किती भोळी रखुमाई
Submitted by पुरंदरे शशांक on 1 April, 2018 - 23:36
किती भोळी रखुमाई...
सावळ्या गं विठ्ठलाच्या
हाती हात कसा दिला
रूक्मिणी तू नाजुकशी
वर रांगडा वरला ?
धावे जनाईच्या मागे
शेण्या उचलीत गेला
कबिराला बोले थांब
शेला विणाया बैसला
सुखे विष पिऊनिया
मीरेपाठी उभा ठेला
किर्तनात करी साथ
नाम्याहाती खाई काला
नाही याला काळवेळ
भक्तकाजि रमलेला
मुलखाची भोळी बाई
वर असा निवडला ?
माय भक्तांलागी तूंचि
खोटेनाटे तुज सांगे
नाही युगत कळली
भाळलीस याच्यामागे
विषय:
शब्दखुणा: