी वेगळाच आवडत असेल !
<<
"कुणाचेही दुमत होऊ शकत नाही" हा गैरसमज आहे.

ज्याने आयुष्यात कधी अभिजात पाश्चात्य संगीत ऐकलं नाही, त्यातली जाण समज नाही, त्याला त्यातले ओ की ठो कळत नाही. हे काय किंचाळताहेत असे वाटते, तोच प्रकार भारतीय शास्त्रीय संगीताचा आहे.

चेतन भगतला सुमार का म्हणतात? उत्तर म्हणजे बाबा कदम, गुरुनाथ नाईक यांना अभिजात लेखक का म्हणत नाहीत?

आता गुणवत्ता म्हणजे काय? अन अभिजात किंवा उच्च अभिरुची कशाला म्हणायचे?

अन्ना नंतर, अनेकानेक वर्षे माणसाला रिझवणारी एकच गोष्ट आहे.

१. सेक्स प्रणयापासून पोर्नोग्राफीपर्यंत व १. व्हायोलन्स. युद्धस्य कथांपासून आर्पीजी गेम्स पर्यंत.

या पलिकडे अन अलिकडेही बाकी सगळे कॉण्टेक्स्ट बेस्ड असते. तथाकथित उच्चभ्रू टोळक्यात बसलो, की सवाई गंधर्व किती उच्च, अन हळदीच्या डीजेमधे नाचायला कोंबडी पळाली किंवा झिंगाटला छान म्हणायचं.

फाल्तू लोकांची अभिरुचीच कमी झालिये वगैरे गळे काढण्यात काही पॉइंट नाही. अगदी माझ्या वयातल्याही बर्‍याच लोकांना अगदी जुनं हिंदी पिक्चरचं 'सारंगा तेरी याद मे' कालीन मुझिक बोअर होतं, अन मला आजकालचे पंजाबी गळे काढलेले ऐकून इरिटेट होतं.

पुस्तकांचं म्हणावं, तर मराठीत नवं काही छापिल पुस्तकरूपी ओरिजिनल लिहिलेलं दिसणं फार काळापासून बंद झालंय. अनुवादांचा जो सुक्काळ झालाय तो पाहून मी मराठी वाचणं आवरलं, यालाही कित्येक वर्षे लोटली. पण याचा अर्थ या अनुवादांना गिर्‍हाईक नाही असा नाहीच. इन फॅक्ट वाचक आहेत म्हणून तर हे छापून विकलं जातंय की!

बाकी अभिनयाचं काय बोलावं? चित्रपटांतून निघून जाहीर सभांपर्यंत उच्च दर्जाची अ‍ॅक्टिंग पहायला मिळतेय. नृत्य, नाट्य, शास्त्रीय संगीत यांचा आस्वाद घ्यायला लोकांजवळ वेळ नाही, अन ते एक्स्प्रेस करायला शिकण्याइतपत कलाकारांजवळ दम नाही.

चित्र शिल्पकलेबद्दल म्हणावं तर यात कुठे कमतरता आलेली दिसत नाही. इन फॅक्ट नवे मेडियम अन नव्या एक्स्प्रेशन्स होताहेत. डिजिटल आर्ट अन फोटोग्राफी कुठल्याकुठे जाऊन पोहोचते आहे. 3D प्रिंटिंगने अन कॅड डिझाइन्सनी किती उंची गाठली आहे! चौसष्ठवरून चौर्‍यांशीपर्यंत तर कला नक्कीच पोहोचल्या आहेत. (आसने देखिल ८४ च्या पुढे वाढली असावीत असा अंदाज करायला वाव आहे. Lol )

तेव्हा गुरुकुलांच्या काळात जाऊन कलाकारांनी कला शिकावी, अन विद्यार्थ्यांनी विद्या, असले विचार केले, तर पोटापाठी धावणारं जग तुम्हाला सोडून फार पुढे निघून जाईल हे नक्की.

***
रच्याकने. 'मथितार्थ'. मंथन करून काढलेला. मथित. अर्थ

नृत्य, नाट्य, शास्त्रीय संगीत यांचा आस्वाद घ्यायला लोकांजवळ वेळ नाही, अन ते एक्स्प्रेस करायला शिकण्याइतपत कलाकारांजवळ दम नाही.>>
अगदी पूर्णविरामासकट पटलं. अभिरुची, कलेचा आस्वाद म्हणजे मिनिटा-सेकंदाचा खेळ नाही. उंची वाईनसारखीच कलेची "टेस्ट" डेव्हलप करावी लागते.
आजच्या काळात इतका वेळ काढणं (कलाकारांसाठीसुद्धा) बर्याच लोकांना शक्यच नाही.

Pages