फुलोंकी घाटी अर्थात व्हॅली ऑफ फ्लॉवर्स - समारोप

Submitted by साधना on 3 March, 2018 - 08:39

मागचा भाग : https://www.maayboli.com/node/65351

बारा साडेबाराच्या सुमारास जाग आली. आजचा दिवस मी ऋषिकेश दर्शनासाठी राखून ठेवला होता. मुलींनाही उठवले. अंघोळी वगैरे सगळे आधीच आटपले असल्याने लगेच तयार होऊन बाहेर पडलो. आमच्या बाजूच्या खोलीत मुंबईकर अशोक उतरलेला. सकाळी आमच्यासोबतच तोही कॅम्पवरून इथे आला होता. फिरायला सोबत जाऊ म्हणाला होता, पण त्याच्या खोलीला कुलूप दिसल्यावर आम्ही निघालो.

इतके दिवस थंडी व पावसात घालवले होते. इथे ऋषिकेशला टळटळीत ऊन होते. इकडे गर्मीसुदधा भरपूर असते असे ऐकून होते पण नशिबाने आम्ही होतो तेव्हा सगळे आलबेल होते. खाली आल्यावर इकडे तिकडे फिरून, त्रिवेणी घाटाच्या दिशेने जाऊन आलो. गेल्या वेळेस वाटेत जो कचऱ्याचा डोंगर दिसलेला तो गायब झाला होता. कचराकुंडी बापूडवाणी होऊन एका बाजूला उभी होती. सगळे एकदम साफ, चकाचक. आठ दिवसांपूर्वी जिथे इतका कचरा पाहिलेला तिथे आता सफाई पाहून मला आश्चर्यच वाटले. बहुतेक तेव्हा सफाई कामगारांचा संप वगैरे असेल. गुगल मॅपवर लक्ष्मण झुला शोधून तिथे जायला रिक्षा वगैरे काही मिळते का बघत कोपऱ्यापर्यंत आलो. एक दहा सीटर रिक्षा दिसली.

इथली रिक्षा म्हणजे मूळ हिरवा/पिवळा/काळा असलेला पण आता त्यातला बराचसा रंग उडालेला पत्र्याचा सांगाडा. रिक्षा धावताना खूप मोठा आवाज करते त्यामुळे ती वेगात जाते असा भास होतो, प्रत्यक्षात तिचा वेग आवाजापेक्षा खूपच कमी असतो. सुरक्षित इतकी की आपले लक्ष नसेल तर रस्त्यावरचा छोटासा धक्काही आपल्याला बाहेर फेकू शकतो!! रिक्षावाला अगदी पंधरा सोळाचा पोरगा दिसत होता. पण एकूण रुपडे पाहून खरेच पंधरा सोळा वर्षाचा आहे की सततच्या उपासमारीमुळे असा दिसतोय याचा अंदाज येत नव्हता. मुंबईत असे लोक फारसे दिसत नाहीत पण मुंबईबाहेर गेले की कोऱ्या, रंगहीन चेहऱ्याचे, खंगलेल्या शरीराचे, पाठीला बाक येऊन पोट त्याला चिकटलेले लोक दिसतात. सुख, आनंद, आशेचा स्पर्श कधी आयुष्याला झाला होता याची पुसटशी खुणसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर नसते. हे लोक कामे करत असतात, रिक्षा चालवायचे, ओझे वाहायचे, माल विकायचे.. जणू जन्मापासून तेच काम करताहेत व असेच करताकरता एके दिवशी संपतीलही. न समजता आला दिवस ढकलत काढणारे लोक!!

लक्ष्मणझुल्यापर्यंत किती घेणार विचारल्यावर त्याने दहा रुपये सवारी सांगितले. लक्ष्मणझुला इतका जवळ असल्याचे गुगलमॅप दाखवत नव्हता. रिक्षा सुरू झाल्यावर काहीही संभाषण करणे अशक्य होते. रस्ते काही ठिकाणी चांगले होते, काही ठिकाणी खड्डे पडले होते. इथे मुंबईत पण खड्ड्यात रस्ते असतात, त्यामुळे आम्हाला तिथल्या खड्ड्यातल्या रस्त्यांची फारशी मातब्बरी वाटली नाही. वाटेत असंख्य देवळे व तितकेच योग आश्रम दिसत होते. काही आश्रम बाहेरून हाय फाय हॉटेलसारखे दिसत होते. यांना आश्रम का म्हणावे हा प्रश्न पडावा इतके हायफाय.

हरिद्वार-ऋषिकेश ही भारतीय संस्कृतीच्या प्रेमात पडणाऱ्या परदेशी मंडळींची पंढरी आहे. इथे येऊन भा सं च्या गंगेत डुबकी मारल्याशिवाय काही खरे नाही असा समज एकतर करून दिला गेलाय किंवा झालाय. जे काही असेल ते असो. डुबकी मारण्यासाठी आलेल्या लोकांच्या आदरातिथ्याची व डुबकी मारायची उत्तम सोय इथे आहे. जन्मापासून भारतीय लोक ह्या भा सं बद्दल इतके काही ऐकून असतात की कधीतरी त्यावर जमलेला भरमसाठ भुसा पाखडून त्याखाली काय आहे हे बघायची बुद्धी कोणाला होत नाही. हिंदू धर्म म्हणजे हा प्रश्न कोणी विचारला तर चटकन उत्तर देता येणार नाही. वेद, उपनिषदे, गीता यात काय सांगितलंय विचारले तरी उत्तर देता येणार नाही. ही उत्तरे शोधणारे शेवटी ऋषिकेश हरिद्वारला येऊन पोचतात. उत्तरे मिळतात का माहीत नाही पण मिळत असावीतही. भारतीयांना इथवर पोचायची गरज नाही. त्यामुळेच बहुधा इथले योग आश्रम परदेशी लोकांनी भरलेले असतात.

वाटेत चोटीवाला रेस्तराँचे बोर्ड पाहून तिथे जायचे का हा प्रस्ताव मी मांडताच दोन विरुद्ध एक मतांनी तो तात्काळ फेटाळला गेला. मुलींनी जर्मन बेकरीत जायचे नक्की केले होते. पुणे सोडून ही बेकरी ऋषिकेशला कधी आली याचे नवल करत इथे नक्की आहे ना बेकरी म्हणून परत परत विचारल्यावर, इथेच आहे व तिथेच खा म्हणून मित्रमंडळाकडून जोरदार शिफारस झालेली आहे हे कळले. काही उपाय नाही हे जाणून मी गप्प बसले.

अर्ध्या तासाने एका चौकासारख्या दिसणाऱ्या जागी रिक्षावाल्याने आणून सोडले. येही है लक्ष्मणझुला म्हणून त्याने सांगितले खरे पण आजूबाजूला कुठेही झुल्याचा मागमूस दिसत नव्हता. दहा रुपयात इतक्या लांब रिक्षा आली म्हणजे इथे भरपूर स्वस्ताई असणार असा विचार करत मी उतरले. आजूबाजूला चौकशी केल्यावर खरा लक्ष्मणझुला तिथून अजून एक किमी दूर आहे व तिथवर चालत जावे लागते हे कळले. आलिया भोगासी म्हणत मी मुलींच्या मागून चालू लागले. झुल्याच्या आधी जो रस्ता होता त्यावर कुठल्यातरी पंथाच्या लोकांची मिरवणूक सुरू होती, सगळा रस्ता भरून गेला होता. हरवेन या भीतीने मी ऐशुचा हात घट्ट धरून त्या गर्दीतून बाहेर पडले. बाकी पुढे स्टॉल्स, दुकाने, हॉटेले वगैरे सगळा बाजार मांडला होता व त्यांच्यामधून उरलेल्या जागेतून वाट काढत लक्ष्मणझुला गाठायचा होता.

लक्ष्मणझुल्याकडे जायच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप चित्तवेधक स्टॉल्स आहेत. तुम्हाला सेमी प्रेशस स्टोन्स मध्ये रस असेल तर इथे भांडार आहे… गळ्यातले, कानातले, बोटातले, हातातले.. जे हवे ते आहे. किमती घासाघीस करून ठरवता येतात. बाकी फंकी कपडे, बॅगा, ट्रेकिंग साहित्य, पुस्तकांची दुकाने, रुद्राक्ष माळा व इतर भक्तीसाहित्य असल्या विविध दुकानांची तिथे रेलचेल आहे. त्यातच अधेमध्ये क्षुधाशांती गृहे आहेत. तुम्हाला जर असले वातावरण व तिथे शॉपिंग करणे आवडत असेल तर या भागाला भेट द्याच. काही शॉपिंग करायचे नाही असे आधीच ठरवून टाकल्यामुळे फक्त नयनसुख घेत मी चालत होते. शॉपिंग करायची असती तर मात्र वाट लागली असती. कुठे कुठे काय काय घेऊ असे झाले असते. कारण जे बघत होते ते सगळेच मला आवडत होते.

वाटेत कढीचावल असा मोठा बोर्ड दुकानावर लावून एक गुटगुटीत ब्राम्हण भाताने भरलेल्या ताटांमध्ये पिवळीजर्द कढी ओतून देत असताना दिसला. हाय रे दैवा!! कढीचावलच्या देशात येऊन मी परदेशी अन्न खायला उत्सुक असलेल्यांच्या मागून जर्मन बेकरी शोधत फिरत होते. Sad

असेच बराच वेळ वर खाली चालल्यावर एकदाचा लक्ष्मणझुला आला. तिथून वर एका जागी जर्मन बेकरी व रेस्तराँ लिहिलेले दिसत होते पण ती ओरिजिनल नाही, ओरिजिनल तिकडे झुलेपार आहे अशी खबर असल्याने मुलींनी तिकडे दुर्लक्ष केले. ते रेस्तराँ खूप छान जागी आहे. थोडे उंचीवर असल्याने तिथे बसून लक्ष्मणझुला व परिसर व्यवस्थित न्याहाळता येईल असे वाटत होते.

लक्ष्मणझुल्यावर तुडुंब गर्दी होती. इतकी गर्दी की तुम्ही स्वतःची सेल्फी जरी काढलीत तरी तुमच्यासोबत अजून चार टाळकी फोटोत येतील. इतक्या गर्दीला सामावून घेणारा लोखंडी झुला चांगलाच मजबूत बांधलाय. इंग्रजांच्या काळात बांधलेल्या ह्या पुलावर तेव्हा जीप न्यायची परवानगी होती पण आता बहुतेक फक्त बाईक्सना परवानगी आहे. पूर्ण लोखंडी बांधकाम असले तर चालायचा रस्ता डांबरी आहे.

मला सहसा गर्दीत जायला अजिबात आवडत नाही पण इथल्या तुडुंब गर्दीत स्वतःला लोटून देण्याखेरीज दुसरा मार्ग नव्हता. गर्दी सगळी आमच्यासारख्या बघ्यांचीच होती. अशा लोकप्रिय जागी गेले की लोक किती फिरतात याची जाणीव होते. हाय फाय सॉफीसटीकेटेड ट्रॅव्हलर्स द
सगळीकडेच असतात. पण अशा लोकप्रिय ठिकाणी म्हातारेकोतारे, गर्दीला बुजलेल्या, प्रथमच प्रवासाला निघाल्यासारख्या दिसणाऱ्या बायका, अगदी लहान मुले, मोठी कुटुंबे घेऊन फिरणारे कुटुंबप्रमुख असे विविध प्रकारचे लोक असतात. सगळे त्याच उत्सुकतेने फिरत असतात. ताजमहलला सुद्धा असे विविध सामाजिक स्तरावरचे लोक दिसले होते. अशी ठिकाणे melting पॉईंट्स आहेत खरेतर. येणाऱ्याचा सामाजिक स्तर, पूर्वपीठिका निरनिराळी असेल पण इथे सगळे एका स्तरावर येतात, प्रत्येकजण त्याच औत्सुक्याने, आनंदाने ते ठिकाण पाहात असतो.

झुल्यावरच्या गर्दीत आम्ही तिघी मागेपूढे राहिलो. मुली खूप मागे राहिल्या हे लक्षात येताच मी तिथेच थांबून त्या येताहेत का पाहात होते तेवढ्यात एका मध्यमवयीन गृहस्थाने मला अडवून जरा फोटो निकालो म्हणत त्याचा मोबाईल माझ्या हातात दिला. मला हे काम अजिबात आवडत नाही कारण हातात कोंबलेल्या मोबाईलची कॅमेरा सेटिंग चटकन लक्षात आली नाहीत तर उगीच कानकोंडे वाटायला लागते. तितक्यात शामली येताना दिसल्यावर मोबाईल तिच्याकडे देऊन ह्या गृहस्थाचे फोटो काढ, मी ऐशूला शोधून आणते म्हणत मी सटकले. मी मागे जाऊन ऐशूला शोधून आणले आणि पाहाते तर शामली वाकडे तोंड करून हातात मोबाईल घेऊन उभी होती व तो गृहस्थ फुफाजी, तावजी, मौसीजी पुकारत फोटोसाठी माणसे गोळा करत होता. शेवटी त्याचे सगळे फुफाजी, ताऊजी, मौसाजी व त्यांचे चिल्ले पिल्ले एकदाचे एकत्र उभे राहिले व फोटो निघाला. त्याचा मोबाईल परत देऊन शामली मला म्हणते, हा माणूस ग्रेट होता, मोबाईल माझ्या हातात देऊन तो मागे फॅमिली शोधायला गेला.

इतक्या गर्दीतसुद्धा अधून मधून अशा मोकळ्या जागा सापडतात.

झुल्यावर इतकी गर्दी आहे तरी माकडे अजिबात न घाबरता लोखंडी बांधकामावरून सरसर चढत उतरत असतात. माकडे आजूबाजूला असताना हातात काहीही न ठेवणेच योग्य. मी माकडांचा वाईट अनुभव घेतलाय एकदा. ताजमहालला जाताना वाटेत गरज नसताना मथुरेला थांबलो. गाडीतून उतरल्याबरोबर चष्मा सांभाळा म्हणून ड्राइवरने सांगितले होते, सोबत केळी ठेवा म्हणूनही सांगितले होते. पण केळेवाले दिसले नाहीत व माकडे तोंडावरून चष्मा ओढून नेतील यावर मी विश्वास ठेवला नाही. मागून माझ्या खांद्यावर माकडाने त्याचा कोमल हात ठेवल्यावर मी मागे चेहरा वळवला, त्याने क्षणार्धात चष्मा ओढला व तो छतावर गेला. हे इतक्या झटपट झाले की मला तो थेट छतावर जात असतानाच दिसला, माझ्या पाठीमागे आलेला दिसलाच नाही. लोक ओरडले की केला फेको उसकी तरफ, वो चष्मा फेकेगा. आमच्याकडे केळेही नव्हते. चष्मा गेला.

भटके, बाईकवाले, सेल्फीवाले, फॅमिली फोटोवाले, थांबून खाली वाहात असलेली गंगा पाहणारे यांच्या गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या पुलाच्या मध्यभागी आल्यावर भणाणून जाणारा वारा अनुभवायला मिळाला. झुल्याची लांबी 137 मीटर आहे, खालचे गंगेचे पात्र तेवढे रुंद आहे. आणि गंगेची लांबी विचारूच नका. एवढा मोकळा अवकाश समोर आल्यावर भणाणता वारा असणारच. आम्ही तिथे थांबून वाऱ्याचा आनंद घेत असताना अचानक पायाखालची जमीन हलल्याचा भास झाला. दचकून आजूबाजूला बघितले तर बाकीचे लोकपण आमच्यासारखेच चकित झालेले दिसले. क्षणार्धात काय होतेय ते कळले. पूल चक्क झुलत होता. लक्ष्मण 'झुला' आहे हे माहीत होते पण तो असा झुलेल ही कल्पना केली नव्हती. आता एकदा शोध लागल्यावर मजा यायला लागली. झुला मस्त थोडा थोडा झुलत होता आणि रेलिंगला धरून सगळे झुलण्याचा आनंद घेत होते. तिथे बराच वेळ गंगा दर्शन, फोटोग्राफी, झुलने वगैरेचा आनंद घेतल्यावर तिथून निघून झोन्क गावी आलो. लक्ष्मण झुला गढवाल जिल्ह्यातल्या तपोवन व झोन्क ह्या दोन गावांना जोडतो.

झुल्यावरून दिसणारे गंगेचे विशाल पात्र

झोन्कमध्ये आल्यावर मात्र आता जास्त वेळ न दवडता बेकरी शोधा नैतर मिळेल त्या दुकानात शिरून कढीचावल ऑर्डर करेन म्हणून मी धमकी दिली. पुलाच्या खालीच पायऱ्या उतरून नदीच्या तटी जायची सोय होती. त्या पायऱ्यांवर एक हॉटेल होते. जर्मन बेकरी तिथेच अशी पक्की बातमी होती. पण तिथल्या रेस्तराँचे नाव काही भलतेच होते. मी म्हटले, खड्ड्यात गेली बेकरी, जे मिळाले तिथे जाऊ.

गंगा बीच रेस्तराँ असे मस्त नाव धारण केलेले ते हॉटेल बाहेरून छोटेसे दिसत असले तरी आत भरपूर जागा होती. बसायला भारतीय बैठक होती, टेबल खुर्च्याही मांडल्या होत्या. मांडी घालून आरामत बसायचे व बाहेर वाहणारी गंगा पाहायची. आम्ही गेलो तेव्हा तिथे फारसे कुणी नव्हते. संध्याकाळी गजबजाट होत असणार. मला जागा आवडली. शांत, निवांत एकदम. बाहेर एका कोपऱ्यात एक परदेशी ध्यान लावून बसलेला. रेस्तराँमध्ये जास्त गोंगाट नसलेली इंग्रजी गाणी अगदी बारीक आवाजात लावून ठेवलेली. मेन्यूमध्ये इटालियन, इस्रायली, इंडियन, चायनिज, थाई वगैरे पदार्थ होते. अर्थात सगळे शाकाहारी होते. ऋषिकेशला मांसाहार करतात का माहीत नाही. मुस्लिम जनता दिसत होती म्हणजे मांसाहाराची सोय असणार. पण आपल्याकडे हॉटेलात चिकन तंदुरी टांगलेले दिसतात तसे तिथे कुठेही दिसले नाही.

टेस्ट करून पाहू म्हणून मी जेवण येईपर्यंत लेमन टी ऑर्डर केला. चवीला चांगला होता. अर्थात हेमकुंडला प्यायलेल्या लेमन टी सारखा चहा कुठेही मिळणार नाही पण हा सुद्धा चांगला होता. मुलींनी मला अगम्य असलेले पदार्थ ऑर्डर केले, त्यातला फक्त पिझ्झा ओळखू आला. बाकीच्यांची नावे माहीत नसली तरी मला काही फरक पडत नव्हता. मी सगळे पदार्थ थोडे थोडे खाऊन बघितले. चवीला चांगले होते. तसल्या नावाचे पदार्थ इथे उगीचच 300 च्या पुढे किंमती लावून विकतात. त्यामानाने तिथे किंमती बऱ्याच ठीक वाटत होत्या व प्लेटी बऱ्यापैकी भरून येत होत्या.

गंगादर्शन करत दोनएक तास मन लावून खात बसलो. खाणे झाल्यावर बिल विल देऊन खाली आलो. ऐशूला तरी आशा वाटत होती की हीच ती बेकरी असणार पण आता नाव बदलले असणार. पण मालकाने गेल्या पंधरा वर्षात हॉटेलचे नाव बदलले नाही असे सांगून तिला निराश केले. तिला ज्याने सांगितले होते तो सहा महिन्यांपूर्वी ऋषिकेशला आला होता. पण पत्ता सांगताना त्याने उलट पत्ता सांगितला असणार. म्हणजे आम्ही ज्या बाजूला उतरलो त्याच्या विरुद्ध घाटावर तो राहिलेला असणार व त्यामुळे त्या बाजूने लक्ष्मणझुला ओलांडून तो बेकरीत आला असणार. असो. त्यानंतर आम्ही खाली जाऊन नदितटावर बसुन बराच वेळ घालवला. तिथले वातावरण खूप छान होते. धावती गंगा पाहात शांत बसून राहायचे. त्या बाजूलाच तेरा मंझील मंदिर हे तेरा माळ्याचे मंदिर आहे. पण तिकडे जायचे राहून गेले.

संध्याकाळ होत आली तसे परत निघालो. लक्ष्मणझुल्यावरून चालत परत तपोवनला आलो. आता झुल्याचा बाजार ओलांडला की रिक्षा स्टँड. असा विचार करत परतीचा प्रवास करत असताना शॉपिंग करायचा मोह झालाच. सहज म्हणून एका दुकानात टी शर्ट पाहिले व तिथे मुलींनी उत्तराखंड वगैरे लिहिलेले टी शर्टस, लेगिंगस, वूलन रॅकसॅक वगैरे घेतली. दुकानदार नेपाळी होता. त्याच्याकडे डबल मटेरियल लावलेले होजियारी कुर्ते, पॅन्टस, टी शर्ट वगैरे माल भरपूर होता व खूप छान होता. एकावर एक दोन मटेरिअल्स ठेऊन कापड शिवायचे. मग वर मशीनची शिलाई मारून आजूबाजूचे फक्त वरच्या थराचे कापड कापायचे. होजियरी असल्याने ते लगेच गोल फिरते व आतले कापड दिसते. अशी मशीन वापरून वेगवेगळी डिझाइन्स करायची व त्यावर अधून मधून हाताने भरतकाम करायचे. हे सगळे नेपाळवरून करून आणले म्हणून दुकानदार सांगत होता. तिथून निघून एका गुजराती दुकानदाराकडे जाऊन अजून थोडा खिसा हलका केला. पुढे जात असताना चुकून एका प्रेशस स्टोनच्या दुकानासमोर रेंगाळले. दुकानदाराने मला सिर्फ देखो देखो करत दुकानात नेले. हे उत्तरांचल उद्योग मंत्रालयाचे दुकान होते. तिथे गंडकी नदीतील शाळीग्राम घेतला. काही सेमी प्रेशस दगडांच्या माळा घेतल्या. हे दगड खरेच आहेत हे दाखवण्यासाठी त्याने लाईट्स बंद करून दगड एकमेकांवर घासुन प्रकाश पाडून दाखवला. ही रत्ने एवढी स्वस्त विकणे कसे परवडते यावर तो म्हणाला की हिमालयातील खाणीतून ही रत्ने मिळतात, सरकार रत्ने काढायचा व पॉलिश करायचा खर्च घेते. अर्थात मी फारसा विश्वास ठेवला नाही. पण खिसा मात्र खाली झाला.

तिथून पुढे आल्यावर गायत्री एम्पोरियम हे पुस्तकाचे दुकान दिसले. तिथे जाणे अनिवार्य होते. त्याच्याकडे पुस्तकांचा खजिनाच होता. भारतीय संस्कृती, तत्वज्ञान, आयुर्वेद, उपचार पद्धती, मानसशास्त्र,तिबेटी संस्कृती, योग... कुठलाही विषय घ्या, कुठलाही लेखक घ्या.... हिंदी व इंग्रजीत पुस्तकांचे भांडार तिथे होते. वेगवेगळ्या विषयांवर सीडीज होत्या. तिथे बरीच पुस्तके घेऊन उरलेला खिसा हलका केला. त्याच्याकडे सुवासिक, कफ, पित्त, वात प्रकृतीला योग्य अगरबत्या होत्या. . मित्रमंडळींना भेट म्हणून भरपूर पाकिटे घेतली गेली.

एवढी शॉपिंग करून खिसा बऱ्यापैकी हलका झाल्यावर रिक्षावाल्याने जिथे सोडले होते ती जागा आली. आता संध्याकाळची वेळ असल्याने तिथे भरपूर गर्दी होती व भरपूर रिक्षाही होत्या. मी तीन चार रिक्षावाल्याना विचारले. भारत मंदिर धर्मशाळेजवळ जायला कुणीही तयार नव्हते, सगळे बाहेर मेन रोड वर सोडणारे होते व सवारी तीस रुपये सांगत होते. तिकडे सगळा सवारीचा भाव असतो. जेवढ्या सवाऱ्या मिळतील तेवढ्या रिक्षात कोंबायच्या. मला तीस रुपये द्यायला त्रास नव्हता पण मेन रोडवरून भरपूर आत चालावे लागले असते. आमच्या हातात आता पुस्तके व इतर शॉपिंगचे ओझे होते त्यामुळे चालायची अजिबात इच्छा नव्हती. सकाळी दहा रुपयात आणून सोडणारा रिक्षावाला कोण देवमाणूस होता देव जाणे!!

आम्हाला रिक्षा मिळत नाहीय बघून माझी चिडचिड व्हायला लागली. माझा राग मी मोठ्याने मराठीत व्यक्त करू लागले, पाय अर्थात चालतच होते. जेवढे जमेल तसे चालू, रिक्षा मिळाली की तिच्यात बसू हा विचार करत चालत होते. तेव्हढ्यात एक रिक्षावाला आला व रिक्षा लावून आम्हाला बसा म्हणाला. मी कुठे जायचे हे सांगितल्यावर म्हणतो अंदर नही जाते, वहासे कोई सवारी वापस नही मिलती. मी वैतागले होते त्यामुळे रिक्षात बसले. आम्ही तिघी बसताच त्याने रिक्षा सुरू केली. मला आश्चर्य वाटले. मुझे और सवारी नही लेंनी असे रिक्षावाल्याने म्हटल्यावर भांग नसेल ना चढवली? असे मी मनातल्या मनात बोलून घेतले.

रिक्षावाला गप्पा मारायच्या मूडमध्ये होता.

आप महाराष्ट्रसे आये हो ना?
हम्म
मै आपको देखतेही जान गया आप महाराष्ट्रसे हो
अच्छा?
मै भी था महाराष्ट्रमे
कहा?
नाशिक
रिक्षा चलाते थे क्या?
नही, फॅक्टरीमे था
तो वापस क्यू आये?
राज ठाकरेके डर से
क्या?????

मला धक्काच बसला. तो म्हणाला की त्याच्या फॅक्टरीत काहीतरी युनियनचा प्रॉब्लेम झाला, त्यात याचा काहीतरी हात होता. प्रकरण हाताबाहेर जायला लागले तसा हा घाबरून तिथून पळून आला. मुझे वहा अच्छा लगता था लेकीन अब वापस नही जा सकता.

अशी बडबड सुरू असतानाच त्याने रिक्षा एक ठेल्याशी आणून लावली. मी बाहेर बघितले. जिथे आम्हाला सोडायची बात झालेली तिथून हा भाग खूप लांब होता. मी त्याला काही विचारणार तेवढ्यात तो रिक्षातून पायउतार झाला व ठेल्यावर जाऊन त्याने ऑर्डर दिली. ठेला एक मुलगी चालवत होती. भिजवलेले काबुली चणे, पांढरे वाटाणे, हरभरे इत्यादी कडधान्ये तिने हारीने मांडून ठेवलेली व ऑर्डर प्रमाणे हवे ते कडधान्य कढईत भाजून त्यावर मसाला, कांदा, चटण्या वगैरे टाकून देत होती. या बाबाने काबुली ऑर्डर केले व ते तयार होईपर्यंत तो मुलीशी गप्पा मारत उभा राहिला.

आम्ही तिघीही रिक्षातून पाहात होतो. शामलीला एवढा धक्का बसलेला की तिला बोलणे सुचत नव्हते. शेवटी थोडी सावरल्यावर ती म्हणाली, कसला कुल ड्युड आहे हा माणूस. आपल्या रिक्षात पॅसेंजर बसलेत, त्यांना त्यांच्या जागी वेळेत सोडायची आपली जबाबदारी आहे, आपण त्याचे पैसे घेणार आहोत याचे याला काहीही देणे घेणे नाही. हा आरामात रिक्षा लावून गप्पा मारतोय. आपण का नाही याच्यासारखे होत?

आधी मलाही धक्का बसलेला, पण नंतर हा असला अतरंगी रिक्षावाला आम्हालाच भेटायचा होता हा विचार करून मला जाम हसू आले. आम्ही महाराष्ट्रातले हे त्याने ओळखून मुद्दाम आम्हाला आत घेतले आणि आता अतरंगीपणा करत होता.

तोवर त्याची ऑर्डर बनवून झालेली. तिने पुडी पॅक करताना ह्याने अजून एक्सट्राची चटणी घालून घेतली व रिक्षात येऊन बसला व आरामात खायला सुरवात केली.

मै जबभी यहासे जाता हु, ये जरूर खाता हु. त्याने काहीतरी नाव घेतले त्या चाटचे. अच्छा है, आपभी खाके देखो.

मग मीही दहा रुपये देऊन एक पुडी मागवली. प्रकार एवढा काही खास नव्हता, ठीकठाक होता.

रिक्षावाल्याचे खाऊन झाल्यावर त्याला पाण्याची आठवण झाली. आम्ही भली मोठी बाटली घेऊन फिरत होतोच. त्यातलेच त्याला थोडे दिले. त्याचे सगळे आटोपल्यावर रिक्षा परत सुरू केली.

यहा सब आरामसे चलता है ना, मी त्याला विचारले.
हा, तो म्हणाला. ऋषिकेशमे तो सब आरामसे होता है, कोई जलदी नही। यहा तो सब फोकटमे मिलता है! फोकटका खाना, रेहना, मौत भी फोकट मे।
वो कैसे?
गंगामैयामे जाके डुबकी लगानेकी, मैया लेके जायेगी साथ। आपके यहा जहर भी खरीदना पडता है, ट्रेनके नीचे आ गये तो भी पैसा भरना पडता है।
मी म्हटले हा भय्या, ऐसा आराम तो सिर्फ यहीपर मिल सकता है!

यथावकाश तो अजून बडबड करत आमच्या इथल्या मेन रोड कॉर्नरकडे आला व रिक्षा आत घेतली. मला म्हणाला आपको जहातक जाना है, मै छोडता हु। मी म्हटले मी प्रति सवारी तीस रुपयांपेक्षा जास्त देणार नाही. तो हसायला लागला, आपका जो मन करे दे दो!

आम्हाला हवे होते तिथे उतरून त्याला टाटा बाय बाय करून उतरलो. खोलीत जायच्याआधी तो 20 x 2 पायऱ्यांचा डोंगर चढायचा होताच. हळूहळू खोलीत आल्यावर बेडवर अंग टाकून दिले. संध्याकाळी साडे सात, आठच्या सुमारास जाग आल्यावर रात्री नऊ वाजता परत एकदा त्रिवेणी घाटावर गेलो. घाटावर आता फारसे लोक नव्हते. पाणीही आधीच्या मानाने कमी झाले होते. वातावरणातले मनुष्यनिर्मित आवाज नाहीसे झाले होते. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीचा आवाज आसमंतात भरून राहिला होता. ते जादुई वातावरण अनुभवत थोडा वेळ बसून राहिलो व परत खोलीत परतलो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाचचे डेहराडूनहुन फ्लाईट होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी जरा आरामातच उठलो. ऋषिकेशला अजून बरेच काही पाहण्यासारखे होते पण मुली कंटाळलेल्या. मग मीही कंटाळा केला. इथे रूमवर चहा कॉफी वगैरे काही मिळण्यासारखे नसल्याने खाली जाणे भाग होते. तयार होऊन बाहेर आलो तर आमचा कॅम्पमेट अशोक निघत होता. त्याचेही फ्लाईट होते पण ते दोन वाजताचे होते. वाटेत रस्ता कसा आहे माहीत नाही म्हणून मी लवकर निघतोय म्हणून त्याने सांगितल्यावर आपणही लवकर निघायला हवे याची मी मनाशी नोंद करून ठेवली. येताना आमची रिक्षा पंक्चर झाली होती.

खाली आल्यावर हॉटेल मालक भेटला. त्याला हॉटेल बुकिंगसाठी ओळखपत्राची कॉपी हवी होती. मी फोटोकॉपी दुकान कुठे असेल म्हणून विचारल्यावर त्याने ती आयडियाच सोडून दिली व फक्त पाचशे रुपये घेऊन हिशोब मिटवला.

आम्ही राहात होतो तो भाग बराचसा निवासी होता, तिथे कुठलेही हॉटेल, ढाबा वगैरे काही नव्हते. रिक्षाही कुठे दिसत नसल्याने चालत मेन रोड पर्यंत जाणे भाग होते.
मी आजूबाजूला बंद दुकाने पाहात चालत असताना रस्त्याच्या कडेला एक ठेला दिसला. एकजण तिथे उभा राहून काहीतरी खाताना दिसला. मी तिथे मोर्चा वळवला. ऐशु नको नको म्हणून ओरडत होती पण तिकडे दुर्लक्ष करून मी डिशची चौकशी केली. ठेल्यावर छोले कुलचे मिळत होते. जो इसम खात होता त्याने जरूर ट्राय करो, अच्छे है म्हणून शिफारिस केल्यावर मी ठेलेवाला काय करतो हे बघायला लागले. तेवढ्यात कुणीसा बाईकवरून आला व पार्सलची ऑर्डर दिली. त्यामुळे मला पहिल्यापासून पदार्थाची रेसीपी पाहता आली. काबुली चणे हळद मीठ घालून उकडून परातीत भरून मंदाग्नीवर ठेवले होते. पळस, साग किंवा तत्सम मोठ्या आकाराची पाने बाजूलाच रचून ठेवली होती. ऑर्डर आली की एक मोठा डाव भरून छोले पानावर काढून घ्यायचे, त्यात बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घालून पानावरच मॅश करायचे, मग बाजूला ठेवलेल्या तीनचार कोरड्या पुडीतल्या चिमूट चिमूट पुडी त्यात टाकायच्या. बहुतेक चाट मसाला, गरम मसाला, आमचूर पूड, धनेजिरे पूड वगैरे मसाले असावेत. त्यावर हिरवी व चिंचेची चटणी टाकायची आणि सगळे परत पानावर चांगले फिरवून मिक्स करायचे. मग दोन्ही बाजूने एकेक टोमॅटो कांद्याची चकती लावून द्यायचे. कुलचे बहुतेक रेडिमेड होते. मी खाल्लेले मुंबईतले कुलचे व नान चवीला सारखेच वाटले होते, फक्त आकारात फरक होता. पण खरा कुलचा म्हणजे यीस्ट घालून फुगवलेल्या मैद्याच्या पिठाची जाडसर रोटी. यीस्टमुळे पीठ फुगलेले असते, कुलचाला आत थोडी जाळी पडते. ठेल्यावरचे कुलचे आतुन पावासारखे फुलले होते. भरपूर लोणी लावून तव्यावर गरम करून छोल्यासोबत दोन कुलचे मिळत होते. आम्ही तिघींमध्ये एक डिश घेतली. मुलींनी आधी भुवया उडवीत, काहीही खाते ही बाई असा चेहरा करत चव घेतली व दोघीही तुटून पडल्या. ऐशु छोले अजिबात खात नसे पण आता ह्या कृतीने घरी केलेले छोले कुलचे आनंदाने खाते. मायबोलीकर अल्पनाने लिहिलेली अमृतसरी छोले ही रेसिपी बरीचशी याच्या जवळपास जाते.

छोले असे दुलहनसारखे सजवून ठेवले होते

ही फायनल डिश:

कुलचे:

छोले कुलचे खाऊन जीवात जीव आल्यावर दुपारचे जेवण कुठे घ्यावे असा विचार करत मेन रोडच्या दिशेने निघालो. चोटीवाला रेस्तराँमध्ये जाऊन जेवावे, तिथे पोचेपर्यंत जेवायची वेळ झालीच असती. पायीच जाऊया म्हणजे वाटेत बघण्यासारखे काही असेल तेही बघून होईल असा कार्यक्रम ठरवून निघालो. मेनरोडवर थोडे पुढे गेलो तर आमचा ग्रुपलिडर महेश भेटला. त्याची दुसऱ्या दिवशीची ट्रेन होती. कुठे राहिलास म्हणून विचारल्यावर म्हणाला की अजून कॅम्पमध्येच मॅनेजर साहेबांसोबत त्यांच्या खोलीत राहतोय. त्याच्यासोबत तिथला लोकल माणूस होता. उत्तम जेवण कुठे मिळणार याचा पत्ता लोकल माणसाशिवाय अजून कोण सांगू शकणार? त्याला विचारले असता त्याने राजस्थानी मिष्ठान भांडारचे नाव सांगितले. अतिशय उत्कृष्ठ राजस्थानी व उत्तर हिंदुस्थानी जेवण मिळेल याची खात्री त्याने दिल्यावर पत्ता घेऊन आम्ही तिकडे जाण्यासाठी यु टर्न मारला.

त्या रस्त्यावर हा लोकल ओवन दिसला. यात बिस्किटे बनवून विकली जात होती:

बिस्किटे घरीच बनवून इथे फक्त गरम करत होता असे वाटले:

तोवर ऊन खूप वाढले होते पण रिक्षा मिळेना. शेवटी चालतच निघालो. मेन रोडवरून बरेच पुढे गेल्यामुळे परत तेवढेच मागे यावे लागले. राजस्थानी मिष्ठान भांडार मेन मार्केट रोडवरच खूप गजबजलेल्या भागात आहे. बरीच पायपीट केल्यावर एकदाचे पोचलो. दुकान बाहेरून नेहमीचेच वाटते पण पदार्थ खरेच ए-वन आहेत. त्यांच्या थाळीची वेळ झाली नव्हती व थाळी असती तरी फारसे काही खाल्ले गेले नसते म्हणून समोसा व कचोरी चाट मागवले. चव अप्रतिम, प्लेट दोन माणसांना पुरेल इतकी होती. थाळी खायची खूप इच्छा होती पण त्यासाठी खूप थांबावे लागले असते व तेवढी भूकही नव्हती. कधी ऋषीकेशला गेलात तर राजस्थानी मिष्ठान भांडारची वारी अजिबात चुकवू नका. त्यांचे इंटिरियर सुद्धा पाहण्याजोगे आहे. भिंती, कपाटे, टेबले, जिथे जागा मिळेल तिथे बोधवचने चिकटवलेली आहेत. Happy

समोसे:

चाट:

भरल्या पोटाने रमतगमत खोलीवर पोचलो. थोडा आराम केला व परतीच्या प्रवासाला सुरवात म्हणून खाली येऊन डेहराडूनला जाणारी रिक्षा पकडली. तासाभरात डेहराडून विमानतळ गाठले व तिथून फ्लाईटने मुंबई, एका नितांत सुंदर ट्रेकच्या आठवणी सोबत घेऊन!

*********

या ट्रेकमध्ये बरेच काही पाहिले, जेवढे पाहिले त्यापेक्षा बरेच काही पाहायचे राहून गेले. चारधाम यात्रा करावी हा विचार याआधी मनात चुकूनही कधी आला नव्हता. पण तिथे गेल्यावर चारधाम करावा हा विचार वरखाली उसळत राहिला. कधी वाटायचे की हा अनुभव घ्यायलाच हवा, तर कधी वाटायचे, नकोरे बाबा, परत हा प्रवास नको. तिथून परतल्यावर आता चारधाम करावासा वाटायला लागलेय.

मी अजून कुठेही पूर्ण प्लॅनिंग करून गेलेले नाही. अचानक ठरले, बुकिंग केले व तिथे गेल्यावर त्या भागाचा परिचय झाला असेच घडलेले आहे. हा ट्रेक युथ हॉस्टेलने प्लॅन केला असल्याने स्वतःहून करण्यासारखे काही फक्त शेवटच्या दोन दिवसातच शक्य होते. पण ट्रेकआधीचे दिवस खूप घाईत गेल्यामुळे फारसे काही ठरवता आले नाही. मला वाटते कुठेही जाण्याआधी असे प्लॅनिंग केलेले खूप चांगले. वेळ सत्कारणी लागतो. ऋषीकेशला जितके पाहिले त्यापेक्षा अजून बरेच काही पाहता आले असते. पण थोडा कंटाळा केला.

फिजिकल फिटनेस व स्टॅमिना किती महत्वाचा आहे हे या ट्रेकने ठळकपणे दाखवून दिले. हिमालयात जायचे तर फिटनेस हवाच. तो नसेल तर तुम्हाला पूर्ण आनंद घेता येत नाही. आता बहुतेक सगळीकडे हेलिकॉप्टरची सोय आहे. पण निसर्ग न्याहाळत पायी जाण्यात जी मजा आहे ती पाच मिनिटात हवेतून तिथे पोचण्यात नाही.

फुलोनकी घाटीतली बरीच फुले अजून पाहायची आहेत. जी पाहिली ती परत पाहायची आहेत. त्यामुळे परत जाणार हे नक्की...

सगळ्यात शेवटी युथ हॉस्टेलबद्दल. शेवटी त्यांचा थोडा गोंधळ झाला, अचानक माणसे जास्त झाल्यामुळे व्यवस्थापन बिघडले. पण हे वगळता, माझा युथ होस्टेलचा खूप चांगला अनुभव आहे. मी यापुढेही त्यांच्या ट्रेक्सना नक्की जाईन, फक्त जिथे तंबूत राहायचे ते ट्रेक्स टाळेन. Happy एकट्याने ट्रेक करायचाय पण तेवढी हिम्मत होत नसेल तर युथ हॉस्टेल बेस्ट, खूप सुरक्षित.

मात्र आम्हाला जसे सगळीकडे घोडे किंवा सामान उचलायला पोर्टर मिळत होते तसेच युथ होस्टेलच्या इतर ट्रेक्सवर मिळतील असे अजिबात नाही. इथे मिळाले कारण ही सोय इथे होती, युथ हॉस्टेलचा याच्याशी काही संबंध नव्हता. तुम्ही कुठे जंगलात किंवा बर्फात ट्रेकला गेलात तर तिथे स्वतःच सामान उचलून चालायची तयारी ठेवा. Happy

शेवटी एवढेच म्हणेन की बघण्यासारखे, अनुभवण्यासारखे भरपूर आहे. रोजच्या धावपळीतून वेळ काढून बाहेर पडा.

मंझील मिलही जायेगी, भटकते हुएही सही
गुमराह तो वो है, जो घरसे निकलेही नही।

***********

एकत्रित सर्व लिंक

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधना, ही हिमालयातली तुझी निसर्गरम्य साधना खूपच आवडली. मी आशा करते की मला अगदी फुलोंकी घाटी नाही तर निदान ऋषीकेश ला तरी जाता येईल. असेच लिहीत रहा.

अख्खी मालिका अगदी चाटून पुसून वाचली. म्हणजेच नेहमीप्रमाणे हे लेखन अर्धे मुर्धे वाचून पळ काढणे अशक्य झाले इतकी स्वतः बरोबर भ्रमंती करवणारी सुंदर लेखमालिका.
आता पुढच्या लेखनाची उत्कंठा निर्माण झाली आहे .

भुईकमळ Happy धन्यवाद.

रश्मी, व्हॅलीला पण जाता येईल आरामात. मनात इच्छा ठेव फक्त.

हीरा, हर्पेन, अनघा, Rockstar1981, मनी मोहोर, नरेश माने, राजसी, वंदना, वावे, जिप्सी, जाई, दिविजा आभार.

मंजुताई, अजून काहीच प्लॅन केला नाही. आमचे एक नातलग गुवाहातीत राहतात, त्यांनी दिवाळीच्या दरम्यान हवा चांगली असते म्हणून सांगितलंय. तेव्हा प्लॅन करायचे याचे प्लॅन गेले पाच वर्षे ठरताहेत Happy Happy

संपूच नये अशी वाटणारी मालिका ! अगदी प्रांजळपणे , कसलाही साहित्यिक किंवा सोशल सायंटिस्ट बडेजाव न करता लिहिलंय ते फार आवडलं.. दोन टीनेजर मुलींना घेऊन प्रवास करणे किती कठीण याची थोडीशी कल्पना आहे. तुम्ही तर इतक्या दुर्गम , इतक्या कठीण ठिकाणी गेलात त्याचं खरंच कौतुक. मुली सुद्धा बीचेस , रीसॉर्ट असं काहि नसलेल्या प्रवासात आल्या, अडी अडचणींनी नाराज न होता फिरल्या, मिळेल ते खाऊन पिऊन मजा केली हे सर्व वाचून फार छान वाटलं.

आणखीन वेगवेगळे प्रवास करा आणि तुमच्याबरोबर आम्हालाही फिरवून आणा .

. नर्म विनोद आणि तपशिलाचे बारकावे, माणसांचे स्वभाव, वर्तनातली विसंगती हे सर्व छान टिपलेले असते तुमच्या लेखनात. शुभेच्छा. >>>>>>>> + 999
अप्रतिम लेखनशैली, मज्जा आली वाचताना... Happy

अप्रतीम झालीये मालिका.

तू म्हणालीस तसे तीथेच ३-४ दिवस मुक्काम करायचा असेल तर कुठे रहायचे आणि जायची यायची व्यवस्था कशी करायची याची काही माहिती आहे का?

तिथेच म्हनजे व्हॅलीत ना? , घाअंगरियात हॉटेल्स आहेत भरपूर. तिथे राहून जा ये करावी लागणार. नेटवर पहा, हॉटेल बुकिंगसाठी. मी जे नंद पॅलेस लिहिलेय ( वर लिहिलेय कुठेतरी पुर्ण नाव, चेक करा, हे पूर्ण नाव नाहीय, आठवत नाही आता) तेही खूप मस्त आहे.

व्हॅलीत चालतच जावे लागते, जर पिट्टू किंवा पालखी नको असेल तर. घोडे जात नाहीत. पोर्टरच्या पाठीवरून जाणे मला खूप जड वाटत होते, आपले वजन कुणी दुसरा उचलणार म्हणून. पण येताना अगदीच नाईलाज झाला तेव्हा मी पिट्टू वापरला. रोज चालायची सवय असेल तर त्रास होणार नाही फारसा.

साधना, अप्रतिम लेख!
मुंबईबाहेर गेले की कोऱ्या, रंगहीन चेहऱ्याचे, खंगलेल्या शरीराचे, पाठीला बाक येऊन पोट त्याला चिकटलेले लोक दिसतात. सुख, आनंद, आशेचा स्पर्श कधी आयुष्याला झाला होता याची पुसटशी खुणसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर नसते. हे लोक कामे करत असतात, रिक्षा चालवायचे, ओझे वाहायचे, माल विकायचे.. जणू जन्मापासून तेच काम करताहेत व असेच करताकरता एके दिवशी संपतीलही. न समजता आला दिवस ढकलत काढणारे लोक!!>>>>>>>>>>हे वाचून फार वाईट वाटलं. मौज मजा तर सोड पण दोन वेळचं जेवणही मिळण्याचीही मारामार! किती विषमता आहे ना? ज्यांच्याकडे आहे त्यातले काही अन्न टाकूनही देतात. आणि काही लोक कायम उपाशी. Sad

संपूच नये अशी वाटणारी मालिका !>>++१
मलाही किडुक मिडुक सगळे लिहायचा कंटाळा येत होता पण म्हटले आता लिहायला घेतलेच तर पूर्ण करूयाच.>>> किडुक मिडुक पण छान वाटत होते वाचायला. Happy

मस्त झाली लेखमाला. आणि समारोपही तितकाच सुरेख!! तुमचे प्रांजळ लिखाण आणि ओघवत्या लेखनशैलीमुळे समोर बसून गोष्ट ऐकल्यासारखे वाटले. प्रवास करत रहा. लिहित रहा!!

चोटीवाला ऋषिकेषमध्ये खूप फेमस आहे म्हणे!! मला वाटले तुम्ही गेला असाल तर कळेल कसे आहे रेस्टॉरंट ते.

Pages