चाळीतल्या गमती-जमती (१७)

Submitted by राजेश्री on 18 May, 2018 - 22:54

चाळीतल्या गमती-जमती (१७)

कुणाचं काय आणि कशाचं काय....

"एका रातीत मिळाल्याल कळसाच्या शिखरावाणी यश कधी बी टिकून राहत नाय"अस माझी आज्जी म्हणायची याचा प्रत्यय ते इंदू आज्जी आणि तायडीचे ऐतिहासिक मल्लयुद्ध झाल्याच्या आठ दिवसातच मला येऊ लागला. तायडीची भूमिका कशी योग्य होती,आम्ही भाडं भरतोय काय चिंचोके मोजून देत नाही.असे मम्मीने पण म्हातारीवर आपलं तोंड सोडलं(खर तर तोंड तर आहे तिथेच असत ते सोडलं का म्हणतात काय माहीत मग तायडीपेक्षा कधी नव्हे ती मी चांगली म्हणून मला मिळणारा मान चार दिवसातच ओहोटीस लागला.कधी कधी मीच मम्मीला माझ्या चांगुलपणाची आठवण करावी म्हणून आमच्या घरात कशाच्या निमित्ताने चाळीतल्या बायका जमल्या की मम्मीला म्हणू लागले,कस ग मम्मी तायडीला मी कवळा घालून उचलून माग ठेवलं...नायतर काय झालं आसत नाय..यावर मम्मी म्हणायची नायतर काय झालं नसत राजे...तुझ्याच अंगात खोट आहे.माझी पुरगी गुणाची हाय. घरात प्याला पाणी नको का..तुला गावाला नुसता तमाशा दाखवायचा असतो..पाणी पाणी म्हणून माणस टाचा घासून मरतील पण तू थेंबभर पाणी द्याच्या लायकीची नाहीस..असा माझ्या उद्धार व्हायचा हे म्हणजे माझं मीच हात दाखवून अवलक्षण केल्यासारख होत.मला वाटत चांगलं वागल की काय उपेग नसतोय हे मला तेंव्हापासून कळल असलं पायजे
आमच्या चाळीतल्या बाळ गोपाळ मंडळींमध्ये मात्र माझा आदर आजिबात कमी झाला नव्हता उलट तो दुनावला होता.लहान मूल निरागस आणि खर बोलणारी असतात म्हणून तेंव्हापासून माझं मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांवरच जास्त विश्वास बसू लागला. स्वप्नया म्हणायचा आपली मायडी ताई लय ताकदवान आहे.पश्या म्हणायचा आपल्या मायडी ताई आणि सिंदबादची एकदा गाठ पडायला पायजे त्यो आपल्या मायडी ताईला सुलेमानी तलवार देऊन टाकील.मग इंदू आज्जी घर सोडून जाईल पळून..दिदू म्हणायची मायडी ताई तुझं सगळं बरोबर असत.मग माझ्या अंगावर मूठभर मांस वाढत राहायचं.हातात सुलेमानी तलवार असल्याचा भास होऊन मी त्या अकॅशन मध्ये दिमाखात तिथून चालत जायचे.
इंदू आज्जीला तर मी तिला संभाव्य मारपीठी पासून वाचवल्याच सोयरसुतक कुठं होत तवा. हा पण एक आश्चर्यकारक बदल तिच्यात झाला होता.ती पाणी सुटले की या नाट्याच्या पंधरा वीस दिवसानंतर तायडीला ये जयू पाणी सुटलं बघ ग...म्हणून प्रेमाने हाक मारायची.पहिली तिची अशी हाक ऐकली तेंव्हा चेहऱ्यावर चमत्कारिक,व्हाट्स ऍप च्या smily सारखे सर्व भाव एकदम एकवटले होते.तायडी माझ्या पुढून कॉलर ताट करून घागर घेऊन बाहेर गेली.हे जग सगळं मिथ्या आहे आणि आपण गौतम बुद्धासारखं झाडाखाली जाऊन बसावं अस मला प्रकर्षाने वाटले आणि मी पाणी सुटलं की मी पाणी भरणार नाय जा,तुझं तूच भर इंदू आज्जी तुझी लाडकी आहे माझी नाही म्हणत कामातून अंग काढून घ्यायचं कारण शोधून चिंचेच्या झाडाखाली जाऊन बसू लागले...,

राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
२१/०४/२०१८

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users