कंपोस्टिंगचे एक वर्ष

Submitted by वावे on 6 June, 2018 - 08:45

भाज्यांचे आणि फळांचे देठ, साली, बिया, उरलेले, नासलेले अन्न, अंड्यांची टरफले, मांसाहारी स्वैपाकातून उरणारे हाडांसारखे टाकाऊ पदार्थ ही नावे उच्चारली तर प्रथम काय डोळ्यासमोर येतं ? भरून वाहणारी कचराकुंडी आणि दुर्गंध, हो ना? पण या सगळ्या घटकांमध्ये फक्त अजून २ घटक मिसळा- जीवाणू आणि थोडीशी इच्छाशक्ती- मग पहा काय तयार होतं ? झाडांसाठी अत्यंत पोषक असं कंपोस्ट!

मार्च महिन्यात मला कंपोस्टिंग सुरू करून एक वर्ष पूर्ण झालं. या एका वर्षात मी माझ्या घरात तयार होणार्या ओल्या कचर्यापासून जवळजवळ पन्नासएक किलो कंपोस्ट खत तयार केलं. मी कुंडीत लावलेल्या झाडांसाठी तर ते खत वापरलंच, पण शिवाय सोसायटीतल्या अनेकांनी माझ्याकडून कंपोस्ट खरेदी केलं. शिवाय, माझं पाहून सोसायटीतल्या अजून दोघीजणी त्यांच्या घरी कंपोस्ट तयार करू लागल्या.
हे घरगुती कंपोस्ट वापरून आम्ही घरी कुंड्यांमध्ये टोमॅटो, अळू, पालक, गाजर, बीटरूट, कोथिंबीर, पुदिना अश्या भाज्या पिकवल्या.

21oct2017 977_0.jpeg

हा आमच्या कुंडीतला पालक.

phone photos 128.jpg

हे टोमॅटो!


मुळात कंपोस्ट म्हणजे काय?

कंपोस्ट म्हणजे ओल्या कचर्याचे विघटन होऊन तयार झालेले खत. कंपोस्टिंग ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती सतत निसर्गात चालू असते. जंगलात झाडांची पाने जमिनीवर पडल्यावर हळूहळू त्यांचे विघटन होते. या विघटन होत असलेल्या पानांमधील पोषक द्रव्ये झाडाच्या मुळांकडून शोषली जातात. असं हे नैसर्गिक रिसायक्लिंग आहे.

आता घरात कंपोस्ट तयार करायचे असेल तर काय करायचं?
आपल्या घरात तयार होणार्या कचर्यापैकी सुमारे ७०% कचरा हा जैवविघटनशील असतो. भाज्यांचे देठ, साली, उरलेले अन्न, वापरलेले टिश्यू पेपर्स, सुकलेली फुले, चहा/ कॉफी पावडर/ टीबॅग्स, अंड्याची टरफले, मांसातील हाडे, नारळाच्या शेंड्या हा सगळा कचरा कंपोस्टमध्ये रूपांतरित करता येतो. हा सगळा कचरा एका वेगळ्या टोपलीत/ प्लॅस्टिकच्या डस्ट्बिनमध्ये ठेवायचा. बाकी प्लॅस्टिकचा, रबराचा वगैरे कचरा यात मिसळायचा नाही. दिवसातून एकदा हा ओला कचरा कंपोस्टिंग बिनमध्ये घालायचा. ही कंपोस्ट बिन विकत मिळते किंवा घरीही तयार करता येईल. ( घरी तयार करायची असेल तर एखादा झाकण असलेला प्लॅस्टिकचा उभट डबा/ झाकणवाली बादली घ्या आणि त्याला खालपासून वरपर्यंत ठराविक अंतरावर छोटी छोटी छिद्रं पाडा. आत हवा खेळती राहण्यासाठी ही छिद्रं आवश्यक आहेत). मग या कचर्याचं विघटन होण्यासाठी त्यात ' विरजण’ किंवा कल्चर घालायचं. हेही विकत मिळतं. कचर्याचं विघटन करून त्याचं कंपोस्ट्मध्ये रूपांतर करणारे हे जीवाणू असतात. कोकोपीट ( नारळाच्या शेंड्यांची पावडर) आणि हे जीवाणू एकत्र करून आपल्या ओल्या कचर्यात घालायचे. वर एक वर्तमानपत्राचा कागद घालायचा आणि झाकण लावून टाकायचं. बास, रोज २ ते ३ मिनिटं लागतात फक्त हे सगळं करायला! एकदा आपलं कंपोस्ट तयार झालं की हे कल्चर विकत आणण्याचीही जरूर नाही. आपलं कंपोस्टच नव्या ओल्या कचर्यात मिसळायचं की झालं!
अशा दोन तरी बिन्स आपल्याकडे पाहिजेत. म्हणजे एक बिन भरली की दुसरीत कचरा टाकायला सुरुवात करता येते. साधारणपणे २ महिन्यांनी कंपोस्ट तयार होतं. मधून मधून ते ढवळावं, म्हणजे सगळीकडे हवा लागते आणि कंपोस्टिंग चांगलं होतं.

21oct2017 979.jpg

गेल्या वर्षी सोसायटीत कंपोस्ट्चा स्टॉल लावला होता. तेव्हाचा हा फोटो. या फोटोत डावीकडे प्लॅस्टिकचा स्टॅक टाईपचा कंपोस्टर आहे आणि त्याच्या बाजूला स्टँड अलोन कंपोस्टर ( जो माझ्याकडे आहे)

बंगळूरमध्ये रहायला आल्यापासून आपणही घरी कंपोस्टिंग करावं असा विचार डोक्यात मधूनमधून घोळत असे. बंगळूरमध्ये डेली डंप ही कंपनी या कंपोस्ट बिन्स बनवण्यात आघाडीवर आहे. सुरुवातीला ते फक्त टेराकोटाचे कंपोस्टर विकत असत. बंगळुरात अगदी मध्यमवर्गीयांमध्येही स्वत:चं स्वतंत्र घर असणं आणि घराभोवती जागा असणं हे आत्ताआत्तापर्यंत कॉमन होतं, त्यामुळे टेराकोटाचे भलेमोठे जड कंपोस्टरही विकत घेणारी बरीच मंडळी होती.
21oct2017 1041.jpg

यात टेराकोटाचा स्टॅक टाईप कंपोस्टर दिसतोय.

आम्ही मात्र फ्लॅटमध्ये राहणारे. त्यामुळे ते शक्यच नव्हतं. शिवाय, त्या कचर्याचा वास तर घरभर पसरणार नाही ना, मुलंही लहान आहेत, ती त्या कचर्याजवळ जाऊन त्यांना काही इन्फेक्शन वगैरे तर होणार नाही ना, अशा शंकाही मनात येत होत्याच. शेवटी गेल्या वर्षी या सगळ्या शंका बाजूला सारून कंपोस्टिंग सुरू करायचं ठरवलं. तोवर डेली डंपने प्लॅस्टिकचे कंपोस्टरही विकायला सुरुवात केली होतीच. त्यांच्या २ बिन्स आणल्या. चुकत माकत सुरुवात झाली. कचरा आणि कोकोपीटचं मिश्रण खूप ओलसर झालं तर त्यात भरपूर अळ्या (maggots ) होतात, दुर्गंधही येतो. मिश्रण खूप कोरडं झालं तर कचर्याचं विघटन होत नाही. अशा दोन्ही प्रकारच्या चुका करून हळूहळू आम्ही शिकत गेलो. आता मात्र हे काम अगदी अंगवळणी पडलं आहे. रोज सकाळी किंवा रात्री दिवसभराचा ओला कचरा बिनमध्ये टाकायचा, साधारणपणे ३ आठवड्यांनी दोन्ही बिन्स भरल्या की आधीच्या बिनमधलं अर्धवट तयार झालेलं कंपोस्ट दुसर्या एका मोठ्या बादलीत काढायचं, पूर्णपणे तयार झालं की चाळून ठेवून द्यायचं. तोपर्यंत सोसायटीतल्या मैत्रिणींचे ’ कंपोस्ट तयार आहे का?’ असं विचारणारे फोन येऊन गेलेलेच असतात. खरंतर कंपोस्ट जितकं जुनं (मुरलेलं) तितकं जास्त चांगलं. पण बाल्कनीत जागा मर्यादित. त्यामुळे मी फार काळ ते ठेवून देत नाही.
21oct2017 902.jpg

हे चाळून तयार झालेलं फायनल प्रॉडक्ट Happy

खरंतर अगदी साधी सोपी अशी ही पद्धत आहे. त्यात खूप वेळही जात नाही. आपण रोज जो ओला कचरा महानगरपालिकेच्या ताब्यात देतो, तो जर घरीच कंपोस्ट केला तर तब्बल ३०० किलो कचरा ( हा आकडा चौघांच्या कुटुंबासाठी आहे ) आपण लॅन्ड्फिलमध्ये जाण्यापासून वाचवतो. पण कंपोस्टिंगबद्दल लोकांच्या मनात अनेक शंका असतात, दुर्गंध येईल याची धास्ती असते, वेळखाऊ प्रकरण असेल असं वाटत असतं. त्यामुळे सहजासहजी कुणी कंपोस्टिंग करू धजत नाही. हे काम वाटतं तितकं कठीण आणि वेळखाऊ नाही हे सांगावं आणि कंपोस्टचं १ वर्ष पूर्ण झाल्याचं ’ सेलिब्रेट’ करावं असं वाटलं म्हणून हे लिहावंसं वाटलं!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वावे छान माहिती .
माझ्याही मनात बर्याचदा येतं की असा कचरा वाया घालवण्याएवजी कंपोस्ट बनवावं , पण जमेल की नाही वगैरे वर तुम्ही उल्लेख केलेल्ल्या बर्याच शंकांमुळे राहतं .

कंपोस्टच्या वर्षपूर्तीबद्दल अभिनंदन
मी पण चालू केलं आहे . पण नक्की तारीख लक्षात नाही. माझंही जवळ पास वर्ष झालं असावं.

अधिकाधिक लोकांनी हे करायला हवं, ह्याकरता हा लेख उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही.
धन्यवाद

खूपच छान!! माहिती बद्दल धन्यवाद.

कचरा आणि कोकोपीटचं मिश्रण खूप ओलसर झालं तर त्यात भरपूर अळ्या (maggots ) होतात, दुर्गंधही येतो. मिश्रण खूप कोरडं झालं तर कचर्याचं विघटन होत नाही. अशा दोन्ही प्रकारच्या चुका करून हळूहळू आम्ही शिकत गेलो. >>>याबद्दल जरा सविस्तर माहिती द्याना. जेणेकरून नक्की काय अन कशी काळजी घ्यायची ते कळेल.

वा मस्तच. मी एकदा घरी हा प्रयोग केला होता. बादलीला भोकं पाडून वगैरे. शिवाय कल्चरही विकत नव्हतं आणलं. खूप छान खत झालं होतं - अगदी शेवटच्या फोटोत दाखवलंय तसं (थोडं जास्त काळपट होतं). अळ्या झाल्या होत्या, पण दुर्गंध अजिबात नव्हता.

खुप छान उपक्रम चिकाटीने राबवताय ह्यासाठी सर्वप्रथम आपले अभिनंदन Happy

ह्यात अजुन एक स्टेप पुढे जावून कंपोस्ट टी (लिक्विड फर्टिलाइजर) बनवता येते ज्याचा मुख्य फायदा बनलेल्या सॉलिड खतापासून अनेक पट जास्त लिक्विड खत सध्या आहे त्याच उपलब्ध जागेतुन बनते त्यामुळे अनेक जणांना (मित्र मैत्रीण वगैरे) मागणीच्या प्रमाणात देवू शकतो. बाकी त्याचे पोषण मूल्य वाढवण्यासाठी मी सोबत सी विड्स आणि गोमूत्र मिसळून १५ दिवस एजिटेटर लावून ठेवयचो. अतिशय सुंदर रिझल्ट्स मिळाले आहेत. लाल माठ भाजीचा देठ शीस पेन्सिल एवढ्या जाडीचा झाला, मुळा भाजीचे जाड जुड़ मूळ चक्क फुटभर वाढले, तुळशीची पाने, गवती चहा अन् कडीपत्ता मे महिन्यातसुद्धा जाड अन् टवटवीत दिसतात. फुलझाडानाही खुप चांगला बाहर आलेला. शक्य असल्यास प्रयोग करून नक्की पहा.

चांगलं लिहिलंय.मी गेले 3 वर्षे कंपोस्ट करतेय.
मॅगोट, ओला किचकट कचरा डेपो टाईप वास येणारा कचरा , एका चक्रम क्षणी त्यावर वास जायला निलगिरी तेल शिंपडणे, मग पंचक्रोशीत तो मिक्स घाण वास या स्टेज पार करून आम्ही चांगल्या कंपोस्ट ला आलो आहोत.
डेली डम्प खूप ओव्हर हाईप आहे असे माझे मत.साध्या कोपऱ्यावरच्या कुंभाराकडचे कोणतेही मोठे मातीचे भांडे किंवा कुंडी सारखा इफेक्ट कमी पैशात देते.
हे आमच्या 2 कंपोस्ट चे फोटो.एक कुंडीत, जवळ जवळ होत आलेले आणि दुसरे फुटक्या प्लास्टिक बादलीत, अजून दमट पण कुजण्याच्या योग्य प्रोसेस ला असलेले.वास अजिबात नाही.
IMG_20180606_202644_2.jpgIMG_20180606_202709.jpg

सर्व प्रतिसाददात्यांचे आभार!
@हर्पेन, अनु, अंबज्ञ, तुमचंही अभिनंदन! तुम्ही कुठून कंपोस्टर बिन घेतलीत, किंवा घरीच कशी तयार केलीत हेही इथे लिहिलंत तर इतरांना त्याचा चांगलाच उपयोग होईल. डेली डंपव्यतिरिक्त पुण्यात इतर अनेक जण घरगुतीही या टोपल्या तयार करून विकतात. त्यांचे संपर्क/पत्ते कुणाकडे असतील त्यांनी इथे टाकले तर अजूनच छान.
अनु,'कचरा डेपोसारखा वास' या स्टेजमधून आम्हीही गेलोच Happy 'एरोबिक' विघटन होत असेल तर दुर्गंध येत नाही आणि 'अनेरोबिक' विघटन होत असेल तर दुर्गंध येतो. आपण वास येऊ नये म्हणून झाकण लावून ठेवतो आणि उलटा परिणाम होतो Happy आतल्या जीवाणूंना ऑक्सिजन पुरेसा न मिळाल्यामुळे दुर्गंध येऊ लागतो.
डेली डंप ओव्हरहाईप्ड असेलही, पण इथे तरी घरगुती कुणी अशा टोपल्या करून विकत असल्याचं ऐकलं तरी नाही. पण तुझं बरोबर आहे. साधं मातीचं भांडं किंवा प्लॅस्टिकचा डबा आणि त्याला हवा खेळती राहण्यासाठी छिद्रं एवढं पुरेसं आहे.
@sonalisl, स्वयंपाकघरातील कचर्यात नायट्रोजनचं प्रमाण जास्त असतं. कोकोपीट, लाकडाचा भुसा, वाळकी पानं यांच्यात कार्बनचं प्रमाण जास्त असतं. कंपोस्ट योग्य प्रकारे होण्यासाठी या दोन्हीचा समतोल राखणं आवश्यक असतं. शिवाय आर्द्रतेचाही समतोल असावा लागतो. कोकोपीट कमी पडलं, तर मिश्रण खूप ओलं होतं, मग त्यात भरपूर अळ्या होतात, त्या बाहेरही येतात, एकूण त्रासदायक प्रकार होतो. जर कोकोपीट खूप जास्त टाकलं, तर मिश्रण कोरडं होतं आणि कंपोस्टिंगची प्रक्रिया खूप स्लो होते. वर अनुने दिलेल्या फोटोंमध्ये जो वरचा फोटो आहे, साधारण तेवढं दमट मिश्रण योग्य असतं. हे हळूहळू अनुभवानेच लक्षात येत जातं. यात काही फार कठीण नाही, पण थोडा पेशन्स आवश्यक असतो. Happy

मी हि करते गॅलरीत.

अळ्या होवु नये म्हणून.

लेयर लावायचे,
-खाली नारळाच्या किशी( कोयर) मग जो ज्यास्त ओलसर कचरा मग फळाच्या साली( केळ्याच्या उत्तम, कलींगडाच्या, संत्राच्या उत्तम). पोटॅशियम सालीत असते.
मग अंड्याच्या कवचा, भात वगैरे.
ह्याने काय होतो एकाच लेयरला ओला गिचका होत नाही.
-कपोस्ट बिन हवेशीर कोन्यात ठेवा. खूप उनही नाही आणि सावली नाही.
-गांडूळ टाकावेत , मी टाकते. आणखी छान खत होते.
- रोज दोनदा ढवळा लाकडी बांबू काठीने.
- ढवळताना मी मध्येच , टी ट्री ऑयल किंवा निलगिरी तेल मिश्रीत स्प्रे मारते. अळ्या अजिबातच होत नाहीत.
दहा थेंबाना , एक लिटर पाणी असा स्प्रे. खूप मारु नका.
अ‍ॅसीडीक खत हवे असेल तर, एक आठवडा झाला की ढवळून, विनेगार स्प्रे मारून आणखी एक आठवडा ठेवावा.
गुलाबाला लागते अ‍ॅसीडीक खत.

शेवटच्या टप्याला, ईप्सम सॉल्ट मिक्स करावे.

माझे खत खूपच काळे असते.
गावी शेण आणि भाजी कचरा ह्या पासून मी बनवलेले.

अरे वा! हे वाचून करून पाहावंसं वाटतंय. कल्चर नर्सरीतच मिळतं का?
सुरूवातीला चुकतमाकत असताना अळ्या झाल्या, तेव्हा त्या त्यातून बाहेर पडल्या नाहीत का? आय मीन, अळ्या झाल्या तर त्या बाहेर पडून इकडेतिकडे पसरत नाहीत ना याकडे लक्ष ठेवावं लागत नाही ना?

अळ्या न होवु देणेच उत्तम. हे म्हणजे पोटातले जंतासारखे आहे.
झाडांची मुळे खातात असे खत टाक्स्ले तर. आपल्याला कळत नाही फळं नीट का धरत नाही वगैरे.
अळ्या अस्स्तीलच तर, खतावर निलगीरी मारून, जरासे उन दाखवून आणखी मुरु द्यावे नाहितर गांडूळ सोडावे. नाहीच गेल्या अळ्य्सा तर फेकावे खत.

अळ्या पसरत नाहीत(बाकी ठिकाणी पसरुन त्यांना खाऊ मिळत नाही.)
कंपोस्ट म्हणून मिळणारे कंपोस्ट् कल्चर/गांडूळ खत/जीवामृत(गोशेण्+बेसन्+गूळ्+गोमूत्र यांचे शेतकरी विकत असलेले मिश्रण.) यापैकी काही टाकले तरी प्रोसेस वेगात होते.
जर खूप ओला कचरा(आमट्या/कलिंगड साले/खरबूज साले) भरपूर टाकणार असल्यास कंपोस्ट चा स्पीड वाढायला छोटे तुकडे करावे लागतात.
कल्चर न वापरताही कंपोस्ट होते. कल्चर ने वेग वाढतो.फक्त तुमच्याकडे कंपोस्ट मध्ये खेळती हवा, ऊन आणि भरपूर ब्राऊन(वाळके गवत्/पाने/वर्तमानपत्र तुकडे/लाकूड भुसा यापैकी एक) आणि बारिक कापलेला ओला कचरा लागतो.

(वावे माझ्या कंपोस्ट बिन बद्दल विचारपूस मध्ये)

वावे खुप छान लिहील आहे.

मी पण घरातील एकही साल फुकट घालवत नाही. फक्त मी कल्चर वापरत नाही. मी डायरेक्ट भाज्यांना किंवा कुंडीत टाकते. मग त्याच हळू हळू खत तयार होत. जर कोणी चुकुन ओला कचरा बाहेर टाकला तर मला अगदी जीवाला लागत.

जुने वडाचे झाड़ आसपास असेल तर त्याच्या सावलीत ह्यूमस तयार झालेला असतो त्याचा वापर केला तर आपोआप माइक्रोब्स कल्चर निसर्गातूनच मिळेल.

कंपोस्टमधे थोड्याफार प्रमाणात maggots होणे हे नॉर्मल आहे. त्यांनी काही बिघडत नाही. फारच वाढले तर वाळकी पानं/ सॉ डस्ट/ कोकोपीट घालून आर्द्रता कमी करायची.
झंपी, ललिता-प्रीति, जागूताई, धन्यवाद Happy
मी मायबोलीवर नसलेल्या माझ्या अनेक मित्रमैत्रिणींना या लेखाची लिंक पाठवली. त्यांच्या प्रतिक्रिया वाचून माझ्या लक्षात आलं की त्यापैकी काही जण स्वतः कंपोस्ट करतात किंवा काहींच्या ओळखीचं कुणी ना कुणी तरी आहे जे घरी कंपोस्ट करतात. एकूण या बाबतीत जागृती वाढत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे.
ललिता-प्रीति, स्वस्ति, तुम्हाला शुभेच्छा Happy

कल्चर न वापरताही कंपोस्ट होते. >>> धन्यवाद. मी हाच विचार करत होते की कुठुन आणू म्हणून. मी गेले ५ म. कंपोस्ट सुरु केलेय.. ओला कचरा जराही फुकट जाउ देत नाही.. माझी बहिण ही हे करते, ती म्हणाली की खरकटे नाही घालायचे यात. ती जीवामृत ही तयार करते अधून्मधून.. भरपुर्र करते म त्यांच्या हिरव्या ग्रुपमधल्या सगळ्यांना देता येते..

हे सगळे करण्यात पर्यावरणाला मदत तर आहेच पण जो आनंद मिळतो ना तो मला आवडतो.

अरे वा! हे वाचून करून पाहावंसं वाटतंय.>>>>> + १२३

ती म्हणाली की खरकटे नाही घालायचे यात. >>> अस का म्हणे Uhoh

कंपोस्ट कल्चर न वापरता एकदम फास्ट करायचे असेल तर मिक्सर मधून काढता येईल भाजी किंवा फळे साल कचरा Happy
पण मिक्सर बिघड्ल्यास ताप होईल.
मी कलिंगड साले चटणी करुन टाकते मिक्सर मध्ये.
जीवामृत शिम्पडले तरी कल्चरसारखेच काम होते.
पण जीवामृताचा वास अशक्य घाण येतो(शेणाचा वास सुवास नसतो. Happy त्यात गोमूत्र आणि बेसन गूळ मिक्स झाल्यवार तयार होणारा वास अशक्य असतो. अर्थात नाकाला फडके बांधून जीवामृत शिंपडल्यावर झाडं मस्त वाढतात.)

माझ्या मुली मला नेहमी म्हणतात जीवामृतला काही पर्याय नाही का त्याच्या वासामुळे. पण त्याचे इफेक्ट खुप चांगले आहेत त्यामुळे त्यांना समजावते. जीवामृतमुळे कल्चरचे काम होते हे माहित नव्हते. आता प्रयत्न करेन.

(शेणाचा वास सुवास नसतो. Happy त्यात गोमूत्र आणि बेसन गूळ मिक्स झाल्यवार तयार होणारा वास अशक्य असतो.

शेण, गोमूत्र, बेसन, गूळ हे योग्य प्रमाणात मिसळून जीवामृत बनते.
माझ्याकडे कृती पण होती. पण व्याप केला नाही.

मी तरी खरकटं, उरलेलं अन्न हे सगळं घालते कंपोस्टमधे. अळ्यांचा मी फार बाऊ करत नाही. खूपच संख्या वाढल्याशिवाय त्या बाहेर येत नाहीत. कलिंगडाची सालं मी लहान तुकडे करुन घालते. केळीचा फणा संपला की उरलेला देठांचा गुच्छ असतो त्यातलं एकेक देठ सुटं करून घालते. मक्याच्या कणसांचा मधला भाग, आंब्याच्या बाठी मात्र नाही टाकत यात.

छान माहिती! आणि अभिनंदन!
चाळून तयार झालेलं फायनल प्रॉडक्ट>> शेवटी ते इतकं छान कोरडं तयार होतं का!! ? भारीच !!
पूर्णपणे बनून चाळण्याच्या स्टेज ला आलय कि नाही हे कसं ओळखायचं ?

@ अंजली, धन्यवाद Happy
ते इतकं कोरडं असलं पाहिजे असं नाही. हे मी उघड्या डब्यात ठेवल्यामुळे कोरडं झालं आहे. खाली ओलसर/ दमटच असतं.
पूर्णपणे बनून चाळण्याच्या स्टेज ला आलय कि नाही हे कसं ओळखायचं ?>> चांगला प्रश्न.
कंपोस्ट तयार झालं की त्याला एक विशिष्ट प्रकारचा वास येतो. जेव्हा आपण जमिनीत खड्डा खणतो, तेव्हा त्या खणलेल्या मातीला जसा फ्रेश वास येतो, अगदी तसाच छान फ्रेश वास कंपोस्टला येतो. तसा वास आला की ओळखायचं की कंपोस्ट तयार आहे Happy
शिवाय अजून एक टेस्ट असते, ते कंपोस्ट पाण्यात मिसळून २-३ दिवस ठेवून मग ते पाण्यात विरघळतं की नाही ते बघायचं वगैरे.
पण त्यापेक्षा मला वासाची चाचणी सोपी वाटते.

Pages

Back to top