'गणेश कसबे
सोशल वर्क'
हे नाव पुकारलं गेलं, आणि समोर बसलेल्या अनेक दिग्गजांमधली एक सावळ्या वर्णाची, मात्र चेहर्यावर प्रसन्नतेचं, समाधानाचं तेज ल्यालेली, साधारण साठीला झुकलेली, बारीक अंगकाठीची व्यक्ती उठून उभी राहिली. त्यांनी एक दीर्घश्वास घेतला, शांतपणे. टाळ्यांच्या कडकडाटातच ते समोर आले. सात- आठ पावलं समोर असलेल्या मा. राष्ट्रपतींना किंचित वाकून नमस्कार केला, आणि ते चालत मा. राष्ट्रपतींच्या समोर आले. त्यांच्या देहबोलीतून प्रचंड आत्मविश्वास जाणवत होता. मा. राष्ट्रपतींनी त्यांच्याशी हस्तांदोलन केलं, आणि त्यांच्या कोटावर 'पद्मश्री'पुरस्काराचं कांस्यचिन्ह लावलं. त्यानंतर मा. राष्ट्रपतींनी त्यांच्या हातात प्रमाणपत्र दिलं. फोटो काढण्याचा सोपस्कार पार पडला, आणि ते - पद्मश्री विभूषित श्री. गणेश कसबे आपल्या जागेवर जाऊन बसले. पुढे पुरस्कारांचं वाटप होतच राहिलं, पण त्यांचं मन मात्र कित्येक वर्षं मागे जाऊन पोहोचलं होतं, आपसुकच.
_________________________________________
" अsय गण्या! उट! साळंला नाय जायाचं? चल, निघ बिगीनं"
आईची, माझ्या मायेची हाक ऐकू आली नि मी पहाटेच्या साखरझोपेतून कुरकुरतच जागा झालो. डोळे चोळून किलकिले करत मी पाहिलं, माय भाकर्या बडवत होती. तिच्या हातातल्या दोन- तीन हिरव्या बांगड्यांची किणकिण आमच्या अगदीच लहानशा, सारवलेल्या खोलीत घुमत होती. चुलीचाच काय तो उजेड. बाहेर पुरेसं उजाडलेलंही नव्हतं. मिशेरीचा वास हळुहळू कमी होत होता. माझा बाप ज्यांला 'बा' म्हणायचो, त्याला आणि मायला मिशेरी लागायची दात घासायला. हो, 'तो' बापच. त्याला कधीही मी अहोजाहो केलेलं आवडायचं नाही, कधी मजेत म्हटलंच तर वाकडं तोंड करत बोलायचा, " ल्येका, तुजा बा मजूर हाय साधा! सायब नाय." तेव्हा मी मनाशी गाठ बांधून ठेवायचो, की मोठ्ठा साहेब होऊन बापाला चांगले दिवस दाखवणार!
रोज सकाळी मी उठल्याबरोबर तो मला " ह्हा बघ बाल्या उटला! " असं खुशीत म्हणून उचलून घ्यायचा, आणि प्रेमाने माझा गालगुच्चा घ्यायचा. मला ते आवडायचं नाही, म्हणून मी चुळबुळ करायचो. तसा तो मोठ्ठ्याने हसायला लागायचा, आणि माझे हात त्याच्या गळ्याभोवती टाकत मला पोत्यासारखं पाठीला लटकवून घ्यायचा, नि गमतीने " कांदे बटाs टे! " बोलत बाहेर मला आंघोळीला घेऊन जायचा. हे असं बोललेलं मात्र मला खूप आवडायचं, नि मी हसायला लागायचो. मला आठवतं, हा रोजचा मला उठवायचा सोहळा चालू असताना न थांबता भाकरी बडवणार्या आईच्या हातातल्या बांगड्यांची किणकिण तेवढावेळ मात्र थांबायची. ती माऊली आम्हा बापलेकाच्या प्रेमाकडे डोळे भरून बघत असावी. मी होतो तेव्हा फक्त आठ वर्षांचा. यत्ता तिसरीत.
पण आज मात्र बा मला उठवायला आला नाही. मी इकडेतिकडे पाहिलं, बा खोलीत नव्हताच. मी उठून बसलो आणि मायला विचारलं. " माय, बा कुटं हाय? "
माय माझी नजर चुकवत म्हणाली, " पोरा, आजपास्नं जादाचं काम मिळालं हाय यास्नी! पन पार गावच्या येशीपासचं हाय. मगून बिगीनं गेल्याती ते आज. तुज्या मास्तराला सांग, दुपारच्याला पैसं देतं मगून! "
मला हे ऐकून कालचा शाळेचा दिवस आठवला. पेंडसे मास्तरांनी मला शाळेचा पूर्ण वेळ उभं ठेवलं होतं आणि दुसर्या दिवशी, म्हणजे आजच फी न भरल्यास शाळेत येऊ नको, असं खडसावून सांगितलं होतं. मी रडतच घरी आलो होतो, आणि माय - बापाला सगळं सांगितलं होतं. ते दोघंही विचारात पडले होते. चिंतेतच बापाने जेव्हा मला सांगितलं होतं," मी बगतो कायतरी!" ; तेव्हा कुठे माझी कळी खुलली होती. मी नंतर बाहेर खेळायला गेलो होतो, तेव्हाच या दोघांनी पैशांबाबत काही ठरवलं असावं. कारण मला माझ्यासमोर ते काही बोलल्याचं आठवत नाही.
माझा बाप शेतमजूरीसाठी, नाहीतर गावच्या दामू गवंड्याच्या हाताखाली काम करायला जायचा. कधीकधी हाताला पडेल ती कामं करायचा. ही कामं गोठा साफ करण्यापासून घरं शाकारण्यापर्यंतची असायची. मायही मोलमजुरी करायची. पण काही महिन्यांपूर्वी बापाचं नि दामूकाकाचं बहुतेक मजूरीच्या पैशांवरून भांडण झालं. चूक तर दामूकाकाचीच होती. शेवटी गरिबाचंच झुकतं माप मानून काही चूक नसताना बाप दुसर्या दिवशी दामूकाकाची माफी मागायला गेला, तर अर्वाच्य शब्दांत बापालाच सुनवून त्याने बापाला हाकललं. दामूकाकाच्या हाताखाली असताना कामांची शाश्वती तरी असायची. कारण शेताची कामं आमच्या गावात एका हंगामातच व्हायची. उरलेले महिने कसेबसे दामूकाकाने दिलेल्या मजूरीत जायचे. पण आता खायचेच वांदे झाले होते. आईलाही इतकी कामं मिळत नव्हती. खोलीचं भाडं तर दोन-तीन महिन्यांचं थकलं होतं. खोलीमालक कधीही आम्हाला तिकडून घालवायला आला असता. वर दुष्काळात तेरावा महिना, म्हणून हे शाळेच्या फीचं संकट आलं असावं.
मी तयार होऊन शेजारच्या मुलांसोबत शाळेत गेलो. मास्तरांनी विचारलं, तेव्हा मी आई जे बोलली ते त्यांना सांगितलं. ते त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने नाकात म्हणाले, " बरं ठीकाय! दिलें नाहीत तर संध्याकांळीं घरीं येतो, कांय? " मी होकारार्थी मान हलवली, नि वर्गात माझ्या जागेवर जाऊन बसलो. दुपारी शाळा सुटता- सुटता बाप शाळेत आला, घामाने चिंब भिजलेला, अंगावरच्या कपड्यांना माती लागलेली, दमलेला, असा. माझ्याकडे बघून बाप कनकुसं हसला. ते हसणं घरचं दुःख चव्हाट्यावर न येऊ देण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याचं होतं. ते हसणं गलितगात्र मात्र तरीही माझ्याखातर आनंदाचं पाणी चढवलेलं होतं. गुरूजी बाहेर आले, आणि बापाने कनवटीला बांधलेले पैसे काढले आणि गुरूजींच्या हातात टेकवले. गुरूजी तिरसटपणे म्हणाले, " खूंपच लंवकर भरल्यांत हो फिया! पुंढल्या वरसालांच भंरायच्यांत!" यावर बाप काहीही बोलला नाही.
माझा हात त्याने पकडला, आणि आम्ही चालू लागलो. बापाच्या हातावर पडलेले घट्टे माझ्या नाजूक, चिमुरड्या हातांना जाणवले, तसं मी माझा हात झटकला नि लगेच त्याचा हात समोर धरून पाहू लागलो. चांगलेच घट्टे पडले होते बापाच्या हाताला. मी काळजीने म्हणालो, " बा, काय ह्ये? तुज्या हातानला काय जालंय रं? कुटं गेलतास, खरं बोल!" बापाने सुस्कारा सोडला, नि तो म्हणाला, " आरं गण्या कामावं गेलतो रं! दुपारच्याला फिया भरायच्या व्हत्या ना! मगून सांदच्यापतूर करायची कामं दुपारपतूरच केली रं." यावर मी त्याला म्हणालो, " बा, आता जाव नको कुटं! मायला तेलाचं चमचं घालायला सांगतु तुज्या हातावर. " यावर बापाने माझ्याकडे कौतुकाने पाहिलं आणि नंतर आम्ही चालत घरी आलो. पण मला का कोण जाणे, बाप खोटं बोलतोय, असं माझ्या मनाला कुठेतरी वाटलं. ..................../लेखिका- द्वादशांगुला/जुई नाईक/
संध्याकाळी मित्रांसोबत खेळायला गेलो, तर गावात कसलीतरी गडबड वाटत होती. कोणाला तरी आपापसात बोलताना ऐकलं, की गावातल्या एका बर्यापैकी पैसेवाल्या, बेवड्या माणसाच्या घरात - किर्याकाकाच्या घरात चोरी झाली होती. त्यांच्या घरातला काही ऐवज लंपास झाला होता. त्यांचे वडील सावकार होते. बापजाद्यांनी कमावलेले पैसे दारूपायी जाळत. एकटेच रहायचे. दिवसरात्र घरामध्ये नशेत पडून असायचे. चोरी बहुधा आदल्या दिवशी रात्री झाली असावी. भरपूर दारू ढोसलेल्या किर्याकाकाला जेव्हा दुपारच्या सुमारास शुद्ध आली, तेव्हा म्हणे त्याला चोरी झाल्याचं कळलं. त्याने पोलिसात कळवलं होतं. त्याने बराच तमाशा केला होता गावात. वर एक श्रीमंत म्हणून त्याचा गावात दबदबा होताच.
त्यानंतर मी घरी आलो, तेव्हा संध्याकाळी घरात शिरताना मायला हे सहज सांगितलं. तेव्हा मायचा आणि बापाचा चेहरा मला किंचित चरकल्यासारखा वाटला. ते दोघं किंचित घाबरल्यासारखे दिसत होते. पण हे कळण्याचं, त्यांना काही विचारण्याचं माझं वय नव्हतं. मी नंतर चुलीपाशी अभ्यास करत बसलो आणि हे विसरूनही गेलो. सकाळी जाग आली ती मायच्या हंबरडा फोडण्यानेच. बापाला पोलिस शिवीगाळ करत पकडून नेत होते, फटकारून काढत होते; आणि माय त्यांना हात जोडून, पायाशी लोळण घेऊन बापाला न नेण्याबद्दल विनवत होती. आजुबाजूला बरीच गर्दी जमली होती. पोलिसांच्या काठ्यांचे तडाखे प्रसंगी मायलाही पडत होते. पण ती बिचारी कसोशीने बापाला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. बापही त्यांना विनवत होता. पण पोलिस शेवटी बापाला घेऊन गेलेच. बापाला किर्याकाकाघरच्या चोरीत दोषी ठरवण्यात आलं होतं. त्याला सहा महिन्यांची कोठडी सुनावण्यात आली होती. खरं सांगतो, त्यादिवशी मला पहिल्यांदाच बापाचा तिरस्कार वाटला होता.
ते सहा महिने आम्ही कसेबसे काढले. खोलीमालकाने तर "असले चोर नकोत या खोलीत!" म्हणून दुसर्या दिवशीच आम्हाला हाकललं होतं. आम्ही रस्त्यावर आलो होतो. खोलीमालकाने तर खोलीतलं आमचं सामानही आम्ही भाडं न भरल्याने त्याच्याकडेच ठेवून घेतलं होतं. मी आणि माय रात्री गावच्या पारापाशी झोपायचो. सारं गाव किर्याकाकाच्या बाजूचं. पूर्ण गाव आमचा तिरस्कार करायचं. त्यामुळे मायला एकही काम मिळायचं नाही. अक्षरशः भीक मागून दिवस काढले आम्ही. आमचे कोणी गावात नातेवाईकही नव्हते. आजाला त्याच्या उमेदीच्या काळात इथे मजूर म्हणून कुठूनतरी आणलं गेलेलं आणि त्याला एकच अपत्य- माझा बाप. आजा-आजी मी गुडघ्याएवढा असतानाच वारलेले. आणि आईच्या गावाला जावं, तर ते पंचक्रोशीबाहेरचं. तिथे जाण्यासाठीच्या बैलगाड्यात आम्हाला कोणी घेणार तर नव्हतंच, पण माझी माय स्वाभिमानी होती, हेही तिथे न जाण्याचं एक कारण होतं. वर वर माझ्या समाधानासाठी खंबीर असल्याचं दाखवणारी माय मी रात्री झोपेत असताना तोंडाला पदर लावून अश्रू ढाळायची. तिच्या उभ्या आयुष्यात तिने इतके लाचारीचे दिवस कधीच बघितले नसावेत.
दरम्यान माझी शाळाही सुटली होती. शाळेत सर्व मुलं मला 'चोराचा पोरगा' म्हणून हिणवायची. मी त्यांच्या वस्तू चोरीन, या शंकेने मला त्यांच्या आसपासही फिरकू द्यायची नाहीत. मास्तरही पदोपदी बापाच्या गुन्ह्याचा उल्लेख करायचे. मी या सगळ्याला कंटाळलो होतो. पदोपदी होणारी अवहेलना नको वाटत होती. आणि एक दिवस मास्तरांनी मला सांगितलं, की यापुढे शाळेत येऊ नकोस. मायला मी हे ऐकवलं, तेव्हा यावर तीही काही बोलली नाही, लाचार हसली फक्त. शाळेची वाट धुसर झाली होती. कधीकधी शाळा, खेळ, मिळालेली शाबासकी हे सारं आठवून डोळे पाणावायचे. कधीकधी एकटाच नदीच्या तीराजवळच्या आडबाजूला जाऊन खूपवेळ बसायचो. पाठ उन्हाने तापायची, पण पर्वा नसायची. काठीने वाळूत शब्द, अक्षरं खरडायचो. नदीच्या पाण्याने ती अगदी पुसून जाईपर्यंत त्यांच्याकडे एकटक बघत रहायचो. पण का कोण जाणे, ही वाळूतली अक्षरं पुसली जातानाचे दृश्य बघताना मला माझ्या भाळावरच्या उज्ज्वल नशीबाच्या रेषाच पुसून जाताहेत; असा भास व्हायचा. मग मी नदीच्या लाटा अडवायला धावायचो. हं! एक व्यर्थ प्रयत्न! ही अक्षरं पुसून जाताना कधीकधी भडभडूनही यायचं, उगीचच! मात्र अक्षरांच्या जागी कोरी सपाट वाळू पाहून फार रितं रितं वाटायचं, हे खरं! मग विषण्ण मनाने घरी परतायचो.
कसेबसे ते अंगावर धावून येणारे सहा महिने उलटले. बाप सुटला. तो खंगला होता. त्याच्या दाढीमिशा वाढल्या होत्या. कीव वाटली मला त्याची. आता पुढे काय, हा प्रश्न अजस्त्र पशूसारखा समोर उभा ठाकला होता. बापामध्ये त्या जेलातल्या लोकांसोबत राहून सूक्ष्म बदलही झाले होते. आल्यावर त्याने आम्हाला आम्ही कसे दिवस काढले, याबाबत साधं विचारलंही नव्हतं. संयमी असणारा माझा बाप हल्ली कोणत्याही गोष्टीवर पटकन चिडायला लागला होता. आम्ही बापाला काही सांगणं, म्हणजे त्याला ते आमचं उर्मटपणे तोंड वर करून बोलणं वाटू लागलं होतं. शब्दाशब्दावर तो हात उगारायला लागला होता. बापाची प्रथमच भीती वाटू लागली होती. मायही चकीत झाली होती. तिने बापाच्या हातचा मारही खाल्ला होता. आणि किर्याकाका तर आमच्या जीवावर उठला होता. त्याचा मुद्देमाल न सापडल्याने तो धुमसत होताच. त्याने जागोजागी माणसं पेरून आम्हाला वाळीतच टाकलं होतं. मग घाईतच आमची मतं जाणून न घेता बापाचं ठरलं,
शेकडोंची पोशिंदी मुंबैमाता आपल्याला पदरात सामावून घेईल.
-------------------------------------------
-जुई नाईक.
द्वादशांगुला
सर्व हक्क सुरक्षित.
जुई मस्तच आहे पहिला भाग....
जुई मस्तच आहे पहिला भाग.....नेक्स्ट पार्टच्या प्रतीक्षेत....
धन्स सिद्धी!
धन्स सिद्धी!
खुप छान, अगदी डोळ्यासमोर उभं
खुप छान, अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं
धन्यवाद शितलजी!
धन्यवाद शितलजी!
खुप छान सुरवात केलीए. मस्तच!
खुप छान सुरवात केलीए. मस्तच!
मस्त सुरूवात.. पुभाप्र..
मस्त सुरूवात.. पुभाप्र..
छान सुरुवात!
छान सुरुवात!
द्वादशांगुला/जुई नाईक/ >>>> हे मधे मधे का टाकलय?
मस्तच
मस्तच
बापाने माझ्याकडे कौतुकाने
बापाने माझ्याकडे कौतुकाने पाहिलं आणि नंतर आम्ही चालत घरी आलो. पण मला का कोण जाणे, बाप खोटं बोलतोय, असं माझ्या मनाला कुठेतरी वाटलं. /द्वादशांगुला/जुई नाईक/>>>> इथे सुधर
बारकावे सुंदर टिपलेत . लिखाण
बारकावे सुंदर टिपलेत . लिखाण आवडले .
पण गावाकडे उकिरड्यावर जनावरांचे शेणच मिळते . अन्न टाकत नाहीत . शिळे अन्न दुसऱ्या दिवशी सुध्दा खातात गरम करुन . त्यादृष्टीने खटकले . थोडा बदल करु शकाल तर .... जसे काही दिवस शेजारच्या छोट्या शहरात काढणे वैगेरे .
हे माझे वैक्तिक मत .
पुनश्च लिखाणशैली सुंदरच ....
छान लिव्हलय...नवीन भाग लवकर
छान लिव्हलय...नवीन भाग लवकर येऊ द्या
खूपच छान सुरुवात... नविन
खूपच छान सुरुवात... नविन भागाच्या प्रतीक्षेत...लवकर येवू दे
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
द्वादशांगुला/जुई नाईक/ >>>> हे मधे मधे का टाकलय?}>>
/द्वादशांगुला/जुई नाईक/>>>> इथे सुधर}>>
मी गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करते, मात्र लेखनचोरी टाळण्यासाठी मी हे टाकले आहे.
पण गावाकडे उकिरड्यावर जनावरांचे शेणच मिळते . अन्न टाकत नाहीत . शिळे अन्न दुसऱ्या दिवशी सुध्दा खातात गरम करुन . त्यादृष्टीने खटकले . थोडा बदल करु शकाल तर >>>> मला प्रत्यक्ष पाहून माहीत नाही; मात्र 'अशोक जाधव' यांच्या आत्मचरित्रात 'उकिरड्यावरील बुरशी लागलेले भाकरीचे तुकडे खाल्ले', असा संदर्भ आहे. पण बदलते तो भाग!
मस्त लिहीलय. पुभाप्र
मस्त लिहीलय.
पुभाप्र
धन्स पंडितजी!
धन्स पंडितजी!
दमदार सुरुवात, पुलेशु
दमदार सुरुवात, पुलेशु
हृदयद्रावक कथानक
धन्यवाद अंबज्ञजी!
धन्यवाद अंबज्ञजी!
छान लिहिलंय. तुझी कथा म्हणून
छान लिहिलंय. तुझी कथा म्हणून वाचून काढली...असच लिहीत राहा.
धन्यवाद आर्यनमॅन जी!
धन्यवाद आर्यनमॅन जी!
तुझी कथा म्हणून वाचून काढली.>>>> याबद्द खास धन्स!