किती भोळी रखुमाई

Submitted by पुरंदरे शशांक on 1 April, 2018 - 23:36

किती भोळी रखुमाई...

सावळ्या गं विठ्ठलाच्या
हाती हात कसा दिला
रूक्मिणी तू नाजुकशी
वर रांगडा वरला ?

धावे जनाईच्या मागे
शेण्या उचलीत गेला
कबिराला बोले थांब
शेला विणाया बैसला

सुखे विष पिऊनिया
मीरेपाठी उभा ठेला
किर्तनात करी साथ
नाम्याहाती खाई काला

नाही याला काळवेळ
भक्तकाजि रमलेला
मुलखाची भोळी बाई
वर असा निवडला ?

माय भक्तांलागी तूंचि
खोटेनाटे तुज सांगे
नाही युगत कळली
भाळलीस याच्यामागे

राबवेल तुला संगे
घेवोनिया भक्तांघरी
नको बोल लावू कुणा
तूंचि निवडला हरी....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Superb!

केवळ अप्रतिम बुध्दीभेद रखुमाईचा

म्हणे माय रखुमाई
नको बुध्दीभेद मज
तीन जगाचा हा स्वामी
राखे दुबळ्यांची लाज

वर असा मिळायला
जन्मोजन्मीची पुण्याई
असे नवरत्न माझे
त्याची तुलनाच नाही

Happy

शशांकजी,
खूप, खूप, खूपच सुंदर..